गौळणी!!!

मस्त कलंदर's picture
मस्त कलंदर in जनातलं, मनातलं
2 Nov 2010 - 11:02 pm

सगळीकडे दिवाळी चालू होते धनत्रयोदशीला. पण काही घरांसारखी माझ्याही घरी ही चाहूल आधीपासूनच लागते. आधी घरी चार-पाच म्हशी होत्या तेव्हा काही काळजी नसायची. एकादशीला आई, आत्या, आणि घरोघरच्या लक्ष्म्या भल्या पहाटे उठत. (आता असे फक्त म्हणावं लागतंय. एकादशीला घरी असल्याला लै सालं उलटली). आम्ही त्यानंतर अर्ध्या तासाने डोळे चोळत बाहेर जाऊ तोवर तिचा अंगणात शेणसडा घालून झालेला असायचा. मला आईच्या कामात लुडबुड करायची असायचीच, पण ती मोठ्या ठामपणे माझा बेत हाणून पाडायची. तिथून उठून रांगोळ्या काढणार्‍या बहिणींच्यात गेले, तरी तिथेही तीच गत. मग मी येऊन पायरीवर बसून दोन्ही हातांच्या ओंजळीत हनुवटी घेऊन आई काय करते हे एकटक पाहात राही. आणि बघता बघता माझ्या अंगणात इवलंसं एक नगरच अवतरे!!!

आईचं एक तंत्र होतं. शेणाचा छोटासा गोळा दोन्ही हातात घेऊन ती त्याला आकार देई, अशी आधी नुसती धडे बनवून बाजूला ठेवे, मग त्यांना योग्य जागी ठेवे, आणि मग डोकी आणि नंतर त्यांना हात चिकटवे. मी आईला बर्‍याचदा गूळ लावून मला एक-दोन तरी गौळणी बनवायला दे असे म्हणत असे. तिने एकदा खरेच दिलं खरं, पण माझ्या गौळणी फारच नम्र झाल्या होत्या. उभ्या राहिल्या खर्‍या, पण कमरेत भलत्याच वाकल्या होत्या.

वसुबारसेला चालू झालेला हा सोहळा संपतो तो बलिप्रतिपदेला. बळीराजाची सर्वांना माहित असलेली तीच ती छोटीशी गोष्ट. बळी राजाचे पुण्य खूप झाले, इतकेकी त्याला देवांचा राजा करतील की काय अशी इंद्राला पुन्हा एकदा भीती पडली. त्यानं श्रीविष्णूला साकडं घातलं आणि पुण्यवान बळीला स्थान मिळालं ते पाताळात. त्या बळीचे पूजन जरी बलीप्रतिपदेला होत असलं तरी, त्याचं स्मरण करण्याची ही आगळीवेगळी प्रथा विलक्षणच. लहानपणी खूप कुतुहल असे, आईला प्रश्न विचारूम मी भंडावत असे. आता हे काम भाचरं करतातच.

हे नक्की असतं काय? तर, बळी राजाच्या राज्यातले एक छोटंसं नगर. जिथे सगळेजण गुण्यागोविंदाने राहतात. तिथे समृद्धी आहे, संस्कृती आहे, कामसू वृत्ती आहे. थोडक्यातच सांगायचं तर या पुण्यशील राजाच्या राज्यात सगळीकडे आनंदीआनंद आहे. ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रजानन त्याची सेवा करतात. हे इतकं सगळं दाखवताना तिथे अवतरतात, गौळणी!! मुख्य असतो तो बळीराजा. नगरीत दिसणारा एकमेव पुरूष. बाकीचे कुठे गेलेयत तडमडायला या प्रश्नाचे उत्तर मला अजून मिळाले नाहीय. तर हा निवांत पहुडलेला असतो. त्याच्या हातापायाशी, डोक्याशी गौळणी त्याची सेवा करत असतात. हा बळी पडला राजा. त्यामुळे त्या बळीला सजवण्याचीही अहमहिका लागलेली असते. त्याचा हार, मुकुट, भलादांडगा करदोडा, वाळे हे तर नेहमीचेच. त्यासोबत छोटेमोठे हार आणि इतर दागिन्यांचे तर काही विचारायलाच नको. आणि त्यात बारकावे इतके, की त्याच्या मानेखाली एक छोटीशी उशीही दिली जाते. हा आमचा साधासुधा बळीराजा.

गौळणी घालताना पहिला मान बळीराजाचा. तो एकदा तयार झाला की, कल्पनेच्या भरार्‍या चालू होतात. जणू या गृहिणी आपल्याच रूप या कामाकाजात गुंतलेल्या गौळणींमध्ये पाहतात. कुणी भल्यापहाटे जात्यावर जावेला नाहीतर नणंदेला सोबत देत धान्य दळते, कुणी स्वयंपाक रांधते, कुणी तुळशीवृंदावनासमोर घरच्यांसाठी-तिच्या धन्यासाठी आरोग्य, समृद्धी मागते, कुणी गायींना पाणवठ्यावर नेते, कुणी बाजारहाट करते, एक ना दोन. पण त्या गौळणींना मात्र आभूषणांचं लेणं नाही. त्यांचं लेणं म्हणजे, बोटाशी पोर आणि डोईवर घमेलं नाहीतर हातातलं काम. घमेल्यावाल्या गौळणीच्या म्हणजे बाजारात जाणार्‍या. माझी मामी मग त्या प्रत्येक गौळणीच्या डोईवरच्या घमेल्यात काही ना काही ठेवतेच. मग एकजण कांदा-मिरच्या घेऊन येते, दुसरी नुसतीच भुईमुगाच्या शेंगा तर तिसरी दुसरंच काही. कधी कधी भाकरीच्या करणारीच्या तव्यावर, टोपलीत, हातात इवलुशा भाकरीही ठेवते. तिच्या कडच्या गौळणी सगळेजण आवर्जून पाहायला येतात. तसं प्रत्येक घरापुढचे नगर वेगळं. पण यात वेशीत आपल्या सखीला भेटणारी आणि लेकुरवाळी अशा गौळणी आणि दरदिवशी मोठा होत जाणारा डोंगर या गोष्टी मात्र सगळीकडे अगदी मस्ट!!! सगळ्यांच्या गौळणी पाहाव्यात आणि नुसतं घरधनीणीचं कौतुक करत रहावं.

कामात गर्क गौळणी:

रोज रोज मात्र तेच ते केलं जात नाही. वैविध्य हवंच, नाही का? मला या डोंगराचे महत्व किंवा त्याचे अस्तित्व का असावे हे अजून कळालं नाही. वसुबारसेला डोंगराचा एकच थर असतो. हा असा:


त्यामुळे काही गौळणी नगरात तर काही या डोंगरावर असतात. काहींची बाळंही त्यांच्यासोबत असतात. दुसर्‍या दिवशी आणखी एक थर पडतो, तिसर्‍या-चौथ्या दिवशी मग डोंगर खर्‍या अर्थाने डोंगर म्हणण्यासारखा उंच होतो.

हा फोटो तिसर्‍या दिवशीचा असावा. बारकाईने पाहिले तर तीन थर स्पष्ट दिसताहेत. आत्याचे काम अजून चालू असतानाच मी हा फोटो काढलाय. इथे वेशीतल्या गौळणीच्या कडेवर बाळ आहे.

या नगरात अगदी खर्‍याखुर्‍या नगरासारखी जिवंतपणाची सळसळ असते. काहीजणी डोंगर चढत असतात, काहीजणी मुक्कामाला पोचलेल्या असतात, एक भाकरी तव्यावर, दुसरी हातात, काही भाकरी तयार होऊन टोपल्यात विसावलेल्या असतात, काही गायी पाणवठ्यावर पोचलेल्या असतात, एखादे चुकार वासरू आपला पाय मागे ओढत असते, वर्णन करू तितके कमीच!! प्रथा कुणी चालू असावी माहित नाही, पण हे असे जिवंत चित्रण एखाद्या कलाकाराच्या कलाकृतीइतकंच मला भावतं!!!

बळीपाडव्याच्या दिवशी मात्र चित्र एकदम पालटतं. बळीराजा उठून उभा राहतो, सगळ्या गौळणींची पूजा होते आणि त्यांची घरच्या पांढर्‍याशुभ्र शेवयांनी सजलेली छोट्या छोट्या पानांची पंगत बसते. ज्वारीची कणसासहित पाच धाटे आणि एक ऊस यांचा झोपडीसदृश आकार त्याच्या डोईवर विसावतो. इतर दिवशी या नगरात नसणारी दिपमाळ यादिवशी मात्र या चित्रात किमान एकतरी हवीच. बहुधा ही पंगत गावातल्या चौकात किंवा ग्राममंदिरात बसत असावी. आता मला नांव आठवत नाही, पण या सगळ्या गौळणींना पांढरे पण टोकाशी गुलाबी होत जाणारे गवताचे तुरे खोचले जातात. ते नाही मिळाले तर मग झेंडू आणि मखमलीची फुले असतातच.

वरती चित्रात ही आडवी काठी दिसते ती वेस आहे. वेशीतच नेहमी गाठभेट होते याचा प्रतिकात्मक अर्थ घरी पाहुणा येणार हे माहित असेल तर त्याला सामोरे जाऊन तिथेच गळाभेट घेऊन घरी मानाने आणणं असावं. वेशीच्या वरच्या बाजूला दोन-तीन फुले ल्यालेली आकृती दिसतेय, ही आहे दीपमाळ. मोठ्या मंदिरांत ही सहसा असतेच. तिच्यावर आता समारंभाला पण पूर्वीच्या काळी अंधारून आलं की दिवे, पणत्या ठेवल्या जात.
आदल्या दिवशीच्या गौळणी दुसर्‍या दिवशी उत्तरपूजा करून मोडल्या जातात आणि त्यात नवीन शेण मिसळून पुन्हा नव्या गौळणी बनतात. पाडव्यानंतर मात्र या सगळ्या गौळणी चांगल्या वाळवून शेण्यांच्या *हुडव्यात ठेवतात आणि मग कधीतरी बंबात जातात.

आता घरी म्हशी नाहीत, आणि आईलाही मधल्या काळात झालेल्या छोट्या अपघतानंतर जास्त वेळ चवड्यावर बसवत नाही. गेल्या वर्षी आत्याने घातलेल्या गौळणींचा फोटो काढला आणि तिला म्हटले, “मी यावर इंटरनेटवर लिहीन.” जाम खूष झाली ती. आता घरी गेले की तिला हा लेख आणि त्यावरच्या प्रतिक्रिया दाखवेन, म्हणजेच ती आणखी्च खूष होऊन जाईल!!!

*हुडवा: उन्हाळयात शेण्या चांगल्या वाळवून त्या व्यवस्थित गोलाकार रचून त्यावर पुन्हा शेणाचा जाडसा थर देतात. पावसाळ्यात भिजूनही याचे फारसे नुकसान होत नाही. गरज पडेल तशी एका बाजूने या हुडव्याला छोटे भगदाड पाडून आतल्या शेण्या बाहेर काढल्या जातात.

संस्कृतीसमाजमाहितीआस्वाद

प्रतिक्रिया

Dhananjay Borgaonkar's picture

2 Nov 2010 - 11:06 pm | Dhananjay Borgaonkar

खुपच मस्त कला आहे ही. मी पहिल्यांदाच अस कहीतरी पहातो आहे.
अतिशय सुंदर आठवण :)

मुक्तसुनीत's picture

2 Nov 2010 - 11:08 pm | मुक्तसुनीत

उत्तम , प्रसंगोचित लिखाण. पारंपारिक कलाप्रकाराची सुरेख ओळख.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Nov 2010 - 11:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

या प्रकाराबद्दल आज दुपारी तुझ्याशी चॅट करेपर्यंत मला कल्पनाही नव्हती. छानच लिहीलं आहेस आणि फोटोही आवडले. या वर्षी घरी बनवलं आहेस हे सगळं का कुठून पैदा केलेस फोटोज?

काही गॉसिपप्रेमींसाठी: तेव्हा मी आणि मकी बोलत होतो त्याची विस्तारीत आवृत्ती वरच्या लेखात आहे. आणि माझं एकच वाक्य होतं, "एकूणच रूढी, परंपरा, धर्म, देव इ.इ. गोष्टींपासून मी स्वतःला बरंच वाचवलं आहे."

