ग्राम"पंचायत" लागली..!! -2

विशुमित's picture
विशुमित in जनातलं, मनातलं
23 Sep 2017 - 2:57 pm

<a href="http://www.misalpav.com/node/40963" title="ग्राम&quot;पंचायत&quot; लागली..!! -1">ग्राम"पंचायत" लागली..!! -1</a>

यंदा बिनविरोध होणार नाही, हे माझ्या अगोदर नानांनी त्या होलपाटण्या मन्याला का सांगितले असावे?
घरातल्या माणसांना किंमतच नाही दिली कधी नानांनी. कधी कोणासमोर चांगल्या कामाचे कवतुक नाही केले. स्वतःला सांगलीच्या आबांचे पाईक समजत राहिले आयुष्यभर. वडाच्या झाडाखाली रोपटे येत नाही हे मान्य पण कोणालाच वर येऊन नाही द्याचे, असे एकंदरीत वडाचे लॉन्ग टर्म धोरण असावे बहुतेक.
कधीच कुठल्या मिटिंग मध्ये सहभागी होऊ नाही दिले. गावाच्या, सोसायटी, कारखाना, झेड पी नोव्हे नोव्हे आमदारकी आणि खासदारकी निवडणुकीच्या सुद्धा बैठका गोठ्यातल्या खोलीत होत असत. पण पहिल्यापासून आम्ही फक्त सतरंजी टाकायला, लोकांना चहा-पाणी देयाला. एकदम क्लीन श्वेड वेटर.
मांडीपासून पंज्यापर्यंत गयच्या मुतारीने मिठाची ओघळ आलेली आणि पिंडरीपर्यंत बॉटम फाटलेली पॅन्ट घालणारा 'पम्या' सारख्या येड्या भोकांनी आम्हाला लांबूनच बोटाने फर्मान सोडायचे, 'पाव्हणे इकडे आना चहा.'
पम्या: " काय फळकावणं बनवलाय. दुदु नव्हतं का? १० एकर शेती आहे लका तरी २ जनावरं सांभाळता येईना याना. लोक पाच पांडात १० गुरांचा गोठा चालवतात.
दुसरा: "नाना सारखं कुठलं जमायला यांना. गुंठा गुंठा इकून खातील." लय कूचकं बोलला.
पम्या: " धोतार गेल्यावर यांचं कसं होयचं, देव जाणे."
आम्ही: " नाना अजून २०-२५ वर्ष काही जात नाहीत. त्यामुळे आमची नका काळजी करू. का उगाच त्यांच्या मरणावर टपला आहात?".
खिडकीतून एकदम वीज चमकली. ३ वर्षापूर्वीचा प्रसंग आठवून अंगावर पाल पडल्यासारखं वाटलं.
माझ्याशी अरे तुरे सहसा कोणी बोलत नसे. नानाचा तेवढा दराराच होता म्हणा. बाकी नानांची घरगुती वातावरणामध्ये एकदम मित्रासारखी वागणूक होती. त्यात त्यांनी त्यांची जवळपास ७५% जमीन माझ्या नावावर करून टाकली होती. पण राजकारण आणि समाजकारणातच नाना माझ्याशी असे का वागत आले हे अजून तरी समजलं नाही.
टूग काही वाजले नव्हते बराच वेळ. डेटा बंद केला आणि पांघरून घेतले. पाऊस ढसाढसा रडत होता.
-----
नाना (उर्फ माउली) : वय वर्ष ७४. एकदम खंग्री माणूस.
त्यांच्या वडिलांनी भोपळ्याच्या वेलाची पाने खाऊन पन्नाससाठ एकर जमीन आणि गुळाचे गुराळ कमावलेले.
४ भावामध्ये नाना ""कारभारी"". नुसतं घरातच नाही पण अख्या गावाचं कारभारी. त्यांचे सगळं काम पण लय भारी.
१७ वर्षाचे असताना निरेतून गुळाच्या व्यापाऱ्याकडून पैसे उचलून थेट मुंबई गाठली आणि येझदी बुक केली होती. पंचक्रोशीतली पहिली येझदी. ती वापरल्यावर नंतर बुलेट घेतली होती. १० गावात ती पण पहिलीच होती. सध्या बटन-स्टार्ट होंडा डिलक्स वापरतात.
