मै हूं जयपूरकी बंजारन्...चंचल मेरा नाम ....
स्व. रफीसाहेबांच्या अनेक गाण्यांपैकी एक सुरेल गीत. १९४७ साली, म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्या वर्षी आलेल्या "साजन" मधील हे गीत. सी. रामचंद्र उर्फ आण्णांचे कर्णमधुर संगीत , कमर जलालाबादींचे शब्द आणि या गाण्यात रफीसाहेबांबरोबर गाणारी गायिका होती ललिता देऊळकर! याच चित्रपटातील अजुन एक गाजलेले गीत म्हणजे....
"संभल संभल के जैय्यो ओ बंजारे.... के दिल्ली दूर है...........!"
या गाण्यातदेखील रफीसाहेबांबरोबर ललिता देउळकर आणि गीता रॉय या गायिका होत्या. तसेच १९४८ साली आलेल्या "नदिया के पार" (राजश्रीचा नव्हे, या चित्रपटात दिलीप कुमार आणि कामिनी कौशल होते) मध्ये देखील चितळकर आण्णांच्या संगिताने सजलेली दोन गाणी ललिताताईंनी गायलेली होती.
मोरे राजा हो ले चल नदिया के पार
आणि ... शहीद या चित्रपटातलं गाणं "बचपन की याद धीरे धीरे प्यार बन गयी" ललिताताईंनी गायले होते. या गाण्यांनी ललिताताईंना खर्या अर्थाने भारतीय संगीत क्षेत्रात ओळख मिळवून दिली.
तशी ललिताताईंनी गायलेल्या गाण्यांची लिस्ट फार मोठी नसली तरी लक्षात ठेवण्यासारखी निश्चितच आहे. त्याकाळच्या बहुतेक ख्यातनाम संगीतकारांकडे त्या गायल्या आहेत.
उदा. खेमचंद प्रकाश (आया रे आय रे आया रे सावन देखो : सावन आया रे : राम मुर्ती चतुर्वेदी)
सी. रामचंद्र(खिडकी मधलं ऐ हो सावरिया,नदिया के पारचंच दिल लेके भागा दगा देके भागा, झांझर मधली काही गाणी, गर्ल्स स्कुल मधलं एक तरफ है जगत का बंधन, रोशनी मधलं जिया चाहे की उड जाये हम, साजन मधलंच किसको सुनाये हाले दिल)
सचिनदेव बर्मन (शबनम मधलं हम किसको सुनाये हाल ये दुनिया पैसेकी)
आणि अर्थातच स्वत: बाबुजी उर्फ़ स्व. सुधीर फडके यांच्यासाठी गायलेली जय भिम या चित्रपटातली "हम दोनो पंछी उड जा रहे है एक दिशा कि ओर" आणि "दिल को दुखिया बनाके आंसु बहां के..." ही दोन गाणी)
अजुनही काही ज्ञात अज्ञात गाणी असतील. आज या सगळ्याची आठवण यायचे कारण म्हणजे काल मंगळवारी त्यांचे पार्ल्यात दीर्घ आजारामुळे निधन झाले. ललिता देऊळकर हे नाव बर्याच जणांसाठी कदाचित अज्ञात असेल पण ललिताबाई फडके हे नाव आपल्याला कुणालाच अज्ञात नाही.
स्व. सुधीर फडके यांच्या पत्नी आणि श्री. श्रीधर फडके यांच्या मातोश्री. मृत्युसमयी त्या ८५ वर्षाच्या होत्या. पार्ल्यातच त्यांच्या पार्थिवावर अंतीम संस्कार करण्यात आले.
मुळ मुंबईकर असलेल्या ललिताताईंनी दत्तोबा तायडे आणि पुरुषोत्तम वालावलकर यांच्याकडे गायनाचे प्राथमिक धडे गिरवले होते. बाबुजींबरोबर लग्न करण्यापुर्वी त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमधून गाणी गायलेली आहेत. मला वाटतं हिंदी संगीत सृष्टीत लताबाईंची एंट्री होण्यापुर्वी एक जमाना गाजवलेल्या त्या पहिल्या मराठी गायिका असतील. सी. रामचंद्र, गुलाम हैदर, एसडी, खेमचंद प्रकाश, बी.एस. हुगन तसेच वसंत देसाईंनी संगीत दिलेल्या "नरसिंह अवतार" या हिंदी चित्रपटासाठी त्या गायल्या होत्या. लग्नानंतरही काही मराठी/हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गाणी म्हंटली आहेत. उदा. सुवासिनी, जशास तसे, उमज पडेल तर, वंशाचा दिवा, मायाबाजार,सौभाग्य, चिमण्यांची शाळा ई. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्व. बाबुजींच्या आयुष्यातील सुवर्णयुग ठरलेल्या गीत रामायणातील कौसल्येच्या तोंडी असलेली सर्व गाणी त्यांनी गायलेली आहेत. नंतर बाबुजींचा संसार सांभाळण्याच्या नादात त्यांचं स्वतःचं गाणं कधी मागं पडलं ते त्यांनाही उमजलं नाही. पण त्याबद्दल त्यांना कधीच खंत नव्हती.
बाबुजींसारख्या महान माणसाचा संसार सावरण्यात त्यांनी आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता मानली. प्रत्येक पावलावर त्या बाबुजींच्या खांद्याला खांदा लावून उभे राहील्या. मग ते त्यांचा संसार सांभाळणे असो, अरुणाचल प्रदेशमधील "लेकी फुन्सुक" ची आई बनणे असो वा दादरा नगर हवेलीचा संग्राम असो त्या नेहमीच खंबीरपणे बाबुजींच्या सोबत राहील्या. काही दिवसांपुर्वी त्या आजारी असताना श्रीधर फडके नेमके अमेरिकेत कुठेतरी होते, तेव्हा फुन्सुक (किं फुन्सो ?) आपल्या या आईसाठी म्हणुन खास पंधरा दिवसाची रजा टाकून तिच्या सेवेत हजर झाला होता.
असं हे प्रेमळ, आतिथ्यशील आणि गायनाचं विलक्षण अंग असलेलं व्यक्तिमत्व काल अनंतात विलीन झालं. त्यांच्या आत्म्यास ईश्वर चिरशांती देवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.
संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील लेखाचा दुवा
विशाल.
प्रतिक्रिया
26 May 2010 - 10:52 pm | रामपुरी
अर्थातच स्वत: बाबुजी उर्फ़ स्व. श्रीधर फडके
??????????
27 May 2010 - 9:23 am | विशाल कुलकर्णी
ती टायपो होती रामपुरी , चुक सुधारलीय. धन्स :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"