"मी मुंबईकर"
=============================================
आजपासून बरोबर अठरा वर्षांपूर्वी.. मी, व माझ्या भावंडांनी पहिल्यांदा मुंबई पाहिली.
वडिलांचं बऱ्याचदा ऑफिसच्या कामानिमित्त मुंबईत त्या आधी येणं-जाणं होत असे.. आताही अगदी या आठवड्यापर्यंत मुंबईची बदली रद्द करण्यासाठी म्हणून ते मुंबईला जाऊन आले होते. बावीस वर्ष एकाच भागात राहिल्या नंतर आताची ही मुंबईची बदली त्यांना नको होती. बदली रद्द करण्याचे ती एखाद्या दुसऱ्या ठिकाणी करून घेण्याचे सगळे प्रयत्न थकल्यावर अगदी ऐनवेळी आमचं मुंबईला जायचं निश्चित झालं. त्यामुळे मुंबई प्रवासाची अशी काहीच तयारी झाली नव्हती. शाळा सुरू होऊन महिना दीड महिना उलटून गेला होता, तिकडच्या शाळेत प्रवेश घ्यायचा होता.. त्यासाठी बाबांना पुन्हा एकदा मुंबई वारी करावी लागली. इकडे मिळालेल्या चारपाच दिवसात आम्ही सगळ्या सामानाची बांधाबांध पूर्णं केली. सामान बरंच लांब जाणार होतं. बाबा आले त्याच दिवशी ट्रक ठरवून सामान भरलं ही गेलं. आमच्या आधी सामानाचा ट्रक रवाना झाला. तिकडे मुंबईला एक एका कॉर्टरसाठी चार चार दावेदार होते.. ऑफिसनं कॉर्टर देऊ केली असली तरी अजून ताब्यात आली नव्हती. आम्हाला आमचं सामान पोहचायच्या आधी मुंबईला पोहचणं भाग होतं त्यामुळे मग उजाडता उजाडता पोहचेल अशी शेवटची एस्टी आम्ही पकडली.
पहाटेचे पाच-साडेपाच वाजले असावेत, आकाश पिवळसर करड्या रंगानं उजळून निघालं होतं आजू बाजूला अंधार आणि गर्द निळ्या आकाशाचा, रंग उडालेल्या पडद्यासारखा दिसणारा भाग.. घड्याळातल्या वेळेचा बसमधून दिसणाऱ्या दृश्याशी कसलाच ताळमेळ लागत नव्हता.. कसल्या कसल्या उग्र वासांनी नाकातले केस जळून जातील की काय असे वाटत होते.. रिझर्वेशन न करता केलेल्या आठ-नऊ तासांच्या भरगच्च भरलेल्या एस्टी प्रवासाने.. अंग, मन, अवघडून गेलं होतं. मी ना धड मोठी होते ना छोटी होते.. रात्रभरात गर्दीची ओळख झालीच. दोन सिटच्या मधल्या मार्गात बॅगांवर बसून बसून बुडाला, मणक्याला चांगलीच रंग लागली होती. घर सोडल्यापासून रडून रडून डोळ्यातलं पाणी संपलं होत. कोणी कोणी सांगितलेल्या मुंबईच्या भीतिदायक कहाण्या डोक्यातून जात नव्हत्या. गाव सोडल्याची अगम्य हुरहूर मनाला वेढून होती.. रात्रभर तारवटलेल्या डोळ्यांना प्रचंड थकवा आला होता. बाहेर घरांची इमारतींची गर्दी वाढत चालली होती. बस मधले पिवळट रंगाचे दिवे लावले गेले. कंडक्टरने टाण-टाण करून घंटा वाजवली, उतरणाऱ्या प्रवाशांना जागा करून देण्यासाठी आम्हाला सामान घेऊन जमेल तितकं सिटच्या बाजूस घुसावं लागलं.. दोनदा, तीनदा.. बस थांबत गेली.. सूर्याशिवायच चारी दिशा उजळल्या होत्या. एक ते आकाशच काय ते अजून रात्रीस धरून होतं. तेही भुरकट, अनोळखी, तिऱ्हाईतासारखं... पुन्हा मन गदगदून आलं, डोळे पाझरणार इतक्यात बाबांनी आता आपल्याला उतरायचंय तयार राहा.. करून सूचना केली. बस थांबली जमेल तितकं सामान घेऊन आम्ही सगळ्याजणी उतरलो.. समोर हा एवढा मोठ्ठा बस स्टॅंड, बसच बस..! अजून उजाडायचं होतच, रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. तरी जी काही माणसांची गर्दी होती ती आम्हाला दडपवून टाकणारीच होती..!
