भिकारी पोट्टा (लोकल गोष्टी )

स्वाती फडणीस's picture
स्वाती फडणीस in जनातलं, मनातलं
28 Jul 2010 - 10:29 am

भिकारी पोट्टा
===============================
.
.
लोकलमध्ये नेहमीच बऱ्याच किरकोळ घटना घडत असतात.. इतक्या सर्रास दिसणाऱ्या सामान्य.. की आपल्या लक्षातही येत नाहीत. मग त्यांत लक्ष घालणं.. त्यांना लक्षात ठेवणं या तर फार दूरच्या गोष्टी..! पण रोजच्याच प्रवासात रोजच्या प्रवाशांपैकी कोणी कधी रोजची अनास्था दूर सारून नेहमी पेक्षा वेगळं वागताना दिसतं..

आज तसंच झालं.
ऑफिसमधून घरी येताना.. नेहमीप्रमाणे एक मुलगा डब्यात झाडू मारायचं निमित्त करून भीक मागायला आला. कोणी 'जाओ, जाओ' करून हटकलं, कोणी त्याचा झाडू अंगाला लागू नये म्हणून पाय वरती उचलून घेतले ( तसा सेकंड क्लासच्या डब्याच्या मानानं फर्स्ट क्लासच्या डब्यातल्या सीट खाली फारसा कचरा नसतो. ) त्या मुलानं ही उगाच इकडे तिकडे कचरा सारवण्या सरकवण्याचं सोंग वठवून पोटावर जोरात चापट्या मारत भीक मागायला सुरुवात केली.. अशा वेळी निदान दोन तीन हात तरी पैसे द्यायला पुढे येतात. आज मात्र कोणी ढिम्म लक्ष देत नव्हतं.. त्याचं पोट वाजवणं सुरूच होतं. याच्या पुढची स्टेप म्हणजे बसलेल्या बायकांच्या हाताला पायाला हात लावून लक्ष वेधून घेणं. बऱ्याचदा तो असा जवळ येऊ नये म्हणून ही कोणी एखादं नाणं देऊन टाकतं. ( स्पेशली सकाळी ऑफिसला जायच्या वेळेला घरातली काम आटपून नुकतीच अंघोळ करून आवरून सावरून ऑफिसला जात असताना ते कळकट काळे हात खरंच नकोसे वाटतात. ) आता तो ती ट्रिक वापरणारच होता.. तेवढ्यात माझ्या शेजारी बसलेल्या पारशी आंटीने त्याच कचरा उडवणं भलतंच मनावर घेतलं, आणि त्याला डब्यातून बाहेर घालवण्याचा पवित्रा घेतला. तसा हा ही बऱ्याचदा दिसणारा प्रसंग. अशा वेळी कधी ना कधी एखादी बाई असा आरडा ओरडा करतेच..!

एक दोनदा हाकलून जाईल तर तो भिकारी कसला, असा ज्याच्या त्याच्या शब्दांनी अपमानित होत राहिला, दुखावला गेला,किंवा पडत घेत राहिला तर त्याचा तरी निभाव लागायचा कसा..? तो तर आजू-बाजूच्या गर्दीच्या वरताण गेंड्याच्या कातडीचा. ( तो कसला आंटीच्या हुसकावण्याला दाद देतोय. आंटी अजून एक-दोन वेळा ओरडेल आणि स्वतःशीच धुसफुसत आपल्या जाग्यावर बसेल. ) शेवटी भीक मागणं हाच त्याचा धंदा आहे.

आज मात्र वेगळंच झालं.. चवताळलेली आंटी एक-दोनदा ओरडली खरी.. पण मग तिलाच काय वाटलं कोण जाणे. तिने जातीनं उभं राहून त्या पोट्ट्या कडून अख्खा डबा नीट झाडून घेतला.. दाराशी सरकवलेला सगळा कचरा त्याला बाहेर टाकायला लावला.. आणि मग त्याच्या हातावर चांगली दहाची नोट ठेवली. पण त्यानंतर पुढचं स्टेशन आल्यावर एक सेकंद ही त्याला डब्यात ठेवून घेतलं नाही.. की तिच्या व्यतिरिक्त आणि कोणासमोर हात पसरू दिला नाही.

डबा जरा साफ झाला. त्या मुलाला जर खरंच काम करायचं असेल तर आजची ही दहाची नोट त्याला नक्कीच सुखावून गेली असेल. पण भीकच मागायची असेल तर इथून हुसकवल्यावर त्यानं नक्कीच लगेच दुसरा डबा गाठला सुद्धा असेल, तिथेही हेच नाटक करून तो पुन्हा पोट बडवत भीक मागत असेल. आजपर्यंत कुठल्याच झाडू घेऊन फिरणाऱ्या या मुलांनी पूर्णं डबा नीट/पूर्णं झाडल्याच दिसलं नाही. आणि तेच ते नाटक रोज रोज बघणारे त्याला परत परत भुलतात.. काम करायचंच नसेल तर ते करण्याच नाटक तरी कशाला..? हातात झाडू न धरता ही भीक मागता येतेच ना..! आता हा मुलगा ज्या डब्यात शिरलाय तिथे त्याला अशीच कोणी आंटी भेटेल का..? अशीच एक तरी आंटी प्रत्येक डब्यात पाहिजे नाही. जी भिकाऱ्याला रिकाम्या हातानं ही पाठवणार नाही.. आणि त्याच्या मोकळ्या हातांना आणखीन सोकावू ही देणार नाही.

आंटीनी खूपच चांगली ऍक्शन घेतली होती. मला त्यांचं अगदी मनापासून कौतुक वाटत होतं. खरं तर त्यांना ते तसं बोलून दाखवायला पाहिजे होतं. पण नेहमीच्या सवयीने मी नुसतंच स्मित केलं. ते त्यांच्यापर्यंत पोहचलं असावं.. अशी आशा करते. त्यांना तशी त्याची काहीच जरूर नव्हती. त्यांनी त्यांच्या मनात आलेलं कार्य पूर्णत्वाला नेलं होत, त्याचं समाधान त्या प्रेमळ पिकल्या चेहऱ्यावर पुरेपूर झळकत होतं.

बसता बसता त्या माझ्यासमोर आणखीन एक वाक्य बोलून गेल्या.. " आपण दिवसभर काम करतो तेव्हाच आपल्याला पैसे मिळतात ना..! मध्ये कुठेतरी भिकाऱ्यांना पैसे द्यावे की नाही वर चर्चा वाचली होती.. त्या चर्चेला या पारशी आंटीने जणू उत्तर दिलं होतं.
.
.
===============================
स्वाती फडणीस............ ०६-०९-२००९

जीवनमानप्रवासलेखअनुभव

प्रतिक्रिया

भारतीय's picture

28 Jul 2010 - 11:06 am | भारतीय

छान छान गोष्टी..

विचार करायला लावनणारा लख

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Jul 2010 - 2:47 pm | llपुण्याचे पेशवेll

छान कथा. आंटीनी चांगले काम केले.

चिरोटा's picture

28 Jul 2010 - 5:19 pm | चिरोटा

पारशी काकूंनी घेतलेली 'अ‍ॅक्शन' आवडली.दमट भरगच्च डब्यामधे असे काही करणे म्हणजे चॅलेंजच असतो.

प्रकाश घाटपांडे's picture

28 Jul 2010 - 5:29 pm | प्रकाश घाटपांडे

निरिक्षण चांगले मांडले आहे. व्यावसायिक भिकारी उत्तम अभिनय करतात.

स्वाती फडणीस's picture

28 Jul 2010 - 8:17 pm | स्वाती फडणीस

धन्यवाद..! :)

मी-सौरभ's picture

28 Jul 2010 - 11:48 pm | मी-सौरभ

तुमची लेखन शैली फार छान आहे...

मीनल's picture

29 Jul 2010 - 1:40 am | मीनल

मी ही एक गोष्ट लिहिली आहे . विषय हाच...
नक्की वाचा.

त्या सा-या जणी आणि तो पो-या.

स्वाती फडणीस's picture

29 Jul 2010 - 10:48 am | स्वाती फडणीस

मिनल तुम्ही लिहीलेली गोष्ट वाचली.. ती ही सचित्र..
छान वर्णन केलय तुम्ही.

बहुगुणी's picture

22 Nov 2012 - 2:55 pm | बहुगुणी

दोघींचेही लेख आवडले, नेमक्या घटना वेचण्याची बारकाई आणि एका सर्वसामान्य पण बोचर्‍या वास्तवाची जाणीव साध्या शब्दात करून देणं हे दोघींनाही छान जमलं आहे.

अनुराग's picture

22 Nov 2012 - 11:54 am | अनुराग

आवडले