मुंबईतील हॉटेलमधील नवीन नियम

देवदत्त's picture
देवदत्त in जनातलं, मनातलं
12 Dec 2009 - 6:10 pm

मुंबईतील हॉटेल संघटनेने लागू केलेल्या नव्या नियमापासून ताटात घेतलेले अन्न टाकल्यास पाच रू. दंड आकारण्यात येणार आहे. वाढती महागाई व अन्न धान्याची कमतरता हे मुख्य कारण असल्याचे सांगत आहेत. तसेच ग्लासातील वाढलेल्या पाण्याचाही अपव्यव टा़ळण्यात येणार आहे.
(स्टार माझावरील बातमी येथे वाचा. व्हिडीयोचा नेमका दुवा मिळाला नाही. स्टार माझाच्या संकेतस्थळावर येथे ११/१२/२००९ च्या यादीमध्ये "खाऊन माजा टाकून नको!" व्हिडीयो पहायला मिळेल  तसेच मटावरील बातमी येथे वाचा)

मनात विचार आला की हे आधीपासून त्यांच्या लक्षात का येत नव्हते? असो, उशीरा का होईना लोकांना जाग येत आहे. मी तर गेले कमीत कमी ६/७ वर्षे हा नियम स्वत: पाळत आहे. ताटात घेतलेले अन्न पूर्ण संपवितोच. तसेच सोबत असलेले नातेवाईक किंवा मित्र ह्यांनाही करावयास सांगतो. खरोखरच खाऊन होत नसेल तर ते पाकिटात बांधून देण्यास सांगतो.

पाण्याचेही तसेच. तसा मी कमीच पाणी पितो (जास्त प्यावयास पाहिजे हे मान्य. सध्या तरी तो मुद्दा नाही) आणि पाहिजे तेवढेच पाणी घेतो. पण ग्लास रिकामा झाला असेल आणि पुढील वेळी जर कोणी ग्लासात पाणी वाढून देत असेल तर मला पाहिजे तेवढेच वाढायला सांगतो. काही वर्षांपूर्वी हॉटेलात पाहिले होते की अर्धा ग्लास रिकामा असला तरी वेटर तो ग्लास उचलून त्याच्या जागी पूर्ण भरलेला ग्लास ठेवत असे. मला ते पटले नव्हतेच. मित्रासोबत बोललो, तर तो म्हणाला, "काही हॉटेलमध्ये पद्धत असते. चांगली सेवा द्यायची म्हणून वाढताना पाणी सांडण्याची शक्यता असल्याने ग्लासच बदलवून द्यायचा." म्हटले ठीक आहे. तेव्हा काही म्हणालो नाही. पण आता ह्या हॉटेलवाल्यांनीही ग्लास बदलण्याची पद्धत बंद करावयाचे ठरविले आहे असे ऐकून चांगले वाटले.

तसेच फक्त हॉटेलच्या ग्राहकांनाच पाणी देण्यात येणार असून फु़कटात देण्यात येणारे पाणी बंद करणार आहेत. अर्थात त्यांना पडणारा पाण्याचा खर्चही ते कमी करू इच्छित असतील. तरीही पाण्यासारखी गरजेची गोष्ट नाकारणेही तेवढे चांगले वाटत नाही. पण प्रत्येकाचे मत वेगळे म्हणता येईल.

सध्याचा नियम म्हणजे दंड म्हणून नाही पण जनजागृती व्हावी ह्यासाठी असे पाऊल उचलले गेले असा त्यांचे म्हणणे आहे. आता जरी ग्राहकांचा त्यात सकारात्मक प्रतिसाद असला तरी किती दिवस चांगला सहभाग मिळेल? तो सारखा मिळून हॉटेलला असा नियम बनविणे गरजेचे वाटणार नाही अशीच इच्छा आहे.
पण काही हॉटेलमध्ये ताटातील, मागवलेल्या पदार्थांतील उरलेले पदार्थ बांधून देण्यास नकार करतात. अशा वेळी काय करणार?

अशाच प्रकारे विजेचा होणारा अपव्यव टाळण्यातही लोकांनी पुढाकार घेतला तर आणखी चांगले होईल असे वाटते.

जीवनमानप्रकटनबातमीअनुभव

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Dec 2009 - 6:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नियम चांगले, फक्त ते कागदावर राहू नयेत. कार्यवाही व्हावी.

-दिलीप बिरुटे

विकास's picture

12 Dec 2009 - 6:47 pm | विकास

नियम चांगले, फक्त ते कागदावर राहू नयेत. कार्यवाही व्हावी.

असेच म्हणतो. लोकशिक्षण म्हणून आणि काही अंशी (मराठीतील) शिक्षा म्हणून हे चांगले आहे. या वरून "उदर भरण नोहे" चर्चेची आठवण झाली.

