नैनिताल : एक काकडलेला अनुभव

अरुंधती's picture
अरुंधती in जनातलं, मनातलं
29 Apr 2010 - 2:27 am

नैनिताल म्हटले की डोळ्यांसमोर येते विशाल पर्वतराजी, नेत्रसुखद निसर्ग, मनाला आल्हाद देणारे नैनी सरोवर.....

बर्‍याच वर्षांपूर्वी केलेला माझा नैनितालचा प्रवास म्हणजे या सर्व सुंदर वातावरणाच्या पार्श्वभूमीवर बाह्यतः केलेली मौजमजा व अंतर्यामी विचारमंथन असा दुहेरी अनुभव होता. परवाच एका वर्गमित्राने ओर्कुटवर त्या प्रवासाचे व सहलीचे काही फोटोज अपलोड केले आणि ते पाहिल्यावर मनात त्या सहलीच्या स्मृती रुंजी घालू लागल्या.

महाविद्यालयाच्या अखेरच्या पर्वातील अभ्यास-सहल म्हणजे सर्व मित्र-मैत्रिणींच्या सोबत धमाल करण्याचा अधिकृत परवानाच जणू! मी व आमच्या वर्गातील सहाध्यायी मित्र-मैत्रिणीही याला अपवाद नव्हतो. अभ्यासाच्या सर्व स्थळांची सहल करून झाल्यावर आमच्या सहलीचा मोर्चा नैनितालकडे वळला. नैनितालला आम्हाला ''कोणतेही वेळापत्रक पाळावे लागणार नाही'' असे बरोबरच्या प्राध्यापकांनी सुतोवाच केल्यावर तर आमचा उत्साह अजूनच वाढला होता. त्याचीच परिणिती म्हणून की काय, आमचे प्रवासात अखंड टिवल्याबावल्या करणे, चिडवाचिडवी, भेंड्या, उखाळ्यापाखाळ्या, खोड्या असे उद्योग चालू होते. :D

दिल्लीहून एक संपूर्ण रात्र नागमोडी, वळणावळणाच्या रस्त्यांनी बसचा ''जागर'' प्रवास केल्यावर भल्या पहाटे नैनिताल आले. तिथे गाडीतून पाऊल बाहेर टाकले मात्र, आणि चरचरून काटा आला अंगावर! बरोबरच होते, ऐन नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धातील हाडे गोठवून टाकणारी थंडी आम्हाला ''सुबुध्द'' लोकांना जरा अनपेक्षितच होती! :S

तशी आम्हाला आमच्या प्राध्यापकांनी नैनितालच्या थंडीची पूर्वसूचना दिली होती. परंतु तरुणाईच्या जोषात आम्ही तिकडे फारसे लक्ष दिले नव्हते.

परिणामी, चाळीस जणांचा आमचा जथा कुडकुडत, थरथरत, सुन्न होऊन नैनितालच्या नैनी सरोवराच्या काठालाच लागून असलेल्या पर्यटक निवासात दाखल झाला. दिवसा साधारण तीन ते चार डिग्रीज सेल्सियस तापमान असायचे. रात्री ते किती घसरायचे ह्याची कल्पनाच न केलेली बरी! त्यात आम्ही सरोवराच्या काठालाच असल्याने तो गारठा अजूनच वेगळा! सकाळी दहा वाजता सूर्य उगवायचा (म्हणजे आभाळात धुगधुगी आल्यासारखा दिसायचा! ) बाकी वेळी धुकाळ वातावरण, बोचरी थंडी, रक्त गोठविणारे वारे आणि मधूनच दाटून येणारा अंधार! भर दुपारी निस्तेज सूर्याला काळेसावळे ढग आणि धुके काही काळ झाकून टाकायचे. लख्ख दुपारीही अंधाराचे साम्राज्य! आणि जरा कोठे सूर्य पुन्हा दिसू लागला की दुपारी चार-पाच पर्यंत तो मावळलेलाही असायचा! काय ही घोर फसवणूक!! =((

