पोटापाशी चोरखिसा असलेली धुवट पांढरी
अर्ध्या बाह्याची बंडी, तपकिरी स्वेटर..
निळ्या रेघांचा नाडीवाला पायजमा..
नीळ घातलेला स्वच्छ कॉलरचा पांढरा शर्ट..
आतली बाजू बाहेर केलेली काळी पॅन्ट,
भोकाभोकाचं बनियन..
टोकाची शिवण उसवून उंची वाढवलेली गणवेशाची गडद्द निळी पॅंट..
कधीकाळी सफेद पण आता धुऊनही मळकट दिसणारा
शाईचे डाग पडलेला छोटा शर्ट..
चौकड्या चोकड्यांचा, काखेत उसवलेला लाल काळा फ्रॉक..
काळा परकर, पोलका, निळ्या पिवळ्या सिंथेटिक साडीची घडी
इथे तिथे फाटलेले चार पाच पंचे,
त्यांच्या पोटात लपवलेले आतले कपडे
दोरीवर वाळत घातलेले कपडे
खूप काही सांगून जातात,
घराबद्दल, घरातल्या माणसांबद्दल..
प्रतिक्रिया
1 Jan 2018 - 3:03 pm | भीडस्त
साध्या सोप्या शब्दात मस्त आशय व्यक्त झाला आहे.
1 Jan 2018 - 3:04 pm | एस
असे चित्र काही वर्षांपूर्वी सर्रास दिसत असे. आताशा लोकांची क्रयशक्ती आणि सौंदर्यदृष्टी, दोन्हींत लक्षणीय बदल झाले आहेत. कविता आवडली हेवेसांनल.
1 Jan 2018 - 5:11 pm | प्राची अश्विनी
धन्यवाद.
बरोबर , शहरात नाही दिसत अलिकडे. पण गावात अजूनही असतं.
1 Jan 2018 - 3:49 pm | पगला गजोधर
आर्थिक परिस्थिती बेताचीच असलेला, कनिष्ठ मध्यमवर्गीय व्यक्ती (ट्रॅफिक वॉर्डन ? चा जॉब ???)...
त्याची पत्नी (लग्नाला कदाचित १४-१५ वर्षे)...
त्याचे घरी आश्रित असणारे म्हातारे वडील...
शाळेत जाणारी मुले (एक मुलगा व एक मुलगी)....
असं अंदाजे ५ जणांचे कुटुंब ????
1 Jan 2018 - 5:10 pm | प्राची अश्विनी
कदाचित हो.
2 Jan 2018 - 3:25 pm | विनिता००२
त्याचे घरी आश्रित असणारे म्हातारे वडील...>> आश्रित नका म्हणू. असेच असेल असे काही नाही.
1 Jan 2018 - 9:08 pm | पैसा
खूप छान!
1 Jan 2018 - 9:35 pm | पलाश
दोरीवर वाळत घातलेले कपडे
खूप काही सांगून जातात,
घराबद्दल, घरातल्या माणसांबद्दल..
..... ते ही देखे कवी! :)
कविता शीर्षकासकट आवडली.
1 Jan 2018 - 10:40 pm | चौथा कोनाडा
सुरेख चित्रदर्शी कविता !
ही कविता म्हंजे एक भारी फोटो आहे !
5 Jan 2018 - 11:25 am | पिशी अबोली
परफेक्ट वर्णन!
कविता खूप आवडली.
2 Jan 2018 - 7:06 am | केडी
कविता आवडली. वाचून ह्या शॉर्ट फिल्म ची आठवण आली थोडीशी, अर्थात तुमच्या कवितेचा आशय वेगळा आहे
The Father
2 Jan 2018 - 9:43 pm | प्राची अश्विनी
आत्ताच पाहिली. छान आहे.
2 Jan 2018 - 7:33 am | अजब
कपड्यांवरून न दिसणारी माणसे आेळखणे...
2 Jan 2018 - 9:07 am | नाखु
जो केलाय तो लाजवाब आहे
नित वाचक नाखु
2 Jan 2018 - 9:19 am | चामुंडराय
अशा साध्या विषयावर देखील छान लिहिले आहे.
जे न देखे रवि ते देखे कवी ....
खरंतर न देखे रवि हे तितकंसं बरोबर नाही. हे कपडे रविला दिसावेत म्हणूनच बाहेर उन्हात टांगलेले असतात :)
आजकाल काही हुच्चभ्रू सोसायट्यांमध्ये दर्शनी भागावर असे कपडे वाळण्यासाठी टांगायला बंदी असते म्हणे.
2 Jan 2018 - 1:55 pm | प्राची अश्विनी
:)
2 Jan 2018 - 9:41 am | ज्ञानोबाचे पैजार
इतके लक्षपूर्वक तर माझ्या घरातले कपडे मी कधी पाहिले नसतील.
इथे तर दुसर्याच्या घरातले कपडे नीट लक्षपूर्वक पाहून त्यांचे विश्लेशण केले आहे.
आणि त्या विश्लेशणामधून निष्कर्ष देखिल काढून झाला आहे.
रच्याकने :- कविता अतिशय आवडली आहे.
पैजारबुवा,
2 Jan 2018 - 1:56 pm | प्राची अश्विनी
:)__/\__
2 Jan 2018 - 2:19 pm | पद्मावति
सुंदर.
2 Jan 2018 - 3:27 pm | विनिता००२
चित्रदर्शी वर्णन!
अशीच एक कविता हर्शदा सौरभ हिची पण आहे.
2 Jan 2018 - 3:31 pm | सूड
सुंदर!
2 Jan 2018 - 3:49 pm | अभ्या..
अप्रतिम लिहिलिय
2 Jan 2018 - 4:21 pm | अभ्या..
.....
अॅल्युमिनियमच्या वायर वळवून केलेली दोनचाकी गाडी
२.७५/१८ चा फाटका तुटका टायर
आधीची लाल आणि आता विटकरी झालेली मडगार्ड नसलेली एमेटी
दोन स्टॅन्ड आणि कॅरीयर असणारी लेडीज अॅटलस गोल्डलाईन
.....
एक पायडल पडलेली, विटलेली पण एकेकाळी लालभडक असलेली तीनचाकी चिमुकली
आडव्या हॅन्डलच्या हट्टापोटी रडून आणलेली आणि त्यावर भांडेवाल्याडून कुमार नाव टाकलेली हिरो रेंजर
वायझरवर स्वामीसमर्थ प्रसन्न लिहून छोटासा गणपती असणारी, आडव्या पट्ट्याची, पुढचे मडगार्ड बदललेली जुनी स्प्लेंडर
नंबरप्लेटवर स्वीटी नावाच्या रेडीयमखाली डॅडस गिफ्ट मिरवणारी ठिकठिकाणी कोचे असलेली अॅक्टिव्हा.
......
क्रॉसची ६ शिमानो गिअरची स्टॉर्म
वनफोरथ्री नंबरप्लेटची केटीएम
डॅशवर सोनेरी दगडूशेठ असलेली वॅगनार
फ्लुरोसंट पिवळा मिरवणारी वेस्पा
.....
चिखलाने माखलेली एटीव्ही
८०५५ नंबरची ५०० सीसी क्लासिक बुलेट
योकोहामाच्या ठोकळ्यावर तोललेली फोर्च्युनर
सदैव इंदुरीकरांची किर्तने वाजणारी वेर्ना
......
वाहने आणि वाहणे
खूप काही सांगून जातात,
घराबद्दल, घरातल्या माणसांबद्दल..
2 Jan 2018 - 5:09 pm | प्राची अश्विनी
करता बात. एकदम बुंगाट!
2 Jan 2018 - 5:43 pm | अभ्या..
थॅन्क्स डॉक.
2 Jan 2018 - 5:17 pm | चाणक्य
ही कशी काय वाचायची राहून गेली बा ? एकदम झकास जमलीये.
2 Jan 2018 - 7:56 pm | अभिजीत अवलिया
आवडली.
2 Jan 2018 - 9:44 pm | प्राची अश्विनी
सर्वांनाच धन्यवाद!
3 Jan 2018 - 8:27 pm | राघव
सुंदर लिहिलंय!
:-)
3 Jan 2018 - 10:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
लोकांना दिसतील अशी वाळत घातलेली धुणी... आवडली ! :)
4 Jan 2018 - 1:53 pm | अजया
अप्रतिम कविता प्राची! जीयो :)
5 Jan 2018 - 8:13 am | प्राची अश्विनी
__/\__
5 Jan 2018 - 11:17 am | संजय पाटिल
सहसा जे न देखे.... च्या वाटेला जात नाही पण प्रतिसादांची संख्या बाघून डोकावलो तर चीज झाले!
सुंदर कविता...