विसंगत धोरणं; शिक्षण व्यवस्थेच्या मुळावर?

अँड. हरिदास उंबरकर's picture
अँड. हरिदास उंबरकर in जनातलं, मनातलं
21 Nov 2017 - 9:29 am

प्राथामिक शिक्षणाच्या दर्जाबाबत यापूवी विविध माध्यमातून बरीच चर्चा झाली आहे. शिक्षणाच्या पारंपरिक ढाच्यात सुधारणा करण्यासाठी आजवर अनेक नवनवीन धोरणे राबविण्यात आली. निश्चितच काही सकारात्मक बदल यामुळे शिक्षण क्षेत्रात दिसून येत आहेत. मात्र सततची बदलणारी धोरणे. आणि, उद्देश आणि अंलबजावणी यात झालेली विसंगती, यामुळे सुधारणांपेक्षा संभ्रमाचेचं वातावरण शिक्षण क्षेत्रात अधिक दिसून येते. बदली, बढती, निवृत्ती याबाबत नेहमी बदलणाऱ्या निर्णयांमुळे शिक्षक व्यथित आहे. तर, गुणवत्ता वाढीसाठी केल्या जाणाऱ्या निरनिराळ्या प्रयोगामुळे विध्यार्थी गोंधळात..बरं, धोरण ठरविणारं शिक्षण खातं ही ठाम आहे, असं दिसत नाही. तथाकथित शिक्षण तज्ज्ञ एकादा नवीन प्रयोग बाहेर काढतात, आणि नंतर आपणच घेतलेल्या निर्णयाला नकार देतात. प्राथमिक शिक्षण कसं आणि कायं असलं पाहिजे, हे आपण अजून निश्चित करु शकलो नाही, यापेक्षा दुर्दैव ते कोणतं.. शिक्षकांवर अन्याय झाला तर ते आंदोलनातून आपला रोष व्यक्त करतात, पण विध्यार्थ्यांचं कायं? क्षमता, कुवत असो वा नसो, निर्णयामागून निर्णय आणि प्रयोगांमागून प्रयोग त्यांच्यावर लादले जातात. नुकतेच आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांनी मोठे आंदोलन केले. हातातला खडू खाली ठेवून गुरुजी रस्त्यावर उतरलेला दिसताच शिक्षणमंत्री खाडकन जागे झाले, अन शिक्षकांच्या खांद्यावरील अशैक्षणिक कामाचा बोझा हलका करण्याची घोषणा त्यांनी करून टाकली. अर्थात, घोषणा आंदोलनाची धग कमी करण्यासाठी आहे कि, अंलबजावणीसाठी. हे काही दिवसात कळेलच. परंतु केवळ अशैक्षणिक कामाचा व्याप कमी करून प्रश्न सुटणार आहे का? एकामागून एक केल्या जाणाऱ्या प्रयोगांमुळे शाळा आज प्रयोगशाळा बनल्या आहेत, त्यावर शासन काही ठोस भूमिका घेणार आहे का? शिक्षकांच्या आंदोलनांमुळे आज सरकारी धोरणांचा मुद्दा ऐरणीवर आला असताना एकूणच शैक्षणिक धोरणांवर चर्चा करणे संयुक्तिक ठरेल.
शिक्षणाची दारं सर्वांसाठी खुली करण्याची मागणी महात्मा फुले यांनी एकोणाविसाव्या शतकात केली. परंतु प्राथमिक शिक्षणाला मोफत व सक्तीचे करण्यासाठी एकविसावे शतक उजाडावे लागले. भारत स्वातंत्र्य झाल्यावर शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सरकारी पातळीवरून विशेष प्रयत्न केल्या गेले. अनेक अभियान राबविल्या गेलेत. शैक्षणिक धोरणे ठरविल्या गेली. ब्रिटिश कालीन काळात केवळ नोकरदार आणि कारकून निर्मिती करणारे शिक्षण दिल्या जात होते. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणासाठी विविध आयोग व समित्या तयार झाल्या. १९५२-५३ चा मुदलियार आयोग, यांनी शिक्षण मातृभाषेतून द्यावे, अशी शिफारस केली. १९६४-६६ च्या कोठारी आयोगानुसार प्राथमिक शाळा १ कि. मी. च्या आत असावी हे नमूद केलं. १९८६ च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्राथमिक शिक्षणात खडूफळा मोहीम यावर भर दिला गेला. सध्या आठवीपर्यंत शिक्षण मोफत आहे. निश्चितच यामुळे शिक्षणाच्या दर्जात गुणात्मक व संख्यात्मक वाढ झाली. परंतु, प्राथमिक शिक्षण पूर्णपणे सार्वत्रिक आणि समृद्ध झाले का? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. गेल्या दशकभरातील शैक्षणिक धोरणांचा आढावा घेतला तर, सुधारणाऐवजी अस्वस्थेतेचे वातावरण शिक्षण क्षेत्रात अधिक दिसून येते. शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी एकीकडे करोडो रुपये खर्च करून विविध उपक्रम राबविले जातात. तर दुसरीकडे विसंगत निर्णय घेऊन त्यावर पाणी फेरल्या जाते. शिक्षक हा शिक्षण क्षेत्राचा कणा.. दर्जेदार शिक्षक नसतील तर दर्जेदार शिक्षण मिळणार नाही. हा साधा सरळ नियम. परंतु सरकार शिक्षकांनाच वेठीस धरते. शिक्षकाला अशैक्षणिक कामाचा बोझ्याखाली दाबून टाकले जाते. तपासण्या, प्रशिक्षण, मूल्यमापन, मतमोजण्या, जनगणना, सवेक्षण, जनजागृती असे कितीतरी उपक्रम राबविण्याची जबाबदारी शिक्षकांच्या खांद्यावर टाकली जाते.