अनपेक्षित थंडीने आमचे प्रेमळ स्वागत केल्यावर आमची स्थिती तर काय वर्णावी!! नाक, कान, चेहरे थंडीने कोरडे, लाल पडलेले... हात-पाय कधीही बधिर होऊन दगा देतील अशा स्थितीत! पहिल्याच दिवशी स्थानिक बाजारातील दुकाने उघडल्यासरशी आमची टोळी तेथील दुकानांमधून ढीगभर स्वेटर्स, शाली, कानटोप्या इत्यादी खरेदी करून आली. इतकेच नव्हे तर पुण्यातील आपल्या कुटुंबियांसाठीही प्रत्येकाने पुण्यात तीन - चार डिग्रीज सेल्सियस तापमान असल्याच्या थाटात वारेमाप गरम कपडे घेतले! (त्यानंतर तब्बल १२ - १३ वर्षांपर्यंत आमच्या घरी नैनितालच्या लोकरी स्वेटर - शालींची पुण्याई पुरी पडत होती, म्हणजे बोला!) एवढ्या थंडीत प्रवासाने आखडलेले आमचे हात-पायही चटचट हालत नव्हते. अंघोळीच्या नुसत्या कल्पनेनेही जीव नकोसा होत होता. स्नानगृहात एरवी तासंतास रेंगाळणाऱ्या भद्रकन्या विजेच्या चपळाईने स्नानादिकर्म आटोपून बाहेर येत होत्या. :D
आणि आंघोळ म्हणजे तरी काय? गरम पाणी झटक्यात निवून जात असे. मग कुडकुडत कसेबसे दोन-चार तांबे अंगावर पाणी घ्यायचे आणि त्यालाच ''स्नानकर्म'' असे म्हणायचे. पोरांच्या गोटात तर अनेकांनी आंघोळीच्या गोळ्यांचा नियमित खुराक सुरु केला होता! :P

थंडीच्या मोसमामुळे नैनितालमध्ये प्रवाशांची फारशी गर्दी दिसत नव्हती. दुकाने, हॉटेल्सही पटापट बंद होत असत. आम्ही त्यातल्या त्यात स्वस्त व मस्त अशा ढाबावजा टपरीत बसून गरम चहा, ब्रेड-बटर-सटर-फटर आणि विस्तवाच्या ऊबेचा आनंद घेत असू. तिथे एकाच ठिकाणी बसून बसून बुडे बधिर झाली की हात-पाय झटकत, आपटत मार्केट रोडवरची दुकाने न्याहाळत किंवा आजूबाजूला आढळणार्‍या ओक, लिची, देवदार, पाईनच्या वृक्षराजीचा मनमुराद आनंद लुटण्यात वेळ घालवत असू.

आमच्या भल्या मोठ्या रूममध्ये तसा पाचजणींमध्ये मिळून एक हीटर होता, पण ऐन रात्री तो बंद पडत असे. रूमची एक बाजू सरोवराच्या दिशेने उघडत होती. त्या बाजूला मोठमोठ्या काचेच्या खिडक्या होत्या, जेणेकरून सरोवर व पलीकडील पर्वतराजींचा नयनरम्य देखावा सतत समोर असावा. आणि खरोखरीच दृष्ट लागावी असा मनोहर देखावा दिसायचा तिथून! पण आमच्या लेखी ह्या खिडक्या म्हणजे अधिक गारठण्याची क्रूर हमी होत्या! माझ्या मैत्रिणी थंडगार पडलेल्या गादीवर कूस जरी बदलावी लागली तरी अक्षरशः किंचाळत उठत असत, इतकी ती गादी बर्फासमान गार पडलेली असे. मला तर थंडीने झोपच नव्हती. अख्खी रात्र गादीचा ऊबदार कोपरा शोधण्यात व्यर्थ जात असे. :<

पहिल्याच रात्री माझ्या एका मैत्रिणीच्या पायात थंडीमुळे प्रचंड गोळे व मुंग्या आल्या. मुळात ती इतकी बारकुडी आणि छोटीशी होती की आमच्यापाशी असलेले चरबीचे अतिरिक्त ''कुशनिंग'' तिच्याजवळ नसल्यानेच तिला हा त्रास होत असणार या कल्पनेने सगळे तिची कीव करू लागले. :> आमच्या वर्गमित्रांना हे कळल्यावर त्यातील एकाने गुपचूप तिला थोडी ब्रँडी आणून दिली व रात्री ती पायाला चोळायला सांगितले.

पण ही मुलगी तर फार महान निघाली.... 8| तिला औषधासाठी चमचाभर ब्रँडी पोटात तर घेणे सोडाच, पण ती पायाला चोळायलाही महासंकोच वाटत होता. शेवटी रात्री पुन्हा एकदा थंडीने किंचाळून झाल्यावर तिने पायाला कण्हत कुथत ब्रँडी चोळली व खोलीतील इतर सर्व जाग्या मुलींकडून बाकी कोणालाही न सांगण्याचे वचन घेतले! (जसे काही आम्ही हिची बदनामीच करणार होतो, कप्पाळ! ) :$ :D 8}

थंडीमुळे आमचे सर्व प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचे बेत बारगळले. आमच्यातील काही अति-उत्साही वीर व वीरांगना गेले सुरुवातीला हिंडायला....भीमताल, हनुमानगढी, नैना देवीचे मंदिर, टिफिन टॉप वगैरे ठिकाणे पाहायला.... पण परत आल्यावर त्यांची रात्री थंडीने जी हालत झाली होती ती पाहिल्यावर तर आमच्यापैकी ७-८ जणांचा स्थळदर्शन रहित करण्याचा मनसुबा पक्का झाला. एक तर ह्या अगोदरच्या सहलीच्या सर्व टप्प्यांमध्ये अगदी नक्को नक्को एवढे स्थलदर्शन मुकाट सहन करावे लागले होते. B) आरामात, संथ गतीने जीवन जगण्याची सवय असलेल्या आम्हां कोमलचरणी, सूर्यवंशी, निशाचर पामरांना वेळापत्रके, कर्फ्यू टाईम, समूह-शिस्त वगैरे वगैरेचे अपचन होऊ घातले होते. :P आणि इथे तर नैनितालच्या गडद धुक्यामुळे व कधीही पडणाऱ्या अंधारामुळे मुख्य शहरापासून फार लांब जाणे, डोंगर तुडविणे जरा आमच्यासारख्या नवख्यांना धोक्याचेच वाटत होते. शिवाय कधीही असल्या थंडीची सवय नसल्याने सगळेजण एवढे गळाठले होते की दिवसभर बाजारात हिंडणे, रोप-वे वरून राईड घेणे, घुडसवारी करणे व नौकानयन याखेरीज खाणे-पिणे व झोपा काढणे (जमल्या तर, कारण थंडीमुळे झोपही यायची नाही! ) हाच उद्योग! त्यामुळे अनेकदा आम्ही क्वचितच उघड्या असणाऱ्या पर्यटन ऑफिसमध्ये घुसत असू व त्यांच्याकडील नैनिताल परिसराचे विविध रंगीत नकाशे, पुस्तिका यांच्यावर ताव मारून जणू आपण ती ती स्थळे प्रत्यक्ष बघत आहोत अशा तऱ्हेचे सोंग आणून मुक्त बडबड करीत असू. :D

संध्याकाळनंतर नैनितालच्या रस्त्यांवर मार्केट रोडवरील तुरळक ये-जा सोडली तर शुकशुकाट असे. सायकल-रिक्षावाले, गाईड्स, फेरीवाले थोडेफार ''टुन्न'' असत. त्यांच्या जीभा सैलावलेल्या असत. रस्त्यात कोणी स्वतःशीच बरळताना दिसे, तर कोणी रस्त्याच्या मधोमध भेलकांडत चालण्याचा प्रयत्न करत असे. ठिकठिकाणी शेकोटी पेटवून हातावर पोट असणारे लोक तिच्याभोवती कोंडाळे करून बसलेले दिसत. कधी हलक्या आवाजात गाण्यांचे स्वर कानावर पडत तर कधी त्या शेकोटीवीरांचे झिंगलेले हास्य! आणि आम्ही? आम्हाला तर थंडीमुळे प्रत्येक रात्र ''हाड''वैर्‍याची हे आता ठरून गेले होते!! :S

एके दुपारी, मनाचा हिय्या करून मी व माझ्या दोन मैत्रिणींनी आतापर्यंत टाळत आलेल्या नौकानयनाचा लाभ घेण्याचे ठरविले. एक नावाडी ठरविला. दुपारची वेळ असल्याने सूर्य नावाला का होईना, आकाशात दिसत होता. अर्थात त्या उन्हात काही दम नव्हता. गार वारे वाहत होते. सरोवरात बोटींची जास्त वर्दळ नसली तरी अनेक लोक आमच्यासारखाच नौकानयनाचा आनंद लुटायला आल्याचे दिसत होते. हवेतला बोचरा गारठा कमी होण्याची कसलीच लक्षणे नसल्यामुळे आम्ही आमच्या कॉलेजवयातील फॅशन सेन्स ला शोभणारे गरम कपडे घालून आलो होतो. (म्हणजेच, कपड्याच्या उबदारपणापेक्षा 'दिखावा' जास्त, हे सुज्ञांनी समजून घ्यावे! )

नावाड्याने नाव वल्हवायला सुरुवात केल्याबरोबर थोड्याच अंतरावर अचानक आभाळ दाटून आले. जोरात वारे वाहू लागले. आमची नाव गदगदा हालू लागली. सरोवरात इतरही बोटी होत्या. अंधारात नाव तशीच वल्हवली असती तर त्यांच्याशी टक्कर होण्याचा धोका असतो असे मौलिक ज्ञान आम्हाला नावाड्याकरवी मिळाले. :SS कोंदलेला अंधार आकस्मिक होता. पण नावाड्याला ह्याची सवय असल्यामुळे त्याने सराईतपणे नाव थांबविली, स्थिर केली व अचानक दाटून आलेला अंधार सरायची वाट पाहत विडी शिलगावून बर्फाळ हवेत धुराची वलये सोडू लागला. इथे आमचे प्राण मात्र कंठाशी आले होते! आमच्यापैकी एकीलाच पोहोता येत होते. आजूबाजूला डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही, एवढा गुडुप्प अंधार होता. नाव वाऱ्याच्या वेगासरशी डुगडुगत, डळमळत होती. नावाडी जगाची पर्वा नसल्यासारखा आपल्याच नादात होता. डोंगरातील एका देवळातून ऐकू येणारा अखंड घंटा गजर मात्र त्या अंधारातही आश्वासन देत होता. माझे सारे लक्ष त्या घंटानादाकडे एकवटले होते. मनातल्या मनात ईश्वराची प्रार्थना चालली होती. इतके दिवस आमची सर्वांची जी मौजमजा चालली होती, तिची चमक आता फिकी पडू लागली होती. अजून किती बघणार, किती पाहणार? किती प्रेक्षणीय स्थळे पाहिल्यावर हे डोळे निवणार? किती वेगळे वेगळे पदार्थ चाखणार? असे किती पदार्थ चाखले म्हणजे समाधान होणार? अजून किती मौजमजा करणार? याला काही अंत आहे का? असे कितीसे मौलिक ज्ञान आपल्याला ह्या अभ्यास-सहलीतून मिळाले? त्या अनुभवांनी आपले आयुष्य असे कितीसे समृध्द झाले? :/ मनात असे आणि अजून बरेच विचार उमटत होते.

सरोवरावर निःस्तब्ध शांतता पसरली होती. पक्षीही अंधारात चिडीचूप झाले होते. वातावरणात भरून राहिला होता तो फक्त घोंघावणाऱ्या वाऱ्याचा आवाज व अविरत चाललेला घंटानाद! त्याक्षणी मनात काहीतरी हालले. एक पडदा गळून पडला. आपण जे काही करतोय त्यापेक्षा बऱ्याच वेगळ्या कार्याच्या दिशेने जाण्याची अंतर्सूचना मिळाली. गोंधळलेले मन जसे सावरत होते तोच सूर्यानेही अचानक काळ्यासावळ्या ढगांच्या व धुक्याच्या आडून एकदम बहारदार दर्शन दिले! सरोवरातील नौकाप्रवाशांमधून आनंदाचे एकच चीत्कार उमटले. #:S आमच्या नावाड्याने नाव वळवून पुन्हा काठाच्या दिशेने प्रवास सुरु केला. एवढा वेळ निसर्गाच्या ह्या आकस्मिक रूपाने अवाक् झालेल्या माझ्या मैत्रिणींनाही कंठ फुटले. त्यांच्या गप्पा चालू होत्या, पण मी गप्पच होते. निसर्गाने आपल्या अजब करामतीची फक्त एक झलक दाखवून आपले सार्वभौमत्व सिध्द केले होते. मौजमजेलाही माणूस विटू शकतो, स्वतःतील अर्थपूर्ण अस्तित्त्वाला शोधू शकतो याची त्या क्षणी झालेली अनुभूती अवर्णनीय होती. :X त्या एका अनमोल जाणिवेने माझ्या डोळ्यांत आलेले कृतार्थतेचे अश्रू लपवितच मीही मग हसर्‍या चेहर्‍याने मैत्रिणींच्या चटपटीत गप्पांमध्ये सामील झाले.

काठावर आमच्या वर्गातील इतर मित्रमैत्रिणी आमची वाटच पाहत होते. आमच्या प्राध्यापकांनी आम्हाला तासाभरात मुक्काम हालविण्यासाठी तयार होण्याचा निरोप दिला होता.

कॉलेजवयीन नियमाला अनुसरून मी मनोमन(च!) त्या सूर्यदेवतेला नमस्कार केला व एका अनामिक उत्साहाने पुढील प्रवासासाठी सज्ज झाले! :-)

--- अरुंधती

प्रवासमौजमजाअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

29 Apr 2010 - 2:30 am | बेसनलाडू

चित्रमय, उत्कंठावर्धक प्रवासवर्णन करत आहात; पण त्याचबरोबर काही प्रकाशचित्रे डकवता आल्यास आणखी मजा येईल.
(प्रेक्षक)बेसनलाडू

सखी's picture

29 Apr 2010 - 7:36 am | सखी

बे.ला.सारखेच म्हणते. अजुन एक म्हणजे तुला इतक्या वर्षांपूर्वीचे सगळे कसे काय आठवता येते आणि इतकं चांगल लिहीताही? विशेषतः शेवटच्या परिच्छेदानी जणु काही वाचकांनाही अनुभुतीच दिली आहे.

अरुंधती's picture

29 Apr 2010 - 2:54 pm | अरुंधती

सखी, अगं जेव्हा एखाद्या ठिकाणी डोकं बधिर होतं [जसं माझं नैनितालमध्ये थंडीनं झालं होतं!!! :)) ] तेव्हा फक्त डोळे, कान, नाक, स्पर्श यांद्वारे त्या त्या ठिकाणच्या गोष्टी बहुतेक माझ्या ''मेमरी स्टिक''मध्ये सेव्ह केल्या जात असाव्यात. पण त्या वेळी जर मला कोणी विचारले ना, की तुझा या स्थळाविषयीचा काय अनुभव आहे, तर मला आईशप्पथ काहीही सांगता येणार नाही!!!! हे खूप वेळा झालंय असं..... लोक त्या ठिकाणी त्या देखाव्याविषयी, जागेविषयी वगैरे भरभरून बोलत असतात आणि मी गारठलेल्या पुतळीसारखी फक्त सर्व काही ''स्टोअर'' करत असते.
मग सावकाश रवंथ करत बसते!!! ;-) :D

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

अरुंधती's picture

29 Apr 2010 - 2:38 pm | अरुंधती

बेसनलाडू, मित्रांकडचे त्या सहलीचे फोटोज पाहिले मी.... नैनितालच्या धुक्यासारखेच धूसर आलेत! आणि त्यांनी बरेच फोटोज त्यांच्या रूममध्ये चित्रविचित्र चेहरे, हातवारे, पोझेस देऊन काढलेले असल्यामुळे इथे नकोतच!! ;-)
पर्वतराजी, नैनी सरोवर यांचे फोटोज काढण्याऐवजी सर्वांनी आपापले मुखचंद्रमे झळकावलेत फोटोंमध्ये! अति दिव्यानुभूती!! :D

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

सुचेल तसं's picture

29 Apr 2010 - 2:59 am | सुचेल तसं

फारच सुंदर लेख!!!

चित्रा's picture

29 Apr 2010 - 3:20 am | चित्रा

हाडांत जाणारी थंडी आमच्याइथे नेहमीचीच झाली आहे आता, पण भारतात असतानाची थंडी अजूनच हाडात जाते (कारण हीटींग नसतेच जवळपास).

पण अनुभव खूपच आवडला - तुमच्या मैत्रिणीचा ब्रँडीचा किस्सा खास आहे! खूप हसले.

अरुंधती's picture

29 Apr 2010 - 2:41 pm | अरुंधती

चित्रा, आम्हाला त्या मैत्रिणीला कसे समजावावे हेच कळत नव्हते! एकीकडे तिचे खूप हसू येत होते तर दुसरीकडे तिची कीव करावीशी वाटत होती. सहलीनंतर तो किस्सा आठवून आम्हीही खूप हसायचो! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

शुचि's picture

29 Apr 2010 - 3:28 am | शुचि

अथ पासून इति पर्यंत वाचतच गेले. किती छान लिहीतेस गं. आणि विनोदीही : )
मस्त!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव

रेवती's picture

29 Apr 2010 - 6:11 am | रेवती

छान केलेस वर्णन!
अगदी कुठेही कंटाळा आला नाही. लेख वाचून हुडहुडी भरली हे सांगायलाच नको. तशीही मला थंडी आणि भिती जास्तच (वाजते) वाटते. पूर्व किनार्‍याला येण्याआधी नवर्‍याने मला 'थंडी फार असते' एवढेच साध्या शब्दात सांगितले होते. मी फिझरशिवाय बर्फ कुठेही बघितले नसल्याने, 'असून असून अशी किती थंडी असणार? घेतलेत कि दोन स्वेटर!" असा विचार केला होता. आता सवय झालिये पण हिवाळा किती असू शकतो त्याची कल्पना आली.
रेवती

अरुंधती's picture

29 Apr 2010 - 2:44 pm | अरुंधती

शुचि, रेवती, प्रतिसादाबद्दल धन्स! :-)
रेवती, << मी फिझरशिवाय बर्फ कुठेही बघितले नसल्याने, 'असून असून अशी किती थंडी असणार? घेतलेत कि दोन स्वेटर!" असा विचार केला होता. >>

फक्त दोन स्वेटर???? :D थंडीने गोठस्कर झाली असशील!!!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

Pain's picture

29 Apr 2010 - 12:09 pm | Pain

आमच्यापैकी एकीलाच पोहोता येत होते

अशा पाण्यात पोहोल्यानन्तर कोणीही वाचले नसते :(

अरुंधती's picture

29 Apr 2010 - 2:56 pm | अरुंधती

सर्व शक्यतांचा विचार करत होते हो मी! आणि ते पाणी इतकं बर्फाळ होतं की बास! आताही आठवून हुडहुडी भरते!! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

स्पंदना's picture

29 Apr 2010 - 12:20 pm | स्पंदना

म्हणजे वाचलच पाहिजे नाही का?
छान आहे लेख ! नाहीतरी कॉलेज सहलिन्ची मजा अगदी हनिमुन ल सुद्धा येत नहि! खरच अग! बघ ना जे कोण हुच्च गिरी करेल तो हिरो असतो कॉलेज मध्ये! होय कि नाही!! आम्ही एकदा बेन्गलोर ते धारवाड पुरा रस्ता कुत्र्यान सारखे भुन्कलो होतो.
वैतागुन शेवटी जेन्व्हा सर ओरडले तेन्व्हा एकान " म्याव'' म्हणुन सरान्ना हसु आणल होत.
तुझ्या आठवणिन बरोबर स्वतःच ही कॉलेज आठवल.

