इंदूरची भाषा खास इंदूरी आहे. म्हणजे आहे ती हिंदीच पण तिच्यातही बरेच प्रादेशिक रंगही मिसळेले आहेत. त्यामुळे इथली हिंदी उत्तरेतल्या हिंदीपेक्षा काहीशी वेगळी वाटणारी आहे.
म्हणजे कहॉं से आ रहे हो, कहॉं जा रहे हो हे हिंदी रूप इंदूरमध्ये आल्यानंतर मात्र कहॉंसे आ रीया, कहॉं से जा रीया होतं. इथला सामान्य माणूस याच भाषेत बोलतो. हे ऐकताना आपल्याला वेगळं वाटत असलं तरी त्यांना काहीही वाटत नाही. हिंदी भाषक दुसर्या प्रदेशातून आलेल्यांनाही इथलं हिंदी विचित्र वाटतं. कुणीही बोलत असलं की आपण हो किंवा होय असं म्हणतो. इथं 'हाऊ' असं म्हणण्याची प्रथा आहे. स्त्री असो की पुरूष सगळे असंच बोलतात. इथे आल्यानंतर तुम्हाला उद्देशून 'भीय्या' म्हटलं तर 'भ्याव' वाटू देऊ नका. हा भय्या या शब्दाचा इथला खास इंदुरी उच्चार आहे. तेच भौत भूख लगी है असे कुणी म्हटल्यानंतर भूत पाहिल्यासारखे दचकू नका. बहूतला दिलेला हा भौत टच इंदुरी आहे. इंदुरमध्ये पोहे 'भयानक' फेमस आहेत. आपल्याकडे जसा मिसळपाव यत्र तत्र सर्वत्र मिळतो, तसे इथे पोह्यांचे आहे. हे पोहे मागताना 'एक पोहा देना' असं म्हणावं.
आपल्याला कंटाळा येतो तसा इथल्या लोकांना 'कंटाला' येतो. माळवी आणि निमाडी बोलीचाही इंदूरच्या बोलीवर प्रभाव आहे. निमाड हा भाग इंदूरला लागून असलेला त्यामुळे या भाषेचा इथे प्रभाव, तर इंदूर माळव्यातच मोडत असल्याने ती तर इथली स्थानिक भाषा. या सगळ्या मिश्रणाने इथल्या बोलीला एक खास 'टेस्ट' आहे. तुम्हाला शेजारी बसायला जागा पाहिजे असेल तर 'जगो' है क्या असे विचारले गेले तर चमकून पाहू नका. जगहचा 'जगो' हा खास निमाडी बाज आहे.
इथल्या हिंदीची जशी वेगळी चव तशीच मराठीचीही आहे. माळव्यातील मराठी बोली भन्नाट आहे. येथील लोकांच्या मराठी बोलण्यात हिंदी शब्द येणं ही 'आम' बात आहे. येथे लोक छान किंवा मजेत नसतात, तर 'बढिया' असतात. इंदूरमध्ये मराठी भागात पत्ता शोधत असताना 'थोडं पुढे जाऊन डावीकडे 'मुडा' असं ऐकू आलं नाही तर आश्चर्य वाटू देऊ नका. एकारान्ती क्रियापदांची इंदूरी आवृत्ती खाशी आहे. म्हणजे जाईल्ले, करील्ल्ये खाईल्ल्ये, अशी क्रियापदे नीट लक्ष देऊन ऐकली तर ऐकू येतात. जाशील ना, करशील ना या प्रकारच्या अंत्य शब्दांचा वळणदार पण छान वाटणारा उच्चारही येथील लोक करतात. इथल्या मराठी बोलीने हिंदी ताल धरला आहे. म्हणजे नहीं करेंगेच्या तालावर 'नाही करणार' असं म्हटलं जातं. असंच नाही आहेचं, आहे नाही होतं. वास्तविक हे इथे लिहिण्यापेक्षा ते ऐकण्यात मजा आहे.
आणखी एक बाब. इथल्या मराठी घरातील नाती मराठीच आहेत. त्याचे हिंदीकरण वा आंग्लीकरण झालेले मला तरी दिसले नाही. त्यामुळे पप्पा, मम्मी, डॅडीऐवजी शुद्ध, आई, बाबा, काका, काकू, मामा, मामी हेच शब्द येथे वापरात आहेत.
या मराठीला मुंबई, पुण्याचे लोक धेडगुजरी असं म्हणतात. पण ते चुकीचं आहे. इथल्या मराठीवर हिंदीचा प्रभाव अपरिहार्य आहे. उलट माझ्या मते अनेक मराठी कुटुंबाच्या पिढ्या येथे जाऊनही ती मराठी बोलतात, हे विशेष आहे. हिंदीच्या आधाराने का होईना पण मराठी टिकून आहे. इथले मराठी लोक साहित्यातही पुष्कळ आहे. त्यांच्या मराठी लेखनातही हिंदी शब्द असतात. मला त्याचेही कौतुक वाटते. भाषकदृष्ट्या आपल्याला ती चुक दिसेल. पण माझ्या मते हे लोक मराठीत साहित्य निर्मिती करतात हे जास्त महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रात मराठी विविध पदरी असताना इंदूरमध्ये ती वेगळे रूप घेऊन जिवंत आहे. त्यामुळे तिची उपेक्षा करण्यापेक्षा तिला बोलीचा दर्जा दिला तर ते जास्त योग्य ठरेल.
प्रतिक्रिया
27 Mar 2008 - 7:11 pm | विजुभाऊ
इंदोरी मराठी " तुझे आहे तुजपाशी" मधे छान घेतले आहे पु ल नी.......
ऐकुन एकदम तबियत खुष होते...त्यचा लेहेजा ही खूब असतो.....
इंदोर ( मराठी: इंदूर) मधे असताना आपण महराष्ट्रात आहोत असेच वाटत असते.....इथले पोहे थोडे वेगळे असतात्..त्यात कांदे नसतात...... फोडणी झाल्यावर वर गाठीया आणि बडीशेप ( सौंफ) टाकतात......
सर्राफ्फा /५६दुकान हे भाग म्हणजे खवैयांची चंगळ....
इथला प्रत्येक माणुस घरी जाताना सामोसे /पोहे /ढोकळा असे पदार्थ घेउनच जातो.....त्या प्रत्येका सोबत बारीक शेव ही इथली स्पेश्यालीटी.......
इंदोर एकुणच अजुनही रीलॅक्स आपल्याच मस्तीत जगते.....
इंदोरची आणखी खासीयत म्हणजे इथली घरे....एकेक पहात रहावी अशी डीझाइन्स असतात.
27 Mar 2008 - 7:27 pm | विसोबा खेचर
कुणीही बोलत असलं की आपण हो किंवा होय असं म्हणतो. इथं 'हाऊ' असं म्हणण्याची प्रथा आहे.
सहमत आहे. इंदुरी मराठीत जसं हो चं हाऊ होतं तसंच हैद्राबादी हिंदीतही 'हां, किंवा जी हां' चं 'हौ' होतं! :)
अवांतर - हैद्राबादी हिंदीचा गोडवाही काही औरच! असो...
येथे लोक छान किंवा मजेत नसतात, तर 'बढिया' असतात.
क्या बात है! :)
इथल्या मराठी बोलीने हिंदी ताल धरला आहे.
अतिशय सुंदर वाक्य!
या मराठीला मुंबई, पुण्याचे लोक धेडगुजरी असं म्हणतात. पण ते चुकीचं आहे. इथल्या मराठीवर हिंदीचा प्रभाव अपरिहार्य आहे. उलट माझ्या मते अनेक मराठी कुटुंबाच्या पिढ्या येथे जाऊनही ती मराठी बोलतात, हे विशेष आहे. हिंदीच्या आधाराने का होईना पण मराठी टिकून आहे. इथले मराठी लोक साहित्यातही पुष्कळ आहे. त्यांच्या मराठी लेखनातही हिंदी शब्द असतात. मला त्याचेही कौतुक वाटते. भाषकदृष्ट्या आपल्याला ती चुक दिसेल. पण माझ्या मते हे लोक मराठीत साहित्य निर्मिती करतात हे जास्त महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रात मराठी विविध पदरी असताना इंदूरमध्ये ती वेगळे रूप घेऊन जिवंत आहे. त्यामुळे तिची उपेक्षा करण्यापेक्षा तिला बोलीचा दर्जा दिला तर ते जास्त योग्य ठरेल.
हा शेवटचा परिच्छेद अतिशय चांगला झाला आहे असे आवर्जून सांगावेसे वाटते!
वा भोचकगुरुजी,
आपण फार छान लेख लिहिला आहे. आपला बोलीभाषांचा चांगला अभ्यास दिसतो! आमचाही 'बोलीभाषा' हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामुळे बोलीभाषेशी निगडीत लेख आम्हालाही वाचायला आवडतात. आपल्याकडून अशाच उत्तमोत्तम लेखांची अपेक्षा आहे.
एका चांगल्या लेखाबद्दल मनापासून अभिनंदन...
आपलाच,
तात्याभैय्या देवासकर,
देवासकरांची कोठी,
इंदौर.
27 Mar 2008 - 7:54 pm | चतुरंग
सुंदर लेख. इंदौरबद्दल खूप ऐकून आहे पण मला अजून एकदाही तिथे जाण्याचा योग आलेला नाही ;(. आपला लेख वाचून पुन्हा एकदा मनात तिथे जाण्याच्या इच्छेने जोम धरलाय.
मराठी भाषिक लोक मध्यप्रदेशात बर्याच ठिकाणी आहेत आणि त्यांची भाषिक सरमिसळ मजेदार बोली भाषा निर्माण करते हे ऐकायला खरेच खूप आवडेल. (शिवाय चाट, सामोसे, फरसाण, खमण हे तर खुणावत आहेतच!;)
असेच अजून लिखाण वाचायला नक्कीच आवडेल.
चतुरंग
27 Mar 2008 - 8:17 pm | सृष्टीलावण्या
त्यांची भाषिक सरमिसळ मजेदार बोली भाषा निर्माण करते हे ऐकायला खरेच खूप आवडेल.
बोलीभाषांना एक विशेष गोडवा असतो. कारण त्यांच्यावर माणसे, तो भूप्रदेश, तिथले पाणी सर्वांचा प्रभाव पडलेला असतो आणि त्यातील शब्द तर चपखल असतात.
आता भोचक हाच शब्द पहा ना मूळ शब्द भूचक्र. दिवाळीत लावले जाणारे भूईचक्र जसे गरागरा फिरत कुठेही जाते तसा भोचक माणूस हा अगोचरपणे कुठेही जाऊन कोणत्याही विषयात / प्रसंगात तोंड घालतो. म्हणून त्याला भोचक म्हटले जाते. दुसरा शब्द झकास. आकाशात वीज चमकण्याला मूळ शब्द आहे चकास् त्याचे बोलीभाषेत झकास असे रुपांतर होते जे मूळ चकास् पेक्षा सुद्धा छान वाटते.
>
>
नणदेचं कार्ट किरकिर करतंय, खरुज होऊ दे त्याला, ग भवानी आई रोडगा वाहिन तुला..
27 Mar 2008 - 9:33 pm | ठणठणपाळ
माझा इंदौरमधे राहणारा एक लहान भाऊ एकदा झाडावर माकड चढताना बघून ओरडला, "ते बघा, पेडावरती बंदर चढून राहिलंय..
27 Mar 2008 - 10:43 pm | सुधीर कांदळकर
पेडावरचा.
मस्त जमलेला लेख. बोली गोडच असते. बोलीतील गोडवा लेखातहि उतरलाय.
धन्यवाद.
अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.
28 Mar 2008 - 4:02 am | मीनल
तिथे मराठी भाषा वेगळी आहे ते खर.
तसेच तिथले आदरातिथ्य विचारा.
आग्रह इतका की वरून खालून बाहेर येई पर्यंत खावे लागते.
आग्रह न मोडता येण्या जोगा असतो.
खाना पिना व्हरायटी इतकी ,की सर्वच नवनविन.