पुस्तक परीचय: "थ्री कप्स ऑफ टी"

मराठे's picture
मराठे in जनातलं, मनातलं
22 Oct 2010 - 1:37 am

हा पुस्तक परिचय आहे. परिक्षण करण्याइतपत अक्कल मला नाही. जे आवडलं ते लोकांना सांगावं हाच फक्त उद्देश.

१९९३ मधे, अमेरिकेतल्या मोंटाना राज्यात राहणारा एक धाडसी गिर्यारोहक "ग्रेग मॉर्टेन्सन", के-२ हे जगातलं दुसर्‍या नंबरचं उंच पण अतिशय अवघड असं शिखर सर करण्यात अपयशी ठरतो. पाकिस्तानातल्या (पाक्-व्याप्त काश्मिरमधल्या) ईशान्येला असलेली हिमालयातली काराकोरम पर्वतरांग म्हणजे जगातल्या अत्युच्य अशा साठ पर्वतशिखरांचं माहेरघर, पाकिस्तान व चीन मधे असलेली नैसर्गिक हद्द. शरिराने श्रमलेल्या आणि अयशस्वी चढाईमुळे पूर्णपणे मानसिकरित्या खचलेल्या अवस्थेत ग्रेग मॉर्टेन्सन बेस कॅंपची आणि पर्यायाने बाकिच्या जगाची वाट चुकून कित्येक तास भरकटत एका गावात शिरतो. गावातली लोकं त्याची काळजी घेतात. परतताना मॉर्टेन्सन त्यांना, त्याच्या अवाक्याबाहेरचं, वचन देतो, "मी परत येइन आणि तुमच्या गावात एक शाळा बांधेन".

अवक्याबाहेरचं वचन ह्यासाठी की मॉर्टेन्सनकडे त्यावेळी स्वतः राहायला घरही नसतं. अशा उनाड फिरणार्‍या आणि आपल्या गाडीत झोपणार्‍या मॉर्टेन्सनला ह्या प्रंसंगामुळे जगायला नवं कारण मिळतं. जवळ असलेलं नसलेलं सगळं विकून आणि नविन देणगीदारांना गाठून शाळेसाठी पैसे जमा करतो. आणि पुन्हा कोर्फेला परतुन तो आपलं वचन पूर्ण करतो. पण त्याचं कार्य इथेच संपत नाही. उलट इथे त्याच्या कार्याची सुरुवात होते. आज जवळ जवळ एक दशकभर चाललेल्या, तालिबान आणि अल्-कायदा सारखी अत्यंत कट्टरपंथियांचं आश्रयस्थान समजला जाणार्‍या प्रदेशात राहून विशेषतः मुलींसाठी शाळा बांधण्याच्या त्याच्या अथक परिश्रमांची ही गोष्ट आहे.

एकिकडे जग दहशतवाद्यांची पाळंमुळं खोदुन काढण्यासाठी युध्द करत आहे.तर हा जगावेगळा शिपाई गरिबी आणि अडाणिपणा ही, दहशतवादामागील मूळ कारणं दूर करतो आहे. मुलं आणि मुलींना एकाच प्रकारे गैर-उग्रवादी (शब्द सुचवा) (nonextremist) शिक्षण देत आहे.

हे करताना मॉर्टेन्सन यांना स्वतः अपहरण आणि असंख्य हल्ल्यांना तोंड द्यावं लागलं. भडकलेल्या इमाम व मुल्लांनी त्यांच्या विरुद्ध काढलेले फतवे तसंच अमेरिकेविरुद्ध गद्दार ठरवून त्यांना दिलेल्या धमक्या यांची तर गणतीच करायला नको. असं असूनही त्यांनी "सेंट्रल आशिया इन्स्टिट्युटचं" स्वप्न साकार केलं. ह्या अंतर्गत ५५ शाळा ईशान्य पाकिस्तान व अफगाणिस्तानच्या दुर्गम आणि गरीब भागात बांधल्या आणि त्या व्यवस्थित चालू राहतील याची व्यवस्था केली. मॉर्टेन्सन यांनी इथल्या हजारो मुला-मुलींना शिक्षणाद्वारे नवी दारं उघडून दिली आहेत. स्वतःच्या अथक परिश्रमांनी आज खरोखरच त्यांनी ह्या मुलांचं जग बदललं आहे.

हे पुस्तक वाचताना मला मॉर्टेन्सन यांचं कार्य व भारतात महर्शी कर्वे, महत्मा फुले यांनी केलेलं कार्य यातलं साम्य वारंवार जाणवत होतं. आज जगात दहशतवाद बोकाळतोय कारण लहानपणापासूनच त्यांच्या मदरसांमध्ये मुलांच्या मनावर कट्टर इस्लाम बिंबवण्यात येतोय. मुलींना शिक्षणापासून पद्धतशीरपणे दूर ठेवण्यात येतंय. त्यातुनच दहशतवाद्यांची नवी पिढी जन्माला येते. हे बदलायचं असेल तर सामान्य लोकांची धारणा बदलली पाहिजे. आणि हे करण्यासाठी घरातली स्त्री शिकलेली पाहिजे. ती आपल्या मुलांवर योग्य संस्कार करू शकेल. "घरातली स्त्री शिकली की सगळं घर _शहाणं_ होतं" ही फुल्यांची शिकवण किती योग्यप्रकारे लागू पडते?

वाङ्मयसमाजअनुभवप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

मैथिली१५'s picture

22 Oct 2010 - 2:00 am | मैथिली१५

खरंच सुरेख आहे हे पुस्तक
ग्रेगबद्दल अधिक माहितीसाठी आणि त्याच्या कार्याला मदत करण्यासाठीदुवा

शुचि's picture

22 Oct 2010 - 6:16 am | शुचि

छान ओळख.

या पुस्तकाबद्दल बरंच ऐकून होतो. अजून वाचायचा योग आलेला नाहीये. इथल्या लायब्ररीत आहे का पाहतो.

बाकि.... पुस्तक परिचय आवडला.

गांधीवादी's picture

22 Oct 2010 - 6:45 am | गांधीवादी

पुस्तक परिचय छान.

>>आज जगात दहशतवाद बोकाळतोय कारण लहानपणापासूनच त्यांच्या मदरसांमध्ये मुलांच्या मनावर कट्टर इस्लाम बिंबवण्यात येतोय.
हे तुमचे स्वताचे मत आहे कि ह्या पुस्तकातील काही भाग आहे.

नसेल तर
पुस्तक परिचयाच्या नावाखाली असली जातीयवाद भडकाऊ विधाने कृपया करू नका.

>>मुलींना शिक्षणापासून पद्धतशीरपणे दूर ठेवण्यात येतंय. त्यातुनच दहशतवाद्यांची नवी पिढी जन्माला येते.
असहमत. अनेक शिकलेले देखील दहशतवादी होतात.

आपल्याला एक नम्र विनंती.
कृपया शेवटचा परिच्छेदातील दुसरे आणि तिसरे वाक्य आपल्या लेखातून काढून टाकावे.
अन्यथा, एक पुस्तक परिचयाच्या नावाखाली जातीयवाद भडकाऊ विधाने करण्याची एक नवीन पद्धत रुजू होईल.

>>आज जगात दहशतवाद बोकाळतोय कारण लहानपणापासूनच त्यांच्या मदरसांमध्ये मुलांच्या मनावर कट्टर इस्लाम बिंबवण्यात येतोय.
हे तुमचे स्वताचे मत आहे कि ह्या पुस्तकातील काही भाग आहे.

हे माझे स्वतःचे मत आहे. सगळ्या नसल्या तरी त्या प्रदेशातील बहुतेक मदरसांमधून कट्टरवादच शिकवला जातो. पुस्तकात अशा आशयाचं काही आहे.
"ग्रेग ह्यांना पैशाची व्यवस्था करण्यासाठी वारंवार अमेरिका-पाकिस्तान फेर्‍या मारायला लागायच्या. असेच एकदा पाकिस्तानात परतल्यानंतर (काल ९/११ च्या आगोदरचे काही महिने) जागोजागी उभारलेल्या मदरसा पाहून त्यांना कुतुहल वाटलं. पाकिस्तान सरकारच्या खिजगणतीतही नसलेल्या ह्या प्रदेशात सौदी अरेबिया व इतर इस्लामिक श्रीमंत देशातून मदत मिळवून इतक्या मदरसा उभ्या राहिल्या होत्या. पण त्यात गैर-उग्रवादी (नॉन-एक्स्ट्रीमिस्ट) शिक्षण मिळत नव्हतं"

अनेक शिकलेले देखील दहशतवादी होतात.

ह्याचं कारण सुद्धा त्यांचं पद्धत्शीर पणे केलं गेलेलं ब्रेन-वॉश.

बबलु's picture

22 Oct 2010 - 12:14 pm | बबलु

ओ गांधीवादी,

>>आज जगात दहशतवाद बोकाळतोय कारण लहानपणापासूनच त्यांच्या मदरसांमध्ये मुलांच्या मनावर कट्टर इस्लाम बिंबवण्यात येतोय.

यात चुकीचं काय आहे ? कितीतरी reports आहेत. मी सुद्द्धा काही independant unbiased रिपोर्टस वाचले आहेत, पुराव्यासहित.
यात जातीयवाद भडकाऊ मुळीच नाही. स्पष्ट वस्तुस्थिती आहे.

उगाच तुमचं दहशतवादी-प्रेम दाखवत नका बसू.
आजकाल ही फॅशनच झालेय.

ऋषिकेश's picture

22 Oct 2010 - 4:37 pm | ऋषिकेश

काय योगायोग आहे.. ह्या विकांताला हेच पुस्तक वाचायला घेतोय! आणि इथे परिचय
त्यामुळे परिचय वाचलेला नाहि.. पुस्तक वाचल्यावरच वाचेन .. तुर्तास ही पोच

मस्तानी's picture

22 Oct 2010 - 7:12 pm | मस्तानी

'थ्री कप्स ऑफ टी' वाचून झालं की "स्टोन्स इनटू स्कूल्स" पण वाचा. जिथे 'थ्री कप्स ऑफ टी' संपत तिथे "स्टोन्स इनटू स्कूल्स" चालू होतं. माझं व्यक्तिगत मत ... आजच्या घडीला नोबेल शांतता पुरस्कार मिळावा असा हा एक माणूस आहे.

वा, परिचयावरुन पुस्तक नक्कीच वाचावं असे दिसत आहे. पुस्तकाबरोबरच एका माहिती असावीच अश्या व्यक्तीमत्त्वाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद!