ढुंढो ढुंढो रे साजना, तशात दुपटीची भर.......

भानस's picture
भानस in जनातलं, मनातलं
17 Nov 2009 - 4:33 am

अरुंधती आज नेहमीपेक्षा जरा लवकरच उठली. सेक्शनचे हळदीकुंकू होते. नेहमीचा तो पंजाबी नको बाई, आज जरा साडी नेसीन. मनासारखे आवरून निघायचे तर घरातली कामे आवरून स्वतःसाठी अर्धा तास तरी हवाच ना. आयत्यावेळी काहीतरी उदभवते म्हणून अजून थोडा वेळ असू दे हाताशी म्हणून अजूनच लवकर उठून आवरायला सुरवात केली. डबेडुबे झाले. बाईही वेळेवर आली. लेकीची रिक्षाही आज पाच मिनिटे लवकरच आली. नवऱ्याला आज नेमके उलट दिशेला जायचे असल्याने रिक्षा घ्यावी लागेल एवढाच काय तो घोळ होता. पण त्याची फार चिंता नको करायला. रोज तर पाहतो आपण खाली उभ्याच असतात रिक्षा. एकीकडे आवरत अरूचे स्वतःशीच बोलणे सुरू होते.

सुंदरशी अबोली रंगाची चंदेरी तिने अगदी मन लावून नेसली. मस्त शेपटा त्यावर एकच नाजूकसे गुलाबाचे फुल टाचले. नेहमीची पर्सही बदलली. रात्रीच सगळ्यांना द्यायचे वाण, फुले व पेढे तिने पिशवीत भरून ठेवले होते. पुन्हा एकदा आरशात डोकावून स्वतःलाच मस्त अशी पावती देत खूश होऊन आज तिने उंच टाचेच्या चप्पल घातल्या. खांद्यावर पर्स एका हातात पिशवी व दुसऱ्या हातात कुलूप घेऊन ती दारापर्यंत पोचली आणि आठवले, " दूध राहिलेच की आत टाकायचे. ओटा आवरला तेव्हां गरमच होते जरासे. बरे झाले आठवले नाहीतर संध्याकाळी पनीरच करावे लागले असते. " असे पुटपुटत साडीचा घोळ, पर्स, पिशवी, कुलूप सांभाळत एकीकडे रिक्षा असेलच ना खाली हा विचार करत घाईघाईत ओट्याशी आली. कुलूप पिशवी धरलेल्या हातात घेत तिने दुधाचे भरलेले पातेले एका हाताने उचलले. फ्रीजचा दरवाजा कुलुपाच्या हाताने कसाबसा उघडला खरा पण दूध तापवले तेव्हां अगदी उतास चालले होते. त्यामुळे पातेल्याची कड ओशट झालेली. पटकन आत ठेवावे म्हणून ती वाकली तोच भांडे हातातून सटकले. लीटरभर दुधाचा फ्रीजला, जमिनीला व अरूच्या साडीला अभिषेक झाला.

तिथेच भांडे आपटून अरू दुधाच्या ओघळांमध्येच पिशवी-पर्स रागाने फेकून देऊन फतकल मारून बसली. जिवाचा संताप झाला होता अगदी. आता हा सगळा पसारा आवरायला हवा, असेच टाकून जाता येणारच नाही. गेले तर संध्याकाळी मुंग्यांचे थैमान असेल जिकडे तिकडे. शिवाय आता अंघोळ किमान हातपाय स्वच्छ धुवायला हवेत. इतक्या सुंदर साडीची लागलेली वाट, सकाळपासून उत्साहात असलेले मन कोमेजून गेले. पाहता पाहता अरू रडायलाच लागली. नेहमीची ट्रेन तर सोडाच अजून एक तासानंतरचीही मिळणार नव्हती. म्हणजे लेटमार्क किंवा हाफ डे. ऑफिसमध्ये सगळ्या कश्या मुरडत असतील. साड्यांची, वाणाची चर्चा रंगेल आणि नेमकी मीच या सगळ्या आनंदाला मुकणार. अरूचे रडू थांबेचना.......:(

चरफडत, बडबडत अरूने आवरायला घेतले. किती घाई करावी माणसाने. तरी नेहमी आई ओरडते, " जरा शांतपणे करत जा गं. घाईने काम केले ना की हमखास घोळ होतो. आणि असा काय वेळ वाचतो त्यातून? उलट त्रासच होतो. एकातून दुसरे काम निर्माण होते म्हणजे दुप्पट वेळ वाया जातोच वर मनस्ताप. " पण मी तिचे ऐकले तर ना..... आता जर ओट्यावर कुलूप, पिशवी ठेवली असती तर येव्हांना ट्रेनमध्ये असते ना मी. मूर्ख, वेंधळी कुठली.

हे असे प्रसंग आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत बरेचदा घडतात. अगदी साध्याच गोष्टीतही वेळ व श्रम वाचू शकतात. आणि घाई केली की काम बिघडतेच बरेचदा. आपल्या मनाची धारणा झाली आहे की घाई असली की आपण काम भरभर करतो. पण तुम्ही घड्याळ लावून पाहा, शांतपणे ( मनाचा शांतपणा ) केलेले काम व घाईने ( मनात घाई-गडबड, आवरा पटापट.... डोक्यात असंख्य विचार ) केलेले काम यात फारसा वेळेचा फरक पडत नाही. उलट पक्षी अनेकदा घाईघाईने केलेले काम एकतर अर्धवट केले जाते किंवा त्यातून पुन्हा दुप्पट काम निर्माण होते. किंवा गडबडीने आपण काहीतरी वेगळेच करतो आणि पुनश्च हरी ओम करायची वेळ येते.

अगदी साधी उदाहरणे, समजा ऑफिसमधून दमून घरी आलोय. नेमके मागोमाग नोंदवलेले किराणासामान येऊन पडलेय. आता रात्रीची जेवणे, मधून मधून मुलांचे गृहपाठ, नवऱ्याचे आणिकच काहीतरी, त्यात आवडती एखादी मालिका- आता या मालिकांमध्ये असते काय रोज वेगळे हा प्रश्न असला तरी संपूर्ण दिवसातून किंचितसा टीवी पाहावा असे वाटणारच ना? मध्येच एखादा वेळखाऊ फोन असतोच ........ या हाणामारीत शेवटची काडी असते हे किराणासामान. बरे त्याची निरवानिरव झोपण्याआधी करणे भागच आहे. नाहीतर सकाळपर्यंत साखर, डाळी, रवा जिकडे तिकडे तुरुतुरु पळताना दिसतील.

घरातले सगळे कधीचेच झोपायला पळालेले त्यामुळे चडफडत आवरायला घेतले जाते. साखरेचा डबा काढून साखर भरताना थोडीशी तरी सांडतेच. मग डाळींचा नंबर, रवा, पोहे करत करत एकदाचे सुस्थळी पडले की सांडलेल्या कणांकडे काणाडोळा करत आपण झोपायला जातो. सकाळी मस्त मुंग्यांचा सुकाळ आणि सारखे पायाला लागत राहते. पण रात्रीच फक्त एक मिनिट खर्च करून वर्तमानपत्राचे एक पान पसरून त्यावर सगळे डबे ठेवून हे भरले असते तर किती सोपे झाले असते? निदान झाडून घेतले असते तर.... आता सकाळी या मुंग्यांना आवरता आवरता नाकात दम आला ना? भाजी चिरली हातासरशीच डेखे, साली उचलून टाकल्या, चहा केल्या केल्या चोथा पाणी टाकून साखरेचा अंश घालवून टाकला, कपबश्या विसळून निथळत ठेवल्या. जेवायला ताटे घेण्याआधीच ओटा आवरून घेतला तर स्वत:चेच बरेचसे काम होऊन जाते.

हातासरशी काम करून टाकावे व एका कामातून दुसरे काम निर्माण होता नयेच ही सवय मनाला प्रयत्नपूर्वक लावली की अंगवळणी पडते. सुरवातीला थोडा त्रास होतो खरा. पण एकदा का सवय लागली की आपण नकळत वस्तू जागच्या जागी ठेवू लागतो. त्यामुळे आपला किती वेळ तर वाचतोच त्याहिपेक्षा चिडचिड, मनस्ताप टळतो. नेलकटरचे काम झाले की पडले तिथेच असे केले की दुसऱ्याला लागले की तो शोधतोय घरभर... मग आरडाओरडा..... अरे कोणी रे घेतले होते? एक वस्तू जागच्याजागी मिळेल तर शपथ. काय घर आहे का कबाडखाना? पाहिलेत..... किती शब्द आले पाठोपाठ.

आमचे बाबा नेहमी म्हणतात, " अरे तुम्ही आंधळे आहात असे समजा. एकदा वस्तूची जागा ठरवून घेऊन नंतर त्याच जागी ती नेमाने ठेवत चला. मग कशी हरवते तेच पाहू आपण. पण नाही. तुम्ही फेकणार कुठेही आणि मग चिडचिडही तुम्हीच करणार. " खरेच आहे की. आळशाला दुप्पट व कृपणाला तिप्पट सारखीच गत आपली. बरेचवेळा नखे कापायला घेतली की हमखास ती इकडेतिकडे उडतात. आपणही फक्त समोर दिसणारी उचलतो. पण जर अंघोळ झाल्यावर नखे कापली तर ती मऊ पडलेली असतात मग अशी उडत नाहीत.

बाहेरून आलो की चप्पल-बूट दाराशी, कसेही उलटेपालटे पडलेत. किती वाईट दिसते अन जागाही जास्ती व्यापते. अंघोळ झाली की ओल्या टॉवेलचे बोळे पडलेत..... वह्यापुस्तके, वर्तमानपत्राची पाने बेवारश्यासारखी विखुरलेली. किल्ल्या हरवणे हा तर रोजचा घोळ असतो अनेक घरांमध्ये. नेहमीची भरायची बिले- टेलिफोन, इलेक्ट्रिसिटी ..., पासबुके, अगदी पासपोर्टही शोधणारी मंडळी पाहिलीत. महत्त्वाची कागदपत्रे अगदी जपून ठेवावी म्हणून ठेवायची पण कुठे ठेवली तेच नेमक्या वेळी आठवत नाही. मग संपूर्ण घर खाली येते. शेवटी जीव खाऊन एकदाचे सापडते आणि ते घेऊन तो माणूस जातो निघून. घरात उरलेले मात्र पसारा आवरत बसतात. अश्या आवरा आवरीत बरेचदा अनेक हरवलेल्या वस्तू व काही आठवणीही सापडून जातात, जाता जाता निदान तेवढे तरी सुख. अर्थात त्या युरेका युरेका झालेल्या गोष्टी पुन्हा हरवायला वेळ लागतच नसतो.

विजेच्या लपंडावाला आजकाल आपण सरवलोत. आता इनव्हर्टरही आलेत. पण जेव्हां सटीसामाशी दिवे जात होते ( हे सुख माझ्या सुंदरश्या बालपणाबरोबरच संपलेय ) तेव्हां अंधारात जिकडेतिकडे ठेचकाळत मेणबत्ती व काड्यापेटी शोधण्याची धमाल सर्कस चालत असे. हल्ली बरेचजण मेणबत्ती फ्रीजमध्येच ठेवतात त्यामुळे सापडतात पटकन. तशात पोरगंही आपल्यावरच गेलेले. उजाडत शाळा असल्याने मग त्या अंधारात ते दप्तर भरू लागते. पण वह्यापुस्तके, कंपास-रंगपेटी मन मानेल तसे उंडारून दमून कुठल्या कुठल्या कोपऱ्यात माना टाकून पडलेले. ते कुठले सापडायला बसलेत. की मग आईचे करवादणे बाबावर, " कारटा अगदी तुमच्या वळणावर गेलाय. रोजची हाणामारी आहे ही. अहो उठा आणि शोधा जरा त्याची पुस्तके." हे ऐकले की बाबा वैतागून उठणार आणि त्याच्या हाताला प्रथम लागणार तो कार्ट्याचा कान. मग तो पिळून कार्टे बोंबलू लागले की त्याला घेऊनच शोधाशोधीला लागणार.