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

अरुंधती's picture

29 Apr 2010 - 2:47 pm | अरुंधती

अपर्णा, << आम्ही एकदा बेन्गलोर ते धारवाड पुरा रस्ता कुत्र्यान सारखे भुन्कलो होतो.
वैतागुन शेवटी जेन्व्हा सर ओरडले तेन्व्हा एकान " म्याव'' म्हणुन सरान्ना हसु आणल होत.>> =)) =)) =))

अशक्य हसले मी हे वाचून आणि तशी कल्पना करून!! सरांनादेखील बिचार्‍यांना काय काय सहन करावे लागले असेल!!!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Apr 2010 - 1:13 pm | बिपिन कार्यकर्ते

जबरदस्त कथन आणि थरारक अनुभव... छान... तो घंटानाद वगैरे तर अगदीच अद्भुततेच्या पातळीवर घेऊन जाणारा...

बिपिन कार्यकर्ते

टुकुल's picture

29 Apr 2010 - 2:24 pm | टुकुल

अरुंधती हे नाव वाचल कि बर्‍याच अपेक्षेने लेख उघडला जातो, अश्याच लिहित रहा.

--टुकुल

अरुंधती's picture

29 Apr 2010 - 3:03 pm | अरुंधती

बिपिन, टकुल, प्रतिसादाबद्दल धन्स! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

अमोल नागपूरकर's picture

29 Apr 2010 - 3:31 pm | अमोल नागपूरकर

उत्तम लेख !!! ऐन उन्हाळ्यात आम्हाला नैनीतालची सफर घडली.

स्वाती२'s picture

29 Apr 2010 - 5:12 pm | स्वाती२

मस्त!

अनिल हटेला's picture

29 Apr 2010 - 6:50 pm | अनिल हटेला

काय मस्त लिहीता तुम्ही!!
अगदी पूर्ण चित्र डोळ्यासमोर उभे करण्याची ताकद असलेलं लिखाण...जीयो !! :)

थंडी म्हणजे नेमकं कशाला म्हणतात,ह्याचा अनुभव आस्मादीकानी यंदाच्या वींटरात घेतला..आणी अगदी तॄप्त झालोये (वोडका रीचवून-रीचवून).....:-D असो....

अरुंधती म्हणजे उत्तम लिखाणाचे ब्रँड नेम झालयसं,जाहीर करावंसं वाटतये...:>

(थंडीने अजिबात कुडकुडे झालेला) ;)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D

प्राजु's picture

29 Apr 2010 - 6:48 pm | प्राजु

सुंदर अनुभव!!!
खूप छान लिहिले आहेस गं.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

मॅन्ड्रेक's picture

29 Apr 2010 - 10:56 pm | मॅन्ड्रेक

सुंदर अनुभव!!!
खूप छान लिहिले आहे.
+
at and post : Xanadu.

प्रियाली's picture

29 Apr 2010 - 11:26 pm | प्रियाली

लेख आवडला. थंडीच्या दिवसांत झोपल्यावर पावले थंड का पडत असावीत याचे कारण मला माहित नाही पण १००% थंड पडतात हे निश्चित.

सोपा उपाय - झोपताना पायमोजे घालून झोपावे. आता पुण्या-मुंबईतल्या लोकांना याची सवय नसल्याने मुबलक पायमोजे तुमच्याकडे होते का ते माहित नाही.

अरुंधती's picture

4 May 2010 - 7:26 pm | अरुंधती

प्रियाली,
आम्ही पायात मोजे, डोक्याला कानटोप्या/ मफलर, अंगात डबल कपडे व स्वेटर आणि शिवाय त्या गेस्ट हाऊसने पुरविलेल्या जाड दुलया घेऊन झोपत होतो तरीही थंडीने गच्छंती झाली होती! :D

बाकी प्रतिसादाबद्दल अनिल, प्राजु, मॅन्ड्रेक, स्वाती, प्रियाली, अमोल.... सर्वांचे आभार! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/