कालच एक कविता ऐकण्यात / पाहण्यात आली. मूळ हिंदी असलेल्या या कवितेचं कवी नारायण सुर्वे यांनी मराठी रुपांतर केलं...ही जितेंद्र जोशीने एका कार्यक्रमात सादर केली होती.
तो एकदा सातार्याला एका भटक्या विमुक्त मुलांसाठीच्या शाळेत गेला असताना एका मुलाने ही कविता त्याला ऐकवली... :)
हंबरून वासराले चाटते जवा गाय,
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय
रे हंबरून वासराले ...
आया बाया सांगत व्हत्या, व्हतो जवा तान्हा,
दुस्काळात मायेच्या माझ्या आटला व्हता पान्हा,
पिठामंदी..... पिठामंदी
पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय ...
तवा मले पिठामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..
रे हंबरून वासराले...
कण्या काट्या वेचायला माय जाइ राणी,
पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवानी,
काट्या कुट्या ......रं काट्या कुट्या
काट्याकुट्यालाही तीचं मानत नसे पाय,
तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय...
रे हंबरून वासराले...
बाप माझा रोज लावी, मायेच्या मागे टुमन,
बास झालं शिक्षाण आता, घेवुदे हाती काम,
आग शिकून शान .....ग शिकून शान.....
शिकून शान कुठ मोठा मास्तर व्हनार हायं...
तवा मले मास्तरमंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय.....
रे हंबरून वासराले.....
दारू पिवून मायेला मारी जवा माझा बाप,
थरथर कापे अन, लागे तीले धाप,
कसा ह्याच्या .......रं कसा ह्याच्या....
कसाह्याच्या दावणीला बांधली जशी गाय,
तवा मले गायीमंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय.....
रे हंबरून वासराले...
नं बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी,
सांग म्हणे राजा तुझी कवा दिसल राणी,
न भरल्या डोळ्यान ............न भरल्या डोळ्यान,
भरल्या डोळ्यान कवा पाहिल दुधावर् चि सायं,
तवा मले दुधामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........
रे हंबरून वासराले....
गो म्हणून म्हणतो आनंदान भरावी तुझी वटी
पुन्हा एकदा जनम घ्यावा ग माये तुझ्या पोटी,
तुझ्या चरणी......गं तुझ्या चरणी,
तुझ्या चरणी ठेवून माथा धराव तुझ पाय,
तवा मले पायामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........
हंबरून वासराले चाटते जवा गाय,
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय
रे हंबरून वासराले.....
- अस्मिता
प्रतिक्रिया
17 Jun 2010 - 10:39 am | सागर
सुंदर कविता... कंठ दाटून आला
एवढ्या सुंदर आणि सरळ हृदयाला हात घालणार्या कवितेची स्तुती करायला शब्दच नाहीत. कवितेचा प्रत्येक शब्दन् शब्द काळजाला हात घालतो.
गदगदून आले एवढेच म्हणेन
एवढी सुंदर कविता सर्वांना उपलब्ध करुन दिल्याबद्दल मधुमती तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभारही ...
(आईप्रेमी) सागर
17 Jun 2010 - 2:19 pm | पांथस्थ
अगदि असेच म्हणतो.
- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
17 Jun 2010 - 8:28 pm | रामपुरी
मूळ हिंदी कविता कुणाला माहीत आहे काय?
17 Jun 2010 - 11:26 am | स्मिता_१३
छान कविता!
स्मिता
17 Jun 2010 - 12:47 pm | नील_गंधार
केवळ अशक्य
फार फार गहिवरून आलेय.
निशःब्द झालो.
कविला मनापासून सलाम.
नील.
17 Jun 2010 - 3:17 pm | पंकज
17 Jun 2010 - 3:29 pm | अस्मी
मी वर दुवा दिला आहे..पण मला असा डायरेक्ट YouTube चा नाही देता आला
:(
- अस्मिता
17 Jun 2010 - 3:49 pm | जागु
अप्रतिम.
17 Jun 2010 - 3:59 pm | मेघवेडा
जितेन्द्र जोशीने जेव्हा ही कविता ऐकवली होती तेव्हाही अंगावर काटा आला होता आणि आज पुन्हा वाचतानाही आला! केवळ अप्रतिम!
17 Jun 2010 - 3:59 pm | मेघवेडा
जितेन्द्र जोशीने जेव्हा ही कविता ऐकवली होती तेव्हाही अंगावर काटा आला होता आणि आज पुन्हा वाचतानाही आला! केवळ अप्रतिम!
17 Jun 2010 - 5:56 pm | प्रमोद्_पुणे
केवळ अप्रतिम..
17 Jun 2010 - 6:04 pm | मीनल
हाय क्लास भावना, छान कविता आणि साधेसे सादरीकरण.
अप्रतिम.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
17 Jun 2010 - 10:38 pm | सुनिल पाटकर
हि मूळ हिंदी कविता नाही स.द.पाचपोळ (रा. हिंगोली) याची ही कविता आहे.तिचे नाव माय असे आहे.
18 Jun 2010 - 6:51 am | पाषाणभेद
असे असेल तर धाग्याच्या लेखनात दुरूस्ती केली जावी ही मी लेखिकेला विनंती करतो.
बाकी ही कविता मोबाईलवर बरीच हस्तांतरीत झालेली आहे. आधीही ऐकली होती. स.द.पाचपोळ (रा. हिंगोली) यांचे आभार!

मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
18 Jun 2010 - 12:02 pm | सुमीत भातखंडे
सुंदर.
शब्द नाहीत.
18 Jun 2010 - 1:29 pm | नंदन
कविता. येथे दिल्याबद्दल अनेक आभार. नारायण सुर्वे यांचीच अजून एक कविता आहे. जन्म दिला नसला तरी आईची माया देणार्या त्यांच्या मातेबद्दलच्या त्या कवितेच्या शेवटच्या ओळी - 'आधीचे नव्हतेच काही, आता आईदेखील नाही' आठवल्या.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
18 Jun 2010 - 10:55 pm | चतुरंग
पोरक्या जिवाला जीव लावून वाढवणार्या आईबापांबद्दल सुर्व्यांच्या मनात काय भाव असतील ते समजते!
(साश्रू)चतुरंग
27 Nov 2010 - 9:33 am | अस्मी
तुम्ही म्हणताय ती कविता ही आहे का?
माझी आई
जेव्हा तारे विझू लागत
उंच भोंगे वाजू लागत
पोंग्याच्या दिशेने वळत
रोज दिंडय़ा जात चालत
झपाझप उचलीत पाय
मागे वळून बघीत जाय
ममतेने जाई सांगत
नका बसू कुणाशी भांडत
वर दोन पैसे मिळत.
दसऱ्याच्या आदल्या दिनी
जाई पाचांसह घेऊनी
फिरू आम्ही आरास बघत
साऱ्या खात्यांतून हुंदडत
किती मज्जा म्हणून सांगू
शब्दसाठे झालेत पंगू
भिंगऱ्या पेपेटे घेऊन
फुग्यांचे पतंग झोकून
जात असू पक्षी होऊन.
एक दिवस काय झाले
तिला गाडीतून आणले
होते तिचे उघडे डोळे
तोंडातून रक्त भळभळे
जोडीवालीण तिची साळू
जवळ घेत म्हणाली बाळू
मिटीमिटी पाहात होतो
माझे छत्र शोधीत होतो
आम्ही आई शोधीत होतो.
त्याच रात्री आम्ही पाचांनी
एकमेकांस बिलगूनी
आईची मायाच समजून
घेतली चादर ओढून
आधीचे नव्हतेच काही
आता आईदेखील नाही
अश्रूंना घालीत अडसर
जागत होतो रात्रभर
झालो पुरते कलंदर.
- नारायण सुर्वे.
18 Jun 2010 - 7:41 pm | शुचि
कवितेतील भवना तर सुंदर आहेतच. पण भाषेचं माधुर्य काय आहे !!!
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
18 Jun 2010 - 10:31 pm | मदनबाण
सुंदर...
आई सारखे दैवत सार्या जगतामध्ये नाही. :)
मदनबाण.....
A truly strong person does not need the approval of others any more than a lion needs the approval of sheep.
Vernon Howard
18 Jun 2010 - 10:57 pm | चतुरंग
बहिणाबाईच्या कविता ज्या बोलीत आहेत ती.
अतिशय सुंदर कविता दिल्याबद्दल तुमचे कौतुक वाटते मधुमती. तुमचे शतशः आभार!
चतुरंग
19 Jun 2010 - 8:38 am | पाषाणभेद
मुळ कविबद्दल कोणास जास्त माहिती असली तर द्यावी. कविच्या नावाबद्दल गोंधळ आहे.
मुळ कर्त्या कविला श्रेय मिळालेच पाहिजे!
मुळ कवि झिंदाबाद!
कार्यकर्ता,
महाराष्ट्र नवनिर्माण कविसेना
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
19 Jun 2010 - 8:41 am | पाषाणभेद
मुळ कविबद्दल कोणास जास्त माहिती असली तर द्यावी. कविच्या नावाबद्दल गोंधळ आहे.
मुळ कर्त्या कविला श्रेय मिळालेच पाहिजे!
मुळ कवि झिंदाबाद!
कार्यकर्ता,
महाराष्ट्र नवनिर्माण कविसेना
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
21 Aug 2010 - 12:27 am | अविनाश कदम
हे मुळ गाणे हिंदीतून नारायण सुर्वे यांनी अनुवादीत केलेले आहे ही माहीती चुकीची आहे. गीत सादर करतांना गायक जितेंद्र जोशी यांनी गीताच्या मूळाविषयी शहानिशा करायला हवी होती. (कदाचित नारायण सुर्वेंचं नाव घेतल्यावर गाण्याचे महत्त्व वाढेल असे त्यांना वाटले असावे) हे गाणे मराठवाड्यातील एका कवीचे आहे. त्याचे नाव पाचपोळ आहे. जितेद्र जोशी यांनी ज्या चालीत हे गाणे गायले तीच चाल गाण्याला लावून “विद्रोही शाहीरी जलसा” या कलापथकाने डिसेंबर २००५ मध्ये धुळे येथे झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनात हे गाणे सादर केले होते. त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रातील पुरोगामी कलापथके व कलाकारांमध्ये हे गाणे अत्यंत लोकप्रिय झालेले आहे. त्यामुळे सातार्यातील शाळेत एका मुलाकडून हे गाणे त्यांनी ऐकले हे खरे असावे. पण जितेंद्र जोशी यांनी गायलेल्या गाण्यात मुळ गाण्याच्या शब्दांमध्ये/रचनेमध्ये बदल करून ते जास्तच ”शुद्ध” करून घेतलेले दिसते. मुळ गाण्याचे शब्द असे आहेत.
हंबरून वासराले चाटते जवा गाय
तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय......।।धृ।।
आया बाया सांगत्याती जवा मी व्हतो तान्हा
दुष्कळाच्या साली व्हता आटला मायचा पान्हा
पिठमंदी मिसळून पाणी पाजित मले जाय
तवा मले पिठामंदी दिसते माझी माय...... ।। १।।
सुटीमध्ये मी जवा येत असे घरी
उसनं पासनं आणून घाली खाऊ नाना परी
करू नको घाई, पोट भरून खाईत जाय
तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय.......।।२।।
.............................................................
बाप माझा रोज लावी, मायेच्या मागे टुमनं,
बास झालं शिक्षाण आता, घेवुदे हाती रुमनं
शिकून शानी कुठ मोठा मास्तर व्हनार हायं...
तवा मले मास्तरमंदी दिसते माझी माय.......।।
दारू पिवून मायला जवा मारी मया बाप,
थरथर कापे माय अन, लागे तीले धाप
कसाबाच्या दावनीला बांधली जशी गाय,
तवा मले गायीमंदी दिसते माझी माय...........।।
...................................................................
म्हनून वाटतं आनंदानं भरावी तुझी वटी
पुन्या यकदा जनम घ्यावा माय तुज्या पोटी
तुझ्या चरनी ठेवून माथा धरावं तुजं पाय.
तवा मले कष्टणारी दिसते माझी माय........ ।।
--अविनाश कदम,मुंबई
21 Aug 2010 - 6:46 am | कुक
आई ज्या कवितेमध्ये आहे त्या कवितेच्या उत्तम ते बद्दल वादच नाही.
मनाला भावली