नमस्कार मंडळी,
उल्कावर्षावावर लिहून बरेच दिवस झाले. अदितीतै, चतुरंगकाका आणि घासकडवी गुर्जींनी सुचवल्याप्रमाणे त्यात अजून थोडी भर घालायचा हा एक प्रयत्न!
उल्कावर्षाव पहायचे अनेक मौके वर्षभर आपणास मिळतच राहतात. पण काही उल्कावर्षाव असे असतात की ते टाळून किंवा चुकवून चालतच नाही मुळी! अशाच प्रसिद्ध वर्षावांपैकी एक म्हणजे सिंह राशीतून होणारा उल्कावर्षाव! १७ नोव्हेंबर ही त्या उल्कावर्षावाची मुख्य तारीख मानली जाते. पण साधारणपणे १४ नोव्हेंबर पासूनच उल्का ठळकपणे दिसायला लागतात, त्या २२ ते २५ नोव्हेंबर पर्यंत तुरळक दिसत राहतात.
हा उल्कावर्षाव पहायचा तर तो तीन प्रकारे पाहता येतो.
पहिला पर्याय:
उल्कावर्षाव वगैरे खड्ड्यात घालून मस्त झोपून जावे. स्वप्नात उल्काच काय, चंद्र-सूर्य-तारे-रॉकेट-नील आर्मस्टाँग यापैकी सगळे एकाच वेळी दिसू शकतात. ;-)
दुसरा पर्याय:
हा प्रकार पहिल्या पर्यायापेक्षा अवघड असला तरी तसा सोपा आणि हवाहवासा आहे. रात्री १० नंतर (अर्थात जेवून) गच्चीत जावे. मस्तपैकी गादी वगैरे घालावी. कॉफीचा एक टंपास भरून घ्यावा. कॉफीऐवजी इतर मादक पेय असतील तरी हरकत नाही, पण त्या पेयांत दिवसाही उल्का चमकवायचे सामर्थ्य असल्याने उल्कावर्षाव-पेश्शल रात्री कॉफी, मसाला दूध वगैरे निरुपद्रवी पेयांवर विश्वास ठेवावा. मस्त गादीवर पडून आकाशाचे निरिक्षण करावे. बाजूला चान चान वाटतील अशी गाणी वगैरे लावावीत. अशी सर्व प्रकारची ऐयाशी करत उल्का पहाव्यात. अंधार्या रात्री उल्का दिसतातच. त्या कशा, का, कुठून वगैरे फालतू प्रश्न फाट्यावर! उल्का पाहून कंटाळा आला, आणि मित्र जमवलेच असतील तर पत्त्यांचा डाव टाकावा. व्वा! जन्नत! :-)
तिसरा पर्याय:
आधीच सांगतो की हा थोडा किचकट पर्याय आहे. यासाठी थोडीशी माहीती, थोडासा पेशन्स पाहीजे. त्यातल्या माहीतीचा पार्ट माझा, पेशन्स तुम्ही गोळा करुन आणणार असाल तर मात्र यासारखी मजा नाही! यात ऐषआरामाचा भाग थोडा वजा करावा वगैरे अशी अट नाही.
पूर्वतयारी म्हणून चंद्रास्त कधी आहे हे पहावे लागेल. कारण चंद्र कितीही सुंदर आणि रोमँटीक दिसत असला तरी चंद्रप्रकाशात लहान उल्का दिसत नाहीत. त्यामुळे चंद्र मावळतोय कधी हे पहावे लागते. यावेळी म्हणजे दि. १७ ला चंद्रास्त आहे पहाटे पावणेतीन वाजता! कार्तिक शु. एकादशी असल्यामुळे चंद्रबिंब सुमारे ८४% प्रकाशित आहे. त्यामुळे पश्चिम दिशेला फारसं काही दिसणारच नाही. हरकत नाही, पेशन्स!!
आता मुख्य काम! रात्री १२ नंतर गच्चीत जावे. १२ नंतर अशासाठी की आपले टारगेट असणारी सिंह रास मुळात उगवेलच १ च्या सुमारास. त्याआधी तुरळक उल्का दिसत राहतात. सिंह रास उगवून, चंद्र मावळून वगैरे गोष्टींसाठी पहाटेचे ३ वाजणारच! तोपर्यंत पत्ते, मसाला-दूध, कॉफी वगैरे मजा आहेच. नोव्हेंबरात गुलाबी थंडी वगैरे असणारच!
साधारण १ च्या सुमारास काम सुरु करायला हवे. आकाशातील काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. सर्वप्रथम दिशा समजून घ्यावी. या वेळी चंद्राचा उपयोग होईल, रात्री १ वाजता चंद्र मावळतीकडे गेला असणार. त्यामुळे पश्चिम समजली. पूर्व समजली. दक्षीण-उत्तर दिशा गरजेप्रमाणे समजून घ्याव्यात.
दुसरे म्हणजे तारकासमूह. आकाशात सिंह रास ओळखता आली पाहीजे. 'स्वदेस' चित्रपटात दाखवले तसे आपोआप आकार दिसत नाहीत. ते थोडेफार जुळवून, समजून घ्यावे लागतात. त्यासाठी सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे सर्वात ठळक रास/नक्षत्र शोधायचं. १७ तारखेच्या दिवशी सर्वाधिक सोपा तारकासमूह म्हणजे वृषभ राशीतील मृग नक्षत्र आणि मिथून राशीतले पूनर्वसू नक्षत्र!
हा आकाशाचा नकाशा १७ नोव्हेंबर रात्री १ वाजता:
वरील चित्रातील संपूर्ण आकाशाचा नकाशा जर रात्री गच्चीवर जाऊन डोक्यावर धरून दिशा जुळवून पहावा. नकाशा भारतात वापरण्यास योग्य आहे. परदेशातील इच्छुकांनी स्थानिक नकाशे वापरावेत. भौगोलीय फरकामुळे तारकासमूहाच्या आकारात थोडाफार सापेक्ष फरक पडतो.
मृग नक्षत्र कसे ओळखायचे ते सांगतो थोडक्यात. कल्पना करा की आकाशाच्या मधोमध पूर्व-पश्चिम एक रेषा आहे. ही अर्धगोलाकार रेषा म्हणजे १८० अंश! आपल्या डोक्यावर बरोब्बर नव्वद अंश होतात. या नव्वद अंशाच्या किंचित पश्चिमेला मृग नक्षत्र दिसेल. हरणाचे चार पाय, त्याच्या पोटात लागलेला बाण, त्या बाणाच्या रेषेत सरळ थोडा दक्षीण-पूर्वेला दिसणारा व्याधाचा ठळक तारा हे सगळं अगदी सहज ओळखता येतं.
मृग नक्षत्र (Orion) आणि व्याधाचा तारा (Sirius):
पूनर्वसू नक्षत्र सध्या आपल्या डोक्यावर आहे. (रात्री लवकर पाहीले तर अजून थोडे पूर्वेला हे नक्षत्र दिसेल.) आकाशात डोक्यावर एक समांतरभुज चौकोन दिसेलच. या चौकोनाचे एका बाजूचे दोन तारे ठळक आहेत, त्यांची नावे कॅस्टर आणि पोलक्स (Castor & Pollux). तिसरा तारा 'आल्मैसन' (Almeisan) थोडासा फिकट आहे, तो आणि चौथा अगदीच फिकट तारा आर्द्रा नक्षत्रात येतो. हे चार तारे मिळून 'स्वर्गाचे दार' (Gateway of heavens) हा पाश्चात्य तारकासमूह बनतो.
पूनर्वसू व आर्द्रा नक्षत्र:
आता इतके शोधून होईपर्यंत दोन अडीच वाजतीलच. पूर्वेला सिंह रास आकाशात नीटशी वर आली असेल आणि चंद्रसुद्धा अगदी मावळतीला गेला असेल. म्हणजे आपण ज्याची वाट पहात होतो ती वेळ जवळ आलीये. त्यासाठी फक्त एकदा सिंह रास समजावून घेऊयात.
पूर्वेला पूनर्वसू नक्षत्रानंतर 'पोलक्स'प्रमाणेच किंवा अजून ठळकपणे चमकणारा तारा दिसेल. हा सिंह राशीतल्या 'मघा' नक्षत्राचा तारा (Regulus) आहे. त्याच्या दक्षीण-पूर्वेला त्यापेक्षा थोडा फिकटसा तारा आहे तो 'उत्तरा फाल्गुनी' नक्षत्राचा तारा (Denebola) आहे. सिंह रास ही बरीचशी एखाद्या बसलेल्या सिंहाच्या आकारासारखी दिसत असल्याने ओळखण्यास त्रास होणार नाही.
