पुस्तक परिचय : "आत्मा ते जनुक"

मुक्तसुनीत's picture
मुक्तसुनीत in जनातलं, मनातलं
22 Jun 2010 - 8:43 am

मराठी भाषेच्या एकंदर स्थितीचा विचार करताना ज्ञानाच्या निरनिराळ्या शाखांमधला गहन आशय सोप्या भाषेत परंतु विषयाची यथायोग्य ओळख करून देणार्‍या पुस्तकांच्या अभावाचा उल्लेख येतो. इंग्रजीच्या तुलनेमधे या गोष्टीमधे नक्की तथ्य आहे; परंतु त्याचवेळी जे काम चालले आहे त्याचा वेधसुद्धा घेणे महत्त्वाचेच.

मराठीमधे अर्थातच अशा प्रकारचे लिखाण होत असते. थोडा शोध घेतला तर आपल्याला जाणवते की अशा प्रकारच्या लिखाणाला आता मराठीमधे बाजारपेठही चांगली आहे. विविध प्रदर्शनांमधे, पुस्तकांच्या दुकानांमधे अशा पुस्तकांना ग्राहकवर्ग मिळताना दिसतो.

आज या प्रकारच्याच एका पुस्तकाची ओळख करून द्यावी म्हणतो.

आज ज्याला आधुनिक वैद्यक मानले जाते त्याचा ज्ञात इतिहास सुमारे अडीच हजार वर्षांचा आहे. विविध संस्कृतींमधे वेगवेगळ्या टप्प्यांमधे कायकाय नि कसकशी प्रगती झाली, त्यात महत्त्वाचे टप्पे काय होते, ज्ञानाची प्रगती कसकशी झाली , त्यात काय अडथळे आले, हा सगळा अर्थातच एका नव्हे तर अनेक खंडांच्या आवाक्यात आरामात बसेल इतका गहन आणि विस्तृत असा विषय आहे. विविध भाषांमधे अनेक ज्ञानकोष या विषयाला वाहिलेत.

डॉ. चंद्रकांत वागळे यांनी लिहिलेल्या "आत्मा ते जनुक" या पुस्तकाचा विषय ढोबळ मानाने हाच आहे. अनेक शतकांच्या इतिहासातले महत्त्वाचे टप्पे थोडक्यात दाखवल्यामुळे , या छोट्याशा पुस्तकाला एका नकाशाचे स्वरूप आलेले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे , ज्ञानाच्या या ब्रह्मांडाचे दर्शन या पुस्तकरूपी पिंडात करताना, त्यांनी एक महत्त्वाचे सूत्र राखलेले आहे. आणि सगळा प्रवास या सूत्राने होतो. कोणते बरे हे सूत्र ?

मानवजातीच्या प्रगतीचा वेध घेताना सामान्यतः असे मानले जाते की, माणसाला निसर्गातल्या गोष्टींचे कुतुहल होते. ज्ञानविज्ञानाच्या प्रगतीमागे या कुतुहलाचा मोठा भाग होता आणि आहे. निसर्गातल्या घटनांमागची मीमांसा जोवर करणे शक्य नव्हते, त्यामागची कारणे जोवर अज्ञात होती तोवर त्याना परमेश्वराचे स्वरूप देण्यात आले. सजीवत्व हा देखील या कुतुहलाचाच विषय होता. या सजीवत्वाच्या, चेतनेच्याबद्दलच्या चिंतनातूनच "आत्मा" ही संकल्पना अस्तित्वात आली. विसाव्या शतकात जनुकांचा शोध लागेपर्यंत, सजीवत्त्वाचा शोध चालूच होता, मात्र त्याला स्वरूप होते तत्वज्ञानविषयक संकल्पनांचे. जनुकांच्या शोधाने सचेतनत्वाचे कोडे उलगडले आणि काही विशिष्ट परिस्थितीत काही प्रोटीन्स आणि न्युक्लिक अ‍ॅसिड्स या दोन अचेतन रासायनिक द्रव्यांमधून सचेतन जीवसृष्टीची निर्मिती होऊ शकते हे सिद्ध झाले. म्हणजे जडतत्वापासूनच सजीवत्व निर्माण होते हे पुराव्याच्या आधारे सिद्ध झाले. शतकानुशतके विचारांची घुसळण चालू असलेल्या एका अतिशय अ‍ॅबस्ट्रॅक्ट संकल्पनेचे रूपांतर काँक्रीट स्वरूपी सिद्धतेपर्यंत कसा झाला याचा हे पुस्तक वेध घेते.

विषयाची व्याप्ती घेता , पुस्तक २०० पानी म्हणजे अगदीच टीचभर मानायला हवे. मात्र लेखकाने केलेला सम्यक अभ्यास, हे पुस्तक सादर करत असताना नेमके काय मांडायचे आहे याचे त्याने ठेवलेले भान , आणि महत्त्वाच्या टप्प्यांबद्दल , निर्णायक शोधांबद्दल दिलेली नेमकी माहिती या मुळे या प्रदीर्घ प्रवासाच्या नकाशाने आपले काम अचूक बजावलेले आहे.

हिप्पोक्रीटसच्या शपथेपासून जो प्रवास सुरू होतो तो वेसालिअसच्या पहिल्यावहिल्या शरीरशास्त्रीय अभ्यासाला , दुसर्‍या शतकात गॅलेनने मांडलेल्या रक्ताभिसरणाच्या संकल्पनेला गवसणी घालतो. आणि इथे सगळ्यात आश्चर्यकारक भाग येतो. तिसर्‍या शतकात गॅलनने जी थिअरी मांडली त्यात "शरीरात रक्त वहाते" इतकाच भाग बरोबर होता. बाकी सगळे अंदाजपंचे असल्याने चुकीचेच होते. गॅलनच्या या थिअरीला उलथून लावण्याकरता १६वे शतक उजाडावे लागले ! १६ ते १९वे शतक केवळ अ‍ॅनाटॉमीचा अभ्यास चालू होता. या सगळ्यादरम्यान शवविच्छेदनावरील बंदीमुळे अनेक शतके अंधारातच गेली. त्यानंतर मात्र पाश्चात्य जगतात प्रयोग-नीरीक्षणे-संशोधन- सिद्धांत मांडणी या प्रक्रियेला वेग येत गेला. विल्यम हार्वे, मॉरग्ननी यांनी रक्ताभिसरणाचे रहस्य उलगडले. फर्को नावाच्या जर्मन संशोधकाने पेशीचा सिद्धांत मांडला. सूक्ष्मदर्शक यंत्रे जन्माला आली. लुई पाश्चर ने सूक्ष्मजीवांचे अस्तित्व सप्र्योग सिद्ध केले , रेबीज वरची लस शोधून काढली. क्षयजंतूंवर संशोधन झाले. लिस्टरने निर्जंतुकीकरण शोधल्याने शस्त्रक्रिया विकसित व्हायला महत्त्वाचे वळण मिळाले स्टेथोस्कोप अस्तित्त्वात आले. हे सर्व होता होता वेदनाहरण करणार्‍या क्लोरोफॉर्मचा, पहिल्या इसीजीचा शोध लागला. भौतिकशास्त्रज्ञानी क्ष किरणाअंसारख्या गोष्टींचा शोध लावला. आणि पेनिसिलीन आणि अन्य अँटीबायोटीक्सचे युग अवतरायला , विसावे शतकही उजाडले. फ्रॉईड बाबाने मनोविकारशास्त्रात क्रांती घडवून आणली. मेंडेलसारख्या संशोधकांमुळे आनुवांशिकतेचे रहस्य उलगडण्याला सुरवात झाली आणि जनुकांचे युग अवतरले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात , डीएने सारख्या संकल्पनांचे अस्तित्त्व सिद्ध झाले आणि ह्युमन जीनोम पर्यंत जेनेटीक एंजिनियरींग येऊन पोचले.

हे सगळे संक्षिप्त आहे, अगदी थोडक्यात आहे, परंतु अत्यंत रोचक रीतीने मांडलेले आहे. अक्षंड परिश्रम, प्रयोग, संशोधनाला आयुष्याचे मिशन बनवून केलेले काम या सार्‍यामुळे आपल्या सर्वांचे जीवनमान वाढायला , आपले आयुष्य वेदनारहित करायला , सुखकर बनवायला कसकशी क्रमाक्रमाने प्रगती झाली हे सारे उत्तम रीतीने मांडलेले आहेच. पण त्याचबरोबर केवळ मनन-चिंतनाच्या पातळीवर असलेल्या सचेतनत्वाच्या संकल्पनेचा प्रवास तत्वज्ञानाचय ग्रंथांमधून , धर्मग्रंथांच्या नि धर्मपीठांच्या कचाट्यातून , प्रयोगशाळॅपर्यंत आणि संशोधनसिद्ध काँक्रिट पुराव्यांपर्यंत कसा झाला हे अतिशय उद्बोधक आहे.

हे पुस्तक सर्वव्यापी नाही, सगळे आवाक्यात घेणारे नाही. त्याचा तसा दावाही नाही. मात्र हा एक उत्तम आरंभबिंदू आहे.

शीर्षक : आत्मा ते जनुक
लेखक : डॉ. चंद्रकांत वागळे.
प्रकाशन : पॉप्युलर
पृष्ठे : २२०.
किंमत : रु २१०

औषधोपचारइतिहासतंत्रविज्ञानआस्वाद

प्रतिक्रिया

सहज's picture

22 Jun 2010 - 10:08 am | सहज

पुस्तकाच्या शेवटी भविष्यातल्या काही शोधांवर प्रकाश टाकला आहे काय?

एकंदर पुस्तक रोचक दिसते आहे.

यावरुन आठवले, नाटक्यासाहेबांच्या पुस्तकाचे काय झाले?

मुक्तसुनीत's picture

23 Jun 2010 - 7:42 am | मुक्तसुनीत

नाही, पुस्तक डीएनए-ह्युमन जिनोम प्रोजेक्ट पर्यंत येऊन थांबते. पुस्तकातले ज्ञान अद्ययावत नाही, काहीसे स्केची आहे असेही म्हणता येईल. परंतु मला त्यात जाणवलेले सौंदर्य हे चैतन्यत्वाकडून जडत्वाकडच्या प्रवासाच्या उत्कृष्ट , मार्मिक चित्रणात जाणवले.

युयुत्सु's picture

22 Jun 2010 - 10:15 am | युयुत्सु

पुस्तकाचा संदेश काय आहे? आणि हो, काँक्रिट पुराव्यांपर्यंत = भक्कम पुराव्यांपर्यंत

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

मदनबाण's picture

22 Jun 2010 - 10:21 am | मदनबाण

पुस्तक परिचय आवडला...

मदनबाण.....

"Life is like an onion; you peel it off one layer at a time, and sometimes you weep."
Carl Sandburg

राजेश घासकडवी's picture

22 Jun 2010 - 12:17 pm | राजेश घासकडवी

पुस्तकाचं नाव वाचून थोडा गोंधळ झाला कारण reductionist विचारांप्रमाणे जनुकांपासून आत्मा कसा होऊ शकतो हा प्रवास अपेक्षित होता. थोडं वाचल्यानंतर तो संकल्पनांचा प्रवास आहे हे कळलं.

इतक्या क्लिष्ट विषयाची ओळख करून देणंही सोपं नाही. एकंदरीत लेखक यशस्वी झाला आहे असं दिसतं. वाचायला पाहिजे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Jun 2010 - 12:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुस्तक वाचण्याची उत्सुकता, या परिचयामुळे, निर्माण झाली आहे.

अदिती

श्रावण मोडक's picture

22 Jun 2010 - 6:30 pm | श्रावण मोडक

+२

मुक्तसुनीत's picture

23 Jun 2010 - 7:43 am | मुक्तसुनीत

reductionist विचारांप्रमाणे जनुकांपासून आत्मा कसा होऊ शकतो हा प्रवास अपेक्षित होता.

reductionist विचारसरणी म्हणजे काय ? त्यानुसार हा उलटा प्रवास कसा सिद्ध करता येईल ?

राजेश घासकडवी's picture

23 Jun 2010 - 8:55 am | राजेश घासकडवी

जगात आपल्याला अनेक अगम्य गोष्टी दिसतात. त्या कशा कार्य करतात हे माहीत नसतं. त्यांना आपण ब्लॅक बॉक्स म्हणू. reductionist विचारसरणी म्हणजे एखादा ब्लॅक बॉक्स उघडून त्यातले इतर ब्लॅक बॉक्स उघडून बघून शेवटी मूलभूत तत्वं शोधून काढणं. उदाहरणार्थ शरीराकडे बधू - ते विविध प्रकारच्या पेशींनी बनलं आहे. प्रत्येक पेशीचं कार्य बायोकेमिस्ट्रीतून समजतं. बायोकेमिस्ट्री ही केमिस्ट्रीची शाखा, तर केमिकल गुणधर्म हे शेवटी भौतिकशास्त्राच्या अणू-रेणूंच्या गुणधर्मावर आधारित आहे. त्यामुळे एकदा भौतिकी गुणधर्म माहीत असले की त्यावर आधरित शरीर कसं चालतं हे उत्तर देता येतं.

संशोधनाचा प्रवास हा वरपासून खालपर्यंत होतो. तर त्यातून सापडणारं उत्तर हे पायापासून कळसापर्यंत जातं.

मुक्तसुनीत's picture

23 Jun 2010 - 9:08 am | मुक्तसुनीत

व्याख्येबद्दल आभार.

"आधी कळस मग पाया" च्या निमित्ताने एक योगायोग सांगतो : प्रस्तुत पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणातली वाक्ये व्हर्बॅटीम अशी आहेत :

'आधी कळस मग पाया' अशा पद्धतीने प्रारंभ झालेली विज्ञानातली एकमेव शाखा म्हणजे वैद्यक. उपचार म्हणजे वैद्यकाचा कळस. वैद्यकाची सुरवात उपचारांनी झाली. शरीररचना आणि शरीरक्रिया हे वैद्यकाचे पायाभूत विषय. या दोन विषयांचा अभ्यास सोळाव्या शतकापासून सुरु झाला...

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Jun 2010 - 4:43 pm | बिपिन कार्यकर्ते

ओळख उत्तम करून दिली आहे. पुस्तक चांगले वाटते आहे.

बिपिन कार्यकर्ते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jun 2010 - 6:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>ओळख उत्तम करून दिली आहे. पुस्तक चांगले वाटते आहे

अवांतर : सध्या गणेश आवटे यांची 'भिरुड’ कादंबरी वाचतोय.

-दिलीप बिरुटे

धनंजय's picture

23 Jun 2010 - 3:15 am | धनंजय

चांगला आढावा घेतलेला आहे.

सुनील's picture

23 Jun 2010 - 7:20 am | सुनील

पुस्तकाचा सुरेख परिचय.

पुस्तकात फक्त पाश्चिमात्य घडामोडींचाच आढावा घेतला गेला आहे की चरक-सुश्रुत आदींचेही उल्लेख आहेत?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मुक्तसुनीत's picture

23 Jun 2010 - 7:47 am | मुक्तसुनीत

पुस्तकात सुश्रुत/चरक यांचे उल्लेख आहेत. सुश्रुताने केलेल्या सुघटनशस्त्रक्रिया (प्लास्टीक सर्जरी ?) चे वर्णन आहे. मात्र, यासंदर्भातल्या दस्तावेजीकरणाचा अभाव पुस्तकात नोंदवला गेलेला आहे.

सन्जोप राव's picture

23 Jun 2010 - 11:25 am | सन्जोप राव

पुस्तक परिचय आवडला. आत्मा आणि जनुके या दोन्ही विषयांवरील चर्चेत हात पोळले असूनही पुस्तक वाचावेसे वाटत आहे. हे सध्या तरी परीक्षणाचे यश म्हणावेसे वाटते.
जाता जाता: मुक्तसुनीत यांचे लेखन हे असे स्वयंप्रकाशित असताना त्यांनी 'लंबोदर पीतांबर फणिवर वंदना' असे म्हणत इतरांची तबके उचलावीत हे खरोखर रोचक आहे. मुसुंनी खरे तर फक्त स्वतःचे लिखाण प्रकाशित करावे. इतर लिखाणावर प्रतिसादही देऊ नयेत.प्रत्येक प्रतिसादामागे एक आरती उचलणारा अदृष्य हात असतो म्हणे!
सन्जोप राव
ठोकर ना लगाना हम खुद है
गिरती हुई दीवारों की तरह

चतुरंग's picture

23 Jun 2010 - 10:14 pm | चतुरंग

पुस्तकाचा विषय उत्सुकता चाळवणारा आहे.
जडापासून चैतन्यापर्यंतचा प्रवास कसा झाला असावा ही माणसाची अदिम उत्सुकता असावी.

मागे एकदा कुठल्याशा लेखात चैतन्याचे स्पष्टीकरण देताना एक दाखला दिलेला आठवला - संवेदना ग्रहण करणारी इंद्रिये, म्हणजे ज्ञानेंद्रिये, त्यांचे काम चैतन्याच्या अभावी करु शकत नाहीत. म्हणजे कसे? तर डोळे उघडे आहेत त्यावर समोरच्या दृश्याची प्रतिमा तयार होते ती मेंदूपर्यंत जाते 'दिसणे' ही जैवरासायनिक प्रक्रिया ह्या पातळीवर पूर्ण होते परंतु बघणार्‍या व्यक्तीचे चित्त थार्‍यावर नसले तर 'दिसल्या'ची 'जाणीव' होत नाही, काहीतरी दिसले आहे ह्याची नोंद मेंदू करत नाही असा अनुभव आपल्याला अनेकदा आला असेल. आपण त्या व्यक्तीला म्हणतो सुद्धा "अरे काय रे तुझं लक्ष दिसत नाहीये" किंवा चित्त थार्‍यावर नाहीये" किंवा आपणच ती व्यक्ती असलो तर सांगतो "मी बघत होतो पण अरेच्या अमूक तमूक कधी झालं मला समजलंच नाही."
सांगायचा मुद्दा असा की केवळ भौतिक, रासायनिक प्रक्रियांचा शोध लागला तरी संवेदनांची संपूर्ण प्रक्रिया समजण्यामागे अजून दोन अंगुळे काही शिल्लक राहते की काय असे वाटते.

चतुरंग

अक्षय पुर्णपात्रे's picture

24 Jun 2010 - 1:17 am | अक्षय पुर्णपात्रे

पुस्तक वाचावेसे वाटत आहे.

नंदन's picture

24 Jun 2010 - 10:21 am | नंदन

पुस्तकपरिचय.

मराठी भाषेच्या एकंदर स्थितीचा विचार करताना ज्ञानाच्या निरनिराळ्या शाखांमधला गहन आशय सोप्या भाषेत परंतु विषयाची यथायोग्य ओळख करून देणार्‍या पुस्तकांच्या अभावाचा उल्लेख येतो. इंग्रजीच्या तुलनेमधे या गोष्टीमधे नक्की तथ्य आहे; परंतु त्याचवेळी जे काम चालले आहे त्याचा वेधसुद्धा घेणे महत्त्वाचेच.

--- सहमत आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी