Everything , everything

मराठी कथालेखक's picture
मराठी कथालेखक in जनातलं, मनातलं
21 May 2018 - 6:33 pm

नमस्कार ,
चित्रपट समीक्षण वगैरे करण्याइतका मी दर्दी नाही.. त्यातही इंग्लिश चित्रपट --ज्यातले सगळे संवाद नेमके कळाले असतीलच असं नाही.. झरकन जाणारे सगळे सब टाईटल्स सुद्धा १००% वाचले गेल्याची शक्यता नाही. झालंच तर पात्रांची नावं पण विसरलोय (इंटरनेटवर पुन्हा शोध घेता येईल पण कट्ट्यावर गप्पा मारताना कशाला पुन्हा तो खटाटोप).. तर समीक्षण नाही पण एका सुंदर चित्रपटाबद्दल सांगावेसे वाटतेय.. ते सांगण्याचा हा प्रयत्न

मुळात मी इंग्लिश चित्रपट फारसे बघत नाही.. हिंदी वाहिन्यांवर डब होवून येणारे इंग्लिश चित्रपट बहूधा Sci-fi असतात किंवा गुन्हेगारी संबंधित (FBI, CIA ई) किंवा काही आक्राळविक्राळ प्राण्यांचे वा भुतांचे असतात.. मला असले चित्रपट बघण्यात फारसा रस नसतो.
माझ्या DTH पॅक वर मी इंग्लिश चित्रपटांच्या वाहिन्या घेतलेल्या नाहीत. पण सध्या Airtel च्या कृपेने अशा काही वाहिन्या मला थोडे दिवस फुकट बघायला मिळत आहेत (म्हणजे माझ्या पॅकपेक्षा अधिकचे पैसे खर्च न करता)..
तर संधीचा फायदा घेत चांगल्या चित्रपटांचा शोध चालू असताना काल Romedy Now वर Everything, Everything नावाचा सुंदर चित्रपट पाहिला.

अगदी लहान असल्यापासून कधीच घराबाहेर न पडलेली एक मुलगी या कथेची नायिका आहे. आई सोबत राहणारी ही नायिका आता ती अठरा वर्षांची झाली आहे. इंटरनेट आणि घराच्या काचांतून दिसणारा बाहेरचा परिसर इतकीच तिची बाहेरच्या जगाशी ओळख. एका असाध्य आजाराने त्रस्त असल्याने बाहेरचा कोणताही संसर्ग होवू नये म्हणून तिच्या आईने तिच्यावर बंधने घातली आहे. तिनेही आपले असे कंटाळवाणे जगणे स्वीकारले आहे. जरी ती आनंदी , उत्साही नसली तरी तिची त्याबद्दल तक्रारही नाही. तिला समुद्राकाठी जाण्याची खूप इच्छा आहे पण ते या आयुष्यात शक्य होणार नाही हे तिला माहित आहे.
घरात फक्त तिची नर्स कार्ला तसेच साधारण तिच्याच वयाची कार्ला मुलगी रोज यांनाच आत येण्यास मुभा आहे. मुलीला कोणताही संसर्ग होवू नये यासाठी तिच्या आईने सर्वतोपरी काळजी घेतलेली आहे, काहीसे नियमही आखले आहेत आणि नायिकेनेही विनातक्रार सगळे नियम मान्य केले आहेत.
अशा स्थितीत नायिकेची तिच्या समोरील घरात रहायला आलेल्या एका तरुणाशी (म्हणजे कथेचा नायक) काचेच्या आडूनच ओळख होते. काचांआडूनच मोबाईल नंबरची देवाण घेवाण होते. संदेशांची देवाण घेवाण होत गप्पा रंगू लागतात. नायिका कार्लाकडे त्या मुलाला घरी भेटायला बोलावण्याची परवानगी मागते , नायिकेची चांगली मैत्रीणही असलेली असलेली कार्ला तिच्या हट्टापुढे विरघळते आणि एकमेकांना स्पर्श करायचा नाही या अटीवर भेटण्याची परवानगी देते. अर्थात आईला मात्र हे काही माहित नसते. आईला जेव्हा कळते तेव्हा ती मुलीला शांतपणे त्याला पुन्हा भेटण्यापासूण परावृत्त करते पण पंधरा वर्षांपासून साथ देणार्‍या कार्लाला मात्र कठोरपणे कामावरुन काढून टाकते आणि कडक शिस्तीची नवीन नर्स नेमते.
पण आईच्या अशा वागण्याने दुखावलेली नायिका आईसाठी एक पत्र सोडून घरातून पळून नायकासोबत हवाईला फिरायला जाते...भरपूर मस्ती करते, समुद्राच्या पाण्यात यथेच्छ डुंबते , पोहायला येत नसतानाही समुद्रात सूर मारते.
पुढे काय होते ते मी आता इथे लिहीत नाही कारण आपल्या पैकी कुणाला हा चित्रपट बघावासा वाटेल.. पण तरी कुणाला पुर्ण कथा जाणून घ्यायची असल्यास कृपया मला व्यनि करा.
प्रेमासाठी माणूस काय करु शकतो ... सारं काही .. Everything , everything .. या अर्थाने चित्रपटाचे शीर्षक आहे... नायिकेच्या आईने आपल्या पती आणि मुलाला एका अपघातात गमावले आहे आणि आता मुलगीच तिचं सर्वस्व आहे.. तिचं आपल्या मुलीवर खूप जास्त प्रेम आहे..
इकडे नायिकेला नायक भेटला आहे.. तारुण्यसुलभ प्रेमाशी , एका नव्या विश्वाशी तिची ओळख झाली आहे. आईच्या सुचनेच्या विरोधात जावून घरातून बाहेर पाऊल बाहेर टाकण्याचा विचारही जिच्या मनाला शिवला नाही ती हवाईला पळून जाते... हे फक्त ती तो भेटल्यामुळेच करते.. प्रेमासाठी सारं काही.. करणार्‍या मायलेकींची ही कथा अनेकांना आवडू शकेल.

चित्रपटआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

21 May 2018 - 7:32 pm | पद्मावति

वाह, छान ओळख करून दिलीत. हा चित्रपट पाहायला आवडेल मला.

हा नुकताच आलाय ना चित्रपट? पहायला हवा. विषय तर चांगला वाटतोय. 'स्टोरी' न सांगीतल्याबद्दल धन्यवाद!

ज्योति अळवणी's picture

7 Jul 2018 - 10:03 pm | ज्योति अळवणी

अप्रतिम चित्रपट आहे. मी 2 वेळा बघितला. नक्की बघावा असा आहे

मराठी कथालेखक's picture

16 Jul 2018 - 7:16 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद

माहितगार's picture

7 Jul 2018 - 10:36 pm | माहितगार

सुरेख चित्रपट परिक्षण . योग आल्यास बघेन . पु. ले. शु.

मराठी कथालेखक's picture

16 Jul 2018 - 7:16 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद