विजय तेंडुलकरांचा !

दिपोटी's picture
दिपोटी in जनातलं, मनातलं
19 May 2010 - 4:54 am

एप्रिल २०१० मध्ये अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनात प्रकाशित झालेल्या 'हितगुज'च्या संमेलन विशेषांकात हा माझा लेख प्रथम छापला गेल्यानंतर शुक्रवार १४ मे रोजी 'सकाळ' वर्तमानपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीत व आज १९ मे रोजी विजय तेंडुलकरांच्या दुसर्‍या स्मृतीदिनानिमित्त याच वर्तमानपत्राच्या मुंबई आवृत्तीत छापला गेला आहे. तेंडुलकरांच्या प्रतिभेला सलाम ठोकण्यासाठी लिहिलेला हा लेख 'मिपा'च्या वाचकांसाठी येथे पुनर्प्रकाशित करीत आहे.

--------------------------------------------------------------------------

विजय धोंडोपंत तेंडुलकर - मराठी साहित्य आणि नाट्यविश्वातील एक झंझावाती व्यक्तिमत्व! आज १९ मे रोजी या थोर रंगकर्मी साहित्यिकास आपल्यातून जाऊन दोन वर्षे पूर्ण होतील. या निमित्ताने त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी व त्यांना आदरांजली वाहण्यासाठी हा लेखप्रपंच ... त्यांच्या असंख्य वाचक-प्रेक्षक चाहत्यांवर त्यांचे लेखक-नाटककार या नात्याने असलेले ऋण काही अंशी तरी परत फेडण्याचा हा एक यत्न.

नेहमीची खास 'श्रध्दांजली-छाप' पोकळ व गुळगुळीत वाक्ये वापरण्याचा आरोप होण्याचा धोका पत्करुन सुध्दा 'कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली, मानदंड निखळला' अशी विधाने तेंडुलकरांसारख्या प्रतिभावंताच्या बाबतीत मात्र अगदी तंतोतंत लागू पडतात असे निश्चितच म्हणता येईल. तरीही असे काही म्हणण्याअगोदर 'विजय तेंडुलकर' - किंवा 'तें' - नावाचे हे रसायन कसे अजब व गुंतागुंतीचे आणि तरीही किती सच्चे व सृजनशील होते हे बघणे महत्त्वाचे ठरेल.

उण्यापुर्‍या ऐंशीएक वर्षांच्या समग्र आयुष्यात 'गिधाडे', 'शांतता! कोर्ट चालू आहे', 'पाहिजे जातीचे', 'सखाराम बाइंडर', 'घाशीराम कोतवाल', 'श्रीमंत', 'बेबी', 'एक हट्टी मुलगी', 'कमला', 'कन्यादान' अशा उभा महाराष्ट्र ढवळून काढणार्‍या आणि कमी-जास्त प्रमाणात वादग्रस्त व तरीही 'मैलाचा दगड' ठरलेल्या अनेक नाटकांच्या संहितांची आणि 'सामना', 'सिंहासन', 'उंबरठा', 'आक्रीत', 'आक्रोश', 'मंथन', 'निशांत', 'अर्धसत्य' अशा अनेक अजरामर चित्रपटांच्या पटकथा-संवादांची निर्मिती तेंडुलकरांच्या हातून घडली. याव्यतिरिक्त त्यांनी असंख्य एकांकिका लिहिल्या, विपुल आणि अपार ललित लेखन केले. हिंसा, सांप्रदायिकता, नीती-अनीतीच्या व्यक्तीसापेक्ष बदलत्या कल्पना, जातीयवाद, स्त्री-पुरुष संबंधांतील गुंतागुंत, सत्तेसाठी खेळले-खेळवले जाणारे मनगटशाहीचे व झुंडशाहीचे दांभिक राजकारण यासारख्या - एरवी किमान मराठी नाटकांत/चित्रपटांत तरी न किंवा कमी हाताळल्या जाणार्‍या अशा - वादळी आणि काही बाबतीत स्फोटक अशा विषयांना त्यांनी वाचा फोडली. उमेदवारीच्या काळात अत्र्यांच्या 'मराठा' दैनिकात त्यांनी गिरवलेले निर्भीड पत्रकारितेचे धडे पुढे कामी आले. वयाच्या जेमतेम विशीत हाती घेतलेली लेखणी तब्बल साठ वर्षे त्यांनी अखंडितपणे चालवली. मराठी रंगभूमीचा तोंडावळाच नव्हे तर वळणसुध्दा पूर्णतया बदलून टाकण्याची जबरदस्त क्षमता या लेखणीत होती. मराठी रंगभूमीची बरीच स्थित्यंतरे त्यांनी पाहिली - त्यातील कित्येक तर त्यांनीच घडवली. कथा-पटकथा-लेख-नाटक-एकांकिका-वृत्तपत्रीय सदरे-कादंबरी असे विविध साहित्यप्रकार त्यांनी लीलया हाताळले. अगदी उतारवयात सुध्दा तरुणांहूनही तरुण असलेल्या 'तें'चे त्यांच्या ललित लेखनाबरोबरच त्यांच्या लेखनारंभकाळातील आठवणी उतरवून काढणे, तरुण लेखकूंना व रंगकर्मीयांना मार्गदर्शन करणे, कार्यशाळा घेणे वगैरे उत्साहाने चालूच होते. नव्या पिढीशीही त्यांनी चांगलाच संवाद जुळवला होता. कित्येक तरुण लेखकांसाठी व नाटककारांसाठी ते प्रेरणेचा स्रोत ठरले.