पूर्वी गावात इस्त्रीचे कपडे वापरणारा एकमेव फकड्या. पेहराव कडक टोपी, कडक नेहरू आणि कडक धोतार. बुल्लेटला किक मारली की अख्या वाडीच्या तोंडात एकच वाक्य," धोतार निघालं दिल्लीला". अगदी किसनराव बाणखेलेंसारखी देहयष्टी (दाढी विना).
तरुणपणात नांगर सोडला की पहिल्या धारेची हाणायची हा नित्यनेम.
तवलीने ने चहा प्यायचे आणि कचाच गांजा खायचे.
म्हातारीवर लय जीव होता पण ती पोरगा नाही देऊ शकली.( ४-५ वर्षा पूर्वी गेली बिचारी.)
फक्त एकच मुलगी. आयुष्यात फक्त एकच सल! एकतरी पोरगा पाहिजे होता.(अजून पण ही सल आहे)
पोरगी अगदी मोठ्या खानदानात दिली होती. मग काय नाना एकदम मोकळा झाला. सगळ्या गावाची धुनी धुवायला वेळच वेळ होता. नानांनी ती धुतली सुद्धा! कामाचा नुसता धडाकाच लावला होता.
सगळा भारत पालथा घातला. फक्त विमानात बसायची इच्छा राहिली आहे.
४० वर्षापूर्वी पोरीच्या सासरी एका महाराजांनी अनुग्रह दिला. पोरगा पाहिजे असेल तर मांसाहार-दारू सोडा, माळ घाला आणि अखंड सप्ताह हरिनाम सप्ताह चालू करा. त्याकाळात सप्त्याच वारें नवीनच होतं. स्वखर्चाने कार्यक्रम चालू केला.
अनुग्रह दिलेला महाराज लफ़डीकेशन मध्ये सापडला म्हणून त्या गावातील लोकांनी त्याला हाकलून दिला. पण नानांनी त्याला दिलेला शब्द अजून पाळला आहे. गेली ३९ वर्षा सप्ताह अविरत चालू आहे. नानांनी उत्तरकाळात २-३ लफ़डीफाईड बुवांचे पुनर्वसन करून त्यांना माणसात आणले आहे.
""बुवा तिथे बाया, आणि बाया तिथे परमेश्वर ..!!"" चालायचे.
नाना आता ज्ञानदेव कचऱ्याचे """माऊली"" कचरे झाले होते. नानांनी पंचक्रोशीत आदर मिळवला होता. कचरेवस्ती साठी नानाचा शब्द शेवट होता. देवमाणूस ही बिरुद त्यांना चिकटले होते.
माळ घालून, सप्ताह करून पण पोरगा काही झाला नाही. माऊली माऊली..!!
मी ३ वर्षांचा असताना पोरीकडून मला उचलून आणले.
माझ्यासाठी नाना अन आजीच आईबाप..!!
-----
गाव अगदी छोटे. २५०० टाळक्यांचं. २० वर्षांपूर्वी सोमयाच्या करंज्यातून जी १२ गावं फुटून वेगळी झाली होती. त्यातला हा एक तुकडा. अडीच वर्षासाठी नाना गावाचे पहिले सरपंच होते. त्यानंतर सलग १८ वर्ष फराटे किंवा फराटे पुरस्कृतच सरपंच झाले.
३५ % लोकसंख्या फराट्यांची म्हणून त्या आडनावाने गावाचे नाव पडले होते. ""'फराटेवाडी."".
आता हा तुकडा ३ गटात विभागला आहे.
गट नंबर १ आणि २ हायवेच्या एका बाजूला आणि ओढ्याने विभागलेला. तिसरा गट रस्त्याच्या पल्याड.
गट नंबर-१: फराटेवाडी गावठाण.
गट नंबर-२ : कचरेवाडी (३३% लोकसंख्या). नावाप्रमाणे सगळी याच आडनावाची. कचरे (आगवडोदके)..!
कचरे आणि फराटे दोन्ही ओबीसी.
गट नंबर ३: ब्राह्मण- मराठ्यांची प्रत्येकी ३-३ घरे. (टोटल ८%), धनगर समाज (२०%) आणि बाकी उरले सुरलेले सगळी खिचडी.
ऑफिसमध्ये बसल्याबसल्या मी सगळा डेटा तयार केला होता. तसा मला या डेटाचा काहीच फायदा नव्हता म्हणा.
खरी फाईट गट नंबर १ आणि २ चीच पण जिंकणार कोण हे ठरवणार मात्र गट नंबर ३.
----
शुक्रवार:
७.३० वाजल्या होते. बायको तोंडावरच पांघरून ओढून म्हणाली, " ऑफिस ला जायचं नाही का आज?"
"आय घालू दे ते ऑफिस. रात्री भिजल्याने अंग ठणकतंय सगळं."
ती," आजकाल शिव्या खूपच वाढल्या आहेत आपल्या. गावाचं पाणी लागले वाटतं परत. ते पुण्याला होतो तेच बरे होते. आपण आता जबाबदार हुद्द्यावरती आहात हे विसरू नका. गावटीपणा सोडा आता."
कसनुसं हसून आम्ही थेट ब्रश घेऊन संडासात. ब्रश दात घासायचा बरका.
बाहेरून आवाज," गावठी ते गावठीच. टॉयलेट मध्ये ब्रश करू नकोस, तोंडात जंतू जातील". आम्ही कहणून," काय नाय होत".
आमचे लग्न ठरले तेव्हा नानांनी संडास बांधून घेतलं होतं. नातसून शहरातली होती ना!
अनुदान पण लाटले होते. सरकार माय बापच म्हणायचे. संडास कोठे करायची यासाठी पण अनुदान देती आहे. राम्राज्यच म्हणायचं!
पण बऱ्याच जणांनी अनुदान लाटण्यासाठी आणि अधिकाऱ्यांना दाखवण्यापुरतीच संडास बांधली होती.
इन्स्पेक्शन झाल्यावर कोणी त्यात पेंडीची पोती ठेवली, कोणी कोंबड्या डाल्या तर कोणी शेरडीची करडे कोंडली.
संडासच्या भांड्यातच कोंबड्या आणि करडांना दाणा-पाण्याची सोय करून ठेवली जाऊ लागली.
कागदोपत्री मात्र गाव हागणदारी-मुक्त झाले होते. पण हागणदारी मुक्त होती आणि मुफती देखील. हे ही नसे थोडके म्हणा..!
जवळपास सगळ्यांना शौचालय असल्याचं दाखला मिळाला होता.
इच्छुकांना आता फक्त जातीचा आणि जात पडताळणीचा दाखला एवढेच दिव्यं पार करायचे होते.
----
२ प्यानल ची कुणकुण लागली होती. कुणकुण काय हेच २ प्यानल असणार हे पम्या सारख्या शेम्बड्या पोरालापण ठाऊक होतं.
या निवडणुकीला दोन्ही प्यानलचे म्होरके फराट्यांचेच.
पहिला प्यानल दाढीवाल्यांचा. ह्या प्यानलचे पाचीही पुढारी दाढीवाले.
दुसरा प्यानल संग्राम फराट्याचा. काँग्रेस मध्ये जसा राहुल गांधी तसा हा ह्या प्यानलचा तो दाढीवाल्यानी हेटाळलेला "पप्पू" होता.
वारसा हक्काने नेतेपद मिळाले होते.
तसा तरुण, धडाकेबाज आणि तेवढाच मायाळू. जीभ मात्र दुस्या बैलाच्या सैल सोडलेल्या कासऱ्यासारखी. त्यामुळे आगावूपणा पांढऱ्या खादीच्या कपड्यावर उठून दिसत होता. अगाव बोलणे कोण सहन करतं म्हणा आणि आजकाल कोणीच स्वतःला कमी पण मानत नाही.
त्यात जनतेला घराणेशाही नको झाली होती.
दाढीवाल्यानी ही बाब चांगलीच ओळखली होती.
ह्या राजपुत्रापेक्षा लोकांना हे टोळीवाले जिवाभावाचे वाटू लागले होते.
फक्त सगळ्यांचं लक्ष नाना कोणत्या प्यानल मध्ये जाणार ही उत्सुकता होती.
नानांनी संग्रामची बाजू घेतली होती....!!
कचरेवस्तीमध्ये दुफळी पडली.
----
क्रमश:

समाजअनुभव

प्रतिक्रिया

मार्मिक गोडसे's picture

23 Sep 2017 - 3:13 pm | मार्मिक गोडसे

अगदी किसनराव बाणखेलेंसारखी देहयष्टी (दाढी विना).

खेड मंचरचे का?

विशुमित's picture

23 Sep 2017 - 3:19 pm | विशुमित

हो 'खेड मंचर' चेच. मोरे सरांना आस्मान दाखवणारे.

भारीच लिहलंय..हे वाचून आमच्या गावच्या निवडणुकीची आठवण आली ... गावचं राजकारण लय वंगाळ ...
लिहा अजून विशेष म्हणजे नानांचं व्यक्तिचरित्र वाचाय आवडेल.

विशुमित's picture

23 Sep 2017 - 3:57 pm | विशुमित

दादा खूप खूप धन्यवाद ..!!

निकाल लागे पर्यंत नानाच असतील बहुतेक प्रत्येक ठिकाणी.

पगला गजोधर's picture

23 Sep 2017 - 4:52 pm | पगला गजोधर

काकडे पवार निंबाळकर कोणाचा इन्फ्लुअन्स नाही पॅनेल वर ?

बा द वे- लेखमाला वेगळी व छान

पगला गजोधर's picture

23 Sep 2017 - 4:54 pm | पगला गजोधर

आणि obc फॅक्टर आहे तर, जानकर/मुंढे/भुजबळ/तटकरे/फरांदे कोणाचं मार्गदर्शन नाही ????

विशुमित's picture

23 Sep 2017 - 5:00 pm | विशुमित

गावच्या राजकारणात बाहेरचा प्रभाव लोक सहसा मान्य करत नाहीत. म्हणून तर ग्रामपंचायत निवडणुकीची मजा कुछ और अस्तेय..!!

पैसा's picture

23 Sep 2017 - 4:57 pm | पैसा

मस्त रंगतेय कथा. हल्ली मिपावर दुर्मिळ झालाय हा प्रकार! :)

पैसा ताई तुमच्यासारख्यांचा एवढा पाठिंबा असल्यावर "घासून नाही तासून येणार ".

धन्यवाद..!!

पैसा's picture

23 Sep 2017 - 5:27 pm | पैसा

_/\_

अभिजीत अवलिया's picture

23 Sep 2017 - 6:24 pm | अभिजीत अवलिया

मस्त कथा...

एस's picture

23 Sep 2017 - 6:51 pm | एस

वाचतोय. पुभाप्र.

नाखु's picture

23 Sep 2017 - 9:43 pm | नाखु

फर्मास पान जमवावं तसं खंग्री लिखाण

शेरातला नाखु

विशुमित's picture

25 Sep 2017 - 10:24 am | विशुमित

धन्यवाद नाखु जी ..!!

संग्राम's picture

23 Sep 2017 - 10:38 pm | संग्राम

मस्त जमला आहे है भाग पण

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Sep 2017 - 12:06 am | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं रंगत चालली आहे कथा... गावरान कोंबडीसारखी !

जेम्स वांड's picture

24 Sep 2017 - 8:28 am | जेम्स वांड

कसनुसं हसून आम्ही थेट ब्रश घेऊन संडासात. ब्रश दात घासायचा बरका.

लैच बेक्कार हसलोय देवा ह्या खुलाश्यावर .:D:D:D:D

हा खरोखरी घडलेला खुलासा आहे.

मस्त लिहिताय.. वाट बघतोय पुढच्या भागाची..

विशुमित's picture

24 Sep 2017 - 11:55 pm | विशुमित

अभिजीत जी, एस जी , म्हात्रे सर, संग्राम जी, शलभ जी, खूप खूप धन्यवाद...!!
लवकरच टाकतो पुढील भाग.

वरुण मोहिते's picture

25 Sep 2017 - 4:31 pm | वरुण मोहिते

सही लिहिता ..पॅनल उभे राहिले कि माझ्यासमोर माळेगाव (बु) चे , माझ्या आठवणीतले ,. बारामतीतले . अगदी सेम वर्णन

विशुमित's picture

25 Sep 2017 - 4:47 pm | विशुमित

धन्यवाद मोहिते साहेब..!!

कथा लिहण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. तुम्हा सर्व मिपाकरांच्या प्रोत्साहनाने मी भारावून गेलो आहे.

पुनःच्च सर्वांचे आभार मानतो.

एकच लंबर लिहिलंय विशुपाटील.
कॅरेक्टर खंग्री उभे केलंय अगदी.
तुम्ही लिहित जावा हो रेग्युलरली. ऑब्झरवेशन दांडगेय तुमचे.

विशुमित's picture

25 Sep 2017 - 6:05 pm | विशुमित

थँक्यू थँक्यू अभेंद्र जी..!! ...

सिरुसेरि's picture

25 Sep 2017 - 8:17 pm | सिरुसेरि

हाही भाग मस्त . पॅनलला शुभेच्च्छा . पुभाप्र .