शिक्षकांना बदल्या शाळाबाह्य आदी निर्णयाच्या माध्यामातून वेळोवेळी अस्वस्थ करण्याची संधीही शासन सोडत नाही. 'पट' वाढविण्यासाठी दारोदार हिंडत शाळांची 'पत' टिकविण्याची कसरत करणारा शिक्षक अध्यापनाचे काम करतो केंव्हा ? याची पडताळणी करण्याची गरज त्यामुळे निर्माण झाली आहे.
एखादे शैक्षणिक धोरण राबविताना विध्यार्थ्यानचा किती विचार केला जातो, हा प्रश्नही संशोधन करण्यासारखा आहे. अभ्यासक्रमाचे ओझे वाटू नये आणि त्याचा बाऊ केला जाऊ नये म्हणून सरसकट आठवी इयत्तेपर्यंत विद्यार्थ्यांना नापास करायचे नाही, असा आदेश निघाला. व्हायचे तेच झाले. मुले आठवीपर्यंत लिलया पास झाली आणि नववीत जाऊन अडकली. उपक्रम राबवण्याचा उद्देश कितीही चांगला असला तरी त्याचा चुकीचा संदेश गेला. आता पुन्हा परीक्षा पद्धत सुरू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मध्यंतरी 'कुणीही यावे आणि टपली मारून जावे' या उक्तीनुसार कुणीही या इंग्रजी शाळा घेऊन जा असं धोरण सरकारच होत. यात गल्लीगल्लीत कॉन्व्हेंट च पीक आलं. काही ठराविक शाळा सोडल्या तर या इंग्रजी शाळेत काय शिकवलं जात हे न बोललेलंच बरं. ठराविक खेळ खळेने, चित्रांची पुस्तके चाळणे, बिनकामाची गाणी म्हणणे आणि डबा खाऊन घरी येणे, असला प्रकार असतो. अर्थात इंग्रजी शाळात जी अवस्था आहे जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळातही यापेक्षा दुसरी अवस्था नाही. मुळात मुलांना काय शिकवावे याबाबतच शिक्षण क्षेत्रात एकमत नाही. समाज मूल्यहीन होत आहे. मूल्यशिक्षण सक्तीचे करा, पर्यावरणाचा ह्रास होतोय पर्यावरण शिक्षण सक्तीचे करा, लैंगिक शिक्षण सक्तीचे करा. आजवरचे सगळे जीआर एकत्र केले तर त्याचा एक ढिग होईल आणि त्यातून नेमकं काय गरजेचं आहे हे वर बसलेल्या तज्ज्ञ मंडळीनाही सांगता येणार नाही.
'एक ना धड भरभर चिंध्या' सारखा प्रकार शिक्षण क्षेत्रात सूर असताना विध्यार्थी त्याला विरोध करू शकत नाही. शिक्षकांचं म्हणावं तर त्यांच्याच इतक्या समश्या आहेत कि सरकारी जबाबदारीतून त्याला विध्यार्थ्याच्या भविष्याकडे बघायला वेळ मिळतोच कुठे ? मिळेल त्या वेळात अभ्यासक्रम पूर्ण करायचा आणि आपण शाळाबाह्य ठरू नये यासाठी सरकारी कामांचा बोझ उचलण्यातच त्यांची संपूर्ण ऊर्जा खर्च होऊन जाते. याउपरही काही हरहुन्नरी शिक्षक मुलांच्या भविष्यासाठी शाळेत वेगवेगळ्या संकल्पना राबवितात. स्वतःच्या खिशातून खर्च करून शाळेसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात तर त्यांच्यामागे बदल्यांचे झेंगाट लावल्या जाते. त्यामुळे आता हा शिक्षणावरचा प्रयोग थांबायला हवा. ठोस काही तरी घेऊन मुलांपर्यंत जायला हवे. शिक्षक, पालक, सरकार सर्वांचीच ही सयुंक्त जबाबदारी आहे. आज,शिक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी एल्गार पुकारला असल्याने शैक्षणिक धोरणांचा मुदा ऐरणीवर आला आहे. यानिमित्ताने फक्त शिक्षकांच्या समश्याच नाही तर एकूण खाजगीकरण, बाजारीकरणाच्या विळाख्यात अडकलेल्या शैक्षणिक व्यवस्थेवर चर्चा व्हावी, यासाठीच हा खटाटोप..!
ऍड. हरिदास उंबरकर,
बुलडाणा

राजकारणशिक्षणलेख

प्रतिक्रिया

कालच एक माहिती वाचली एका वर्षात शासनाने ५५० अधिसूचना काढल्या, हे खरे आहे का? आणि काढल्या असतील तर कोणत्या बाबींवर जोर दिल्या जातोय हे समजेल का?

अँड. हरिदास उंबरकर's picture

21 Nov 2017 - 4:56 pm | अँड. हरिदास उंबरकर

नेमक्या किती अधिसूचना काढल्या.... याची आकडेवारी देता येणार नाही..

कोणत्या बाबींवर जोर दिला जातोय.... हे जर ठरवायचे झाले तर, याच नक्की उत्तर सरकारलाही देता येणार नाही. एकामागून एक प्रयोग शिक्षण क्षेत्रात करण्यात येत आहे.. शिक्षकांच्या बदल्या असो कि शेक्षणिक धोरण.. तज्ञ एक धोरण किंव्हा निर्णय ठरवितात आणि नंतर त्याला तेच विरोध करतात..

babu b's picture

21 Nov 2017 - 4:59 pm | babu b

नोटाबंदीच्या कोलांट्याउड्यांसारखाच हा प्रकार दिसतोय

अँड. हरिदास उंबरकर's picture

21 Nov 2017 - 5:03 pm | अँड. हरिदास उंबरकर

इतिहास घडविन्याच्या हव्यासासाठी सध्या निर्णय घेतले जात आहेत.. परिनामांची पर्वा करते कोण?

मोदक's picture

26 Nov 2017 - 10:15 pm | मोदक

क्षमता असूनही निर्णय न घेण्याबद्दल काय मत आहे आपले..?

आपल्या देशातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाचा दर्जा अतिशय गंभीररित्या वाईट आहे. शिक्षकांचा दर्जा तपासण्यासाठी वरचेवर परिक्षा घेतली जावी, विद्यार्थ्यांचे इयत्तावार कौशल्य सर्वेक्षण(देशपातळीवर) घेतले जावे, बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक करावी व त्याचा डेटा वेबसाईटवर टाकणे बंधनकारक करावे, आरटीई कायद्यातील घातक तरतूदी वगळाव्या अशासारख्या उपायांतून बरेच साध्य करता येईल दुर्दैवाने सरकार(आताचे अन यापुर्वीचे कोणतेही) याविषयी गंभीर नव्हते/नाही.
नविन शैक्षणिक धोरण सरकारने स्विकारले नाही. टीएसआर सुब्रमणियम समितीने दिलेला मसूदा स्व्कारला न जाता कस्तुरीरंगण यांच्या अध्यक्षतेखाली नवी समिती बनवली गेली आहे.

The Bharatiya Janata Party (BJP) on Monday promised to increase public spending on education to 6% of gross domestic product from around 4%, putting special emphasis on education and skill development.

In its general election manifesto, the BJP said that if voted to power, it would set up a national commission on education to devise ways to reform and revise the sector to make India a knowledge hub. The party also intends to implement a national education policy in the context of the changing dynamics of education.

हे झाले नाही.

The BJP’s manifesto also promises to universalize secondary education and give priority to reducing the acute shortage of teachers. The party promises “to review and revise...the salary structures associated with the teaching staff”. India has a shortage of half a million teachers in schools—in higher educational institutions such as the Indian Institutes of Technology and central universities, the shortage ranges between 20% and 45% of the required faculty strength.

The manifesto also said that the University Grants Commission will be restructured and transformed into a higher education commission rather than just being a grant distribution agency. The party said it will revisit the apprenticeship law to facilitate youth to earn while studying.

हे देखिल अजून प्रत्यक्षात आलेले नाही. ही हेळसांड चिंताजनक आहे.
अजून दोन वर्षे आहेत, सरकारने काळजीपुर्वक शिक्षण या विषयावर काम करावे.

आणखी एकः शिक्षकांना शालाबाह्य कामे देणे गैर आहे. सरकारने याविषयी ठोस धोरण आखून हे बंद करावे.

अँड. हरिदास उंबरकर's picture

21 Nov 2017 - 9:59 pm | अँड. हरिदास उंबरकर

अतिसुदंर विवेचन.. दोन वर्ष राहिलित काही तरी ठोस धोरण अपेक्षित आहे... पण आठ दिवसांपूर्वी सन्माननीय शिक्षणमंत्री यांचे एक भाषण एकन्यात आले.. बहुधा बालक दिनाच्या मुहूर्त वरील असावे...मंत्री मोहदय म्हणाले या राज्यात शिक्षणावर ९६ हजार रूपये प्रति विद्यार्थी खर्च केला जातो.. यापुढे एव्हड़ी रक्कम विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खात्यात जमा करणार.. पालकाला जी शाळा योग्य वाटेल तिथे ते आपल्या पाल्याचा प्रवेश घेतील.. हां पैसा सम्भादित शाळेच्या व्यवस्थापनाकडे जमा होईल आणि त्यातून शिक्षकांना पगार दिला जाईल... बाकी सर्व शिक्षाकांचे पगार बंद.. जिथे मूल प्रवेश घेतील फ़क्त त्या शिक्षकांना पगार मिळणाऱ्.. अर्थात हां प्रयोग सध्या नाही पण जाता जाता करू अस सांगायला मंत्री मोहदय विसरले नाहीत... यामुळे शिक्षण क्षेत्र सुधारणार की बिघड़नार, माहीत नाही. पण एक नविन प्रयोग अमलात येण्याची श्याक्यता नाकरता येत नाही.. हां शिक्षण व्यवस्थेत ठोस बदल ठरू शकेल का?? यावर विचार करतोय सध्या!

स्मिता.'s picture

21 Nov 2017 - 11:22 pm | स्मिता.

असा प्रयोग प्रथमदर्शनी तरी भयावह वाटतोय. यातून असंही होईल की ज्या शाळेत विद्यार्थी जास्त तिथल्या शिक्षकांना पगार जास्त! मग खाजगी शिकवण्याच काय वाईट? सरकारी आणि सरकार अनुदानीत शाळांची स्थिती आणि दर्जा सुधारण्याचे प्रयोग करायचे सोडून हे तर भलतेच काहितरी.

तुलना न करायचे ठरवूनही इथे केल्याशिवाय रहावत नाहीये पण पाश्चिमात्य देशांत बहुसंख्य पालक आपल्या पाल्यांना सरकारी शाळांतच घालतात. बहुतेक सगळ्या सरकारी शाळांचा दर्जाही कमी-अधिक प्रमाणात सारखाच असतो. केवळ अतिश्रीमंतांचीच मुले काय ती खाजगी शाळांत जातात. आपण जर इतर अनेक गोष्टींत पाश्चिमात्यांचे अनुकरण करू शकतो तर शिक्षण या महत्त्वाच्या बाबतीत का करू नये?

पण पाश्चिमात्य देशांत बहुसंख्य पालक आपल्या पाल्यांना सरकारी शाळांतच घालतात. केवळ अतिश्रीमंतांचीच मुले काय ती खाजगी शाळांत जातात.
>> हे भरतासाठीदेखील खरे आहे. जवळपास ८० % मुलं सरकारी शाळेतच जातात. खाजगी शाळेत अती/श्रीमंत, उच्चमध्यमवर्गच जातो.

===
चांगली चर्चा चालू आहे धाग्यावर. पुम्बा, अमितदादा यांचे प्रतीसाद आवडले.

हे ९६,००० रु. म्हणजे शुध्द मुर्खपणा आहे. चला आपण थोडा विचार करु. एका जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा घ्या. ५० विद्यार्थांची संख्या धरुया. ९६,००० * ५० = ४८,००,००० रु. होतात. दोन शिक्षक कार्यरत आहेत. त्यांचा पगार फार तर १२,००,०००/- रु. उरले ३६,००,०००/- रु. सांगा एवढे अनुदान सरकार एका शाळेवर खर्च करते का? गणवेश, कपडे, पोषण आहार, शाळेचा खर्च, शिष्यवृत्ती सगळे धरा. प्रति विद्यार्थी ७२,०००/- रु. प्रतिवर्ष सरकार देते का?

babu b's picture

22 Nov 2017 - 7:57 am | babu b

अशी किंमत ठरवताना जागा , भाडे , इ इ धरले जातात.

म्हणजे प्रति व्यक्ती बसने जाण्यास किती खर्च येतो , तर तिकिटाचे २० रु + बसच्या किमतीचा १/५०

५० लोकांची बस

बस्स !

अँड. हरिदास उंबरकर's picture

22 Nov 2017 - 8:30 am | अँड. हरिदास उंबरकर

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महात्मा फुल्यांनी प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक व सक्तीचे करण्याची मागणी केली. स्वतंत्र भारतात ‘शिक्षण हक्क’ कायदा करण्यास व राज्यघटनेत ‘शिक्षणाचा अधिकार’ हा मूलभूत अधिकार म्हणून समावेश करण्यास एकविसाव्या शतकाचे पहिले दशक उजाडावे लागले..नवनिर्मिती होऊच नये अशी उपजत व्यवस्था ब्रिटिश शिक्षण पद्धतीत होती. अजूनही बहुतांशी आपली तीच स्थिती आहे. पूर्व-प्राथमिक शिक्षणाला कुणी वालीच नाही.

उद्याचा नागरिक निंर्णय घेण्या लायक ,स्पर्धेत उतरण्या लायक राहुच नये म्हणजे एका वर्गाचिच मक्तेदारी राहावी.ही व्यवस्था करण्यात येत आहे...
शिक्षणाने विद्यार्थ्यांस सक्षम बनवावे..मूल्यशिक्षणाद्वारे सामाजिक कर्तव्यांची त्याला जाणीव असावी..शिक्षण हे व्यवसायाभिमुख ही असल् पाहिजे..यासाठी प्रयत्न करायचे सोडून सरकार नुसते प्रयोगामागुन प्रयोग राबवित आहे.. यंदा शिक्षक बदल्यांच् धोरण बदलण्यात आल.. ऐन शैक्षणिक सत्राच्या मध्यात शिक्षक बदलिच कुम्भाड़ रचने म्हणजे शिक्षण व्यवस्थेचा कणा मोड़ने च आहे..!

यंदा शिक्षक बदल्यांच् धोरण बदलण्यात आल.. ऐन शैक्षणिक सत्राच्या मध्यात शिक्षक बदलिच कुम्भाड़ रचने म्हणजे शिक्षण व्यवस्थेचा कणा मोड़ने च आहे..!

हे एक बदल्यांची नाटके आधी संपवायला हवीत. पैसे देऊन बदल्या थांबवल्या येतात किंवा इच्छित स्थळी बदली मागून घेता येते. काय चावटपणाय? नव्या धोरणाने हा भ्रष्टाचार थांबणार असेल तर ठीक आहे धोरण बदलणे.

तेजस आठवले's picture

25 Nov 2017 - 3:42 pm | तेजस आठवले

उद्याचा नागरिक निंर्णय घेण्या लायक ,स्पर्धेत उतरण्या लायक राहुच नये म्हणजे एका वर्गाचिच मक्तेदारी राहावी.ही व्यवस्था करण्यात येत आहे...

हा वर्ग कुठला ? जरा समजावून सांगता का?

एका वर्गाचिच मक्तेदारी राहावी.ही व्यवस्था करण्यात येत आहे
???

अमितदादा's picture

22 Nov 2017 - 1:27 pm | अमितदादा

तुम्ही लेखातून आणि प्रतिसादातून शिक्षणाविषयी व्यक्त केलेली चिंता नक्कीच खरी आहे, महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षात कोणतेही ठोस असे शैक्षणिक धोरण दिसत नाही, हे नवीन सरकार येवून सुधा त्यामध्ये फरक पडलेला नाही. सध्याचे शिक्षण मंत्री हे हतबल वाटतात, ते हतबल मंत्री आहेत, त्यांनी दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण होत नाहीत. ह्या मंत्री महोदयांनी विधानसभेत एका शिक्षण उपसंचालकाला एका संशयित प्रकरणात निलंबित करण्याचे आदेश किंवा आश्वासन दिले होते, परंतु त्यांच्याच मंत्रालयातील अधिकार्यांनी त्याला केराची टोपली दाखवली तेंव्हा त्यांची चांगलीच गोची झाली होती, शेवटी ह्यांनाच ते निर्दोष आहेत म्हणून माघार घ्यावी लागली. त्यामुळे त्यांनी जाहीर सभेत कोणतेही आश्वासन दिले तरी त्यांच्या मंत्रालयातून त्याला केराची टोपली दाखवली जाणार यात काही शंका नाही. ह्यांनी ज्या विध्यापिठातून पदवी घेतली होती त्याचा हि वाद मध्यंतरी रंगला होता. मुलांच्या खर्या शिक्षणाची सुरवात ज्या अंगणवाडीतून होते त्याबद्दल तर ह्या सरकार चा अत्यंत निष्काळजी धोरण आहे. शिक्षकांच्या बदल्या करणे, काहीही अध्यादेश काढणे, विद्यापीठ ची नावे बदलने हेच याचं शैक्षणिक धोरण आहे असे दिसते.

मध्यंतरी केंद्रीय मंत्रिमंडळात एका ड्रामा क़्विन HRD मंत्री होत्या ज्यांना स्वतःची डिग्री कोणती हे सुधा छातीठोकपणे सांगता येत नाही. ह्यांच्या हट्टी धोरणापायी अनिल काकोडकर सारख्या शास्त्रज्ञास IIT डिरेक्टर selection कमिटी चा राजीनामा दद्यायला लागला होता. असे शिक्षण मंत्री असतील तर बट्याबोळ होणारच ना. त्यामध्ये सरकार ने विविध संस्थांचा संशोधनावरचा निधी कमी केला.
आताचे HRD मंत्री जावडेकर त्यातल्या त्यात हुशार आहेत, पंरतु काही गुढघ्यात मेंदू असलेल्या असरकारी संघटना त्यांना कसे काम करू देतात हे पाह्यला हव, कारण ह्या संघटनाचा रस ह्याला इतिहासातून बाहेर काढ त्याला इतिहासात घुसव, कुठल्यातरी पुरातनगोष्टीना विज्ञान घोषित कर एवढाच दिसतो.

त्यामुळे सध्याची सरकारी धोरण पाहता मोठ्या प्रमाणात फेर बदलाची गरज आहे असे वाटते.

पुंबा's picture

22 Nov 2017 - 1:53 pm | पुंबा

आधीच्या ईराणी आणि आताचे जावडेकर दोघेही चक्क नालायक आहेत, विशेषत: जावडेकर . शिक्षणमंत्री असण्यासाठी शिक्षणाची अट नसावी असेच माझे मत आहे त्यामुळे ईराणी किंवा मोदी यांच्या शिक्षणावर मला मत द्यायचे नाही(केवळ चौथी पास असणार्‍या वसंतदादांनी दुरदृष्टीने खाजगी इंजिनीअरींग कॉलेजेसना परवानगी घेण्ञाचा निर्णय गेह्तला आताचे उच्चशिक्षीत मंत्रीमहोदय इथून पुढे इंजिनिअरींग कॉलेजेस नको असा धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाहीत.). पण त्यांच्या शिक्षणविषयक धोरणावर मात्र कडाडून प्रहार करावा वाटतो. चक्क काहीच नविन घडत नाहीये या क्षेत्रात. विद्यार्थी, शिक्षक यांचा दर्जा शोधण्यासाठी एक विशेष सर्वेक्षण केंद्र सरकारने घ्यावे ही साधी मागणी अजून पूर्ण होत नाही. स्किल एज्युकेशन या नावाने नुसता तमाशा करून ठेवलाय. अतिशय उत्तम योजना पण मंद मंत्री अंमलबजावणी नीट न करू शकल्याने किती त्यांची वाट लावू शकतो याचे मुर्तीमंत उदाहरण आहे स्किल इंडिया योजना.
नविन शैक्षणिक धोरण तर कधी येणार आहे अस्तित्वात केवळ देवालाच ठाऊक असेल असे दिसते, महाराष्ट्रातील शिक्षणाबद्दल काय बोलावे? बोर्‍या वाजलाय. फार मूलभूत असं काही तरी होणे आवश्यक आहे. मोदींकडून ज्या मुख्य अपेक्षा होत्या त्यातील सर्वात मोठी शिक्षण क्षेत्रात बदल होतील ही होती. अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही. मोदींनी स्वत।, निती आयोगाच्या सहाय्य्याने राज्यांबरोबर ताळमेळ राखून शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणावेत.

अमितदादा's picture

22 Nov 2017 - 2:08 pm | अमितदादा

अतिशय उत्तम योजना पण मंद मंत्री अंमलबजावणी नीट न करू शकल्याने किती त्यांची वाट लावू शकतो याचे मुर्तीमंत उदाहरण आहे स्किल इंडिया योजना.

अगदी सहमत, परंतु स्कील इंडिया हि योजना HRD मंत्रालयाच्या खाली येत नसून स्कील development मंत्रालयाच्या खाली येते याचे माजी मंत्री होते राजीव प्रताप रुडी ज्यांना ह्या योजनेची वाट लावल्याबद्दल मंत्रिमंडळ मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. खालील लिंक वाचा.
Why India's skill mission has failed
त्यांनी राजीनामा देताना, मी माझे यश जनतेपुढे आणि मोदी पुढे मांडण्यात अयशस्वी ठरलो असे म्हंटले होते. परंतु data खोटे बोलत नाही त्यांनी हि योजना अपयशीच केली यात शंका नाही.

आधीच्या ईराणी आणि आताचे जावडेकर दोघेही चक्क नालायक आहेत, विशेषत: जावडेकर .

मला इराणी यांची हे मंत्रालय सांभाळायची कुवत नाही हे त्यांची कामगिरी पाहून पटलेले आहे. जावडेकर नि आताशी कुटे सुरुवात केलीय त्यामुळे त्यांच्याविषयी जास्त काही ऐकल नाही.

परंतु स्कील इंडिया हि योजना HRD मंत्रालयाच्या खाली येत नसून स्कील development मंत्रालयाच्या खाली येते याचे माजी मंत्री होते राजीव प्रताप रुडी

मला रूडींबद्दलच बोलायचे होते. या माणसाने वाट लावली स्किल मिशनची.
जावडेकरांवर राग आहे कारण पर्यावरणमंत्री म्हणून त्यांनी लवलेले दिवे.
शिक्षण हा विषय माझ्या अतिशय जिव्हाळ्याचा आहे, यावर अधिकाधिक वाचन, अभ्यास करून प्रतिक्रिया देत राहीन.

अँड. हरिदास उंबरकर's picture

22 Nov 2017 - 7:53 pm | अँड. हरिदास उंबरकर

नव्या धोरणाने हा भ्रष्टाचार थांबणार असेल तर ठीक आहे धोरण बदलणे...

शिक्षकांच्या बदल्यात होणारा पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप, तसेच चिरीमिरीच्या व्यवहारांना कायमचा पायबंद घालण्यासाठी शिक्षण क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच पारदर्शी व ऑनलाइन पद्धतीने बदल्या करण्याचे धोरण ठरविण्यात आले. २७ फेब्रुवारी २०१७ रोजी शासन निर्णय काढून तालुका निहाय बदली पद्दतीला फाटा देत शिक्षकांचे ४ संवर्गात वर्गीकरण करून हा प्रयोग केला जाणार आहे. मात्र सोप्या आणि अवघडच्या नादात सरकारने परिपत्रकामागून परिपत्रक काढून शिक्षकांना संभ्रमात टाकले आहे. या जी आर नुसार *"अवघड' शिक्षकास तीन वर्षात बदलीचा अधिकार मिळणार असून तो दहा वर्ष सलगपणे सर्वसाधारण क्षेत्रात सेवा केलेल्या शिक्षकाची जागा मागू शकणार आहे. त्यामुळे दुर्गम भागात खितपत पडलेल्या शिक्षकाला न्याय मिळेल. मात्र त्यांची संख्या बघितली तर १० टक्के शिक्षकांना न्याय देण्यासाठी ९० टक्के शिक्षकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे.* शिवाय यात महिला शिक्षकांची मोठी कुचुम्बना होण्याची श्यक्यता नाकारता येत नाही. दुसऱ्या टप्प्यात दुर्धर आजार असलेले तसेच अपंग, विधवा, कुमारिका, परित्यक्ता वा घटस्फोटित महिला व 53 वर्षावरील शिक्षक यांची इच्छा असेल तरच विनंती बदली केली जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात पती-पत्नी एकत्रिकरणाअंतर्गत 30 किलोमीटर परिसरात संधी दिली जाणार आहे. मात्र *दोघांपैकी एकजण बदलीपात्र असेल तरी दोघांमागे बदलीचे झंजट लागणार आहे. पुढील टप्प्यात 'सर्वसाधारण' क्षेत्रातील बदलीपात्र शिक्षकाची सेवाज्येष्ठतेनुसार पसंतीक्रमाने बदली करण्यात येणार आहे. *बदलीतून सवलतींची व प्राधान्यक्रमाची यादी वाढत चालल्याने या प्रक्रियेत 'एकल' शिक्षकांवर अन्याय होईल. मुळात, या धोरणाविरोधात न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यांची संख्याचं हा निर्णय अन्यायकारक असल्याची ग्वाही देतो.

बदल्या रद्द झाल्या की आता....

babu b's picture

25 Nov 2017 - 11:56 pm | babu b

डिग्री ३-५ वर्षांची असते. नंतर ३०-४० वर्षे करियर केवळ त्या ज्ञानावर शक्यच नसते.

थोडक्यात डिग्री म्हणजे लायसन. नंतर गाड्यांची मॉडेल्स व स्किल्स बदलत रहातात.

अँड. हरिदास उंबरकर's picture

26 Nov 2017 - 1:15 pm | अँड. हरिदास उंबरकर
अँड. हरिदास उंबरकर's picture

26 Nov 2017 - 1:15 pm | अँड. हरिदास उंबरकर

बदल्या रद्द झाल्या की आता...

रद्द नाही पोष्टपॉण्ड झाल्या

अँड. हरिदास उंबरकर's picture

26 Nov 2017 - 2:12 pm | अँड. हरिदास उंबरकर

सन्माननीय तेजस आठवले आणि सुबोध खरे जी...
लेखाच रोख आणि प्रतिक्रियेचा आशय आपण लक्षात घेतला तर 'मक्तेदारी' चा विषय आपल्या लक्षात येवू शकेल.

पार्श्वभूमि..

जिल्हा परिषदांच्या शिक्षकांसाठी बदलीचे ऑनलाईन प्रक्रियेचे धोरण निश्‍चित करण्यात आल्यानंतर त्यातील अनेक किचकट प्रक्रियेतून जाताना व अनेक परिपत्रकांच्या माध्यमातून मूळ निर्णयातील नियमांमध्ये दुरुस्ती तर काही नवीन नियम घालून देण्यात आल्याने गेल्या अनेक दिवसांपासून अनाकलनीय संभ्रमावस्था निर्माण झाली होती. त्यामुळे दैनंदिन ताणतणावात वाढ झाल्याने शिक्षकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते.. यात जिल्हा परिषद् शाळेतील विद्यार्थी भरडला जात होता..

एकाच वर्गाची मक्तेदारी...
आज राज्यातील जिल्हा परिषद शाळेत ग्रामीण भागातील बहुतांश गरीब, शेतकरी, मागास, आणि दुर्बल घटकांतिल विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.. ज्यांच्याकडे खासगी शाळा मधे प्रवेश घेण्यासाठी पैसे नाहीत असे विद्यार्थी या शाळात शिक्षण घेतात. हा तोच वर्ग आहे ज्यांच्या दारात शिक्षणाची गंगा फार उशिरा पोहचली..अडानीपना, गरीबी आशा अनेक कारणाने हा वर्ग शिक्षणापासून वंचित होता. शिक्षण मोफत आणि सक्तीचे झाल्यानतर हां वर्ग शिक्षणाच्या प्रवाहात सामिल होऊ लागला..पण विविध विसंगत धोरणामुळे त्यांच्या शिक्षणाचा बट्याबोळ केला जातोय..कधी आठवी पास चा निर्णय.. कधी शैक्षिणक सत्राच्या मध्यात शिक्षकांच्या बदल्याचा निर्णय .. यामुळे या वर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकासन होते. दुर्गम भागातील पालक, अडानी पालक एखाद्या शिक्षाकांच्या आग्रहाखातर मूल शाळेत टाकायला तयार होतात.. तो शिक्षक बदलून गेला तर त्यांचा हिरमोड होण्याची श्याक्यता नाकरता येत नाही. अर्थात, एखाद्या शिक्षकाने आशा दुर्गम भागात किती दिवस काम करावे याला निशितच मर्यादा असाव्यात. पण मूळ मुद्दा हां की जे आता कुठे शिक्षणाच्या प्रवाहात सामिल होऊ लागले आहेत, त्या वर्गाला वेगवेगळ्या निर्णयाने व्यथित का करण्यात येत आहे.. शिक्षण सक्तीचे करण्यामागे शासनाच उद्दात्त हेतु होता.. मग आशा निर्णयाने हा हेतु पूर्ण होत आहें का? ग्रामीण शिक्षणाला डिस्टर्ब करणाऱ्याना फ़क्त एक वर्गच(खासगी शाळेत शिकनारा) शिकावा असे वाटते का? एकाच वर्गाची शिक्षण क्षेत्रात मक्तेदारी राहावी अशी व्यवस्था...याला हा अर्थ अभिप्रेत आहे.

तेजस आठवले's picture

26 Nov 2017 - 4:51 pm | तेजस आठवले

खाजगी शाळेत जास्तीत जास्त मुले जावीत आणि सरकारी शाळा ओस पाडाव्यात असेच प्रत्येक सरकारचे धोरण राहिले आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने तुमच्याशी सहमत.
मक्तेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न तर आहेच, आणि त्यासाठी पालकांना भुलवले जात आहे.पालकही बळी पडत आहेत.

खाजगी शाळा विरुद्ध सरकारी शाळा
मराठी माध्यम शाळा विरुद्ध इंग्रजी माध्यमाच्या शाळा
SSC बोर्ड विरुद्ध आयसीएस्सी विरुद्ध सीबीएससी बोर्ड शाळा
ह्या वरच्या शाळा विरुद्ध इंटरनॅशनल शाळा
स्वतःचे दातही घासता न येणाऱ्या ४ वर्षीय बालकाचे मोठेपणी नासात जाण्याचे स्वप्न आणि ते पूर्ण करण्यासाठी लागणारी खाद्यतेले,त्यात तळलेल्या चकल्या (?) ,हात धुवायचा पातळ साबण, दुधात घालून दुधालाच पौष्टिक बनवण्यासाठी लागणारी चूर्णे, गाणे म्हणत वापरायचा अंघोळीचा साबण इ.इ. जाहिरातींचा प्रचंड मारा.
एकाबाजूला प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी मैलोन मेल चालावी लागणारी मुले आणि दुसरीकडे हे असे. दरी खूप आहे आणि वाढतच आहे.
असो.

babu b's picture

26 Nov 2017 - 6:33 pm | babu b

सरकार म्हणजे कोण ? मंत्री , आमदार इ इ की शिक्षण संचालक वगैरे ? हे लोक जाणूनबुजून असे का करतील ? सरकारी व खाजगी असे चॉईस बाजारात आहेत, लोक आपल्याला हवे ते निवडतात. दोष मात्र इतराना देतात.

खाजगी शाळा विरुद्ध सरकारी शाळा
मराठी माध्यम शाळा विरुद्ध इंग्रजी माध्यमाच्या शाळा
SSC बोर्ड विरुद्ध आयसीएस्सी विरुद्ध सीबीएससी बोर्ड शाळा
>> 'हिंदू' शाळा विरुद्ध 'अल्पसंख्य/ख्रिस्ती' शाळा राहील की :D

अँड. हरिदास उंबरकर's picture

26 Nov 2017 - 8:16 pm | अँड. हरिदास उंबरकर

अहो, सरकार म्हणजेच व्यवस्था..त्यात सर्वच येतात

अँड. हरिदास उंबरकर's picture

26 Nov 2017 - 8:16 pm | अँड. हरिदास उंबरकर

अहो, सरकार म्हणजेच व्यवस्था..त्यात सर्वच येतात

@उंबरकर सो. आपण म्हणतात तसे फक्त शिक्षक आवडता असेल तरच विद्यार्थी शाळेत येतो असे नाही. मुळात बदली करणे आणि बदलीचे धोरण ठरवणे हे शासनाचे अधिकार आहेत. कर्मचार्‍याला त्यात हस्तक्षेप करण्याचे कारण नाही. जिल्हा परिषदेत नोकरी घेतल्यावर आपले कार्यक्षेत्र संपुर्ण जिल्हा असेल हे कसे नाकारता येईल? त्यात कोठेही नियुक्ती दिली ती सोईची नाही, असे कोणता कर्मचारी म्हणु शकतो? कोणाला कोठे कामाला ठेवायचे हा हक्क सरकारचा नाही का? धोरण राबवतांना काही चुका असतील तर त्या दुरुस्त करुन राबवता येईल.

babu b's picture

27 Nov 2017 - 5:37 pm | babu b

सहमत

अँड. हरिदास उंबरकर's picture

28 Nov 2017 - 8:42 am | अँड. हरिदास उंबरकर

फ़क्त शिक्षक बदली ने शिक्षण व्यवस्था व्यथित आहे, अस मुळीच नाही.. ते एक प्रसंगिक प्रतिनिधिक उदाहरण आहे... शिक्षाकांमुळे मूल शाळेत येतात हे सुद्धा त्यापैकीच् एक..

वेल्लाभट's picture

28 Nov 2017 - 2:10 pm | वेल्लाभट

अशा सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी, ऐकण्यासाठी सर्वांनी जरूर या...
मराठीप्रेमी पालक महासंमेलन

२३-२४ डिसेंबर, मुंबई

मातृभाषेतून शिक्षण
दर्जेदार मराठी शाळा
उपयुक्त सुविधा
गुणवत्तापूर्ण शिक्षक
आधुनिक शिक्षणपद्धती
इंग्रजी भाषेवरील प्रभूत्व
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास

या आणि अशा अनेक मुद्द्यांवर राज्यभरातील विचारवंत, अभ्यासक, शिक्षक, पालक, नेते, विविध क्ष्रेतातील प्रसिद्ध व्यक्ती चर्चा करतील. यशाची शिखरं गाठलेले मराठीजन आपले अनुभव सांगतील, भेटतील.

पालकांचा सक्रीय सहभाग गरजेचा असून त्यासाठी पालक एकत्र होणं गरजेचं आहे.

फेसबुक दुवा (www.facebook.com/events/330379617423263)

मराठी अभ्यास केंद्र