स्थलांतरे - घाऊक आणि किरकोळ

सुनील's picture
सुनील in जनातलं, मनातलं
28 Feb 2009 - 5:29 am

लहानपणची गोष्ट आहे. कुठल्याशा सुटीत एका कौटुंबिक सहलीसाठी लोणावळ्याला जाणे झाले होते. विविध स्थलदर्शनांच्या यादीत "कार्ले" येथिल लेण्यांचा समावेश होताच. तेथिल एकविरा देवीच्या मंदिरात गेल्यावर माहिती कळली की, ही कोळी समाजातील लोकांची देवता. मला कुतुहल वाटले. कोळी समाज हा समुद्रकिनार्‍यावरील. मग त्यांची देवता अशी समुद्रकिनार्‍यापासून इतकी दूर, अगदी घाटापलिकडे देशावर कशी? वडिलधार्‍यांना विचारले पण कोणाकडेच समाधानकारक उत्तर नव्हते. आजही नाही. अनेक अनुत्तरीत प्रश्नांच्या ढिगार्‍याखाली ते कुतुहल आजदेखिल पडून आहे!

मिपावर मराठीच्या अनेक बोलींतील लेखन वाचायला मिळते. त्यात एक आहे आगरी बोली. अगदी बालपणापासून बर्‍याचदा कानावर पडलेली ही बोली. माझे वडिल ज्या कारखान्यात काम करीत तेथिल बरेच कामगार आगरी. त्यांचे घरी येणे-जाणे होत असे. तशी ती मंडळी आमच्याशी अगदी प्रमाणित मराठीत बोलायचा प्रयत्न करीत पण त्यांचा तो एक विशिष्ठ आगरी हेल काही लपत नसे. फार गोड वाटे ऐकायला.

नुकतेच वाचनात आले. १३ व्या शतकात देवगिरीचा पाडाव झाला आणि त्याच सुमारास पैठण प्राताचा सुभेदार असलेला बिंब राजा पैठण सोडून उत्तर कोंकणात आला. तेथे त्याने आपले राज्य स्थापले. महिकावती (केळवे-माहिम) ही त्याने वसलेली राजधानी. पैठणहून येताना बिंब राजाने काही लोकसमुहच्या समूह कोकणात स्थलांतरीत केले. त्यातील दोन प्रमुख लोकसमूह होते - आगरी आणि पाठारे प्रभू!
मूळच्या मराठवाड्यातील ह्या दोन जमाती आज मुंबई परिसरात पूर्णपणे मिसळून गेल्या आहेत. इतक्या की, मूळस्थानाशी त्यांचा काही संबंधच उरलेला नाही!

इ.स.पू ९ ते ६ या शतकात असीरीयन साम्राज्य पार इराणपासून इजिप्तपर्यंत पसरले होते. ह्या असीरीयन राजांचे वैशिष्ठ्य म्हणजे साम्राज्यांतर्गत विविध लोकसमुहांची जबरदस्तीने घडवलेली घाऊक स्थलांतरे. भारतातील एक बिंब राजा सोडला तर, अशी घाऊक स्थलांतरे घडविणारा राजा झाला नसावा!

अलिबागहून मुरुड-जंजिर्‍याकडे जाताना वाटेत रेवदंड्याची खाडी लागते. ती पार करून, मुरुडला जाण्यासाठी उजवीकडे वळले, की पहिलेच गाव लागते - कोरलई.

मुरुडकडे सुसाट न पळता थोडे ह्या गावात रेंगाळा. फार मजेशीर गोष्टी समजतील. हे गाव बहुतांशी ख्रिस्ती. गावकर्‍यांचा तोंडावळादेखिल थोडा वेगळा. आणि भाषा? ती तर फारच वेगळी!! म्हणजे तुमच्या-आमच्याशी अगदी व्यवस्थित मराठीत बोलतील पण आपापसात ती मंडळी काय बोलतात याचा तुम्हाला थांगपत्ता लागणार नाही! कारण ती भाषा आहे जुनी पोर्तुगिज - मराठी मिश्रित.

चौल ही चिमुकली पोर्तुगिज वसाहत. १६८३ साली संभाजी महाराजांनी एका झडपेत चौल काबीज केले. त्यावेळी चौलमधिल काही पोर्तुगीज कुटुंबे जीव वाचवण्यासाठी खाडी ओलांडून कोरलईला आली आणि तिथेच स्थायिक झाली. उत्तरेला वसई आणि दक्षिणेला गोवा येथे मोठ्या पोर्तुगिज वसाहती होत्या पण त्यांचा कुणाशीच संबंध राहिला नाही आणि एक चिमुकला पण वेगळाच समाज निर्माण झाला!

कोकण किनार्‍यावर असे बरेचदा घडले. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी इस्रायलहून आलेले ज्यू नागावच्या किनार्‍यावर येऊन थडकले तर इराणहून आलेले पारशी संजाणच्या किनार्‍याला लागले. आपल्या मूळ स्थानापासून दूरावलेले हे समाज नव्या ठिकाणी अगदी पूर्णपणे रुजले - फेरलावणी केलेल्या पिकासारखे!

इतिहासविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

28 Feb 2009 - 5:38 am | मुक्तसुनीत

सुनीलराव ,
अतिशय सुरेख लिखाण. अशा प्रकारचे संशोधन दुर्गाबाई भागवत , रा. चिं. ढेरे आणि अनेक इतर विद्वानांनी केलेले आहे. याबद्दलचे अनेक संदर्भ त्यांच्या लिखाणात सापडतात. मला या लिखाणातला विशेष हा वाटला की हे सारे कुठेही पुस्तकी नसून , रोजच्या आयुष्यतील गोष्टींबद्द्दलच्या कुतुहलातून तुमच्या हातून घडलेले आहे. आपला समाज , आपला इतिहास या सगळ्या गोष्टींकरता इतिहासातल्या संदर्भात जायची दरवेळी गरज आहे असे नाही. तुमच्या आमच्या सारख्या लोकांशी बोलूनही या गोष्टी कळतात हे तुम्ही सिद्ध केले आहे. लेख मला खूप आवडला.

भारतातील एक बिंब राजा सोडला तर, अशी घाऊक स्थलांतरे घडविणारा राजा झाला नसावा!

मुहम्मद तुघलक तुम्ही विसरताय :-) या पठ्ठ्याने राजधानी दिल्लीहून दक्षिणेकडे हलवली. राजकीय दृष्ट्या ते बरोबर होतेच. पण... त्याचबरोबर असा वटहुकूम काढला की दिल्ली शहरच्या शहर रिकामे व्हायला हवे ! एकाही माणसाने मागे रहाता कामा नये ! आणि त्यातून जे घडले ते अर्थातच घाऊक स्थलांतरच होते...

अमोल नागपूरकर's picture

28 Feb 2009 - 10:22 am | अमोल नागपूरकर

एक फकिर काही केल्या दिल्लीवरुन देवगिरी (दौलताबाद) ला यायला तयार नव्हता. तेव्हा तुघलकच्या सैनिकान्नी त्यआचा पाय घोड्याच्या रिकिबित अडकवला आणि त्याला खेचत घेऊन गेले. आसे म्हणतात की देवगिरीला पोहोचेपर्यन्त त्य फकिरचा फक्त पायच शिल्लक होता !!!! घाऊक स्थलान्तराचे असेहि परिणाम होतात.

नीधप's picture

28 Feb 2009 - 6:03 am | नीधप

दोन गोष्टींबद्दल शंका आहे.
१. पाठारे प्रभू - मराठवाड्यातून आले की गुजरातमधून? गुजरात हे मी एका पाठारे प्रभू कडूनच ऐकले आहे खरं खोटं माहीत नाही.
२. चौल इथे पोर्तुगीज लोक आहेत की ज्यू? रायगडमधला ह्या परीसरात ज्यू लोक समुद्रमार्गाने आले आणि वसले. हेच बहुतांश ठिकाणी ऐकलंय/ वाचलंय.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

सुनील's picture

28 Feb 2009 - 6:19 am | सुनील

तुमच्या दोन्हीही शंका रास्त आहेत.

बिंब राजा पैठणहून आला की गुजरातेतील पाटणहून याबाबत इतिहासकारात थोडे मतभेत आहेत. परंतु, त्याच सुमारास झालेले देवगिरीचे पतन पाहता, पैठण हे अधिक सयुक्तिक वाटते.

चौलमधे आता ख्रिस्ती नाहीत. परंतु चौलहून ७-८ किमी दूर असलेल्या कोरलईत आहेत. तुम्ही ज्या ज्यूंचा उल्लेख करता ते, चौल आणि अलिबागच्या मध्ये असलेल्या नागाव येथे प्रथम आले आणि नंतर रयगड जिल्यात इतरत्र पसरले.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

केदार's picture

28 Feb 2009 - 10:13 am | केदार

बिंब राजा हा पैठन वा मराठवाड्यातील नसावा कारण, यादवांचा पाडाव झाला तेंव्हा शंकरदेवराय हा यदुवंशीय राजा राज्य करत होता तर त्याचा मेहूना होता हरीदेवराय. त्यामूळे बिंबचा संबंध निदान देवगीराचा पाडाव झाला तेंव्हा तर नक्कीच नाही. शिवाय तेंव्हा पैठन (प्रतिष्ठान) राजधानी जाउनही बराच कालावधी लोटला होता. देवगीरीवर यादव राजे राज्य करत होते.

शैलेन्द्र's picture

1 Mar 2009 - 12:11 am | शैलेन्द्र

बिंब राजा हा यादवांचा सुभेदार असावा.

विंजिनेर's picture

28 Feb 2009 - 8:13 am | विंजिनेर

गोनीदांच्या "तांबडफुटी" मधे कोकणातल्या बेनेइस्त्रायली कुटंबाचा उल्लेख आहे.
कादंबरीमधला परिसर बहुदा रायगड/देवगड हा आहे.

नीरजाताईंच्या पाठारे-प्रभूंवरून आठवलेला किस्सा.
गौड सारस्वत ब्राह्मण हे बंगालातून स्थलांतरीत झाले, असे ऐकायला मिळाले होते एकदा. तोवर मी गोवा ही सारस्वतांची मूळ भूमी समजत असे. पण सांगणार्‍याने त्यावेळी मला गौड सारस्वत आणि गौड बंगाल यांचा इन्टरसेक्शन काढून सारस्वत आणि बंगाल एकमेकांशी संबंधित असल्याचे सांगितले. माझे याबाबतचे ज्ञान - तेव्हाही आणि आताही - यथातथाच असल्याने हे 'स्थलांतर' (?) माझ्यासाठी आजही एक गौडबंगालच आहे.
(गौड सारस्वत)बेसनलाडू

सुनील's picture

28 Feb 2009 - 6:24 am | सुनील

हे मीही ऐकले आहे. पण मला वाटते, सारस्वत मूळचे उत्तरेकडील (आता लूप्त झालेल्या) सरस्वती नदीकाठचे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

यशोधरा's picture

28 Feb 2009 - 1:21 pm | यशोधरा

मीही सारस्वत हे मूळ सरवती नदीकाठी रहात असे वाचले आहे.
स्व. बाबूराव पारख्यांनी श्रीपरशुरामांवर एक माहितीपूर्ण ग्रंथवजा पुस्तक लिहिले आहे, ( पुस्तकाचे नाव मात्र विसरले :( ) त्यात वाचले होते की, कोकण प्रांत निर्माण केल्यावर काश्मिरातून सारस्वत ब्राह्मणांना त्यांनी कोकण प्रांती वास्तव्य करण्यासाठी निमंत्रित केले. त्यांनी कोकणात राहून विद्यादान करावे हा उद्देश होता. पुस्तकाचे नाव मिळाले तर देईनच.

आवडला लेख व आलेले प्रतिसादही.

प्रदीप's picture

28 Feb 2009 - 7:12 am | प्रदीप

काश्मिरातून आले, असेही ऐकले आहे.

चांगला लेख, आवडला. प्रतिसादही उत्तम आहेत.

सारस्वत ब्राह्मण हे सरस्वती नदीच्या काठावर राहत असत. सारस्वत नावाच्या ऋषींच्या आश्रमात विद्याग्रहण आणि अध्यापन करणारे, तसेच साहित्य-काव्यव्यनिर्मिती करणारे हे ब्राह्मण होत. हा परिसर तत्कालीन पंजाब, उत्तर राजस्थान इ. असावा. सरस्वती नदीच्या प्रदेशात सतत होणारे भौगोलिक बदल, पूर आणि दुष्काळ यातून वाचण्यासाठी, विद्या वाचवण्यासाठी सदर ब्राह्मणांनी नदीतील मासे खायला सुरूवात केल्याचे सांगितले जाते. यांचे नक्की स्थलांतर कधी झाले हे पुराव्यानिशी माहित नसले तरी सरस्वती नदी कोरडी पडू लागल्यावर इतर नद्यांच्या दिशांनी या ब्राह्मणांनी स्थलांतर केले असावे असा सर्वसाधारण समज आहे.

हे स्थलांतर मुख्यत्वे तीन दिशांनी झाले. सिंधू व इतर पंचनद्यांच्या दिशेने उत्तरेला गेलेले ब्राह्मण कश्मिरात आणि सिंधप्रांतात वसले, गंगेच्या दिशेने गेलेले ब्राह्मण बिहार-बंगालच्या प्रदेशात वसले. (हाच गौड-प्रदेश) आणि सिंधू आणि इतर नद्यांच्या वाटेने दक्षिणेकडे गुजराथच्या दिशेने गेलेले ब्राह्मण समुद्रमार्गे गोव्यात पोहोचले. यानंतर बर्‍याच काळाने राजकीय अंदाधुंदीच्या काळात गौड प्रदेशातील लोकांचे पुन्हा स्थलांतर झाले आणि त्यांची एक शाखा भूमार्गे गौडप्रदेश सोडून गोव्याच्या दिशेने आली आणि गोवा, कारवार भागात स्थायिक झाली.

यानंतरचे सारसस्वत ब्राह्मणांचे स्थलांतर पोर्तुगिजांच्या काळात घडले. पोर्तुगीज अत्याचारांना कंटाळलेले आणि स्वत:चा धर्म सुटू नये म्हणून सारस्वत महाराष्ट्रात येऊन कोकण - मालवण, रत्नागिरी, वेंगुर्ले इ. प्रदेशात स्थायिक झाले.

असो.

सर्वच सारस्वत स्वतःला गौड सारस्वत म्हणवून घेत नाहीत. कोकण-गोवा-कर्नाटकातील सारस्वतांत गौड सारस्वत, चित्रापूर सारस्वत, कारवार सारस्वत, राजापूर सारस्वत अशा अनेक पोटजाती आहेत. याशिवाय पंजाब, सिंध, राजस्थान आणि काश्मिरात सारस्वत ब्राह्मण आढळतात. गौड सारस्वत ब्राह्मणांत कुडाळदेशकर, बारदेशकर वगैरे पोट-पोटजातीही आहेत. ;)

(कुडाळदेशकर गौड सारस्वत ब्राह्मण) प्रियाली.

रामदास's picture

1 Mar 2009 - 8:01 am | रामदास

ह्या सगळ्या जाती पोटजातींचे नमुने ताळमकी वाडीत ,एनकेजीएसबी बँकेत किंवा शामराव विठ्ठल बँकेत भेटू शकतील.

प्रदीप's picture

1 Mar 2009 - 9:42 am | प्रदीप

ताळमकी वाडी, एनकेजीसबी, मॉडेल हाउस व तेथील परिसर हे विशेषतः कारवारी/ मंगलोरी सारस्वतांचे आगर. गोवा, (सावंत)वाडी, मालवण येथील सा. ब्रा. सारस्वत बँकेत, तसेच चिखलवाडी, आंबेवाडी, दादर, माटुंगा, विलेपार्ले येथे. कुडाळदेशकर मुख्यत्वे वसई येथे.

मुक्तसुनीत's picture

28 Feb 2009 - 6:10 am | मुक्तसुनीत

मी पाहिलेल्या जवळजवळ सर्व देशस्थ ब्राह्मणांचे कुलदैवत "बालाजी" , हे कसे काय ? हे नक्की कुठले कनेक्शन असावे ?