जुलै महिना पावसाळ्याचे दिवस.. गाव सोडताना आमच्या जोडीने बरसणारा पाऊस इथे पोहचल्यावरही मध्ये मध्ये टिपं गाळत होता.. टॅक्सी मिळवण्यासाठी आमची प्रभात फेरी बस स्टॅंड ओलांडून पुढे आली.. दादर स्टेशन..? बाबांनी टॅक्सीच्या खिडकीत वाकून विचारलं.. टॅक्सीवाला टॅक्सीतच झोपला होता. त्याने डबल भाडं पडेल म्हणून आधीच सांगितलं, तरी बाबांनी होकार दिला.. आम्ही सगळे जण सामान आणि छत्र्या सांभाळत टॅक्सीत चढलो. रस्ते रिकामे होते. पाच दहा मिनिटांमध्येच आम्ही एका गजबजलेल्या भागाजवळ पोहोचलो.. पायाखाली नुसता चिखल चिखल होता त्यातच.. कुठुनसा फुलांचा एकत्रित दरवळ येत होता.. टॅक्सीवाल्याच भाडं चुकतं करून बॅगा घेऊन बाबा पुढे निघाले.. आम्ही बाबांच्या मागे मागे आमच्या हातातले डाग सांभाळत निघालो.
कुठल्यातरी बोळातून वाट काढून रेल्वेस्थानकावर पोहोचलो तेव्हा सकाळचे सहा-पावणेसहा वाजले असतील, इतक्या सकाळीही स्टेशनवर बरीच वर्दळ होती. याच्या आधी आम्ही सांगलीला गेलो होतो तेव्हा एकदाच आम्ही ट्रेनमधून प्रवास केला होता.. दोन-तीन मिनिटात ट्रेन येईल सांगून बाबांनी आम्हाला तयार राहायला सांगितलं आमच्या कडच्या जवळजवळ सगळ्या बॅगा पिशव्या बाबांनी त्यांच्याकडे घेतल्या.. मी नेहमी मागे मागे राहायचे त्यामुळे ट्रेन येताना दिसल्याबरोबर सामानाबरोबरच मलाही पुढे ओढून घेतले.. ट्रेन आली; आम्हा सगळ्यांना ट्रेनमध्ये चढवून मग बाबा सामान घेऊन चढले.
ही ट्रेन आधी पाहिलेल्या सांगलीच्या ट्रेनपेक्षा जरा वेगळीच वाटली.. ट्रेन मधल्या लाकडी बाकड्यांवर बरेच लोक बसलेले होते.. तरी आम्हाला बसायला पुरेशी जागा डब्यात होती. रात्रभर अवघडलेल्या अवस्थेत प्रवास करून आम्ही सगळेच थकून गेलो होतो. तारवटलेल्या डोळ्यांना झोप अनावर होत होती.. आणि समोर ऐसपैस जागा दिसत होती. साहजिकच आम्ही सिटच्या दिशेने झेपावलो..
मी माझ्या तंद्रीत असले की आजूबाजूच्या गोष्टी मला कळायच्याच नाहीत. त्यात त्या दिवशी तर रडून.. जागून.. अवघडून.. आम्ही गळून गेलो होतो. मला बहुतेक फक्त समोरच्या सिटच दिसत होत्या.. आणि मी त्या दिशेने चालले होते. एवढ्यात बाबांनी मला दंडाला धरून बाजूला ओढलं. आणि काय झालं म्हणून मी आजू-बाजूला बघू लागले..
सकाळच्या सहा-साडेसहा वाजता एक भिकारी ट्रेन मध्ये भीक मागत आमच्या दिशेने येत होता.. त्याच्या चेहऱ्याला नाक नव्हते.. त्या जागी नुसतीच दोन भोक दिसत होती, डोळे जवळ जवळ पांढरे फट्टक, पापण्या भुवया झडलेल्या.. बुबळाच्या जागी कळेल न कळेल अशी हिरवट करडी छटा.. हिरड्या दिसणाऱ्या तोंडातले किडके दात, पूर्ण अंगावर काळे पांढरे डाग असलेला तो भयाण अवतार बघून अंगावर सरसरून काटा आला.. भीती, शिसारी, कणव.. अस काय काय मनात एकाच वेळी दाटून आलं. मी आतापर्यंत कधी भूत बघितलं नाहीये.. पण तो भिकारी मात्र कोणत्याही रामसेच्या चित्रपटात एकदम फिट बसला असता असाच होता. आधीच आमच्या मनात मुंबईविषयी भीतीदायक चित्र होत. त्यात त्या भिकाऱ्याच्या दर्शनाने आण्खीनच भर पडली.
अजूनही कुठे जाता येताना कधी-कधी तो भिकारी दिसतो.. आणि त्या दिवसाची आठवण येते. आता त्याची भीती वाटत नसली तरी ते रूप बघवत नाही आणि तो दिसताच नजर कुठेतरी दुसरीकडे वळवली जाते.
आता मुंबईचीही भीती अशी वाटत नाही. उलट आपण योग्यावेळी योग्य ठिकाणी आल्याच समाधानच वाटतं. मुंबईतली गर्दी, धकाधकी.. सार काही आपलंस वाटत. सहवासाने व्यक्ती, वस्तू, ठिकाणाबद्दल जिव्हाळा निर्माण होतो त्यामुळे असेल. पण कशीही असली तरी मुंबई आपली वाटते. म्हणूनच कोणी कधी विचारलंच तर "मी मुंबईकर" असे सहज ओठांवर येऊन जातं.
आमच्या या मुंबई प्रवासाची आठवण झाली की मनात विचार येऊन जातो. तो म्हणजे.. पहिली ओळख हीच शेवटची ओळख असं म्हणतात खरं.. पण ती म्हण परत एकदा तपासून घेतली पाहिजे . तसंही पहिल्या भेटीत, पहिल्या नजरेत.. सगळं कुठे दिसतं..!
कुणी काहीही म्हटलं बोललं तरी.. आपल्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला तिचा असा नाकेला चेहरा आहेच. ही मुंबईची होता होता पटलेली ओळख.
=============================================
स्वाती फडणीस ........................ २९-०७-२००९
प्रतिक्रिया
25 Jul 2010 - 12:40 pm | मराठमोळा
अठरा वर्षापुर्वींच तुम्हाला तंतोतंत आठवतय म्हणजे विशेषच ब्वॉ. :)
आणी तो भिकारी एवढे वर्ष जगला म्हणजे मुंबई भिकार्यांची सुद्धा पुरेपुर काळजी घेते असे म्हणायला हरकत नाही. ;)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
25 Jul 2010 - 12:47 pm | स्वाती फडणीस
काही घटना विसरता येत नाहीत.. तरी लिहीता लिहीता बरेच काही निसटल्याची शक्यता आहे..
25 Jul 2010 - 1:02 pm | बिपिन कार्यकर्ते
चांगलं लिहिताय. वाचतोय.
बिपिन कार्यकर्ते
26 Jul 2010 - 2:44 am | बहुगुणी
एकदम 'फ्लॅश बॅक' तंत्राचा उपयोग? आता पुढचे काही भाग मुंबईतल्या लोकल गाड्यांचे सुरूवातीचे अनुभव असावेत असा कयास चुकीचा असेल का? की मुंबईतील 'लोकल ट्रेनच्या' गोष्टींवरून 'local मुंबई' च्या गोष्टी असा लिखाणाचा प्रवास आहे? काहीही असो, लिहा, आवडतंय वाचायला.
26 Jul 2010 - 4:39 am | शिल्पा ब
खरंच!!! मी मुंबईत आले तेव्हा ७-८ वर्षाची असेन...पण मला मात्र मुंबई आवडली...कधी कधी गावाची आठवण यायची...कारण? उघडं आकाश, मनसोक्त हुंदडण्याच स्वतंत्र वगैरे प्रकार मुंबईत अवघडच...पण खरं सांगू भीती अशी कधी वाटलीच नाही मुंबईत...
26 Jul 2010 - 11:22 am | स्वाती फडणीस
:)