शैलेन्द्र's picture

12 Dec 2009 - 10:05 pm | शैलेन्द्र

नियम पटतो पण दुसरी बाजुही ध्यानात घ्यावी लागेल.

जर समजा मी एकटाच हॉटेलात गेलो आणि मागवलेली भाजी जास्त प्रमाणात आली किंवा तीचा दर्जा चांगला नसला तरीही ती खावुन मी स्वत:वर अत्याचार का करु?

अन्नाची नासाडी करु नये हे अगदी मान्य, पण हॉटेलसारख्या ठीकाणी जीथे काय, कीती आणी कसे येणार हे माहीत नसते तिथे सर्व्हींग पॅनमधील न ऊष्टावलेली ऊरलेली भाजी गोरगरीबांना दान करने हाच व्यवहार्य पर्याय आहे असे वाटते.

सुधीर काळे's picture

13 Dec 2009 - 1:25 am | सुधीर काळे

एकदम मान्य. जय हो! अन्न जास्त झाल्यास जरूर घरी न्यावे. तो गावठीपणा नव्हे.
------------------------
सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम

JAGOMOHANPYARE's picture

13 Dec 2009 - 11:23 am | JAGOMOHANPYARE

तरीही ती खावुन मी स्वत:वर अत्याचार का करु?

अगदीच न खाण्यायोग्य असेल, तर हे लागू होईल.. पण बर्‍याच वेळेला आवडत नाही, चव आवडली नाही, पदार्थ गरम नाही... अशी कारणे असतात....

अगदी योग्य निर्णय आहे... मुंबई हॉटेल्सचे अभिनंदन.

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

नीधप's picture

13 Dec 2009 - 11:40 am | नीधप

कधी कधी भाजी, चटणी आंबलेली असते.
मसाला डोसा किंवा इतर डोश्यात अति प्रमाणात भाजी देतात. कमी घाला असं आधी सांगूनसुद्धा. त्याचं काय?
सगळ्या हाटेलांनी बुफे किंवा वजनावर वस्तू देणं चालू करावं म्हणजे हवं तितकंच घेता येईल.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

अविनाशकुलकर्णी's picture

13 Dec 2009 - 12:16 pm | अविनाशकुलकर्णी

बुफे सिस्टीम ठेवावि...पाहिजे तितके घ्या व त्याचेच बिल द्या....

शाहरुख's picture

13 Dec 2009 - 12:34 pm | शाहरुख

या बाबतचे लोकप्रबोधन समजू शकतो (जे अर्थातच योग्य आणि आवश्यक आहे) पण हा नियम म्हणजे कायदा असेल तर हास्यास्पद वाटतो.

सहज's picture

13 Dec 2009 - 1:30 pm | सहज

अपव्यय होउ नये हा हेतू चांगला असला तरी अपव्यय होण्यामागची इतर कारणे लक्षात घेता दंड करणे पटत नाही.

अन्न ताटात टाकले तरी त्या अन्नावर जगणारे अन्य जीव आहेत, खत बनवता येते. त्यामुळे अन्नाचा नक्की अपव्यय कसा म्हणायचा?

साधे पाणी [फूकट] नाकारणे हे ज्या त्या हॉटेलच्या धोरणाचा भाग. ज्यांना ते पसंत नाही त्यांनी त्या हॉटेलमधे न जाणे हा एक सोपा व प्रभावी उपाय.

देवदत्त's picture

14 Dec 2009 - 8:27 pm | देवदत्त

एवढ्या प्रतिक्रिया.... धन्यवाद. :)
त्या प्रतिक्रियांबाबत माझे मत नोंदवितो.

हा नियम फक्त कागदावरच राहू नये असे मलाही वाटते. आणि मटामधील बातमीप्रमाणे अजून कोणावर दंड लावण्याची पाळी आली नव्हती. त्यामुळे सरकारी नियमाप्रमाणे हे फक्त कागदावरच राहणार नाही असे वाटते.

मागवलेले पदार्थ आपल्याकरीता जास्त प्रमाणात असतील तरी मग ते बांधून घेऊ शकतो, मग ते घरी खावे किंवा एखाद्या गरजूला द्यावे. हो पण त्याचा दर्जा चांगला नसेल तर कितपत करावे हा प्रश्न आहे. अर्थात जर फक्त आपल्यालाच तो दर्जा आवडत नसेल तर कोणाला तरी देण्यात येऊ शकते. पण आंबलेली भाजी वगैरे प्रकार असतील तर मग त्या हॉटेलचीच तक्रार केली पाहिजे. आपण दंड भरणे सोडा. :)

बुफे हा प्रकार मलाही आवडतो. समोर दिसते त्यातून आपण निवडू शकतो आणि पाहिजे त्या प्रमाणात (काही अपवाद सोडून)

ताटात अन्न टाकले तरी मग हॉटेलवाले त्याचे काय करतात हे आपल्याला माहित होत नाही. ते फेकूनही देत असतील. त्यापेक्षा आपणच काय तो विचार करणे योग्य.

