माझे अर्धे बालपण एका छोट्या गावात गेले. आमच्या गावात टोपली संडास होते. टोपली संडास म्हणजे पत्र्याच्या मोठ्या तेलाच्या डब्ब्याची एक बाजू कापून दिवस-दोन दिवस विष्ठा जमा करण्यासाठी बनवलेले भांडे. आमच्या वाड्यात एकमेव संडास होता आणि चार भाडेकरू होते. ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर रोज गावभर फिरत असे व या डब्ब्यांतील घाण एकत्र करून घेऊन जात असे. या ट्रॅक्टरच्या ड्रायवरचे नाव नारायण होते. तो, त्याची बायको आणि एक म्हातारी हे गावभर फिरून मैला गोळा करण्याचे काम करत असत.
नारायण - सतत बिड्या फुकणारा, अर्धवयस्क मिशी असलेला, मधला पडलेला दात सोडून सगळीकडे तांबारलेला - येता जाता आम्हा मुलांकडे कौतुकाने पाहत असे. घरून ताकीद दिल्यामुळे लांबूनच त्याच्याबरोबर मस्ती करायला आम्हाला खूप मजा येत असे. मी दुसरीत असतांना मला शाळेतच धनुर्वाताचा झटका आला. कंबरेखाली काहीच हालचाल करणे शक्य नव्हते. वर्गातल्या मुलांना कळले, बाईंना कळले व त्यांनी मला उचलून खाली (वर्ग दुसर्या मजल्यावर होता व फोनसारखी काहीच साधने नव्हती) आणले. योगायोगाने तिकडून नारायण ट्रॅक्टरवर येत होता. त्याने ट्रॅक्टर थांबवला. त्याच्या बायकोने (त्या माऊलीचे नाव कधीच कळले नाही) मला उचलले. ट्रॅक्टर सरळ सार्वजनिक दवाखान्यात गेला. रस्ताभर मी ओकत होतो. नारायणविषयी असलेली किळस बाहेर पडत होती. आई-वडिल येईपर्यंत नारायण, त्याची बायको थांबून होते. वडिल आल्यावर त्यांनी नारायणला मिठी मारली आणि रडू लागले. मी मनातच आंघोळ केली.
मी महिनाभर घरी पडून होतो. नारायण रोज सकाळी येत असे. फुटक्या कपातला चहा पिऊन माझी आंघोळ झाली का असे आईला विचारून माझ्या डोक्यावर हलकेच टपली मारत असे.
बर्याच वर्षांनी मी आणि आई गावातल्या आठवणी उगाळत होतो. आई बोलता बोलता म्हणाली नारायच्या मुलीला पोलियो होता.
प्रतिक्रिया
6 Mar 2010 - 9:46 am | विसोबा खेचर
!!!
छोटेखानी परंतु विलक्षण प्रभावी लेखन...अगदी अंतर्मुख करणारे..!
पूर्णपात्रे साहेब, तुमचा नारायण फार आवडून गेला..!
आपला,
(व्यक्तिचित्र प्रेमी) तात्या.
6 Mar 2010 - 11:40 am | विष्णुसूत
लेखन आवडलं.
आमच्या बाबांची गोष्ट आठवली ( बाबा आमटे).
जर माहिती नसेल तर जरुर वाचा.
अक्षय पुर्णपात्रेंच अभिनंदन. थोडक्यात बरंच काहि सांगुन गेलात.
तुम्हि उत्तर अमेरीकेत असाल तर भेटायला -बोलायला आणि नारायणा बद्दल अजुन जाणुन घेयला नक्कि आवडेल.
विष्णुसूत नारायण
6 Mar 2010 - 9:55 am | राजेश घासकडवी
तुम्ही अगदी थोड्या शब्दात फार काही सांगितलं आहे.
या कथेचा जीव निश्चितच याहून मोठा आहे. एवढ्याशा शब्दांचा कपडा तिला पुरत नाही. कृपया विस्तार करा. तिची लाज राखा.
राजेश
6 Mar 2010 - 10:19 am | श्रावण मोडक
सहमत! विस्तारीत आवृत्तीच्या प्रतीक्षेत.
7 Mar 2010 - 12:45 pm | स्वाती दिनेश
विस्तारीत आवृत्तीच्या प्रतीक्षेत.
स्वाती
6 Mar 2010 - 9:55 am | मुक्तसुनीत
मैला काढणार्या एका व्यक्तीच्या आठवणी हृद्य आहेत. मला त्या विशेष परिणामकारक वाटल्या कारण न सांगता काही गोष्टी त्यात सांगितलेल्या आहेत.
अशा प्रकारची कामे करणार्यांबद्दलचे आपले प्रेजुडाईसेस किती खोलवर असतात! गंभीर प्रकृती असताना, जी व्यक्ती आपल्याला मदत करण्याकरता घेऊन जाते आहे तिचीच किळस येऊन शरीराची प्रतिक्रिया येणे हे बोलके आहे.
या निमित्ताने अतुल पेठेनी काढलेल्या कचराकोंडी या मार्मिक, परिणामकारक डॉक्युमेंटरीची आठवण येते.
http://video.google.com/videoplay?docid=3070120386399623186&ei=XtiRS6muL...
अजून एक आठवलेली गोष्ट : स्मृतिचित्रे मधला एक प्रसंग. एक भंगीण नेहमी टिळक दांपत्याकडे यायची. लक्ष्मीबाईनी अर्थातच त्या बाईला खूप मदत केली. अशा या बाईच्या घरी जाण्याचा प्रसंग लक्ष्मीबाईंवर आला. त्यांनी त्या गरीब बाईचे लखलखीत , स्वच्छ , टापटीपीचे घर पाहून उद्गार काढले : "तू तर माझ्याही पुढे गेलीस !" (बालभारती, इयत्ता चौथी.)
6 Mar 2010 - 11:39 am | Nile
असेच म्हणतो!
6 Mar 2010 - 2:02 pm | प्रकाश घाटपांडे
अतुल पेठेंची कचराकोंडी ही अप्रतिम निर्मिती आहे. समाज या स्वच्छतेच्या पुजार्यांकडे कुठल्या दृष्टीने पहातो ते लगेच ध्यानी येते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
6 Mar 2010 - 11:01 pm | चित्रा
हृद्य आठवणी. मोजक्या शब्दांत सांगितल्याने अधिक परिणामकारक.
7 Mar 2010 - 12:30 am | मिसळभोक्ता
त्यांनी त्या गरीब बाईचे लखलखीत , स्वच्छ , टापटीपीचे घर पाहून उद्गार काढले : "तू तर माझ्याही पुढे गेलीस !" (बालभारती, इयत्ता चौथी.)
मुसुशेठ,
अहो, हे उद्गार खुद्द रेव्हरंड टिळकांचे आहेत. त्यांच्या बायकोने एका भंगी स्त्रीची इतकी सेवा केली, हे कळल्यावर त्यांनी लक्ष्मीबाईंना उद्देशून हे उच्चारले.
(चौथीतला अभ्यासू विद्यार्थी)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
7 Mar 2010 - 1:09 am | मुक्तसुनीत
:-)
18 May 2010 - 3:10 am | शिल्पा ब
संपूर्ण documentary बघण्याची हिम्मत झाली नाही....लेखाचे म्हणाल तर चांगलेच लिहिले आहे...या कामगारांना साधे gloves देण्याचे सुद्धा सरकारला सुचत नाही !!!
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
6 Mar 2010 - 9:56 am | टारझन
अल्टिमेट !!
6 Mar 2010 - 9:58 am | वेताळ
माणुस म्हणुन माणसांला वागवले जात नाही त्यावेळी खुप चीड येते.
लेखनाबद्दल धन्यवाद.
वेताळ
6 Mar 2010 - 9:59 am | प्रकाश घाटपांडे
अक्षय लेख वाचताना साने गुरुजींच्या शामची आठवण झाली. थोर मनाचा मजुर शिवराम या कथेची. जातीअंताच्या लढ्याकडील तुझा हा संवेदनशिल भावपुर्ण वाटला. आमच्या गावी होल वावर इज अवर असा भाग असल्याने भंगी हा प्रकार नव्हता.
नंतर वडिलांनी लाकडी खोक्याचे केबीन तयार करुन चर खांडुन त्यावर ते ठेवले. नंतर माती टाकायची चर भरला कि खोके हलवुन शेजारच्या चरावर ठेवायचे. ते भरेपर्यंत पहिल्या चराचे उत्तम सोनखत होत असे. ते शेतात केळीसाठी वापरले जाई.
नंतर च्या टप्प्यत मागील पडवीत संडास बांधला. तेव्हा मला आपण शहरी झाल्यासारखे वाटले. त्याची साफसफाई ते स्वतःच करीत.मी ही नंतर शिकलो. यानिमित्त्त काही दुवे
१) स्वच्छतागृहाची सफाई२) स्वच्छतेच्या बैलाला३) परत एकदा स्वच्छतेच्या बैलाला४) क्रयशासन
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
6 Mar 2010 - 10:03 am | शाहरुख
अक्षय, छान लिहिले आहेस..
6 Mar 2010 - 10:44 am | ऋषिकेश
वा फारच सुंदर प्रभावी लेखन
"मी मनातच आंघोळ केली." हे वाक्य लै आवडले.. एकदम प्रभावी लेखन
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
6 Mar 2010 - 3:10 pm | मेघवेडा
पूर्णपात्रेजी .. छान लिहिलंय .. मोजक्या शब्दांत केवढं सांगून गेलात..
विस्तारित कथेच्या प्रतीक्षेत!
-- मेघवेडा
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
6 Mar 2010 - 4:10 pm | शुचि
आपला हा लेख मनातून उतरल्याने प्रभावी झाला आहे. खूप छान.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
6 Mar 2010 - 5:01 pm | अरुंधती
आपण मुळात विषयच मनाला हात घालणारा निवडलात.... माझ्या मते अजून विस्तार चालला असता. लोकांची घाण साफ करणार्याच्या माणसाचे साफ मन त्यातून दिसून येते.
काही काही व्यवसायांतील लोकांविषयी आजही जनमानसात घृणा, कीव, तिरस्कार, अपराधीपणाची भावना दिसून येते. भंग्याचा व्यवसाय हा असाच! आमच्या जुन्या वाड्यात फार वर्षांपूर्वी दर आठ दिवसांनी असाच रामू नावाचा भंगी यायचा. अंगात अर्ध्या बाह्यांचा शर्ट व खाकी हाफ पॅन्ट! हातात खराटा. त्याला कोणी आपल्या घरातही घ्यायचे नाहीत की त्याची धड चौकशीही करायचे नाहीत. घरातल्या बायाही नाकं मुरडायच्या. पण मला आठवतंय, माझे आजोबा त्याला त्याचे काम झाले की चहा पाजत असत. तो घराबाहेर उभ्या उभ्याच चहा पीत असे. नंतर नंतर तो येईनासा झाला. का ते आठवत नाही. पण तुमच्या लेखाने त्या रामू भंग्याची आठवण मनात ताजी झाली. धन्यवाद! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
6 Mar 2010 - 5:54 pm | नंदू
एक नितांतसुंदर लेख. आवडला.
नंदू
6 Mar 2010 - 7:17 pm | मीनल
+१
मीनल.
6 Mar 2010 - 11:32 pm | प्रभो
उत्तम लेख
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
6 Mar 2010 - 11:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'मी मनातच आंघोळ केली.' हे वाक्य लैच भारी.
-दिलीप बिरुटे
7 Mar 2010 - 1:56 am | विकास
एकदम वास्तववादी! खूप आवडले.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
7 Mar 2010 - 2:09 am | बिपिन कार्यकर्ते
श्री. पुर्णपात्रे... आपले सदर लेखन अतिशय आवडले आहे. किमान शब्दात अतिशय प्रभावकारी आणि चित्रदर्शी लेखन.
बिपिन कार्यकर्ते
7 Mar 2010 - 3:20 am | चतुरंग
अंतर्मनात खोलवर रुजलेल्या कल्पनांमुळे काहीवेळा आपल्या स्वाभाविक प्रतिक्रिया देखील इतक्या टोकाच्या असतात की काही काळानंतर आपली आपल्यालाच लाज वाटायला लागते!
मी तर लहानपणापासून वाड्यात राहिलेला. आमच्या वाड्यातही असे बुट्टीचे संडास होते. सकाळी ते साफ करायला भंगी येई. अतिशय घाणीत हात घालून हे सगळे साफ करताना मी काहीवेळा बघत असे. त्यावेळी फार वाईट वाटे. ह्याला दुसरा काही पर्याय नाही का असेही मनात येई. दिवाळी मागायला हे लोक येत त्यावेळीही त्यांना बरेच लोक घरात प्रवेश देत नसत. आमच्या घरी आई त्यांना चहा देई, जुने कपडे, फराळाचे ताजे पदार्थ आणि पैसे असे देऊन व्यवस्थित बोळवण करीत असे. पुढे सेप्टिकटँकचे संडास आले आणि त्या नरकातून ह्या लोकांची सुटका झाली.
चतुरंग
7 Mar 2010 - 4:07 am | धनंजय
वाईट भावना बाहेर पडून मन-शरीर स्वच्छ होण्याचा अनुभव आहे.
7 Mar 2010 - 10:01 am | प्रदीप
अक्षय, मी चीनमधे रहातो, तिथे असल्या लेखाला 'थोफो' लेख म्हणतात. तसा लेख कुठच्याही माध्यमात आला, की इतरांनी सर्व बोरू, पेने, कीबोर्ड व मनातील जळजळ कुठेतरी ओतून टाकण्याकरता वापरण्यात येणारी तत्सम इतर हत्यारे ३.७५७९ दिवस संपूर्ण म्यान करावीत असा संकेत आहे. ह्या संकेताचा उगम बाराव्या शतकात.... पण ते जाऊ दे. त्याविषयी अधिक माहिती तसेच थोफो लेखाची लक्षणे काय असतात ह्याचा उहापोह करणारा लेख नंतर लिहीन.
7 Mar 2010 - 9:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अक्षय, चांगला लेख! "मी मनातच आंघोळ केली." ... हे वाक्य फारच आवडलं.
अजूनही आपल्याकडे घरकामासाठी येणार्या मोलकरणींना काय प्रकारे वागवलं जातं ते पाहून अनेकदा संताप होतो.
अदिती
10 Mar 2010 - 10:04 am | भानस
अक्षय, नेमक्या शब्दात भावना पोचवल्यात. थोडे विस्तार करून मांडलेत तर अजूनच चांगले. शेवटी सारे दृष्टीकोनावरच अवलंबून असते ना.... नारायणने त्याच्या मताने व समोर वाढून ठेवलेल्या दु:खाच्या जाणिवेने व तुम्ही सदोदीत नारायणला ज्या रितीने पाहिलेत ....
11 Mar 2010 - 6:04 am | पंगा
पहले बताना भूल गये थे, अब याद आ गयी|
आगेपीछे कभी अपनी आटोबाइग्रफी लिखोगे, तो उस में यह इस्टोरी ज़रूर दर्ज़ करियो|
लेकिन आटोबाइग्रफी का नाम क्या रखोगे? "माइ एक्सपैरिमैंट्स विथ ट्रूथ"? नहीं वह टाइटिल तो पहले इस्तेमाल हो चुकी है... ऐसा करियो, आटोबाइग्रफी का नाम रखियो "कन्फैशन्स आफ अ महात्मा"... हाँ, फिट भी होगी और बहुत हिट भी, बता रहे हैं हम! याद रखियो गुरू!
- पंडित गागाभट्ट
11 Mar 2010 - 10:14 am | पाषाणभेद
आरं ए बाबा, मराठीत लिव की जरा. का उगा पंगा घेतूया? ऑं? आन काय रे ए तुला हिंदीत टायप करता येतयं, मराठी लेखबी वाचतूया आन तुला मराठी वाक्य टायप करता येत नाय व्हय रे?
पंडित गागाभट्ट आमच्या राजेंच्या राज्याभिषेकाला आले होते अन तु त्यांचेच नाव घेतले म्हणून सोडून द्यावे लागते आहे. नाहितर...
(ह. घे. बाबा पन मराठीतच लिही, बोल, चाल, जेव, झोप, कर, इ.)
बाकी अक्षय, त्या नारायणाच्या मनात त्याच्या मुलीला जे भोगावे लागले ते तुला न लागावे म्हणून त्याने धावपळ केली.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
29 Mar 2010 - 11:29 am | पंगा
ठीक बोलले भाऊसाहेब. आम्ही कोशिश ज़रूर करू. आम्ही सोचत होतो कि पहले एथील मान्यवर सदस्यांचे पासून धीरे धीरे अच्छी मराठी लिहीणेला शिकू, और फ़िर, वह क्या बोलते हैं, हाँ... एकदम झकास मराठीमधून लिहीणे लागू कर के. पण बराबरच बोलले आपण. पहले मराठी लिहिणेबोलणेची कोशिश केलेबिगर कायपण होणार नाही और बात जमणार नाही. तो आजहून आमची कोशिश शुरु. मान गये गुरू.
वैसे एक सवालः शिवाजी महाराजचे राज्यारोहण समारोहचे वक़्तला जे पंडित गागाभट्ट पधारले होते, काय ते येण्याचे पहले मराठी शिकून राहिले होते? शिकून राहिले होते तर कोणाचे पासून शिकून राहिले होते? और नाही शिकून राहिले तर काय शिवाजी महाराजना सोडून द्यावे लागले होते? और फ़िर शिवाजी महाराजची और पंडित गागाभट्टची बातचीत कैसे चालून राहिली होती?
- पंडित गागाभट्ट
29 Mar 2010 - 10:21 am | विशाल कुलकर्णी
अक्षयजी, खुप आवडले. मोजक्या शब्दात फार काही सांगुन गेलात ! हॅट्स ऑफ टू यू बॉस ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
5 Jan 2012 - 2:41 pm | मन१
किमान व अचूक शब्द व प्रभावी अनुभवकथन.
5 Jan 2012 - 11:37 pm | किचेन
ह्या अशा लोकांना आपण जाणून बुजून दुर्लक्ष करतो.तुम्ही आठवण करून दिलीत.
सकाळी कचरा न्यायला येणारा पोरगा सगळ्यांना ओला -सुका कचरा वेगळा ठेवा अस रोज सांगतो.. पण गडबडीत एकत्र कचरा दिला जातो तेव्हा स्वतःच्या हाताने वेगळा करतो. साधारण ३०च तरुण, पण नेहमी दुर्लक्षित.आजपासून काहीही झाल तरी उला कचरा वेगळाच ठेवेल.