"मंगेश कारभारी इकडे या", नानांनी त्यांच्या २ नंबरच्या भावाच्या नातूला हाक मारली.
आजोबा वारल्या नंतर चुलत्याबरोबर समांतर कारभारपण त्याच्या वाट्याला आले होते. अर्थातच हा युतीचा कारभार कुरबुरीचा होता.
उभ्या आयुष्यात पोपटमामा नानांशी बोललेला मी पाहिला नाही. कारण सिम्पल होते. त्याचे लग्न नानांनी त्याला पोरगी न दाखवताच परस्पर लावून दिले होते. पूर्वी नवरामुलाला पोरगी दाखवण्याची पद्धत नव्हती. वडीलधाऱ्यांना पोरगा-पोरगी पसंत पडली की डायरेट त्यांना भोवल्यावर चढवले जायचे.
पोरीबद्दलचा नानांचा अंदाज कंप्लिट चुकला होता. त्या आक्रस्ताळ्या मामीने लग्नाच्या पहिल्याच वर्षी मामाला जेलची हवा खायला लावली होती. त्याची उमेदीचे सगळी वर्षे कोर्ट कचेरीत गेली. पुढे त्यांचा घटस्फोट झाला पण तो पर्यंत मामीने त्याला खूप पिडले होते. त्याने मग कोणाला ही न नेता देवळात दुसरे लग्न केले.
नानांना त्याच्या या परिस्थितीचे काहीही सोयरसुतक नव्हतं. एवढ्या मोठ्या खरबाळ्यात एखादा निर्णय चुकतो. समजून घायचे असते.
पोपटमामा शांतारामला मिळाला आहे ही पक्की खबर नानांकडे होती. त्यामुळे मंगेश नानांसाठी आशेचा दिवा होता.
"तू शांतारामच्या विरोधात फॉर्म भर. तुझी सगळी कागदपत्रे कोतवालाला काढून ठेवायला सांगतो", नानांनी कुठला ही आगापिछा न बघता मंगेशला फरमान सोडले.
"नाना, चुलत्याच्या विरोधात उभे राहणे बरे दिसते का? लोक काय म्हणतील. आणि म्हातारपणी कशाला एवढे जीवाचे हाल करून घेताय.?" ज्याच्या तोंडावरची माशी उठत नव्हती तो मंग्या धोतराला तत्वज्ञान शिकवत होता.
"लका, तो शांत्या स्वतःच्या चुलत्याच्या विरोधात उभा ठाकला आहे, ते तुला दिसत नाही व्हय? म्हातारा कोणाला म्हणतोस अजून पण धान्याच्या पोत्याला थापी देऊ शकतो."
"राहू द्या नाना. मला माझा घरप्रपंच्या चालवायचाय. मोकार रिकामटेकडे उद्योग मला करायचे नाहीत." मंग्याने हात झटकले.
धाकट्या तात्याच्या घरात विचारावे तर ते विश्वासच्या घराचे बटीक होते.
नानाच्या सख्या मेव्हणीच्या घराने विश्वासला पाठिंबा देऊ केला. कारण काहीच ठाऊक नव्हते. फक्त तिचा एक नातू निलेश नाना काळजी करू नका म्हणून सांत्वन करत होता.
२-३ दिवस प्रयत्न करून ही वाडीत शांताराम आणि विश्वासच्या विरोधात उभे राहायला कचऱ्याचे कोणीच तयार होईना.
नाना गळपटले. वाकळ तोंडावर ओढून झोपी गेले.
----
"झ्याटमारी मीच उभा राहणार शांत्याच्या विरोधात. पडलो तर पडलो." नानांनी कॉफी पीत पीत आततायी निर्णय बोलून दाखवला.
"मग विश्वासच्या विरोधात कोण उभा राहणार". नानांच्या हेरखात्यातील निल्याने नानांसमोर नवीन पेच निर्माण केला.
"तू राहा त्याच्या विरोधात", नानांचे राजकारणातले ताळतंत्र चुकत चालले होते.
" नाही बा, मी उभा राहिलो तर तुम्हाला खबरा कोण देणार?" नीलूने चहा नाश्ता करून काढता पाय घेतला.
"नाना कशाला एवढी दगदग करून घेता?" आमच्या "सौ"नी समजावण्याचा प्रयत्न केला.
"मग काय करू. आजपर्यंत मी माझी आण बाण शान जपली आहे. संग्रामच्या पॅनल काढण्याच्या अहवाहनाला बाकी सगळे नको म्हणत असताना मी पाठिंबा दिला म्हणून ते तयार झाले. माझ्या सहकाऱ्यांनी त्यांच्या वॉर्डातील उमेदवार एकमुखाने जाहीर करून टाकले आणि मला एक ही उमेदवार मिळत नाही. त्यात माझेच भाऊ बंदकी माझ्याच विरोधात गेली. गावातील माझी सगळी पत यांनी वेशीवर टांगली. सगळ्यांसाठी एवढे करून ही मला शेवटी काय मिळाले." नानांचा बी पी एकदम थंड पडला होता.
"म्हणून तर म्हणतेय, ही निवडणूक लढवून तुम्हाला काय मिळणार आहे." तिने सबुरीने वाक्य रेटले.
"तुला नाही समजायचे ते. बरं तू एक काम कर, तुझी सगळी कागदपत्रे तुझ्या पप्पांकडून मागवून घे. नाहीतर मी एक माणूस पाठवतो, त्यांना म्हणावं सगळी कागदपत्रे जमा करून ठेवा." नानाचे विचारचक्र भूरकरून बायकोच्या डोक्यावरून गेले.
----
नाना फॉर्म भरणार म्हणून शत्रूच्या गोटात माहिती वाऱ्यासारखी पसरली.
निल्याने सगळा कारभार केला होता. नानाचा हा हेर शांतारामच्या गोटाचे प्रतिनिधित्व करत होता.
पाहुण्याची बायको पण उभी राहणार म्हणून वावडी उठली होती.
धोतार उभे राहणार म्हणून दाढीवाल्यांच्या गोटात दहशत बसण्याऐवजी असुरी आनंद झाला होता. माउलीचे धोतर फेडून डोक्याला बांधायला लावायची नामी संधी त्यांना खुणवत होती.
धोतर फेडणार ही माहिती नानांना समजली तशी त्यांनी मिश्किल स्मित केले आणि त्यांना निवडणुकीसाठी एक टॅग लाईन सापडली.
शांताराम आणि विश्वास यांना मिळणारा प्रतिसाद बघता नानांनी धोतर सांभाळूनच निर्णय घ्यावा असे मला वाटत होते.
धोतार पण १२ गावच्या पाण्यात विसळून आले होते. त्यामुळे ते माघार घेईल याची शक्यता उणे शून्य होती.
----
कामावरून आल्यावर बायकोने दिवसभरातील घडामोडी सांगितल्या.
जेवण उरकून मी गोठ्यातल्या खोलीत गेलो.
नाना DTH च्या डीडी सह्याद्री वर प्रशांत दामलेंचे जुने नाटक पाहत होते.
मी चाचपडत त्यांच्या उमेदवारी विषयी प्रश्न विचारला.
"माझा निर्णय पक्का आहे. मी फॉर्म भरणार. काहीही होऊ दे."
"मी म्हणतो काहीही कशासाठी होऊन द्याचे?" मी अवसान गाठून प्रतिप्रश्न केला.
"म्हणजे"
"तुमच्या सारख्या दिग्गज व्यक्तिमत्वाने त्या चिल्लर पोरांविरोधात लढण्यात काय हासील. उलट त्यांना जास्त चेव सुटेल." माझ्या डोक्यात पक्का प्लॅन तयार होता. कॉर्पोरेट मध्ये मिटिंगपूर्वी जशी तयारी केली जाते तसा संपूर्ण होम वर्क करून मी नानांकडे आलो होतो.
"आरे पण त्यांच्या विरोधात उभा राहायला कोणी कचरे तयार होईना मग माझ्या समोर दुसरा पर्यायच नाही." टीव्हीचा आवाज बारीक करून आयुष्यात पहिल्यांदा माझ्याशी चर्चा करण्यासाठी नानानी तयारी दाखवली होती. माझ्यासाठी हे खूप मोठे सुखद क्षण होते. माझा कॉन्फिडन्स प्रचंड वाढला होता. कंपनीच्या डिरेक्टर बॉडीसमोर प्रभावीपणे मांडणी करणाऱ्याला नाना काही एवढी मोठी आसामी नव्हती. पण त्यांच्याशी वाटाघाटी करणे माझ्यासाठी एक चाललेन्ज मात्र होते.
" संग्रामच्या विरोधात वातावरण तापले आहे. त्यात तुम्ही मैदानात उतरणार म्हणजे आपल्यातला आपल्यात मोठी दरी पडणार. हेच दाढीवाल्यांच्या पथ्यावर पडणार. फराट्यांचा आणखी तिसरा पॅनल निघणार अशी माहिती मिळत आहे. ज्यामुळे शांताराम, विश्वास आणि तुमच्यातल्या दुफळीचा फायदा तिसऱ्या पॅनेलच्या उमेदवाराला मिळणार." पहिला घोषवारा मी सादर केला.
"बरं, पुढे", नानांसाठी ही माहिती नवी नव्हती आणि ते संग्रामबद्दल एकनिष्ठ होते.
"फक्त तुम्ही उमेदवारी घेऊ नका, दुसरा पर्याय मी सुचवतो."
"कोणता पर्याय?" नानांची उत्सुकता भलतीच वाढली होती.
" माईंड गेम खेळायचा", मी भयपटातील वाक्य फेकले.
नानांनी टीव्हीचा आवाज वाढवायला सुरवात केली.
मी विचलित न होता म्हणालो, "संभाला उभे करू!"
संभा आमच्या सालाने राहणाऱ्या गड्याचा धाकटा पोरगा. वडिलांनी लहानपणापासून सांगितले म्हणून नानांना देव मानणारा. खूप हुरहुन्नरी. रेल्वेत ओ एफ सी कॅबेलच्या डिपार्टमेंटमध्ये टेम्पररी काम करत होता. पण त्यात इंजिनीरपेक्षा ही अधिक प्राविण्य मिळवले होते. त्याचा पंचक्रोशीत बराच मोठा मित्र परिवार होता. सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा अशी त्याची ओळख होती. तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ असा त्याचा स्वभाव होता. गडी तसा धडधाकट. चार हाटेकट्टे सहज लोळवू शकेन अशी बॉडी. मला सगळ्यात जास्त त्याचा जो गुण भावला तो म्हणजे हा पोरगा सगळ्या दिव्यातून मार्ग काढत सामान्यांची कामे तडीस नेऊ शकतो.
नानांनी पुढच्या विश्लेषणासाठी डोळे उडवले.
"माईंड गेम असा की एखाद्याला छोटे करायचे असेल तर त्याची तुलना छोट्या वस्तूशी करा. आपोआप ती व्यक्ती छोटी होते. आपण जर त्याची तुलना मोठ्या व्यक्तीशी केली तर काही न करता लायकी नसणारा माणूस मोठा होतो."
"कीर्तन बंद कर, मुद्द्यावर बोल", नाना आतुर झाले होते.
"पहा, संभाचे वडील आपल्यात राबले. हा गड्याचा पोरगा मालक असणाऱ्या शांतारामच्या विरोधात उभा ठाकला तर हवेत उडणारे आपोआप जमिनीवर येतील. अशा स्थितीत शांताराम बऱ्याच चुका करेल आणि त्या चुकांचा कसा फायदा उठवायचा हे तुम्हाला मी शिकवणे म्हणजे ...." नानांनी माझे बोलणे काटले.
" विश्वास विरोधात कोणाला उभे करायचे ते मी बघतो. त्यांनी महिला उमेदवार कचऱ्याची दिली आहे तिच्या विरोधात आपली रहादऱ्याची पारुबाई फिक्स आहेच", नानांचा उत्साह कमालीचा वाढला.
" पण संभा तयार आहे का? नाहीतर तो अजून काहीतरी खुसपट काढायचा."
"तो ११०% तयार आहे" मी ग्वाही दिली.
"एक काम कर तो गावाचा बनवलेला डेटा मला समजावून सांगतो का? मी तुला ५० हजार देतो. मी काही तुझ्या घरचा माणूस नाही आहे ३० हजारात सौदा करायला ". आम्ही दोघे खळखळून हसलो.
----
संग्रामभाऊची फॉर्च्युनर सकाळी सकाळी दारात उभी ठाकली. सोबत त्याचे बॉडीगार्डसदृश साथीदार आणि त्यांच्या वॉर्डातील ठरवलेले उमेदवार पटापट उतरून घरात शिरले. गोठ्यातल्या खोलीत देवपूजा अर्धवट सोडून नाना संग्रामभाऊंचे स्वागत करायला आले. सगळे स्थानापन्न झाले. तांब्या फुलपात्रे पटापट फिरले. मी खूप वर्षानंतर संग्रामला समोरासमोर पाहीले होते. जवळपास समवयस्कचा होता तो मला.
शांतारामचे चेले घराकडे कूच करायला लागले. नानांना पाहून परत आल्या पाऊली माघारी वळले.
"चहात आले जरा जास्त टाक आणि पर्वा बनवलेली पॉवडर पण टाक." नानांनी नेहमीच्या शैलीत चहाचे फर्मान सोडले.
"माउलीनाना चहा कशाला उगाच"
"मग जेवण बनवायला लावू का ?" नानांनी तत्परता दाखवली.
" बरं फक्त चहाच येऊ द्या" संग्रामचा नाईलाज झाला होता.
"उमेदवार मिळाला म्हणायचं एकदाचा" संग्रामने सियासत चालू केली.
"जो पर्यंत फॉर्म भरून मागे घेत नाही तो पर्यंत नाही मिळाला असंच समजायचं" नानांनी साशंकता दाखवली.
आल्याचा मस्त वाफाळलेला चहा आला. संग्राम ने फुरका मारला.
" तुमच्या उमेदवाराचे जरा बाजूला ठेऊ सरपंच पदासाठी आम्ही सर्वानी काही नावांची चर्चा केली आहे. ज्यात तुमच्या नातसुनेचें नाव आघाडीवर आहे." संग्राम ने विचार बोलून दाखवला. बाकीच्यांनी अनुमोदनाच्या माना डोलावल्या. मला आश्चर्याचा धक्का बसला.
मी स्वयंपाक घरातच होतो. माझ्या बायकोचा बीपी वाढायला लागला.
" अहो मी जर निवडून आले तर पाच वर्ष मला या वाडीतच अडकून पडावे लागेल. आखा दिवस ग्रामपंचायत ऑफिसमध्येच बसून राहावे लागेल." ती हळूच पुटपुटली. बायकोच्या दृढ विश्वासाचे आणि अगम्य समजुतींचे कौतुक वाटले.
एवढा सगळ्या इच्छुकांतून तिकीट मिळवणे, दाढीवाल्यांच्या प्रबळ उमेदवाराचा पराभव करणे आणि सरपंचाला २४ X ७ वेळ गावालाच द्यावा लागतो ह्या समजुतीचे हसू आले. पण हा विश्वास तिला नानांच्या कर्तबदारीमुळे अपकसुकच आला होता हे मी नमूद करू इच्छितो.
" ती अजून नवीन आहे गावामध्ये. तिला अजून लोक ओळखत नाहीत." नानांनी स्वतःची बाजू मांडली.
"अहो ताईंना कशाला लागती ओळख, माऊलींची नातसून म्हंटले की झाले." संग्राम बरोबर आलेल्या एका उमेदवाराने पुष्टी दिली.
" तिची ओळख ती स्वतः मिळवेन. हे पद खूप मोठे आहे. फक्त हारतुरे घेण्यासाठी हे पद नाही आहे. त्यामुळे तुम्ही आपण पूर्वी चर्चा केलेला गेंदांचा दत्ता योग्य उमेदवार आहे" नानांनी एक घाव दोन तुकडे केले.
बायकोचा जीव भांड्यात पडला.
----
शिवाबापू समर्थकांसोबत शांताराम, विश्वास आणि त्यांच्या सुनेचा सगळ्यांच्या आधी फॉर्म भरून सरकारी कार्यालयातून बाहेर पडत होते. शक्ती प्रदर्शनात हौसे नवसे गवसे सगळे सामील होते. तोच संभा, पारुबाई आणि संग्रामचा पीए कार्यालयात शिरताना दिसले. त्याच्या बरोबर कोणीच समर्थक नव्हते. अकेला काफी हूं असा अटीट्युड होता.
शांताराम ने संभाला आवाज दिला. शिकवल्या प्रमाणे संभाने त्याला कसलीच भीक घातली नाही. सगळ्या चेल्या चपाट्यात शांतारामचा 'पोपट'मामा झाला.
"यांची लायकी आहे का आमच्या विरोधात उभे राहायची." 'शांती'मामा बिथरला.
समर्थकांत लायकी बद्दलची कुजबुज चालू झाली.
माईन्ड गेमचा पहिला डोस यशस्वी लागू पडला होता.
संभा सर्व कागदपत्रांची पूर्तता करत होता.
शांती समर्थक गेटच्या बाहेर उभे होते.
तोच बटन स्टार्ट डिलक्स हिरो होंडा वरून धोतार कोणाला तरी डबल सीट घेऊन गेटच्या समोर येताना दिसू लागले.
