टंकेल वीडंबक जैं न काहीं

धनंजय's picture
धनंजय in जे न देखे रवी...
9 Jul 2010 - 10:02 pm

टंकेल वीडंबक जैं न काहीं
.
टंकेल वीडंबक जैं न काहीं,
तैं हासयाला मिळणार नाहीं.
कोठून पद्यें मिळतील ठोक?
सवंगतेला मुकतील लोक. ॥१॥
.
कवित्व लोकांत जरी विकें ना,
विडंबनीं खूप रुची जनांना.
झाकावया लाज कवी न पाहो,
विडंबनांचा सुकाळ राहो! ॥२॥
.
तीं-तींच चोथा यमकें फिरून,
कथानकें तीच फिकी विरून,
स्वस्तात आस्वाद तैं नष्ट सारा,
रुसेल वीडंबक जैं बिचारा! ॥३॥
.
- - -
(मूळ कविता "आठवणीतल्या कविता" संग्रहातून, मूळ कवीचे नाव माहीत नाही, बहुधा प्रत-अधिकार-मुक्त)
पेरील जैं शेतकरी न काहीं
.
पेरील जैं शेतकरी न काहीं,
तैं खावयाला मिळणार नाहीं.
कोठून धान्यें मिळतीं अनेक?
फळाफुलांना मुकतील लोक! ॥१॥
.
कापूस शेतात जरी पिके ना,
कोठून वस्त्रें बनतील नाना?
झाकावयालागिं शरीर पाहीं,
तैं वस्त्र साधें मिळणार नाहीं! ॥२॥
.
पेरी न तो तीळ, तरी तिळेल,
तळावयालागिं कसें मिळेल?
जगांत होईल अनर्थ सारा,
जरी रुसे शेतकरी बिचारा! ॥३॥
.
- - -

हास्यकरुणहे ठिकाणकविताविडंबन

प्रतिक्रिया

मिसळभोक्ता's picture

9 Jul 2010 - 10:09 pm | मिसळभोक्ता

मुख्य म्हणजे वृत्त चपखल ! सर्वच तांत्रिक बाबी चोख !

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

नितिन थत्ते's picture

9 Jul 2010 - 10:29 pm | नितिन थत्ते

विडंबन धनंजयनी केले म्हणजे हे सर्व आलेच.

असो. केसूंनी योग्यवेळी लाईन बदलली हे बरे.

नितिन थत्ते

श्रावण मोडक's picture

9 Jul 2010 - 10:51 pm | श्रावण मोडक

+२. विशेषतः केसूंनी योग्यवेळी लाईन बदलली हे बरे, हे वाक्य! :)

केशवसुमार's picture

9 Jul 2010 - 11:02 pm | केशवसुमार

मस्त विडंबन..
(वाचक)केशवसुमार
श्रामो,
ही सगळी पॉल ऑक्टोपसची कमाल..;)
ऑक्टोपस भविष्य सांगायला लागल्या पासून पोपट गाण्याचे कार्यक्रम करायला लागले आहेत असे ऐकीवात येते आहे..
(विस्थापीत)केशवसुमार

श्रावण मोडक's picture

9 Jul 2010 - 11:29 pm | श्रावण मोडक

खतरा... ऑक्टोपस ते पोपट हा प्रवास भारीच मांडलात. ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Jul 2010 - 11:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हाहाह्हा ...

विडंबनही खतरनाक!

अदिती

मुक्तसुनीत's picture

10 Jul 2010 - 12:44 am | मुक्तसुनीत

मजा आली.

परिकथेतील राजकुमार's picture

10 Jul 2010 - 11:33 am | परिकथेतील राजकुमार

विशेषतः केसूंनी योग्यवेळी लाईन बदलली हे बरे, हे वाक्य!

आता कुठे लाईन मारतात ते ?

स्वगतः- तरिच काल मला कॅफेचा पत्ता विचारत होते तर...

उत्सुक
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

(अजून लाईन न बदललेला)चतुरंग

सहज's picture

10 Jul 2010 - 7:13 am | सहज

>वा! धन्याशेठचे विडंबन एकदम मस्त!
सहमत.

कृपया लाईन बदलु नका, तुमच्या इतकी दर्जेदार व मुख्य म्हणजे वैविध्यपूर्ण विडंबने अजुन तरी इथे पहाण्यात नाहीत हो. :-)

रेवती's picture

9 Jul 2010 - 10:59 pm | रेवती

विडंबन छान, हसू आणणारे
मात्रा, वृत मला कळत नाही त्यामुळे जास्त काही बोलणे नाही.;)

रेवती

क्रेमर's picture

9 Jul 2010 - 11:44 pm | क्रेमर

तीं-तींच चोथा यमकें फिरून,
कथानकें तीच फिकी विरून,

विशेष आवडले.

राजेश घासकडवी's picture

9 Jul 2010 - 11:47 pm | राजेश घासकडवी

म्हणूनच दोन्ही डगरींवर पाय असलेला पैं बरां..

कुंथेल वैचारिक जैं न काहीं,
तैं चीवडाया मिळणार नाहीं.
कोठून धागे मिळतील ठोक?
शिमग्या नि पोळ्यासि मुकतील लोक. ॥१॥
.
विचार लोकांत जरी विकें ना,
खाज्रेपणी खूप रुची जनांना.
करावया माज कोणी न लाजो,
छद्मीपणाचा सुकाळ राहो! ॥२॥
.
त्या-त्याच चोथा चर्चा फिरून,
प्रश्नावली तीच फिकी विरून,
स्वस्तात आस्वाद तैं नष्ट सारा,
रुसेल वीचारवान् जैं बिचारा! ॥३॥

श्रावण मोडक's picture

10 Jul 2010 - 1:08 am | श्रावण मोडक

हायला, मास्तर आजकाल काय घेताय? म्हणजे खाणं वगैरे म्हणतोय मी... ;)
भारीच प्रकरण केलंत हे...

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jul 2010 - 6:34 am | बिपिन कार्यकर्ते

भारी म्हणजे काय? एकदम भारीच की हो... शिवाय ऑलखीचं वाटतंय ते वेगळंच. वा!!! मुसुशेठ, वा!!! चांगलीच माहिती दिलीत हो. :D

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

10 Jul 2010 - 7:22 am | चतुरंग

मुसुषेठ एकदम पेटेश! ;)
लै भारी!!

चतुरंग

सहज's picture

10 Jul 2010 - 7:34 am | सहज

हा हा

क ड क माल मुसुशेठ!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Jul 2010 - 2:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ऐं ल्ला, मज्जा आली.

अदिती

Nile's picture

10 Jul 2010 - 1:12 am | Nile

वा, मजा आली.

*ऐं वृत्तात बसावे म्हणुन का?

-Nile

घाटावरचे भट's picture

10 Jul 2010 - 2:10 am | घाटावरचे भट

वा वा!! मस्तच...

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jul 2010 - 6:33 am | बिपिन कार्यकर्ते

जबरा!!!

बिपिन कार्यकर्ते

ऋषिकेश's picture

10 Jul 2010 - 10:49 am | ऋषिकेश

धनंजय आणि मुसुशेठ,
लै भारी विडंबन!
मुसुशेठ ने दिलेला 'खाज्रे'पणा थेट भिडला ;)

ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा

स्वाती दिनेश's picture

10 Jul 2010 - 11:09 am | स्वाती दिनेश

धनंजय आणि मुसु,
दोन्ही विडंबने मस्त..
स्वाती

अवलिया's picture

10 Jul 2010 - 11:35 am | अवलिया

छान !

--अवलिया

धनंजय's picture

11 Jul 2010 - 1:40 am | धनंजय

माझ्या विडंबनाच्या प्रयत्नाचा दिलेल्या प्रोत्साहनाबाबत सर्वांचे आभार.

मध्ये "(वर्तूळ)", "{वाघूळ}" "|वातूळ|" वगैरे "गारगोट्यूळांचे वादळ हल्लीहल्लीच एके दिवशी झाले. आठवतच असेल. माझ्यासारख्याच या हौशी विडंबकांबद्दल टीका करता येत नाही. भाईकाकांनी स्वतःच्या लेखणीने आम्हा ऐर्‍यागैर्‍यांसाठी ज्ञानोबा माउलीने दिलेले पर्मिट पोचवलेले आहे :

"राजहंसाचें चालणें । भूतळीं जालिया शहाणें ।
आणिकें काय कोणें । चालावेचिना ॥"

माउलीने राजहंसाला मात्र बेडौल चालण्याचे पर्मिट दिलेले नाही. ज्या विडंबकांना लीलया यमके-वृत्त सांभाळता येते, त्यांचा माल आपण वेगळ्या तराजूवरती तोलतो.

कोणाला वाटेल की येथे "विडंबन हे परप्रकाशित आहे" वगैरे, विडंबनविरोधी टीका मी करणार आहे. मुळीच नाही. परप्रकाशित असले तरी विडंबनात स्वयंप्रतिभ कला असावी लागते, असे मी मांडणार आहे.

विडंबनाची तुलना करावी अजायबघरातील शीशमहालाशी. तिथल्या आरशांत आपला चेहरा बघितला की तो इतका गमतीदार दिसतो, की पुन्हापुन्हा हसावेसे वाटते. पण मग कुठल्याही मोडक्या-तोडक्या आरशात तोंड बघायला आपण तिकिटाचे पैसे देतो का? नाही. असा आरसा स्वस्तातसुद्धा विकत घेत नाही. अजायबघरातला शीशा "उगाच कसाही" वेडावाकडा नसतो. तो बनवायला कारागीर लागतो. प्रतिबिंब कसे वाकडे होणार, त्याची योजना कारागिराने आखलेली असते. प्रतिबिंबात मूळ वस्तूची ओळख सहज पटेल, अशा प्रकारेच बदल होतात. मात्र झालेल्या बदलाने व्यंग्यपूर्ण आकार प्रतिबिंबात येतो. तो बदल बघणार्‍याला अगदी नाविन्यपूर्ण हवा. काही अ-पूर्व, विलक्षण बघून आनंदाने हसू फुटावे.

