दिवाळीची धामधूम. लोक गल्लीत फटाके, फुलबाज्या वाजवत आहेत. बहिणी भावाला ओवाळत आहेत, उत्सवी वातावरण! जीव कसा हरखून जातो ना?? माझाही जात होता. पण काल-पर्वाचे अॅटमबॉम्ब तसेच पडलेले असूनही मला ते वाजवावे वाटेनात. उगाच फालतू आवाज कशाला काढायचे. नुकताच गाडीवर दीड-दोनशे किलोमीटर जाऊन आलो होतो. त्यामुळे आपल्यालाही शरीर आहे हे जाणवत होते. आ:!!!! आई ~!!!! अर्धाकप चहा दे बरं ! खिडकीतून गल्लीतला फटाक्यांचा नजारा पहात-पहात आपसूकच मातोश्रींना ऑर्डर गेली. तेवढ्यात बाहेर वेगळेच आवाज होऊ लागले होते.
धाड्ड...धाड्ड.. फड्ड्ड...फड्ड्द..
काय आहे म्हणून बघायला बाहेर पडलो. गल्लीतील सगळ्यांची दारं फडाफड बंद झाली होती; आणि खिडक्यांच्या गजांना तोंड लाऊन लोक गल्लीत डोकावत होते.
एऽऽऽऽ पोलीसांना फोन लावा रे! सगळ्या मूडचा सत्त्यानाश साला.
"ओ कुलकर्णी, आत जा.. मरायचं आहे का?" खिडकीतून कुणीतरी ओरडले.
माझ्याएवढाच एक मुलगा होता. हातात एक लांबसर फरशी घेऊन तो कुणाच्यातरी दारावर जोरजोरात मारत होता. आयला ! काय झालंय ते त्याला विचारावं म्हणून त्याच्या दिशेने गेलो. दारावर फरशी मारमारून त्यानं दारावरची नक्षी पार उखडून टाकली होती. त्याच्या अंगात संचारलेल्या त्या अद्भुत शक्तीनिशी तो दारावर फटके देत होता. ते फटके मारताना त्याला बाकी जगाची काहीच तमा नव्हती. व्हाट ए ब्युटीफूल व्हायोलन्स ! पण कशाचं काय, ते वाक्य मनात चमकून विझले नसेल तेवढ्याच एका क्षणभरात माझ्या दिशेनं असलेली त्याची पाठ वळली आणि डोळे माझ्यावर रोखले.
"व्हीफ्ह्ह्हऽऽऽऽ व्हीफ्ह्.... जवळ येऊ नको.. दगड डोक्यात घालील हांऽ.."
त्याच्या नाकपुड्यांतून प्रचंड शक्तीने आतबाहेर होत असणारा श्वास आणि त्याचा तो भयानक पवित्रा पाहुन मला काहीच सुचलं नाही आणि "एऽऽऽ मारू नको.. मारू नकोऽऽऽ" एवढेच शब्द तोंडातून बाहेर पडून मी परत घराकडे पळालो आणि दारात उभा राहून पुढे काय होतंय ते पाहू लागलो.
"घरात हो रे गाढवा!~! त्याचं डोकं फिरलंय, जवळ जाऊ नको त्याच्या, दार लाऊन घे पटकन!" हातात कप घेऊन आलेली आई ओरडली.
"थांब गं तुऽ.. पाहु दे मला.."
तो पुन्हा एकदा त्या दारावर दगडाचे फटके देत होता. त्या दाराच्या आतले लोक लिहून दाखवता येणार नाही अशा भेदरलेल्या आवाजात मोठमोठ्यानं ओरड्त होते. दार कोयंड्याच्या एकाच खिळ्यावर तटून राहिले होते आणि दगडाचे फटके बसताच "दाण्ण!! दाण्ण!!" असे आवाज निघत होते. तेवढ्यात कुणीतरी बहाद्दर एका लांबक्या फरशीचा तुकडा हातात घेऊन त्या पोराच्या दिशेनं धावला.
"दगड खाली टाक साल्याऽऽऽ दगड खाली टाक म्हणतो नाऽऽऽ..." फरशी त्या पोरावर उगारत तो धमकवू लागला.
"तुम्हाला काय करायचंय?? जा तुम्ही...जाऽऽ"
एवढ्यात आणखी चार-पाच जण घराबाहेर पडले आणि त्या सगळ्यांनी त्या पोराभोवती कोंडाळे केले. मी पण त्यात घुसलो. आरडाओरड्यात कुणीतरी त्याच्या हातातली फरशी खेचून दूर फेकली आणि मग ते चारपाच जण त्याला धरून बुकलू लागले.
"मॅड झालंय सालंऽऽ आईचा जीव घेत होतं स्वत:च्याऽऽऽ ठोका साल्याला... ए शैलेश, दोरी आणऽऽ.. दोरी आण म्हणतो नाऽऽऽ "
"तुम्हाला काय करायचंय??.. मी तुम्हाला काही करतोय का?"
"साल्या इथं आमची लेकरं खेळत होती..डोक्यात फरशी घातली असतीस म्हणजे.." या माणसानं फटाफट त्याच्या थोबाडीत लगावल्या.
"पैशे देतो ना मी तुम्हाला... देऊन टाकतो तुमचे पाच हजार रूपयेऽऽ"
"बांधा रे आधी त्याला.."
"होऽऽ होऽऽऽ आधी त्याला बांधून टाका.. मरायचं कुणी च्यायला.."
"मी काही करीत नाही कुणाला.. तुमी जा इथून.. मी आत जाऊन बसतो.."
"पोलीसला फोन लावाऽऽ याचा काही भरवसा नाहीऽऽ.. तोपर्यंत बांधून टाका आधी याला "
बांधाण्याचे नाव ऐकताच त्याच्या भोवती जमलेल्या कोंड्याळ्याला धक्का देत, त्याला धरू पाहाणार्या लोकांच्या हातांत नख खूपसून रक्त काढीत तो कोंडाळ्यातून बाहेर पडला आणि शेजारीच असलेल्या त्याच्या दोन खोल्यांत पळाला. लटलट उडणारे माझे काळीज आता नॉर्मल झाले होते आणि आता मलाही धैर्य आले होते. त्याच्या खोलीच्या बंद होत असलेल्या दारावर मी धडक दिली आणि आत घुसलो.
"बाहेर होऽऽ बाहेर हो म्हणतो ना साल्या.. बाहेर निघ आधी.."
"तु जा उगं इथून.. पहार घालीन डोक्यात तुझ्या.." त्याच्या ओठातून आलेलं रक्त मनगटानं पुशीत तो म्हणाला.
"हे बघ.. एकटा आत बसू नकोस.. बाहेर चल..माझ्याघरी चल... "
"जा त्याला घेऊन तुमच्या घरी च्यायची पिडा.."
"हा कुलकर्णी पण मॅड्च आहे..त्याला कशाला घरी घेऊन जातो रे.. आधी त्याला बांधा आणि इथंच पडू द्या पोलीस येईपर्यंत.."
"ओ मालक, पंधरा मिनीटात तुमची दोरी सोडील तो.. आणि हा उद्या फॅनला लटकलेला दिसला ना मग विचारीन तुम्हा सगळ्यांना मी.." मी पण आता चेकाळलो होतो.
आता लोक हादरले. त्याला बाहेर घ्या, बाहेर घ्या म्हणू लागले आणि त्याला सगळ्यांनी बाहेर काढायला सुरूवात केली.
शेवटी त्याच्या घरासमोरच्या फ्लोअरींगवर तो जाऊन बसला आणि दोन पांयात डोके लपवून ढसाढसा रडू लागला.
"रडतंय कसं आता, दारूफिरू पिऊन आलंय का बघा..." माझ्या शेजारीच उभे असलेले कुणीतरी ओरडले. जरा जवळ गेलो तर याच महाशयांच्या तोंडातून दारूचा बेक्कार वास येत होता.
"तुम्ही जा इथून.. मी काही करीत नाही कोणाला, पैशे देऊन टाकतो मीऽऽ "
"स्वत:च्या आईचा जीव घेत होतास साल्याऽऽ तु काय पैसे देणार रेऽऽ दार मोडलंस माझं.. " हे त्याचे घरमालक होते.
"देतो ना तुम्हाला पाच हजार रूपयेऽऽ " रडतारडता तो म्हणाला.
गर्दीतल्या टग्यांनी अर्वाच्य शिव्या देत त्याच्यावर आणखी एकदा हात मोकळा करून घेतला. तोपर्यंत कुणीतरी दोरीपण घेऊन आले होते.
"असं करा, त्याला बांधाच. नको उगं पीडा मोकळी." आसाराम बापू स्टाईल दाढीमिशा असलेला एक म्हातारा म्हणाला.
पुन्हा एकदा जबरदस्तीने त्याला त्याच्या घरात नेण्यात आलं आणि कॉटवर आडवा झोपवून हात, पाय पक्के बांधण्यात आले.
"बघून घेतो एकएकाला.. बघुन घेतो.."
"मॅड झालंयऽऽ बार्हाळेकडं न्या त्याला"
"कोण नेईल बॉऽऽ गळाफिळा दाबायचं रस्त्यात आपलाच"
"पडू द्या त्याला इथंच.. "
मग गर्दी काय झालं होतं कशामुळं झालं होतं वगैरे चर्चा करण्यात गुंतली. काही लोक उगाच मधूनमधून त्या खोलीत चकरा मारू लागले.
मला मात्र नेमकं कुणाचं डोकं सरकलंय ते कळेना. नुसता मतांचा हलकल्लोळ माजला होता. डोकं दुखू लागलं.
घरी परत आलो. कॉम्पुटरसमोर ठेवलेल्या चहावर आता साय आली होती.
प्रतिक्रिया
7 Nov 2010 - 11:07 pm | गवि
काय भारी आहे रे. कोणतीही गोष्ट पर्सिव्ह करण्याच्या तुझ्या वेगळेपणा विषयी मला तुझ्या प्रत्येक लिखाणात कौतुक वाटत आलंय.पत्रकार आणि साहित्यिक यांचं ऑप्टिमम काँबिनेशन ग्रेट..
7 Nov 2010 - 11:11 pm | झंम्प्या
खरच कळत नाही की कोण मॅड आहे ते... का तो असा वागत असेल ह्याचा विचार नं करता प्रत्तेक जण आपापल्या परिणे त्याला मॅड ठरवूण मोकळा होतो. आजकालचं जिवण असंच होवून बसलय... आपन सुध्दा स्वतःला कित्तेकवेळा मॅड ठरवूण मोकळे होतो.
मणाला भीड्ला तुमचा लेख.
7 Nov 2010 - 11:13 pm | शिल्पा ब
छान लिहिलंय...
त्या माणसाबद्दल वाईट वाटले...सत्यकथा असेल तर त्याला मानसोपचाराची गरज आहे असे वाटते..
7 Nov 2010 - 11:21 pm | पैसा
असंच वाटतंय...
8 Nov 2010 - 4:40 am | शुचि
जिवंत लिखाण असतं तुमचं.
8 Nov 2010 - 6:42 am | स्पा
अप्रतिम........
जबरदस्त जिवंत लिखाण....
असा वाटत होत कि डोळ्यासमोर घडतंय... सगळ....
असेच लेख येउद्यात..... ;)
8 Nov 2010 - 6:52 am | सहज
पण सगळे काही (लेखन, कथानक, पात्रे, लेखक) शीर्षकाप्रमाणेच! ;-)
8 Nov 2010 - 7:49 am | यकु
.
9 Nov 2010 - 7:36 am | स्पंदना
बापरे !! त्याला साभाळायला कोणी नाही का?
अगदी डोळ्यासमोर घडल्या सारख वाटतय.
21 Dec 2010 - 5:50 pm | स्वैर परी
खुप सुंदर लिहिले आहे. असे वाटत होते, डोळ्या समोर घडते आहे!
लिखाणाचे शैली जबरदस्त!