रेवती's picture

14 Dec 2009 - 9:12 pm | रेवती

पाणी न देणे जरा विचित्र वाटते. आपल्याकडे बाकी काही नाही तरी पाणी नक्कीच देतात.......म्हणजे द्यावं! बाकी पदार्थांबद्दल बोलायचे झाल्यास, चव नसलेले, आंबलेल्या पदार्थांचे पैसे आपणच देऊ नयेत. अगदी खूप फिरती असणार्‍या लोकांच्या बाबतीत हॉटेलची माहिती नसताना जावे लागणे हे नेहमीचेच! तरी सर्वसामान्यपणे आपल्या आवडीची रेस्टॉरंटस जवळजवळ ठरून गेलेली असतात..... अनेक कारणांनी! जसे, अंतरामुळे, मुलांच्या वयानुसार, बरोबर असलेल्या वयस्कर व्यक्तींच्या असण्याप्रमाणे वगैरे. अश्यावेळी आपले आवडीचे पदार्थ बर्‍याचवेळा घेऊन माहीत झालेले असतात व त्याप्रमाणे ते ऑर्डर करू शकतो. ओळखीचे झालेले हॉटेलमालक पॅकिंगची सोय नाकरत नाहीत (ओळखीमुळे;)). वाया घालवायचे नसेल व सोयीस्कर असेल (गावठी वाटत नसेल;)) तर आपला डबा जवळ बाळगावा.;) डोसा मागवल्यास अतोनात भाजी देतात हे खरेच! पूर्वी आम्ही एक मसाला डोसा व साधा डोसा घेत असू. आता ते हाटेल (त्यामुळेच कि काय?) बंद झालय.
बुफे मला त्यामुळे बरं वाटतं पण जेवताना मधेच उठावं लागतं त्यामुळे गैरसोयीचं वाटतं विशेषत: लहान मुलांना एकटं बसल्या जागेवर सोडून गेलं की ती किरकिरत मागे येतात. आपल्याबरोबरच भोजनास आलेल्या लोकांबद्दल तर का बोलावं?;) खरकटे सांबार भाताचे हात तसेच घेऊन उजव्या हाताने वाढून घेणार्‍याला तिथल्यातिथे रागवावं इतकच नाही तर जेवण अर्धवट सोडून जावं असं वाटतं. काहीजण धुसखोरी करतात तर काहीजण बागेत फिरायला आल्यासारखे निवांतपणे पदार्थांचं निरिक्षण करत असतात. त्यापेक्षा पूर्वी आमटी,भाजी, कोशिंबीरीची चौपाळी घेऊन फिरणारे वाढपी बरे असं वाटतं की नाही? आपल्या ग्लासातलं पाणी संपल्यावर नको असेल तर आम्ही नको म्हणून नेहमीच सांगतो.....ग्लासावर हात ठेवून्......तरी कधी कधी तत्परतेनं वाढून जातातच त्यावेळी इलाज नसतो कारण बाहेर जेवायला जाणं म्हणजे सारखेसारखे फक्त 'नियम' पाळणे असं होऊ शकत नाही.

रेवती

शक्तिमान's picture

14 Dec 2009 - 11:18 pm | शक्तिमान

काहीच्या काही!... असले काय टुकार नियम काढतात काय माहीत..

अर्धवट राहिलेल्या पाण्याचा पुनर्वापर करा ना.. म्हणे पाणीच देणार नाही..
अन्नधान्य टंचाई आणि महागाईचा हॉटेलवाल्यांशी काय संबंध??
बरं आणि ५ रू.ने तरी कुठे नुकसान भरपाई होणार आहे? लोक १०० रू टीप देतात, ५ रू चे काय घेऊन बसला आहात..

उलट हॉटेलवाल्यांना खरकटी भांडी धुवायला सोपी जावीत म्हणून हा वर वर कल्याण्कारी वाट्णारा हास्यास्पद नियम बनवला आहे असे माझे मत आहे..

निमीत्त मात्र's picture

14 Dec 2009 - 11:38 pm | निमीत्त मात्र

अश्या नियमांमुळे लोक पोट भरल्यावरही (दंड भरावा लागू नये म्हणून) खाऊ लागले तर त्यामुळे त्यांच्या स्वास्थ्यावर परिणाम होणार नाही का? लागेल तितकेच मागवावे, तरीही उरल्यास बांधून घ्यावे हे सर्वात उत्तम. कारण बळजबरीने पोटात ढकलले काय आणि ताटात टाकले काय ते अन्न वायाच गेले की. ताटात टाकल्याने किमान प्रकृतीस तरी धोका नाही.