मूळ आकार ओळखीचा ठेवणे आणि अनोळखी-विलक्षण बनवणे या विरुद्ध प्रक्रियांमध्ये तोल साधायची कसरतच असते. ही उत्तम विडंबकाकडून आम्हा आस्वादकांना अपेक्षित असते.
१. मूळ कविता निवडण्यात नेमकेपणा वाचकाला जाणवावा. विडंबकांना याची चांगली कल्पना असते - म्हणून स्फूर्तिस्थानाचा निर्देश "अमक्यातमक्याची अप्रतिम गझल" वगैरे शब्दांनी करतात. मात्र कित्येकदा कच्चा मालच रटाळ असतो. विडंबनात मुळातल्या कवितेची आकृती शोधण्यात वाचकाला मजा वाटली पाहिजे. मुळातली कविता इतका तरी ठसा उमटवू शकली पाहिजे.
२. मूळ कवितेत कमीतकमी शब्दबदल करून अर्थ जास्तीतजास्त वेगळा हवा. तर मजा येते. कमीतकमी बदल केल्यामुळे मुळातली आकृती स्मरत राहाते. अर्थात फरक खूप असल्यामुळे नव्या-जुन्या अर्थांची विसंगती गुदगुल्या करत राहाते. नवीन अर्थ ती लुटुपुटूची लढत जिंकण्याइतका स्वतंत्र आणि समर्थ हवा. हा अर्थ एकजिनसी असला, तरच परप्रकाशित आकृतीच्या वरती विडंबकाची प्रतिभा लखलखते.
३. विडंबनांचे विडंबन करायच्या भानगडीत अव्वल विडंबक क्वचितच पडत असावेत. तसे केल्यास "कुठली आकृती स्मृतीत यावी?" याचा भलताच गोंधळ वाचकाला होऊ शकतो. भोज्या ठरलेला नसला तर अर्थांच्या लपंडावाचा खेळ गमतीचा राहूच शकत नाही.
उदाहरण बघूया :
रामदासस्वामींचा श्लोक

"मना सज्जना भक्तिपंथेची जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ।
जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे ।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥"

त्याचे पु. ल. देशपांड्यांनी केलेले उत्तम विडंबन येथील वाचकांना ठाऊक असेलच :

"मना सज्जना ट्रामपंथेचि जावे ।
तरी वाचतो एक आणा स्वभावे ।..."

याचे झेरॉक्सचे-झेरॉक्स काढल्यासारखे काळेबेद्रे विडंबन निकृष्ट असते?

"मना सज्जना ग्रामगंगेसि जावे ।
तिथे कुंथती देख कोणी स्वभावे ।..."

येथे कुठली मूळ आकृती ठसवून मग त्याच्या विकृतीची गंमत अनुभवायची, तेच कळत नाही.

करायचेच तर मुळातल्या श्लोकाचे नव्याने विडंबन करायला घ्यावे.

"मना सज्जना सक्तिपंथेची जावे ।
तरी यम्म्यल्ये होइजे तू स्वभावे ।
जनीं गुंड ते सर्व जोडूनी घ्यावे ।
मनी-फंड खावा खिसेही भरावे ॥"

...
(अर्थात ही सुद्धा उच्च दर्जाची रचना नाही. पण वरील डबल-झेरॉक्सपेक्षा हीत थोडा अधिक दम आहे, हे मान्य केले पाहिजे.)
- - -

मिसळपावावरचे वाचक मला, किंवा अन्य कविकिरडूंना "मस्त", "+१", "अप्रतिम" वगैरे प्रोत्साहन देतात. भोळ्या सांबासारखा हा त्यांचा आशीर्वाद देण्यास तत्पर स्वभाव आहे. मोठी तपश्चर्या केलेल्या विडंबन-ऋषींनी मात्र एवढ्यावर समाधान मानू नये. दयाळू मिसळपावकर तोषतील अशी विडंबने ते दिवसाला दोन-चार रचू शकतात. त्यांनी स्वतःच्या वेगळ्या "कडक" निकषांवर विडंबन घासून बघावे : "रचना आपल्या कौशल्याला साजेशी आहे का?" कित्येकदा विडंबन वाचून पुन्हापुन्हा खात्री करून घ्यावी लागते - "छे छे! आपल्या याने हे रचले!"

आणि खरे तर मिसळपावकर रसिकांनीही दुहेरी निकष वापरायला काय हरकत आहे? गल्लीत टेनिस बॉल क्रिकेट खेळणार्‍यांना आपण सहजासहजी शाबासकी देतो. म्हणून काय आपण मुंबई संघाकडून तितक्याच टाकटूक कौशल्याची अपेक्षा करतो का? नव्हे. खूप अधिक अपेक्षा करतो. मला तेंडुलकरासारखी बॅट फिरवता येत नाही, म्हणून गल्लीतल्या माझ्यापेक्षा बर्‍या पोरांना संघात पाठवू देऊ काय? आपल्या हातात कौशल्य नसले, तरी फार-फार उच्च कौशल्य दिसू शकतील असे डोळे आपल्यापाशी आहेत.