तसा मी इथलाच..
केव्हापासून???
पोटासाठी इथे आलो तेव्हापासून...!!
इथेच घडलो.. इथेच वाढलो..
या अनोख्या भागात आता कायमचा सडलो...!
काम काय?
द्याल ते!
जे तुम्हाला करायचं नसतं.. करायला जमत नाहि किंवा कमीपणाचं वाटतं..
पण मला जे दोन वेळच जेवण देतं...
असं वाट्टेल ते!
मी इथला कसा?
तुम्ही जसे इथले तसाच मीही
तुम्हाला इथे मान आणि पैसा दोन्ही मिळतो
मला तर केवळ पैसा
त्रास सहन करतो जितका तुम्ही तितकाच मीही
मी बाहेरचा का?
माझी मुळं इथली नसल्याचं तुम्ही दाखवून देताय
मी इथे स्वतःला रुजवू पहातोय
मात्र मला इथून उपटण्याचा घाट तुम्ही घालताय
ना इथला ना तिथला असं तुम्हीच जाणवून देताय.. आणि विचारताय मी बाहेरचा का?
मी इथे कशासाठी?
अहो सोप्पंय पोटासाठी!
मला इथेच रमायचं आहे...मरायचं नाहि
तुम्हाला त्रास द्यायचा तर हेतू नाहिच नाहि
इथे खरंच मी आहे केवळ पोटासाठी
मी कोण?
काहि म्हणतात मला परकीय... परप्रांतीय.. उपरा..
थोडक्यात मी आहे तो जो तुम्हाला तुम्हीच टाकलेलं-न जमलेलं उचलताना पाहवत नाहि तो
पण मी व्यक्ती नाहि मी आहे परिस्थिती
मी होतो पूरातन युरोपसाठी स्वस्त आफ्रिकन नोकर
मी आहे अमेरिकनांसाठी भारतीय
मी आहे भारतीय व्यापार्यासाठी चीनी माल
सध्या मात्र मी आहे मुबईकरांसाठी भैया
मात्र नाहि माहित उद्या मी कोण असेन
प्रतिक्रिया
7 Feb 2008 - 4:07 am | चतुरंग
मनाला स्पर्शून जाणारं मुक्त चिंतन आणि सद्यस्थितीलाही चपखल लागू.
चतुरंग
7 Feb 2008 - 3:09 pm | स्वाती दिनेश
मनाला स्पर्शून जाणारं मुक्त चिंतन आणि सद्यस्थितीलाही चपखल लागू.
असेच म्हणते, आवडले हे वेसांनल.
स्वाती
7 Feb 2008 - 5:25 am | धनंजय
म्हणून प्रभावी आहे.
केल्याने देशाटन, एखादा मुद्दा अनेक दृष्टिकोनांतून बघितला जातो.
7 Feb 2008 - 8:10 am | विसोबा खेचर
फारच सुंदर रे ऋषिकेशा!
तुझी कविता फार आवडली..अगदी वास्तव सांगणारी!
छानच लिहिली आहेस...
तात्या.
7 Feb 2008 - 8:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फारच सुंदर रे ऋषिकेशा!
तुझी कविता फार आवडली..अगदी वास्तव सांगणारी!
छानच लिहिली आहेस...
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
7 Feb 2008 - 9:12 am | प्राजु
थोडक्यात मी आहे तो जो तुम्हाला तुम्हीच टाकलेलं-न जमलेलं उचलताना पाहवत नाहि तो
पण मी व्यक्ती नाहि मी आहे परिस्थिती
मी होतो पूरातन युरोपसाठी स्वस्त आफ्रिकन नोकर
मी आहे अमेरिकनांसाठी भारतीय
मी आहे भारतीय व्यापार्यासाठी चीनी माल
सध्या मात्र मी आहे मुबईकरांसाठी भैया
मात्र नाहि माहित उद्या मी कोण असेन
अतिशय चपखल...
- प्राजु
7 Feb 2008 - 9:23 am | मनिष
फारच छान!!!!
7 Feb 2008 - 2:14 pm | इनोबा म्हणे
मी इथे कशासाठी?
अहो सोप्पंय पोटासाठी!
मला इथेच रमायचं आहे...मरायचं नाहि
तुम्हाला त्रास द्यायचा तर हेतू नाहिच नाहि
इथे खरंच मी आहे केवळ पोटासाठी
तू इथे कशासाठी?
मला माहितेय पोटासाठी!
मग पोटापुरते बघ ना...
लालू,अमरसिंग हवेत कशासाठी?
महाराष्ट्रात उत्तर प्रदेश दिन कशासाठी?
स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे परप्रांतीयांना निष्पाप ठरवत आहेत्,पण आमच्याच भूमीत आमच्या संस्कृती आणि भाषेचा अट्टहास धरला तर आम्ही ठरतो प्रांतीयवादी.
हरकत नाही,खुशाल म्हणा आम्हाला प्रांतीयवादी.मराठीचा अट्टहास प्रांतीयवाद असेल तर आम्ही आजन्म प्रांतीयवादी राहणेच पसंत करू.
(कट्टर मराठी) -इनोबा
7 Feb 2008 - 2:32 pm | अवलिया
स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे परप्रांतीयांना निष्पाप ठरवत आहेत्,पण आमच्याच भूमीत आमच्या संस्कृती आणि भाषेचा अट्टहास धरला तर आम्ही ठरतो प्रांतीयवादी.
खर आहे
स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे व ज्यांना परप्रांतीयांपासुन काहि त्रास होत नाही अशा अमेरीकी लोकांना या मराठी मातीशी काहिच नाते उरले नाही
पोकळ फोक्लीच्या गप्पा मारतात
असो दुर्लक्ष करा
नाना
7 Feb 2008 - 2:47 pm | प्रकाश घाटपांडे
अहो नाना,
घेन देन नस्त त मंग हित कशाला आले असते. हा आता त्येंन्ला परप्रांतीयांचा तरास न्हाई ह्ये ठीक. पन आपल्याला स्वप्रांतियांचा तरास काय कमी व्हतो का? आता विंग्रजांनी आप्ल्यावं राज्य केलं दीडशे वर्श . म्हनल तर काय तरास दिला त्याण्नी? आपल्या राजे संस्थानिकांनी किती दिल्हा? करा हिशेब.
प्रकाश घाटपांडे
7 Feb 2008 - 3:07 pm | छोटा डॉन
"स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे व ज्यांना परप्रांतीयांपासुन काहि त्रास होत नाही अशा अमेरीकी लोकांना या मराठी मातीशी काहिच नाते उरले नाही
पोकळ फोक्लीच्या गप्पा मारतात"
आजकाल "परदेशस्थ मराठी" लोकांच्या नावाने बोटे मोडण्याचा एक नवा पायंडा पडत चललेला आहे. वर अजून म्हणायचे की त्यांचे मराठी मातीशी काही नाते राहिले नाही, पोकळ फोक्लीच्या गप्पा, पैशासाठी परदेशगमन इत्यादी, इत्यादी ........
पण मला सांगा हे सर्व ठरवणारे आपण कोण ???
आपला तरी काय योगदान आहे "मराठी मातीसाठी ?"
7 Feb 2008 - 7:21 pm | इनोबा म्हणे
मूळात परदेशात राहणारे मराठी लोक पण तिथले परप्रांतीयच आहेत ना.त्यामूळे कदाचित वरील काव्यातील परीस्थिती,दारीद्र्य आणि करूणा वगैरे तथाकथीत गोष्टीचे तुम्ही समर्थन करणारच.पण अमेरीका आणि इंग्लंड सारखे देश ही आता 'आऊटसोर्सिंग'ला वैतागले आहेतच.तिच परीस्थिती इथे आहे.
7 Feb 2008 - 3:03 pm | ध्रुव
--
ध्रुव
7 Feb 2008 - 3:39 pm | सागर
ऋषिकेश,
कविता म्हणून खूपच सुंदर आणि मनाला स्पर्शून जाणारी आहे.
हे विचारही खूप छान आहेत यात वाद नाही. पण भारतात सगळीकडेच अशी परिस्थिती खरेच नाहीये रे...
ह्या विचारांची माणसे सगळीकडे सारखी हवी...
मुंबईच्या बाबतीत जे होत आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे ह्यात गुरफंटून जाण्यापेक्षा आपण सर्वच मराठी माणसांनी मराठी पणा जपण्यासाठी एकत्र येणे हे जास्त आवश्यक आहे असे मला वाटते. आपण आपल्या पोटावर परप्रांतियांकडून पाय यायची स्वतःच वाट का बघत बसतो? इथे आपल्याच मातीत आपणच आपल्या मराठी माणसाचे पाय ओढत असतो... हा खालच्या जातीचा.... हा वरच्या जातीचा... हा असाच आहे... नि तो तसाच आहे...हा भेद आजही केला जातो... आपल्या मराठी बांधवाची काम करण्याची लायकी हा एकमेव निकष जेव्हा मराठी माणूस ठेवेल तो दिवस मराठी माणसाच्या उत्कर्षाचा दिवस असेन. मग कोणाची खोटी तरफदारीही करावी लागणार नाही की नोकरी टिकवण्याची चिंता... मराठी मनगटांत अवघे विश्व पेलण्याची क्षमता आहे यावर माझा विश्वास आहे..... असो
(प्रत्येक मराठी माणसाविषयी केवळ प्रेमच असलेला) सागर
7 Feb 2008 - 6:44 pm | वरदा
जे तुम्हाला करायचं नसतं.. करायला जमत नाहि किंवा कमीपणाचं वाटतं..
पण मला जे दोन वेळच जेवण देतं...
अगदी खरं
7 Feb 2008 - 6:55 pm | स्वाती राजेश
परिस्थितीचे वर्णन छान केले आहे.
7 Feb 2008 - 7:31 pm | ऋषिकेश
प्रतिसाद देणार्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार!!
-ऋषिकेश
7 Feb 2008 - 7:51 pm | इनोबा म्हणे
खरं आहे.या लोकांना तिथे नोकर्या नाहीत म्हणूनच ते इथे येतात.यात त्यांची काय चूक. खरं तर महाराष्ट्र शासनाने त्यांना 'रिझर्वेशन' द्यायला पाहीजे.
-मनकवडा
7 Feb 2008 - 9:05 pm | llपुण्याचे पेशवेll
तू इथे कशासाठी?
मला माहितेय पोटासाठी!
मग पोटापुरते बघ ना...
लालू,अमरसिंग हवेत कशासाठी?
महाराष्ट्रात उत्तर प्रदेश दिन कशासाठी?
इनोबा अगदी मनातले बोललास रे. खरे तर या लालू आणि अमरसिंगाला धरून चपलेने झोडा. ते खरे प्रांतीय वादी आहेत. मराठी माणसाच्या बाबतीत एक गोष्ट सांगू. मराठी समाजाने स्वातंत्र्य आणि संपन्नता म्हणजे काय ते छत्रपतींच्या राज्यात आणि पेशवाईत पाहीले आहे. पण या उत्तर भारतीयांचे पिढ्यान पिढ्या गेल्या सुलतानाची चाकरी करण्यात आणि साहेबाचे बूट चाटण्यात. अरे हे लोक महाराष्ट्रात का येतात माहीत आहे? कारण इकडे लोकांकडे क्रयशक्ती आहे. तिकडे जर गेलास तर लोकांमधे क्रयशक्तीच नाही रे. पुण्यात ६ कि.मी. जायचे झाले तर ४० रु. खाली कोणताही रि़क्षावाला नाही तयार होणार. पण कानपूर ला गेलास तर १५ रु. जाशील. का कारण ४०रु मागितले तर कोण देणारच नाही. तिकडे मजूर का उपलब्ध आहेत? कारण लोकाना रोजगार उपलब्धच नाहीत. जर आपल्याला पुण्यात ६० रु. रोज मिळाला तर ४० रु. रोजावर काम करायला कोण जाईल का मुंबई ला? तसेच आहे ते?
फक्त परीस्थिती कारणीभूत असली तरी त्याला ते लोकच जबाबदार आहेत. आजही उत्तर प्रदेशात निवडणूका जातीवरच चालतात. महाराष्ट्रात काही प्रमाणात का होईना पण शेतकरी, साखर कारखाने, विकास, हिंदुत्व हे मुद्दे आहेत.
त्यामुळे उत्तरप्रदेशीयाना मार खायला लागला तर त्याला मराठी माणसाच्या मुजोरीबरोबरच त्या लोकांचा मागासपणा पण तितकाच कारणीभूत आहे.
-स्वाभिमानी
डॅनी
पुण्याचे पेशवे
8 Feb 2008 - 2:43 am | ऋषिकेश
वाचून करमणूक झाली.
हे एवढेच महाराष्ट्रापुढचे मुद्दे आहेत हीच तर खंत आहे!!
शहरांतील वाहतूक, गावांतील भयानक आरोग्य (सांगली जगातील सवात जास्त एड्सग्रस्त भागांपैकी एक असल्याचें वाचनात आलं), बेळगाव प्रश्न, कोकणाचा विकास (म्हणजे कोकण संपवून नव्हे तर त्यातील लोकांचा विकास), रस्ते, शुद्ध पाणी (खरंतर शुद्ध दारूही), वीज, सिग्नल व्यवस्था, भ्रष्टाचार इत्यादि विषय असताना मी कोण -तु कोण करत बसणे म्हणजे "मुद्दे" हे वाचून करमणूक झाली.
असो. या मुळ कविता/मुक्तकावरील प्रतिसादात तरी हा माझा शेवटचा प्रतिसाद. (कारण हे मुक्तक मी काथ्याकूट सदरात (मुद्दामच) टाकलेलं नाहि :) )
-ऋषिकेश
8 Feb 2008 - 3:20 am | llपुण्याचे पेशवेll
हे एवढेच महाराष्ट्रापुढचे मुद्दे आहेत हीच तर खंत आहे!!
वरती लिहिलेले मुद्दे हे केवळ तुलने साठी लिहिले होते. महाराष्ट्रापुढील समस्या या विषयावर प्रबंध लिहीण्यासाठी नव्हे. ते लिहीले असते तर परप्रांतीयांचा प्रश्न पण उल्लेखिला असता.
असो. या मुळ कविता/मुक्तकावरील प्रतिसादात तरी हा माझा शेवटचा प्रतिसाद. (कारण हे मुक्तक मी काथ्याकूट सदरात (मुद्दामच) टाकलेलं नाहि :) )
आपण जेव्हा एखाद्या जिवंत विषयावर लिहीता तेव्हा त्यावर चांगल्या वाईट प्रतिक्रीया येणे साहजिकच आहे. मग ते तुम्ही काथ्याकूट सदरात टाका किंवा नका टाकू. हा आमचा देखील या मुक्तकावरील शेवटचा प्रतिसाद.
पुण्याचे पेशवे
8 Feb 2008 - 9:36 am | मनिष
@ ऋषिकेश - कविता/मुक्तक अतिशय आवडली. ही वर्तमानपत्रात का देत नाही? अवश्य पाठव...