स्थलांतरे - घाऊक आणि किरकोळ
लेखनप्रकार
लहानपणची गोष्ट आहे. कुठल्याशा सुटीत एका कौटुंबिक सहलीसाठी लोणावळ्याला जाणे झाले होते. विविध स्थलदर्शनांच्या यादीत "कार्ले" येथिल लेण्यांचा समावेश होताच. तेथिल एकविरा देवीच्या मंदिरात गेल्यावर माहिती कळली की, ही कोळी समाजातील लोकांची देवता. मला कुतुहल वाटले. कोळी समाज हा समुद्रकिनार्यावरील. मग त्यांची देवता अशी समुद्रकिनार्यापासून इतकी दूर, अगदी घाटापलिकडे देशावर कशी? वडिलधार्यांना विचारले पण कोणाकडेच समाधानकारक उत्तर नव्हते. आजही नाही. अनेक अनुत्तरीत प्रश्नांच्या ढिगार्याखाली ते कुतुहल आजदेखिल पडून आहे!
मिपावर मराठीच्या अनेक बोलींतील लेखन वाचायला मिळते. त्यात एक आहे आगरी बोली. अगदी बालपणापासून बर्याचदा कानावर पडलेली ही बोली. माझे वडिल ज्या कारखान्यात काम करीत तेथिल बरेच कामगार आगरी. त्यांचे घरी येणे-जाणे होत असे. तशी ती मंडळी आमच्याशी अगदी प्रमाणित मराठीत बोलायचा प्रयत्न करीत पण त्यांचा तो एक विशिष्ठ आगरी हेल काही लपत नसे. फार गोड वाटे ऐकायला.
नुकतेच वाचनात आले. १३ व्या शतकात देवगिरीचा पाडाव झाला आणि त्याच सुमारास पैठण प्राताचा सुभेदार असलेला बिंब राजा पैठण सोडून उत्तर कोंकणात आला. तेथे त्याने आपले राज्य स्थापले. महिकावती (केळवे-माहिम) ही त्याने वसलेली राजधानी. पैठणहून येताना बिंब राजाने काही लोकसमुहच्या समूह कोकणात स्थलांतरीत केले. त्यातील दोन प्रमुख लोकसमूह होते - आगरी आणि पाठारे प्रभू!
मूळच्या मराठवाड्यातील ह्या दोन जमाती आज मुंबई परिसरात पूर्णपणे मिसळून गेल्या आहेत. इतक्या की, मूळस्थानाशी त्यांचा काही संबंधच उरलेला नाही!
इ.स.पू ९ ते ६ या शतकात असीरीयन साम्राज्य पार इराणपासून इजिप्तपर्यंत पसरले होते. ह्या असीरीयन राजांचे वैशिष्ठ्य म्हणजे साम्राज्यांतर्गत विविध लोकसमुहांची जबरदस्तीने घडवलेली घाऊक स्थलांतरे. भारतातील एक बिंब राजा सोडला तर, अशी घाऊक स्थलांतरे घडविणारा राजा झाला नसावा!
अलिबागहून मुरुड-जंजिर्याकडे जाताना वाटेत रेवदंड्याची खाडी लागते. ती पार करून, मुरुडला जाण्यासाठी उजवीकडे वळले, की पहिलेच गाव लागते - कोरलई.
मुरुडकडे सुसाट न पळता थोडे ह्या गावात रेंगाळा. फार मजेशीर गोष्टी समजतील. हे गाव बहुतांशी ख्रिस्ती. गावकर्यांचा तोंडावळादेखिल थोडा वेगळा. आणि भाषा? ती तर फारच वेगळी!! म्हणजे तुमच्या-आमच्याशी अगदी व्यवस्थित मराठीत बोलतील पण आपापसात ती मंडळी काय बोलतात याचा तुम्हाला थांगपत्ता लागणार नाही! कारण ती भाषा आहे जुनी पोर्तुगिज - मराठी मिश्रित.
चौल ही चिमुकली पोर्तुगिज वसाहत. १६८३ साली संभाजी महाराजांनी एका झडपेत चौल काबीज केले. त्यावेळी चौलमधिल काही पोर्तुगीज कुटुंबे जीव वाचवण्यासाठी खाडी ओलांडून कोरलईला आली आणि तिथेच स्थायिक झाली. उत्तरेला वसई आणि दक्षिणेला गोवा येथे मोठ्या पोर्तुगिज वसाहती होत्या पण त्यांचा कुणाशीच संबंध राहिला नाही आणि एक चिमुकला पण वेगळाच समाज निर्माण झाला!
कोकण किनार्यावर असे बरेचदा घडले. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी इस्रायलहून आलेले ज्यू नागावच्या किनार्यावर येऊन थडकले तर इराणहून आलेले पारशी संजाणच्या किनार्याला लागले. आपल्या मूळ स्थानापासून दूरावलेले हे समाज नव्या ठिकाणी अगदी पूर्णपणे रुजले - फेरलावणी केलेल्या पिकासारखे!
वाचन
22874
प्रतिक्रिया
0