लेडीज कंपार्टमेंट आणि पुरुष प्रवासी (लोकल गोष्टी )

स्वाती फडणीस's picture
स्वाती फडणीस in जनातलं, मनातलं
29 Jul 2010 - 10:53 am

लेडीज कंपार्टमेंट आणि पुरुष प्रवासी
============================================

फेरीवाले आणि भिकारी यांचा सगळ्यात जास्त सुळसुळाट लेडीज डब्यातच असावा.. त्यात पुरूष फेरीवाले आणि भिकारी ही आलेच. आंधळ्या भिकाऱ्यांना तर लेडीज डबे अगदी अचूकपणे ओळखता येतात.. कधीही न चुकता ते या डब्यांमधून सहज चढ-उतर करतात.. डब्यात चढल्यावर मात्र त्यांना समोर उभ्या असलेल्या बायका दिसत नाहीत. कोणत्याही टीसीने आजवर भिकाऱ्यांना हटकलेलं मी पाहिलेलं नाही.. फेरीवाल्यांना मात्र कधी कधी डब्यातून उतरवलं जातं. नेहमीच दंड किंवा शिक्षा केली जाते असं नाही. ते एका डब्यातून उतरून दुसऱ्या डब्यात चढतात.. पाळली जात नसली तरी.. निदान त्यांच्या विक्रीवर भीक मागण्यावर बंदी तरी आहे. बायकाही भीक घालणं किंवा ट्रेन मधल्या विक्रेत्यांकडून खरेदी करणं थांबवत नाहीत, आणि त्यांचं लेडीज डब्यात येणं काही थांबत नाही. ( थांबवलं जात नाही. )

लेडीज डब्यातले दुसरे नियमित पुरूष प्रवासी म्हणजे शाळांना जाणारी आठवी ते दहावी पर्यंतची मुलं. यातली काही मुलं तर इतकी थोराड आणि व्रात्य असतात की त्यांना चुकूनही लहान मुलं म्हणावं असं वाटत नाही. त्यांचं दाराशी लटकणं, चालत्या ट्रेन मधून उड्या टाकून चढणं उतरणं.. मोठं-मोठ्यांनी पाचकळ विनोद करणं.. डब्या मध्ये काहीबाही लिहून ठेवणं चित्र काढणं.. या सगळ्या मुळे ती त्रासदायक वाटतात. त्यांना काही सांगायला जाणं म्हणजे तर मूर्खपणाच.

या मुलांना लेडीज डब्यातून प्रवास करायची अनुमती आहे खरी पण ते काय करतात बघायला, त्यांना आवर घालायला मात्र कोणीच नाही. लोकलचे पोलीस किंवा टीसी यांना ही मुलं, त्यांचं वागणं कधी दिसतच नाही का..? की त्यांच्या आखलेल्या कामांमध्ये याचा समावेश होत नाही असा प्रश्न बऱ्याचदा पडतो..

( नऊ डब्यांच्या गाडीमध्ये ) पुढे अर्धा डबा सेकंड क्लास.. पाव डबा फर्स्ट क्लास.. मध्ये पाऊण डबा सेकंड क्लास, पाव डबा फर्स्ट क्लास.. (बारा डब्यांच्या गाडीत) आणखी अर्ध सेकंड क्लासचं कंपार्टमेंट बायकांसाठी म्हणून राखीव असतं. असे एकूण पावणेदोन ते सव्वादोन डबे बायकांच्या वाट्याला येतात. फस्ट क्लासचा जो विभाग महिलांसाठी राखीव आहे त्याचेच दोन भाग करून त्यातील एक भाग पूर्ण वेळ महिलांसाठी तर दुसरा भाग अर्ध वेळ (म्हणजे रात्री १० पर्यंत) राखीव असतो. त्या पुढे तो जनरल डबा म्हणून धरला जातो. रात्रीच्या वेळेला महीला प्रवासींची असलेली संख्या बघता त्याला काहीच हरकत नसावी.. (नाहीच. ) डोक्यात जातं ते पुरूष प्रवाशांचं बरोबर दहा वाजता कधी कधी दहाच्या आधीच टपून बसल्या प्रमाणे या डब्यात उड्या घेणं.

काही जणी पहिल्यांदाच इतक्या उशिरा प्रवास करत असतात.. त्यांना अशा वेळी नेमकं काय होतं आहे ते न कळल्या मुळे त्या गोंधळून जातात. त्या वेळेच्या आसपास चढलेल्या बायकांच्यात आपणच चुकीच्या डब्यात चढलोय की काय असा संभ्रम निर्माण होतो. ज्या कोणाला हा प्रकार माहीत असतो त्या बायका सहसा नऊ साडेनऊ नंतर त्या डब्यातून प्रवास करणं शक्यतो टाळतातच. पण जर कोणी दहाच्या आधी चढल्या असतील तर त्यांना या प्रकाराला सामोरं जावं लागत. दारात बायका/मुली उभ्या आहेत.. एखादीच्या कडेवर लहान मूल आहे.. वगैरे कोणत्या गोष्टी लक्षात न घेता सहज चढून बसण्या इतका वेळ आणि जागा उपलब्ध असतानाही ट्रेन पळून चालली असल्या सारख्या उड्या का घेतल्या जातात कोण जाणे..? त्या नंतर मात्र डब्यात असतील नसतील तेवढ्या बायका उतरून फर्स्ट क्लासच्या दुसऱ्या भागात किंवा सरळ सेकंड क्लासच्या डब्याकडे निघून जातात.किंबहूदा रात्रीच्या वेळी फर्स्ट क्लासच्या डब्यात पुरेशी वर्दळ नसेल तर त्या डब्यात चढणंच टाळलं जातं. ( काय सांगावं कोणी मध्येच चढलं तर..! ) अशा प्रकारे सुविधा आणि अधिकार असताना महिलांना त्यांपासून वंचित राहावं लागतं.

गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या स्फोट, बळजबरी वगैरे प्रकरणां नंतर महिलांच्या डब्यात पोलीस दिसायला लागले.. मध्ये काही काळ महिला पोलीसही डब्यात तैनात असायच्या.. हल्ली मात्र महिला पोलिस फारशा दिसत नाहीत. त्या ऐवजी पुरूष पोलीसच डब्यात चढलेले दिसतात.. असेल बाबा तशी काही नवी योजना, असा विचार करून भाबड्या बायका त्यांचे डब्यात चढणे चालवून घेतात खऱ्या.. पण मग या पोलिसांच्या हातातल्या बॅगा.. त्यांचं मध्येच उतरून जाणं.. कधी कधी दोन तीन पोलीसां एकाच डब्यात असणं खटकत राहतं.

रोज रोज हा प्रकार पाहिल्या नंतर हे पोलीस लेडीज डब्यात घुसत असल्याच लक्षात येतं. त्यांना टोकायची बिशाद मात्र सहसा कोणाची नसते. पण एखादं दिवशी एखादी बाई " आप ड्युटीपे हो क्या? " विचारण्याची हिंमत करतेच. या असल्या प्रश्नांना चढलेल्या पोलीस शिपायांकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जातात.. आपण ड्यूटीवर असल्याच अर्ध सत्य विधान सर्रास केलं जातं. मग एखादी तिडीक गेलेली बाई चक्क भिकाऱ्याला हुसकवावं तसं या पोलीस शिपायाला हुसकवून लावते.

काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे.. अशाच बॅग घेऊन डब्यात चढलेल्या एका पोलीस शिपायाला मी "तो ड्यूटीवर आहे का..? " म्हणून विचारले तर समोरून नेहमीचेच होकारार्थी उत्तर आले... मग मी त्याला तो आमच्या डब्याच्या ड्यूटीवर आहे का म्हणून विचारले.. त्या नंतर मात्र त्याने नाही असे उत्तर दिले. ( तेव्हाही तो बंडल मारू शकला असता खरा.. पण तेवढी कोळून प्यायला नसावा.. किंवा त्याला तो काही चुकीच करतोय असं वाटतच नसावं. त्या मुळे खरं ते बोलला.. ) पुढे.. तो दोन तीनच स्थानकां नंतर उतरणार असल्याची व या डब्यात गर्दी नसल्याची पुस्ती ही जोडली. ( या च्या पुढे काय बोलणार..! ) तरी मी त्याला हा लेडीज डबा आहे ना.. विचारलंच. तसंच त्याच लेडीज डब्यात चढणं बरोबर ( नियमांना धरून) आहे का..? असं ही विचारलं. तेवढंच माझं मला समाधान. बायका अशा लोकांना का खपवून घेतात म्हणणारी मी ही त्याच डब्यात असते ना..! पुढे माटुंगा स्थानकावर तो त्याच्या वरिष्ठांच्या समोर उतरला. तरी त्यांनीही त्याला हटकलं नाही. चार-पाच पोलिसांचा जथ्था उघड्या डोळ्यांनी आपल्या सहकाऱ्याच ते वर्तन निर्विकारपणे पाहत होता. (ते ही असाच प्रवास करत असावे.) सध्या पोलीस चढता आहेत, आणखीन काही दिवसांनंतर कोणीही चढेलं.. आणि त्या वेळी लेडीज डब्यातून प्रवास करणाऱ्या पोलिसांना बोलायला तोंडही नसेल.

कोणीही चढेल कशाला चढतंच की.. याच आठवड्यात परवा एक दारुडा डब्यात चढला होता.. बोरिवलीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये डाव्या बाजूच्या दाराला लटकून झोकांड्या घेत कधीही पडेल असा फुटबोर्डवर उभा होता. डब्यात तशी बऱ्या पैकी गर्दी होती. त्याच्या शेजारी उभ्या बायका पोलिसांकडे करतात तसंच दुर्लक्ष करून उभ्या होत्या.. एक दोघींनी त्याला खाली उतरायला सांगायचा प्रयत्न केला.. कोण कोणाशी बोलतंय कोण जाणे या आविर्भावात तेव्हा मात्र तो जाणून बुजून इकडे तिकडे बघत होता तेव्हा एकही पोलीस शिपाई डब्यात आला नाही की स्टेशन स्टेशन वर उभ्या त्यांच्या पैकी एकालाही लेडीज डब्यात उभा असलेला माणूस दिसलाही नाही..

गर्दी टाळण्यासाठी जिथे पोलिसांनाच लेडीज डब्याचा आसरा घ्यावा लागतो तिथे कोणाला काय बोलणार..!
आणि तक्रार तरी कोणाकडे करणार..?

कधी कधी असं ही होतं की एखादी बाई आपल्या वयोवृद्ध वडिलांना घेऊन डब्यात चढते, ( नाहीतर मग तिला वडिलांसोबत खचाखच भरलेल्या पुरुषांच्या डब्यातून प्रवास करावा लागणार असतो. ) एकदा अशीच एक बाई कोणालातरी बरोबर घेऊन डब्यात चढली ( मोठा माणूस असल्यासारखं वाटलं. ) डब्यात भरपूर गर्दी असूनही कोणीही काही आक्षेप घेतला नाही, पुढे गर्दी ओसरता ओसरता मी त्या व्यक्तीला पाहू शकले तो एक २०-२५ वर्षांचा मतिमंद मुलगा होता. त्याला आपल्या सोबत ठेवणं किंवा त्या मुला सोबत राहणं हे त्या बाईंसाठी आवश्यक होतं. अशावेळी कोणीच नियमांवर बोट ठेवत नाही.

आज तर आणखीन एक गंमत झाली..
एक सोनेरी केसांचं गोरं जोडपं हसत खिदळत लेडीज डब्यात चढलं तसं दारा जवळ उभ्या असलेल्या बायकांनी त्यांना अडवायचा प्रयत्न केला पण ते इतके आपल्यातच मग्न होते की त्यांना काही कळलेच नाही. डब्यात फक्त बायकाच आहेत हेही त्यांच्या लक्षात आले नाही. बाकी बायकांच त्यांना ते चढलेत तो लेडीज फर्स्टक्लास आहे समजावणं चालूच होतं. तेव्हा त्यांनी त्यांच्या जवळील फर्स्टक्लासचं तिकीट काढून दाखवलं.. परदेशांत कुठे लेडीच कंपार्टमेंट वेगळं असतं नसावं..? त्यांना त्याची कल्पनाच नव्हती. मग एका बाईंनी त्यांच्यातली महीला या डब्यातून प्रवास करू शकते पुरूष प्रवाशाला शेजारच्या जनरल डब्यातून प्रवास करता येईल असे समजावून सांगितले त्यानंतरच्या स्टेशनवर ती जोडी डब्यातून उतरून गेली.. तो पर्यंत त्या दोघांनी डब्यातल्या सगळ्यांची चांगलीच करमणूक केली.
सांगण्याचा मुद्दा हा की असं ही होऊ शकतं.

मध्ये असाच बोलता बोलता हाच विषय निघाला ( लेडीज कंपार्टमेंट आणि पुरुष प्रवासी ) असताना एकाने डब्यात चढणाऱ्या पोलिसांकडून अशा ( पोलिस इतर ) पुरूष प्रवाशांचा बंदोबस्त करून घेतला पाहिजे म्हणून सुचवलेलं तेव्हा हसूच आलं.. पाहिजे त्या वेळी पाहिजे त्या ठिकाणी उपस्तित असतील तर ते पोलिसच कुठले..! बरोबर ना?

============================================
स्वाती फडणीस ........................ ११-०९-२००९

प्रवासजीवनमानलेखअनुभव

प्रतिक्रिया

जिप्सी's picture

29 Jul 2010 - 1:01 pm | जिप्सी

स्वातीताई,व.पुं. च्या लिखाणातून जसं मध्यमवर्गाच्या सुख दु:खाचं चित्रण दिसायच तसंच तुमच्यासुद्धा लिखाणातूनसुद्धा मुंबईतल्या रोज लोकलन प्रवास करणाऱ्या नोकरदार,मध्यमवर्गीय स्त्रियांचं चित्रण दिसत. अगदी लोकलच्या डब्यात एखाद्या कोपर्यातून आजूबाजूच्या जगाचं निरीक्षण केल्यासारख वाटत. आणि अगदी साध्या सोप्या भाषेत सगळ वातावरण जिवंत करता तुम्ही.
( आयुष्यात ४-५दाच लोकलन प्रवास केलेला) जिप्सी

मी ऋचा's picture

29 Jul 2010 - 4:48 pm | मी ऋचा

नेहमीप्रमाणेच स्स्स्सह्ह्ही!!!!

मी ऋचा
रंगुनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा!

अर्धवट's picture

29 Jul 2010 - 6:58 pm | अर्धवट

लेख कळला.. भावला...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Jul 2010 - 11:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मलाही!

विशेषतः 'आंधळ्या' भिकार्‍यांचं निरीक्षण!

शिल्पा ब's picture

29 Jul 2010 - 11:22 pm | शिल्पा ब

तुमच्या लोकल गोष्टी आवडल्या

स्वाती फडणीस's picture

30 Jul 2010 - 12:01 am | स्वाती फडणीस

मनापासून आभार..! :)

उदय's picture

30 Jul 2010 - 12:33 am | उदय

या लेखामुळे १ प्रसंग आठवला. फार पुर्वी (अंदाजे १९९१-९२) मी कामानिमित्त कलकत्त्याला गेलो होतो, तेव्हा तिथे लोकलने प्रवास केला होता. तिथे लोक सर्रास बायकांसाठी राखीव डब्यातून प्रवास करताना दिसायचे. एकदा जरा हिंमत करून एकाला विचारले की पुरुषांच्या डब्यात प्रवास करण्याऐवजी तू बायकांसाठी राखीव डब्यातून का प्रवास करतोस? तर मी जणूकाही परग्रहावरून आलो आहे, अशा कुत्सित नजरेने बघून तो मला म्हणाला, "वोह लेडिज को अकेला कैसा सफर करने देनेका इसिलिये उनको कंपनी देने के लिये जाता हू. अगले टाइम से तुम भी जाना".

उदय

शिल्पा ब's picture

30 Jul 2010 - 1:55 am | शिल्पा ब

<<<"वोह लेडिज को अकेला कैसा सफर करने देनेका इसिलिये उनको कंपनी देने के लिये जाता हू. अगले टाइम से तुम भी जाना".

असे काळजीवाहू बंधू असल्यावर कोणाची भीती...

अजय वानखेडे's picture

1 Aug 2010 - 12:36 pm | अजय वानखेडे

मना पासुन आवडलय....