अ विंडमिल (अर्थात पाटा-वरवंटा!)

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
7 Jul 2010 - 8:16 am

परवा आंतरजालावरती बुद्धीबळासंबंधी एक लेख वाचत असताना कार्लो टोर्रे-रेपेट्टो ह्या मेक्सिकन खेळाडूबद्दल वाचले. ह्याचे नाव मी पहिल्यांदाच वाचले असल्याने उत्सुकता ताणली गेल्याने आणखीन थोडा धांडोळा घेतला असता एक अफलातून डाव हाती लागला!

विंडमिल म्हणजे पवनचक्की. वार्‍याने पाती क्रमाक्रमाने फिरुन आवर्तन पूर्ण होते. बुद्धीबळात जेव्हा दोन किंवा क्वचित तीन मोहर्‍यांच्या समन्वयातून प्रतिस्पर्ध्याचा राजा त्याच्याच प्यादी आणि इतर मोहर्‍यात असा सापडतो की आलटून पालटून एकदा शह आणि लगेच काटशह देऊन अनेक मोहर्‍यांची, प्याद्यांची त्या 'पाट्या-वरवंट्यात' चटणी होते आणि डाव हातचा जातो.
कार्लोने त्याच्या चक्कीत कोणा ऐरागैर्‍याला पिसला असता तर ह्या डावाला कितपत महत्त्व आले असते माहीत नाही पण त्याने ज्याला पिसले तो होता जगज्जेता महारथी ग्रँडमास्टर इमॅन्यूएल लास्कर!

कार्लोच्या नावाने टोर्रे अ‍ॅटॅक असे एक ओपनिंगसुद्धा आहे ह्यावरुन ह्याची बुद्धीबळाच्या क्षेत्रातली कामगिरी लक्षात यावी.
लास्करविरुद्धचा हा डाव १९२५ साली मॉस्को इंटरनॅशनल टूर्नामेंट मध्ये खेळला गेला. पांढर्‍या मोहर्‍यांनी खेळणार्‍या कार्लोने डावची सुरुवात टोर्रे अ‍ॅटॅकनेच केली -
1. d4 Nf6 2. Nf3 e6 3. Bg5 c5
पाचव्या खेळीपर्यंत ओपनिंग नक्की झाले.

4. e3 cxd4 5. exd4 Be7 6. Nbd2 d6 7. c3 Nbd7 8. Bd3 b6 9. Nc4 Bb7 10. Qe2 Qc7 11. O-O O-O
अकराव्या खेळीपर्यंत डावाच्या मध्यावर ताबा मिळवण्याची धडपड दोघांनी केली आणि राजांचा किल्लेकोट करुन सुरक्षितता आणली. दोन्ही बाजूंच्या हत्तींचा समन्वय झालेला आहे. एकेक प्यादे सोडले तर बाकी सर्व सेना व्यवस्थित आहे. कार्लोकडे जागेचा वरचष्मा आहे परंतु अजूनतरी निर्णायक फायदा दिसत नाही.

12. Rfe1 Rfe8 13. Rad1 Nf8 14. Bc1 Nd5 15. Ng5 b5 16. Na3 b4 17. cxb4 Nxb4 18. Qh5 Bxg5 19. Bxg5 Nxd3 20. Rxd3 Qa5
विसाव्या खेळी अखेर स्थिती अशी आहे - सी स्तंभ मोकळा झालेला असला तरी त्याचा ताबा कोणी घेतलेला नाही. कार्लोचे दोन्ही हत्ती अनुक्रमे डी व ई स्तंभात आहेत्.त्याचे डी प्यादे आयसोलेटेड आहे. त्याच्याकडे एक प्यादे कमी आहे.त्याचा घोडा डावाच्या डावीकडे जाऊन बसलाय. परंतु त्याच्या वजीर आणि उंटाने काळ्या राजाच्या बाजूला पाचव्या पट्टीपर्यंत मुसंडी मारली आहे.
लास्करकडे एक प्याद्याची बढत आहे. त्याचे ए स्तंभातले प्यादे आयसोलेटेड आहे. उंटाने ए८-एच१ हा मोठा कर्ण धरलेला आहे. वजीर चौथ्या पट्टीत बसलाय. एकूण स्थिती बरोबरीची दिसत असली तरी पांढर्‍याकडे पोझीशनल अ‍ॅडवांटेज आहे.

21. b4 काळ्या वजिराला चौथ्या पट्टीतून हुसकवायला कार्लो त्याचे प्यादे पुढे टाकतो
Qf5 - काळा वजीर एफ ५ घरात हलला

आता हत्ती जी३ मधे आणूण कार्लो राजावर दबाव वाढवायला सुरुवात करतो. लास्करने एच ६ प्यादे पुढे टाकून पांढर्‍या उंटाला हुसकवायचे ठरवले आहे. आता गंमत अशी आहे की पांढरा उंट काढला तर वजीर पडणार कारण वजिराला आधारच नाही!
22. Rg3 h6

डी ६ चे प्यादे दुबळे आहे असे हेरुन कार्लोने घोडा सी४ मधे आणला. आता पांढरा उंट खाता येत नाही कारण मग डी६ चे प्यादे खाऊन घोडा वजीर -आणि ई८ मधला हत्ती अशी कात्री लावून बसतो आणि हत्ती पडतो.
23. Nc4 Qd5
इथे लास्करने वजीर डी ५ मधे नेला.

24. Ne3 - पुन्हा एकदा वजिरावर घोडा आणला Qb5 वजीर बी ५ मधे सरकतो. लास्करला काही केल्या पाचवी पट्टी सोडायची नाहिये कारण पांढर्‍या उंटाचा त्याचा मोह सुटत नाहीये!

आता कार्लो काय खेळणार? ए४ असे प्यादे वजिरावर टाकून प्याद्याचा बळी देऊन उंटाची सुटका करुन घेणार. दोन प्याद्यांची आघाडी म्हणजे भरपूर झाली असा लास्करचा कयास!
काय होते पहा -
25. Bf6!!! उंट एफ ६ - हीच ती खेळी ज्याने हा डाव जगप्रसिद्ध झाला! वजिराचा बळी देऊ केलान कार्लोसने!!
आता हा वजीर खावाच लागतो लास्करला कारण नाही खाल्ला तर R x g7+, Kh8, Qxh6# अशी दोन खेळ्यात मात आहे.
Qxh5 - वजीर खाल्लान लास्करने आणि चक्की चालू झाली!!

कोपर्‍यात अडकलेल्या राजाला शह मिळाल्यावर हलण्यासारख्या केवळ दोनच जागा असल्याने तो चक्कीत पिसला जाणे अपरिहार्य आहे -
26. Rxg7 शह Kh8 राजा एच ८ मधे
27. Rxf7 हत्तीने प्यादे मारुन उंटाचा काटशह Kg8 - राजा पुन्हा जी ८
28. Rg7 शह Kh8 राजा पुन्हा एच ८ मधे
29. Rxb7 हत्तीने उंट मारुन काटशह Kg8 - राजा पुन्हा जी ८
30. Rg7 शह Kh8 - बिचारा राजा पुन्हा एच ८
31. Rg5 हत्तीचा वजिरावर हल्ला आणि काटशह Kh7 - हुश्श आत्ता कुठे चक्कीतून सुटून सातव्या पट्टीत राजा आला!
32. Rxh5 - काळा वजीर पडला! Kg6 - पांढरा उंट खायला मिळणार पण काय व्हायचं होतं ते नुकसान झालं आहे.
33. Rh3 Kxf6 34. Rxh6 Kg5 35. Rh3 Reb8
पस्तिसाव्या खेळीअखेर पांढर्‍याची तीन प्यादी जास्त आहेत आणि काळ्या राजाला भर मैदानात आणून त्याची ससेहोलपट झाली आहे!

36. Rg3+ शह Kf6
37. Rf3+ शह Kg6
38. a3 a5 39. bxa5 Rxa5 - ए पट्टीतल्या प्याद्यांची मारामारी करुन काळा हत्ती मैदानात आणण्याचा प्रयत्न.
40. Nc4 - दुबळे डी प्यादे Rd5 - हत्तीचा प्याद्याला जोर आणि पांढर्‍या डी ४ प्याद्यावर हल्ला
41. Rf4 Nd7 - घोडा डावात आणण्याचा लास्करचा प्रयत्न

42. Rxe6 - ई ६ चे प्यादे पडले आणि शह. Kg5 - राजा हत्तीवर न्यायचा दुबळा प्रयत्न
43. g3 प्याद्याने हत्तीला जोर आणि पुढल्या काही खेळ्यात मात अटळ. लास्करने डाव सोडला!!

काय भन्नाट डाव आहे! वा!!
भर डावात वजिराचा बळी देऊन चक्की चालवण्यामागची कल्पनाशक्ती ही थक्क करणारी आहे. इतक्या मातबर मोहर्‍याचा बळी देणे हे प्रतिस्पर्ध्याच्या विचारात येणेही अवघड असते कारण डावाच्या तार्किक संगतीत अशा खेळ्या बसत नाहीत त्यामुळे बलिदाना विरुद्ध कोणताही बचाव नसतो!! ती एक उत्स्फूर्त कला असते. कल्पनाशक्तीचा आविष्कार असतो. भले त्या खेळाडूंनी वर्षानुवर्षे बुद्धिबळाचं विश्व गाजवलं नसेलही पण अशा एकदोन चमकदार डावांनी त्यांनी बुद्धीबळाला अनमोल रत्नं प्रदान केलेली असतात!!
कार्लोसला माझा सलाम!!

टीप - हा संपूर्ण डाव इथे खेळून बघता येईल.

चतुरंग

क्रीडालेखमाहितीआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

7 Jul 2010 - 5:52 pm | परिकथेतील राजकुमार

शॉल्लेड डाव मालक.

मोक्याच्या जागेवरची एकच सोंगटी काय कमाल करु शकते पहा.

बाकी २१ वी चाल b4 च्या ऐवजी qf5 का खेळली गेली असावी पटकन लक्षात येत नाहिये.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

चतुरंग's picture

7 Jul 2010 - 6:04 pm | चतुरंग

खेळी आहे आणि त्याला उत्तर म्हणून क्यू एफ५ ही काळ्याची.
(आधी ते नीट लक्षात येत नव्हते आता लेखात थोडी सुधारणा केली आहे.)

चतुरंग

गणपा's picture

7 Jul 2010 - 5:52 pm | गणपा

रंगाशेठ मस्त परिक्षण झालय हो..
आता तो खेळविभाग आलाच पाहिजे.. :)

शाळेत असतानाच बुद्धीबळाची गोडी लागली. घरी आई,बाबा, बहिण सगळेच खेळायचे. मग कॉलेज मध्ये पण लेक्चर बंक करुन कधी बुद्धीबळ कधी टिटी तर कधी कॅरम सॉल्लेड धम्माल करायचो.

सध्या एकटाच संगणकाबरोबर खेळत बसतो :(

भाऊ पाटील's picture

7 Jul 2010 - 7:07 pm | भाऊ पाटील

गणपाशी सहमत.मस्त परिक्षण.

प्रभो's picture

7 Jul 2010 - 7:04 pm | प्रभो

जहबहरा.......

विसोबा खेचर's picture

7 Jul 2010 - 7:14 pm | विसोबा खेचर

जबरा..!

वात्रट's picture

7 Jul 2010 - 8:19 pm | वात्रट

शाळेत असताना खुप खेळायचो बुद्धीबळ
मुकुन्द जोशी झाला होता...
ते व्हा आपण बुद्धीबळ Champion झालो आहोत असली स्वप्न पडायची..
पुस्तक आणुन ते डाव खेळुन बघायचो..
ते दिवस आठवले.

<<आता तो खेळविभाग आलाच पाहिजे..
बा डि स

टारझन's picture

7 Jul 2010 - 10:25 pm | टारझन

धनंजयचा लेख वाचल्यासारखे वाटले :)

(बुद्धिबळात डब्लुडब्लुएफ खेळणारा) वंडर टेकर

मस्त कलंदर's picture

8 Jul 2010 - 2:51 am | मस्त कलंदर

छान लेख.. आता जरा घाईतच वाचला.. उद्या निवांतपणे एक एक खेळी खेळत पाहीन... आणि माझ्या निर्बुद्ध शंका तुम्हांला विचारायला येईन

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

धनंजय's picture

8 Jul 2010 - 3:33 am | धनंजय

राजा दोन घरात मागे-पुढे वावटळीतल्या पाचोळ्यासारखा फडफडतोय! लास्करला काय वेदना होत असतील...

चतुरंग's picture

8 Jul 2010 - 9:48 pm | चतुरंग

पुढल्या लेखात असाच एक डाव घेऊन येतो! :)

चतुरंग