मागे बसलेल्या व्यक्तीने टॉवेलने तोंड झाकले होते.
नाना जसे जवळ यायला लागले तसे शांती समर्थकांची तोंडे लपवण्यासाठी धावपळ सुरु झाली. नाना काही क्रूर प्रवृत्तीचे किंवा गुंड पाळून ठेवणारे व्यक्तिमत्व नव्हते. तरी लोकांची धावपळ का सुरु होती याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. ज्या माणसाचे हाद हाद हादडले, त्याच्याच विरोधात लोक कामधंदा सोडून वापरून सोडून देणाऱ्या शांती मामाच्या मागे आले होते. याची त्यांना जनाची नाही पण मनाची लाज नक्कीच वाटली असणार.
नानांनी आपली बहुढंगी नजर गर्दी वरती फिरवली आणि गाडी स्टाईल मध्ये स्टॅन्डवर लावली. उतरून गांधीफेम झपझप पाऊले टाकत कार्यालयात शिरले.
नानांबरोबर माणूस कोण होता हे लोकांना समजले नाही.
नाना आत असल्यामुळे ऑफिस मध्ये घुसायचे कोणाचे धाडस होईना.
थोड्या वेळात माउली, पी ए, संभा, पारुबाई आणि सतीश ऑफिसच्या व्हरांड्यात आले.
नानांनी समस्त जनतेला वजीर पिचर मधल्या अशोक सराफ सारखा नमस्कार केला.
आपला चुलतभाऊ सतीश समोर पाहून विश्वासच्या काळजाचा ठोका चुकला.
====
क्रमश :
((सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.. जागा, पात्रे, सर्व काल्पनिक.))
प्रतिक्रिया
28 Oct 2017 - 2:56 pm | वरुण मोहिते
वाचत आहे
28 Oct 2017 - 3:23 pm | विशुमित
संपादक मंडळ खालील दिलेली भाग-४ हि लिंक कृपया ऍड कराल का?
बाकी सगळ्या लिंक्सला १, २, ३, आणि ४ असे नामकरण करून देता का?
http://www.misalpav.com/node/41316
28 Oct 2017 - 4:14 pm | एस
केलं.
पुभाप्र.
28 Oct 2017 - 4:50 pm | विशुमित
धन्यवाद एस भाऊ...!!
28 Oct 2017 - 5:03 pm | शलभ
मस्त चालू आहे. आत्ताशी फॉर्म भरलेत.. अजून मागे घ्यायची तारीख आहे.. प्रचार आहे.. येऊ द्या..
28 Oct 2017 - 6:37 pm | पैसा
भारी!!
28 Oct 2017 - 8:48 pm | पगला गजोधर
येऊ दे
28 Oct 2017 - 8:50 pm | अमितदादा
छान लेख...पुभाप्र
28 Oct 2017 - 10:55 pm | बबन ताम्बे
पुलेप्र!
29 Oct 2017 - 1:11 am | संग्राम
पावनं.... नवीन भाग जरा लवकर येऊ द्या ....
30 Oct 2017 - 10:57 am | विशुमित
सर्वांचे आभार..!!
लवकर निकाल लावायचा प्रयत्न करतो लेखमालेचा.
30 Oct 2017 - 6:01 pm | अस्वस्थामा
इतक्या लवकर निक्काल ? अहो फुल्ल डेली सोपचं जबरा पोटेन्शियल आहे बघा. तुम्ही प्लॉट लय भारी मांडलाय आणि पात्रं पण सॉलिड आहेत, 'नेहमीचे यशस्वी कलाकार' अशा धर्तीचे नाहीत. शक्य असला तरी मसाला टाळून चांगलं रंगवलंय पण खरं सांगतो चांगल्या कथामालिकेची क्षमता आहे. ( ढिस्क्लेमर : डेली सोप ही चेष्टा नसून कथेतल्या पोटेन्शियलबद्दल स्तुती आहे. सध्याच्या पकाऊ डेली सोपमुळे गैरसमज होऊ शकतो म्हणून सांगितलं. )
30 Oct 2017 - 6:18 pm | विशुमित
निकाल लगेच नको असे म्हणताय तर खरेच अजून खूप पात्रे आहेत त्यांचा उल्लेख नाही केला तर त्यांच्यावर अन्याय होईल.
कथा गुंडाळण्याचा विचार तूर्तास बाजूला ठेवून शक्य तेवढा डिटेलिंग देण्याचा प्रयत्न करतो.