सर्वसामान्यांच्याच नव्हे तर समाजातील सर्व घटकांच्या जीवनाबद्दल व अनुभवांबद्दल तेंडुलकरांना असलेले दुर्दम्य कुतूहल त्यांच्या ललित लिखाणात प्रकर्षाने जाणवते. 'माणूस' हा एकच विषय त्यांनी आयुष्यभरात वेगवेगळ्या कोनांतून अभ्यासला-तपासला-हाताळला. आपल्या निरागस नातीला सतत पडणार्‍या निष्पाप प्रश्नांच्या अखंड फैरीला तिच्याएवढेच होऊन उत्तरे देण्यात त्यांना जितका आनंद वाटे, तेवढीच आपुलकी त्यांना दुर्गम भागांतील पारधी-वारली-भिल्ल-मडिया-नागा आदिवासींच्या वर्तमानाबद्दल-संघर्षाबद्दल होती. एखाद्या सर्वसाधारण नागरिकाचे दैनंदिन अनुभव तिच्याशी वा त्याच्याशी समरस होऊन ऐकण्यात त्यांना जितके स्वारस्य होते, तेवढाच रस त्यांना सत्तेसाठी हपापलेल्या एखाद्या राजकारण्याची लालसा जाणून घेण्यात होता आणि तेवढेच कुतूहल त्यांना माणसांतील प्रसंगी उफाळून वर येणार्‍या पशूवृत्तीबद्दल देखील होते. वास्तवापासून दूर पळून जाण्यापेक्षा त्याला थेट सामोरे जाणे त्यांनी पसंत केले. नेहरु पाठ्यवृत्तीच्या निमित्ताने 'गुन्हेगारी व हिंसा' या विषयावर अभ्यास करण्यासाठी तर ते भारताच्या कानाकोपर्‍यात वणवण हिंडले. गुन्हेगारांच्या हिंसक प्रवृत्तीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी त्यांनी बर्‍याच पोलीस-स्टेशनांना भेटी दिल्या, नक्षलवाद्यांत जाऊन राहिले, कोर्टात एक 'बघ्या' म्हणून हजर राहिले, तुरुंगाच्या चार भिंतींत कैद्यांशी संवाद साधला - अगदी फाशी-गेटपर्यंत सुध्दा पोहोचले. मात्र हे सर्व करताना कोठेही एखादा सर्वज्ञानी तत्त्वज्ञ असल्याचा खोटा भपका वा आव त्यांनी कधी आणला नाही. एकंदरीतच समाजाकडे बघताना त्यांचा दृष्टीकोन हा शेवटपर्यंत एखाद्या जिज्ञासू व अभ्यासू विद्यार्थ्याचा राहिला.

कुंटणखान्यातून पैसे देऊन सोडवून ज्याने घरी आणले त्या पत्रकाराच्याच बायकोला 'तुला केवढ्याला विकत घेतलं याने' असा सहज व खडा रोकडा सवाल टाकणार्‍या 'कमला'चा अथवा वाक्या-वाक्याला अंगावर येणार्‍या 'गिधाडे' सारख्या खळबळजनक व जहाल नाटकाचा हा कर्ता-करविता प्रत्यक्ष जीवनात मात्र अत्यंत शांत, मृदूभाषी व मवाळ होता यावर विश्वास ठेवणे प्रथम थोडे जरा कठीणच जाते. नाट्यतंत्राची-नाट्यमाध्यमाची पूर्ण जाण व समज असलेल्या तेंडुलकरांची कथा-पटकथा-संवाद अशा नाट्य-चित्रलेखनाच्या सर्व पैलूंवर उत्तम पकड होती. त्यांच्या आजन्म गुलामीची बांधिलकी आनंदाने स्वीकारणारे शब्दभांडारातील तमाम शब्द गेली कित्येक वर्षे रोज सकाळी नेमाने त्यांना 'जी हुजूर, आज काय हुकूम?' असे अदबीने विचारीत असावेत असा माझा आपला एक कयास आहे. पक्क्या बांधणीच्या व आटोपशीर मांडणीच्या त्यांच्या कथा नेहमीच वाचनीय असत. भाषेवर विलक्षण स्वामित्व असलेल्या या शब्दप्रभूला कधीही बेगडी वा बोजड शब्दांचा अघळपघळ फापटपसारा मांडण्याची अथवा शब्दबंबाळ लेखनाचा बडेजाव करण्याची गरज भासली नाही. स्वच्छ व परखड विचार किंवा विषय - आणि तो मांडण्यासाठी सरळसोपी व सहज आणि तरीही अचूक, काटेकोर व नेमकी शब्दयोजना ही त्यांची खासियत होती. रोजच्या बोलीभाषेत आणि किमान शब्दांत कथानकाचा आशय नेमका पकडणे ही एक खास तेंडुलकरी शैली होती. अशा या खास तेंडुलकरी नाटकांत व चित्रपटांत जब्बार पटेल, दुबे, अरविंद देशपांडे, निहलानी, बेनेगल यांच्यासारख्या रथी-महारथी दिग्दर्शकांच्या हाताखाली निळू फुले, नसिर, लागू, स्मिता पाटील, ओम पुरी, अमरीश पुरी, सोनाली कुलकर्णी, सयाजी शिंदे, अमरापूरकर, पाटेकर अशा मराठी-हिंदी रंगभूमीवरील व चित्रसृष्टीतील एकाहून एक सरस अशा दिग्गज कलावंतांना पहाणे म्हणजे दुग्धशर्करा, कपिलाषष्ठी आणि मणिकांचन असे तीन-तीन योग एकाच वेळी जुळून येण्यासारखे विशेष असे. एरवी पडद्याआड असणार्‍या तेंडुलकरांचे काहीएक वर्षांपूर्वी 'नितळ' या मराठी चित्रपटात पडद्यावर देखील ओझरते दर्शन घडले.

रंगभूमीबाबतीत नेहमीच प्रयोगशील राहिलेल्या तेंडुलकरांनी त्यांच्या ऐन उमेदीच्या काळात विजया जयवंत (आजच्या विजया मेहता), अरविंद देशपांडे, माधव वाटवे अशा त्यांच्या तेव्हाच्या काही सह-नाट्यधर्मीयांबरोबर 'रंगायन' संस्था स्थापन करुन समांतर वा प्रायोगिक नाट्य-चळवळीची बीजे मराठी रंगभूमीत रुजवली. खानोलकर-एलकुंचवार-तेंडुलकर या लेखक-त्रयीच्या नाट्य-संहितांबरोबरच आयनेस्को, ब्रेख्त अशा काही समकालीन पाश्चात्य नाटककारांच्या एकांकिका-नाटकांच्या भाषांतरांना वा रुपांतरांना या नाट्य-प्रयोगशाळेने मूर्त रुप दिले. पुढे 'रंगायन' फुटल्यावर पूर्णत्वाने जरी नाही तरी प्रामुख्याने व्यावसायिक रंगभूमीवर उतरलेल्या तेंडुलकरांनी प्रयोगशीलतेची कास - आणि आस - मात्र सोडली नाही. नाटकाची बांधणी-धाटणी किंवा फॉर्म, कथानकाचा विषय व त्याची मांडणी, प्रसंग उभारणी, संवाद, व्यक्तीरेखाटन, पात्रयोजना अशा सर्वच घटकांच्या बाबतीत त्यांचा ध्यास नेहमीच वहिवाट सोडून एखादी न मळलेली नवी वाट शोधण्याचा-चोखाळण्याचा आणि सतत काहीतरी नवे वेगळे जोपासण्याचा-देण्याचा राहिला.

दोन-अडीच वर्षांपूर्वी 'बुध्दिवंतांची गोची' या जयंत पवार यांनी 'मटा'साठी घेतलेल्या मुलाखतीत तेंडुलकरांनी मराठी भाषेचे व रंगभूमीचे भवितव्य, विचारवंतांच्या - निर्भयपणे विचार मांडायला लागणार्‍या - 'वेडेपणा'चा अंत, साहित्यिक व राजकारणी यांच्यातील परस्परसंबंध अशा विविध विषयांवर - आपल्याला पूर्णतः पटोत वा ना पटोत, तरीही निश्चितच वाचनीय व विचार करण्याजोगी अशी - त्यांची मते मनमोकळेपणाने मांडली होती. मृत्यूपूर्वी फक्त काहीएक महिने आधी झालेल्या त्यांच्या या गप्पावजा मुक्त चिंतनाइतकाच २००५ साली अमोल पालेकरांनी पुण्यात आयोजिलेल्या 'विजय तेंडुलकर नाट्यमहोत्सवा'त तेंडुलकरांना मानवंदना म्हणून विविध दिग्दर्शकांनी सादर केलेल्या त्यांच्या काही एकांकिकांचा व नाटकांतील प्रवेशांचा संग्रह सुध्दा - त्यांच्या प्रकाशित साहित्याइतकाच - महाराष्ट्रातच नव्हे तर जगभर पसरलेल्या तेंडुलकर-चाहत्यांसाठी एक संग्राह्य खजिना ठरला आहे.

तेंडुलकरांचे सारेच लिखाण वैचारिक अथवा धीरगंभीर प्रकृतीचे होते असे समजण्याची गल्लत बर्‍याचवेळा केली जाते. खरे तर अशातला अजिबात भाग नाही हे त्यांचे कित्येक ललित लेख आणि 'गुरुर्ब्रह्मा', 'चावा' व इतर अनेक नर्मविनोदी कथा सहज सिध्द करतील. मध्यंतरी वाचनात आलेल्या त्यांच्या एका लेखात त्यांनी 'अर्धसत्य'च्या अनपेक्षित व्यावसायिक यशानंतर हिंदी चित्रसृष्टीतील तमाम निर्मात्यांनी रांग लावून त्यांच्याकडे केलेल्या पटकथेच्या मागण्यांचे भन्नाट वर्णन केले होते. मात्र केवळ 'पैसा खोर्‍याने ओढण्याचे एक साधन' या व्यापारी दृष्टिकोनातून व गल्ल्यावर एक नजर ठेवून कथा-पटकथेकडे पहाणार्‍या अशा धंदेवाईक निर्मात्यांचे व तेंडुलकरांचे जमणे तसे कठीणच होते. 'शोमॅन' राजकपूर याने सुध्दा त्याच्या आगामी चित्रपटाच्या पटकथेसाठी - खरे तर त्या पटकथेतील फक्त एका राजकीय ढंगाच्या भागासाठी - त्यांच्यामागे तगादा लावला होता. अन्य बाजारी निर्मात्यांपेक्षा पूर्ण वेगळ्या अशा या एकेकाळच्या मनस्वी व संवेदनाक्षम अभिनेता-दिग्दर्शक-निर्मात्याने आताच्या मात्र त्या गल्लाभरु व तद्दन फिल्मी मसालेदार मूळ कथेचे ऐकवलेले जिवंत व स्तिमित करणारे असे कथन (या एकपात्री कथनाचा अस्सल दृकश्राव्य व भारावून टाकणारा असा निव्वळ 'अवर्णनीय' अनुभव तरीही शब्दांत अगदी सहज पकडून आपल्यासमोर वर्णावा तो केवळ शब्दप्रभू 'तें'नीच), तेंडुलकरांकडून पटकथेविषयी असलेल्या त्याच्या अवाजवी अपेक्षा, त्यांच्याविषयी एकंदरीतच राजकपूरने दाखवलेला अकृत्रिम आदर व अमर्याद लोभ आणि फक्त त्यामुळेच - अशा शुध्द व्यापारी बाजाच्या सनसनाटी चित्रपटाची पटकथा किंवा तिचा एखादा छोटा भाग सुध्दा लिहिण्याची इच्छा मनात अजिबात नसूनही - एरवी ठाम विचारांच्या व कृतीच्या असलेल्या तेंडुलकरांकडून नकार देण्यात होणारा असाधारण विलंब, शेवटी यातून त्यांनी कशीबशी करुन घेतलेली सुटका ... या सर्व घटनांमधून व घोळातून राजकपूरचे - तेंडुलकरांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर 'एका जित्या जागत्या लोककथे'चे - एक अत्यंत सुरेख व लोभस व्यक्तिचित्र त्यांनी या नितांतसुंदर व हलक्याफुलक्या लेखात उभे केले आहे.

अमाप प्रसिध्दी पावलेले तेंडुलकर स्वतः आपणहून मात्र प्रसिध्दी-वलयाच्या मोहापासून दूरच राहिले. कंपूबाजी करणे, छुप्या खेळींचे राजकारण खेळणे यापासून अलिप्त राहिलेल्या 'तें'नी तसे शेवटपर्यंत - त्यांचे आप्त आणि काही अगदी खास निवडक व निकटतम स्नेही यांची साथ सोडल्यास - स्वतंत्र आणि एकाकी रहाणेच पसंत केले. 'भल्या सकाळी ईश्वराला गंध लावल्यावर दिवसभर लोकांना चुना लावण्याचा परवाना मिळतो' असा भ्रामक पण सोयीस्कर गैरसमज असण्याची - किंबहुना करुन घेण्याची - प्रवृत्ती समाजात थोडीफार बळावत असताना 'गंध नको आणि चुना सुध्दा नको' अशी भावना उराशी बाळगून आणि 'जनसेवा हाच खरा कर्मयोग' अशा सेवाभावी वृत्तीने ते बाबा आढाव यांच्या 'एक गाव, एक पाणवठा' या चळवळीत सामील झाले. उतारवयात त्यांना एकामागोमाग एक पत्नी निर्मला, मुलगा राजू, मुलगी प्रिया अशा एकेका कुटुंब-सदस्याच्या वियोगाचे धक्के पचवावे लागले. यापाठोपाठ कधी आजार-विकार तर कधी आर्थिक विवंचना - या सर्वांतून त्यांचे आत्मचरित्रवजा लेखन चालू असताना अर्ध्यावरच स्नायूंच्या आजाराचे निमित्त करुन नियतीने त्यांना गाठले. त्यांचे आजवरचे अप्रकाशित साहित्य - प्रामुख्याने ललित लेखन - त्यांच्या वाचकांसाठी खुले करण्याचा मानस त्यांच्या दोन मुलींनी - सुषमा तेंडुलकर आणि तनुजा मोहिते यांनी - 'तें'च्या निधनानंतर व्यक्त केला होता. 'तें'नी त्यांच्या शेवटच्या काही दिवसांत कागदावर उतरवलेल्या त्यांच्या आठवणी-साठवणी - अपूर्णावस्थेत का होईना - गेल्या वर्षी त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी ''तें' दिवस' नावाने पुस्तकरुपाने प्रकाशित झाल्या.

तेंडुलकरांची उत्तुंग व प्रगल्भ प्रतिभा लक्षात घेता वाचकांच्या पसंतीस हमखास उतरेल असे रुढार्थाने 'लोकप्रिय आणि यशस्वी' लिखाण त्यांच्या समर्थ लेखणीतून सहजरीत्या उतरु शकले असते असा दावा करता येईल. पण केवळ वैयक्तीक फायद्यासाठी वा प्रसिध्दीच्या हव्यासापायी साधारण वकूबाची एखादी व्यक्ती आपल्या मूळ विचारांना व मतांना जशी सरळ सोयीस्कर मुरड घालेल-घालू शकेल, तशी अशा वेळी मूल्यांशी करावी लागणारी अपरिहार्य तडजोड अजिबात न स्वीकारता त्यांनी रोखठोक व सडेतोड लेखणी चालवली. बंडखोरी त्यांच्या रक्तातच होती असे म्हणणे वावगे ठरणार नाही. जे पटले ते व्यक्त करायला त्यांची जीभ - किंवा लेखणी - कधी कचरली वा अडखळली नाही. गुळगुळीत, चॉकलेटी, वास्तवाशी फारकत - खरे तर काडीमोड - घेणार्‍या व सतत दिवाणखान्याभोवतीच दळू दळू दळण दळणार्‍या नाटकांच्या - व अशा जीवनाच्या - पार पलीकडे असलेल्या संघर्षमय, काटेरी आणि प्रसंगी रुढ संकेतांना धक्का देऊन हादरवून टाकणार्‍या गडद काळ्या अशा दैनंदिन वास्तवाची जाणीव करुन देण्याचे असाधारण धाडस त्यांनी दाखवले. 'दोन घटका रंजन' या चाकोरीबध्द विचार-परिघाच्या बाहेर त्यांनी मराठी रंगभूमीला नेले. कोणाचाही मुलाहिजा न बाळगता आणि वास्तवाशी प्रतारणा न करता सर्वसामान्य माणसातील प्रकृती व विकृती त्यांनी मर्मभेदकपणे शब्दबध्द केली. यामुळे बर्‍याचवेळा त्यांना जहरी व बोचर्‍या टीकेचा धनी व्हावे लागले आणि कित्येक वादांना सामोरे जावे लागले. रंगभूमीवरील त्यांची निष्ठा व प्रेम कसाला लावणार्‍या निर्णायक प्रसंगांना तोंड द्यावे लागले. अखेरीस मात्र 'तें' या सर्व वादळांना पेलून, वावटळींना पचवून आणि टीकेला व वादांना अक्षरशः पुरुन उरले. हे येर्‍यागबाळ्याचे काम खचितच नोहे! लेखकाची मुस्कटदाबी आणि लेखनाची गळचेपी करणार्‍या अविचारी विरोधकांची फळी समोर उभी ठाकली असताना न डगमगता 'तें'नी अशा विरोधकांच्या कचाट्यातून रंगशारदेला सोडवून या स्वयंघोषित व तथाकथित 'संस्कृतीरक्षकां'पासून आपल्या रंगसंस्कृतीचे रक्षण केले आणि आपल्या भूमिकेशी व विचारांशी प्रामाणिक राहून पुढील अनेक वर्षे लेखनकार्य केले यातच तेंडुलकरांचा - व पर्यायाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा - निर्विवाद विजय आहे.

--------------------------------------------------------------------------
तेंडूलकरांचे छायाचित्र : श्री सतीश देशपांडे (सौजन्य : राजहंस प्रकाशन, पुणे)

नाट्यभाषासाहित्यिकचित्रपटप्रतिभा

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

19 May 2010 - 8:35 am | स्पंदना

कुठे तरी वाचनात त्यान्च्या शेवटच्या ( सर्व जिवलगान्चे म्रुत्यु सोसल्यानन्तरचे) शान्त एकाकि दिवसान्च वर्णन करणारा मजकुर आला होता. त्यन्च्या पत्नी अजुन्ही मुल इकड तिकड काम करताहेत याच भ्रमा खाली होत्या. आणि तेन्डुलकर त्यान्च्या त्या भ्रमाला जराही धक्का न लावता त्यन्ना साम्भाळत होते..... खरच स्वतःच दुखः पेलत असताना त्यान्नी पत्निला दिलेला आधार .....एकमेव व्यक्ती.....

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

विनायक पाचलग's picture

19 May 2010 - 10:25 am | विनायक पाचलग

लेख नंतर वाचुन मत देइनच..
पण आत्ता १० दिवसांच्या प्रवासानंतर पुन्हा पुण्याला जात आहे..
तेंडुलकर स्मृतिदिनानिम्मित होणार्‍या एका कार्यक्रमाला जाण्यासाठी....
आल्यावर सविस्तर लिहिनच...
विनायक पाचलग
वाँट टु टॉक

Dhananjay Borgaonkar's picture

19 May 2010 - 11:13 am | Dhananjay Borgaonkar

मी तें ची बरीच पुस्तक वाचली. प्रत्येक पुस्तकात सातत्याने जाणवत ते म्हणजे अपार दु:ख. त्यांच्या प्रत्येक पुस्तकात कोणाची ना कोणची कैफियत असते.
मी त्याच हलक फुलक पुस्तक एकही नाही वाचलं. कोणाला असं पुस्तक माहीत असल्यास प्लीज कळवा.

नीधप's picture

19 May 2010 - 2:18 pm | नीधप

त्यांचं सगळं लिखाण खूपच प्रामाणिक असल्याने हलकंफुलकं काही मिळणार नाही.
बाकी त्यांच्या लिखाणात मधूनच डोकावणारा विसंगतीतून विनोद जाणवला तर बघा.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

स्थळ प्रयाग हॉस्पिटल आयसीयू
चित्र पुरेसे बोलके आहे....

तेंडुलकरांच्या आठवणींना प्रणाम...
बरोबर दोन वर्षांपूर्वी मी मिपावर लिहिलेला लेख..
http://www.misalpav.com/node/1828

दिपोटी's picture

18 May 2011 - 8:27 am | दिपोटी

उद्या १९ मे - ज्येष्ठ लेखक-नाटककार विजय तेंडुलकर यांचा तिसरा स्मृतीदिन.

गेल्या वर्षी त्यांच्या दुसर्‍या स्मृतीदिनानिमित्त लिहिलेला हा लेख ... त्यांच्या आठवणी चाळवण्यासाठी परत एकदा ...

- दिपोटी

आनंदयात्री's picture

18 May 2011 - 12:25 pm | आनंदयात्री

लेख वर आणल्याबद्दल धन्यवाद.

दिपोटी's picture

19 May 2012 - 4:18 am | दिपोटी

आज १९ मे - ज्येष्ठ लेखक-नाटककार विजय तेंडुलकर यांचा चौथा स्मृतीदिन.

या विलक्षण व्यक्तिमत्वाच्या प्रतिभेला सलाम ठोकण्यासाठी / वंदन करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी त्यांच्या दुसर्‍या स्मृतीदिनानिमित्त लिहिलेला हा लेख ... त्यांच्या आठवणी चाळवण्यासाठी आज परत एकदा ...

- दिपोटी

पैसा's picture

19 May 2012 - 7:17 am | पैसा

लेख उत्तम आहे. तेंडुलकरांना या निमित्ताने श्रद्धांजली!

दिपोटी, लेख वर काढल्याबद्दल धन्यवाद !
एवढा सुंदर परिचय करुन दिलाय, पण वाचायचा राहून गेला होता.
भडकमकर मास्तरांनी टाकलेल्या फोटो आणि फोटोंओळींबद्दल तर क्या कहने !
दोघांचेही पुन्हा एकदा धन्यवाद.