मस्त कलंदर's picture

2 Nov 2010 - 11:26 pm | मस्त कलंदर

सौ: सौ. उषा!!! हे सगळं माझ्या आत्याने केलंय. आधी सहज म्हणून एका संध्याकाळी गौळणी अगदी वाळून गेल्यावर फोटो काढला होता. आणि मग म्हटलं की एकदा लिहावं यावर. आणि मग नंतर आत्या गौळणी बनवतानाच तिथे जाऊन बसायला लागले. हाताशी असावे म्हणून फोटो काढून ठेवलेले आता वर्षभरानंतर कामी आलेत.

अवांतर : माझ्या आत्याचे नाव उषा. त्यामुळे घरी 'उशी कुठे गेली? मला उशी दे" अशा प्रकारच्या प्रसंगनिष्ठ गोंधळ आणि विनोद यांना फाटा म्हणून बाबा-आत्याच्या लहानपणापासूनच घरी आत्याला उषा आणि उशीला उसूशी म्हणतात. बळीराजाच्या उशीबद्दल लिहिताना आधी तोच शब्द आधी लिहिला गेला होता.

मस्त कलंदर's picture

2 Nov 2010 - 11:32 pm | मस्त कलंदर

एकेकाळी शेणसडा घालणं,हाताने अंगण सारवणं हेही केलंय. आता शेणात हात घालेन असं वाटत नाही गं.. पण आताचं काही सांगू शकत नाही. इतकं पाहात बसले पण आत्याला मदत करू का म्हणून विचारलंही नाही..

चित्रा's picture

3 Nov 2010 - 1:01 am | चित्रा

असेच म्हणते. फार छान लेख.
साठवून ठेवण्यासारखा.

सेरेपी's picture

3 Nov 2010 - 6:17 pm | सेरेपी

मस्त लिहिलंय. मी पहिल्यांदाच गौळणींबद्द्ल वाचलं/ पाहिलं. :-)

अफलातून लेख आहे हा आणि ही कलाकारी. बळीराजाचं राज्य काय , गवळणी काय फारच समृद्ध करणारं आहे. आत्ता असोशीने माझ्या मुलीची आठवण येते आहे. हा लेख, हे भावविश्व, चिटुकलं जग तिच्याबरोबर वाटून घ्यावसं वाटतं आहे.
ही अशी काही परंपरा असते हे माहीत नव्हतं. या परंपरा लुप्त होऊ नयेत हीच इच्छा.

मकी तुम्ही लिहीलायही फार मस्त हा लेख. अगदी दिवाळीसारखं वाटू लागलं वाचल्याबरोबर. वाईट वाटतं आहे कालांतराने हा लेख मागे पडेल याचं. पूर्वीची पद्धत असती तर प्रतिक्रियांनी नक्की खूप दिवस वर राहीला असता.

पैसा's picture

2 Nov 2010 - 11:27 pm | पैसा

खूपच नवीन महिती मिळाली. आमच्याकडे (रत्नागिरीला आणि कोकणात) दिवाळीत घरोघरी मातीचे किल्ले तयार करतात. त्यांचं मूळ या गौळणीतच कुठेतरी असावं. एकूण सगळं वर्णन पहाता दिवाळी हा खरा शेतकर्‍यांचा सण का हे लगेच कळतं.

या शेणाच्या बाहुल्या दिसतायत सुरेखच. पुन्हा ते शेण फुकट जात नाही हे महत्त्वाचं. शेवटी ते जळवण म्हणून कामी येतं. ही शेतकर्‍यांचीच खासीयत.

>>पण माझ्या गौळणी फारच नम्र झाल्या होत्या. उभ्या राहिल्या खर्‍या, पण कमरेत भलत्याच वाकल्या होत्या.

हे वाचून खूपच मजा आली. तू ओलं शेण घेतलंस वाटतं!!!

* हुडवा: आमच्याकडे जळणाचा पेंढा ढिगात रचून ठेवतात, त्याला "उडवी" म्हणतात. दोन्ही जवळचे शब्द वाटले.

जबरदस्त!!! पहिल्यांदाच पाहिलं हे असलं काही..
सुंदर माहिती लिहिली आहेस... मस्तच! सुरेख लेखन.

प्रियाली's picture

2 Nov 2010 - 11:30 pm | प्रियाली

दिवाळीला किल्ले करतात हे माहित होते पण या गौळणी म्हणजे नवीनच माहिती. वर्णन आवडलं.

दिवाळीच्या शुभेच्छा! तुम्हाला आणि घरच्यांनाही!!

बेसनलाडू's picture

2 Nov 2010 - 11:37 pm | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

पुष्करिणी's picture

2 Nov 2010 - 11:36 pm | पुष्करिणी

अरेवा; मस्तच आहे ! अजिबातच माहित नव्हतं हे. किल्ले करायचो पण गौळणी आणि त्यांचा हा सगळा कारभार आताच कळतोय.

हॅप्पी दिवाळी सगळ्यांना!

प्रभो's picture

2 Nov 2010 - 11:39 pm | प्रभो

भारी गं मके.....

याविषयी आईकडून ऐकलेलं फक्त..पण लहानपणापासून शहरात असल्याने कधी पहायचा योग नव्ह्ता आलेला..

चिगो's picture

2 Nov 2010 - 11:58 pm | चिगो

सगळं लहाणपणी बघितलेलं तर आहे (इतक्या सविस्तर नसेल) पण ही माहिती खरंच रोचक आणि आवडेश आहे..:-) धन्यु, मकीताई...

सुरेख लेख!
माझ्या मैत्रिणीची आई करायची असेच पण तेव्हा फटाके आणि इतर गोष्टींच्या नादात त्या मागील गोष्ट समजून घ्यायचा कधी प्रयत्नही केला नव्हता. :(

मितान's picture

3 Nov 2010 - 1:09 am | मितान

किती छान लिहिलंयस !!

मी लहाणपणी या गौळणी केलेल्या आहेत. आता चुलतबहिणी करतात.
आमच्या घरी कायम १२-१५ गायी असल्याने शेण भरपूर असायचं ! मग आम्ही मोठ्ठा चौक आखून त्यात करायचो :)

सुहास..'s picture

3 Nov 2010 - 1:37 am | सुहास..

मितान हेच आणी असच !!

पण एक घोटाळा झालाय , दिपावलीत नाही, जन्माष्टमीला !! आणी शब्द (शिर्षकातला) " गवळणी " असा !!

असो ......

बेळगांवच्या नजीक " गवळीवाड्याला" असाच एक ऊत्सव असतो ..नेहाच्या कार्यक्रमातही त्याच्या ऊल्लेख आहे .

कुठली परंपरा, कधी कुठे दिसेल याचा भरवसा नाही.

सुहास, अरे जन्माष्टमीला पण करतात. पण या मकीने सांगितलेल्या गवळणी दिवाळीतल्याच ! गोवत्सद्वादशीला पूजा असते. वसुबारस म्हणतात. आज आहे.

मला काही नाही वाटत शेणात हात घालायला. लहाणपणी मात्र शेणामुळे हातावर प्रयत्नांनी रंगवलेली मेंदी जाईल अशी भिती वाटायची.

रेवती's picture

3 Nov 2010 - 1:35 am | रेवती

मस्त आठवणी आणि गौळणीसुद्धा!
हा प्रकार माहित नव्हता.
माहेरी गोकुळाष्टमीला मातीचं गोकुळ केलं जातं ते माहित होतं.
(त्यातही कृष्ण, बलराम, भटजी (पाठिवरच्या लाटण्यासहीत), पुतना मावशी, गोप, गोपिका इ. प्रकार आम्ही करत असू.
मोठ्या पाटावर हा प्रकार केला जातो. बाळलेणी म्हणून ज्वारीचे दाणे माती ओली असेपर्यंत लावावे लागतात. रात्री आरती, हळदीकुंकू असते, त्याला सगळेजण उत्साहाने येतात. त्या मूर्तींचे विसर्जनही लगेच केले तर बरे पण आता आईबाबांना तसे जमत नाही, मग चार दोन दिवसात ज्वातीची पाती दिसतात त्याचे हसू येते.)
फक्त बळीराजा एका घरी केलेला आठवतो आहे.

उपास's picture

3 Nov 2010 - 2:24 am | उपास

डीट्टो. .खालती माझ्या प्रतिसादात मी हेच म्हटलय गोकुळाविषयी.. तुमचं माहेर देशावरचं का? :)

अगदी पक्कं देशावरचं!:)
तुम्ही दिलेली माहिती वाचून फार आनंद झाला.
मला वाटायचं कि फक्त आमच्याकडेच कसा हा प्रकार असतो?
पण तसे नाही हे आपला प्रतिसाद वाचून समजले.

उपास's picture

3 Nov 2010 - 2:23 am | उपास

सचित्र लेख अगदी समयोचित.. मागच्यावर्षी काढलेले फोटो जपून ठेवून त्यावर ह्यावर्षी आठवणीने ( आणि हो आळस न करता) माहितीपूर्ण लिहीलयस अगदी! आवडलंच..
आमच्याकडे शेणाचा बळी काढतो (म्हणजे मी शेण आणून काढयचो.. आजीकडून शिकलेलो)..

अवांतर :
आणि गवळणी़वरुन आठवलं.. आमच्या इथे माझ्या लहानपणी कित्येक वर्षापर्यंत गोकुळाष्टमीला आम्ही 'गोकुळ' करायचो.. म्हणजे अगदी अख्खं गोकुळ वसवायचो.. शाडूची माती असायची मुबलक आणि मग असेच सगळे, गौळणी, नंद, यशोदा, देवकी, वसुदेव, त्यांचा तुरुंग, बलराम, पुतनामवशी, पेंद्या, गायी-वासरं, यमुना, कालिया आणि कान्हा .. आणि मग ह्या गोकूळाची रात्री कृष्ण जन्माला पूजा.. १०-१५ जण बसलो की तासाभरात गोकूळ नांदायला लागायचं :)
ते दिवस आठवले की हुरहूर लागते.. हल्लीच्या मुलांनी (टीव्ही आणि पीसी समोर बसण्यापेक्षा) असं काही करावं की नाही माहित नाही, पण लहान लहान गोष्टींनी असा काही आनंद दिलाय लहानपणी, बालपण समृद्ध झालं एवढं नक्की.. तुझ्या लेखातल्या गौळणींमुळे सगळं आठवलं...

सहज's picture

3 Nov 2010 - 6:16 am | सहज

नविन माहीती समजली. समयोचित, सुरेख, सचित्र लेख अतिशय आवडला.

५० फक्त's picture

3 Nov 2010 - 6:52 am | ५० फक्त

अतिशय सुंदर माहिती बद्दल खुप खुप आभार, पुढच्या वर्षी कर्मभुमी कडुन जन्मभुमीकडे गेलो तर करेन लेकाला बरोबर घेउन आणि फोटो टाकेन.

पुन्हा एकदा धन्यवाद.

हर्षद

मृत्युन्जय's picture

3 Nov 2010 - 10:23 am | मृत्युन्जय

लेख चांगला असे लिहिणार होतो. नंतर विचार केला फोटो चांगले असे लिहावे. मग वाटले यात मकीचे काय श्रेय? कलाकारी छान आहे म्हणावे. मला खुप आवडले. पण आवडले म्हणजे नक्की काय आवडले हेच बराच वेळ कळत नव्हते. नंतर कळाले हे सगळे चांगले आहेच. पण त्याहुनही जास्त मनाला भावली ती या सगळ्यामागची भावना. दिवाळीची खरी मजा या आणि अश्या छोट्या छोट्या गोष्टींमधुन आहे.

कोणि शेणात हात घालायला सांगितले तर मला नाही जमणार. हळु हळु या गोष्टी आता लुप्त होत जातील. पण अजुनही आपली ही संस्कृती माहिती असणारी, ही कला ज्ञात असणारी पिढी आपल्या आजुबाजुला आहे याचा सगळ्यात जास्त आनंद झाला. यानिमित्ताने एक नवीन गोष्ट कळाली. एका प्रथेचा अर्थ कळाला.

त्यामुळेच एकच म्हणतो. आवडले. सगळेच.

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Nov 2010 - 10:57 am | बिपिन कार्यकर्ते

लै भारी....

परिकथेतील राजकुमार's picture

3 Nov 2010 - 11:28 am | परिकथेतील राजकुमार

हायला !!
मके धन्यवाद ग :) (च्यायला काय वेळ आलिये ! ह्या मकीचे धन्यवाद मानावे लागत आहेत)

हे काही म्हणजे काही माहिती न्हवते. आज पहिल्यांदाच हे बघण्यात आणि वाचनात सुद्धा आले. कलाकारी आणि कलाकुसर दोन्ही भारीच. फोटुंच्या साथीने केले वर्णन सुद्धा छान, अगदी इत्यंभूत माहिती मीळाली.

स्वाती दिनेश's picture

3 Nov 2010 - 12:02 pm | स्वाती दिनेश

जन्माष्टमीला करतात त्या गोकुळाची माहिती होती पण हे माहित नव्हते. लेख आणि चित्रे दोन्ही आवडली ,
छान लेख मके!
लेखाच्या प्रतिक्रियांसकट प्रिंट आउट घे आणि घरी नक्की दाखव.
तुला आणि घरातल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!
स्वाती

इन्द्र्राज पवार's picture

3 Nov 2010 - 12:08 pm | इन्द्र्राज पवार

".....(च्यायला काय वेळ आलिये ! ह्या मकीचे धन्यवाद मानावे लागत आहेत)....."

~ च्यायला, काय वेळ आलिये, अगदी प.रा. शी सहमत व्हावे लागत आहे.

काही विषय संदर्भात फोटो मजकुरावर मात करतात, तर काहीवेळा मजकूर फोटोपेक्षा सरस ठरतो, पण मस्त कलंदर यानी (अहोजाहो बोलत आहे....इतका मान ठेवलाच पाहिजे...असा लेख लिहिणार्‍या व्यक्तीचा) दोन्ही बाजू अतिशय समर्थपणे, आणि तितक्याच माहेरचा अलवारपणा जपत, वाचकांना दाखविल्या आहेत. खरंतर कोणत्याही दिवाळी अंकात हा लेख अगदी उठून दिसला असता, पण तरीही नेमक्या दिवाळीच्या दिवसातच इथे प्रकाशित करण्यात त्यानी (पक्षी : म.क. यानी) औचित्य दाखविल्यामुळे लेखाची खुमारी वाढलीच आहे.

"उषा....उशी....उसुशी" (कोल्हापुरात उसुशी न म्हणता उशाशी असे म्हणतात...) ची मजाही काही औरच आहे....त्याला कारण म्हणजे माझ्या एका मावशीचे नाव उषाच आहे.... तिचे मिस्टर या 'उषा" नावावर टपली मारतात.... उन्हाळा आला की, "बाप रे, काय गरम होत आहे, आता ही उषा नको ती उषा घरी ठेवतो...!" ['उषा' पंख्याला उद्देश्यून]

एका सुंदर लेखाबद्दल मस्त कलंदर यांचे (परत आदरार्थी)....अभिनंदन !

इन्द्रा

अवलिया's picture

3 Nov 2010 - 12:45 pm | अवलिया

ज ब र द स्त !!!

खुप आवडले ... प्रथमच पाहिले आणि ऐकले ...

आमच्याकडे .. बारामती-पुण्याला नसते वाटते असे काही ...

तुम्ही लिहिलेले खुप छान आहेच , पण ज्यांनी ते नगर वसवलेले आहे त्यांचा आनंद ही प्रत्येक निर्मिती मधेय दिसत आहे ...

सर्व आवडले ...

प्राजक्ता पवार's picture

3 Nov 2010 - 3:26 pm | प्राजक्ता पवार

नविनच माहिती मिळाली . लेख व फोटो दोन्ही आवडले :)

रोचीन's picture

3 Nov 2010 - 3:27 pm | रोचीन

>>त्याहुनही जास्त मनाला भावली ती या सगळ्यामागची भावना. दिवाळीची खरी मजा या आणि अश्या छोट्या छोट्या गोष्टींमधुन आहे.
१००%सहमत!

रोचीन's picture

3 Nov 2010 - 3:36 pm | रोचीन

>>त्याहुनही जास्त मनाला भावली ती या सगळ्यामागची भावना. दिवाळीची खरी मजा या आणि अश्या छोट्या छोट्या गोष्टींमधुन आहे.
१००%सहमत!

श्रावण मोडक's picture

3 Nov 2010 - 6:28 pm | श्रावण मोडक

दिवाळीत करावयाच्या किल्ल्याचं मूळ याच परंपरेत असावं. ही मूळची बळीराज्याची (शेतकर्‍याचं राज्य) परंपरा नंतर अर्वाचीन इतिहासाच्या संदर्भात घटवली गेली असावी.
मस्त लेख.
बादवे - बळीला पाताळात "स्थान" मिळालं?

मस्त कलंदर's picture

3 Nov 2010 - 7:56 pm | मस्त कलंदर

सर्व वाचकांचे व प्रतिसादकांचे आभार.
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

आमच्याकडेही किल्ला करतात, अगदी त्यावर हळीवाचे शेत उगवून मस्त सैनिक आणि मावळ्यांची आरासही केली जाते. मात्र गोकुळाष्टमीला असे काही केले जाते किंवा रेवतीकाकू म्हणतात तसे ज्वारीचे शेत तसे कुठे पाहिले, ऐकले व वाचले नाही. असो, या निमित्ताने माहितीचे आदान-प्रदान तर झाले!!!

@श्रामो: तुमच्या प्रश्नावर आपण पुविवर चर्चा करू..

धमाल मुलगा's picture

3 Nov 2010 - 9:08 pm | धमाल मुलगा

हायला!

झक्कासच. हे राहिलंच होतं वाचायचं. मस्तच गं मके!

अग आज फराळातुन रिकामी झाले अन राहिलेल सगळ वाचायला घेतल.

आम्ही पण करतो हे गावी, पण त्या मागची कथा वा बाकी काही म्हणजे काही माहिती नव्हत.
मेन म्हणजे आम्ही त्या बळी राजाला 'पेंद्या ' म्हण्तो. आणी त्याच्या नाभित ???????????/ ( खर तर ' बेम्बी म्हणावस वाटतय) मखमलीच फुल घालतात.
एकदा माझ्या आई 'चला आज गवळणी मोडायच्या' अस म्हंटल्यावर मझ्या भाउ कंपनीने ' ढ्याण टड्याण ' ( ज्याच आज गाण झालय ते ) अस म्हणत दणादण लाथा मारुन हा वाडा तोडला अन मग आईंच्या कडुन मार खाल्ल्ला होता.

अतिशय सुरेख लेख , अन फोटोज. एक संस्क्रुती ची जपणुक करणार लिखाण.

निखिल देशपांडे's picture

4 Nov 2010 - 4:31 pm | निखिल देशपांडे

हे वाचायचं राहीलेच होते..
खुप छान आणि नवीन माहिती मिळाली

आज मकीने दुवा दिला नसता तर हे नजरे आडच राहिलं असतं.
धन्स गो.

सस्नेह's picture

4 Sep 2012 - 2:18 pm | सस्नेह

भूतकाळात नेलें या लेखानं !
आजीच्या गौळणी इतक्या वर्षांनी पुन्हा डोळ्यासमोर दिसल्या.
पण त्यांची हिष्ट्री आताच समजली.
धन्स मकताई..!

मन१'s picture

4 Sep 2012 - 2:40 pm | मन१

मक आणि स्नेकि तैं ना धन्यवाद.
चांगला धागा.

मन१'s picture

4 Sep 2012 - 2:40 pm | मन१

मक आणि स्नेकि तैं ना धन्यवाद.
चांगला धागा.

किसन शिंदे's picture

4 Sep 2012 - 3:04 pm | किसन शिंदे

हे माहित नव्हतं, हा प्रकार पहिल्यांदाच वाचतोय पाहतोय.

धन्यवाद मकी.

प्रास's picture

4 Sep 2012 - 4:03 pm | प्रास

हायला, हे खरंच मस्तय की...!

छान लिहिलंय मके! :-)

सुमीत भातखंडे's picture

5 Sep 2012 - 6:07 pm | सुमीत भातखंडे

बरं झालं वर आला लेख...
नवीनच माहिती

जव्हेरगंज's picture

5 Nov 2016 - 5:12 pm | जव्हेरगंज

_

कौशी's picture

5 Nov 2016 - 6:20 pm | कौशी

गावी आईकडे आहे ही प्रथा..आई असे पर्यंत करायची.

जव्हेरगंज's picture

5 Nov 2016 - 6:21 pm | जव्हेरगंज

अतिशय सुंदर!!

जुन्या आठवणी,आईसोबत केलेली मद्त सर्व काही आठवले....धन्यवाद मके.

वाचनखूण साठवली आहे. अलवार आणि मनाचा ठाव घेणारं लेखन.

पुजारी's picture

8 Nov 2016 - 3:21 pm | पुजारी

आता समजले कि लहानपणी आजी समोर झोपून राहिल्यास ," कसा बळीराणा उताणा पडलाय बघ " ! असं का म्हणायची .