कृष्णा नी बेगने..(येथे ऐका)
(हे माझं रसग्रहण हे मूलत: गाण्याच्या सांगीतिक भागावर आहे..काही वर्षांपूर्वी एकदा अण्णांशी निवांतपणे संवाद साधायची संधी मिळाली होती.. बोलताना अण्णांनी मला 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा' आणि 'कृष्णा नी बेगने..' या कन्नड गाण्यांचा मराठीत अर्थ समजावून सांगितला होता, तो पुसटसा आठवतो आहे, तसा लिहितो आहे. येथे कुणी कन्नड जाणणारा/जाणणारी असल्यास मी जे कानडी शब्द लिहिले आहेत, आणि पदाचा जो अर्थ लिहिला आहे त्यात अवश्य सुधारणा करावी. त्याचं स्वागतच आहे..)
कानडी भाषेतलं कृष्णावरचं फार सुंदर गाणं.. व्यासतीर्थांची रचना.. यमुना कल्याणी रागातलं.. कर्नाटक-संगीतातला यमुना कल्याणी, आपल्या हिंदुस्थानी संगीतातला यमन कल्याण! दाक्षिणात्य गायिका चित्राने गायलं आहे हे गाणं..
साजूक तुपातली मिठाई तीच.. यमनची! फक्त बॉक्सेस वेगवेगळे! :)
'कृष्णा नी बेगने बारो' - रे कृष्णा इकडे (माझ्याकडे ) ये रे लवकर..!
'ष्णा' अक्षरावरच्या शुद्ध गंधारात अक्षरशः देवत्व आहे.. साक्षात श्रीकृष्णच वस्ती करून राहिला आहे त्या स्वरात.. किती कौतुक आहे त्या 'कृष्णा' शब्दात.. किती गोडवा आहे! एखादी आई आपल्या लाडक्या लेकाला ज्या ममत्वाने हाक मारते तेच ममत्व या 'कृष्णा' च्या स्वरात आहे.. फक्त दोनच स्वर - सा आणि ग!
'बेगने बारो..' तल्या 'बारो' शब्दावरची 'प रे' संगती म्हणजे अगदी ऑथेन्टिक यमन! :)
'बेगने बारो मुखवन्ने तोरो' - रे कृष्णा लौकर इकडे ये रे आणि मला तुझं मुखावलोकन करू दे..
खूप छान गायली आहे ही ओळ.. ह्यातल्या शुद्ध मध्यमाबद्दल मी काय बोलावं? यमनकल्याणातल्या शुद्ध मध्यमाबद्दल मी काय बोलावं? इतकंच सांगेन की तो शुद्ध मध्यम म्हणजे यमनाच्या गालावरचा सुरेखसा तीळ! हवं तर आपण त्याला बाळकृष्णाच्या गालावरील तीट म्हणू.. जी असते दृष्ट लागू नये म्हणून, कुठलंही अमंगल टाळण्याकरता असते ती.. परंतु ती तिट स्वत: मात्र अतिशय पवित्र.. सुमंगल आणि देखणी! तसा आहे यमनकल्याणातला शुद्ध मध्यम! :)
'बेगने बारो' गाताना चित्राने 'ध़नी़रेग..' ची एक सुरावट अशी घेतली आहे की नारायणरावांच्या 'नयने लाजवीत..' पदातल्या 'जणु धैर्यधर धरित धनदासम धन' मधल्या 'धनदासम' ची आठवण व्हावी! :)
काशी पितांबर कैयल्ली कोळलू
मीयोळू पुसिद श्रीगंध घमघम..
रे कृष्णा, तू सुरेखसं काशीचं केशरी पितांबर नेसला आहेस आणि तुझ्या हातात बासरी आहे..चंदनलेपाने अभ्यंगित अशी तुझी कांती आहे!..
मंडळी, हे अभ्यंग चंदनलेपाचं नव्हे, ते आहे यमनकल्याणच्या स्वरांचं.. काशीच्या भरजरी केशरी कदाचं जे सौंदर्य, तेच सौंदर्य यमनकल्याणचं..! :)
तायिगे बायल्ली मुज्जगवन्ने तोरिद
जगदोद्धारक नम्म उडुपीय श्रीकृष्ण..
कृष्ण, ज्याने बालपणी आपल्या मातेला आपल्या मुखात सार्या विश्वाचं दर्शन घडवलं होतं, असा सार्या जगाचा उद्धार करणारा असा उडुपीचा श्रीकृष्ण!
कृष्णाने सार्या जगाचा उद्धार केला आहे की नाही ते माहीत नाही, परंतु हिंदुस्थानी रागसंगीताचा प्रसाद वाटून सार्या संगीत रसिकांचा मात्र त्याने उद्धार केला आहे.. आपलं रागसंगीत हे त्यानं आपल्या पदरी घातलेलं सर्वात मोठं दान!
असो,
कन्नड भाषेतलं हे फार सुंदर गाणं.. याचं हरिहरनने फ्यूजन केलं आहे तेही खूपच सुंदर आहे.. येशूदासही सुंदर गातो हे गाणं..
सदरच्या ध्वनिफितीत चित्रानेही हे गाणं अगदी मन लावून गायलं आहे.. सोबतची बासरी आणि सतारदेखील खूप छान! बरं वाटतं हे गाणं ऐकून, समाधान वाटतं, पवित्र वाटतं, मंगल वाटतं..! हे देणं देवाघरचं, हे स्वरसामर्थ्य यमनकल्याणाचं..!
अण्णांशी जेव्हा या गाण्याबद्दल बोललो तेव्हा अर्थ सांगताना अण्णांनीही सहजच गुणगुणलं होतं हे गाणं. पण अक्षरश: शब्दातीत गुणगुणलं होतं..! फक्त माझ्यासाठी.. मी एकटा श्रोता, त्या अलौकिक स्वरांचा साक्षीदार! :)
अहो, सबंध गाणं तर सोडाच.. अण्णांनी सुरवातीचे नुसते 'कृष्णा नी ' हे शब्द गायले आणि मी जागीच संपलो.. कल्पना करा - अण्णांचा आवाज आणि कृष्णा नी मधले षड्ज, गंधार! अक्षरश: शंखध्वनी, नादब्रह्म!
असो..
हा लेख मी त्या जादुगार कृष्णाच्या, कानडाऊ विठ्ठलू असणार्या आमच्या पांडुरंगाच्या आणि कानडाऊ भीमसेनूंच्या चरणी अर्पण करत आहे..
-- तात्या अभ्यंकर.
प्रतिक्रिया
28 Jun 2010 - 4:12 pm | बिपिन कार्यकर्ते
अजून एक छान लेख तात्या. गाण्याचे शब्द ओळखीचे वाटले पण मूळ गाणं कधी ऐकलं नव्हतं. ते हरिहरनचा संदर्भ बघितल्यावर आठवले. ते रिमिक्स गाणे ऐकले होते. बाकी 'भाग्यदा लक्ष्मी..' बद्दल काय बोलावे. दैवी गाणं आहे ते... प्रच्चंड आवडतं मला. गेली सतरा अठर वर्षं तरी नियमितपणे ऐकतो आहे. प्रत्येकेवेळेला तेवढाच आनंद देऊन जातं हे गाणं. त्या दासवाणी अल्बममधली बाकीची सगळीच गाणी सुंदर आहेत.
बिपिन कार्यकर्ते
28 Jun 2010 - 4:15 pm | विसोबा खेचर
'भाग्यदा लक्ष्मी..' वर केव्हातरी लिहायचा विचार आहे..
ग्वाल्हेर अंगाचा कोमल धौवताचा बिभास आहे तो! :)
जयपूरवाले शुद्ध धैवताचा गातात!
28 Jun 2010 - 4:22 pm | बिपिन कार्यकर्ते
लिहीच तू... बाकी धैवत वगैरे कळायला बहुधा सात जन्म अजून लागतील... तो पर्यंत तुझ्यासारख्यांकडून असं जमा करत राहू...
'कृष्णा नी...' मधला सुरूवातीची तान /आलाप काय म्हणतात ते... 'मागे उभा मंगेश' या गाण्याच्या सुरूवातीची जी तान आहे तशी आहे का थोडीशी? शिवाय या भजनाच्या रागतली अजून काही भजनं आहेत का? वाटतंय तसं...
बिपिन कार्यकर्ते
28 Jun 2010 - 4:29 pm | विसोबा खेचर
करेक्ट.. अरे हा सगळा यमनचा महासागर आहे.. मागे उभा मंगेश, कानडाऊ विठ्ठलू.. नाथ हा माझा.. असे अनेकानेक माणिकमोती असलेला..
मी गेली अनेक वर्ष या यमनच्या महासागरात डुबक्या मारतो आहे.. पण अद्याप ना सापडला किनारा, ना सापडला तळ.. काही ठावच लागत नाही आणि कधी लागणारही नाही..
जर मला कावळा नाही शिवला तर हिराबाईंचा किंवा अण्णांचा यमन लावा रे कुणीतरी.. किंवा नारायणराव बालगंधर्वांचं नाथ हा माझा लावा.. लग्गेच पिंड घेऊन जाईन! :)
30 Jun 2010 - 8:17 am | स्पंदना
बिपिनदा तुम्हाला जस भाग्यदा ...आवडत ना तसच मलाही आवडत. पण हा एक व्हिडीओ पण पहाना. कन्नड येत असेल तर काय मज्जा आहे ते मला पण सांगा. मला यात लोकांच्या प्रतिक्रीय पाहुनच फार हसु येत.
निसर्गात आपल्या पाऊलखुणांशिवाय काहिही ठेऊ नका आणि त्यांच्या सुखद आठवणींशिवाय काहिही नेऊ नका.
(योगेश २४ यांच्या परवानगीने)
30 Jun 2010 - 4:20 pm | विसोबा खेचर
अहो अपर्णाजी,
अन्डरलाईनचा ट्यॅग नीट बंद करा प्लीज..
28 Jun 2010 - 4:22 pm | नंदन
रसग्रहण. रिमिक्स आधी पाहिलं होतं, त्यात हरिहरनच्या गाण्याबरोबरच नीना कुळकर्णीचा शेवटच्या प्रसंगातील बोलका अभिनयही लक्षात रहावा असा. मूळ गाण्याच्या शब्दांवरून 'भवतारकु हा कान्हा वेगीं भेटवा का' ही ओळ आठवली.
किंचित अवांतर - बेगने = लवकर असा अर्थ असावा (असा एक अंदाज आहे). हा वेग-वेगाने वरून आल्यासारखा वाटतो. तसं असेल तर देशावर याचं 'बिगी-बिगी', तळकोकणात 'बेगीना' आणि कन्नडमध्ये बेगने होतं असं म्हणावं लागेल.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
28 Jun 2010 - 4:26 pm | बिपिन कार्यकर्ते
असाच असावा... कन्नड मधे बेगा म्हणजे लवकर असं आहे.
बिपिन कार्यकर्ते
28 Jun 2010 - 4:30 pm | विसोबा खेचर
आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतात 'बेगी बेगी आओ' असे शब्द असलेल्या अनेक बंदिशी आहेत..
![](http://lh3.ggpht.com/_CuWvXTEA884/S9F1gbNMC0I/AAAAAAAAD8o/72Jl74gzSkI/Wiki.jpg)
28 Jun 2010 - 4:47 pm | अवलिया
ब हा र दा र !!
कृष्णाने सार्या जगाचा उद्धार केला आहे की नाही ते माहीत नाही, परंतु हिंदुस्थानी रागसंगीताचा प्रसाद वाटून सार्या संगीत रसिकांचा मात्र त्याने उद्धार केला आहे.. आपलं रागसंगीत हे त्यानं आपल्या पदरी घातलेलं सर्वात मोठं दान!
क्या बात है !!
--अवलिया
28 Jun 2010 - 5:09 pm | शुचि
तात्या तुम्ही केलेले रसग्रहण खूपच सुंदरच आहे. पण मला ते थोडं संगीतमय अधिक वाटलं. म्हणून मी विकी वर जाऊन या कवितेचा अर्थ एकसंध पाहीला. तो पुढे देतेय.
कृष्णा ! वेगे इकडे ये !
तुझा (कमळासारखा) चेहरा मला (वेगे) बघू दे!
सुंदर पैंजण तुझी पावलं सुशोभीत करताहेत! नीळ्या रंगाची कडी तुझ्या हातावर शोभत आहेत!
हे घनसावळ्या (लडीवाळा).. नृत्य करत इकडे ये !
घुंगुरघंटा लावलेला कंबरपट्टा तुझ्या कंबरेवर शोभून दिसतो आहे! (विविध, सुंदर) अंगठ्यांनी तुझी (कमळाच्या पाकळ्यांसारखी) बोटे सुशोभीत आहेत. !
स्वर्गीय वैजंती पुष्पांची माळ तुझ्या गळ्यात रुळते आहे !
काशीचे केशरी पीतांबर तू धारण केले आहेस! हाती मुरली धरली आहेस.!
हे प्रिय! चंदन लेप तुझ्या सर्वांगास (सुगंधीत) करतो आहे!
ज्या (बालकृष्णाने) आपल्या मातेस अखिल ब्रम्हांडाचे दर्शन मुख (कमल) उघडून दाखविले,
असा तो शुभम्कर उडुपी श्रीकृष्ण (आम्हास प्रिय) आहे.
28 Jun 2010 - 8:01 pm | सहज
धन्यु
कलोनियल कझिन्सचे ते गाणे ऐकले होते. छान आहेच यमन अगदी शुद्ध धुप तुपातला आम्हाला कळला नाही तरी.
नंदनच्या खवमधे एक दुवा होता शास्त्रीय संगीताबद्दल, धनश्री पंडीत-राय यांचा तो आठवला.
अजुन एक उदाहरणांचा दुवा.
28 Jun 2010 - 5:12 pm | तिमा
रोशन या थोर संगीतकाराने 'यमन' असंख्य स्वरुपात मांडून सामान्यांपर्यंत पोचवला.
तात्यांशी सहमत, यमन हा महासागरच आहे.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
28 Jun 2010 - 5:13 pm | शानबा५१२
यमन चा गायनात काय अर्थ होतो ? तो कसा ओळखायचा?तात्यांनी एवढी तारीफ केल्यानंतर 'यमन' की काय ते एकायचे आहे.
___________________________________________________
![]()
see what Google thinks about me!
इथे
28 Jun 2010 - 6:07 pm | चतुरंग
ITC Sangeet Reasearch Academy च्या संस्थळावर 'समय राग' असा एक दुवा आहे तिथे गेलात तर संपूर्ण दिवसातल्या वेगवेगळ्या वेळी गायल्या/वाजवल्या जाणार्या रागांची माहिती आहे. आरोह्-अवरोह, पकड इत्यादी.
खाली मी यमनचा दुवा दिलेला आहे त्यात ३ मिनिटांची यमनाची एक धून ऐकता येते.
http://www.itcsra.org/sra_raga/sra_raga_that/sra_raga_that_links/raga.as...
चतुरंग
28 Jun 2010 - 5:51 pm | संदीप चित्रे
लेख खूप आवडला हे वेसांनल !
>> 'भाग्यदा लक्ष्मी..' वर केव्हातरी लिहायचा विचार आहे..
वाट बघतोय रे... लवकर लिही.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
28 Jun 2010 - 6:15 pm | भाग्यश्री कुलकर्णी
मिरजेला राघवेंद्र स्वामींच्या मठात "भाग्यदा लक्ष्मी " लागलेले असायचे. संध्याकाळी गल्लीतल्या कट्टी अन चिप्प्लकट्टींच्या घरातुन हेच सुर ऐकत मोठे झालो आम्ही.
मध्यंतरी इंदोरात जयतिर्थ मेवृंडींच्या आवाजात भाग्यदा ...ऐकले अन एकदम लहानपणींच्या आठवणीत रमले.
तात्या लिहाच त्यावर.अन कृष्णा बेगने.... सहीच्चे.
28 Jun 2010 - 9:19 pm | विसोबा खेचर
ही गोष्ट असेल नव्वदीच्या दशकातली..
मिरजेच्या राघवेन्द्र स्वामींच्या मठात एकदा अण्णांचा पुरिया ऐकला होता.. असा भन्नाट पुरिया पुन्हा ऐकला नाही! त्या पुरिया नंतर अण्णांनी 'जादू भरेली कौन अलबेली, नैना रसिली..' हा अब्दुलकरीमखासाहेबांचा दादरा गायला होता.. त्यानंतर मध्यंतर झाले..
या मैफलीत माझे सारे ग्रह उच्चीचे होते कारण पहिल्या रांगेत अगदी माझ्या शेजारीच भाईकाका आणि काकू बसल्या होत्या.. तेव्हा आमची ना विशेष ओळ्ख ना पाळख.. (म्हणजे मी त्यांना अर्थातच ओळखत होतो..) :)
"जादू भरेली' मध्ये अण्णांनी अशी काही जादू भरली की मध्यंतर होताच भाईकाका अचानक माईकवर आले आणि म्हणाले,
"भीमसेन, नको रे रडवूस.. तुझा पुरिया सुन्न करून गेला.. श्रोतेहो, हे गाणं करीमखासाहेबांच्या मिरजेत सुरू आहे.. आणि या मैफलीत साक्षात खासाहेब मला गाणं ऐकण्याकरता आलेले दिसताहेत, जाणवताहेत..!"
भाग्यश्रीवैनी, ही माझी मिरजेतली आठवण..!
मिरजेतल्या अजूनही काही आठवणी आहेत.. तानपुरावाले आबासाहेब आणि त्यांच्या घराण्यातली लोकं.. आबासाहेबांच्याच एका मानस नातवाने (मजीद) मला तंबोर्यांची जवारी काढायला शिकवलं आहे.. मिरज हे करीमखासाहेबांचं गाव, तानपुर्यांचं गाव. तिथे करीमखासाहेबांची समाधी आहे, तिथेही मी अण्णांचं, गंगुबाईंचं गाणं ऐकलं आहे.. मिरज ही आम्हा किराणावाल्यांची पंढरी! :)
तिथून जवळच असलेल्या वाडीच्या बासुंदीत मला दत्तगुरू दिसले आहेत.. काय सांगू अन् किती लिहू? सध्या आपला टाईम खराब आहे साला! :)
जयतीर्थही चांगला गातो.. अण्णांच्या गाण्याचा, विशेष करून तानांचा प्रभाव आहे त्याच्यावर..माझ्या माहितीप्रमाणे हल्ली तो गोव्याला पणजी रेडियोत नौकरी करतो..
तात्या.
28 Jun 2010 - 6:23 pm | आनंद घारे
यमन हा शब्द ऐकण्यापूर्वीपासून ऐकत आलो आहे. कर्नाटकात तर हे पद लोकप्रिय आहेच, पण तामिळनाडूमधल्या भरतनाट्यमचा या गाण्यावरील हावभावासह आविष्कार पाहिला आहे. हा लेख आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रियांमधून मिळालेल्या दुव्यांबद्दल आभार.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
28 Jun 2010 - 6:45 pm | घाटावरचे भट
छान प्रकटन!!
28 Jun 2010 - 6:47 pm | निखिल देशपांडे
ते रिमिक्स एकले होते..
तेव्हा आवडले पण होते...
आता तुम्ही दिलेले रसग्रहण पण आवडले..
एकदा सगळ्या धवनीफिती एकुन बघतो...
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
28 Jun 2010 - 7:05 pm | यशोधरा
केवळ!
28 Jun 2010 - 7:10 pm | विसोबा खेचर
केवळ काय?
केवळ अप्रतिम?, केवळ वाईट?, केवळ संग्राह्य?, केवळ टाकाऊ? की केवळ अन्य काही?
केवळ काय? :)
28 Jun 2010 - 7:36 pm | पार्टनर
स्वर्गीय आवाज आणि गाणंदेखिल !
बरेच वेळा ऐकलं ..
-- पार्टनर
28 Jun 2010 - 8:18 pm | अरुंधती
लहानपणापासून मी हे गाणं सुब्बलक्ष्मींच्या आवाजात ऐकलं आहे.... तेव्हाच ते खूप आवडायचं, त्याचा अर्थ अजिबात कळायचा नाही, पण ती चाल, ते मोहक शब्द, सूर आणि सुब्बलक्ष्मीच्या गानमुद्रांनी त्या गाण्याचे स्थान मनात अलगद जपून ठेवले. पुढे हरिहरनचे फ्यूजन ऐकले, तेही विलक्षण आवडले.
येशूदास यांनी गायलेले गाणे यूट्यूबवर http://www.youtube.com/watch?v=zhNpqi7qRiE&feature=related येथे ऐका.
भाग्यदा लक्ष्मी बारम्मा ही शुक्रवारची देवीची आरती भीमसेनजींनी वेगळ्या चालीत म्हटली आहे. मला नेहमीची पारंपारिक आरतीची चाल व शब्द ठाऊक आहेत. आपल्याकडे कसे आरतीतले शब्द आणि उच्चार घरागणिक बदलतात, तसेच ह्या आरतीचेही आहे! मी सत्संगमध्ये ही पारंपारिक आरती खूप वेळा गायली आहे आणि तिची नादमयता, गेयता लोकांना विलक्षण भावून जाते असा अनुभव आहे! आणि मला खास कन्नड हेल काढून ही आरती म्हणायला फार मजा येते. प्रसन्न व भक्तिमधुर आरती गीत! :-)
इतक्या सुंदर गाण्यांना लेखबध्द केल्याबद्दल धन्यवाद! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
28 Jun 2010 - 9:29 pm | स्वाती दिनेश
सुरेल रसग्रहण!
स्वाती
28 Jun 2010 - 10:59 pm | रेवती
मस्त! आत्ताच ऐकलं.
चित्राबाईंचा आवाज फार गोड आहे.
बाकी गाण्यातलं काहीच कळलं नाही.
कानडी माझी पितृभाषा असूनही मला येत नाही.
रेवती
29 Jun 2010 - 9:57 am | आंबोळी
खल्लास!!!
साला रागाबीगाविषयी लिहावं बोलावं ते आपल्या तात्यानेच!
अवांतरः काल दिलेली हिच प्रतिक्रीया उडाली म्हणून आज परत देत आहे. मिपाचे बांधकाम सुरू आहे. त्या गडबडीत चुकून उडाली असेल अशी मनाचे समजूत करून घेतलेली आहे.
आंबोळी
30 Jun 2010 - 4:19 pm | विसोबा खेचर
प्रतिसादकर्त्या सार्या रसिकवरांचे आभार.. :)