बडे दिनो के बाद हम बेवतनों को याद...

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
16 May 2010 - 11:15 am

बडे दिनो के बाद हम बेवतनों को याद
वतन की मिट्टी आयी है, चिठ्ठी आयी है

अमेरिकेत आलो त्याला बरीच वर्षं झाली. नशीबाची गोष्ट म्हणजे एकाच वर्गातल्या आम्हा तिघांना एकाच युनिव्हर्सिटीमध्ये स्कॉलरशिप मिळाली. त्यामुळे ती खूपच सोय झाली. आम्ही तिघे एक अपार्टमेंट घेऊन राह्यलो. एकगठ्ठा तिघं जण एकत्र असल्यामुळे साहजिकच पहिल्या थॅंक्सगिव्हिंगला इतर जनता गावोगावहून आमच्या घरी जमली. परत एकदा मोठ्ठा ओळखीचा ग्रुप जमत होता. ग्रॅड स्टुडंट असल्यामुळे बजेटं तशी मर्यादितच होती. पण दुकानात दारू खरेदी करायला गेलो तेव्हा आमच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. आंद्रे शॅंपेन - बाटलीची किंमत केवळ दोन डॉलर‍! मिळाली. आम्ही तेव्हा आयुष्यात कधी शॅंपेन प्यायली नव्हती, त्यामुळे चांगली वाईट वगैरेचा प्रश्नच नव्हता. शॅंपेन या शब्दाचं वलयच पुरेसं होतं. 'साला शॅंपेन पियेंगे' म्हणून आम्ही तीनचार बाटल्या घेतल्या, बीअर वगैरे घेतली आणि पार्टी मस्त रंगली. जुन्या आठवणी निघाल्या. प्रत्येकाने आपापल्या युनिव्हर्सिटीच्या गमती सांगितल्या. थंडीला सगळ्यांनीच शिव्या दिल्या. टेक्सासमधल्या एकाने हे थंडी म्हणजे काय विचारल्यावर त्यालाही शिव्या दिल्या. सगळं मस्त चाललं होतं. मध्येच कोणीतरी बडे दिनोंके बाद लावलं. झालं. ती सस्त्यातली व भरपूर शॅंपेन आणि बीअर, भारतातून येऊन नुकतेच झालेले काही महिने, नव्याची किंचित ओसरलेली नवलाई, पुन्हा भेटलेले मित्र आणि जागलेल्या आठवणी.... या सगळ्या अजब मिश्रणावर या गाण्याने जी जादू केली की आत्तापर्यंत गोठून राहिलेल्या पाण्याला वाट मिळाली. त्या रात्री भले भले रडले....

नंतर बऱ्याच वेळा ते गाणं ऐकलं. ती जादू काही झाली नाही. खरं तर दिवसाउजेडी स्वच्छ डोक्याने ते गाणं ऐकलं की बटबटीत वाटतं. तेरी बीबी करती है सेवा, सूरत से लगती है बेवा... तुझ्या आईची अशी अवस्था झाली आहे, तू पैसे कमावलेस तरी किती गोष्टींना मुकला आहेस वगैरे वाक्यांचे भावना पिळवटून काढण्यासाठी, चरक रचले आहेत. चाल काही वाईट नाही, पण अधल्या मधल्या ओळी रेल्वेमधल्या भिकाऱ्याच्या तोंडून येऊ शकतील असं वाटतं. योग्य वेळ, आणि परिस्थिती लागते अशा गाण्यांसाठी....

अमेरिकेत आल्यानंतर बऱ्याच दिवसांनी माझ्या होस्टेलमधल्या एका मित्राला पत्र पाठवलं. त्यावेळी त्याने उलट पाठवलेल्या पत्रात काहीसं गमतीनेच लिहिलं होतं, '...एव्हाना, कॉलेजात ओळखत होतो पण नंतर आमचा संपर्क राहिला नाही, अशी परिस्थिती झालेली असेल असं वाटलं होतं, म्हणून तुझं पत्र बघून आश्चर्य वाटलं....'
त्यावेळी नुकताच कॉलेजातून बाहेर पडून नवीन देशात आलेलो होतो. जुने दिवस मनात ताजे होते. पायाखालच्या जमिनीइतकीच मित्र ही भरभक्कम, चिरंतन वस्तू असते असं वाटत होतं. 'नंतर संपर्क राहिला नाही' वगैरे वाक्यं उडत उडत ऐकली होती. पण अपघाताप्रमाणे त्या दुसऱ्यांना होणाऱ्या, त्यासुद्धा आईबापांच्या पिढीतल्या लोकांना होणाऱ्या गोष्टी वाटायच्या. म्हणून मी ते वाक्य विसरूनसुद्धा गेलो.

आता मागे वळून बघताना खूप मित्रांचं तेच झालेलं दिसतं. प्रत्येकजण आपापल्या संसारात गुरफटलेला. नोकरी, करीअर, पोरंबाळं, त्यांच्या शाळा, अधूनमधून प्रवास... फुरसतके रातदिन कधी कुठे निघून गेले ते कळत नाही. फोन आहे, इंटरनेट आहे, अमुक टॉक, तमुक मेल... तरीही कॉलेजमध्ये जसे पक्के दोस्त असतो तसे कसे राहाणार? काही वेळा अचानक नावं समोर येतात, कोणी फेसबुकवर, तर कोणी लिंक्डइनवर ओळखीचं माणूस हाका मारत येतं, आणि आठवणी जाग्या करून जातं. काही गोड, काही कडू...

मी मुळातच तसा मित्र गोळा करण्यात वाकगबार नाही. लोकांपेक्षा पुस्तकं, पार्ट्यांपेक्षा शांतता, आणि सगळ्यांबरोबर ढाणढाण गाणी ऐकण्यापेक्षा घरातच मंद स्वर ऐकण्यात रममाण होणारा. त्यात एक नंबरचा विसरभोळा - लोकांची नावं, चेहेरे लक्षात ठेवण्याची मारामार, तर वाढदिवस, अॅनिव्हर्सऱ्या (किंवा ते लिहिलेल्या डायऱ्या...) कुठे सांभाळत बसणार. एकेक मित्र असे गळत गेले. काही त्याबाबतीत नशीबवान असतात. काही त्यासाठी परिश्रम घेतात. त्यामुळे त्यांच्या मैत्र्या खूप काळपर्यंत घट्ट टिकून राहातात - व्यवस्थित निगा राखल्यामुळे भक्कम राहिलेल्या बत्तिशीसारखे. माझं लहान वयातच मोजके दात लुकलुकणारं बोळकं झालं.

भारतात अनेक वाऱ्या झाल्या. पहिल्या काही वेळा पुनर्भेटीचा आनंद होता. होस्टेलवर जाऊन दोस्तांना भेटणं हे असायचंच. आयायटीशी माझं विशेष नातं. हॉस्टेल रूमच्या भिंतीवर मधुबाला काढलेली होती. ती जाऊन बघून येणं हा एक कार्यक्रम असे. नंतर राहायला आलेल्या लोकांनी अनेक वर्षांच्या रंगरंगोटीतून ती जपलेली होती. ती बायकोला अभिमानाने दाखवली होती. इतरही हौशी असायच्या. ठरलेल्या ठिकाणी भेळपुरी हादडून त्याच्या शेजारीच कुल्फी खाणं, हौस म्हणून नेहेमीच्या बसने प्रवास करणं, कुठे काय बदलतंय ते बघणं, या सगळ्यांत एक गंमत होती, एक हवेसेपणा होता. ते हळुहळू बदलायला लागलं. कधी, कसं लक्षातदेखील आलं नाही. आयायटीचं नंतर नंतर नुसतं दर्शनच असायचं, कारण त्या अवखळ हसणाऱ्या मधुबालाशिवाय ओळखीचे कोणी शिल्लक नसायचे. मित्र, लहान भावंडं हळुहळू लग्नाळायला लागले. काहींचे केस विरळ झाले, तर काही पांढरे व्हायला लागले. चेहेरे थोडे वेगळे दिसायला लागले. एकमेकांना छेद देणारी वर्तुळं मोठी होऊन दूर सरकायला लागली. आठवणी अंधूक व्हायला लागल्या.

मधुबाला पुसली गेल्याचं उडत उडत कळलं तेव्हा खूप काही हरवल्यासारखं वाटलं.

अशीच वर्षं जात होती आणि दिवसेंदिवस रस कमी होत होता. काही महिन्यांपूर्वी मी मराठी संस्थळांवर लिहायला सुरूवात केली. लेख लिहिले, लोकांचे वाचले, तावातावाने केलेल्या चर्चांमध्ये तितक्याच तावातावाने भाग घेतला. प्रतिसाद दिले, संवाद झाले, खव, खफ, व्यनिंमधून ओळखी होत गेल्या. एरवी सामान्य परिचित लोकांच्या कंपन्यांमधली राजकारणं, स्टॉक मार्केट, सिनेमे असल्या साच्यातल्या विषयांपलिकडे जाऊन मराठी वाचन, लेखन, साहित्य, समाज यांविषयी माझ्याप्रमाणेच जिव्हाळा असलेले लोक भेटले. आयड्यांची व्यक्तिमत्वं धूसरपणे दिसायला लागली. वाद, भांडणांचे संदर्भ कळायला लागले. आणि या जगाविषयी, या लोकांविषयी आपुलकी वाटायला लागली.

हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे, अचानक, खूप काळाने पुन्हा एकदा मला भारतात यावंसं वाटलं. नातेवाईक भेटतील, आईवडिलांबरोबर वेळ घालवायला मिळेल हे नेहेमीचे जमेचे मुद्दे आहेतच. त्याहीपलिकडे यावेळी नवीन लोकांना, आयड्यांपलिकडच्या व्यक्तींना भेटण्याची इच्छा आहे. मराठी संस्थळांचं विश्व मल तसं नवीनच आहे. तरी इथे तुमच्याकडून, वाचकांकडून मला खूप आपुलकी मिळाली. चरकात घालूनही फारसा रस निघणार नाही अशी परिस्थिती येतेयसं वाटत असतानाच नवा ओलावा मिळाला. खूप दिवसांनी कोणालातरी भेटायला जावं ही इच्छा मनात जागी झाली. फिरून एकदा वाटलं...

बडे दिनों के बाद, हम बेवतनों को याद, वतन की मिट्टी आयी है...

20 मेला पोचतोय.

संस्कृतीदेशांतरसमाजप्रकटन

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

16 May 2010 - 11:52 am | बेसनलाडू

मी ११ जून ला पोचतो आहे. १६ जुलैपर्यंत देशात असेन. काहीशी धावपळ असेल. पुण्यामुंबईव्यतिरिक्त कदाचित अन्यत्रही भटकत असेन. मात्र वेळात वेळ काढून भेटीचा योग साधता आल्यास, पुण्यामुंबईकडच्या अनेक मिसळपावकरांना एकत्रित भेटता आल्यास उत्तम!
(सामूहिक)बेसनलाडू
जमल्यास कधी कुठे भेटायचे सांगा. त्यानुसार संपर्क व्यवस्था कळवतो. येथे मिल्पिटासमध्येच भेटायचे झाल्यास तसेही सांगा. त्यानुसारची (वेगळी) संपर्क व्यवस्था कळवतो.
(संपर्कसाधू)बेसनलाडू
बाकी देशात जायचे, कितीही वार्‍या करायचे सुख वेगळेच. येथे राहून देशाची वारी ही मी पंढरीच्या वारीइतकीच पुण्याईची समजतो.
(पुण्यवान)बेसनलाडू

शिल्पा ब's picture

17 May 2010 - 11:41 am | शिल्पा ब

milpitas मध्ये कुठे?

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

आजच नॉर्थ मिल्पिटास बुलवावरील स्टारबक्स मधे श्री. घासकडवी महोदय, सौ. घासकडवी आणि चि. घासकडवी यांची भेट झाली. तीनेक तास नानाविध विषयांवर गप्पा रंगल्या.
(गप्पिष्ट)बेसनलाडू

शुचि's picture

17 May 2010 - 6:25 pm | शुचि

मजा आहे बुवा तुमची. आमच्या शहरात कोणी येतच नाही. बहुतेक मीनल येतेय पण : ). मी भेटणारे.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

प्राजु's picture

17 May 2010 - 10:59 pm | प्राजु

११-१८ जून दरम्यान जे फ्लाईट मिळेल त्या फ्लाईट ने भारतात येते आहे.. :)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

खुप भावनाप्रधान होउन लेख लिहलात ते जाणवत. =D> जुन्या आठवात हारवलात ना?
(या!! या !! भानावर या आता.२० तारखेला यायचय ना? :) )
man
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

वाचक's picture

17 May 2010 - 6:57 am | वाचक

मातृभूमीची आठवण अशी सहजा सहजी पुसली जात नाही म्हणतात ते काही खोटे नाही. शेवटी ते आपल्या 'जीन्स' मधेच लिहिले गेले आहे, पुलंनी म्हंटल्याप्रमाणे 'अंतरीचा आत्माराम कधी कुठल्या गोष्टीची मागणी करेल हे काही सांगता येत नाही' - मग ते पिठले असो की भारत वारी.

मस्त मजा करुन या. शुभास्ते पंथान:

Nile's picture

17 May 2010 - 7:01 am | Nile

मातृभूमीची आठवण अशी सहजा सहजी पुसली जात नाही म्हणतात ते काही खोटे नाही

हेच.

शेवटच्या उतार्‍यातील भावना ओळखीच्या!

शुभास्ते पंथान संतु! मजा करा! :)

-Nile

अप्पा जोगळेकर's picture

16 May 2010 - 6:03 pm | अप्पा जोगळेकर

सही लिहिलंय. एकदम टची. भावना पिळून काढण्यासाठीचे चरकसुद्धा नाहीत. जास्तीत जास्त नैसर्गिक वाटलं. सगळे स्वकीय भेटोत अशा शुभेच्छा.

पाषाणभेद's picture

16 May 2010 - 6:08 pm | पाषाणभेद

या हो या तुम्ही. देश अन आम्हीही तुमचेच आहोत. तुमच्यासारखीच परिस्थिती दुसर्‍यांचीही झालेली असेल.
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

माझी जालवही

अरुंधती's picture

16 May 2010 - 6:33 pm | अरुंधती

जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसि |
मातृभूमीत स्वागत :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 May 2010 - 6:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

:-)

गुर्जी, नक्कीच भेटू या!

अदिती

अक्षय पुर्णपात्रे's picture

17 May 2010 - 3:25 am | अक्षय पुर्णपात्रे

मी २२ मेला पोचणार आहे. जमल्यास भेटू. लेख फारसा आवडला नाही.

ऋषिकेश's picture

16 May 2010 - 6:43 pm | ऋषिकेश

अन्यत्र दिलेला प्रतिसाद पुन्हा इथे:

या या.. आपल्या भारतात तुमचे स्वागत आहे :)
या गाण्याची जादु मी अनुभवली नसली तरी अमेरिकेत असताना स्वदेस रिलिज झाला व त्यातील "ये जो देस है तेरा..." या गाण्याने काळीज पिळवटून निघालं होतं... तसंही मी अमेरिकेत फारसा रमत नाहि.. सुरवातीला एक-दिड वर्ष काढलं तेवढंच.. नंतर फक्त छोट्या छोट्या (२-३ महिन्यांच्या) ट्रिपा मारतो झालं.

तर ते असो.. येताय तेव्हा भेटायला नक्की आवडेल.. बाकी व्यनीतून

या निमित्ताने मी गेल्यावर्षी एका विशिष्ठ अनुभवामुळे कुंपणावरच्या मित्रांसाठी काहि ओळी लिहिल्या होत्या त्या आठवल्या..
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

लंबूटांग's picture

16 May 2010 - 8:57 pm | लंबूटांग

>>>त्यातील "ये जो देस है तेरा..." या गाण्याने काळीज पिळवटून निघालं होतं..

:( अगदी .. मी हे गाणे कितीही छान असले तरी म्हणूनच ऐकत नाही ... ऐकवत नाही :(

रेवती's picture

23 Sep 2010 - 7:49 pm | रेवती

मीही.

श्रावण मोडक's picture

16 May 2010 - 6:56 pm | श्रावण मोडक

या. वाट पाहतोय.
स्वगत: जून हा माहेरपणाचा सीझन दिसतोय. ;)

मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु होतात तेंव्हा!:)

sur_nair's picture

16 May 2010 - 7:26 pm | sur_nair

स्वताच्या मनातले आणि आमच्याही मनाचे बोललात. जुन्या मित्रमैत्रिणींच्या आठवणी काही वेगळ्याच असतात. कधी पुण्याला गेलो कि पुन्हा मित्रांबरोबर अमृततुल्यात्ला चहा घेताना वाटते कि फक्त चहाची किंमत १ रुपयातून १० रुपये झाली, बाकी सर्व तसेच राहिले. तुमची भेट अशीच सफल होवो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 May 2010 - 9:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वागत आहे...!

-दिलीप बिरुटे

बिपिन कार्यकर्ते's picture

16 May 2010 - 10:34 pm | बिपिन कार्यकर्ते

वेल्कम सर, वेल्कम. नुसतं भारतातंच नव्हे तर या आयड्यांच्या भूलघालू जगातही.

भेटूच.

बिपिन कार्यकर्ते

नीलकांत's picture

17 May 2010 - 8:53 am | नीलकांत

हेच म्हणतो,

तुमचे स्वागत आहे.

- नीलकांत

Pain's picture

17 May 2010 - 12:37 am | Pain

त्या रात्री भले भले रडले....
पुरुष रडत नाहीत !

बेसनलाडू's picture

17 May 2010 - 12:41 am | बेसनलाडू

पुरुष रडत नाहीत हा जावईशोध कुणी कसा लावला असावा बरे? अगदी धाय मोकलून रडत नसले तरी सद्गतित होत असावेत, गहिवरून डोळ्यांत पाणी येत असावे, असे वाटते.
(अंदाजपंचे)बेसनलाडू

भडकमकर मास्तर's picture

17 May 2010 - 12:52 am | भडकमकर मास्तर

आणि प्रसंगात वर्णन केल्याप्रमाणे दारू पिऊन / आठवणींनी भावनिक होऊन रडण्याची तर भरपूरच शक्यता...
_____________________________
श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?

Pain's picture

17 May 2010 - 12:59 am | Pain

आणि हो, दारुही पिउ नये.

ब्रिटिश टिंग्या's picture

17 May 2010 - 10:24 am | ब्रिटिश टिंग्या

>>आणि हो

आपण कोल्हापुरला असता का?

टारझन's picture

17 May 2010 - 10:44 am | टारझन

टिंगुस .. ते "आणि हो" नसुन "आणि हो," आहे ... :)
तेंव्हा कोल्हापुरचे असण्याची शक्यता कमीच
आणि हो बाकी काय म्हणता

Pain's picture

17 May 2010 - 12:51 am | Pain

रडणे अपेक्षित नाही. किमान एवढ्या साध्या गोष्टीसाठी तरी नाही.
याउप्पर तुमची मर्जी...

बेसनलाडू's picture

17 May 2010 - 1:17 am | बेसनलाडू

साधी गोष्ट, खास गोष्ट हे सगळे कुणी कसे ठरवायचे? त्या गोष्टी सापेक्ष नव्हेत काय?
(निरपेक्ष)बेसनलाडू

शिल्पा ब's picture

17 May 2010 - 11:47 am | शिल्पा ब

काही लोकांना नाहीच समजत....स्वतःचे मत दुसऱ्यावर लादायचा प्रयत्न कशाला करायचा...ज्याच्या त्याचा भावना...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

Pain's picture

17 May 2010 - 1:58 am | Pain

ठीक आहे. उदाहरण देतो.
परिवारातील कोणाचे निधन झाल्यास रडणे समजण्यासारखे आहे.
इथे लेखक काही काळानंतर घरच्यांना भेटू शकला असता.मस्तपैकी ३ जुन्या, चांगल्या मित्रांबरोबर राहात होता, त्यात बाकी सगळे भेटायला आले.मग कशाला रडायचे ?

बेसनलाडू's picture

17 May 2010 - 2:35 am | बेसनलाडू

१. मी अमेरिकेत आल्यानंतर सर्वप्रथम दीड वर्षांनी भारतात परत गेलो होतो. त्यांनंतरच्या पाच वर्षांच्या वास्तव्यात पाच वेळा भारतवारी घडली आहे. तरीही प्रत्येक वेळी भारतातून अमेरिकेत परतताना माझ्या आईप्रमाणेच वडिलांच्याही डोळ्यांत पाणी येते.
२. कॉलेजातील दोन जिवलग मित्रांना पहिल्यांदा भेटलो ते कॉलेज सोडून एक-दीड वर्ष(च) लोटल्यावर. त्याप्रसंगी त्यांच्यापैकी एकाच्या डोळ्यांत पाणी आले होते.
सारांश - डोळ्यांत पाणी येण्याचा प्रसंग दु:खाच्या वेळीच येतो असे नाही; आनंदाश्रू नावाचा प्रकारही असतो. अभिमानाने डोळे भरून येणे (इत्यादी इत्यादी) असते. त्याचा पौरुषत्त्वाशी नि स्त्रीत्त्वाशी संबंध कमी (किंबहुना शून्य) पण भावनिक जवळीक असणे आणि स्वतःला व्यक्त करता येणे, याच्याशी जास्त असतो. असो.
(सुस्पष्ट)बेसनलाडू

Pain's picture

17 May 2010 - 1:03 pm | Pain

मीपण अमेरिकेत आल्यानंतर सर्वप्रथम दीड वर्षांनी भारतात परत गेलो होतो. माझ्या बाबांच्या डोळ्यातून पाणी नाही आले. मला त्यांच्याकडून हेच अपेक्षित आहे आणि फार आवडते.

त्यांनंतरच्या पाच वर्षांच्या वास्तव्यात पाच वेळा भारतवारी घडली आहे
:खूप जळजळ वाटते :D असो.

डोळ्यांत पाणी येण्याचा प्रसंग:
आनंदाश्रू किंवा अभिमानाचा प्रसंग, यात तुमचे बरोबर असावे (मला अनुभव नाही)
मी फक्त दु:खाच्या वेळच बोलत आहे.
मानसिक कणखरपणा असणे/ नसणे हा माझा मुद्दा होता.

आणि
त्याचा पौरुषत्त्वाशी नि स्त्रीत्त्वाशी संबंध कमी (किंबहुना शून्य) :
तुमचे बरोबर आहे. मी प्रचलित आणि आवडत्या समजानुसार टीपणी* केली होती. (just my opinion, not a fact)

आईप्रमाणेच वडिलांच्याही डोळ्यांत पाणी येते.
त्याबद्दल काही म्हणायची सोय नाही आमच्याकडे.