सिंह रास, मघा आणि उत्तरा फाल्गुनी:
या वरील चित्रात दाखवल्याप्रमाणेच सिंह रास दिसत असल्याने ओळखू येईलच. यातील अल्जेईबा (Algeiba) तारा जो आहे तो आहे आपले आजचे आकर्षण केंद्र. म्हणजे उल्कावर्षावाच्या उल्का या तार्याला केंद्रस्थानी ठेवून पडतात. तांत्रिकदृष्ट्या, एखादी उल्का पडताना जर आपण तिचा काल्पनिक मार्ग काढला आणि तो जर अल्जेइबा तार्याच्या आसपास सुरु होत असेल तर ती उल्का ही सिंह राशीच्या उल्कावर्षावाची समजली जाते.
अर्थात, उल्का संपूर्ण पूर्वेला दिसत राहतील, सिंह रास पूर्वेला असताना आकाशात मध्यावरही उल्का दिसू शकतात. पण या असल्या रस्ता चुकलेल्या उल्का सिंह राशीच्या मानत नाहीत. त्याना 'स्पोरॅडिक' (sporadic) उल्का म्हणतात. आपल्याला जर सिंह राशीतून पडणार्या उल्का मोजायच्या असतील तर मात्र या स्पोरॅडिक उल्का सोडून द्याव्या लागतात. दर वर्षी या उल्कांचे तक्ते बनवून ते ईंटरनॅशनल मेटीयर ऑर्गनायझेशनला सुपूर्त केले जातात. हे तक्ते बनवायचे काम जरा कष्टप्रद आहे. उल्कावर्षाव हा अनुभवायचा भाग न राहता त्यापुढे जाऊन अभ्यासाचा विषय होतो तेव्हा हे कामही करावे लागते.
पण सध्या आपण ते काम न करता उल्कावर्षावाचा अनुभव घेऊ! गरमागरम कॉफी, गप्पा, आणि उल्कावर्षाव! तुमची एक रात्र वेगळ्या अनुभवात जायची खात्री! अर्थात हे सगळं न करता पहिला पर्याय आहेच. पण हा आयता मौका हातसे जाऊ देऊ नका आणि आपला हा अनुभव शेअर करायला विसरु नका ही नम्र विनंती!!!
टीप:
१. पश्चिमेला चंद्राजवळ एक तेजस्वी ग्रह दिसेल. तो 'गुरु' आहे.
२. थंडीसाठी आवश्यक ती काळजी घ्यावी.
३. लेखातून सुटलेली माहीती व चुका शोधण्यासाठी तज्ञांनी मदत करावी.
प्रतिक्रिया
16 Nov 2010 - 8:57 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
असुरा, समयोचित माहितीपूर्ण लेख!
मृगाच्या नकाशात फारच गर्दी झाली आहे, त्यामुळे मधल्या तार्यांची नावं वाचता येत नाहीयेत. बाकी तुला याच लेखासाठी अल्जिबाचं नाव हवं होतं काय? (मला उत्तर येत नाही.)
बाकी लेखाची सुरुवात वाचल्यावर 'तू मिपा सभासद आहेस' याची खात्री झाली! ;-)
16 Nov 2010 - 9:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माहितीपूर्ण लेख...!
-दिलीप बिरुटे
16 Nov 2010 - 9:17 am | ए.चंद्रशेखर
उत्तम लेख. मी २/३ वेळा हा उल्का वर्षाव बघितला आहे. मोठ्या शहरांच्यात अडचण अशी येते की क्षितिजाजवळ शहरामधील दिव्यांच्यामुळे एक प्रकारचा glow दिसत राहतो. यामधे उल्का नीट दिसत नाहीत. खेडेगावात किंवा कोठेतरी लांब राहून हा उल्का वर्षाव बघायला पाहिजे. तर खरी मजा ये ईल.
16 Nov 2010 - 9:35 am | अमोल केळकर
खुप छा न माहिती
धन्यवाद. बाकी पर्याय १ आवडला
अमोल केळकर
16 Nov 2010 - 9:41 am | नगरीनिरंजन
छान माहिती असुरराव! पृथ्वीवरच्या कोणत्याही स्थळावर त्या त्या वेळेप्रमाणे हाच अनुभव येईल काय?
16 Nov 2010 - 4:04 pm | असुर
>>> पृथ्वीवरच्या कोणत्याही स्थळावर त्या त्या वेळेप्रमाणे हाच अनुभव येईल काय? <<<
उल्कावर्षाव ही सूर्यग्रहणासारखी टाईम स्पेसिफिक घटना नाही की जी एका ठिकाणाहून दिसेल आणि दुसरीकडून दिसणार नाही. उल्का नोव्हेंबरच्या १० तारखेपासून ते साधारण २५ तारखेपर्यंत दिसत राहतात. पण आपल्या भौगोलिक स्थानफरकाप्रमाणे वेळ आणि उल्कावर्षावाचा सर्वाधिक उल्कांचा कालावधी (maxima) यात फरक पडतो.
यावेळी १७ नोव्हेंबरला जो सर्वाधिक उल्कांच्या कालावधीचा अंदाज वर्तवला आहे, तो दुपारी ३ वाजता जि.एम.टी. ते रात्री १२ वाजता जि.एम.टी. (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८:३० ते पहाटे ५:३०) आहे. या वेळेत उत्तर गोलार्धातून अतिपूर्वेकडे अलास्कापासून ते मध्य आशियापर्यंतचा भाग सामील आहे जिथे रात्र असेल, सिंह रास उगवली असेल आणि चंद्रास्त झालेला असेल. त्यापुढील देशांमधे उल्कावर्षाव दिसेलच, पण चंद्रप्रकाशामुळे फक्त हा 'मॅक्झिमा' पाहता येणार नाही!
सर्वांना हॅप्पी उल्कावर्षाव! :-)
--असुर
16 Nov 2010 - 9:43 am | श्रावण मोडक
चांगला लेख. माहितीपूर्ण आणि खास मिपाकर शैलीतील असल्याने या विषयात रस निर्माण करणारा.
चंद्रशेखरांनी शहरातील दिव्यांच्या ग्लोविषयी लिहिले आहे. त्यावर "प्रकाशाचे प्रदूषण आणि खगोल" अशा संदर्भात अदिती, असूर किंवा चंद्रशेखर यांनी लिहावे, ही विनंती.
16 Nov 2010 - 4:34 pm | असुर
प्रकाशाच्या प्रदूषणासंदर्भात मी थोडा माझा उजेड पाडतो. :-)
चंद्रशेखर म्हणतात त्यात तथ्य आहे. शहरातून पाहण्याऐवजी जर गावाबाहेरून अंधार्या जागी जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच जास्त प्रमाणात उल्का दिसतील.
याचे मुख्य कारण आहे ते म्हणजे प्रकाशाचे प्रदूषण. साधारणपणे एखाद्या मोठ्या शहरात प्रकाशाचे प्रदूषण इतके असते क्षितिजाजवळ सूर्योदयाच्या आधी दिसेल तसा प्रकाश दिसत राहतो. साधारणपणे +३ पेक्षा कमी तीव्रतेचे तारे दिसतच नाहीत. नुसत्या डोळ्यांनी आपण +६ पर्यंतच्या अवकाशस्थ गोष्टी पाहू शकतो.
उल्कावर्षावाच्या वेळीसुद्धा हा त्रास जाणवतो, कारण छोट्या उल्का ज्यांची तीव्रता +३ ते +६ आहे, त्या दिसत नाहीत. यावेळी ताशी ३० मोठ्या उल्कांचे (prominent of the shower) भाकीत केलेले आहे. त्यामुळे चान्स आहे.
मी सुरुवातीला एक दोन वर्षे घरूनच उल्कावर्षाव पाहीलेला आहे. हिरमोड नक्कीच होत नाही! :-)
पण, रात्री अशा शहरापासून दूर, अंधार्या जागी जायचे असेल तर आवश्यक ती माहीती आणि खबरदारी घ्यावी!
* शक्यतो गटानेच जावे, आपण कुठे जातोय हे घरी कुणालातरी नक्की सांगून ठेवावे.
* सेलफोनसहीत जाणे इष्ट!
* खाण्यापिण्याची आवश्यक ती सोय असावी.
* अशा मोकळ्या जागी रात्री थंडी आणि पहाटे दव यांचा हमखास त्रास होतो. त्यासाठी काळजी घ्यावी.
* शक्यतो मोकळ्या जागी जावे. डोंगरदर्यांमध्ये प्रकाशाचा त्रास नसला तरी संपूर्ण आकाश दिसायला प्रॉब्लेम येतो.
* अशा अंधार्या जागी जाताना बॅटरी/टॉर्च असावा. टॉर्चच्या तोंडावर बांधायला लाल जिलेटीन कागद वापरावा. अंधार्या जागी आपले डोळे अंधाराला सरावल्यानंतर टॉर्चचा उजेड डोळ्याना त्रासदायक ठरू शकतो.
नीट काळजी घेतल्यास आकाशनिरिक्षण हा निवांत आणि सुखाचा अनुभव ठरेल हे नक्की!
--असुर
16 Nov 2010 - 3:17 pm | चिगो
बघण्याचा प्रयत्न करेन.. धन्यवाद !!
16 Nov 2010 - 4:15 pm | नितिन थत्ते
त्यापेक्षा सकाळी चारला जाणे चांगले नाही का?
16 Nov 2010 - 8:01 pm | प्रभो
छान माहिती रे!!!
16 Nov 2010 - 8:55 pm | विकास
लेख एकदम आवडला.
नासाच्या संकेतस्थळावर उल्कावर्षाव कसा बघावा यावर काही माहिती मिळाली. ती अवश्य वाचा. उद्याच्या उल्कावर्षावासंदर्भात काही रोचक माहीती होती, ती खाली चिकटवत आहे:
Leonids
Comet of Origin: 55P/Tempel-Tuttle
Radiant: constellation Leo
Active: Nov. 7-28, 2010
Peak Activity: Night of Nov. 17-18, 2010
Peak Activity Meteor Count: Approximately 15 per hour
Time of Optimal Viewing: A half-full moon sets after midnight, allowing for a dark sky. Best viewing time will be just before dawn.
Meteor Velocity: 71 kilometers (44 miles) per second
Note: The Leonids have not only produced some of the best meteor showers in history, but they have sometimes achieved the status of meteor storm. During a Leonid meteor storm, many thousands of meteors per hour can shoot across the sky. Scientists believe these storms recur in cycles of about 33 years, though the reason is unknown. The last documented Leonid meteor storm occurred in 2002.
बाकी उल्का पडणार आहेत आधीपासून इतके डीटेल मधे कसे समजते? (सोपी / थोडक्यात माहीती असली तर अवश्य सांगा)
16 Nov 2010 - 9:45 pm | असुर
एक नंबर!
डायरेक नासा?? हे म्हणजे अॅसिडीटीमुळे छातीत जळजळ झाली म्हणून हृदयरोगतज्ञाला दाखवल्यासारखंच झालं की! ;-)
नासाबद्दल मला अगदीच आदर आहे! तिथे रॉकेटं उडवतात आणि भार्तात यायच्या आधी सारुक तिथेच कामाला होता म्हणून तर केवळ नतमस्तकच!
मस्त माहीती आहे ही! इंग्रजी असूनही मला कळली म्हणजे सोपीच आहे. :-)
--असुर
16 Nov 2010 - 9:35 pm | धमाल मुलगा
असूरसाहेब,
छान माहिती सांगितलीये.
माझ्यासारख्या ढ माणसालाही बरंचसं कळालं, ह्यातच तुमच्या ह्या लेखाचं यश आहे. :)
उद्या वर्षाव पाहण्याआधी एकदा तुम्हाला फोन करुन पुन्हा समजाऊन घेईन म्हणतो.
धन्यवाद. (माहितीपुर्ण लेख लिहिल्याबद्दल आणि लिहिते झाल्याबद्दलही. :) )
-(अश्नी) ध.
16 Nov 2010 - 10:49 pm | प्राजु
मस्त माहितीपूर्ण लेख!!
आणि लेख लिहिण्याची ष्टाईलसुद्धा मस्त आहे..
आणखीही येऊद्यात असे लेख.
17 Nov 2010 - 12:58 am | बेसनलाडू
(खगोलप्रेमी)बेसनलाडू
17 Nov 2010 - 12:22 am | मेघवेडा
मस्त रे! छान लिहिलंयस. आता लाईव्ह इव्हेंटच्या वेळी तू केंटात येतोयस की मी हर्टफर्डशरात यायचं? ;)
अवांतर : या उल्कावर्षावाचे रियल लाईफ इम्प्लिकेशन्स (असल्यास.. म्हणजे असतीलच की) काय असतील यावर जाणकारांनी प्रकाश टाकल्यास अजून मजा येईल!
17 Nov 2010 - 3:12 am | मराठे
आमच्या कार्टाच्या हट्टाचं निमीत्त करून एक छोटीच पण बर्यापैकी दूर्बिण (खिशाला परवडेल इतपत) घरात आणली. ती काल रात्री लगेच उद्घाटन केलं आणी चंद्रावरचे खड्डे व गुरु (हे सद्ध्या चंद्राच्या जवळूनच उरेनसला सोबतीला घेउन चालले आहेत) बघितले. दूर्बिणीवरून आठवलं...मी साधारण ६-७वी मधे असताना (नुकतच नारळीकरांचं प्रेषीत वाचल्यामुळे) बाबांकडे दूर्बिणीचा हट्ट धरला होता. त्यांनी मला शेवटी प्लास्टीकची फुगेवाल्याकडे मिळते ती दुर्बिण (?) आणली होती. त्याबद्धल तक्रार केल्यावर मला दूर्बिणीशिवाय सगळे तारे त्यांनी दाखवले होते. असो.
माझ्यासारख्या नवशिक्यांसाठी गूगलबाबांचं स्कायमॅप फार छान आहे. विशेषतः फोनमधे असल्याने त्याचा आणखी चांगला उपयोग करता येतो. आम्हाला अजून दूर्बिण नीट वापरता येत नाहिये, शिवाय आमच्या बाल्कनीतनं फक्त पूर्व आकाशच दिसतं. इथे थंडीमधे कोट, हातमोजे वगैरे घालून ती दूर्बीनीचं नळकांडं अॅड्जेस्ट करताना फार हाल होतात. पण एकदा का ते जमलं की मग त्याच्या सारखी मजा नाही.
उल्कावर्षावाबद्धल बरंच वाचून आहे पण अजुन बघण्याचा योग आला नाहिये. बघुया या वेळेला बघायला मिळतंय का ते.... इथलं आभाळ च्यायला बघावं तेव्हा ढगाळलेलं असतं.
17 Nov 2010 - 3:29 pm | ऋषिकेश
(तुम्ही जो मानता किंवा मानत नाही तो) देव करो आणि आज तरी रात्री पुण्यात ढग न येवोत!
17 Nov 2010 - 5:52 pm | असुर
देवाची कृपा असेल तर प्रश्नच नाही. सध्या बीबीसीच्या हवामानअंदाजाप्रमाणे पुण्यात आणि आसपास अंशत: ढगाळ हवामान आहे. ही त्याची लिंक!
सिमला ऑफिस वेधशाळेला फोनून तुम्ही स्थानिक माहीती मिळवू शकता! त्यांच्या वेबसाईटवर तरी विशेष माहीती दिसली नाही!
हा तिथल्या डेप्युटी डायरेक्टर जनरल (वेदर फोरकास्ट) यांचा फोन नं: 020-25535886!!
हॅप्पी उल्कावर्षावाच्या हार्दिक शुभेच्छा!! :-)
--असुर
17 Nov 2010 - 6:10 pm | नंदन
लेख!
--- क्या बात है!
>>> धन्यवाद. (माहितीपुर्ण लेख लिहिल्याबद्दल आणि लिहिते झाल्याबद्दलही. )
--- 'ध'शी सहमत :)
अवांतर - आजचा apod फोटूही पहावा.
21 Nov 2010 - 3:28 pm | मिहिर
उल्कावर्षाव पाहिला. बारा वाजण्यापासून जागण्याऐवजी पावणेतीनला उठलो. त्यावेळी बरेच ढग होते. नंतर जरा कमी झाले आणि थोड्या वेळाने आकाश निरभ्र झाले. सिंह रास शोधून काढेपर्यंत आणि ती नीट दिसेपर्यंत पावणेचार वाजले. त्यानंतर पावणेसहापर्यंत पाहात होतो.
एवढ्या सगळ्या वेळात मिळून एकूण १७-१८ उल्का दिसल्या. खूप छान वाटले. इथे पुण्यात. शिवाय बरोबरीने हॉस्टेलमधील १०-१५ मुले पण होती. खरेच खूप मजा आली.
21 Nov 2010 - 5:58 pm | असुर
व्वा! एक नंबर... आजपासून तुम्हाला 'ऊल्कावर्षाव पाहीलेला मानुश' अशी उपाधी देणेत येत आहे! :-)
मीही इकडे प्रयत्न केला, पण सगळ्या स्पोरॅडिक उल्का! कारण सिंह रास उगवून येईपर्यंत माझ्या गावी तुफान थंडी आणि रापचिक धुकं होतं! आकाश स्वच्छ होतं पण धुक्यामुळे चंद्रसुद्धा धुसर दिसत होता, तिथे उल्का काय दिसणार! सुरुवातीच्या दोन-अडीच तासात १२ उल्का पाहील्या तेव्हढ्याच!
बा़की कोणी उल्कावर्षाव पाहिला काय??
--असुर