अशा निधड्या छातीच्या फिल्ड मार्शलला पुढे पुढे (इंदिरा युगानंतर) मात्र उपेक्षेचे, मत्सराचे, असूयेचे धनी व्हावे लागले. अर्थात त्याची प्रत्यक्षात सुरूवात झाली होती ती १९६२ च्या चीन आक्रमणादरम्यान.
[हे थोडे विस्ताराने सांगितले पाहिजे. तसेच यात ज्या सेनाधिकार्यांची, ज्या राजकारण्यांची, नोकरशाहीतील पदाधिकार्यांची नावे/उल्लेख येतील ते सर्व देशाच्या जडणघडणीत सामील होतेच, पण शेवटी माणूस वैयक्तिक पातळीवर घसरला की, त्याच्या वर्तणूकीची सीमा कुठपर्यंत जाते ते पाहिले तर या लोकांना मोठे म्हणायचे तरी कशासाठी हा विचार सर्वसामान्यांच्या मनी येतोच....असो]
(१९६० ते १९६२ ~~ मेनन, नेहरू, थिमय्या)
१९५६-५७ च्या सुमारास स्वतंत्र भारताला थोडीशी स्थिरता येऊन देशाचे लक्ष हळुहळू कृषि आणि उद्योगधंद्याच्या प्रगतीकडे वळले. तशातच दुसरीकडे 'हिंदी-चिनी भाईभाई' या चीनच्या कावेबाज प्रचाराला शांतिप्रिय पंडित नेहरूही चकले आणि नेमक्या याच क्षणी व्ही.के.कृष्ण मेनन यांची संरक्षणमंत्री पदी निवड झाली. श्री.मेनन हे अत्यंत बुद्धीमान असल्याचे मानले जात होते पण त्याहीपेक्षा ते नेहरूंच्या गळ्यातील ताईत होते. श्री.मेनन यांना कोणत्याही गोष्टीत विरोध केला गेला तर नेहरू अस्वस्थ होत असत. श्री.मेनन यांनी सैन्यदळाचा आढावा घेतला, त्यावेळी वरिष्ठ अधिकार्यांनी 'चीनी आक्रमणाचा वाढता धोका' ओळखून वेळीच सैन्याच्या आधुनिकीकरणाची गरज आहे असे प्रतिपादन करूनही त्याकडे दुर्लक्ष केले [हा एक वेगळा विषय होईल...]. काहीतरी करत आहे हे दाखविण्यासाठी १९५८ मध्ये डेहराडून येथे सैनिकांसाठी युद्धशिक्षणाकरीता 'जंगल वॉरफेअर स्कूल' व 'कॉलेज ऑफ इन्फंट्री, महु येथे दुसरी संस्था चालू करण्यात आली. झाली तयारी श्री.मेनन यांच्या नजरेतून. १९६० उजाडले आणि त्यावेळचे चीफ ऑफ आर्मी जनरल थिमय्या हे इटलीला जाऊन "माऊंटेनरींग वॉरफेअर अँड स्ट्रटेजी" करून आल्यानंतर त्यांनी संरक्षण खात्याला आपल्याकडे आता तातडीने सैन्यात एक 'माऊंटेनरींग डिव्हीजन' सुरू करण्याची आवश्यकता आहे अशा आशयाची लिखित स्वरूपाची सूचना केली. तिला श्री.मेनन यांनी केराची टोपली दाखवली, इतकेच नव्हे तर पं.नेहरू यांच्याकडून "असे केले तर आम्ही युध्दखोर आहोत असे चीनला वाटण्याची शक्यता आहे, मग दोन देशात तणावाचे वातावरण निर्माण होईल," असा जन.थिमय्या यांना निरोप दिला गेला. जनरल थिमय्या अस्वस्थ होणे स्वाभाविकच होते आणि ते मेनन यांचा विरोध जाणून होते. त्याला कारण म्हणजे जनरल ब्रिज मोहन कौल. [जे नेहरू परिवारातील तसेच काश्मिरमधील असल्याने मेनन यांच्या मर्जीतील.] मिलिटरीत 'क्वार्टरमास्टर जनरल' नावाचे एक मोठे पद असते जिचा अर्थखात्याशी संबंध असतो. सुप्रीम कमांडर या नात्याने त्या पदावर जनरल थिमय्या यांनी १९५९ मध्ये मेजर जनरल पी.एस.ग्यानी यांच्या नावाचे शिफारस केली होती....तिली मेनन यांनी मोडता घातला आणि संरक्षण मंत्री या हक्काने त्या जागी मे.जनरल बी.एम.कौल यांना नियुक्त केले. ही अपमानस्पद घटना मनी ठेवूनच जन.थिमय्या इटलीला गेले होते व परत आल्यानंतर पर्वतदलाच्या प्रस्तावाला दिलेली नामंजुरी याबद्दल ऑगस्ट १९६० मध्ये थेट मेनन यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. मेनन यांना मनातून ते नको होतेच. पण जनरल थिमय्यांची ही अस्वस्थता तोपर्यंत संसद सदस्यांपर्यंत पोचली असल्याने मेनननी थिमय्यांना नेहरूंच्याकडे पाठविले; नेहरूंनी मेनन यांची बाजू घेतली व नागरी प्रशासन आणि लष्कर यांच्यात ताण नको म्हणून थिमय्यांना पदाचा राजिनामा देण्यास सांगितला, तो त्यांनी लागलीच दिला. थिमय्यांनी राजिनामा तर दिलाच पण आपल्या राजिनाम्या मागील कारण संसदेपुढे सांगितले जावे अशी नेहरुंच्याकडे विनंती केली, ती त्यांनी मानली. मात्र धक्कादायक काय असेल ते हे की, संसदेत सांगताना, नेहरू म्हणाले, (त्यांच्याच भाषणातील वाक्य) : "“Gen.Thimayyaa’s action (Resigning the Post) is peculiarly unwise and most extraordinary thing to do." इतकेच काय पण संरक्षण मंत्री मेनन आणि जन.थिमय्या यांच्यात लष्करी व्यूहरचनेवरून काही वाद चालू होते याचाही त्यांनी साफ इन्कार केला. हा थिमय्या यांना मोठा धक्का होता....तसाच त्यांना मानणार्या त्यांच्या ज्युनिअर अधिकार्यांनादेखील ~ यात होते तीन प्रमुख अधिकारी (१) ले.जनरल एस.पी.पी.थोरात (२) ले.जनरल चौधरी आणि (३) मे.जनरल सॅम माणेकशॉ.
~~ आर्मीच्या सीनिऑरिटीच्या लिस्टमध्ये आता ले.जनरल एस.पी.पी.थोरात यांचे नाव अग्रभागी होते, त्यामुळे त्यांच्या सहकार्यांची उद्या थोरातसाहेबांच्या नावाची 'भारताचे नवे चीफ ऑफ आर्मी स्टाफ' अशी घोषणा होणार अशी अटकळ होती. पण इथेही 'मेनन मॅजिक ऑन नेहरू' कामी आली आणि एका रात्रीत एस.पी.पी.थोरातांच्या जागी त्यावेळचे पश्चिम कमांडचे प्रमुख ले.जनरल पी.एन.थापर (जे जन.कौल यांचे निकटचे स्नेही होते) यांच्या नावाची 'चीफ ऑफ आर्मी स्टाफ' अशी घोषणा दिल्लीतून झाली. इतकेच नव्हे तर दुसर्याच दिवशी बी.एम.कौल यांनाही प्रमोशन देऊन लेफ्ट्नंट जनरल करण्यात आले....आणि त्यांना खाते दिले "चीफ ऑफ जनरल स्टाफ"; म्हणजे ही जागा जनरलपदाच्या तोडीचीच व देशातील सर्व प्रमुख लष्करी ठाणे आणि संस्था यातील प्रमुखांच्या हालचालीवर नजर ठेवणारी. या निवडीला एकजात लष्करी अधिकारी वर्गाने विरोध केला पण मेनन पुढे काहीही चालत नव्हते. याच काळात मे.जनरल सॅम माणेकशॉ इंडियन मिलिटरी अॅकेडमीचे कमांडंट होते. ते आपले दोन गुरु १. जन.थिमय्या आणि २. जन.थोरात यांच्या अपमानस्पद कारकिर्द समाप्तीमुळे कमालीचे अस्वस्थ झाले होते आणि नेहरूंशी असलेली त्यांची सलगी मेनन आणि कौल यांना खटकत असल्याने या दोघांनी "सॅम माणेकशॉ हे वरिष्ठांविषयी परदेशात गैरसमजूत पसरवितात आणि त्यांना भारतापेक्षा इंग्लंड प्रिय आहे.." असली काहीतरी बेताल वक्तव्ये करून सॅमविरूध्द "कोर्ट ऑफ इन्क्वायरी" स्थापन केले. (त्याला दुसरेही एक सुडाचे राजकारण होतेच. 'थिमय्या' प्रकरणाचा संसदेत थोडा गाजावाजा होणार असे दिसताच 'थिमय्या कसे इन्कॉम्पिट्न्ट जनरल आहेत' असे त्यांच्या नजदिकच्या अधिकार्यांनी वेळ आल्यास सांगावे असे मेनन यांनी ज्यांना सुचविले आणि ज्यानी तो प्रस्ताव तात्काळ फेटाळून लावला त्यात अग्रभागी सॅम माणेकशॉ होते, ही चीडदेखील मेनन यांच्या मनात ठसठसत होतीच.)
[मिपा वाचकांचा इथे थोडासा गोंधळ उडेल....कारण नागरी व लष्करी अधिकार्यांच्या विरुद्ध माणेकशॉ यांनी ओपनली उदगार काढल्याचे एकवेळ समजेल पण 'इंग्लंड' चा इथे काय संबंध? तर तोही एक हास्यास्पद आरोप होता. आयएमआयच्या माणेकशॉ यांच्या ऑफिसमधील टेबलवर जे काही दोनचार व्यक्तिगत फोटो होते, त्यात एक होता क्वीन व्हिक्टोरियाचा जी एकेकाळी इंग्लंडची महाराणी होती....ही बाब स्वतंत्र भारतातील नोकरशाहीला खटकत होती आणि त्याबाबतचा रिपोर्ट खुद्द नेहरूंपर्यंत पोचला होता. पण नेहरूंना त्या फोटोचे काही वाटले नव्हते.]
१९६१ च्या मध्यावधीस कामकाज सुरू केलेल्या कोर्ट ऑफ इन्क्वायरीमधून अर्थातच काही निष्प्णण झाले नाही आणि तिने सॅमना सर्व आरोपातून मुक्त केले. मेनन आणि कौल यांच्या अंगाचे तीळपापड झाले आणि तशातच चीनचा ड्रॅगन इकडे चालून आल्यानंतर या दोघांची लायकी काय आहे हे सार्या देशाला समजले. मग याक्षणी नूतन जनरल पी.एल.थापर कुठे होते? तर ते फिरत होते आपली कागदपत्रे घेऊन ले.जन.कौल यांच्या पाठीमागे. संरक्षण मंत्र्याने देशाच्या सुप्रीम कमांडरला, थापरना अगदी हरकाम्या (त्यांना खाजगीत errand boy असे म्हणत) करून सोडले होते.
जन.थापर हे मेनन यांच्यादृष्टीने कसे एक खेळणे होते याचे वर्णन सुप्रसिद्ध पत्रकार श्री.डी.आर.मंकेकर (ज्यांचे कृष्ण मेनन यांच्याशी अगदी 'अरेतुरे' चे संबंध होते) यांनी त्यांच्या "The Guilty Men of 1962" या गाजलेल्या पुस्तकात केले आहे. तो खास उतारा इंग्रजीमधूनच वाचण्यासारखा आहे : "it was apparent that General Thapar's greatest qualification for the post of the chief of army staff was his malleability-unlike Thorat whom Menon considered 'uppity'. Menon hoped that a man (i.e. Gen.P.L.Thapar) with such unspectacular service record would be beholden to him for being made the army chief and eat out of his hands." During his tenure, Thapar is said to have deliberately and instructions from Menon-sidelined Manekshaw. But even Menon found Thapar useless. So much so that once Menon remarked to Mankekar that Thapar did not even know the places in NEFA.
१९६२ च्या नामुष्कीच्या पराभवानंतर या सगळ्या कचर्याची नेहरूंनी हकालपट्टी केली आणि त्यांनी माणेकशॉ यांना सन्मानाने दिल्लीला परत बोलाविले (खरं तर नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्या मनात त्यावेळी सॅम माणेकशॉ यांनाच थापर यांच्यानंतर 'चीफ ऑफ आर्मी' करायचे होते, पण त्याला खुद्द माणेकशॉ यानीच नकार दिला कारण ते सीनिऑरिटीला मानत होते आणि त्यांच्या दृष्टीने त्यावेळी प्रथम जन.चौधरी व नंतर जन.कुमारमंगलम हे त्यांना सीनिअर होते. मग खरेच या दोन जनरल्स नंतरच माणेकशॉ यांनी चीफची जबाबदारी स्वीकारली) व नेफा आघाडीवर जाण्यास सांगून अधिकार्यांच्यात व सैनिकांत मनोधैर्य कायम करण्याची जबाबदारी सोपविली. माणेकशॉ यांनी सैनिकांसमोर केलेले भाषण तर प्रसिध्द आहेच (जे लेखमालेच्या या अगोदरच्या भागात दिले आहेच) पण त्या अगोदर त्यांनी नेफा आघाडीवर असलेल्या लष्काराच्या सर्व तुकड्यांच्या अधिकार्यांची सभा घेतली. त्यांचे कनिष्ठ अधिकारी नेहमीप्रमाणे सभेची तयारी करीत होते...सर्व अधिकारी एकेक करून तिथे आले, जमले, सभेसाठी सज्ज झाले....आणि दुसरीकडून जनरल माणेकशॉ यांची हसरी पण तितकीच जरब वाटणारी आकृती त्या ठि़काणी आली. खाड्कन उठून सर्व अधिकार्यांनी त्याना रितसर सलामी ठोकली आणि ते आता खुर्चिवर टेकतात न टेकतात तोच....माणेकशॉ यांनी भाषण केले :
"मित्रांनो, मी आलोय...चला काम सुरू करू या..."
बस्स....संपले भाषण आणि सॅमबहादूर तंबूच्या बाहेर !
"जनरल माणेकशॉ आणि त्यांचे लाडके सैनिक"
मागील दोन भागात १९७३ पर्यंतचा आढावा घेतलेला आहेच. त्यामुळे तो काळ परत इथे न आणता त्यांच्या निवृत्तीच्यावेळी झालेल्या अन्यायावर येतो.
आपली अशी कल्पना असते की असूया, मत्सर नागरी सेवेतच असतो. पण लष्करातही तो कुठल्या पातळीपर्यंत जातो हे समजले तर सर्वसामान्य नागरिकांना त्यावर विश्वास ठेवणे जड जाते. जनरल सॅम माणेकशॉ यांची सेवा काहीच महिने राहिले असता इंदिराजींना त्यांना "स्वतंत्र भारताचे प्रथम फिल्ड मार्शल" या मानद किताबाने गौरविण्यात यावे असे वाटले व त्यानुसार त्यांचे त्यावेळचे सचिव पी.एन.हक्सर यांच्यामार्फत संरक्षण खात्यास तसा प्रस्ताव तयार करण्यास सांगितले. त्याअगोदर बांगला देश युद्ध विजय, बॅन्कांचे राष्ट्रीकरण, संस्थानिकांचे तनखे बंद आदी विक्रमी कामगिरीमुळे इंदिरा गांधी देशभरात "हीरो" झाल्याच होत्या त्यामुळे संरक्षण खात्यानेही त्यांच्या या सुचनेची तातडीने अंमलबजावणी करून प्रस्ताव राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी (तिन्ही दलाचे सरसेनापती या नात्याने) तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली.
१९६९ ते १९७३ या काळात श्री.आय.राममोहन राव हे आयएएस अधिकारी मिलिटरीचे पब्लिक रिलेशन्स ऑफीसर होते. त्यांनी 'सॅम माणेकशॉ - जनरल ते फिल्ड मार्शल' घडामोडी पाहिल्या. त्यांनी या घटनेचा आढावा घेतला आहे. प्रक्रिया तर सुरू झाली पण इथे आता अडचण अशी आली की; 'फिल्ड मार्शल' या पदाबरोबर 'बाय डिफॉल्ट' नेव्ही आणि एअर फोर्स यांचे प्रमुखपददेखील माणेकशॉ यांच्याकडे जाणार आणि साहजिकच उच्चपदस्थांत असूयेने जन्म घेतला. डिफेन्स मिनिस्ट्रीने नेव्ही आणि एअर फोर्स प्रमुखांकडे हे पद माणेकशॉ यांना देण्याबाबत विचारणा केली असता अॅडमिरल एस.एम.नंदा यांनी कागदपत्रावर सही केली मात्र हवाई दल प्रमुख पी.सी.लाल यांनी माणेकशॉ याना "फिल्ड मार्शल" हे पद देणास विरोध केला. त्यांनी आपला विरोध लेखी स्वरुपात नोंदविला जो श्री.राममोहन राव यांच्याकडे आला. एसीएम लाल म्हणतात, "The three Services had operated as equal partners in the Bangladesh war, and they had demonstrated their ability to work effectively together without having a Super Chief sitting over them....I saw in the proposed arrangement a positive danger to the frank and free discussion, particularly if the CDS [Chief of Defence Staff] happened to be excessively assertive and intolerant of the ideas of others." परत थांबली ती फाईल....लष्करातून मंत्रालयात..मंत्रालयातून हक्सर,...हक्सरकडून इंदिराजी. इतका वेळ की....आता कायद्यानुसार माणेकशॉ यांची सेवा दोन आठवडे उरली होती....शेवटी बाईंनी आपल्या अधिकारात त्यावर शेरा मारला आणि मंजुरीसाठी राष्ट्रपती भवनकडे फाईल गेली. त्यावर त्यावेळचे राष्ट्रपती गिरी यांनी संमतीदर्शक सही केली. म्हणजे सेवा संपण्यास फक्त १३ दिवस राहील होते.
"फिल्ड मार्शल पदाचे बॅटन" जे राष्ट्रपतींनी प्रदान केले.
(~~~~ पण दुर्दैवाने या पदाला ना पगार होता, ना भत्ते.....ना कुठे जाण्यासाठी एखादी कार.)
इन्द्रा
(पुढील भागात > पेन्शन प्रकरण, निवृत्तीनंतरचे जीवन, कुटुंबिय)
प्रतिक्रिया
1 Oct 2010 - 4:12 pm | चिरोटा
हाही भाग वाचनिय.
1 Oct 2010 - 5:37 pm | नितिन थत्ते
हाही भाग वाचनीय.
दुवे देता आले तर बरे.
दुवा एक : त्यांच्या १३०० रु पेन्शनविषयी. असे दिसते की त्यावेळी लष्करप्रमुखांना १२०० रु पेन्शन असे. त्यापेक्षा १०० रु जास्त पेन्शनवर ते फील्ड मार्शल म्हणून निवृत्त झाले.
यात जेकब यांनी कोर्ट ऑफ इन्क्वायरी विषयी पण सूचक लिहिले आहे. Jacob recalls this incident and says, "It's not my wont and not in my character to give evidence, so I refused." But he adds, "Had I done so, it might have caused difficulties for Maneckshaw."
इतर सैन्याधिकार्यांच्या रोषाचे कारण कदाचित What's gnawing at most of his contemporaries is that, Maneckshaw also did go around claiming that he ran the show singlehandedly during the 1971 war. The insinuation was that the airforce and navy were answering to him, when again, this is not true. हे असावे.
दुवा दोन : त्यांच्या फील्ड मार्शल पदावरील नेमणूकीबाबतच्या घडामोडी.
(या भागात अपेक्षित नावांवर दोषारोप नसल्याने अनेकांचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता). ;)
1 Oct 2010 - 5:53 pm | पुष्करिणी
टेक्निकली फिल्ड मार्शल ह्या पदावरील व्यक्ती कधीच सेवानिवॄत्त होत नाही आणि या पदाचं वेतन मरेपर्यंत मिळतं.
त्यामुळं फिल्ड मार्शल व्यक्तीला सेवानिवृत्ती वेतन देणं हेच फारसं बरोबर नव्हतं. ते डॉ. अब्दुल कलामनी २००७ मधे १९७३ पासूनचा पागार आणि सरकारकडे राहीलेली इतर थकबाकी असे १.१६ कोटी रूपये मंजूर करून ती चुक दुरूस्त केली.
1 Oct 2010 - 11:49 pm | इन्द्र्राज पवार
"......आणि या पदाचं वेतन मरेपर्यंत मिळतं.''
~ खरंय.... पण झारीतल्या काही शुक्राचार्यांनी त्यांचे हे 'वेतन'च फिक्स केले नाही ना. त्यामुळे ३५ वर्षे ते रुपये १३००/- च घेत राहिले. वेतनश्रेणी नसल्याने पे फिक्स नाही... अन् पे फिक्स नसल्याने कालानुरूप त्याचे रीव्हिजन झाले नाही.
इन्द्रा
2 Oct 2010 - 12:43 pm | पुष्करिणी
१३०० रू. हे 'चीफ ऑफ आर्मी स्टाफ' या पदाचं सेवानिवृत्ती वेतन म्हणूनच देण्यात आलं, पगार म्हणून नाही.
1 Oct 2010 - 7:13 pm | इन्द्र्राज पवार
"Had I done so, it might have caused difficulties for Maneckshaw."
~~ होय जनरल जेकब यांची ही प्रतिक्रिया मला माहित आहेच. चौकशीमध्ये क्वीनचा फोटो लावणे याशिवाय आणखीन एक बाब होतीच जिचा मी जाणूनबुजून उल्लेख केलेला नाही....कारण ती त्यांची (माणेकशॉ यांची) खाजगी बाब होती....पण त्या दरम्यान मेनन अँड को.ने ती काढली होती हे खरे. हा विषय विस्ताराने पुढील भागात घ्यावा असे वाटते.
"Maneckshaw also did go around claiming that he ran the show singlehandedly during the 1971 war."
~~ हे जरा पचायला जड जाते मला....पण उद्या परत इथल्या दोघांतिघांशी चर्चा करतो. [वाक्याच्या रचनेवरून तर असे वाटते की, सत्य नसून प्रवाद असावा.]
इन्द्रा
1 Oct 2010 - 8:37 pm | सुनील
या भागात अपेक्षित नावांवर दोषारोप नसल्याने अनेकांचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता
हे अपेक्षित कोण बॉ?
2 Oct 2010 - 2:20 pm | परिकथेतील राजकुमार
ह्यालाच एका चाचाने दुसर्या चाचाला पाठीशी घालणे असे म्हणत असावेत.
सहजराव म्हणतात तसे लेखन आणि त्यावरील प्रतिसाद दोन्हीही अप्रतिम. असे सुंदर लेखन, प्रतिक्रीया वाचण्यात आल्या की वाचनखुणेची उणीव हमखास जाणवतेच.
5 Oct 2010 - 11:00 pm | चतुरंग
ह्यालाच एका चाचाने दुसर्या चाचाला पाठीशी घालणे असे म्हणत असावेत.
किंवा 'चाचेगिरी' असे म्हटले तरी चालावे! ;)
जनरल रंगय्या
1 Oct 2010 - 6:10 pm | sagarparadkar
मी अनेक वर्षांपूर्वी जनरल थोरात यांच्या आत्मचरीत्रातील काही भाग बहुतेक दै. लोकसत्ता मधे वाचला होता. त्यांत नेहरू-मेनन यांची ध्येय्-धोरणे (?), जनरल कौल ह्यांचे इस्पितळातील खाटेवरून आदेश सोडणे, जनरल थिमय्यांचे ह्या सर्वांशी असलेले तणावपूर्ण संबंध वगैरे सर्व काही अगदी विस्ताराने दिले आहे.
टी प १ : हे लेख जेव्हा लोकसत्ता मधे प्रकाशित झाले तेव्हा स्वाभाविकच श्री. माधव गडकरी हे संपादक होते.
टीप २ : ही प्रतिक्रिया त्या वाचकांसाठी आहे जे नेहरू, मेनन ह्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्व बाजूने विचार करू शकतात. ज्यांनी त्यांना देवत्व अर्पण केले आहे आणि त्यांचे विरुद्ध मतांना जे देवावर आरोप असे समजतात त्यांनी ह्या प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष करावे ...
1 Oct 2010 - 7:38 pm | इन्द्र्राज पवार
जनरल एस.पी.पी.थोरात यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत तर लिहिता येईलच पण एकूणच याही महान सेनानीच्या झगझगत्या कारकिर्दीबद्दलही तितक्याच आत्मियतेने लिहिता येईल...स्वतंत्रपणे.
".....त्यांनी ह्या प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष करावे ..."
~ असे काही नसते, सागर. लोकशाही तत्वावर मिसळपावची कार्यप्रणाली चालते, तेव्हा तुम्हाला उद्या असे वाटले की, 'इन्द्रराज पवारां'च्या या लिखाणाला विरोध करु या....तर यू आर मोस्ट वेलकम. या उलट तुमचे एखाद्या प्रतिक्रियेतील मत मला पटले नाही तर मी देखील तसे इथे नोंदवू शकतो..... फक्त विरोध करताना प्रतिक्रियेतील भाषेचे सादरीकरण लाल असू नये.
इन्द्रा
1 Oct 2010 - 7:18 pm | हर्षद आनंदी
भारताला या परिस्थिती पर्यंत पोहचवण्यास मदत करणार्या नेहरु-गांधींना कोपरापासुन नमस्कार!!!
उद्या गांधीं जयंती.,,. पांढरी टोपी घाला, हात जोडा म्हणा
रघुपती राघव राजाराम | पतित पावन सीताराम
कोण म्हणतो रे, दोन्ही बाजुला बाया चुकलो स्वयंसेविका हव्यात.. सेवा कराल मेवा मिळेल हो!!
मग तिकडे राम वनवासात का असेना??
1 Oct 2010 - 9:42 pm | जयंत कुलकर्णी
हे आपल्याकडून अपेक्षित नाही. आपण मला वाटते हे लिहिण्यात चुकच केली आहे. आपण गांधींच्या विचारावर टीका करू शकता पण त्यांचे विचार काय होते हे पूर्णपणे समजून घेऊन. आपले वय काय आहे हे समजत नाही पण आपण जरा सबुरिने घ्यावे ही विनंती.
9 Oct 2010 - 9:40 pm | हर्षद आनंदी
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
2 Oct 2010 - 10:20 am | नितिन थत्ते
इंद्रा यांच्या लेखात गांधींचा उल्लेख देखील नाही.
मग त्यांची आठवण काढून "नेहमीचीच लोकप्रिय" वक्तव्ये करायचे काय कारण?
2 Oct 2010 - 11:13 pm | विश्वनाथ मेहेंदळे
थत्ते काका, टापरे लावलेला घोडा असतो ना, त्याला कसे फक्त एकाच दिशेने बघता येते, बाकी सगळा अंधार असतो, तसे आहे हे. अनेक लोकांना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी फक्त गांधी द्वेषच दिसतो. असो, आपण काय करणार त्याला ?
1 Oct 2010 - 7:31 pm | पुष्करिणी
अजून एक या काळातली कॉन्ट्रोव्हर्सी म्हणजे १९७१ मध्ये बांग्लादेश निर्मिती नंतर एका वार्ताहरानं मुलाखत घेताना विचारलं की
'१९४७ मध्ये जर तुम्ही भारतीय सैन्यदलात सामिल न होता पाकिस्तानी सैन्यदलात सामिल झाला असता तर काय झालं असतं?'
त्यांचं उत्तर होतं ' कदाचित युद्धाचा निर्णय वेगळा लागला असता'. ह्या उत्तरावर बरीच रणधुमाळी माजली होती म्हणतात.
एका एनसीसी च्या संचालनात एका स्त्री कॅडेटला बक्षिस देताना त्यांचा हँडशेक करण्याऐवजी 'पेक ऑन द चीक' प्रकार बराच गाजला होता म्हणे. पण त्यांनी हे एका सैनिकाचं दुसर्या सैनिकाप्रति फक्त अफेक्शनेट वर्तन आहे हेच म्हणणं कायम ठेवलं.
२००१ मध्ये परवेझ मुश्शरफ भारत भेटी दरम्यान एअर चिफ मार्शल टिपणीसांनी मुश्शरफ ना फक्त हँड्शेक केला सॅल्युट नाही यांवर त्यांनी टिपणीस चूक आहेत आणि 'मी गणवेषात असतो तर मी सॅल्यूट केला असता' अस म्हटलं त्यावर थोडं वादंग होतं.
2 Oct 2010 - 12:05 am | पैसा
असे मनात असेल ते प्रमाणिकपणाने बोलणारे लोक बहुतेक वेळा वरिष्ठ लोकाना खूष ठेवू शकत नाहीत. माणेकशॉ हे स्पष्टवक्ते होते असं कोणी म्हणेल, तर कोणी याचं वर्णन फटकळपणा असं करील. आणखी कोणीतरी " स्वतःला खूप जादा समजतो काय?" असंही म्हणेल.
पण १०० त ९९ वेळा राजकारणी असोत किंवा बरोबरचे दुसरे कलिग्ज असोत, त्याना असे स्पष्टवक्ते लोक अडचणीचे ठरतात. आणि मग ते पद्धतशीरपणे बाजूला सारले जातात.
1 Oct 2010 - 7:33 pm | विसुनाना
-मी वाचलेल्या एका पुस्तकात (The unfought war of 1962 : the NEFA debacle / J. R. Saigal) म्हटल्याप्रमाणे - याउलट नेहरूंनाच आपल्या सैन्याबद्दल गैरवाजवी आत्मविश्वास आणि चिनी सैन्याच्या शक्तीबद्दल गैरवाजवी अंदाज होता. त्यामुळे आपण नेफा-(अरुणाचला)ची सीमा निश्चित केली तर चिनी त्याला विरोध करणार नाहीत म्हणून त्यांनीच सैन्याच्या हालचाली नेफा बॉर्डरवर सुरू केल्या असा उल्लेख आहे. चीनने दिलेल्या इशार्यांना न जुमानता त्यांनी तिथे आपली औटपोस्ट स्थापायला सुरुवात केली त्यामुळेच ६२चे युद्ध झाले. ते 'शांतिप्रिय' होते हे तितकेसे खरे नसावे.
तुमचे काय मत आहे?
6 Oct 2010 - 9:12 am | अप्पा जोगळेकर
होय. ते शांतिप्रिय नव्हते तर धोरणी होते असा दावा नरहर कुरुंदकर यांनी केला आहे. त्यांची धोरणे चुकली असतील किंबहुना चुकलीच पण त्यामागे शांतिप्रियता हा हेतू नव्हता. भारतासारख्या दुबळ्या, गरीब राष्ट्राला स्वातंत्र्य मिळाल्या मिळाल्या कोणतेही युद्ध परवडण्यासारखे नव्हते. म्हणून त्यांनी शांततेचा लांबरुंद लतामंडप उभारुन ठेवला. भारतात रणगाड्यांचे प्रॉडक्शन(५४ किंवा ५६ साली) सुरु करण्यामागे पंडित नेहरु यांचा इनिशिएटिव्ह आहे ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. पंडित नेहरु काय किंवा महात्मा गांधी काय ते शांतिप्रिय होते, अहिंसावादी होते या सगळ्या फार नंतरच्या गोष्टी आहेत. या सगळ्याआधी ते दोघेही एक मुत्सद्दी, धूर्त,कावेबाज राजकारणी होते ही बाब लक्षात ठेवली पाहिजे.
1 Oct 2010 - 7:43 pm | सुनील
वाचनीय भाग.
अवांतर वाटेल, परंतु कोणत्याही व्यक्तीस केवळ काळ्या वा पांढर्यात रंगवले जाऊ नये म्हणून सांगावेसे वाटते.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व मेनन यांनी केले होते. २३ जानेवारी १९५७ रोजी काश्मिर ह्या विषयावर सलग आठ तास भाषण करून त्यांनी भारताची बाजू मांडली. अती थकव्याने कोसळले. वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना इस्पितळात नेले गेले. तिथून परत परिषदेत आले. पुन्हा तासभर बोलून भाषण संपवले.
निवृत्तीनंतर माणेकशा अनेक कंपन्यांच्या डायरेक्टर बोर्डावर होते (ज्यात ओबेरॉय हॉटेलचाही समावेश होता). त्यामुळे, १३०० रुपये निवृत्तीवेतन (ते ही नियमाप्रमाणे मिळणारे) हा फारसा बाऊ करण्याचा विषय नसावा. हे कदाचित नंतरच्या भागात येईलही.
1 Oct 2010 - 8:10 pm | इन्द्र्राज पवार
श्री.सुनील....
~~ तुम्ही या लेखाचा सुरूवातीचा पॅरा वाचला तर लक्षात येईल की मी म्हटले आहे "श्री.मेनन हे अत्यंत बुद्धीमान समजले जात" (कारण ते सत्यच होते.... ज्या व्यक्तीचा इंग्लंडमध्ये बर्नार्ड शॉ समवेत जाहीर सत्कार केला जातो...आणि तोही इंग्लिश कम्युनिटीकडून.... ती व्यक्ती नक्कीच एक्स्ट्राऑर्डिनरी टॅलेन्टची असणार यात संदेह नाही...). मात्र पुढे जेव्हा ते नेहरूना अतिप्रिय झाले त्यावेळी त्यांच्यातील 'बुद्धिजीवी' बाजूला जाऊन एका राजकारण्याने तिथे प्रवेश केला, ज्याने त्या बुद्धीला 'मी इतरापेक्षा वेगळा....' हे झालर दिली. फार हट्टी झाले होते नंतर नंतर....कारण? परत तेच....नेहरूंचे त्यांनी मिळविलेले प्रेम.
~~ येस ऑफ कोर्स....आम्हा सर्वांना ते ८ तासाचे मॅरेथॉन काईंड भाषण माहित आहे, इतकेच काय युनोच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठे भाषण त्याची अशी नोंद आहे. त्याबद्दल त्यांना सलामच केला पाहिजे. खुशवंतसिंग यांनी लंडन हायकमिशनरच्या कार्यालयात त्यांच्याबरोबर काम केले आहे. त्यांनी सांगितलेल्या आठवणीवर इथे एक लेख देण्याचा विचार आहेच....पण थोडक्यात इतका बुद्धीमान माणूस वैयक्तिक आकसावर उतरून दुसर्यास हिणवतो ही नाही म्हटले तरी क्लेशदायक आहेच आहे.
इन्द्रा
1 Oct 2010 - 9:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
खरंतर बुद्धीमान माणूसच वैयक्तीक आकसावर उतरला तर त्रास होतो. ज्यांना विचार नाही करता येत त्यांच्याबद्दल काय राग येणार?
असो. इंद्रा, चांगला लेख. सुनील यांच्या प्रतिसादामुळे कृष्ण मेनन यांचाही चांगला भाग समोर आला.
1 Oct 2010 - 8:41 pm | स्वाती२
माहितीपूर्ण लेखमाला!
1 Oct 2010 - 9:27 pm | इन्द्र्राज पवार
धन्यवाद स्वाती....
~ पण लेखमालेविषयी सूचनाही करीत जावा. हे एवढ्यासाठी म्हणतो की, त्यामुळे अशा विषयातील अभ्यासाला आणखीन नवीन दिशा मिळते. उदा. वर श्री.सुनील यांनी श्री.कृष्ण मेनन यांचा आदरार्थी उल्लेख केला आहे...तो वाचल्यानंतर मेनन यांच्याविषयी आपला अभ्यास कमी पडतो की काय अशीही शंका येते. त्यामुळे 'चला, त्यांची ती बाजुही पाहू...' हा विचार येतो....अभ्यासकाला हा ही एक फायदाच.
इन्द्रा
2 Oct 2010 - 10:30 am | प्रदीप
सुंदर आहे पण एकांगी होऊ नये ह्याची काळजी घेणे आवश्यक आहे असे मला वाटते. म्हणूनच मी अगोदर एकदा म्हटले होते की मेनन ह्यांच्याविषयी नुसते खुशवंत सिंगांच्या (तथाकथित) खुसखुशित लिखाणाव्यतिरीक्त इतरही काही संदर्भ तपासावेत. वर सुनील ह्यांनी एक चांगला उल्लेख केलेला आहे. नेहरूंच्या चीनविषयक धोरणावरील माहितीही (जिचा तुम्ही येथे ओझरता उल्लेख केला आहेत), विसूनानांकडून एक वेगळाच अँगल मिळाला आहे.
अत्यंत कर्तबगार माणसे अनेकदा फटकळ असतात, त्यांच्या वर्तनाचा फटका त्यांच्या हाताखालील कामे करणार्यांना तसेच बरोबरीच्यांनाही बसलेला असतो. ह्या दुखापतींचे कोठे ना कोठे पडसाद उमटणार हे स्वाभाविक आहे. त्यात तुम्ही दर्शवलेली असूयाही आहेच.
जाता जाता: फोटोतील सैनिकांत अनेक जायबंदी दिसतात, कुणाचा पाय बँडेजमधे आहे, कुणाचे डोके! तरीही सर्व हसताहेत, माणेकशा सैनिकांत अत्यंत पॉप्युलर असले पाहिजेत.
1 Oct 2010 - 11:49 pm | प्राजु
अतिशय वाचनीय..
पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत..
2 Oct 2010 - 5:18 am | मुशाफिर
इंद्रांनी त्यांच्या लेखात केलेल्या विधानाविषयी आणि 'विसूनानां' नी त्याबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्णाविषयी थोडसं:
नेहरू शांतिप्रिय होते की नव्हते? यापेक्षा त्यांची देशाचे नेते म्हणून लष्कराविषयीची (आणि एकूणच जागतीक राजकारणाविषयीची) जाण किती होती? हा महत्वाचा मुद्दा आहे, असं मला वाटतं. स्वातंत्र्यानंतर "भारत कोणावरही कधीच हल्ला करणार नाही. त्यामुळे, आम्हाला सैन्याची गरजच नाही (सैन्यदलं विसर्जीत करावीत). आमच्या अंतर्गत सुरक्षेसाठी केवळ पोलिसदलच पुरेसे आहे." (संदर्भः 'इंडियन डिफेन्स रिव्हु', स्वातंत्र्यानंतरचे भारताचे पहिले लष्करप्रमूख जनरल सर लोखार्ट यांनी १९४७ मध्ये भारताची सुरक्षा योजना कशी असावी? ह्याविषयीचा अहवाल नेहरूंना सादर केल्यावर नेहरूंनी दिलेले हे उत्तरः “Rubbish. Total Rubbish. We don’t need a defence plan. Our policy is non-violence. We foresee no military threats. Scrap the Army. The police are good enough to meet our security needs").
ह्यातून ते आंतरराष्ट्रीय राजकारणात किती नवखे ('naive') होते, हेच दिसून येते. त्यावेळच्या बर्याच लष्करी अधिकार्यांच्या मते १९४८ च्या पाकिस्तानी काश्मिरवरच्या आक्रमणामुळेच भारतीय लष्कर विसर्जीत होण्यापासून वाचले.
त्यामुळे, "याउलट नेहरूंनाच आपल्या सैन्याबद्दल गैरवाजवी आत्मविश्वास आणि चिनी सैन्याच्या शक्तीबद्दल गैरवाजवी अंदाज होता." हे विधान तितकसं बरोबर नाही. नेहरूंनी जनरल कौल, मेनन, आय. बी. चे प्रमूख एन. बी. मल्लिक आणि कं. यांच्या विषयी अवास्तव विश्वास दाखवला, हा त्यांचा दोष नक्कीच होता. पण आपल्या सैन्याबद्दल गैरवाजवी आत्मविश्वास होता, हे म्हणणं बरोबर नाही कारण चीन आपल्या 'फॉरवर्ड पॉलिसी' ला सैनिकी विरोध ('मिलिटरी रेसिस्टन्स') करणार नाही, हा नेहरूंचा समज होता. १९६२ च्या युद्धाविषयीचा 'हेंडरसन ब्रूक्स रिपोर्ट' आजही जनतेला खुला नाही. केवळ, नेव्हिल मॅक्स्वेल यांनी (त्यांच्यामते रिपोटमध्ये काय असेल ह्याचा) लिहिलेला सारांश जालावर आहे. जिज्ञासूंनी जरूर वाचावा: http://www.claudearpi.net/maintenance/uploaded_pics/AnIntroductiontotheH...