शुचि's picture

17 May 2010 - 2:16 am | शुचि

आपल्याला प्रवासाच्या आणि भारतातील मुक्कामाच्या शुभेच्छा. फोटो काढा भरपूर. जरूर प्रवास वर्णन लिहा.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

हे तर राहिलेच ! आईच्या हातचे खा, सगळ्यांना भेटा, मजा करा :)

सहज's picture

17 May 2010 - 6:47 am | सहज

कोणीही कितीही विसरभोळा, माणुसघाणा असला तरी कुठेतरी स्व:ताला आभासी जीवनाचा फायदा घेउन माणसात गुंतवत असतोच. त्यातुन एखाद्याला लोकात मिसळणे(किंवा घाउक द्वेष करायला), गप्पा(टोमणे) मारायला आवडत असेल तर मसंस्थळाचे व्यसनात रुपांतर कधी होते कळतही नाही.

पुढे कधीतरी याचा परिणाम पेट्या इकडून तिकडे करण्यात होते. फायनान्शीयल इन्व्हेस्टमेंटचे फारसे कौतुक नसले तरी इमोशनल इन्व्हेस्टमेंट डे ट्रेडिंगप्रमाणे वर खाली अगदी विथ लिव्हरेजेस! आणी मग द रेस्ट इज हिस्ट्री.

हॅपी जर्नी.

जाताजाता: माझ्या एका सहीप्रेमी मित्राला तुमची भेट घ्यायला नक्की सांगीन.

श्रावण मोडक's picture

17 May 2010 - 5:22 pm | श्रावण मोडक

जाताजाता: माझ्या एका सहीप्रेमी मित्राला तुमची भेट घ्यायला नक्की सांगीन.

हाहाहाहा... हे धंदेही???

मदनबाण's picture

17 May 2010 - 9:08 am | मदनबाण

हिंदुस्थानात स्वागत आहे...
लेख आवडला... :)

मदनबाण.....

"Life is an art of drawing without an eraser."
John Gardner

युयुत्सु's picture

17 May 2010 - 5:24 pm | युयुत्सु

मधुबाला पुसली गेल्याचं उडत उडत कळलं तेव्हा खूप काही हरवल्यासारखं वाटलं.

घाश्यानं ४० पेन्सिली वापरून काढलेली मधुबाला भन्नाट होती बरं का? मी ती बघितलेली आहे.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

परिकथेतील राजकुमार's picture

17 May 2010 - 6:09 pm | परिकथेतील राजकुमार

घाश्यानं ४० पेन्सिली वापरून काढलेली मधुबाला भन्नाट होती बरं का? मी ती बघितलेली आहे.

त्यामुळेच ती पुढे आपणहुन अदृष्य झाली असावी. ;)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

टारझन's picture

17 May 2010 - 9:17 pm | टारझन

>>> त्यामुळेच ती पुढे आपणहुन अदृष्य झाली असावी.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =))
किंबहुणा पहायला गेले माधुरी ... आणि दिसला मधुर (भांडारकर हो) .. =)) असं नाही ना झालं ?

©º°¨¨°º© लारा ©º°¨¨°º©
आमचे जंगल

टुकुल's picture

17 May 2010 - 5:59 pm | टुकुल

खुपच मनापासुन लिहिल आहे.
या तुम्ही, पुण्यातल्या एखाद्या कट्याला आपली गाठभेट होइल :-)

--टुकुल

अमोल केळकर's picture

17 May 2010 - 6:15 pm | अमोल केळकर

परदेशात रहाणार्‍यांच्या मातृभुमी बद्दलच्या भावना या आपल्या लेखातून छान मांडल्या आहेत :)
अवांतरः
(आमच्या साठी तर मुंबई हे आमचे परदेश आणि सांगली ही मातृभुमी
आपण वर्णन केलेल्या सर्व भावना आमच्या सांगली - मुंबई वार्‍यांसाठीही लागू होतात )