सुनील's picture

28 Feb 2009 - 6:22 am | सुनील

.... आणि कोकणातील कोकणस्थ ब्राह्मणाम्ची कुलदेवता पार आंबेजोगाईत?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नीधप's picture

28 Feb 2009 - 1:26 pm | नीधप

त्याची फोड मधे चित्पावन संमेलनाच्या वेळेला ऐकली होती ती अशी.
परशुरामाने परशु देशातील १४ ब्राह्मण आणून कोकणात वसवले पण त्यांचा वंश वाढायला कोकणात माणसेच नव्हती. म्हणून मग देशावरच्या देशस्थ मुलींशी त्यांची लग्ने लावण्यात आली. त्या मुलींची देवी ती आंबेजोगाई.
कुठे वाचले तो संदर्भ पक्का आठवत नाहीये तेव्हा १००% हेच कारण असेल असे नाही.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

प्रकाश घाटपांडे's picture

1 Mar 2009 - 11:03 am | प्रकाश घाटपांडे

देशस्थांमध्ये ऋग्वेदी यजुर्वेदी असे भेद आहेत. आता आमच्या आडनावातच घाट असल्याने आम्ही कोकणातले असणे शक्यच नाही. पुणे नाशिक रोडवर पेठ घाट हे मुळ वसती स्थान. तिथुन हे घाटातले पांडे लोक आंबेगाव, खेड (आताचे राजगुरुनगर) जुन्नर तालुक्यात विखुरले. आमचे कुलदैवत खंडोबा. जेजुरीचा. पण स्थानिक खंडोबा म्हणजे कोरठण चा . पारनेर तालुक्यातला. भौगोलिक दृष्ट्या जवळचा. बैलांचे गाडे या भागात होतात. बैलाविषयी अत्यंत प्रेम. टिंग्या पहा. माझी बायको अकारांत कोकणस्थ आहे तिला अगोदर खंडोबा या मराठ्यांचाच देव असुन देशस्थ लोक म्हणजे ब्राह्मणातले मराठा असेच वाटायचे. बालाजीची भानगड काय समजली नाही. आमच्या मते बालाजी हा विष्णुचा अवतार आन खंडोबा हा शंकराचा अवतार मानतात. चंपाषष्ठी हा आमचा प्रमुख धार्मिक सण असायचा. खंडोबाच नवरात्र त्या दिवशी संपायच.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

हे कोकणस्थ म्हणजे देशस्थांना आणि इतर ब्राह्मणांना ओबीसी समजतात.(अदर ब्राह्मण क्लासेस).ह.घ्या.
यजुर्वेदी =गोदावर्या उत्तर तीरे.
ऋग्वेदी=गोदावर्या दक्षीण तीरे.
म्हणजे माध्यंदीन आणि तैत्तरीयांनी कुठे जायचं हो?परत आश्वलायन आणि हिरण्यकेशीची भानगड आहेच.
सुनीलनी कामाला लावलंय सगळ्यांना.

सुनील's picture

1 Mar 2009 - 3:20 pm | सुनील

सुनीलनी कामाला लावलंय सगळ्यांना.
=)) =)) =))

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चित्रा's picture

28 Feb 2009 - 7:08 am | चित्रा

छोटेखानी लेख आवडला. सगळे गौडबंगालच आहे खरे! अलिबागमधल्या एका ज्यू मुलीशी काही काळ ओळख होती, तिची आठवण झाली.

एकविरा देवीच्या कार्ल्याच्या देवळावरून मला खरे तर एक शंका वाटते -(ही शंका इंटरनेटवरील छायाचित्रे पाहून - त्यामुळे त्याला ठोस पुरावा न वाटल्यास सोडून द्या. खूप लहानपणी गेले होते त्यावेळी कार्ल्याला सायीचे छान दाट, गार दूध मिळायचे एवढेच आठवते आहे, लेणी वगैरे काही आठवत नाहीत :) ) - की ते देऊळ नंतरच्या काळात बांधले गेले असावे. कारण असे की एकतर ते एका बौद्ध लेण्यांच्या प्रवेशदारातच बांधले आहे. दुसरे म्हणजे बांधण्याच्या पद्धतीवरून असे वाटते की लेण्यांचा मूळ आर्किटेक्ट असे मध्येच देऊळ बांधणार नाही. असे असले तर कदाचित लेण्यांच्या नंतरच्या काळातील आहे का हेही तपासावे लागेल असे वाटते. (देवळाच्या दगड, आणि त्यांच्या तासण्याच्या/कापण्याच्या पद्धतीवरून लक्षात येऊ शकते असे वाटते).

हे फोटो मिळाले.

हा एक

आणि हा एक वेगळा भाग.

माझी शंका खरी असल्यास देऊळ हे कदाचित नंतरच्या एखाद्या कोळी राजाने किंवा पुढार्‍याने ते सुरक्षित रहावे म्हणून बांधले असेल का? किंवा दुसरे म्हणजे एखाद्या तत्कालिन विजयी समाजाने बांधले असावे का?

प्रदीप's picture

28 Feb 2009 - 7:15 am | प्रदीप

वेगळा विषय व छान हाताळणी. लेख व प्रतिक्रिया ह्यांतून उपयुक्त माहिती मिळेल असे वाटते.

बेसनलाडू's picture

28 Feb 2009 - 1:15 pm | बेसनलाडू

(जिज्ञासू)बेसनलाडू

विंजिनेर's picture

28 Feb 2009 - 7:53 am | विंजिनेर

सोप्या भाषेत, कुठलेही बोजड शब्द न वापरता समजावून सांगितले आहे. छान लेख आहे.

मी जालावर एका वेगळ्या विषयाची माहिती गोळा करत असताना मला हबशी आणि सिद्दी समाजाबद्दल ही माहिती सापडली त्याचा स्वैर अनुवाद खालील प्रमाणे:

हबशी:
हबशी लोक हे इथोपिया आणि पूर्व अफ्रिकेतून भारतात समुद्रमार्गे स्थलांतरित झाले. त्यांच्या धिप्पाड शरीरयष्टीमुळे ते प्रामुख्याने शरीर-रक्षक/सैनिक/सरदार अशा व्यवसायांतून पुढे आले. ते मुख्यतः भारतातील मुस्लिम राजे/सरदारांच्या चाकरीत होते.
संदर्भः "द वंडर दॅट वॉज इंडिया - भाग २", लेखक - रिझवी ,लंडन १९८७
अवांतरः बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या राजा शिवछत्रपती मधे ह्यांचा सिंधुदुर्गाच्या लढाई आणि गोवा/उ. कर्नाटकाच्या मुलुखात झालेल्या लढाया इ. मधे उल्लेख येतो.
(..धिप्पाड हबशी आपले तळपते तेगे घेऊन डेर्‍याच्या बाहेर गस्त घालत होते...)

सिद्दी:
आजच्या उ. कर्नाटक आणि जवळच्या भागात राहणार्‍या सिद्दी समाजाची मुळे १५व्या शतकापासून चालत आलेल्या गुलामगिरीत आहेत. ही गुलामगीरी पोर्तुगीज व्यापार्‍यांनी सुरू केली (ती अगदी१९व्या शतकापर्यंत चालू होती!). हे व्यापारी पोर्तुगाल मधून येताना आफ्रिकेच्या मोझांबिक आणि इतर बंदरांत दहशत/लाच अशा अनेक मार्गातून गुलाम गोळा करायचे व भारतात येऊन विकायचे.
जंगलतोडे आणि शेत मजूर म्हणून गुलामगिरीचे खडतर आयुष्य जगताना ह्या समाजात शिक्षण आणि प्रगतीचा अभाव राहिला तो आजही दिसून येतो. अगदी अलिकडे मात्र सरकारच्या पुढाकाराने, ह्या समाजातील मुले प्राथमिक शिक्षण का होइना घेउ लागली आहेत. साब्राणी, यलापूर आणि करावतीच्या जंगलात राहणारा हा सिद्दी समाज हिंदू/मुस्लिम्/ख्रिस्ती धर्म पाळतो. असे असले तरीही ह्यांच्या मधे आंतरधर्मीय विवाहसुद्धा प्रचलित आहेत.

प्राजु's picture

28 Feb 2009 - 8:23 am | प्राजु

छोटेखानीच पण अत्यंत उत्तम माहिती आहे या लेखात. संशोधनाचाच हा विषय आहे खरेतर.
या विषयावर आणखी जाणून घ्यायला आवडेल.
याची लेखमालाच सुरू करावी.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

28 Feb 2009 - 4:55 pm | विसोबा खेचर

याची लेखमालाच सुरू करावी.

हेच बोल्तो..

तात्या.

अवलिया's picture

28 Feb 2009 - 8:26 am | अवलिया

छान लेख. आवडला.
अजुन येवु द्या.. :)

--अवलिया

रामदास's picture

28 Feb 2009 - 8:38 am | रामदास

तशीच कोकणस्थ ब्राह्मणांची मराठवाड्यात अंबेजोगाईला किंवा कोल्हापूरला.अशी सामूहीक स्थलांतरे गुजरातमध्ये पण आहेत.उदा:कच्छी बोलणारे भाटीया किंवा लोहाणा मूळचे पंजाब -सिंध प्रांतातले.लोहाणांकडे पहा नाक पठाणासारखे.रंग पठाणासारखा.इतर गुजराती बोलणार्‍या लोकांपेक्षा वेगळे दिसतात.
सारस्वत ब्राह्मण म्हणाल तर ते पंजाबात आणि राजस्थानात पण आहेत.उदा: राजस्थानी ओझा ब्राह्मण सारस्वत ब्राह्मण आहेत.
बर्‍याच वेळा राजाच्या इच्छेनी माणसं स्थलांतरीत झाली असतील तर काही वेळा पोट भरण्याची नैसर्गीक साधनं अपूरी पडायला लागली म्हणून , किंवा परकीय आक्रमण झाले म्हणून .
कानपूरजवळ ब्रह्मावर्तात पेशव्यांच्या सोबत गेलेली ब्राह्मण कुटुंब तिथेच राहीलेली आहेत.
अवांतरः यानंतर पाचशे वर्षानी जर्मनीचा किंवा अमेरीकेचा इतिहास लिहीला जाईल तेव्हा डांबीस राजाची प्रजा किंवा लिखाळ पंडीताची वंशावळ असा उल्लेख वाचायला मिळेल.हे लोक आपसात अगम्य अशी मराठी नावाची भाषा बोलतात असा उल्लेख येईल.

भडकमकर मास्तर's picture

28 Feb 2009 - 9:29 am | भडकमकर मास्तर

अवांतरः यानंतर पाचशे वर्षानी जर्मनीचा किंवा अमेरीकेचा इतिहास लिहीला जाईल तेव्हा डांबीस राजाची प्रजा किंवा लिखाळ पंडीताची वंशावळ असा उल्लेख वाचायला मिळेल.हे लोक आपसात अगम्य अशी मराठी नावाची भाषा बोलतात असा उल्लेख येईल._
(डांबिस राजाची प्रजा !!!! :)) )
आज रामदासभौ एकदम फॉर्मात आलेत...

_____________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

पिवळा डांबिस's picture

28 Feb 2009 - 10:23 pm | पिवळा डांबिस

डांबिस राजाची प्रजा म्हनं.....
आता या वयात हे काय भलतंच मागणं?
आता तरी जरा प्रजामुक्त 'कामा'त रमू द्या की रे!!!!
:)

नीधप's picture

28 Feb 2009 - 1:37 pm | नीधप

कोकणस्थांच्या काही शाखा कारवारात गेलेल्या आहेत. त्यांची घरातली भाषा चित्पावनी आणि बाहेर व्यवहाराची भाषा कोकणी किंवा कन्नड आहे. मराठी कळतही नाही त्यांना. अश्याच काही शाखा बडोदा परीसरात पण आहेत.

माझी एक मैत्रिण कुमाउनी आहे (पहाडी. नैनिताल, कुमाउ आणि तो सगळा भाग). कुमाउनी ब्राह्मण. तिच्या लग्नात तिच्या बर्‍याच नातेवाइकांची आडनावं पाह्यली तर ती मराठी वाटली. आणि तिच्या एका काकांनी सांगितलं की आम्ही जीव आणि धर्म वाचवण्यासाठी महाराष्ट्रातून पळून आलेले नी नंतर पहाडात राह्यलेले मराठी ब्राह्मण आहोत त्यामुळे उत्तरेतले असलो तरी आमची डिसेन्सी मराठी लोकांसारखी आहे. भडकपणा आणि गाजावाजा आमच्याकडे आवडत नाही. पंत, व्यास, कलबे अशी काही आडनावे.

महाराष्ट्राबाहेर जिथे जिथे म्हणून मराठी संस्थानं होती तिथे तिथे मराठी माणसांचे एकगठ्ठा स्थलांतर झालेच आहे. ग्वाल्हेर, झांशी, इंदौर, बडोदा आणि बहुतेक तंजावर सुद्धा.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

जीव आणि धर्म वाचवण्यासाठी महाराष्ट्रातून पळून......

भय्या व बिहारींच्या आक्रमणामुळे आताही महाराष्ट्रीयांनी हेच करण्याची पाळी आली आहे :)

त्यामुळे उत्तरेतले असलो तरी आमची डिसेन्सी मराठी लोकांसारखी आहे. भडकपणा आणि गाजावाजा आमच्याकडे आवडत नाही.

हे मनापासून आवडले :)

नीधप's picture

28 Feb 2009 - 8:14 pm | नीधप

>>भय्या व बिहारींच्या आक्रमणामुळे आताही महाराष्ट्रीयांनी हेच करण्याची पाळी आली आहे<<
वेळ आली? झालंय की सुरू तसंही. अमेरीकेच्या दिशेने.

डिसेन्सी बद्दल त्यांनीच मला सांगितले. आणि खरच त्या लग्नातला साधेपणा (दिल्लीतल्या इतर लग्नातल्या गाजावाजाशी तुलना करताना...) वेगळा जाणवण्यासारखा होता. अगदी आपल्याकडच्यासारखा

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

शितल's picture

28 Feb 2009 - 8:41 am | शितल

लेख आणी त्यावरिल प्रतिसाद माहिती पुर्ण आहेत.
:)

रामदास's picture

28 Feb 2009 - 8:53 am | रामदास

आणि स्थलांतरातून होणार्‍या मिश्र जातीसंबधी विसरलोच.अँग्लो इंडीयन ही त्यातल्या त्यात नवी मिश्र जमात.देसी बाई आणि गोरा साहेब यांची वंशावळ.आधी जास्त करून रेल्वेत कामाला असायचे.
इच्छुकांनी भोवानी(भवानी )जंक्शन कादंबरी वाचावी किंवा सिनेमा पहावा.खूप छान कथा आहे.ऍग्लो इंडीयन समाज आणि सत्तेचे स्थलांतर याचे वर्णन आहे.लेखक :जॉन मास्टर्स.चित्रपटाची नायीका आवा(ऍव्हा) गार्डनर आहे.

http://www.youtube.com/watch?v=y3LQE5eTLU8

अनुजा's picture

28 Feb 2009 - 10:18 am | अनुजा

फारच चांगला लेख /विषय आहे. बरीच नवीन माहिती कळली.
अनुजा

त्यावरच्या प्रतिक्रियाही खुप वाचनिय आहेत. अजुन माहिती वाचायला आवडेल.
वेताळ

विनायक प्रभू's picture

28 Feb 2009 - 12:15 pm | विनायक प्रभू

सुंदर लेख. खुपच आवडला

विनायक प्रभू's picture

28 Feb 2009 - 5:05 pm | विनायक प्रभू

सारस्वत मुळ बंगालचे

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Feb 2009 - 12:40 pm | बिपिन कार्यकर्ते

सुनील, चांगलं लिहिलंय.

कार्ल्याची देवी - कोळी, आंबेजोगाईची देवी - कोब्रा, बालाजी - देब्रा.... हे सगळे संबंध मलापण नेहमी गूढच वाटत आले आहेत. एखादा समूह कुठून कुठे स्थलांतरित होतो. आणि इतका वेळ जातो की सामूहिक स्मरणशक्तीतून काही गोष्टी (उदा. मूळ स्थान) बाद होतात पण काही गोष्टी (उदा. देवता वगैरे) बाद होत नाहीत. हेही एक गूढच. भारतातच नव्हे तर जगभरात अशी खूपच उदाहरणं दिसतात.

मला सापडलेली अशी २ उदाहरणं.

नवायत

सौदी अरेबिया मधे असताना या लोकांचा संपर्क आला. उत्तर कर्नाटकातील भटकळ भागात यांची मुख्य वस्ती. इतर भागात पसरलेले. धर्माने मुसलमान. परिसरातील इतर मुसलमानांपासून अगदी वेगळे. दिसायला, बोलायला, वागायला.... सगळ्याच बाबतीत. यांचे मूळ अरबस्तानात. अरबी व्यापारी इथे आले आणि इथेच वसले. त्यांचे वंशज ते हे नवायत. काही नवायत ओळखीचे झाले होते. जालावर शोधले असता हे मिळाले. http://en.wikipedia.org/wiki/Nawayath

मालाणा

हिमाचल प्रदेशात 'मालाणा' नावाचं एक गाव आहे. बाकीच्या जगापासून एकदम तुटलेलं. स्वत:चे कायदे कानून असलेलं. ते कायदे तोडले तर कडक शिक्षा... बाहेरच्या लोकांना सुद्धा. हे लोक मूळ अलेक्झांडरच्या सैन्यातले सैनिकांचे वंशज असल्याची एक आख्यायिका आहे. अजूनही काही आख्यायिका आहेत. पण हे लोक आजूबाजूच्या इतर लोकांपासून पूर्णतः वेगळे आहेत हे नक्की.

http://en.wikipedia.org/wiki/Malana,_Himachal_Pradesh

बिपिन कार्यकर्ते

नीधप's picture

28 Feb 2009 - 1:40 pm | नीधप

असं म्हणतात की कर्नाटकातला जो कुर्ग प्रांत आहे तिथले लोक हे अलेक्झांडरच्या वेळेस राहून गेलेले ग्रीक लोक जे दक्षिणेपर्यंत पोचले आणि तिथे स्थिरावले त्यांचे वंशज आहेत. कुर्गी लोकांची अंगकाठी आणि चेहरेपट्टी इतर कानडी लोकांपेक्षा वेगळी असते हे नक्की.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

नीधप's picture

28 Feb 2009 - 1:40 pm | नीधप

असं म्हणतात की कर्नाटकातला जो कुर्ग प्रांत आहे तिथले लोक हे अलेक्झांडरच्या वेळेस राहून गेलेले ग्रीक लोक जे दक्षिणेपर्यंत पोचले आणि तिथे स्थिरावले त्यांचे वंशज आहेत. कुर्गी लोकांची अंगकाठी आणि चेहरेपट्टी इतर कानडी लोकांपेक्षा वेगळी असते हे नक्की.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

सहज's picture

28 Feb 2009 - 1:25 pm | सहज

अतिशय छान विषय, लेख व प्रतिसाद. मस्त वाचनीय लेख.

ढ's picture

28 Feb 2009 - 5:00 pm |

लेख तर छान आहेच पण प्रतिसादांमधून सुद्धा नवनवीन माहिती मिळत आहे.

अवांतर प्रतिसाद नाहीत. :D

विसुनाना's picture

28 Feb 2009 - 6:00 pm | विसुनाना

भटक्या, विमुक्त जातींमध्ये मोडणारी 'वंजारी' अथवा 'लमाण' ही जमात इ.स. ११०० मध्ये राजस्थानची रहिवासी होती. इतिहासाप्रमाणे गझनीच्या महमदाच्या आक्रमणानंतर ते तेथून निघाले आणि जगभर पसरले.
याच जमातीच्या एका शाखेला युरोपमध्ये रोमानी म्हणून ओळखले जाते.

एखादा स्वतंत्र लेख लिहावा इतकी माहिती उपलब्ध आहे.

रामदास's picture

28 Feb 2009 - 10:10 pm | रामदास

त्यात परत एन.टी २ आणि एनटी.३ असा फरक आहे.
एन.टी.३ आपल्या चांगल्या परीचयाची असेल.त्यांची आडनावे मुंढे, आंधळे,ढाकणे,वगैरे.
एन.टी= नोमेडीक ट्राईब.

ब्रिटिश's picture

28 Feb 2009 - 10:01 pm | ब्रिटिश

सुनीलभो चांगला ईशय
जल्ला आमाना पन सोताबद्द्ल जास्त नोलेज नाय ! आजून काय आसल त येवदेत

मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

चतुरंग's picture

1 Mar 2009 - 8:15 am | चतुरंग

सुनीलराव तुमच्या चौकस विचारातून स्फुरलेला छोटेखानी परंतु माहितीपूर्ण लेख आवडला.
प्रतिक्रियांमधून चर्चा होत होत अधिकाधिक माहितीची भर आपसूक पडत जावी आणि नवनवे प्रश्न आणि माहिती समोर येत जावी ह्यातच लेखाचे यश आहे!

बर्‍याच कोकणस्थांची देवी "अंबेजोगाई" आणि खूपशा देशस्थांचा "बालाजी" हे मलाही पडलेले कोडे आहे पण त्यावर कधी फार खोलात शिरलो नाही आता नक्कीच शिरेन! ;)

अहमदनगरलाही कोंगाडी म्हणून ओळखले जाणारे कोष्टी किंवा विणकर समाजातले लोक आहेत. हे मूळचे तेलुगू आहेत. गेल्या अनेक पिढ्या अहमदनगरला काढल्याने ते मराठी उत्तमच बोलतात. त्यांची घरगुती भाषा तेलुगूशी साम्य दाखवते. ह्या लोकांचे वैशिष्ठ्य म्हणजे कलाकार लोक असतात. अगदी लहान लहान मुलांचे हस्ताक्षर सुद्धा इतके वळणदार आणि देखणे बघितले आहे की थक्क व्हावे. हस्ताक्षर/चित्रकला स्पर्धेची बक्षिसे हमखास पटकावणार! चित्रकला, मूर्तिकला, कापडावरची छपाई, विणकामातले कौशल्य जणू उपजतच असावे ह्या समाजात असे वाटते.
अडगटला, नडीमेटला, संदुपटला अशाप्रकारची आडनावे आढळतात (हे महाराष्ट्रातल्या पाषाणकर, पुणेकर सारखे गावाशी संबंधित असावे असे वाटते.)

चतुरंग

गुंडू साडीचा हट्ट पुरवला नाही का अजून ?

अजय भागवत's picture

1 Mar 2009 - 8:31 am | अजय भागवत

new

असेच स्थलांतर चालुक्य राजाच्या काळात झाले होते. त्याबद्दल मी विकिवर वाचले होते पण आज मला ती लिंक सापडली नाही. बदमि शहराचा इतिहास मला वाचायचा होता तेव्हा खूप महत्वाची माहिती विकिवरुन मिळालि. त्यावरुन मला असे कळाले की, चालुक्य राजाच्या वंशातील एक शाखा जी बदामी शहरात वसलि होती त्यांचे संबंध सातवाहनाशी आल्यानंतर (कोणाची मुलगी कोणाकडे विवाहबंधनातुन सासरी गेली- आता आठवत नाही व तो आत्ता दुवा सापडला नाही) बदामितुन अनेक लोक देवगिरि, जुन्नर भागात आले. त्यात अनेक स्तरावरचे लोक होते.
आपल्याला अनेक मराठी आडनांवं आत्ताच्या कर्नाटकात व महाराष्ट्रात सारखीच दिसतात हे त्यामागचे कारण असावे.

चित्रा's picture

1 Mar 2009 - 9:58 am | चित्रा

मागे कधीतरी मोठा थोरला मराठी ग्रंथ हाती लागला होता, दुर्दैवाने ग्रंथाचे नाव आणि काहीच आठवत नाही. लेखक सातवळेकर किंवा असेच काही होते का असे वाटते (पण आठवत नाही). परंतु त्यात सर्व जातींची वैशिष्ट्ये आणि ते लोक मूळ कुठून आले असतील त्यासंबंधीचे तर्क होते असे आठवते. ग्रंथाची माहिती असल्यास जाणत्यांनी प्रकाश पाडावा.

लिखाळ's picture

1 Mar 2009 - 4:21 pm | लिखाळ

भारतीय संस्कृतीचा इतिहास या नावाचे सातवळेकरांचे एक पुस्तक पाहिलेले समरते (वाचलेले नाही.)

सुनिलराव,
आपला लेख छानच आहे. आणि प्रतिसाद सुद्धा भारी. ही सर्व चर्चा पुन्हा एकदा निवांत वाचाविशी वाटते आहे.
-- लिखाळ.

सुनील's picture

3 Mar 2009 - 11:39 am | सुनील

अपेक्षेप्रमाणेच मूळ लेखापेक्षाही काही प्रतिक्रियांमधून अधिक रोचक आणि उद्बोधक माहिती मिळाली. किंबहुना, कुतुहल जागवणे हाच या लेखाचा मूळ हेतू असल्यामुळे, तो बर्‍याच प्रमाणात यशस्वी झाला असे म्हणायला हरकत नाही.

मानवी स्थलांतरांचे मुख्य्त्वे तीन भागांत वर्गिकरण करता येईल -
१) घाऊक स्थलांतर - ज्यात एखादा समाज संपूर्णपणे आपल्या मूळ स्थानापासून दूर होऊन अन्यत्र जातो.
२) किरकोळ स्थलांतर - ज्यात समाजाचा एखादा हिस्सा वेगळा होऊन दुसरीकडे जातो आणि मूळ समाजाशी त्याचा फारसा संबंध न उरलेल्यामुळे, एक वेगळा समाज म्हणून उदयास पावतो.
३) वैयक्तिक स्थलांतर - यांना सांप्रतच्या मराठीत "अनिवासी" असा शब्द आहे!!!

समाज हा व्यक्तींचा बनलेला असला तरी, एखाद्या व्यक्तीला लागू होणारे गुणविशेष समाजाला लागू होतातच असे नाही. म्हणूनच, वरीलपैकी तिसरा प्रकार हा वैयक्तिक स्थलांतराचा असल्यामुळे समाजाच्या स्थलांतरात मोडत नाही.

स्थितिशीलता हे समाजाचे वैशिष्ठ्य. अगदी न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या गृहितकाचा आधार घेऊन असे म्हणता येईल की, जोवर कोणतीही बाह्य शक्ती (अवर्षण, जुलुम्-जबरदस्ती, परकीय आक्रमण इ) कार्य करीत नाही, तोवर समाज ढिम्म हलत नाही!!!

सातवळेकरांच्या पुस्तकाचा उल्लेख वर आलाच आहे पण मला वाटते अत्रे यांच्या (आचार्य नव्हेत) गावगाडा ह्या पुस्तकातूनही बरीच रोचक माहिती मिळू शकेल. ही दोन्ही पुस्तके वाचण्याची इच्छा आहे, बघू या कधी योग येतो.

चर्चेत भाग घेतलेल्या सर्वाचे आभार!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नीधप's picture

3 Mar 2009 - 12:43 pm | नीधप

गावगाडा - आत्रे (अत्रे नव्हेत)
पुस्तक एक सर्वसाधारण जातींचा अंदाज येण्यासाठी उत्तम आहे. अगदी आजचा अभ्यास करायचा झाल्यास इतिहासात कुठल्या प्रथेचे मूळ कुठे आहे ह्याचा पर्स्पेक्टिव्ह यायला मदत करणारे आहे.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

प्रकाश घाटपांडे's picture

3 Mar 2009 - 1:16 pm | प्रकाश घाटपांडे

मटा ने निवडलेल्या उत्तम १५० पुस्तकात त्रिंबक नारायण आत्रे यांचे गावगाडा आहे. वरदा बुक्स ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
कुमार केतकरांनी इथे त्याचा परिचय दिला आहे
मुक्त सुनीत ने हे पुस्तक वाचले आहे.
आता आपल्याला गावगाडा ई बुक स्वरुपात भविष्यात वाचता येईल. इथे पहा
खुप सुंदर पुस्तक आहे.

प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.