गाय आणि विदाकेंद्रे (अर्थात डेटा सेंटर्स)

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
28 Jun 2010 - 10:41 pm

 lbl.govleft

आपण जे काही इंटरनेट वापरत असतो, ऑफिसातील कामात विदाचे आदानप्रदान करत असतो, साठवत असतो, त्या सर्वाला विदाकेंद्रे अर्थात डेटासेंटर्स लागतात. अनेक सर्वर्स जोडलेली ही क्रेंद्रे अथक आणि अहोरात्र कार्यरत असतात.

प्रचंड उर्जा खर्च होत असते. अमेरिकेच्या संदर्भात, पर्यावरण खत्याने (इपिए) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार केवळ अमेरिकेत १.५% उर्जा ही विदाकेंद्रे वापरत असतात. १.५% हा आकडा तसा जास्त वाटणार नाही, कदाचीत पण त्याचे पैशात रुपांतर केले तर २००६ साली विदाकेंद्रे चालवण्यासाठी लागणार्‍या उर्जेचा खर्च, एकत्रीत $४.५ बिलीयन्स इतका होता. तो १९९६ सालच्या तुलनेने ८००% वाढला आहे. २००७ सालच्या या अहवालात असेही म्हणले आहे की विदाकेंद्रे ही पाच वर्षाच्या काळात दुपटीने वाढणार आहेत. अशाच इतर अभ्यासानुसार विदाकेंद्रांना लागणार्‍या उर्जेची किंमत हा त्याला लागणार्‍या सर्वरच्या किंमतींपेक्षा अधिक महत्त्वाचा घटक झाला आहे.

थोडी अधिक कल्पना यावी म्हणून विदाकेंद्रे किती या पेक्षा नामांकीत कंपन्यांच्या एकूण विदाकेंद्रांच्या आकडेवारीपेक्षा त्यात असलेल्या सर्वर्सच्या उपलब्ध आकडेवारीवरून कंपन्यांचे यात किती पैसे गुंतत असतील याची कल्पना येईलः

गुगल - अंदाजे ४५०,००० (२००५/२००६ ची आकडेवारी)
मायक्रोसॉफ्ट - अंदाजे २१८,०००
इंटेल - १००,०००
फेसबूक - ३०,०००

विदाकेंद्रांच्या बाबतीत अजूनही एक गोष्ट म्हणजे प्रचंड उर्जावापरामुळे असलेली कार्बन फूटप्रिंट, म्हणजे पर्यावरण बदलास कारणीभूत असलेला कार्बन आणि कार्बनसमान (इक्वीवॅलंट) किती उत्सर्जीत होतो ती संख्या. बहुतेक कंपन्या या आजकाल स्वत:ची कार्बन फुटप्रिंट काढतात, जाहीर करतात.

Source: http://www1.eere.energy.gov/

गुगलच्या संकेतस्थळावर एक मजेशीर माहीती त्यांच्या अधुनिक विदाकेंद्राच्या संदर्भात मिळाली: गुगलच्या म्हणण्याप्रमाणे, आपण जेंव्हा काहीही त्याच्या संकेतस्थळावर शोधतो तेंव्हा साधारण त्याच्या विदाकेंद्राची ०.०००३ किलोवॅट-अवर्स इतकी उर्जा वापरतो अथवा त्यातून ०.२ ग्रॅम्स इतका कार्बन उत्सर्जीत होतो. त्याची तुलनाच करायची तर एक ग्लास ऑरेंज ज्यूस तयार करायला १०५० गुगल शोध घेण्याइतकी उर्जा लागते अथवा सर्वसाधारण अमेरिकन गाडीतून ५ मैल गेले तर ते १०,००० गुगलशोधांइतके होईल! हे अर्थातच गुगलने "हरीत विदाकेंद्रे" तयार केल्याने कमीत कमी उर्जेत होत आहे.

असो, तर मुद्दा हा की कंपन्या विदाकेंद्रास लागणार्‍या उर्जेसंदर्भात गांभिर्याने विचार करत आहेत. त्यातून त्यांचे जसे पैसे वाचतात तसेच कंपनीचे पर्यावरणमित्र म्हणून नाव होण्यास मदतही होते, ज्याचा उपयोग खप वाढवायला होऊ शकतो. याच संदर्भात एच पी या जगप्रसिद्ध माहीती, तंत्रज्ञान आणि संगणकीय कंपनीची विदाकेंद्रांसाठी लागणारी उर्जा ही गायीच्या शेणापासून तयार करायचा आगळावेगळा प्रकल्प वाचनात आला.

संदर्भः न्यूयॉर्क टाईम्स, स्मार्ट प्लॅनेट आणि अर्थातच एच पी .

एचपीच्या सस्टेनेबिलिटीचे प्रमुख असलेल्या चंद्रकांत पटेल यांनी जाहीर केले. त्यातील काही प्रमुख गोष्टी:

* गायीचे दरदिवशीचे सरासरी शेण हे १२० पाउंड जे ३ किलोवॅट-अवर उर्जानिर्मिती तयार करते.
* या गणिताने १०,००० गायींचे वार्षिक शेण हे १ मेगावॅट वर चालणारे विदाकेंद्र चालवून शिवाय अतिरिक्त उर्जा शेतकर्‍यांना देऊ शकेल.
* यामुळे शेतकर्‍यांना सतावणार्‍या मिथेन या ग्रीनहाऊस गॅसचा प्रश्न सुटू शकतोच शिवाय उर्जा निर्मिती होऊ शकते.
* दोन वर्षात गुंतवलेले पैसे वसूल होऊन शेतकर्‍यांना एकत्रित वार्षीक $२ मिलीयन इतका फायदा होऊ शकतो!

या डिझाइनमध्ये विदाकेंद्रामध्ये तयार झालेली अतिरीक्त उष्णता, तशीच विद्यूत निर्मितीत तयार झालेली उष्णता देखील ही गायीच्या शेणाचे "डाय्जेशन" करण्यासाठी वापरली जाते. तयार होणारी वीज ही जशी विदा केंद्रांना मिळेल तशीच ती शेतकर्‍यांना देखील मिळू शकेल. खालील चित्रामध्ये याचे चांगले चित्रिकरण केले गेले आहे:

(स्त्रोत)

अर्थात केवळ विदाकेंद्रांच्या वापरासाठीच अशी उर्जानिर्मिती करायची गरज नसून, त्यातून नागरी उर्जेचे प्रश्न देखील सोडवता येतील.

तंत्रविज्ञानअर्थकारणबातमीमाध्यमवेध

प्रतिक्रिया

मिसळभोक्ता's picture

28 Jun 2010 - 11:28 pm | मिसळभोक्ता

विदाकेंद्रांत बकर्‍यांचा वापरः

http://bit.ly/9yzqkc

गायीच्या शेणापासून ऊर्जा मिळवण्याचा प्रकल्प कितपत यशस्वी होईल, शंका वाटते. कारण वर उल्लेखलेल्या सगळ्या संस्था, एका किलो-वॉट-अवर ला सुमारे ५ सेंट्स खर्चतात. यापेक्षा स्वस्त दरात शेण-ऊर्जा निर्मिती शक्य आहे का ?

त्या आधी विदाकेंद्रांना अनेक "लोंबलेली फळे" (लो-हँगिंग-फ्रूट्स) तोडण्याची संधी आहे.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

विकास's picture

29 Jun 2010 - 12:33 am | विकास

बकर्‍यांच्या माहीतीबद्दल धन्यवाद! ही नवीनच माहिती आहे. (अवांतरः "माझ्या बकरीचा याहूसनी लागलाय लळा" असे नवीन गाणे तयार करायला हवे ;) )

गायीच्या शेणापासून ऊर्जा मिळवण्याचा प्रकल्प कितपत यशस्वी होईल, शंका वाटते.

येथे एक (पान स्क्रोल करा) उर्जाबचतीच्या आर्थिक फायद्याचे गणित दिले आहे. ते योग्य/अयोग्य आहे का हे अवश्य सांगावे. (हा वादासाठी प्रश्न नाही, तुम्हाला या संदर्भात माहीती असणार याची खात्री असल्याने विचारत आहे).

बाकी लोअर हँगिग फ्रूट्स बद्दल पूर्ण सहमत!

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

मिसळभोक्ता's picture

29 Jun 2010 - 3:31 am | मिसळभोक्ता

उर्जाबचतीच्या आर्थिक फायद्याचे गणित दिले आहे. ते योग्य/अयोग्य आहे का हे अवश्य सांगावे.

हे गणित पूर्णपणे योग्य नाही.

अमेरिकेतील राज्या-राज्यात विद्युत-उर्जेच्या दरांत खूप फरक आहे. एवढेच नव्हे, तर राज्यांतर्गत देखील वेगवेगळ्या भागांत दरमध्ये खूप फरक आहे. सिलिकॉन व्हॅलीत एका किलो-वॉट-अवरला १८ सेंट्स पडतात. तेच थोडे उत्तरेला (ओरेगॉन सीमेजवळ) ७ सेंट्स.

जलविद्युत केंद्रांच्या ५० मैलाच्या परिसरात ३ सेंट्स एका किवॉअ ला पडतात. त्यामुळे याहूची नवीन विदाकेंद्रे अशा ठिकाणी आहेत.

(त्यामुळे एक गाय एका दिवसाला फक्त ९ सेंट्सची ऊर्जा देऊ शकते. या गाईचा दिवसाचा आहार नक्कीच ९ सेंट्स पेक्षा जास्त असेल, त्यामुळे मी माझे विधान केले होते.)

दुसरे म्हणजे, एकून विद्युतऊर्जेपैकी ३० टक्के ऊर्जा विदाकेंद्राला थंड करण्यात जाते. त्यामुळे थंड प्रदेशात असलेले विदाकेंद्र ऊर्जेची अधिक बचत करू शकते.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Jun 2010 - 11:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लेखमाला रोचक वाटत आहे.

स्क्वेअर किलोमीटर अरे या भल्यामोठ्या रेडीओ दुर्बिणीचं सध्या फक्त प्लॅनिंग सुरू आहे. (दुर्बीण पूर्णपणे तयार झाल्यानंतर, २०३०-४० च्यानंतर) यात अभियंत्यांना भेडसवणारे सगळ्यात मोठे दोन प्रश्न: १. विदा कसा साठवायचा आणि २. वीजेची गरज!
सध्यातरी हे दोन्ही प्रश्न अनुत्तरीत आहेत.

अदिती

सहज's picture

29 Jun 2010 - 6:37 am | सहज

पण पाठपुरावा करा प्लीज कारण H.P. has yet to construct its own manure-burning system.

ग्रीन इनिशिएटीव्ह म्हणुन प्रकल्प जाहीर होतात (कदाचित करात सुट व कंपन्यांना प्रसिद्धी मिळते) पण प्रत्यक्ष त्याचा पूर्ण वापर सुरु झाला की खरा विदा कळेल.

जाताजाता: कित्येक बँका नियमीत जुनी क्रेडीट कार्डस चांगली चालू असताना नवी नवी क्रेडीट कार्ड काढून, ग्राहकांना जुनी बदलायला लावून केवढे वेस्ट व इमिशन करते याचा विदा मिळू शकेल काय?