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

आम्हाघरीधन's picture

17 May 2010 - 9:39 pm | आम्हाघरीधन

+१ सहमत

टारझन's picture

17 May 2010 - 10:02 pm | टारझन

मी सुद्धा मुंबैत असतो .. पण मी पुण्याला राहातो. एव्हरी विकेंड पुण्याला पळतो. काय सांगु .. शुक्रवारी जेंव्हा मी पुण्याला जायला रेडी होतो .. तेंव्हा आमच्या पुर्ण क्युबिकल मधली लोकं धाय मोकुन रडतात , (उर बडवतात म्हणाना) .. आणि निघण्या आधी घरी फोन केला की आई तर तिथेच रडायला लागते ... :)
घरी गेलो ... की आई बाबा भाऊ बहिण .. असे लायनी ने रडायला बसलेले असतात , आम्ही सगळे यमणात रडतो. असा अर्धा एक तास रडुन होई पर्यंत घरायलं सामाण अश्रुंच्या तळ्यावर तरंगायला लागतं .... मग आम्ही थांबतो आणि नेटाने पुन्हा घर स्वच्छ करतो. असाच कार्यक्रम मी सोमवारी सकाळी निघताना पुन्हा एकदा होतो . गेल्या पाच आठवड्यांत मी पाच वेळा गेलो , तरीही असेच होते हे वैषिष्ठ्य ;)

- असेच रडारडवी

Dhananjay Borgaonkar's picture

17 May 2010 - 11:11 pm | Dhananjay Borgaonkar

आम्ही पण ४ वर्षे मुंबईत काढली. दर शुक्रवारी पुणे आणि सोम्वारी मुंबै.
स्वदेस पाहिला सेंटी झालो आणि तडक पुण्यात निघुन आलो..
=)) =)) =))

अप्पा जोगळेकर's picture

17 May 2010 - 7:03 pm | अप्पा जोगळेकर

परदेशस्थ भारतीय खूप झालेत बॉ इकडे.

प्रकाश घाटपांडे's picture

17 May 2010 - 9:29 pm | प्रकाश घाटपांडे

येताना श्यांपेन बी घेउन या! मारु उली उली. यकदम तराट व्हायला नको!
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

श्रावण मोडक's picture

17 May 2010 - 10:06 pm | श्रावण मोडक

+१

इंटरनेटस्नेही's picture

23 Sep 2010 - 3:01 pm | इंटरनेटस्नेही

सुंदर लेख.

मी मुळातच तसा मित्र गोळा करण्यात वाकगबार नाही. लोकांपेक्षा पुस्तकं, पार्ट्यांपेक्षा शांतता, आणि सगळ्यांबरोबर ढाणढाण गाणी ऐकण्यापेक्षा घरातच मंद स्वर ऐकण्यात रममाण होणारा. त्यात एक नंबरचा विसरभोळा - लोकांची नावं, चेहेरे लक्षात ठेवण्याची मारामार, तर वाढदिवस, अॅनिव्हर्सऱ्या (किंवा ते लिहिलेल्या डायऱ्या...) कुठे सांभाळत बसणार

माझाही स्वभाव असाच आहे . मित्रांनीच सांभाळून घेतलंय आत्तापर्यंत. (मैत्रीच्या व्याख्येत ह्याही एका गुणाचा समावेश असावा.)

आँ? हा लेख कसा काय वाचायचा राहिला असं वाटलं.
त्यावेळी मी भारतात होते हे विसरले.;)
छान लिहिले आहे. घासकडवींचं लग्न झालय हे माहितच नव्हतं.
मला वाटलं अजून विद्यार्थीदशेत असावेत!