खटाऊची नोकरी भाग -१ http://www.misalpav.com/node/11782
खटाऊची नोकरी भाग -२ http://www.misalpav.com/node/11904
आमची कॉलनी म्हणजे अल्ट्रा सुशिक्षीत लोकांची आणि गिरणी म्हणजे शंभर टक्के अर्धशिक्षीत किंवा अशिक्षीत लोकांची गर्दी.अठरापगड लोकं इथे गोळा झालेले असायचे.कोकणी घाटी भैये आणि अण्णा अशी मिसळ .मुसलमान एखादाच. सगळ्यांना एकत्र आणणारी म्हणजे गिरणी. शिक्षण नसताना खात्रीशीर रोजगार फक्त कापड गिरण्याच मुंबईत देऊ शकायच्या.
खटाऊची संस्कृती आपला बाज या गिरण्यांच्या गर्दीत वेगळा टिकवून होती कारण खटाऊतले ऑफीसर आणि मॅनेजर फार उच्च शिक्षीत होते.
साठ ऑफीसर-जवळजवळ सगळेच व्हिजेटीआयचे. फार पूर्वी तर फक्त गोल्डमेडालीस्टच खटाऊत घेतले जायचे.
रीसर्च आणि डेव्हपमेंटचे वेगळे डिपार्टमेंट फक्त खटाऊत होते. साड्यांच्या डिझाईन साठी बेचाळीस कमर्शीअल आर्टीस्टचा ताफा कंपनीत होता.
त्यावेळी बासष्ठ गिरण्या मुंबईत होत्या .इतर गिरणीत जसे कामगार होते तसेच आमच्या कडे पण होते. अशिक्षीत होते दारुडे होते, कर्जबाजारी होते.
काम धड करत नाही म्हणून एकही कामगाराला कधीच नोकरीतून काढून टाकले नव्हते.
याचे श्रेय मॅनेजर पासून कामगारापर्यंत सगळ्यांनाच होते.
याचा अर्थ असा नाही की कामगारांची बाजू घ्यायला युनीयन नव्हत्या.
युनीयन दोनच .एक राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि दुसरी लाल बावटा.
एक ईंटकची आणि दुसरी कम्युनीस्ट.
पगाराच्या दिवशी युनीयनचे दोन रुपयाचे एक तिकीट कामगार घ्यायचे.
युनीयनचे लिडरही कामगारच होते. एखादा कामगार दारू पिऊन कामावर आला तर मॅनेजरच्या आधी युनीयन वाल्याला कळवले जायचे. युनीयनवाला त्याचं बखोट धरून त्याला गिरणी बाहेर काढायचा.त्याच्या जागी दुसरा उभा रहायचा. एक पारस्पारीक सामंजस्य करार असल्यासारखे सगळे वागायचे. डिपार्टमेंटच्या बाहेर कुठलंच प्रकरण जाणार नाही याची काळजी कामगार आपापसात घ्यायचे. कामाच्या हलगर्जीपणामुळे कुठल्याही कामगाराला कधी मिलबाहेर जायला लागले नाही पण चोरी करताना पकडलं गेलं तर एक मिनीट पण गिरणीत थारा मिळायचा नाही.
पण एकदा मात्र आमच्या एका कामगाराला कामात हलगर्जीपणा केला म्हणून काढून टाकायची वेळ आली होती ती मात्र पांडू गोपाळमुळे(नाव आणि वडलांचे नाव एकत्र घेण्याची ही गिरणीची एक खासीयत).
पांडू गोपाळ पांडू भट म्हणून जास्त ओळखला जायचा.
आपण भट असल्याचा त्याला फार अभिमान होता.
पण कामात अत्यंत चुकार आणि आळशी.
युनीयनवाल्यांनी सांभाळून घेतल्यामुळे बरीच वर्षे गिरणीत टिकला होता.
१३०१-४ हा त्याचा साचा नंबर.या साच्याच्या जोडीवर तो काम करायचा. आता साचा म्हणजे लूम .त्यात उभे आडवे धागे विणून कपडा बनायचा. आडवे धागे (वेफ्ट)विणण्यासाठी शटल असायचे त्याला कामगार धोटे म्हणायचे.बिमवरून उभे धागे (वार्फ) पुढे आले की धोटा आडवा फिरायचा .
एका वेळी बिमवर तीन हाजार चारशे धागे पुढे यायचे.
पांडू भट आपली अक्कल चालवून हे काम कसे बंद पडेल आणि पर्यायानी आपल्याला आराम कसा करता येईल याच्या क्लुप्त्या शोधत असायाचा. शिस्तीचा बडगा कधी मिळायच नाही असं नव्हतं.
गिरणीत कामचुकारपणाला चार आणे दंड असायचा.तीन दंड झाले की एक वॉर्नींग पास मिळायचा. तीन वॉर्नींग पास झाले की एक चार्जशीट.
तेव्हाचे गिरणीतले वातावरण सगळ्यांना सांभाळून घेण्याचे होते याचा पूरेपूर फायदा पांडोबा घेत होते. असे होता होता पांडूभटाच्या नावावर अकरा चार्जशीट जमा झाल्या होत्या.
पांडोबांची मस्ती मात्र कायम होती.
कामचुकारपणा अंगात भिनलेला होताच पण डोके सुपीक होते. पांडूनी एक नवी शक्कल लढवायला सुरुवात केली.
कामाच्या आधी अर्धा तास पांडू हजर व्हायचा. धोट्याची (शटलची )जोडी बादलीभर पाण्यात बुडवून ठेवायचा. लाकडी धोटे पाण्यात फुगायचे. लूम ला हे धोटे जोडून विव्हींगची सुरुवात
झाली की थोड्याच वेळात धोटे फायबरच्या बफरवर आपटायचे .असे दोन चार वेळा झाले की ते धोटे फुटायचे. बिम मात्र चालू असल्यामुळे उभे धागे तुटायचे.एक मोठा गुंता व्हायचा .काम थांबायचे. ह्या गुंत्याला आर्या झाला असे म्हणायचे आणि भटाचे काम संपायचे.भट बोंबलत फिरायला मोकळा.
रात्रभर जॉबर आणि फालतू त्याच्या साच्यावर धागे जुळवत बसायचे. पांडूभटाच्या ह्या कुरापतीला डिपार्ठमेंट कंटाळलं.
सगळे सहकारी -जॉबर -मॅनेजर त्याच्या विरुध्द गेले.
पांडूभटाला एक नविन अंतीम चार्जशिट दिली गेली. चौकशी झाली. ह्याच्या बाजूने कुणीच नाही. निकाल लागला. पगाराच्या दिवसापासून पांडू गोपाळला कामावरून काढून टाकण्याचा आदेश आला.
बोर्डावर कामवरून काढून टाकण्याची नोटीस लागली.
पांडूचे धाबे दणाणले. त्याची धावपळ सुरु झाली.युनीयन लिडर त्याला जवळ करेनात. दयेचा अर्ज फेटाळला गेला. पगाराची तारीख (पगार दहा तारखेला व्हायचा.)जवळ आली.
पांडू एक शेवटचा प्रयत्न म्हणून युनीयन वाल्यांकडे गेला.त्यांनी परत हाकलून दिले. शेवटी युनीयनची एक महीला नेता सत्यभामा शंकर यांना (प्रेमानी सगळेजण त्यांना भामी म्हणायचे)पांडूची दया आली.
भामीनी पांडूला सांगीतलं .
"बघ पांडू , नोकरी तर गेल्यात जमा आहे पण तूला धरमशी शेठच वाचवू शकतात."
आता समस्या अशी होती की आमचे धरमशी शेठ आठवड्यातून एकदाच ,बुधवारी ,अर्धा तास गिरणीत यायचे.
कामगारांसमोर तर दसर्याला दोन मिनीटे यायचे.
शेठला भेटायचे कसे ?
भामीनी पांडूला कानमंत्र दिला. पांडूनी दापोलीहून कुटुंबाला बोलावून घेतलं.चार पोरं आणि बायको.
पगाराच्या आधीचा बुधवार आला.पांडू सकाळपासून गेटवर बायकोमुलांसहीत हजर झाला होता.पांड्याचे नशीब एव्हढे चांगले की शेठची गाडी वेळेवर आली.
आता शेठ गिरणीत येणे हा बुधवारचा एक सोहळा होता. बंगल्यावरून गाडी निघाली की गिरणीत फोन यायचा.मॅनेजर लोकं धावपळ करायला लागायचे. मिलचे पटांगण ओस पडायचे. शेठची पांढरी मर्सीडीझ दुरून दिसली की फायर ब्रिगेड ते सात रस्त्यावरून येणारा रस्ता या दोन्ही बाजूची वाहतूक थांबवली जायची. वॉचमन दोन्ही बाजूनी खडी ताजीम देत उभे रहायचे. गाडी गेट वर आली की गेट ते पहील्या मजल्यावरची केबीन असे लाल कार्पेट अंथरले जायचे. ड्रायव्हरनी गाडीचे दार उघडले की शेठ पाऊल खाली ठेवायचे.
पांडू सकाळपासून गस्त घालत बसलेलाच होता. गाडी आली आणि पांडू नी स्वतःला मुलांसकट गाडीसमोर झोकून दिले.शिंदे ड्रायव्हरनी करक्चून ब्रेक दाबत गाडी थांबवली.
एकच गोंधळ. शेठ नी विचारले "शिंदे क्या हो गया ?"
पांडू गाडी के सामने सोया है " ड्रायव्हरनी उत्तर दिले.
शेठनी एक नजर टाकली."आ बाळको कोण छे"
"पांडूची पोरं आहेत शेठ"ड्रायवरनी सांगीतलं
"फिर गाडीके सामने क्युं सोये है" शेठना काही कळेना .
"पांडूको काम से निकाला हैना इसलीये सोये हय."
हा तमाशा चालू असताना पर्सनल मॅनेजर किबे धावत आले.
गाडीच्या खिडकीची काच खाली आली.
"क्या हुआ" शेठनी आता किबेंना विचारलं.
कामगार है .काम बराबर नही करता इसलीये कामसे निकाल दिया है.
एव्हाना पांडूची बायको देखील शेठ ना दिसली.ती बिचारी रडत होती
"वो बाई कौन है"?
"पांडूकी औरत है " मॅनेजरनी उत्तर दिलं .
शेठला गोंधळाचा उलगडा झाला.
मग त्यांनी सगळ्यासमोर मॅनेजरलाच विचारलं "तमारे सू लागे छे तमे लोगो काम करो छो?
मॅनेजर बिचारे काहीच बोलले नाही.
"जवा दे ना भाई...छ हजारमां और एक चिडीया असं म्हणत पांडू भटाला पाय धरण्याची संधी न देता गाडीतून उतरून आपल्या केबीन मध्ये निघून गेले .
झालं .
पांडू भटाला माफी मिळाली.
साच्यामधून त्याची बदली स्टोअरमध्ये झाली आणि मी धरमशी शेठचा माणूस असं टिर्या बडवत म्हणायला पांडू मोकळा झाला.
येणार्या दहा पंधरा वर्षात मुंबईत औद्योगीक वातावरण बदलणार होतं.
पण त्याची चाहूलही तेव्हा नव्हती.
कामगारांनी देव म्हणावे असे मालक होते आणि म्हणूनच.....
क्रमशः---
.
प्रतिक्रिया
27 Apr 2010 - 2:20 pm | भारद्वाज
त्या पांडूची तर...
छान. पुढच्या भागाची वाट पाहतोय. येवू द्या.
27 Apr 2010 - 2:38 pm | आंबोळी
पटापटा लिहा हो...इतक्या सुंदर लिखाणामधे येवढा मोठा ग्याप नको वाटतो....
---आंबोळी
27 Apr 2010 - 4:39 pm | सातबारा
फारच सुंदर लिहिले आहे. पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत.
हे शेतक-यांचे राज्य व्हावे.
27 Apr 2010 - 4:59 pm | पर्नल नेने मराठे
मजा येतेय वाचायला :D
चुचु
27 Apr 2010 - 5:11 pm | भोचक
तुमचं लेखन बघितलं, की पटकन धाग्यावर क्लिकवलं जातं. वाचून झाल्यावर आणखी हवं होतं, असं वाटत रहातं. आम्ही न पाहिलेलं हे वेगळं विश्व वाचायला आणि समजून घ्यायलाही मजा येतेय.
(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव
28 Apr 2010 - 9:21 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदी ... पुढचे भाग पटापट टाका. मजा येते आहे वाचायला!
अदिती
27 Apr 2010 - 5:22 pm | प्रमोद देव
वाचतांना मजा येतेय.
27 Apr 2010 - 6:19 pm | प्रभो
मस्त!
27 Apr 2010 - 6:57 pm | रेवती
वाचतीये.
फारच छान लिहिलं आहे.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत....
रेवती
27 Apr 2010 - 7:01 pm | झकासराव
मस्त सुरु आहे :)
28 Apr 2010 - 3:59 am | सुचेल तसं
+१
27 Apr 2010 - 7:37 pm | दिपाली पाटिल
पुढचा भाग लवकर टाका.थोडे मोठे भाग टाकलेत तरी चालेल.मजा येतेय वाचायला...
दिपाली :)
27 Apr 2010 - 7:42 pm | टुकुल
बर्वे साहेब.. एक नंबर लिहित आहात, तुम्ही लिहित असलेला काळ मा़झ्या जन्माच्या आधीचा (किंवा काही न कळण्याचा) त्यामुळे खुप मजा येत आहे वाचायला, तुमची लिखाणाची शैली तर क्या केहने. लिहा अजुन.
--टुकुल
28 Apr 2010 - 3:53 am | इंटरनेटस्नेही
इंटरनेटप्रेमी
27 Apr 2010 - 7:55 pm | संदीप चित्रे
>> शेठला गोंधळाचा उलगडा झाला.
मग त्यांनी सगळ्यासमोर मॅनेजरलाच विचारलं "तमारे सू लागे छे तमे लोगो काम करो छो?
ह्याला म्हटतात झटका !
27 Apr 2010 - 10:24 pm | स्वाती२
वाचत आहे.
28 Apr 2010 - 12:00 am | piu
जरा लवकर भाग टाका
पियु
28 Apr 2010 - 2:24 am | Pain
अरेरे. वाइट झाले.
28 Apr 2010 - 3:25 am | निस्का
नवीन 'city of gold' म्हणून मुम्बैच्या मिल्स मध्ये जो संप झाला होता त्यावर चित्रपट आला आहे असं वाचलं. तुमचं सुरेख अनुभव कथन वाचून तो बघायची इच्छा होते आहे (महेश मांजरेकर छाप धिंगाणा असला तरीही)
नि...
28 Apr 2010 - 5:24 am | मदनबाण
मस्त... :)
पुढच्या भागाची वाट पाहतोय...
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
28 Apr 2010 - 5:33 am | राजेश घासकडवी
:)
राजेश
28 Apr 2010 - 12:49 pm | पक्या
सुरेख.
कापडच्या गिरण्या हे एक वेगळेच विश्व आहे. अजून भराभर लिहा अशी विनंती करतो.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
28 Apr 2010 - 4:35 pm | नंदू
आता भर भर पुढचे भाग येऊ द्या.