माझी सुडंबने

मिनासो's picture
मिनासो in जे न देखे रवी...
6 Apr 2008 - 12:33 pm

दोन्ही विडंबने मूळ कवितेला उत्तर म्हणून केलेली आहेत. म्हणुन त्यांना विडंबन न म्हणता सुडंबन म्हणले आहे.

मूळ कविता- १

निवडूंग

मी लोकांना सांगतो
"माझं आहे निवडूंगासारखं...
त्याच्यासारखी वेगवेगळी अंगे"

काहीही नसेल तरी....उगवीन मी
पाणी कमी असेल तरी....जगीन मी
कोणाचं लक्ष नसेल तरी....वाढीन मी
दुर असाल तर....हिरवा दिसीन मी
फार जवळ आलात तर....काट्यासारखं बोचीन मी
बोचून घ्यायला तयार असाल तर....जवळ घेईन मी
कुठल्याही परिस्थितीत....रंग बदलणार नाही मी
फुलं माझ्याकडे नसली तरी....हिरवागार राहीन मी
फळं दिली नाहीत तरी....प्रत्येक वाटेवर असीन मी
आणि कोणात नसलो तरी....स्वत:त नक्की असीन मी
कवी- अज्ञात

माझं सुडंबन

देवासारखं...

मी लोकांना सांगत नाही पण..
"माझं आहे देवासारखं...
त्याच्यासारखी वेगवेगळी रुपे"
काहीही नसेल तरी....असेन मी
पाणी असेल असे....प्रत्येकात झिरपीन मी
कोणाचं लक्ष नसेल तरी....वाढीन मी
पहाल तसा....दिसीन मी
तुम्ही होऊन आलात तर....नसेन मी
मीच होऊन आलात....जवळ असेन मी
परिस्थिती प्रमाणे ....रंगेन मी
फुलं माझ्याकडे नसली तरी....सुगंधी राहीन मी
फळं दिली नाहीत तरी....प्रत्येक वाटेवर असीन मी
आणि कोणात नाही असा नसेन मी....प्रत्येकात नक्की असीन मी

मूळ कविता-२

मी सोडलंय...... बरच काही सोडलंय
का? कारण का लागतं सोडायला...
मनात आलं तर धरलं
नाही तर दिलं सोडून....

तर मी सोड्लयं
बोलणं सोडलयं
नेहमीच काय बोलायचं?
सगळ्यांनीच काय बोलायचं
कुणी ऐकणारं हवं ना....
म्हणून सोडलय....
मी बोलणं

मी सोडलय
सोडलय बेधूंद वागणं
दिशा नेईल तिकडे
भरकटत जाणं
सगळेच वाहवत गेले तर
होकायंत्र कुणी बनायचं...
म्हणून मी सोडलय
बेधूंद वाहणं

मी सोडलयं
आशा अपेक्षांशी जवळिक साधणं..
किती पुरं पडावं त्यांनीही
अगदी प्रत्येकालाच का त्या पु-या पडणारेत?
कुणाचा तरी आधार नको का त्यांना विसावायला निर्धास्तपणे?
म्हणून मी सोडलय
आशा अपेक्षा कुरवाळणं

मी सोडलय......
हो अजून बरच काही सोडलयं
सगळं सांगायलाच हवं का?
मीच सांगितलं तर पुढे होऊन कोण विचारणार
म्हणून मी सोडलयं
भडभडून सगळं सांगण...

मी सोडलय
नुसतं जगणं सोडलय
जगायच, जगतेय म्हणून
सगळेच तर जगतात ना
सारं धरून जगत जातात ना
मी ठरवलय "सोडून" जगायला...... तटस्थपणे
कूणी तरी असंही हवच ना...अलिप्त...
म्हणून मी सोडलंय
गुंतत जाणं....

हो मी सोडलय.......हो मी सोडलय ...
कवी- अज्ञात

माझं सुडंबन

मीही प्रयत्न केला....
बरचं काही सोडायचा
कारण असे झाले
कोणीच नव्हते सोबतीला

मी ही प्रयत्न केला...
बोलणं सोडायचा
पण मनाशीच अबोला
जमला नाही मला

मी ही प्रयत्न केला...
दिशा नेईल तिकडे
भरकटत न जाण्याचा...
पण होकायंत्र होणारं कुणी हवं ना मदतीला

मी ही प्रयत्न केला...
आशा अपेक्षा सोडण्याचा
पण कोणीच नाही मला निर्धास्तपणे विसावायला
त्याच तर आहेत माझ्या साथीला

मी ही प्रयत्न केला...
...अजून बरच काही सोडण्याचा
सगळं काही सांगण्याचा
कोणी तरी हवे ना पुढे बसून एकणारं

मी प्रयत्न केला...
डोळ्यांनीच अश्रू पिण्याचा
पण डोंगर चढून जाणं
कधी जमलयं का नदीला

मी प्रयत्न केला...
स्वतःलाच शिक्षा करण्याचा
पण प्रेमात शिक्षा नसते
कधीच कोणा एकाला

मी ही प्रयत्न केला... जगणं सोडायचा
काय अर्थ आहे, जगतोय म्हणून जगण्याला
पण हळहळणारं कोणीच नसेल तर
काय अर्थ त्या मरणाला

शेवटी एक प्रयत्न केला...
प्रयत्नच सोडण्याचा
सर्व काही (निय)तिच्या वर सोडण्याचा
हो मी ही प्रयत्न केला... हो मी ही प्रयत्न केला...

- मिनासो

विडंबनप्रश्नोत्तरेप्रतिक्रियाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

6 Apr 2008 - 5:53 pm | प्रमोद देव

अजूनही असे काही वाचायला आवडेल.