शनिवार रवीवारी मान मोडून लेकाचे शाळेचे प्रोजेक्ट करायचे. लेक एकदम खूश :), आईलाही समाधान काहीतरी मनापासून केले. नीट जपून ठेव रे, मंगळवारी न्यायचे आहे ना शाळेत. मंगळवार उजाडतो. अर्धवट झोपेतच लेक निघतो , " अरे निघालास कुठे?तुझे प्रोजेक्ट नाही घेतलेस ते. बरं थांब मीच आणते. कुठे ठेवलेस रे?" लेकाला काही आठवत नसते. " अग माझ्या खणात असेल, नाही काल चिनू आला होता त्याला दाखवून मी कुठे बरं ठेवले.... अंअंआँ..... " करत शेवटी लेक गळा काढतो. माझे प्रोजेक्ट हरवले आता बाई मला ओरडणार. शेवटी संपूर्ण बिल्डिंगला कळते इतका आरडाओरडा होतो. एकदाचे सापडते ते दिवाणाच्या खाली सारलेले. मग लेकाला एक फटका देत त्याच्या हाती सोपवले जाते. हीच तयारी आदल्या रात्री केली असती तर..... दिवसभर सकाळी सकाळी लेकाला मारल्याची बोच तरी लागली नसती जीवाला.:(

या एपिसोडची दर दोन दिवसांनी पुनरावृत्ती ठरलेली तरीही कार्टे काही सुधारत नाहीच. त्याची तरी काय चूक हो. काही दिवस त्याच्या मागे लागून कामे वेळच्यावेळी व नीटपणे करावीत, मग कसे फायदे होतात हे शिकवण्याएवढी व करवून घेण्याएवढी फुरसत व सहनशक्ती आपल्यात उरतच नाही ना.

सकाळी उशीर होणे ठरलेलेच असते, त्यात उगाच कोणाचा तरी डोके खाणारा फोन येतो. मग कसेबसे आवरून खाली उतरून स्कूटरला लाथ मारावी तर ती थंडच. मग वाकडी करा, पुन्हा पुन्हा लाथाडा पण ती तिचा बथ्थडपणा सोडत नाही. अरे करेलच काय तिचा खाऊ तुम्ही दिलाच नाही ना. जाईल पेट्रोलपंपापर्यंत असे म्हणून तिला तशीच रात्री तुम्ही दामटलेली असते. आता ऐनवेळी ती तुमचा घात करते. पुन्हा सकाळी पंपावर रांग लावायची म्हणजे....... आमच्या बिल्डिंगमध्ये हा पेट्रोलचा खडखडाट नित्य नेमाने घडत असतो. कोणी तरी जर रोजचे पाच लीटर पेट्रोल आणून ठेवले ना तर मस्त धंदा होईल त्याचा सकाळी सकाळी. हा पण तो ते आणिलंच हे गृहीत धरून अनेकजण अजूनच सोकावतील. वर जर एक दिवस त्याने हा हक्काचा घास पाजला नाही ना तर त्यालाच धोपटून काढतील........:)

पोरीबाळींचे-बायकांचे डूल, पिना, रुमाल...सारखे काहीतरी हरवतच असते. अनेकदा ड्रेस असतो तर ओढणी गायब. आजकाल ऎक्सेसरीजही किती लागतात. त्याने अजूनच घोळ वाढतोय. बसल्याजागी घड्याळ, बांगड्या काढले जाते. नेमके कोणीतरी हाक मारते की उठून पळाली, ते राहिले तिथेच. सेलफोन हरवणे हा तर रोजचा घोळ झालाय. सेल आहे तर चार्जर गायब, कधी दोन्ही गायब. चष्मा हरवणे हा काळाचे बंधन नसलेला अव्याहत चालणारा आवडता खेळ आहे. विसरभोळे कपाळावर चढवून शोधतात ही गंमत खरीच पण अक्षरशः: जिथे जाऊ तिथे चष्मा विसरून येणारे लोक अगदी आपल्याच घरात असतात. आजकाल तर जागोजागी चष्मे पेरून ठेवले जातात. मग बरेचदा घरात एकदम तिनचार चष्मे दिसू लागतात. हौसेने कॅमेरे घेतले जातात. थोडे दिवस तोच नाद लागतो. मग हळूहळू ते मागे पडते. एखादे दिवशी अचानक टूम निघते, चला ट्रीपला जाऊयात. " अहो, तुमचा तो प्रेमाने घेतलेला एवढा भारी कॅमेरा घ्या बरं का." हो हो म्हणत पाहायला जावे तर बॅटरी फूस्स... मग काय दिवसभर उद्धार ऐकून घ्यावा लागतो. शिवाय जीवाला फार चुटपूट लागते ती वेगळीच.

काही जण अगदी काटेकोरपणे कुठे काय ठेवलेय, माळ्यावर काय, बेडमध्ये काय, अगदी फडताळापासून लिहून काढतील. पण ज्या डायरीत लिहितील तीच ऐनवेळी गायब. मग तिची शोधाशोध सुरू. मधल्या काळात आपण नेमके काय हवेय म्हणून डायरी शोधतोय तेच विस्मरणात जाते की मग त्याची शोधाशोध. ...... आयुष्यातील अर्धा वेळ असा शोधाशोधीत चाललाय. गंमत म्हणजे आजकाल तर कॉम्प्युटरवरही शोधाशोध चालू असते. गुगलबाबावरची नाही काही.... आपणच सेव्ह केलेल्या फोटो, डॉक्युमेंटस, उतरवलेले बरेच काही.... कुठल्या फोल्डरमध्ये ठेवलेय अन तो फोल्डर कुठे दडलाय..... ढुंढो ढुंढो रे साजना आपले चालूच.:)

थोडक्यात काय जरासे शांतपणे व वेळच्यावेळी कामे करण्याची सवय अंगी बाणवली तर खूप सारा वेळ मिळेल. डोक्यात सारखा कसलातरी भुंगा घोंगावत राहणार नाही. ऐनवेळी होणारी धावपळ, आपल्याबरोबर घरादाराला कामाला लावणे टळेल. बिपी वाढणार नाही. येणारी सून-जावई, " किती चांगले वळण लावलेय तुला आई-बाबाने " असे म्हणत शाबासकी देतील. ( वर धाकाने तेही कदाचित सुधरायचा प्रयत्न करतील. हे जरा अतीच झाले का? ) मग आवडीचे काही, अगदी टीवी पाहण्यापासून, वाचन असो, पोरांबरोबर खेळणे...... जे आनंद देईल ते करता येईल. झोपाळ्यावर बसून संगीतात तल्लीन होता येईल. अगदी काहीच नाही तर निवांत ताणून नक्की देता येईल.:)

जीवनमानराहणीप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

अडाणि's picture

17 Nov 2009 - 5:43 am | अडाणि

बराच वेळ आईचं बोलणं ऐकतोय अस वाटलं....

-
अफाट जगातील एक अडाणि.

रेवती's picture

17 Nov 2009 - 6:23 am | रेवती

हुश्श्य! मी तर वाचता वाचताच मनातल्या मनात ती ती कामे करत होते. छान लेखन!
अबोली रंगाच्या चंदेरीवर दूध? मनातल्यामनात कसतरीच झालं. जणू माझ्याच चंदेरीवर दूध सांडले होते.;) अरूंधतीचा प्रसंग झकास जमलाय!
बाकी लहानपणापासून 'वेळच्या वेळी, जागच्या जागेवर' हे ऐकलं असेल तर फायदा खूप होतो. मलाही सासरी " किती चांगले वळण लावलेय तुला आई-बाबाने " अशी शाबासकी मिळाल्याचे अंधुकसे स्मरते आहे.;) आणि त्या धाकाने सुधारणा होण्या ऐवजी "चला, आता कितीही पसारा केला तरी आवरायला हक्काचं माणूस आलं" असच वाटलं सगळ्यांना! लग्नं ठरताना आईने चिडवले होते, " तुझ्या घर आवरण्याच्या गुणांना (?) चांगलाच वाव आहे इथे."
नंतर नंतर सगळ्यांना इतकी सवय झाली.......पसारा करण्याची की एखादे दिवशी चुकुन आवरला नाही गेला तर "हे काय? आज आवराआवर नाही झाली का घराची? बरीयेस ना?" असे प्रश्न ऐकू येऊ लागले. जाऊ दे! फार मोठा विषय आहे तो!:)
अवांतर: मी निदान दुसर्‍यांच्या घरचा पसारा तरी आवरत नाही, माझी चुलतबहिण तर ओळखीपाळखीच्या लोकांकडेही म्हणते की जरा हे कपाट आवरून देऊ का वगैरे.;) काकूनं तीला खूपवेळा तंबी दिलीये..... दुसर्यांकडेतरी निदान असं न करण्या बद्दल!

रेवती

मदनबाण's picture

17 Nov 2009 - 7:40 am | मदनबाण

तुम्ही मस्त लिहता... :)

मदनबाण.....

The Greatest Gift You Can Give Someone Is Your Time,Because When You Are Giving Someone Your Time,You Are Giving Them A Portion Of Your Life That You Will Never Get Back.

क्रान्ति's picture

17 Nov 2009 - 8:33 am | क्रान्ति

खूपच मस्त लिहिलंय. शीर्षक तर अगदी पर्फेक्ट! :)

क्रान्ति
अग्निसखा

सहज's picture

17 Nov 2009 - 8:35 am | सहज

फार छान लिहलेयं

:-)

प्राजु's picture

17 Nov 2009 - 8:40 am | प्राजु

सह्हीये!! माझेच आहेत का हे वरचे सगळे प्रसंग??
मस्त लिहिले आहे.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

विसोबा खेचर's picture

17 Nov 2009 - 8:44 am | विसोबा खेचर

भाग्यश्री, मस्तच लिहिलं आहेस..:)

तात्या.

सुमीत भातखंडे's picture

17 Nov 2009 - 11:56 am | सुमीत भातखंडे

मस्त लिहिलय.

नेहमी आनंदी's picture

17 Nov 2009 - 12:06 pm | नेहमी आनंदी

असेच म्हणते

sneharani's picture

17 Nov 2009 - 12:14 pm | sneharani

रोजच्या आयुष्यातील घटना अगदी व्यवस्थितरित्या मांडल्या गेल्यात.
अगदी मस्त झालाय लेख.
वाचताना प्रत्येकाला आपल्या बाबतीत घडत असणारी घटना असच वाटेल.
छान.

अमोल केळकर's picture

17 Nov 2009 - 12:29 pm | अमोल केळकर

सुंदर लिहिले आहे

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

भाग्यश्री कुलकर्णी's picture

17 Nov 2009 - 12:46 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मस्तच लिहलयं

पर्नल नेने मराठे's picture

17 Nov 2009 - 1:11 pm | पर्नल नेने मराठे

मस्त मजा आली :d
चुचु

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Nov 2009 - 1:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बात तो पते की है। एकदम मस्त लिहीलं आहे!

लहानपणी असा काही ओरडा मिळाला की मी एकदम निरागस(?)पणे बाबांना म्हणायचे, "बाबा, समोरच टाकलेल्या गोष्टींमधून हवी ती गोष्ट पटकन दिसते. शिवाय सगळ्या गोष्टी एकाच जागी असतात, हा फायदा आहे का नाही?" ...

अदिती

प्रभो's picture

17 Nov 2009 - 7:48 pm | प्रभो

मस्त

--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

श्रावण मोडक's picture

17 Nov 2009 - 7:59 pm | श्रावण मोडक

छान!

चतुरंग's picture

17 Nov 2009 - 11:58 pm | चतुरंग

एकदम मनातलं सगळंच लिहिलं आहेत की!

इंजिनिअरिंगला माझा रूममेट होता तो त्याचे टेबल कधीही आवरत नसे
त्याच ३*४*दीड फूट उंच ढिगातून हवी ती वस्तू, पुस्तक, जर्नल, कागद, शीट्स शोधणे सोपे जाई त्याला. एकदा माझ्या सल्ल्याला बळी पडून त्याने चुकून ते आवरले, साफसूफ करुन कपाटात लावले आणि तेव्हापासून बरेच दिवस त्याला त्याच्या गोष्टी सापडेचनात!! मला जाम शिव्या घालायचा तो की तुझ्यामुळे मला वस्तू सापडत नाहीत. शेवटी महिन्याभराने पुन्हा पहिल्यासारखा सगळा पसारा झाल्यावर त्याच्या शिव्या थांबल्या आणि मी कानाला खडा लावला की दुसर्‍या कोणाला आवरण्याचा सल्ला द्यायचा नाही किंवा निदान सल्ला दिल्यानंतर तिथून आपण गायब व्हायचं! :D

चतुरंग

स्वाती२'s picture

18 Nov 2009 - 1:24 am | स्वाती२

मस्त लिहिलयं. लग्नाआधी आई ओरडायची पसार्‍यावरुन. इथे आल्यावर आपण केलेला पसारा आवरायला, हरवलेली वस्तू शोधायला कुणीही येणार नाही हे लक्षात आल्यावर आपोआप घेतली वस्तू जागच्या जागी ठेवायची सवय लागली.

लवंगी's picture

18 Nov 2009 - 1:34 am | लवंगी

आधी आई ओरडायची पसारे आवरा म्हणून.. आता मी ओरडते पोरांवर याच कारणासाठी..

भानस's picture

18 Nov 2009 - 6:46 am | भानस

अडाणि,मदनबाण, क्रान्ति :), सहज, प्राजू :), तात्या, सुमीत, नेहमी आनंदी,स्नेहराणी, अमोल, भाग्यश्री :),पर्नल नेने मराठे, प्रभो, स्वाती, लवंगी, विक्षिप्त आदिती, श्रावण मोडक :), रेवती व चतुरंग तुम्हां सगळ्यांचे अनेक आभार. प्रोत्साहनाने धीर आला.:)

रेवती, हे हे...पण होते खरेच असे माझेही ( मनात हं का..प्रत्यक्षात मी स्वतःला बजावूनच जाते नोंद न घेण्याबद्दल..हा..हा...)
चतुरंग कधी कधी मी मुलाला भेट देऊन आले( डॉर्म मध्ये ) की सगळे आवरून येते मग पुढचे पंधरा-वीस दिवस दिवसातून दहा-बारा फोन," अगं ममा, अमूक कुठे ठेवलेस गं? काय वैताग झालाय......" मी दरवेळी ठरवते पुढच्यावेळी कानाला खडा पण...... :(

अवलिया's picture

18 Nov 2009 - 6:35 pm | अवलिया

सु रे ख !!

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

भानस's picture

24 Nov 2009 - 11:20 pm | भानस

अवलिया प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.