महागाईगीत: कसली भाजी करू मी आज
अहो काही सुचेना मला रोजरोज
कसली भाजी करू मी आज ||धृ||
दोडके गिलके भेंडी मटार
शेवगा भोपळा वाल गवार
सार्यांनीच मार्केटात संप केला आज
कसली भाजी करू मी आज ||१||
बटाटे आणले सगळेच संपले
फ्रिजमध्ये टोमॅटो काहीच न उरले
काय! चिकन करू म्हणता ताजं?
कसली भाजी करू मी पतिराज ||२||
८० रुपये किलो आहे तुरदाळ
असलीच महाग झाली मुगदाळ
महागाईने केला कसला हा माज
कसली भाजी करू मी आज ||३||
साखरेची तसलीच गत झाली
तेलातुपाविना रयाच गेली
खिर पुरी खाऊन झालेत फार दिवस
कसली भाजी करू मी आज ||४||
काय करू मी आज सैपाकाला
भाजी नाही आज डबा करायला
रोजचीच कटकट झाली आहे मज
कसली भाजी करू मी आज ||५||
गहू तांदूळाने केली फार दैना
एका पगारात कसा काढावा महिना
काहीतरी आणा घरी कामकाज
कसली भाजी करू मी आज ||६||
जे आहे ते सुखाने खाऊ
महागाईचा नका करू बाऊ
चैनीचा परवडणार नाही माज
कसली भाजी करू मी आज ||७||
अहो काही सुचेना मला रोजरोज
कसली भाजी करू मी आज ||धृ||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०१/१०/२०१०
प्रतिक्रिया
1 Oct 2010 - 11:42 am | दत्ता काळे
अंगाईगीत तसे हे महागाईगीत. फरक इतकाच कि अंगाईने झोप लागते आणि महागाईने ती उडते.
खिर पुरी खाऊन झालेत फार दिवस
.. चुकून खिर वडे वाचले गेले. हे कश्यामुळे ? तर मिपावर पितृपंधरवड्यासंदर्भात बरेच लेख आले आहेत. पंधरवडा संपण्याच्या आत, एक दिवस पितरेच म्हणतील "खिर वडे नको, लेख आवर ".
--- कृ. ह. घ्या
1 Oct 2010 - 11:14 pm | पक्या
महागाई गीत चांगले आहे.
2 Oct 2010 - 6:33 am | गांधीवादी
पुने रेल्वे स्थानकावर जाऊन एके ठिकाणी २.५ रुपयांत वडा-पाव मिळतो, तो खाणे. नाहीतर पोट भर पाणी पिणे. बहुसंख्य जनता हाच मार्ग अवलंबते,
3 Oct 2010 - 8:52 pm | चिरोटा
महागाई गीत आवड्ले.
गांधीवादी,२.५ रुप्यात वडापाव नक्की कोठे मिळतो?. घरपोच पार्सल व्यवस्था आहे का?
4 Oct 2010 - 12:08 am | रेवती
महागाईगीत आवडले.
खरच बुवा महागाई फार आहे.
म्हणून हाटेलं भरभरून वहात असतात.;)
तिथेच जेवलं कि आटेदाल का भाव मालूम झाला नाही तरी चालतय.