मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी आणि नारायण भंगी

अक्षय पुर्णपात्रे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
माझे अर्धे बालपण एका छोट्या गावात गेले. आमच्या गावात टोपली संडास होते. टोपली संडास म्हणजे पत्र्याच्या मोठ्या तेलाच्या डब्ब्याची एक बाजू कापून दिवस-दोन दिवस विष्ठा जमा करण्यासाठी बनवलेले भांडे. आमच्या वाड्यात एकमेव संडास होता आणि चार भाडेकरू होते. ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर रोज गावभर फिरत असे व या डब्ब्यांतील घाण एकत्र करून घेऊन जात असे. या ट्रॅक्टरच्या ड्रायवरचे नाव नारायण होते. तो, त्याची बायको आणि एक म्हातारी हे गावभर फिरून मैला गोळा करण्याचे काम करत असत. नारायण - सतत बिड्या फुकणारा, अर्धवयस्क मिशी असलेला, मधला पडलेला दात सोडून सगळीकडे तांबारलेला - येता जाता आम्हा मुलांकडे कौतुकाने पाहत असे. घरून ताकीद दिल्यामुळे लांबूनच त्याच्याबरोबर मस्ती करायला आम्हाला खूप मजा येत असे. मी दुसरीत असतांना मला शाळेतच धनुर्वाताचा झटका आला. कंबरेखाली काहीच हालचाल करणे शक्य नव्हते. वर्गातल्या मुलांना कळले, बाईंना कळले व त्यांनी मला उचलून खाली (वर्ग दुसर्‍या मजल्यावर होता व फोनसारखी काहीच साधने नव्हती) आणले. योगायोगाने तिकडून नारायण ट्रॅक्टरवर येत होता. त्याने ट्रॅक्टर थांबवला. त्याच्या बायकोने (त्या माऊलीचे नाव कधीच कळले नाही) मला उचलले. ट्रॅक्टर सरळ सार्वजनिक दवाखान्यात गेला. रस्ताभर मी ओकत होतो. नारायणविषयी असलेली किळस बाहेर पडत होती. आई-वडिल येईपर्यंत नारायण, त्याची बायको थांबून होते. वडिल आल्यावर त्यांनी नारायणला मिठी मारली आणि रडू लागले. मी मनातच आंघोळ केली. मी महिनाभर घरी पडून होतो. नारायण रोज सकाळी येत असे. फुटक्या कपातला चहा पिऊन माझी आंघोळ झाली का असे आईला विचारून माझ्या डोक्यावर हलकेच टपली मारत असे. बर्‍याच वर्षांनी मी आणि आई गावातल्या आठवणी उगाळत होतो. आई बोलता बोलता म्हणाली नारायच्या मुलीला पोलियो होता.

वाचन 10585 प्रतिक्रिया 0