"शुद्ध' काही जीवघेणे...

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
7 Feb 2008 - 10:58 pm

---------
व्याकरण, भाषा, यांचा आग्रह अस्मादिकांना पूर्वीपासूनचा.
मी काही तर्कतीर्थ नाही, की भाषासुधारक वि. दा. सावरकर.
पण माणसानं निदान शुद्ध, व्यवस्थित, दुसऱ्याला समजेल, अशा सोप्या पण स्वच्छ भाषेत बोलावं, एवढा बरीक आग्रह.
किंबहुना, हट्टच.
(त्यामुळं गृहस्वामिनीशीबरोबरही अनेकदा समरप्रसंग ओढवतात. असो.)

पुण्याची भाषा अधिक शुद्ध, व्याकरणाग्रही, आदीम आहे, असा आमचा आपला पूर्वीपासूनचा ग्रह. पण पुण्यात दहा वर्षांच्या मुक्कामातला अनुभव जवळपास नैराश्‍यजनकच. आता, काही तज्ज्ञ मंडळी म्हणतील, बाहेरून आलेल्या (आमच्यासारख्या) लोकांनीच पुण्याची भाषा बिघडवली. पण मी हे बोलतोय हे पुण्यात राहणाऱ्या, म्हणून पुणेकर असलेल्या बाहेरच्या बुणग्यांविषयी नाही; तर ज्याच्या पिढ्यान्‌ पिढ्या पुण्यातच जन्मल्या (आणि खपल्या) आहेत, अशा अस्सल पुणेकर म्हणवणाऱ्यांबद्दल.

"तुम्ही येणार आहे काय,' हे मराठी व्याकरण मला पुण्यात आल्यावरच लक्षात आलं.
"तू येणार आहेस काय,' "तो येणार आहे काय' आणि "तुम्ही येणार आहात काय,' ही वाक्‍यरचना योग्य, असं आमचं आपलं मराठीचं दुबळं ज्ञान आम्हाला सांगतं.
पण "तुम्ही येणार आहे काय' ही आमच्या ज्ञानात भरच.

"सिंह' ( lion ) हा शब्द लिहिताना "सिंह' लिहायचा आणि "सिंव्ह' असा उच्चारायचा, अशी आपली आम्हाला पुस्तकातून, अभ्यासातून, शाळेतून मिळालेली शिकवण. पण पुण्यालाच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्राला ज्याचा अभिमान असला पाहिजे, अशा सिंहगडाचा उच्चार अस्सल पुणेकरही "सिंव्ह'गड' नव्हे, तर "सिंह'गड असाच करताना पाहून, तानाजी नावाच्या नरसिंहाचे बलिदान व्यर्थ जाते की काय, अशीच शंका आमच्या मनाला (सिंहासारखी) चाटून गेली.

पाण्याची "टाकी' असते. पाण्याचं "टाकं' हा शब्द मला पहिल्यांदाच कळला.
पुठ्ठ्याचा खोका असतो. "खोकं'ही नवीन होतं.
माळावर वारा सुटतो. "वारं' मला न झेपणारं होतं.

बाकी तो लसूण की ती लसूण,
ती लसणीची चटणी, की ते लसणीचे तिखट.,
तो ढेकर की ती ढेकर,
तो लाईट की ते लाईट,

हे वाद तर आदीम आहेत. आणि त्यांना अंतही नाही. त्यांत मला पडायचं नाही. पण वानगीदाखल (वांगीदाखल) काही उदाहरणं दिली.

फुटाणे म्हणजे, साखर-फुटाणे.
इथे चण्यालाच फुटाणे म्हणतात.

आता यापुढची काही उदाहरणं अस्सल पुणेकराची नसतील, पण एकूण अनुभवावरची आहेत.
त्याबद्दल मी अस्सल पुणेकराला दोष देणार नाही.

वात आणणारे काही शब्द ः
(माझ्या मते) योग्य शब्द सुरुवातीला आणि त्याचं अपरूप शेवटी.
पोळी - चपाती
(अनेकवचनी) केस - केसं
किल्ली - चावी.
पेन्सिली/पेन्सिल्स - पेन्सिल्या
गटारे - गटारी
(एकवचनी) कारंजे - कारंजा
आमटी - डाळ
भात - राईस
--------------

आता, डोक्‍याची मंडई करणाऱ्या (हाही वाक्‍प्रचार पुण्यातलाच!) काही प्रश्‍नांची जंत्री

ः1. स्थळ ः अमृततुल्य हॉटेल कम टपरी. (इथे फक्त चहा आणि चहाच मिळतो. अगदी डोक्‍यावरून पाणी म्हणजे साधं बिस्कीट आणि क्रीम रोल.)
तिथे आपण एकटेच चहा प्यायला गेल्यावर, कळकटातला कळकट वेटर खुणेनंच विचारतो ः"एक' का?(म्हणजे बोटानं फक्त "एक'ची खूण. संभाषण नाहीच.)

अरे बैला, मी काय तुझ्याकडे "सुपरपॉवर रिन' विकायला आलोय? एकटा चहा प्यायला आलेलो दिसतोय ना? मग (शक्‍य असेल, तर बोटं बुडवून) चहाचा कप बोडक्‍यावर आपट, नाहीतर तोंडानं विचार ना! खाणाखुणा कसल्या करतोयंस?
---
2. स्थळ ः अस्मादिकांच्या सोसायटीचे पार्किंग, किंवा घराचा दिवाणखाना, किंवा कोणतीही जागा.
वेळ ः दुपारी अकरा, बारा, दोन किंवा तीन, चारपर्यंत कोणतीही.
समोरून कुणातरी परिचिताचे आगमन, किंवा फोनवरून संभाषण.
अगदी निरागस, प्रामाणिक विचारणा ः आज "सुटी' का?

पण त्याची ही निरागसता तळपायाची आग मस्तकाला नेऊन भिडवणारी.
अरे अकलेच्या खंदका! नतद्रष्टा! मी पत्रकार आहे! सकाळी उठल्यावर चहा ढोसताना तुला ज्या ताज्या बातम्या चवीचवीनं वाचायला आवडतात (आणि चॅनेलवरची एखादी बातमी त्यात रंगवून सांगितलेली नसली, तर तू शिव्या घालतोस,) त्यासाठी जोडे, लेखणी आणि की बोर्डची बडवाबडवी मला आणि माझ्या जमातीतल्या समस्त पोटार्थ्यांना रोजच करावी लागते. तुझ्यासारखं दहा ते सहा ऑफिस, मग निवांत घरी चहा-पोहे, पर्वती, रात्री साडेआठला वरणभात नाहीतर गुरगुट्या भात आणि पावणेदहापर्यंत गुडूप, असं सरळ, साधं, सोपं आयुष्य नाही आमचं! तुमच्या गरजेपोटी आम्हाला रात्री एकपर्यंत लोकांच्या कुलंगड्यांच्या उठाठेवी करत, सोमालियापासून हिरडोशी बुद्रुकपर्यंतची उष्टी-खरकटी आवरत बसावं लागतं. रात्री अकरा-बारा-एक कितीही वाजेपर्यंत उपाशी पोटी भरल्या घरच्या धन्यांच्या भाषणांच्या बातम्या देत बसावं लागतं.संध्याकाळी आणि रात्री ऑफिसमध्ये म्हटल्यावर सकाळी (आणि सकाळीच) मी घरी असणं अपेक्षित आहे ना? मग कशाला तेच तेच प्रश्‍न विचारून डोकं पिकवतोस?
---

3. तुम्ही "एडिटिंग' म्हणजे नेमकं काय करता? अग्रलेख पण तुम्हीच लिहिता का?

या प्रश्‍नावर त्या माणसासमोर लोटांगण घालणं किंवा स्वतःच्या डोक्‍याचे केस उपटून घेणं, याखेरीज दुसरा काहीच पर्याय नसतो.
असे हे काही प्रश्‍न.
काही शुद्ध, पण जीवघेणे!

यांतून सुटका बहुधा अस्मादिकांचे अवतारकार्य संपुष्टात येईपर्यंत तरी नाही!
-------------

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

8 Feb 2008 - 12:04 am | विसोबा खेचर

आपल्या अभिजिता,

मनमोकळेपणाने विचार मांडले आहेस, हे आवडले. लिहिण्याचा ढंगही आवडला.परंतु त्यातल्या विचारांशी मी सहमत नाही!

अरे भाषेला, शब्दांना असे ठरावीक चौकटीत कोंडून ठेवू नका रे!

व्यक्तिश: मला विचारशील तर अमूक एक नियम म्हणजेच तो भाषेचा अंतीम नियम आहे असे नव्हे! म्हणजे निदान असे मी तरी मानत नाही!

आता तू दिलेल्या उदाहरणांबद्दलच बोलायचं म्हटलं तर मी तरी पोळीला नेहमी हटकून चपाती असंच म्हणतो. माझ्या घरी, नातेवाईकांत सगळे पोळी असंच म्हणतात परंतु मला मात्र चपाती हाच शब्द वापरायला आवडतो. मला तो अधिक आपला वाटतो!

हां, आता भाषेचे, शुद्धलेखनाचे, व्याकरणाचे काही ढोबळ नियम आहेत, जे लहानपणी घरच्यांकडून म्हणा, किंवा शा़ळेत शिकताना म्हणा, जे माझ्या कानावरून गेले ते मीही मानतो. परंतु कुणी त्याचे स्तोम माजवलेले मी तरी ऐकून घेत नाही!

आमच्या घरी आमटीला आमटीच म्हणतात, परंतु त्याकरता कुणी डाळ हा शब्द जरी वापरला तरी तो मला आवडतो. 'मस्तपैकी डाळभात जेवलो!', किंवा 'डाळचावल खाल्ले' ही दोन्ही वाक्य मला सारखीच प्रिय आहेत! :)

माझ्यामते 'भाषा' हे केवळ एक साधन आहे, साध्य नव्हे! तुम्ही लोकांनी तिला साध्य मानल्यामुळे तुमच्यावर ही अशी डोकं धरून बसायची वेळ आली! :)

अरे भाषेला, शब्दांना, असं बंदीस्त करू नका रे! भाषेला जसं बागडायचं तसं बागडू द्या रे!

बरं का अभिजिता,

कुठलीच भाषा वाईट किंवा चुकीची नसते! चांगले-वाईट असतात ते त्या भाषेत व्यक्त केलेले विचार! भाषा ही सगळ्यांचीच आहे. कुणा एका माणसाकडे/समूहाकडे तिचे नियम ठरवण्याचा अधिकार नाही,एवढं तू लक्षात घ्यावंस असं वाटतं!

आता आमच्या गाण्यातलंच एक उदाहरण घे! जसे एखाद्या भाषेत व्याकरणाचे, शुद्धलेखनाचे काही ढोबळ नियम असतात तसेच नियम आमच्या रागदारी संगीतातही असतात आणि शक्यतोवर ते पाळावेत या मताचा मीही आहे. नाही असं नाही! परंतु जर एखाद्या रागात एखादा वर्ज्य स्वर किंवा एखादी अनवट सुरावट जर कुणी गाऊन गेला आणि ती कानाला छान वाटली तर तिथे कुणी गाण्याचं व्याकरण आणू नये असं मला वाटतं, किंबहुना त्या माणसाला गाण्यातली खरी गंमतच कळलेली नाही असं मी म्हणेन! अहो २+२=४ हे गणितात ठीक आहे हो! भाषेत किंवा गाण्यात ते उपयोगी नाही! अरे अभिजिता, दर दहा कोसावर भाषा बदलते असं म्हणतात! चांगलंच आहे की ते. अरे म्हणूनच तर आजतागायत भाषेतला गोडवा, त्यातली विविधता टिकून आहे!

हां, आता राहता राहीला प्रश्न, 'भाषेचं काय होणार?', 'भाषा कशी टिकणार?' असे गळे काढणार्‍या डुढ्ढाचार्यांचा! तर त्याची काळजी नको. अरे तुम्हीआम्ही जाऊ, भाषेच्या शुद्धतेचा मक्ता घेतलेले ते गळेकाढू डुढ्ढाचार्यही जातील, परंतु भाषा ही नेहमीच राहील. कारण माझ्यामते भाषा अमर आहे! शुद्धलेखनाचे आणि व्याकरणाचे सोकॉल्ड नियम भाषेला त्यांच्या कायमस्वरुपी बंधनात कधीच अडकवून ठेऊ शकणार नाहीत!

बरं का अभिजिता, एकदा आमच्या मन्सूरअण्णांचं काय बिनसलं होतं कुणास ठाऊक! ते मैफलीत मारवा गात होते आणि एकसारखा कोमल गंधार लावत होते! बरं मन्सूरअण्णांसारख्या दिग्गजाला विचारणार तरी कोण? गाणं तर रंगलं होतं!

अखेरीस मैफल संपल्यानंतर आमच्या गोविंदराव पटवर्धनांनी हळूच त्यांना विचारलं,

"काय हो अण्णा? हा कोणता राग? मारव्यासारखा वाटत होता!"

मन्सूरअण्णा म्हणाले, "अरे तो मारवाच होता!"

त्यावर गोविंदराव बिचकत म्हणाले, "अण्णा, पण तुम्ही तर सारखा कोमल गंधार लावत होतात!"

आमचे मन्सूरअण्णा म्हणजे महामिश्कील बरं का, ते गोविंदरावांना हसून म्हणाले,

"ठीक आहे. मग आपण त्याला कोमल गंधाराचा मारवा म्हणू! किंवा मारव्या अंगाचा तोडी म्हणू!" :)

"पण जे काही गायलो ते तुला आवडलं किंवा नाही तेवढं बोल! ते महत्वाचं!":)

तात्पर्य काय, तर डाळभात म्हटलं काय, डाळचावल म्हटलं काय, किंवा आमटीभात म्हटलं काय! उत्तम चव लागल्याशी आणि पोट भरल्याच्या तृप्तीशी तेवढा आपाला मतलब!

असो..

तात्या.

देवदत्त's picture

9 Feb 2008 - 11:39 pm | देवदत्त

परंतु जर एखाद्या रागात एखादा वर्ज्य स्वर किंवा एखादी अनवट सुरावट जर कुणी गाऊन गेला आणि ती कानाला छान वाटली तर तिथे कुणी गाण्याचं व्याकरण आणू नये असं मला वाटतं,

ह्यावर सहमत.
तात्या, मला राग, स्वर हे शास्त्रीय संगीतातील (फक्त?) काही कळत नाही. आपल्या कानाला आवडेल ते संगीत चांगले. मनाला रूचतील तर शब्दांसकट गाणी हृदयात. त्यामुळे एखाद्या गाण्यात स्वर, सुरांची अदलाबदल जास्त फरक पाडत नाही.

तसेच भाषा आणि संगीत एकत्र आले तरी तेच. दक्षिण भारतीय सिनेमातील गाणी जेव्हा भाषांतर केलेल्या सिनेमात त्याच चालीवर गायली जातात तेव्हा तीही काही आवडतात. त्यात कुठे आपण भाषेला जास्त महत्व देतो?

सृष्टीलावण्या's picture

22 Feb 2008 - 11:02 am | सृष्टीलावण्या

तात्या, प्रश्न भाषेचा नसून महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणवून घेणार्‍या पुण्याचा आणि इतरांना सदैव उपेक्षेने मारून राहणार्‍या व्याकरणकार पुणेकरांचा आहे...

थोडे महिन्यांपूर्वीचीच गोष्ट आहे. मी unmatched ह्या शब्दाचे अजोड असे भाषांतर केले जे reject झाले कारण एका पुणेरी परीक्षकाचे मत match = तुलना म्हणून unmatched = अतुलनीय.

आता बोला. १०, ००० शब्दात काय प्रत्येक शब्दाला समानार्थी शब्द देत बसणार का?

म्हणूनच माझे म्हणणे की पुण्यातल्या तथाकथित व्याकरण नियमांवर वृत्तपत्रात पानेच्या पाने भरून लिहिणार्‍यांनी सध्या फक्त पुणे आणि जवळपास लक्ष केंद्रित करावे...

विसोबा खेचर's picture

22 Feb 2008 - 11:25 am | विसोबा खेचर

तात्या, प्रश्न भाषेचा नसून महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणवून घेणार्‍या पुण्याचा आणि इतरांना सदैव उपेक्षेने मारून राहणार्‍या व्याकरणकार पुणेकरांचा आहे...

अगदी करेक्ट!

ही इतरांना सदैव उपेक्षेने मारून राहणार्‍या व्याकरणकार मंडळी, हेच माझ्या रागाचं मूळ कारण आहे! बघावं तेव्हा हे भिकारचोट लोक आम्हाला व्याकरणाची, प्रमाणभाषेची शाणपत्ती शिकवत असतात!

मी मूर्ख मनुष्य आहे हे मला माहित्ये परंतु इतकाही मूर्ख नाही की व्याकरणाचे काही ढोबळ आणि बेसिक नियम अवश्य पाळावेत हे मला कळू नये! इन फॅक्ट माझ्यामते हे नियम नकळतच पाळले जातात! त्याकरता भेंडी कुणी कुणाला काही विशेष शिकवायची आणि मारे मोठमोठी पुस्तके लिहून शाणपट्टी गाजवायची गरज नाही!

प्रत्येक मनुष्य हा भाषा ही आपल्या आईवडिलांकडून आणि लहानपणी शाळेत शिकतच असतो. तो लिहायला शिकतो, बोलायला शिकतो. तेव्हा नकळतपणे हे जे काही भाषेचे आणि व्याकरणाचे ढोबळ नियम आहेत ते त्याच्याकडून आपसूकच पाळले जातात.

अहो मला सांगा, अगदी ठार अशिक्षित आईवडिलांची मुलेही भाषा बोलायला शिकतातच ना? ही भाषा त्यांना कोण शिकवतं? त्यांचे अशिक्षित आईवडीलच ना? की त्यांना शिकवायला आणि सो कॉल्ड प्रमाणबद्ध आणि शुद्ध बोलायला तो फोकलिचा वाळंबे येतो??

मग आता हे XXमारिचे व्याकरणवाले असं म्हणणार का, की तो मुलगा आपल्या आईवडिलांकडून जी भाषा बोलायला शिकला आहे ती शुद्ध आणि प्रमाणबद्ध नाही?? कुणी दिला त्यांना ह अधिकार???

आपला,
(मायमराठी भाषेचा स्वातंत्र्यसेनानी!) तात्या.

प्राजु's picture

8 Feb 2008 - 12:24 am | प्राजु

म्हणतात ते अगदि खरंय.. भाषेला बंधनात बांधून ठेऊन काय उपयोग?
आमच्याकडे " तो डाव्(वाढणीसाठि लागतो तो) की ती डाव" असा वाद असतो. तसेच मॅगी (२ मिनिटात तयार होणारे).. ते मॅगी की ती मॅगी...??
चालायचंच..

- प्राजु

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Feb 2008 - 12:26 am | llपुण्याचे पेशवेll

" स्थळ : अमृततुल्य हॉटेल कम टपरी. (इथे फक्त चहा आणि चहाच मिळतो. अगदी डोक्‍यावरून पाणी म्हणजे साधं बिस्कीट आणि क्रीम रोल.)
तिथे आपण एकटेच चहा प्यायला गेल्यावर, कळकटातला कळकट वेटर खुणेनंच विचारतो ः"एक' का?(म्हणजे बोटानं फक्त "एक'ची खूण. संभाषण नाहीच.)"
अहो बिचारा वेटर असेल मौनव्रतधारी पण म्हणून असा पाणउतारा करायचाका बिचार्‍याचा? च्यामारी गांधीबाबाने केले कि मौन आणि पुणेकराने केला कि माज ही कुठली तर्‍हा? :)

"बाकी तो लसूण की ती लसूण,
तो ढेकर की ती ढेकर"
आला तर तो ढेकर आणि आली तर ती ढेकर तसेच खाल्ला तर तो लसूण आणि खाल्ली तर ती लसूण.. स्त्रीमुक्ति चळवळीमुळे असे काही भेद हे सुधारक पुणेकरांनी मान्य केले आहेत. :)

भाषा-सुधारक
डॅनी.
पुण्याचे पेशवे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Feb 2008 - 2:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भाषा, शुद्धलेखन, शब्द,व्युत्पत्ती, व्याकरण, वृत्त, हे आमचे सध्या नावडते विषय असल्यामुळे अशा लेखनाचे आम्ही केवळ वाचक आहोत :)

समजते ते सर्व शुद्ध संप्रदायाचे ह.भ.प.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनस्वी's picture

8 Feb 2008 - 4:22 pm | मनस्वी

तात्याशी १००% सहमत.

मला वेगवेगळे बोलीभाषेतील शब्द ऐकायला मजा वाटते. ते गोड वाटतात.

लोटांगण घालावेसे नाही वाटत.

आपण कुठल्या कृत्रिम साचेबद्ध नाटकी जगात नाही तर दिलखुलास माणसांमध्ये आहोत असे वाटते.

ज्याच्याशी ज्याच्या-त्याच्या style मध्ये बोलण्यात मला आपलेपणा वाटतो!

(पुणेकर) मनस्वी

देवदत्त's picture

9 Feb 2008 - 11:47 pm | देवदत्त

छान लिहिलेत. व्याकरणाशी आपले (माझे) शत्रुत्व नाही की खास मित्रत्व नाही.
पुलंनी म्हटल्याप्रमाणे, एखाद्या दुबळ्या राष्ट्राने बलवान राष्ट्रांशी मिळून मिसळुन रहावे त्यातलाच प्रकार. :)

हैदर अली's picture

10 Feb 2008 - 4:02 pm | हैदर अली

शुद्धलेखनाचे आणि व्याकरणाचे सोकॉल्ड नियम...
तात्या,
भाषेला व्याकरण आणि नियम हे असावेच लागतात असे मला तरी वाटते. भाषा अमर असते हे खरे, पण तिची वाताहत झालेली बघवत नाही. वानगीदाखल व्याकरण नियम धाब्यावर बसवणारे आजच्या मराठीतील रूढ शब्द
'गहूचा डबा'
'गणितची वही'
'चपाती खाल्या',
ही व अशी मराठी तुमच्या कानांना गोड वाटायला लागली तर 'मी मराठी' म्हणवून घ्यायला लाजच वाटेल.

आपला
हैदर अली

विसोबा खेचर's picture

10 Feb 2008 - 5:34 pm | विसोबा खेचर

भाषेला व्याकरण आणि नियम हे असावेच लागतात असे मला तरी वाटते.

हो, काही एक ढोबळ नियम असतात हे मलाही मान्य, असे मी देखील म्हटले आहे. परंतु तेच नियम अंतीम असतात व त्या नियमानुसार बनलेलीच काय ती प्रमाणभाषा असे निदान मी तरी मानत नाही!

गहुचा डबा -

हम्म! गहुचा डबा छान वाटतंय! त्या मनाने 'गव्हाचा डबा' कानांना जरा रुक्ष वाटतंय! :)

गणितची वही -

हम्म! हे जरा वेगळं वाटतंय. पण चलता है.. :)

चपाती खाल्ल्या -

हैदरराव, काय योगायोग आहे पाहा. आमच्या ओळखीचा किसन माळी नेमके 'चपाती खाल्ल्या' असंच म्हणतो! त्याचं ते 'चपाती खाल्ल्या' छान वाटतं कानांना ऐकायला! :)

अवांतर - किसन माळीचं आम्ही लवकरच व्यक्तिचित्र रंगवणार आहोत. काळासावळा किसन माळी हा आमच्या गणगोतातला. मोठा लाघवी आणि अगदी साधा मनुष्य आहे! :)

तात्पर्य काय, तर तुमचं ते पांढरपेशी आणि प्रामणभाषेचा मक्ता सांगणारे,

गव्हाचा डबा
गणिताची वही
चपात्या खाल्ल्या (की पोळ्या खाल्ल्या? कारण व्याकरण-शुद्धलेखनकार आपल्या अभिजितरावांना चपाती हा शब्द देखील वात आणणारा वाटतो!)

यातून जो अर्थ प्रतित होतो, तोच अर्थ

'गहूचा डबा'
'गणितची वही'
'चपाती खाल्या',

यातूनही प्रतित होतो असे आम्हाला वाटते!

भाषा हे साधन आहे, साध्य नाही असे आम्ही आधीच म्हटले आहे. असो...

ही व अशी मराठी तुमच्या कानांना गोड वाटायला लागली तर 'मी मराठी' म्हणवून घ्यायला लाजच वाटेल.

छे छे, काहीतरी भलताच गैरसमज होतो आहे आपला. आम्हाला तरी मुळीच लाज वाटत नाही! तुम्हाला वाटत असेल तर त्याला आमचा इलाज नाही.

आम्ही (म्हणजे मी, किसन माळी आणि असे कित्येक!) अभिमानाने स्वत:ला मराठी म्हणवून घेतो आणि घेत राहू!

असो, तुमचं प्रमाणबद्ध, व्याकरणशुद्ध मराठी तुम्हाला लखलाभ...

आमचं धेडगुजरं (तुमच्या म्हणण्याप्रमाणे!) मराठी आम्हाला लखलाभ! कारण भाषा ना तुमच्या मालकीची, ना आमच्या मालकीची! ती सर्वांची आहे...!

तात्या.

आपला अभिजित's picture

10 Feb 2008 - 5:29 pm | आपला अभिजित

आणखी काही
धेडगुजरी वाक्प्रचार.

- दूध पिलं.
- लाडूंची विक्री. (लाडवांची विक्री)
- मी खूप व्यस्त (इनव्हर्स) आहे. (व्यग्र)
- वरचा मजला खाली आहे. (वरचा मजला रिकामा आहे.)

मी यावर एक ग्राफिटी पण वापरली होती.
`मराठीत हिंदी घुसडणार्‍यांचा वरचा `खाली' असतो!

-आपला अभिजित.

सुधीर कांदळकर's picture

10 Feb 2008 - 6:02 pm | सुधीर कांदळकर

मोजकेच अंतर ठेवून सैनिकी शिस्तीत चालत नाही तसेच भाषेचे आहे. ती बोलणा-याच्या व ऐकणा-याच्या सोयीनुसार बोलावी. अर्थ एकच, नेमका व अचूक असल्याशी कारण. बोलीतील मजा लेखी भाषेला नाही. हे खरेच आहे.

पण काही बाबतीत मी तुमच्याशी सहमत नाही.

पुण्याची मराठी वैय्याकरणिकदृष्ट्या शुद्ध नाही बरे का. उच्चभ्रू पुणेकर देखील 'तो म्हणला' असे पुण्यात म्हणतात. 'तो म्हणाला' हे बरोबर आहे. मुंबईचीच मराठी शुद्ध आहे. इतरहि अनेक प्रयोग आहेत येथे एकच दिला आहेत.

अरे बैला, मी काय तुझ्याकडे "सुपरपॉवर रिन' विकायला आलोय? एकटा चहा प्यायला आलेलो दिसतोय ना? मग (शक्‍य असेल, तर बोटं बुडवून) चहाचा कप बोडक्‍यावर आपट, नाहीतर तोंडानं विचार ना! खाणाखुणा कसल्या करतोयंस?

मी फक्त पत्ता विचारायला आलो आहे.

आज सुटी का? म्हणजे सुटीच आहे की वेगळी शिफ्ट आहे की सुटी घेतली? का कामावरून काढून टाकले?

काही इतर धेडगुजरी प्रयोगः
कागद (कागदे) कापली.
बोट कापल आणि खून आल.

हैदर अली's picture

10 Feb 2008 - 6:15 pm | हैदर अली

कानाला गोड वाटलं ते बरोबर, हे संगितात चाललं तरी भाषेत चालत नाही. सामान्यरूप ही संकल्पना हे मराठीचे वैशिष्ट्य आहे. तेच विसरायचं म्हटलं तर त्या भाषेला मराठी न म्हणता धेडगुजरी म्हणावे लागेल. परंपरेने किंवा अज्ञानातून उद्भवणारी अशुद्ध भाषा आणि अनास्थेतून उद्भवणारी अशुद्ध भाषा यांमध्ये फरक आहे. शेतकरयाचे मळक कपडे आणि कारकुनाचे मळके कपडे यात फरक आहे.

अभिजितराव,
मी तुमच्याशी सहमत आहे. आणखी काही वाक्प्रचार...

नाही व्हायला पाहिजे. (व्हायला नको)
मी आली / गेली / भेटली / बोलली (ले)
पतंगी उडवल्या, इत्यादी.

हैदर अली's picture

10 Feb 2008 - 6:20 pm | हैदर अली

केसं, बुटं, दगडं, गुलाबं...
तात्यांना समदं ग्वाड वाटतंया !!

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Feb 2008 - 12:15 am | llपुण्याचे पेशवेll

बोलीभाषा ह्या भाषेची खुमारी वाढवत असल्या तरी जर भाषा म्हणून जतन करावयाची असेल तर भाषेला नियम, व्याकरण, उच्चारण हे पाळावेच लागतात.
यावर कोणी काही म्हटले तरी चालेल. कोणीतरी कणखर राहून हे नियम, व्याकरण जपले म्हणून ते टिकले आणि आपल्यापर्यंत पोचले ज्याना ते पुढे चालू रहावे असे वाटत असेल त्यानी कसोशीने त्याचे पालन करून ते पुढच्या पिढीपर्यंत पोचवावे.
बाकी ज्याना गोडी चाखण्यासाठीच भाषा आहे असे वाटते त्यानी गोडी चाखित रहावे. ज्ञानोबांनी म्हणून ठेवलेच आहे 'जो जे वांछील तो ते लाहो'.
पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर's picture

12 Feb 2008 - 12:56 am | विसोबा खेचर

बोलीभाषा ह्या भाषेची खुमारी वाढवत असल्या तरी जर भाषा म्हणून जतन करावयाची असेल तर भाषेला नियम, व्याकरण, उच्चारण हे पाळावेच लागतात.

लेको, नाही कुणी म्हटलंय? जे काही ढोबळ नियम आहेत, लहानपणी शाळेत कानावर पडले आहेत, ते आम्हीही मानतोच की! पण म्हणून कोणी जर का आम्हाला शिकवू पाहात असेल तर आम्ही त्याला फाट्यावर मारू!

यावर कोणी काही म्हटले तरी चालेल.

हेच आम्हीही म्हणतो! हे व्याकरणशुद्ध, ते चुकीचं, पोळी म्हणजे बरोबर आणि चपाती म्हणजे चूक असा संकुचितपणा आम्ही मानणार नाही!

कोणीतरी कणखर राहून हे नियम, व्याकरण जपले म्हणून ते टिकले आणि आपल्यापर्यंत पोचले

काय सांगता? ज्ञानेश्वरांच्या वेळेला जे शब्द होते, जे व्याकरणाचे नियम होते ते आजही तसेच्या तसेच आहेत असं तुम्हाला म्हणायचंय? ज्ञानेश्वरीतलं मराठी हे खूप वेगळं आहे, आजचं मराठी हे खूप वेगळं आहे. काळ येतो आणि जातो, त्याचप्रमाणे भाषा आणि तिचे नियमही नेहमी बदलत असतात! आम्ही आमच्या मागील एका प्रतिसादात असं म्हटलं आहे की भाषा हे साध्य आहे, साधन नव्हे!! भाषा ही चार दीडदमडीच्या डुढ्ढाचार्यांनी ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे चालत नसते. आमचा किसन माळी, आमची साधना कोळीण ही मंडळी तुम्ही आम्ही जे मराठी वापरतो, जे नियम वापरतो ते नियम ही मंडळी पाळत नाहीत, नव्हे त्यांना असे काही नियम असतात हेच मुळी माहिती नाही! मग काय तुम्ही असं म्हणणार का की आपण जी लिहितो,बोलतो तीच काय ती शुद्ध भाषा आणि किसन माळी, साधना कोळीण वापरतात ती अशुद्ध भाषा? कुणी दिला हा अधिकार तुम्हाला? त्या चार दीडदमडीच्या व्याकरणवाल्या डुढ्ढाचार्यांनी??

निदान आम्ही तरी ते नियम म्हणजे अंतीम नियम असे मानत नाही! पोळी म्हटलं म्हणजे उत्तम मराठी आणि चपाती म्हटलं म्हणजे धेडगुजरी मराठी इतका हलका आणि संकुचित विचार भाषेच्या बाबतीत आम्ही करू शकत नाही!

आम्ही आमच्या प्रतिसादात असंही म्हटलं होतं की भाषा ही कधीच वाईट वा चुकीची नसते. बरेवाईट असतात ते त्या भाषेतून व्यक्त केलेले विचार! भाषा हे केवळ त्या विचारांच्या देवाणघेवाणीचं साधन आहे. आज वास्तविक पाहता, ज्ञानेश्वरीतलं मराठी हे कित्येकांना समजत नाही, तरीही आज अनेक मंडळी ज्ञानेश्वरी समजून घेण्याचा प्रयत्न करतात, शिकण्याचा प्रयत्न करतात. का? तर त्यातली भाषा, त्यातले शब्द हे आजच्या नियमांनुसार व्याकरण आणि शुद्धलेखनाच्या दृष्टीने बरोबर आहेत म्हणून नव्हे, तर त्यातले विचार अत्यंत सात्चिक आहेत म्हणून!

असो.. गाढवापुढे वाचली गीता असं आता आम्हाला म्हणायची वेळ आली आहे! परमेश्वर सर्व व्याकरण आणि शुद्धलेखनवाल्यांना सद्बुद्धी देवो आणि भाषेच्या बाबतीतले त्यांचे संकुचित मन अधिक विशाल करो!

आमच्या बहिणाबाई म्हणतात,

मन जहरी जहरी, त्याचं न्यारं रे तंतर
अरे इंचू साप बरा, त्याले उतारे मंतर!

अवांतर - आता हे वाचून काही मंडळी मूळ शब्द 'इंचू' असा नसून 'विंचू' असा आहे किंवा कसे, आणि मूळ शब्द 'मंत्र' असा आहे, मंतर नव्हे, असा विचार करत डोकं धरून किंवा आमच्या भाषेत सांगायचं तर केसं उपटत बसतील आणि वरील ओळीतला अर्थ बाजूलाच राहील!

:)

आपला,
(शुद्धलेखन आणि व्याकरणाची नसती ट्यांव ट्यांव करणार्‍या समस्त मंडळींना फाट्यावर मारणारा!) तात्या.

प्राजु's picture

12 Feb 2008 - 2:52 am | प्राजु

भाषा ही भाषा आहे. संवाद साधण्याचे माध्यम आहे. ती कधीही नष्ट होत नाही, हां ..ती भ्रष्ट होऊ शकते. पण भाषाही पाऊलापाऊलावर बदलते. साहित्यिक भाषा हि बोली भाषा होऊ शकत नाही. बोलताना जे शब्द प्रचलित आहेत तेच वापरले जाणार. त्यात लिंग, वचन सगळंच आलं. काहींच्या मते "ते पेन" आणि काहिंच्या मते "तो पेन" .. भाषा प्रभागाप्रमाणे बदलते. याचा किती उहापोह करायचा ते आपणंच ठरवायचं. एकट्या पश्चिम महराष्ट्रात खूप वेगवेगळ्या प्रकारानी मराठी बोलली जाते. म्हणून तात्या, म्हणतात ते खरं आहे. भाषेला बंधनात का अडकवायचे?? ज्याची जशी असेल तशी भाषा..

- प्राजु.

भडकमकर मास्तर's picture

12 Feb 2008 - 1:57 am | भडकमकर मास्तर

पण चालण्याजोगे ढोबळ नियम कुठे संपतात आणि नसती ट्याँव ट्याँव कुठे सुरू होते हे ही कोण्या दुढ्ढाचार्यानेच ठरवायला पाहिजे का इतर कोणी?....

अजून काही चुकीचे वापर...
१. मी तुझी मदत केली...( तुला मदत केली, तुझी मदत घेतली).. ( हे ऐकून आमचे डोके फिरते, पण आता हा शब्द अगदी सगळेकडे ऐकू येतो, यात काही चूक आहे हे कोणालाही वाटत नाही....)
..आता हे ही कानाला गोड लागते का असेच बघायचे का?

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Feb 2008 - 2:40 am | llपुण्याचे पेशवेll

अजून काही.
पाणी-वाणी: पाणी बिणी असा मराठी वापर योग्य.
खाणं-वाणं: खाणं बिणं असा मराठी वापर योग्य.
वरील अशुद्धता हिंदीच्या वापरामुळे आली आहे.
पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर's picture

12 Feb 2008 - 7:51 am | विसोबा खेचर

१. मी तुझी मदत केली...( तुला मदत केली, तुझी मदत घेतली).. ( हे ऐकून आमचे डोके फिरते, पण आता हा शब्द अगदी सगळेकडे ऐकू येतो, यात काही चूक आहे हे कोणालाही वाटत नाही....)

मला तरी त्यात काहीच चूक वाटत नाही! 'मी तुझी मदत केली' हे वाक्य अगदी बरोबर आहे!

आपला,
तात्या वाळिंबे.
(मो रा वाळिंबेचा बाप!)

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Feb 2008 - 2:36 am | llपुण्याचे पेशवेll

"आमचा किसन माळी, आमची साधना कोळीण ही मंडळी तुम्ही आम्ही जे मराठी वापरतो, जे नियम वापरतो ते नियम ही मंडळी पाळत नाहीत, नव्हे त्यांना असे काही नियम असतात हेच मुळी माहिती नाही! मग काय तुम्ही असं म्हणणार का की आपण जी लिहितो,बोलतो तीच काय ती शुद्ध भाषा आणि किसन माळी, साधना कोळीण वापरतात ती अशुद्ध भाषा? कुणी दिला हा अधिकार तुम्हाला? त्या चार दीडदमडीच्या व्याकरणवाल्या डुढ्ढाचार्यांनी??"
तात्या अशुद्ध ते अशुद्धच.. त्याला तुम्ही म्हणा शुध्द हवे तर.
'जो जे वांछील तो ते लाहो' असे ज्ञानोबांनी आधीच म्हटले आहे.
आपण उल्लेखिलेल्या बहीणाबाईंच्या वचनाचा भाव आम्ही देखील बघतो त्यातले शुद्धलेखन नाही. पण म्हणून शुद्ध भाषेला देखील एक गोडी आहेच की. ती पंतोजींच्या कवितांमधून पहावयासही मिळते. प्रत्येक मराठी भाषिकाने शुद्ध मराठीच बोलावे असा आमचा आग्रह नाही. पण शुद्ध मराठी म्हणून पण काही गोष्ट आहे आणि ती जपायचा प्रयत्न केला तर त्याला वाईट म्हणण्याचा अधिकार आपल्याला तरी कोणी दिला ???
(तथाकथित मोठ्या मनाच्या लोकांच्या छोटेपणावर हसणारा)
-डॅनी.
पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर's picture

12 Feb 2008 - 7:36 am | विसोबा खेचर

तात्या अशुद्ध ते अशुद्धच.. त्याला तुम्ही म्हणा शुध्द हवे तर.

अहो पण हे शुद्ध आणि हे अशुद्ध हे ठरवणार कोण? माझा मुख्य प्रश्न हाच आहे!

आपण उल्लेखिलेल्या बहीणाबाईंच्या वचनाचा भाव आम्ही देखील बघतो त्यातले शुद्धलेखन नाही.

काय सांगता? नशीब आमच्या बहिणाबाईचं!

पण म्हणून शुद्ध भाषेला देखील एक गोडी आहेच की. ती पंतोजींच्या कवितांमधून पहावयासही मिळते.

वरील वाक्य,

पण म्हणून हरप्रकारच्या भाषेला देखील एक गोडी आहेच की. ती पंतोजींच्या कवितांमधून पहावयासही मिळते.

असे हवे होते. भाषेत शुद्ध भाषा, अशुद्ध भाषा, प्रमाणभाषा असं काही नसतं हाच तर आमचा मुद्दा आहे. तुमच्या त्या पंतोजींच्या कवितेतली भाषा जेवढी शुद्ध, तेवढीच आमच्या बहिणाबाई, महानोरांचीही भाषा शुद्धच!

पण शुद्ध मराठी म्हणून पण काही गोष्ट आहे आणि ती जपायचा प्रयत्न केला तर त्याला वाईट म्हणण्याचा अधिकार आपल्याला तरी कोणी दिला ???

शुद्ध मराठी म्हणून काही गोष्ट आहे? सांगा बरं कोणती गोष्ट? आम्हाला तरी कळू द्या! अमूक अमूक मराठी म्हणजे शुद्ध मराठी आणि तमूक तमूक मराठी म्हणजे अशुद्ध मराठी हे कुठे लिहिलंय सांगा बरं!

आणि आमच्यापुरतं बोलायचं म्हटलं तर आम्ही कोणत्याच प्रकारच्या मराठीला अशुद्ध म्हणत नाही! मराठी ही एक भाषा आहे आणि ती शुद्धच आहे! ही मराठी शुद्ध आणि ती मराठी अशुद्ध असा पोरकटपणा आम्ही करत नाही!

तात्या.

धनंजय's picture

12 Feb 2008 - 7:52 am | धनंजय

हाहा, हे मस्त.

कोणीही अभ्यासू व्याकरणाचा विद्यार्थी बहिणाबाईंच्या शब्दप्रयोगाला अशुद्ध म्हणणार नाही.

अभ्यासू व्याकरणकाराचे/विद्यार्थ्याचे तर्क कुठल्या तत्त्वांवर चालतात ते मी अन्यत्र तपशीलवार लिहिले आहे, ते येथे पुन्हा उगाळत नाही.

साधारणपणे जी व्यक्ती स्वभाषा म्हणून मराठी बोलत नाही (उदाहरणार्थ प्रौढ वयात मराठी शिकलेला), हल्लीच शब्द बोलू लागलेले मूल, काही विशिष्ट प्रकारचे मतिमंद, एवढ्याच परिस्थितींत विचार न करता पटकन "अशुद्ध" शेरा देण्यास कोणी धजावे.

"मग मिळते भाकर" हा प्रयोग अहिराणीत अशुद्ध आहे, कारण फक्त प्रौढवयात अहिराणी शिकलेला असा चुकीचा उच्चार करेल.

गल्लत वरील चर्चेत झाली आहे असे वाटते.
पोळी = चपाती हा समानार्थी झाला, ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे वापरावा.
मंत्र = मंतर
आणि इतर तत्सम शब्द..

पण निदान अनेकवचन, लिंग, प्रत्यय वगैरे बाबतीत 'कोणतीही मोडतोड' ही कानाला गोड (ग्वाड) मानून घ्यावी हे योग्य नाही.
प्रत्येक इमारतीचा काही मूळ आराखडा असतो त्यात प्रमाणाबाहेर बदल केले की ती दिसायला आकर्षक दिसू ही शकेल, पण रहायला धोकादायक ठरू शकते! त्याचप्रमाणे भाषेतली टोकाची अव्यवस्था भाषेबद्दलची शिकण्याची ओढ कमी करायला कारण ठरेल असे वाटते. काहीही चालते असे झाले की दर्जा घसरतो हे सत्य नाकारता येणार नाही.

आजच्या इ-सकाळ मधलेच एक उदाहरण घेऊ - "दक्षिण कोरियाचा राष्ट्रीय प्रतिक भस्मसात" अशी बातमी मुख्य पानावर आहे.
हे खरेतर "दक्षिण कोरियाचे राष्ट्रीय प्रतीक भस्मसात" असे हवे. नाहीतर त्याचा अर्थ दक्षिण कोरियामधली "प्रतीक" नावाची व्यक्ती भस्मसात झाली असा निघतो. (आत्ताच्या चर्चेसाठी "प्रतीक" मधल्या "ती" चे र्‍हस्व, दीर्घ सोडून देऊ.)

तेव्हा अर्थाचा विपर्यास होणार नाही ही काळजी घेणे अगत्याचे वाटते. शेवटी ऊस मुळापासून खाणे योग्य नाहीच कितीही गोड लागला तरी!

चतुरंग

ऋषिकेश's picture

12 Feb 2008 - 2:40 am | ऋषिकेश

भाषेचे आणि व्याकरणाचे अनेक नियम आहेत आणि ते प्रांतानूसार बदलतात. तेव्हा आमचे तेच बरोबर असे कोणी म्हणु नये आनि समजू तर मुळीच नये
पण ज्याने त्याने आपापले नियम पाळावेत असं वाटतं.. उद्या मराठीच्या शिक्षकांनी प्रमाणभाषा सोडून गावरान भाषा वापरली तर नक्कीच खटकेल आणि तात्यांच्या किसन माळी/साधना कोळीण यांनी प्रमाणभाषा वापरली तर मला तरी त्या व्यक्ती "त्या" वाटणार नाहित. तेव्हा माझ्यामते नियम वगैरे पाळावेत पण प्रत्येकाचे नियमच वेगळे आहेत :)

-ऋषिकेश

विसोबा खेचर's picture

12 Feb 2008 - 7:46 am | विसोबा खेचर

तेव्हा माझ्यामते नियम वगैरे पाळावेत पण प्रत्येकाचे नियमच वेगळे आहेत :)

सहमत आहे! अहो हेच तर आम्हीही म्हणतोय! कुणी एक व्यक्ति, किंवा चार तथाकथित पंडितांचा एक गट ते नियम ठरवू शकत नाही! भाषेसंबंधी नियम ठरवण्याचा अधिकार कुणालाही नाही हेच तर आम्हीही म्हणतोय!

आणि त्यातूनही हे नियम कुणी ठरवलेच, किंवा आगाऊपणा करून मारे व्याकरणाफिकरणाची पुस्तके वगैरे ल्हिली तर त्या बापड्याला ती त्याची "हौस" म्हणून किंवा "पोटापाण्याचा व्यवसाय" म्हणून अवश्य लिहू द्यावीत परंतु त्या पुस्तकानुसार म्हणजेच काय ती प्रामाणभाषा अशी जर विषवल्ली उद्या फोफावू लागली तर आम्ही ती मुळासकट उपटून काढू! :)

आपला,
तात्या ठाकरे!
अध्यक्ष, मराठी नवनिर्माण सेना! :)
--
आम्ही मायमराठीला शुद्धलेखनाच्या आणि व्याकरणाच्या आणि प्रमाणभाषेच्या शृंखलांतून मुक्त करण्यास कटिबद्ध आहोत!

पिवळा डांबिस's picture

12 Feb 2008 - 8:04 am | पिवळा डांबिस

आवो भाशेमधी काय शुद्ध-अशुद्ध नसतंय राव! आमच्या भाईकाकांनीच परमाण दिवून ठिवल्यालं हाय!!
आता बघा,
"आमच्या काळी असं नव्हतं" या वाक्यातला "नव्हतं" हा शब्द शुद्ध आहे का नाही? तो जर शुद्ध असेल तर त्यातला फक्त नकार काढल्यावर तयार होणारा "व्हतं" हा शब्द अशुद्ध कसा?
द्या उत्तर!!!:))

बोलीभाषाप्रेमी,
पिवळा डांबिस

शुचि's picture

27 Feb 2013 - 3:45 am | शुचि

झकास उदाहरण !!! दंडवत स्वीकारावा.

आपला अभिजित's picture

12 Feb 2008 - 8:17 am | आपला अभिजित

एकमेकांच्या अंगावर तुम्ही धावून जावं, हा माझ्या लिखाणाचा हेतू नव्हता.
किंबहुना,
भाषा शुद्धी-अशुद्धीबद्दल सांगोपांग उहापोह (हाही एक भीषण शब्द!) व्हावा, अशीही अपेक्षा नव्हती. नाहीतर, `काथ्याकूट' मध्ये नसता का टाकला?
भाषा प्रांतवार आणि काळवार बदलते, हे मान्य. पण म्हणून व्याकरणाचे नियम बदलू नयेत, एवढी किमान अपेक्षा.
मराठीतही अनेक शब्द संस्क्रुत, (हा शब्द योग्य रीतीने कसा उमटवायचा, ते मला माहीत नाही.) फारसी, उर्दू, अरबी, हिंदी भाषेतून आलेले आहेत. पण ते सर्व नवीन शब्द होते, म्हणून रूढ झाले.
`कंदील' हा शब्द फारसी आहे, हे कुणाला सांगून पटेल?
असो.
वैयक्तिक आरोप - प्रत्यारोप न करता,
भाषेतल्या गमती-जमतीबद्दल चर्चा झाली, तर मजा येईल.

आणि तात्या,
भाषेतला विचार महत्त्वाचा असे म्हणता ना आपण,
मग `फाट्यावर मारतो' हे तुमच्या भाषेच्या सभ्यतेत बसतं?

असो.

आणि मो. रा. वाळिंबे नाही बरं का!
मो. रा. वाळंबे.
हे तरी अशुद्ध (गेला बाजार, चुकीचं ) मानाल की नाही आपण?

-अभिजित.

विसोबा खेचर's picture

12 Feb 2008 - 8:27 am | विसोबा खेचर

मग `फाट्यावर मारतो' हे तुमच्या भाषेच्या सभ्यतेत बसतं?

हम्म! भावनेच्या भरात लिहून गेलो! चुकलं खरं..!
माफी असावी. मनापासून मागतो!

आणि मो. रा. वाळिंबे नाही बरं का!
मो. रा. वाळंबे.
हे तरी अशुद्ध (गेला बाजार, चुकीचं ) मानाल की नाही आपण?

ठीक ठीक! :)

आपला,
(सुधारित) तात्या वाळंबे. :)

असो, आता खुद्द मूळ लेखकाचा (आपल्या अभिजिताचा) प्रतिसाद आला आहे, त्यात त्याने त्याच्या लेखाचा उद्देश पुन्हा एकदा स्पष्ट केला आहे. तेव्हा तूर्तास आम्ही या लेखाकडे चर्चा म्हणून न पाहता ललितलेखन म्हणून पाहतो आणि आमचे भाषेसंदर्भातले सर्व प्रतिसाद येथेच थांबवतो!

पण....अजून लढाई संपलेली नाही! पुन्हा केव्हातरी.... ! :)

आपला,
तात्या ठाकरे!
अध्यक्ष, मराठी नवनिर्माण सेना! :)
--
आम्ही मायमराठीला शुद्धलेखनाच्या आणि व्याकरणाच्या आणि प्रमाणभाषेच्या शृंखलांतून मुक्त करण्यास कटिबद्ध आहोत!

आपला अभिजित's picture

12 Feb 2008 - 10:32 am | आपला अभिजित

मा. तात्याबा,

तरीही `हम्म...' नाही बरं...!
हे इंग्रजी शब्दाचं भाषांतर झालं.!
मराठीत `हं' एवढंच म्हणतात.

हा उगाचच चावा.
स्वस्थ नाही बसवत!

-अभिजित.

वडापाव's picture

12 Feb 2008 - 11:05 am | वडापाव

श्री. अभिजित,

आपण आत्तापर्यंत मांडलेल्या सर्व मुद्द्यांशी व तुम्हाला पाठिंबा देणारया सर्वांशी मी पूर्णपणे सहमत आहे.

संस्कृत हा शब्द नीट लिहिण्यासाठी के दाबा. मग शिफ्ट + आर आणि नंतर यू दाबा

तसेच शक्य असल्यास मिसळपाववर 'देणारया' शब्द नेमका कसा नीट लिहीता येईल तेदेखील कळवा

आपला नम्र,
पाणी पुरी

स्वाती दिनेश's picture

12 Feb 2008 - 12:33 pm | स्वाती दिनेश

मोठ्या आर ला य जोडा म्हणजे र्‍य लिहिता येईल.

बन्ड्या's picture

22 Feb 2008 - 9:39 am | बन्ड्या

मित्रहो .... अपल्या सगळ्यान्चे मराठी वरचे प्रेम पाहून खूप बरे वाटले....

तात्या तूमच्या " आम्ही मायमराठीला शुद्धलेखनाच्या आणि व्याकरणाच्या आणि प्रमाणभाषेच्या शृंखलांतून मुक्त करण्यास कटिबद्ध आहोत! "
या विचाराशी मी सहमत आहे. प्राजुताईनी सांगितल्या प्रमाने----
बोलताना जे शब्द प्रचलित आहेत तेच वापरले जातप्रांतवार आणि काळवार बदलणार. त्यात लिंग, वचन सगळंच आलं. काहींच्या मते "ते पेन" आणि काहिंच्या मते "तो पेन".भाषाही पाऊलापाऊलावर बदलते. मराठीला ही वेगवेगळ्या बाजाची आहे.. कोल्हापूर भागात बोली भाषा बोलताना एक ३ अक्षरी शिवी सारखी असाते.. अगदि ए़खादा बाप आपल्या मूलाचे कवतूक(?) करताना सूद्दा .......तो 'ति' वापरण्यास हयगय करत नसतो ..... मुलावरील प्रेमाचाच तो एक भाग आहे. असो सांगयचा मुद्दा हा की प्रांतवार आणि काळवार बदलते. भाषेला व्याकरणाच्या बेडीत न अडकवता तिचा अधिक वापर कसा होईल ...त्यात अधिकाधिक नवे शब्द कसे येतिल याचा प्रयत्न व्हावा. नवे शब्द यावेत पण ते येताना जुन्या शब्दांना विसरता काम नये नाहितर पोटच्या पोरांना सोडुन दत्तक पोरांचे अधिक लाड होवुन ती डोक्यावर बसतील.

........ आपला बड्या

विसोबा खेचर's picture

22 Feb 2008 - 9:56 am | विसोबा खेचर

तात्या तूमच्या " आम्ही मायमराठीला शुद्धलेखनाच्या आणि व्याकरणाच्या आणि प्रमाणभाषेच्या शृंखलांतून मुक्त करण्यास कटिबद्ध आहोत! "
या विचाराशी मी सहमत आहे.

बन्ड्या,

जियो......!!!

भाषा ही सगळ्यांची आहे, सगळ्यांकरता आहे! तिच्यावर कुणा एकाची मालकी नाही त्यामुळे तिचे शुद्धलेखनाचे वगैरे नियम ठरवण्याचा अधिकार कुणालाही नाही! आम्ही तो अधिकार कुणालाही दिलेला नाही!

प्रमाणभाषेचं तुणतुणं वाजवणार्‍या आणि शुद्धलेखनाच्या नावाखाली नाय ती शाणपत्ती करून भाषेचं सौंदर्य घालवू पाहणार्‍या आणि एखाद्या छानश्या नदीप्रमाणे कुठल्याही वळणाने बागडणार्‍या स्वच्छंद भाषेला जर कुणी संकुचित करू पहात असेल, प्रमाणभाषेच्या आणि शुद्धभाषेच्या स्वार्थी आणि एकाधिकारशाही अट्टाहासापायी तिला बेड्यात जखडू पाहात असेल तर आम्ही ते सहन करणार नाही व त्यांना फाट्यावर मारू!

तात्या.

धनंजय's picture

22 Feb 2008 - 9:00 pm | धनंजय

(पुणेरी व्याकरणकार सोडून सगळ्यांच्या खातर)
हांव गोयांत ल्हानाचो व्हड जालो, तेन्ना जायती लोकां म्हणतली की कोंकणी ही मराठ्येची बोली, विंगड भास ना. गोंय राज्य जाले आणि कोंकणी गोंयची राजभास जाली तेन्ना मुजरतच हांव गोंयाभायेर गेल्लो. म्हजे धाकटेपणांत हांव "मराठ्येची बोली" म्हूण शिकिल्ली उतरां आता मिसळपावाचेर बरवून उपकरता हे आयकून हांव धादोस जालो. तात्या तुजे हे सामके खरे की भास म्हटल्याक न्हय, ती सोबीत वळणां घेत जाय तशी वतली. ही "प्रमाणभास" म्हणपी लोकां तिचेर धरणां बांधपाक सोदतात. तुजे हेंय खरे की अशे करप म्हणल्या मायेंक बेडियो घालप. पुणून माका हाजे वायट दिसता, की तू कोकणियेन बरयना, पुणून पुणेकरांच्या भाशेन बरयता. ते कित्याक? म्हजो तुका येवकार आसा की तू कोकणियेन बरवन या प्रमाणभाशेक नाचवपी लोकांक सायडी घालपाचो फुडाकार घे. पुणेरी बोलीतून तू म्हणता ते तुजे म्हणप म्हटल्याक फकत उतरां. तुज्या घरच्या बोलियेन तुएं तीच उतरां बरयल्यार ती बदल घडवपाखातरची खरी क्रिती.

(पुणेरी व्याकरणवाल्यांसाठी [फक्त] सबटायटल्स. बाकीच्यांना नाहीतरी कळतेच.)
मी गोव्यात लहानाचा मोठा झालो, तेव्हा खूप लोक म्हणत की कोकणी ही मराठीची बोली, वेगळी भाषा नाही. गोवा राज्य झाले, आणि कोकणी गोव्याची राज्यभाषा झाली तेव्हा लवकरच मी गोव्याबाहेर गेलेलो होतो. माझ्या लहानपणात "मराठीची बोली" म्हणून शिकलेले शब्द आता मिसळपावावर लिहून चालतात हे ऐकून मी आनंदित झालो. तात्या तुमचे हे अगदी खरे, की भाषा म्हणजे नदी, ती सुरेख वळणे घेत वाटेल तशी जाईल. ही "प्रमाणभाषा" म्हणणारे लोक तिच्यावर धरणे बांधायला बघत आहेत. तुमचे हेही खरे की असे करणे म्हणजे मायभाषेला बेड्या घालणे. पण मला एक वाईट वाटते, की तुम्ही कोकणीत न लिहिता पुणेकरांसारखे लिहिता. ते कशासाठी? माझे तुम्हाला आमंत्रण आहे, की तुम्ही कोकणीत लिहून या प्रमाणभाषेला नाचवणार्‍या लोकांना बाजूला पाडण्याचा पुढाकार घ्यावा. पुणेरी बोलीत तुमचे हे म्हणणे म्हणजे केवळ शब्द. तुमच्या घरच्या बोलीत तुम्ही तेच शब्द लिहिल्यास ती बदल घडवणारी खरी कृती होईल.

लेखात उल्लेखिलेली बोलीभाषेची वैशिष्ट्ये बव्हंशी जण्रल पच्चिम म्हाराष्ट्राची म्हनून सांगिटली जातात. पुनेरी म्हंजे पुन्यातली आसं असलं तरीबी ते बामनांशी जास्त निगडित का काय ते हाय. तेच्यामुळं पुन्यातली जण्रल भौजन जंता काय म्हंते तेच्याशी लोकास्नी काय देनंघेनं न्हवतं. जौद्या तेचायला तेच्या. आमच्या येळी आसं न्हवतं बगा.

(सांगली-मिरज-कुपवाड म्हाणगरपालिकेतला प्रमुक उंदीरमार) ब्याटम्यान.

पुण्यात तारांगण सोसायटीच्या जवळ एका पोळी भाजी केंद्राबाहेर फलक होता. `दहि' मिळेल. मी जाऊन म्हटलं की एक चूक आढळली, `दही'तली ही दुसरी असते. त्याने मानलं नाही ते. उलट मला कुचकटपणे `हो का !?!' असं म्हणून मान फिरवली.

पिवळा डांबिस's picture

28 Feb 2013 - 12:09 am | पिवळा डांबिस

कदाचित त्या विकेत्याकडे दही मागितल्यावर तो लोटकाभर दही देण्याऐवजी कवडीइतकंच दहि देत असेल!!!!
पुण्यातल्या तारांगण सोसायटीबाहेर काय अशक्य आहे?
:)