वजनदार ! - ४

मोहन's picture
मोहन in जनातलं, मनातलं
4 Oct 2010 - 9:24 am

वजनदार ! - १

वजनदार ! - २

वजनदार ! - ३

स्लिमींग सेंटरचे चार्जेस तर डॉ. विकासच्या दूरदृष्टीमुळे वाचले.... आता पुढे....

रिक्षा घरी पोहेचेपर्यंत मी सारखा मागे वळून पाहत होतो, ती मॅनेजर बाई मागून पाठलाग करत येते आहे असा भास होत होता.
" क्या साब कुछ लफडा करेला है क्या ? "
" अरे नही यार. मै वो सेंटर मे बिना बतायेही चला आया. बेकार लग रहा है "
" वांदा नही साब. रोज दो - चार ऐसेही भागते है. हम वहां के रिक्षावालोंका अछा धंदा हो जाता है."
मी सर्दच झालो. रिक्षावाल्याचे पैसे चुकते करून घरी गेलो.
सगळे रिपोर्टींग आधीच झाले असेल याची खात्री होती. "आता तरी त्या विकासचे आभार मान. नाहीतर १७००० रू. अक्कल खाती जमा झाले असते. असा कसा रे तू जाहिरातींना भूलतोस ?"
तस पाहीले तर मी जाहिरातींवर वगैरे कधीच विश्वास ठेवत नाही. पण काय आहे की दिपीका पदुकोण, असीन, सिंडी क्रॉफर्ड किंवा तत्सम मंडळींनी काही गोष्टी पटवून दिल्या तर मला लगेच पटतात.
पण मी वादात पडलो नाही. " हो , माझ चुकलच जरा." मी लागलीच पांढरा रूमाल फडकवला.
माझी गाडी पुढे सरकणार कशी याची काळजी लागली होती. पुस्तकवाल्या आहार तज्ञाची फी रू ४५,००० ते १,५०,०००. जाहीरात वाल्यांची, जीम वाल्यांची फी पण परवडण्या सारखी नव्हती. काळजी ने माणूस खंगते, माझे मात्र मुठभर मास वाढतच होते.
मग एक दिवस तिने प्रस्ताव मांडला " हे बघ, मला एका आहार तज्ञाचा शोध लागला आहे. त्याने आमीर खानला फीट ठेवले आहे." आता मात्र माझ्या सहनशक्तीचा अंत होत होता " तुला काय बॉलीवूड शिवाय दुसरे कोणी सापडतच नाही का ? आणि आता या तज्ञाची फी काय तू स्पॉन्सर करणार आहेस का ? "
" अरे हो,हो किती चिडतोस ?. माझ्या कलीगने या आहार तज्ञाबद्दल मला सांगितले. गेल्या काही महीन्यांपासून मी तिचे वजन कमी कमी होतांना पाहाते आहे म्हणून मी चोकशी केली ." " मुख्य म्हणजे त्यांची फी माफकच आहे. ५००रू. एका व्हिजीट्चे आणि महिन्याला एकच व्हिजीट. फक्त पहिल्या अपॉईंटमेंट साठी वेळ लागू शकतो. हा घे त्यांचा नंबर"
"तुझ्या मैत्रिणीला किती दिवस झाले या तज्ञाकडे जायला सुरूवात करुन.?" मी आता ताक फुंकून प्यायच्या मनस्थितीत आलो होतो.
"मी सगळी माहिती काढली. काळजी करू नको. हे डॉक्टर जेन्यूईन आहे. आमीर खान कडून पण ५०० रु च घेतात."
आता परत आमीर खान. असतात एकएकाचे वीक पॉइंटस्. मी माझी समजूत घालून घेतली.
तसेही आमीर खान कडून ५०० रु कंसल्टेशन फी घेणारा याची देही याची डोळा पाहायची इछा तिव्र होती.
मी अपॉईंटमेंट घेण्यासाठी फोन केला.
स्वागतिकेने दोन महिन्या नंतरची तारीख दिली. " पहिल्या वेळेला ७५० रु , व नंतरच्या प्रत्येक वेळेला ५०० रू. तुम्हाला डॉ. सांगतील त्या सगळ्या टेस्टस् कराव्या लागतील त्या पाहूनच तुमची ट्रीटमेंट सुरू होईल."
" तुम्ही आमीर खान कडूनही हीच फी घेतली होती का ?" माझी उत्सुकता दुर्दम्य आहे. मी मार खाण्याच्या तयारीत होतो.
" त्यानी सुरुवात केली तेंव्हा आमची फी ४०० रु. होती. आता तो पण ५०० रु च देतो." थंड आवाजात उत्तर आले.
" मला वाटले तुम्ही आता झापता की काय मला " माझे स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग.
" बहूतेक मराठी पेशंटस् हा प्रश्न कधी ना कधी विचारतातच. तुम्ही लवकर विचारला." आवाजात थोडादेखील बदल नव्हता.
" अहो मला जरा लवकरची डेट द्या ना. अर्जंट आहे."
"मी प्रयत्न करीन. पण खात्री नाही. तुम्ही आत्ताची तारीख घेवून टाका. मधे कोणी रद्द केले तर तुम्हाला सांगिन." ह्या बाईत भगवंतानी सांगीतलेली स्थितप्र्ज्ञाची सर्व लक्षणे मला दिसत होती.
नतमस्तक होवून मी हो म्हंटले. आता दोन महीने वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
ठरल्या तारखेला मी वांद्र्याच्या क्लीनिकला पोहोचलो.
दोघांकडून पत्ता पक्का करून घ्यावा लागला. एका जुनाट इमारतीच्या फ्लॅटच्या लाकडी दरवाज्या समोर मी उभा होतो. दारावरची पाटी तर बरोबर होती. भितभित दार ढकलून मी आत गेलो. एका भिंतीला एक छोटेसे लाकडी काउंटर, बाकी तिन भिंतींना लागून लाकडी बाकडी, एक आवाज करत थंडावा देण्याचा प्रयत्न करणारा ए.सी. , क्षीण प्रकाश योजना असलेले ते स्वागत कक्ष पाहून मी एकदम सुखावलो. वेगवेगळ्या वस्तुमानाची "पेशंट" मंडळी वाट पाहत बसली होती.
"माझी अपॉइंटमेंट आहे."
"बसा. हा फॉर्म भरा तोवर." स्वागतिका एकदम 'चवळीची शेंग' होती.
चार ओळींचा तो फॉर्म मी पाच मिनीटात भरून दिला.
अर्ध्या तासानंतर आणिक एक चवळीची शेंग बाहेर आली. " तुमचे मेझरमेंटस् घ्यायचे आहेत. आत चला."
थोड्याच वेळात डॉ. वजन मापन खोलीत आले. ८० - ८२ वर्षांचे आजोबा पाहून मला बरे वाटले.
"येस यंग मॅन. हाव आर यू ?"
" ठीक आहे सर . हे वजनाच जरा..."
"ते आपण पाहू. इथे उभे राहा."
तिथे एक धान्याच्या गोण्या वजन करायचा मेक्यानिकल काटा होता. मला आपण बटाट्याचे पोते वगैरे असल्यासारखे वाटायला लागले.
" ह्यात वजन अचूक मोजता येते." डॉ.नी समजावले
"८४ कि." वजनाची नोंद केल्या गेली.
वेगवेगळ्या ठिकाणी मला चीमटे काढून माझे फॅट कंटेंट ४७% असल्याची नोंद झाली.
शरीराच्या वेगवेगळ्या भागाचे घेर मोजुन त्याचीही नोंद करण्यात आली.
"आता तुम्ही या काही टेस्ट करून घ्या आणि रिपोर्टस् घेवून या. हो, कुठल्याही चांगल्या लॅबमधे टेस्ट केल्या तरी चालतील." डॉ. नी एक कागद माझ्या पुढे करत सांगितले.
रिपोर्टस् घेवून मी आठवड्यात परत गेलो. रिपोर्ट्स् आत पाठवल्या नंतर लगेचच पाच मिनीटात मला आत बोलावले.
" या.डॉ. आजोबांनी स्वागत केले. तुमच्या रिपोर्टस् आणि तुमच्या जीवनशैली वरून तूम्हाला हा तुमचा आहार सुचवतो आहे." एक कागद माझ्या पुढे ठेवण्यात आला. त्यात प्र्ती दिवस :- गहू,- ४० ग्रा. तांदूळ - ३० ग्रा. डाळ - ३० ग्रा. वगैरे वाचून माझ्या पोटात खड्डा पडला.
"डॉ. हे सगळ अस मोजुन खायच आहे की काय."
"हो. तुम्ही एक छोटा तराजू विकत घ्या."
"अहो पण हे अस ग्रॅम मधे खायला लागलो तर मुंबईतला पहिला भुकबळी म्हणून माझी नोंद होइल हो."
" अस काही एक होणार नाही. तुमचे टरगेट वजन ५८ कि. आणि फॅट - २२% आहे. हे करायचे असल्यास मी सांगतो ते करायला पाहीजे."
" म्हणजे २६ कि. वजन कमी करायला पाहीजे ?!!!"
उत्तरादाखल एका चवळीच्या शेंगेने एक अल्बम पुढ्यात टाकला. त्यात आधी - नंतर टाइपचे बरेच फोटो होते. एका फोटोकडे बोट दाखवत डॉ. बोलले.
" हा २८ वर्षाचा तरूण. १२५ कि. वजन होते. लग्नच होत नव्हते. ४ महिन्यात ४५ कि. वजन कमी केले. विशेष म्हणजे लग्न झाल्यावर सूद्धा गेले २ वर्षे मेंटेन्ड आहे."
" अहो पण माझे लग्न झालेले आहे हो." मी काकुळतीला आलो होतो. " उपासाच्या दिवशी फराळाचे खायला वेळ झाला तरी मला चक्कर येतात हो"
"पहिले म्हणजे सगळे उपास बंद. आहार तक्त्यात खाली वाचा. दर १ ते २ तासांनी थोडे थोडे खायचे आहे. त्याकरताच १२ बिस्कीटे लिहीली आहेत. आणि हो रोज जे खाल ते लिहून एक डायरी मेंटेन करा."
" पुढचा डायट चेंज पुढल्या महिन्याच्या २५ तारखेला. या आता. ती डायरी आणायला मात्र विसरु नका"
" जगलो वाचलो तर येतो."
पुढ्ल्या महिन्याच्या २५ ता. पर्यंत मुंबईत भूकबळी किंवा कुपोषणाच्या बळीची नोंद झाली नाही.
मी नियोजीत वेळेवर डॉ. कडे पोहोचलो.
परत आमची गोणी काट्यावर चढली. ८२ कि. शरीराच्या घेरांचे पण मोजमाप कमी येत होते. मला माझा पोटाचा घेर कधी कमी होइल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते. माप चक्क २ सें.मी. नी कमी दाखवत होते.
डॉ. आजोबा मात्र अजीबात खूष नव्हते. माझी फूड डायरी लाल करून माझ्या हातात दिली. " तुम्ही वडा पाव का खाल्ला ?"
"अहो, सिंगलच खाल्ला. फार भूक लागली होती आणि मीटिंग जरा लांबली होती."
"एक वडा पाव = १२ ब्रेड स्लाईसेस हे लक्षात ठेवा. पुढच्या वेळी काळ्जी घ्या. "
" पण धन्यवाद डॉ. इट ईझ वर्किंग"
" इट गॉट टूबी. आफटर ऑल लास्ट ५० इयर्स आय ऐम डूइंग सेम थींग"

समाप्त.

कथामौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

सहज's picture

4 Oct 2010 - 9:36 am | सहज

लेखमाला आवडली.

स्वैर परी's picture

4 Oct 2010 - 10:53 am | स्वैर परी

खुप छान लेख लिहिला आहेत. फक्त एक छोटीशी गोष्ट लक्शात आणुन द्यावीशी वाटते,
"रिक्षावाल्याचे पैसे चुकवून " च्या ऐवजी, "रिक्षावाल्याचे पैसे चुकते करुन" असे हवे होते, नाही का?

मोहन's picture

4 Oct 2010 - 12:04 pm | मोहन

लक्षात आणून दिल्याबद्द्ल धन्यवाद. माझी पहिलीच कथा. त्यामुळे पुष्कळ त्रुटी राहिल्या आहेत.

संपादकांनी वर सुचवलेली दुरूस्ती केल्यास आभारी राहीन.

आपला

संपादक मंडळ's picture

4 Oct 2010 - 1:24 pm | संपादक मंडळ

केला आहे
संपादक मंडळ

अरे कमाल आहे त्यांनी "चुकवले" असतील तर? ;)

इंटरनेटस्नेही's picture

4 Oct 2010 - 11:32 am | इंटरनेटस्नेही

खुप छान

ब्रिटिश टिंग्या's picture

4 Oct 2010 - 1:08 pm | ब्रिटिश टिंग्या

:)

अय्या शेवटी सौ. मुळेच उतरलात ना?
सुन्दर हो शहा, खरतर मी तुम्हाला एक ओळ सुचवणार होते, म्हणजे डायलॉग ,' देखो भाई म्मेरा सरनेम है शहा , और महा होनेका मेरा हक बनता है'
हलके घ्या.

मस्त झाली लेखमाला. मग वजन कमी झाले की नाही शेवटी?

- सूर्य.

चतुरंग's picture

4 Oct 2010 - 4:29 pm | चतुरंग

शेवटी तुमचे वजन उतरणीला लागले तर! ;)

धान्याच्या काट्यावर वजन करायच्या कल्पनेनेच हसू आले! ;)
(एक वडापाव = १२ स्लाईस ह्या समीकरणाने मात्र फार्रर्र वाईट वाटलेले आहे. :( )

(वडापावप्रेमी)रंगा

स्वैर परी's picture

4 Oct 2010 - 5:16 pm | स्वैर परी

हो ना! आता वडापाव खाताना सारखी ह्य ओळीची आठवण होउन घास तोंडातच फिरत राहिल :(

सहज's picture

4 Oct 2010 - 6:10 pm | सहज

खरे आहे १ वडापाव = १२ स्लाईस हे समीकरण आता वडापाव म्हणले की आठवणार!

सूड's picture

4 Oct 2010 - 4:47 pm | सूड

छान !!

अनिल हटेला's picture

4 Oct 2010 - 5:47 pm | अनिल हटेला

:-)

स्वाती२'s picture

4 Oct 2010 - 6:08 pm | स्वाती२

" वांदा नही साब. रोज दो - चार ऐसेही भागते है. हम वहां के रिक्षावालोंका अछा धंदा हो जाता है."
खी खी खी!

खीखीखी!
हसवणारी लेखमालिका आवडली.
तुम्हाला सिंडीमावशीने सांगितलेल्या गोष्टी पटतात म्हणून तात्यांचे व तुमचे एकमत होणार यात शंका नाही.;)
पण एकदाचे चांगले डॉ. भेटले हे काय कमी?
एक वडापाव=१२ ब्रेड स्लाईसेस?
अग्ग्ग्ग्ग!
वडापाव घरी बनवून दिड वर्ष तरी झालं असेल. मध्यंतरी एकदा आयता मिळाला म्हणून सेवन ;) केला होता.
आता वडापाव खाताना ब्रेडचे १२ स्लाईसेस डोळ्यासमोर येणार.

मस्त!!

मग?? सध्या किती दाखवतो आहे वजन तो गोण्या मोजण्याचा काटा?
आणि टारगेट पूर्ण झाले की नाही?? ;)

मोहन's picture

6 Oct 2010 - 12:17 pm | मोहन

धन्यवाद प्राजु ताई

आठ महिन्यांनंतर काटा ७५ कि. म्हणतो आहे. आणि पँट ४२ वरुन ३८ साइज वर आली. टारगेट पर्यंत जायला किती घाम गाळावा लागेल कोणास ठाऊक :-).

चिगो's picture

4 Oct 2010 - 10:43 pm | चिगो

मजा आली.. ;-)

शिल्पा ब's picture

5 Oct 2010 - 6:18 am | शिल्पा ब

खुसखुशीत लेखमाला...
मागच्या भारत भेटीत मी रोज एक सामोसा, एक कचोरी, एक-दोन ग्लास उसाचा रस, अन दीड प्लेट पाणी पुरी खायचे त्याची आठवण झाली..