राम राम मंडळी,
आमचं दैवत असलेले, मराठी संगीत रंगभूमीचे सम्राट नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांच्या जीवनावर प्रसिद्ध कला-दिग्दर्शक नितिन देसाई हे चित्रपट निर्मिती करत आहेत.
ही अत्यंत मोलाची कामगिरी ते करत आहेत, त्याकरता त्यांचं अभिनंदन व चित्रपटाकरता अनेकानेक शुभेच्छा..
आज हिंदी रजतपटाच्या दुनियेत नितिन देसाईंनी कला-दिग्दर्शक म्हणून आपल्या उत्कृष्ट कामाचा जो ठसा उमटवला आहे त्याचा कुठल्याही मराठी माणसाला अभिमानच वाटावा.. नारायणराव बालगंधर्वांवर एक चांगला चित्रपट निर्माण करण्याचं पुण्य त्यांना लाभू दे, हीच शुभेच्छा..
या चित्रपटाची सांगितिक बाजू माझा मित्र कौशल इनामदार सांभाळतो आहे.
नारायणराव गौहर्जानला गाणं शिकवताहेत, असं एक दृष्य त्या चित्रपटात आहे. भास्करबुवांच्या यमनातील 'हारवा मोरा..' या बंदिशीवर आधारीत असलेलं अजरामर नाट्यगीत - 'नाथ हा माझा..' ते गौहरजानला शिकवताहेत..
मुंबैच्या एका ष्टुडियोत आजच याचं रेकॉर्डिंग असून नारायणरावांच्या प्लेबॅककरता आनंद भाटे गाणार आहे तर गौहरजानच्या प्लेबॅक करता वरदा गोडबोले गाणार आहे..
माझा मित्र आदित्य ओक याने हा योग जुळवला आहे. आनंद भाटे हा अत्यंत गुणी मुलगा असून आमच्या अण्णांचा शिष्य आहे. लहानपणी तो नारायणरावांची पदं फार सुरेख गायचा.. माझी गुरुभगिनी सौ वरदा गोडबोले हिलाही 'नाथ हा माझा'ची उत्तम तालीम स्व माणिकताईंकडून मिळाली आहे.. कौशलसहीत या सगळ्या मित्रमंडळींचा मला अभिमान वाटतो..
आज सकाळीच मी फोन करून आनंदला व वरदाला शुभेच्छा दिल्या.. नारायणरावांची पदं गाण्याचं पुण्य खरंच खूप थोर..!
'कुणी मत देता का मत..?' या हल्लीच्या समसच्या जोगव्याच्या जमान्यात वरदा, आनंद सारखी मंडळी सश्रद्धतेने साधनारत आहेत, हीच माझ्या मते खूप मोठी गोष्ट आहे.
नितिन देसाई, कौशल इनामदार यांच्या सार्या टीमला नारायणरावांचा आशीर्वाद लाभावा व एक चांगला चित्रपट त्यांच्या हातून घडावा हीच मनोमन प्रार्थना..!
नारायणरावांचं 'नाथ हा माझा..' मात्र आजही तेवढंच खूप ताजंतवानं वाटतं. ते कृपया इथे ऐका व पुण्य मिळवा..
(बालगंधर्वप्रेमी) तात्या.
प्रतिक्रिया
30 Oct 2010 - 11:52 am | अवलिया
चित्रपटाची आतुरतेने वाट पहात आहे
30 Oct 2010 - 11:54 am | परिकथेतील राजकुमार
वाह !
संपुर्ण युनिटला शुभेच्छा.
हे शब्द विशेष आवडले.
30 Oct 2010 - 11:58 am | सहज
बालगंधर्व यांची भूमीका कोण करते आहे?
30 Oct 2010 - 12:01 pm | विसोबा खेचर
सुबोध भावे..
30 Oct 2010 - 12:02 pm | सहज
धन्यवाद.
30 Oct 2010 - 12:01 pm | इन्द्र्राज पवार
"....नितिन देसाई, कौशल इनामदार यांच्या सार्या टीमला नारायणरावांचा आशीर्वाद लाभावा व एक चांगला चित्रपट त्यांच्या हातून घडावा हीच मनोमन प्रार्थना..!...."
~ या प्रार्थनेत आम्हीही सहभागी आहोत....आणि शक्य झाल्यास आमच्या या भावना तात्यांनी नितिन देसाई आणि टीमपर्यंत जरूर पोच कराव्यात. नितिन ज्या विषयाला हात घालतात तो परिपूर्णतेने सज्जच असतो असा अनुभव आहे.
गाणी ध्वनीमुद्रणापर्यंत नियोजित चित्रपटाची प्रगती झाली आहे म्हणजे प्रमुख कलाकारदेखील करारबद्ध झाले असतील असा कयास आहे. काही अंदाज? किंवा इथेच मिपा सदस्यांना "अंदाज" बांधावयास सांगा, तात्या !
इन्द्रा
30 Oct 2010 - 12:17 pm | चिगो
ह्या आनंदकारी प्रकल्पात सहभाग घेणार्या सगळ्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा...
30 Oct 2010 - 12:17 pm | चिगो
ह्या आनंदकारी प्रकल्पात सहभाग घेणार्या सगळ्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा...
30 Oct 2010 - 12:38 pm | तिमा
नारायणराव यांचे नुसते नांव घेतले तरी लगेच, स्वकुल तारक सुता, सत्यवदे वचनाला नाथा, कशि या त्यजु पदाला, माडीवरी चल ग गडे, नुरले मानस उदास, शशि सूर्यप्रभा गगनाची अशी अनेक गाणी एकामागून एक आठवू लागतात.
असा बालगंधर्व आता न होणे.
हा प्रकल्प हाती घेतल्याबद्दल सर्वांना शुभेच्छा!
30 Oct 2010 - 12:48 pm | स्वानन्द
होय... कालच फेसबुकात सुबोध आणि कौशल यांच्या स्टेटस अपडेट्स मध्ये हे कळले. सर्वांना शुभेच्छा!
30 Oct 2010 - 12:58 pm | सुधीर काळे
तात्यासाहेब, माहितीबद्दल धन्यवाद.
या प्रकल्पाला शुभेच्छा!
30 Oct 2010 - 1:25 pm | समंजस
प्रकल्पात सहभागी असलेल्या सर्वांना शुभेच्छा||
या निमित्ताने का होईना परत एकदा बालगंधर्वांची गाणी ऐकायला मिळतील तसेच बालगंधर्वांची ओळख सुद्धा नव्या पिढीला होईल :)
30 Oct 2010 - 2:45 pm | मी-सौरभ
आमच्याकडून पण शुभेच्छा.....
वितरण करायला पण नितिन देसाई असल्यावर चिंता नसावी :)
30 Oct 2010 - 4:05 pm | जागु
माझ्याकडून पण शुभेच्छा.
30 Oct 2010 - 4:08 pm | sneharani
आमच्यापण शुभेच्छा!
वाट पाहत आहोत चित्रपटाची!
1 Nov 2010 - 12:11 am | स्वाती२
हार्दिक शुभेच्छा!
2 Nov 2010 - 9:10 pm | स्वाती दिनेश
पूर्ण युनिटला शुभेच्छा..
स्वाती
2 Nov 2010 - 9:14 pm | पैसा
पुर्या युनिटला माझ्या पण शुभेच्छा आणि अभिनंदन.
2 Nov 2010 - 9:25 pm | अविनाशकुलकर्णी
3 Nov 2010 - 12:00 am | जयंत कुलकर्णी
ही आठवण सांगायलाच पाहिजे अशी आहे. लहानपणी मी माझ्या आजोबांकडे रहात होतो शुक्रवार पेठेत, अकरामारूती चौकात. हा भाग दोन गोष्टींसाठी प्रसिध्द होता. किंवा अप्रसिध्द होता असे म्हटले तरी चालेल. एक म्हणजे या अकरा मारूतीच्या देवळात अकरा मारूतींच्या मुर्ती होत्या आणि एक गणपतीची मूर्ती होती. ही मुर्ती आणि दगडूशेट हलवाईची गणपतीची मूर्ती या दोन्ही एकदमच हुबेहुब घडवलेल्या होत्या. द्गडूशेट हलवाईची गणपतीची मूर्ती आज ज्या पदाला पोहोचली आहे हे आपण बघतोच. माणसाचे मन कोणाला कुठे घेऊन जाईल हे सांगता येत नाही हेच खरे. सगळेच मनाचे खेळ. याच चौकात एक वृध्द माणूस नेहमी असे. ज्या वाड्यात हे अकरा मारूतीचे देऊळ होते त्या वाड्याचे मालक होते श्री. परांजपे. हे स्वतः वकील होते आणि गाण्याचे मला वाटते चांगले जाणकार होते. बालगंधर्वांना यांनी त्यांच्या उतरत्या काळात आधार दिला होता. ते नेहमी या देवळात यायचे. त्यांना टोपी, हाफ पँट या पेहरावातन बघितलेली बरीच माणसे मला माहीत आहेत. कदाचित मी पण त्यांणा बघितले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण या देवळात आम्ही नेहमी खेळायला जायचो आणि माझ्या आजोबांनी तसा उल्लेख केलेला मला अंधूकसा केलेला मला आठवतोय. जरा त्या वर्शाच हिशेब केला तर ते तेच होते का हे सांगता येईल. त्यांचा त्या वयात सुध्दा असलेला गोंडस चेहरा आम्हा मुलांना अजून आठवतो आहे. या परांजप्यांच्या घरात एक बाई होत्या त्यांनी सांगितलेली एक हकिकत. खरी खोटी त्यांनाच माहीत.
बालगंधर्व साडी नेसताना ती साडी फ्रेंच यु-डी-कोलन मधे भिजवून नेसायचे. त्यामुळे ती साडी चांगली चोपून बसायची. नंतर यु-डी कोलन उडून जायचे आणी साडी इस्त्री केल्यासारखी मस्त बसायची. थोडक्यात त्यांनी आजची रोल प्रेसची कल्पना त्यावेळी वापरली होती.
फार भारी माणूस ! या सिनेमाला शुभेच्छा दिल्या नाहीत तर आपणच कपाळकरंटे म्हणायचे.
3 Nov 2010 - 11:42 am | विसोबा खेचर
सुंदर प्रतिसाद,
धन्यवाद जयंतराव..
तात्या.
3 Nov 2010 - 11:57 am | बिपिन कार्यकर्ते
छान आठवण.
माझ्या आजीच्या लेखी गंधर्वाचं (तिला कधी बालगंधर्व वगैरे म्हणताना ऐकलं नाही, गंधर्वाचं नाटक, गंधर्वाचं गाणं असेच एकेरी उल्लेख आणि डोळ्यात चमक) नाटक म्हणजे आयुष्यातलं सगळ्यात मौल्यवान असं काही. अत्तराचे दिवे लागत म्हणे. तसे असेल तर मग फ्रेंच यु-डी-कलोन मधे आख्खी साडी भिजवणेही शक्य असेलच. गंधर्वाचा थाटच निराळा होता म्हणे.
8 Nov 2010 - 7:52 am | देव जय
8 Nov 2010 - 7:53 am | देव जय
8 Nov 2010 - 8:11 am | चिंतामणी
वाट बघत आहे आता या सिनेमाची. नितीन देसाई निर्मीती करीत आहेत म्हणजे उच्च कलामुल्य असणारच.
उद्या पुण्यात मुहुर्त आहे बालगंधर्व रंगमंदिरात. चित्रपट लौकर तयार होवो.
याचित्रपटामुळे नव्या पिढीला बालगंधर्वांची ओळख होईल.