पुढील भागात इंद्रराज ह्या विषयावर अधिक भाष्य करतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे विस्तारभयास्तव तुर्तास इतकेच.
मुशाफिर.
अवांतरः 'नेहरू आंतरराष्ट्रीय राजकारणात किती नवखे ('naive') होते.....', हे मी बरेचसे संयतपणे मत मांडायचं म्हणून म्हटलयं. एकदा एका मित्राशी याविषयी झालेल्या चर्चेच्यावेळी त्याने "नेहरू मुर्खांच्या नंदनवनात राहात होते आणि चीन्यांनी हे बरोबर ओळखलं होतं" असं मत नोंदवल होत. ज्याच्याशी मी खूपच जास्त सहमत आहे. तो पुढेही बरचं काही बोलला होता पण ते इथे लिहिण्यासारखं नाही :). असो!
2 Oct 2010 - 7:56 pm | विसुनाना
ही फॉरवर्ड पॉलिसी काय होती? -ते जाणून घ्यायला आवडेल.
आज ६२च्या युद्धाविषयी कोणतेही पुस्तक हाताशी नसल्याने त्यासंबंधी माहिती नाही.
3 Oct 2010 - 2:02 am | इन्द्र्राज पवार
".......ही फॉरवर्ड पॉलिसी काय होती...?
~~ या विषयावर इथे या लेखमालेत लिहिणे म्हणजे मूळ विषयाशी फारकत घेतल्यासारखे होईल, त्यामुळे थोडे थांबावे लागेल, कारण एकूणच भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पाहिलेल्या सर्व युध्दांविषयी एक स्वतंत्र लेखमाला मिपावर लिहिण्याचा मानस (अन्य सदस्यांसमवेत) आहे, त्यावेळी इथे चर्चा झालेल्या सर्व पैलुंवर सविस्तर चर्चा होईल असा विश्वास आहे.
इन्द्रा
5 Oct 2010 - 11:19 pm | चतुरंग
होऊन १९४७ मध्ये दोन वर्षांचा काळ लोटल्यानंतरही नेहरुंची आंतरराष्ट्रीय राजकारण आणि युद्ध ह्याबद्दलची ही मते असतील तर खरंच सखेदाश्चर्याची बाब आहे! :(
तुमचं धोरण शांततेचं असणं हे ठीक आहे पण अरे समोरच्याचं तसं हवं ना? आणि समोरच्यांच धोरण कंपल्सरी शांततेचं असावं ह्याकरता तुम्ही सज्ज असणं गरजेचं असतं हे निर्विवाद!
-रंगा
2 Oct 2010 - 6:15 am | सहज
माहीतीपूर्ण लेख व तितकेच माहीतीपूर्ण प्रतिसाद यामुळे ही मालीका अतिशय रंगत आहे.
पुन्हा एकदा मिपाच्या तांत्रीक व्यवस्थापनाला विनंती की कृपया वाचनखुण साठवा सोय लवकरात लवकर उपलब्ध करुन द्यावी.
6 Oct 2010 - 3:26 am | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
2 Oct 2010 - 10:36 am | अनिल २७
वाचतोय...
2 Oct 2010 - 11:32 am | नितिन थत्ते
इथे नेहरू आणि चीन पॉलिसी यावर थोडी माहिती आहे.
2 Oct 2010 - 3:00 pm | इन्द्र्राज पवार
वाचतोय.....बरीच माहिती मिळत आहे.
इन्द्रा
2 Oct 2010 - 8:12 pm | विसुनाना
माझ्या उपरोक्त (इतर) प्रतिसादातील सहगल यांच्या पुस्तकात अशीच माहिती होती असे स्मरते.
“The new posts set up (भारताने निर्माण केलेल्या) in the western sector during March- April 1962 and which led to firing by Chinese troops were not necessary at the time. It is not that Nehru was left with no flexibility. He was prepared to negotiate but chose to impose too many preconditions; almost in all instances he wanted the Chinese to withdraw first as a price for talks."
रोचक दुवा.
काही पुस्तके माहित असल्यास त्यांचीही माहिती द्यावी.
2 Oct 2010 - 8:02 pm | श्रावण मोडक
वाचतो आहे. मागे प्रदीप यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे लेखाच्या शेवटी संदर्भांची यादीही देत चला.
2 Oct 2010 - 9:05 pm | इन्द्र्राज पवार
".....लेखाच्या शेवटी संदर्भांची यादीही देत चला."
~ जरूर. आता लेखमालेच्या शेवटी एकत्रीतच देतो. झाले असे, श्रा.मो., की, बरीचशी ऐकीव माहितीही मी गोळा केली आहे (पंजाब/हरियाणा/दिल्ली या पट्ट्यातून)...आत्ताच नव्हे, तर मिपाचा सदस्य होण्यापूर्वीपासून. 'लष्कर' हा माझा फार प्रिय असा विषय आहे, आणि तुम्ही जाणताच की वरील तीन ठिकाणी असणार्या विविध गटातील कार्यरत्/निवृत्त सनदी+लष्करी अधिकारी/जवान यांच्याकडून किती आणि कसल्या प्रकारची माहिती मिळू शकते. या भागातील दोनतीन जिल्हे तर असे आहेत की, आपल्याकडील जिल्ह्यात जसे साखर कारखाने, जि.प., जिल्हा बॅन्क, दूध सोसायट्या, ग्रामपंचायत या विषयावर संध्याकाळी गावकट्ट्यावर/देवळाच्या हक्काच्या सभामंडपात अगदी हमरीतुमरीवर येऊन चर्चा चालू असतात, त्याचप्रमाणे इकडील गप्पांचा विषय लष्कर आणि शेती.,....फक्त तबकडीला एक पिन देण्याचा अवकाश, असे काही फुलतात हे लोक, की बस्स पुछो मत.
अडचण इतकीच की, अशी ही माहिती अधिकृत धरता येत नाही....पण त्यांचा रेलेव्हन्स लक्षात आला की अभ्यासातील खुमारी खूप वाढते.
एक आहे....'मिलिटरी' या विषयावर फार फार प्रेम आहे या तीन राज्यातील लोकांचे. त्यातही 'सॅम माणेकशॉ' हे नाव याना देवासमान वाटते. [यात आश्चर्यही नसावेच.]
इन्द्रा
2 Oct 2010 - 9:48 pm | श्रावण मोडक
हे पूर्ण गृहीतच धरले होते मी तुमच्या एकंदर लेखनाची पद्धत, आणि मुद्यांविषयीचा अधिकार पाहिल्यानंतर. पण एक आहे - अशी माहिती अधिकृत धरता येत नाही, असे तुम्ही म्हणता, त्यात अधिकृत म्हणजे काय? माझे चुकत नसल्यास सोशल अँथ्रॉपॉलॉजीमध्ये अशा स्वरूपात माहिती संकलनाला महत्त्व आहे आणि या स्रोतांचा उल्लेख प्रत्येकवेळी जाहीर केलाच पाहिजे असे मानले जात नाही. असे स्रोत अनेकदा झाकून ठेवता येतात संशोधकाला. तुम्ही अगदी काटेकोर संशोधनाच्या पद्धतीने जात नसालही, नाहीही. पण म्हणून अशा स्रोतांकडून मिळणारी माहिती (येथे माहिती हा शब्द महत्त्वाचा आहे. केवळ गप्पा नव्हेत!) दुय्यम ठरत नाही. एखाद्या घटनेविषयीचे ते एक परिमाण, व्हर्शन असू शकते. कारण कोणत्याही घटनेचे स्वरूप पाहणाऱ्याच्या दृष्टीतून वेगवेगळे असू शकते. टक्कर की धडक, असा हा पेच असणारच आहे. त्यामुळे असे स्रोत जिथे आवश्यक आहे तिथे झाकून बाकी गोष्टी जरूर मांडा. त्याचे एक वेगळे महत्त्व आहे.
2 Oct 2010 - 10:16 pm | इन्द्र्राज पवार
"....(येथे माहिती हा शब्द महत्त्वाचा आहे. केवळ गप्पा नव्हेत!)
सोशल अॅन्थ्रॉपॉलॉजीची तुम्ही व्यक्त केलेली संकल्पना योग्यच आहे. किमान तशी ती आहे म्हणून तर जगभरातील कित्येक संस्कृतीचे लिखित स्वरूपात होण्याअगोदर मौखिक स्वरूपात जतन झाले होते. फिल्ड स्ट्डीज करताना यात सहभागी असणार्यांच्या बोलण्याच्या ओघातून जी माहिती येत असते ती कितपत 'गप्पा' गटातील नाही हे त्याच्या बोलण्यातील 'इंटेन्सिटी' वरून मला जाणवते, इतपत मी म्हणू शकतो. उदा. भटिंडामध्ये अशीच एक गप्पाची [निव्वळ या विषयावरील नव्हे...दुसरेही होतेच...] रात्र होती; तिथे एका सैनिकाच्या चुलत्याना [जे त्यावेळी ४थ्या शीख रेजिमेन्टमध्ये 'सुबेदार' पदावर होते] १९६५ च्या भारत पाक युद्धात केलेल्या पराक्रमाबद्दल मरणोत्तर 'महावीर चक्र' प्रदान करण्यात आले (जे मला पुढे प्रत्यक्ष पाहायलादेखील मिळाले....असो.)...तर त्यांच्या पराक्रमाविषयी गप्पा रंगात आल्या असतानाच 'आधुनिक शस्त्रां' च्या साहाय्याने तसे पराक्रम करायला आणखीन हुरूप येत असे असा कुणीतरी सूर लावला....जो मला थोडावेळ समजला नाही. पुढे १९६२ मध्ये चीनने केलेल्या नामुष्कीच्या वेळी जर चिन्यांसारखी एक-४७ रायफली आमच्या सैनिकांना दिल्या असत्या तर चित्र वेगळे दिसले असते, इथपर्यंत चर्चेची गाडी आली. आता एके-४७ चा तर आपण हल्लीहल्ली [विशेषतः दहशतवादाचा उगम झालेल्या काळापासून] उल्लेख ऐकतो/वाचतो; पण गप्पातील एक म्हातारबुवा तर १९६२ मध्येदेखील चीनी सैन्याकडे एके-४७ ही अत्याधुनिक रायफल व आमच्याकडे सिंगल बुलेट बॅरेल [मी नेमके नाव विसरलो या मेक चे] होती त्यामुळे आमच्या पराक्रमाला कुठेतरी मर्यादा आली, असे म्हणाले.
आता ही चर्चा [एके-४७] 'माहिती' धरावी की 'गप्पा' हा संभ्रम माझ्यापुढे पडतो....कारण १९६२ च्या युद्धात खरंचे चिन्यांकडे तशी आधुनिक शस्त्रे होती का...? आणि असल्यास आपल्या पराभवाचे ते एक कारण होऊ शकेल का? हा भुंगा फडफडतो.
सोशल अॅन्थ्रॉपॉलीजीचा उपयोग माहिती गोळा करायला खूप होतो....फक्त 'पुरावा द्या' असे इथे कुणी म्हटले की....आम्ही थंडच !
इन्द्रा
3 Oct 2010 - 12:09 pm | विसुनाना
सिंगल बुलेट बॅरेल = एन्फील्ड रायफल नव्हे काय? अगदी नक्की सांगायचे तर -
ही 'ली-एन्फील्ड' किंवा Ishapore 2A/2A1
(प्रकाशचित्र विकीवरून साभार)
चीनकडे एके-४७ असावी. कारण ज्यांचा सैन्याशी काही संबंध नाही पण वाचन चांगले आहे अशा वयस्कांच्या म्हणण्यानुसार - चीनकडे एकास दहा सैनिक आणि प्रत्येक सैनिकाकडे एकास दहा बंदुकीच्या गोळ्या होत्या. त्यांच्याकडे मशिनगन होत्या हे सर्वश्रुत आहे.
(दुव्याचा रंग बदलल्यास बरे)
3 Oct 2010 - 12:22 pm | इन्द्र्राज पवार
"....ही 'ली-एन्फील्ड' किंवा Ishapore 2A/2A1"
~~ धन्यवाद श्री.विसुनाना....दुव्याबद्दल आणि फोटो टाकल्याबद्दल. हीच ती 'मेक' होती का याबाबत थोडी चौकशी करतो (म्हणजे प्रत्यक्ष त्या युध्दातील सहभागी यांच्यासमवेत नव्हे तर आता या क्षणी जे लष्करात आहेत अशा येथील अधिकारी वर्गासमवेत चर्चा करून...). पण अजून एके-४७ चे कोडे कोडेच आहे. चिन्यांच्याकडील 'मशिनगन' हे तर कॉमनच असावे, कारण ते दुसर्या महायुद्धातील महत्वाचे आयुध होतेच...पण दुर्दैवाने मशिनगनदेखील जर आपल्या सैनिकांकडे (सन १९६२ मध्ये) नसेल तर आपली 'आधुनिक शस्त्रास्त्रां'नी सुसज्ज सैन्य याची व्याख्या तरी काय होती त्या काळात?
(श्री. जयंत कुलकर्णी यावर प्रकाश - अधिकारवाणीने - प्रकाश टाकू शकतील असे वाटते.)
(ता.क. : दुव्याचा रंग बदलणे गरजेचे होते, ते आता कळते.....आणखी दोघांनी तसे सुचविले. पण आता हा लेख 'संपादन' करता येत नाही असे दिसत आहे, कारण तो टॅब पानावर दिसत नाही. ~~ पुढ्च्या भागात ही दुरुस्ती अंमलात आणतो...इन्द्रा)
3 Oct 2010 - 7:12 pm | इन्द्र्राज पवार
माहिती मिळाली....
ती रायफल होती : बोल्ट अॅक्शन एनफिल्ड .३०३
(फोटो गूगलवरून साभार....)
इन्द्रा
6 Oct 2010 - 12:28 am | आळश्यांचा राजा
सर्वप्रथम - अप्रतिम लेखमाला. वाचतोय. अभ्यासाचे कौतुक वाटण्याच्या पलीकडली माहिती देताहात. ग्रेट!
एके ४७ चिन्यांकडे असेल किंवा नसेल, ६२ साली. काही गोष्टी ध्यानात घेतल्या तर एके ४७ ची गरज तेंव्हा वाटत होती का याचा विचार करता येईल.
३०३ बंदुक ही ५०० - ७०० मीटर रेंजपर्यंत इफेक्टिव्ह असते/ असायची. म्हणजे माणूस मारायला सक्षम. माणूस मारायला त्याच्या व्हायटल पार्ट (उदा. धड) वर किमान ८० जुल इतक्या उर्जेचा आघात होणे आवश्यक आहे. ३०३ बंदुकीतनं मारलेली गोळी एवढ्या अंतरापर्यंत ८० जुल उर्जा वाहून नेते. त्यापुढे ती साधारण दीड-दोन किलोमीटर जाऊ शकते, पण हाताने दगड फेकल्यासारखी.
स्नायपर बंदुकांची इफेक्टिव्ह रेंज दीड दोन किमी असू शकते, म्हणजे खूप दुरून दुर्बीण लाऊन एखाद्या खाशाला टिपता येते. (एनिमी अॅट दि गेट्स मध्ये हा प्रकार सुरेख दाखवला आहे).
आपल्याकडे आर्मीने अलीकडे रिटायर केलेली एस एल आर (सेल्फ लोडिंग रायफल) ही माणूस मारण्यासाठी उत्तम बंदूक होती. सध्या ही सीआरपी, सी आय एस एफ, डी एस सी यांच्याकडे बघायला मिळते. हिची रेंज होती ७०० मी. म्हणजे इफेक्टिव्ह रेंज.
हिला रिटायर केली आणि इन्सास आणली. इण्डियन नॅशनल स्मॉल आर्म्स सिस्टम. हिची रेंज चारशे मीटरच्या आतबाहेर. म्हणजे एके ४७ च्या जवळपास. रेंज छोटी, बंदुकीचे वजन कमी. या कमी झालेल्या वजनामध्ये जास्तीचे अॅम्युनिशन सैनिकाला सोबत घेता येणार, म्हणजे जास्तीच्या गोळ्या मिळाल्या, हे फायदे.
पण विचारांमध्ये हे जे बदल होत गेले त्याचे लॉजिक असे होते - गोळ्या झाडल्या जातात ते शत्रूसैनिक दृष्टीपथात आल्यावर. ही गोळीबारीची लढाई साधारण तीनशे ते साडेतीनशे मीटरच्या टप्प्यात होते. मग या टप्प्यासाठी सातशे मी रेंजवाल्या बंदुकीचे ओझे का बाळगायचे? हे एक. दुसरे, माणूस मारण्यापेक्षा त्याला जखमी करणे हुशारीचे लक्षण. शत्रू मेला की त्यांचा एक माणूस निकामी झाला. पण जखमी झाला, की त्याला खांद्यावर घेणारा, आणि त्यांना कव्हर देणारा असे तीन शत्रू एकाच गोळीत निकामी होऊ शकतात.
हे लॉजिक चिन्यांनी ६२ मध्ये वापरले होते का याविषयी साशंक आहे. शिवाय ऑटो मोडमध्ये गोळ्यांची खैरात करणार्या एके सरसकट आघाडीवरच्या सैनिकांना द्यायला तेवढे अॅम्युनिशन चिन्यांकडे होते का हापण प्रश्न आहेच. गोळ्या संपल्या की बंदूक म्हणजे काठीच. (ती पुढे लावलेली संगीन सोडली तर).
एके ४७ अजूनही आर्मीसाठी आदर्श बंदूक समजली जात नाही, असे सेनादलातल्या अनेक अधिकार्यांचे मत ऐकले आहे. अर्बन वॉरफेअर, इंटर्नल सेक्युरिटीसाठी ते एक आदर्श शस्त्र आहे. बट फोल्ड करुन कोटात लपवता येते. गोळ्या स्प्रे करुन भिती दाखवता येते. कमी अंतरावर जानलेवापण असते. अशी आखुडशिंगी बहुदुधी आहे. अतिरेक्यांचे ते म्हणूनच आवडते शस्त्र आहे.
(माणेकशांवरच्या लेखाला हा प्रतिसाद अवांतरच आहे, पण विषय निघाला म्हणून ऐकलेली माहिती टंकली. तपशिलात चुका असू शकतात, गाढा वगैरे अभ्यास नाही!)
6 Oct 2010 - 11:13 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
राजेसाहेब, तुम्ही गायब होऊ नका हो!
6 Oct 2010 - 11:34 am | विसुनाना
'बंदुकीचा टप्पा आणि त्याचा युद्धातील वापरावर परिणाम' या विषयावर अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
युद्धे केवळ बंदुकांनी लढली जात नाहीत हे मात्र खरे. अपयशाचे खापर कुठेतरी फोडायचे म्हणून बंदुकांचे कारण दाखवायचे , इतकेच! :(
चीन-भारत युद्ध ही भारताच्या इतिहासातील शरमेची गोष्ट आहे.
6 Oct 2010 - 12:13 pm | बिपिन कार्यकर्ते
आराचा अप्रतिम प्रतिसाद आणि विश्लेषण. मस्त चालू आहे चर्चा.
6 Oct 2010 - 1:03 pm | परिकथेतील राजकुमार
हेच म्हणतो.
6 Oct 2010 - 12:37 am | बहुगुणी
१९४७ मध्ये रशियात तयार झालेली आवटोमॅट कॅलॅश्निकोव्हा (AK-४७) ही चीनी सैनिकांकडे १९६२ साली असणं अशक्य नसावं. याच निर्मितीवर आधारलेली AK-56 ही स्वयंचलित बंदूक चीनमध्येच निर्माण झाली.
6 Oct 2010 - 2:18 pm | इन्द्र्राज पवार
श्री.आरा....आणि श्री.बहुगुणी
~~ दोघांनीही शस्त्रांबद्दल जी माहिती इथे पुरविली आहे त्यामुळे ज्ञानात जी भर पडली किंवा या निमित्ताने पडत चालली आहे, तीबद्दल तुम्हा दोघांचेही मनःपूर्वक आभार.
~~ १९६२ च्या युद्धात चिन्यांनी (त्यावेळेच्या) अन्य आधुनिक शस्त्रांच्या यादीत एके-४७ चा समावेश केला होता हे निश्चित. त्याबाबत मी स्वतः अधिकृत सूत्रांसमवेत चर्चा केली आहेच आणि .३०३ रायफलबाबतदेखील दुमत नाही. त्यावेळच्या सरकारी कागद्पत्रांत उल्लेख सापडतोच पण भारतीय युद्धाचे एक जाणकार इतिहासकार श्री.प्रदीप बरुआ यांच्या एका पुस्तकातील खालील उतारा शस्त्रांच्या मेकबाबत इथल्या चर्चेला पुष्टी देतो : (मुद्दाम इंग्लिशमध्येच देत आहे...)
"The lack of adequate artillery and heavy mortar support and the total absence of air support doomed the Indians’ attempts to stem the Chinese advance. Much has been made of the Indian soldiers’ poor equipment, particularly in terms of small arms, which forced them to rely on bolt-action Enfield .303 rifles against the Chinese AK-47s. But the real advantage that the Chinese enjoyed was their ability to concentrate their firepower and manpower resources at the point of attack. There was, however, an overwhelming Chinese superiority in recoil-less guns and mortars. However, it was the loss of confidence in their military leadership that had the most devastating effect on the Indian soldiers’ morale and discipline. After a long and arduous retreat into the lowlands of Assam (Bhairograh), the soldiers of the Forty-eighth Brigade, exhausted and demoralized, discovered that no provision had been made for shelter. In reaction to their commander’s ineptitude, the soldiers smashed their rifles and used them as match wood. Not a single Indian officer dared to intervene."
"माणूस मारण्यापेक्षा त्याला जखमी करणे हुशारीचे लक्षण."
~~ ही चाल भलतीच प्रभावी वाटते. एकावेळी तीन सैनिक अॅक्शनलेस.
इन्द्रा
24 Sep 2015 - 2:22 pm | नया है वह
मिपा वर अशा लेखांचे खास सदर असावे असे वाटते.
24 Sep 2015 - 6:40 pm | राही
हा लेख वर काढण्यासाठी धन्यवाद. ही लेखमाला पूर्ण झाली का?
इंद्र्राज पवार यांचे लेख तर वाचनीय असतच पण प्रतिसादही सविस्तर आणि माहितीपूर्ण असत. मुख्य म्हणजे शक्यतोवर तटस्थ आणि सरळ असत. त्यात तिरकसपणा, टिंगलटवाळी, आकस, द्वेष, प्रचारकी अजेंडा अजिबात नसे. (त्यामुळे ते अधिकच वाचनीय होत.) एखाद्या महान व्यक्तिमत्वातले दोष दाखवताना त्याच्या इतर महान कार्याला त्यांनी कधीच कमी लेखले नाही अथवा त्याकडे दुर्लक्ष केले नाही.
ते लिहीनासे झाल्यामुळे आन्तरजाल एका अभ्यासू आणि नि:पक्षपाती लेखकाला मुकले आहे.
कोणाच्या ओळखीतले असतील तर त्यांना पुन्हा लिहिते केले पाहिजे.
29 Sep 2015 - 10:21 am | नाव आडनाव
+१
त्यांनी परत लिहायला चालू करावं असं एकदम मनापासून वाटतं.
29 Sep 2015 - 1:53 am | निनाद मुक्काम प...
ह्या उत्कृष्ट लेखमालिका व प्रतिसादांच्या मांदियाळीत
माझी अल्पशी भर
ह्यात जो थापर म्हणून उल्लेख झाला आहे ते सेनानायक थापर आपल्या आजच्या डेविल्स फेम थापर चे पिता
आपल्या वडलांना अपमानास्पद स्थितीत पदभ्रष्ट व्हावे लागले व माणेकशा ह्यांना १९७१ च्या युद्धाने मुळे लोकांच्या गळ्यातील ताईत होणे नशिबी आले हे पाहून त्यांच्यावर डूख धरून असलेल्या पत्रकार थापर ने आपल्या एका कार्यक्रमात
माणेकशा ह्यांच्या देशनिष्ठेवर शिंतोडे उडवले
ह्या करण ची आई ही बिमला थापर चा सख्खा भाऊ गौतम सहगल ची बायको ही विजयालक्ष्मी पंडित ह्यांची मुलगी होती,
तेव्हा नेहरू घराण्याशी असा लांबचा घरोबा असल्याने थापरची वर्णी सैन्यनायक म्हणून लागली.