आमच्या घराच्या मागे खरे तर खाडी होती. ती बुजवून त्यावर बांधकाम कधीतरी सुरू होणार हे नक्कीच. ती खाडी कधी बुजविली ते कळले नाही. पण आता तर त्या जागेवर सर्कससुद्धा उभी राहिली. गेल्या दीड महिन्यापासून म्हणजे १६ ऑक्टो. पासून ती सुरू आहे. नेहमी प्राण्यांचा आवाज ऐकू येत असे. दररोज दुपारी १ वाजल्यापासून त्यांचे संगीत सुरू होते. ते रात्री ९:३० ते ९:४० पर्यंत सुरू असते. मी बहुधा १६ वर्षांपूर्वी सर्कसला गेलो होतो. तेव्हा असे गाणी वगैरे असल्याचे मला आठवत नाही म्हणून वाटले, सर्कसवाल्यांनी मध्येच ऑर्केस्ट्रा ही सुरू केला की काय? :(
लहानपणी तर आम्ही वडिलांसोबत जात असू. मधे एकदा शेजारच्या काकांसोबत गेलो होतो. पण नंतर नाही. इतक्या वर्षांनतर सर्कस आल्याने गेले २ आठवडे आमच्या घरातही सर्कसला जाऊ असे वारे वाहू लागले. पण मुहूर्त मिळेना. शेवटी काल संध्याकाळचा मुहूर्त मिळाला. ७ च्या खेळाला गेलो. आम्हाला वाटले होते की जास्त गर्दी नसेल. पण जाता जाता मागील संपलेल्या खेळाचे लोक परतताना दिसले, तेव्हा अंदाज आला भरपूर लोक आहेत. साधारण ६:५५ ला आत पोहोचलो. ७:१० च्या आसपास सर्कशीचा खेळ सुरू झाला. पाहिले तर अंदाजे ४५-५० टक्के जागा भरली होती. हे ही नसे थोडके.
सर्वात पहिल्यांदा होता तो उंचावरून लटकून एकमेकांना झेलण्याचा खेळ. लहानपणी हे सर्व पाहिले होते तरी पुन्हा पाहण्यात मजा आली. ह्यात दाखवलेला अंधारात फक्त अतीनील प्रकाश वापरून पांढर्या कपड्यातील लोकांच्या उड्या पाहण्याचा प्रसंग माझ्याकरीता नवीन होता.
आता सर्व खेळ बहुधा आठवणार नाहीत तरी जे आठवतील ते सांगतो.
* मुलींचे तोंडात दोरी पकडून उंचावर लटकत जाणे व स्वतःभोवती गिरकी घेणे.
* दोन मुलांचे एकमेकांना उचलत, तोल सांभाळत केलेल्या कसरती
* हत्तीचे नाचणे, क्रिकेट खेळणे, लहानशा स्टूलवर उभे राहणे
* एका मुलीचे ५/६ रिंग फिरविणे
* कुत्र्यांचे खेळ
* पोपट/इतर पक्षांच्या कसरती , लहानशी सायकल चालवणे
* मुलींचे दोरीवरून चालत जात कसरती दाखविणे, दोरीवर सायकल चालविणे
* सायकलवरच्या कसरती
* जीप/मोटारसायकल उडवून दाखवणे
* एका लोखंडी गोलात ३ मोटारसायकलींचा खेळ.
मी जे घरी ऐकू येणार्या गाण्यांबद्दल म्हटले होते ते तिकडे प्रत्यक्षात पाहिले की, एखाद्या कसरतीच्या वेळी ते गाणे गात होते किंवा संगीत चालू होते. चला, माझा अंदाज चुकला तेच बरे. पण एक होते, एकामागोमाग त्यांचे खेळ चालू होते त्यात अडीच तास कसे संपले ते कळले नाही. आधीच्या अनुभवांप्रमाणे एकतर उंचावरून उड्या मारण्याचा खेळ किंवा वाघ/सिंहांचा खेळ शेवटचा/पहिला असतो. म्हणून मी पिंजर्याच्या जाळ्या लावण्याची वाट पाहत होतो. शेवटी घोषणा झाली की, '५ तलवारींच्या खतरनाक खेळानंतर आजचा खेळ संपेल'.
'अरे, वाघ/सिंह ह्यांचा पिंजर्यातील खेळ कुठे गेला?'
खेळ संपला, बाहेर आलो तेव्हा सर्कशीतल्या एकाला विचारले, तर कळले की वाघांचा खेळ ८/१० वर्षांपासून बंद आहे.
असो, एकंदरीत मला तरी लहानपणी सर्कसला जात असू त्या आठवणींनुसार ह्या सर्कशीत तेवढा नाही पण चांगलाच अनुभव आला.
प्रतिक्रिया
30 Nov 2009 - 1:55 am | गणपा
दिड वर्षापुर्वी लेकीला सर्कसला घेउन जायचा योग आला होता.
त्यापुर्वी मी ३-४थीत असताना सर्कस पाहिली होती. पण एकंदर सर्कसची अवस्था पाहुन खुप वाईट वाटल. आख्या तंबुत मोजुन २५ माणसं पण न्हवती. ईतका मोठ्ठा पसारा कसा सांभाळत असतील हा प्रश्न पडला.
एक हत्ती सोडले तर दुसरे प्राणी न्हवते.. कसरती होत्या, विदुषकांचे खेळ होते. माझी लेक कधी खुर्चीतुन पळुन त्या विदुषकांबरोबर नाचायला लागली कळलंपण नाही.
मी हसत होतो कोणाची चिमुरडी इतकी धीट आहे बरं. बायकोने ढोपर मारुन सांगीतली की बास जा आणा आता लेकीला तेव्हा ट्युब पेटली. तिला उचलुन आणल्या वर तिने असा माज भरला की विदुषकाने परत तिला बोलवुन घेतलं..
चांगली आठवण अरुन दिलीत..
30 Nov 2009 - 2:43 am | भडकमकर मास्तर
माझ्या आठवणीप्रमाणे १९९८ किंवा ९९ पासून मनेका गांधींनी सर्कशीतले वाघसिंहांचे खेळ बंद केले...
30 Nov 2009 - 9:02 am | Nile
अरे वा!
पुर्वी सारखी सर्कस आता आवडणारही नाही(वयाचा परिणाम ;) ). त्याशिवाय सद्ध्या सर्कस उद्योगाला चांगले दिवस नाहीच आहेत.
चीनी लोक होते का सर्कस करणारे? पुर्वी रशियनांचा दबदबा असायचा, सद्ध्या चीनी असतात असे ऐकले होते.
30 Nov 2009 - 9:11 pm | देवदत्त
गणपा,
तुम्ही म्हणाल्यात त्याप्रमाणे मलाही २५/३० लोक असतील असेच वाटले होते. पण कमीत कमी २०० तरी असतील.
Nile, वयाचा एवढा परिणाम नाही ;)
असो, ही रशियन सर्कसच आहे (निदान 'मून लाईट रशियन सर्कस' असे नाव आहे). चीनी लोक असतील का एवढे नाही कळले. असतीलही :)
30 Nov 2009 - 9:57 pm | मदनबाण
लहानपणी पाहिलेली सर्कस आठवली.परत एकदा सर्कस पाहुया असे अनेक वेळा वाटले,पण नाही पाहता आली...
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia