“मी पुन्हा सायकलिंग सुरु करणार आहे!" (भीत भीत) अस्मादिक.
“उत्तम कल्पना! चांगलीशी सायकल घे आणि सुरु कर.” तीर्थरूप. (चेहऱ्यावर sadist हसू)
“शाळेत पण नाव घालूया का?” सौ.
“किती पैसे उडवणार आहेस?” मातोश्री.
“साधारण १५ - २० हजार" (पडलेल्या आवाजात) मी.
“एवढे? त्यापेक्षा बँकेत ठेव!” (अर्थातच) मातोश्री.
“त्यापेक्षा घरी टीव्ही घे!” (फणकाऱ्याने) सौ.
===============================================================================
काही दिवसांपूर्वी एका रविवारी दुपारी जेवणानंतर आमच्या घरी झालेला हा सुखसंवाद. भरल्या पोटी घरच्या दोन्ही अनाहिता सहज रुकार देऊन टाकतील अशा समजुतीने मी माझा मनसुबा मांडला, आणि पुढल्या काही दिवसांच्या कोल्ड वॉर ची सोय करून टाकली.
===============================================================================
कुठल्याही सामान्य मुलाप्रमाणेच शाळकरी वयात मला सायकलीचं वेड लागलेलं. आधी दासन आणि मग हर्क्युलिस वर मी मनसोक्त भटकायचो. शिवाय फाफे सारखी माझी पण हडकुळीच असल्याने मित्रांवर शाईन मारायचो. शाळा आणि क्लास ला तर सायकलशिवाय जाण्याचा विचार करणंही अशक्य होतं तेव्हा. शिवाय मी आणि माझे मित्र सायकलींवरून दहिसर-बोरीवली भागात उंडारत असायचो, ते वेगळच.
पुढे कॉलेज ला गेल्यावर सायकल चालवणं कमी झालं. बायकांचा, म्हणजे बाईक्स चा, छंद लागला. सायकल नुसतीच उभी होती, म्हणून ती पण कुणाला तरी देऊन टाकली. सायकलीचे दिवस संपले…
… असा माझा गैरसमज होता. वस्तुस्थिती लौकरच ध्यानात आली. भले स्वत:ची नसली, तरी मित्रांच्या आणि त्यांच्या धाकट्या भावांच्या सायकली बघितल्यावर चालवल्याशिवाय चैन पडत नसे. म्हणून हौसेने पुन्हा एकदा सायकल घेतली. हिरो ऑक्टेन! एव्हाना शिक्षण संपून चाकरी सुरु झालेली. हौसेने चारचाकी पण घेतलेली. तरीही माझं मन सायकलवर बसलेलं!
आणि अवघ्या तीन महिन्यात माझी नवी सायकल चोरीला गेली. पोलिसात तक्रार वगैरे देऊन झाली; पण काही फायदा झाला नाही. आणि मी एवढा नाराज झालो, की पुढली जवळपास ५ वर्षं सायकल घ्यायचा विचारही केला नाही.
===============================================================================
अलिकडेच, म्हणजे गेल्या एक सहा-सात महिन्यांपूर्वी “सायकल सायकल” नावाच्या एका मिपाकरांच्या कायप्पा समूहात सहभागी झालो. आणि जुन्या प्रेमाला पुन्हा धुमारे फुटले! समूहात एकसो एक दिग्गज सभासद त्यांचे सायकलिंग चे अनुभव शेअर करतायत, नवख्यांना मार्गदर्शन करतायत, सारे एकमेकांना प्रोत्साहन देतायत… आणि, मिपाकर असल्याने, भरपूर दंगा सुद्धा करतायत! धमाल! सुरुवातीला मी या समूहात वाचनमात्रच होतो. एकतर सायकलिंग करत नव्हतो. त्यातून बाकीचे सदस्य रोज लांबलांबच्या ट्रीपा मारतायत, ब्रह्म (BRM) मारतायत, पंक्चर काढतायत, सायकल कट्टे करतायत… मी निमूट एका कोपऱ्यात उभा राहून सगळा दंगा बघायचो.
हळू हळू भीड चेपली. मी सुद्धा माझ्या शंका विचारू लागलो. आणि सगळे अगदी आपुलकीने मला उत्तर देतायत हे पाहून धीर वाढला. पुन्हा एकदा सायकल घ्यायच्या विचाराने उचल खाल्ली. आणि उपरोल्लेखित संवाद घडला!
===============================================================================
शेवटी “आधी स्वस्तातली सायकल घेऊन ती नित्यनियमाने चालव” या मातोश्रींच्या आज्ञेनुसार आणि “दिवाळीत TV घ्यायचाच!” या सौंच्या धमकीला मान देऊन स्वस्त सायकलीचा शोध सुरु केला. २-४ सायकली शोर्टलिस्ट केल्या. नेमकी तेव्हाच समूहातल्या सुमित ने ६०० ची ब्रह्म मारलेली. तो म्हणाला, कि कुणीतरी BTWIN ची MyBike घेऊन आलेला, BRM ला. माझ्या यादीत ही सायकल होतीच. लगोलग मी समूहात MyBike घेण्याविषयी पृच्छा केली. आणि सर्व दादा लोकांच्या आशीर्वादाने घेऊन सुध्दा टाकली!
गेल्या शनिवारीच माझ्या बायकोच्या या सवतीला (तिचाच शब्द!) घरी घेऊन आलो… छोट्या छोट्या राईड मारायला सुरुवात केलीये… ३० किमीवर असलेल्या माझ्या कार्यालयात रोज सायकलवरून जायचं लक्ष्य आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करतोय. आणि खात्री आहे की तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांच्या जोरावर लौकरच लक्ष्यभेद करेन. याचं कारण या समूहाचं घोषवाक्य, जे आता माझा मंत्र बनलंय:
धर हँडल आणि मार पँडल!
प्रतिक्रिया
12 Sep 2017 - 3:30 pm | मोदक
अरे व्वा.. अभिनंदन..!! सायकलचा फोटो..?
12 Sep 2017 - 3:31 pm | केडी
मस्त जमलाय...भारी!
12 Sep 2017 - 3:42 pm | दशानन
अरे वाह अभिनंदन!
ग्रुप मेम्बर कसे व्हावे हो?
12 Sep 2017 - 3:48 pm | कपिलमुनी
तुमच्याकडून ब्रह्म होवो ह्याच शुभेच्छा !
12 Sep 2017 - 4:04 pm | ज्योति अळवणी
भलतंच झक्कास. मी फक्त स्वप्नात विचार करते हो सायकलचा. खर तर खूप आवडतं सायकल चालवायला. शाळेत असेपर्यंत खूप चालवली होती. लग्नानंतर पण 3 वर्ष चालवायचे. पण मग एकूण संसारात अडकत गेले आणि आता सायकल म्हणजे स्वप्न झालं आहे.
पण सायकल ग्रुप ची माहिती द्याना इथे. मी पण किमान वाचक होते. कुणी सांगावं तुमच्या सारखं कधीतरी सायकल घ्यायचं आणि चालवायचं धाडस देखील करीन
12 Sep 2017 - 4:07 pm | एस
खंग्री. आता तुमच्याकडून बीआरएम घडो ही शुभेच्छा!
12 Sep 2017 - 4:18 pm | चंबा मुतनाळ
सायकल कंपूत स्वागत आहें. आता फोटो येउंदेत !!
12 Sep 2017 - 4:40 pm | स्वच्छंदी_मनोज
व्वाह व्वाह.. नमनाचा लेख मस्त जमलाय. आता ग्रूपचा मोटो डोळ्यासमोर ठेऊन लांब लांब ट्रिप्स करा आणि इथे त्याचे लेख आणि फोटो टाका..
रच्याकने: त्या तुमच्या सवतीचा फोटो कुठाय? :)
12 Sep 2017 - 4:47 pm | मी-सौरभ
रच्याकने कार्यालयात शॉवर घ्यायची सोय आहे ना? हे बघून ठेवा ;)
13 Sep 2017 - 10:51 am | mayu4u
आहे सोय :)
12 Sep 2017 - 4:55 pm | स्थितप्रज्ञ
प्रथम तुम्हाला नवीन सायकलीच्या (आणि नव्याने सायकलिंगच्या) शुभेच्छा!
रोज चालवत राहा...३० किमी लांब कचेरीत अगदी आरामात जाल.
तेवढं सायकलचा फोटू डकवायला विसरू नका ;)
12 Sep 2017 - 5:30 pm | बाजीप्रभू
आवडलं घोषवाक्य..
छान लिहिलंय हेवेसानगे.
12 Sep 2017 - 6:17 pm | देशपांडेमामा
सास्वांच्या कळपात आपले स्वागत आहे! सायकल सोबतच्या भावी वाटचालीकरता शुभेच्छा !!!
ग्रुपची नीयमावली वाचली असेलच....त्यातला वरुन मधला नियम म्हणतो की नविन सायकल घेण्यार्याने सर्व ग्रुप मेंबरांना मिसळपावाचा नैवेद्य दाखवणे कंपल्सरी आहे! :P
देश
13 Sep 2017 - 10:37 am | mayu4u
सर्वांना प्रत्येक मुंबई भेटीत माम्लेदारची मिसळ माझ्याकडून लागू आहे. त्वरा करा, ऑफर अमर्यादित कालावधीसाठी!
12 Sep 2017 - 6:25 pm | धडपड्या
सयकलींसोबतच लेखणीलाही पुनरुज्जीवन मिळालेलं पाहून आनंद झाला...
आता सायकलींग करा, आणी लेख लिहा(च)..
(फोटो नसले, तर फाऊल धरतात म्हणे... तस्मात... फोटो हवेच)
12 Sep 2017 - 6:40 pm | वेल्लाभट
शुभेच्छा ! चालूद्यात जोरदार पँडल !
12 Sep 2017 - 8:24 pm | कुमार१
मस्त ! शुभेच्छा.
धर हँडल आणि मार पँडल! >>> लय भारी!
याच्या पुढचे एक भारी वाक्य :
"दोन पाय जगातील सर्वांत सुंदर वाहन
इच्छा शक्ती हेच त्याचे इंधन .
13 Sep 2017 - 10:38 am | mayu4u
आवडेश!
12 Sep 2017 - 8:35 pm | पैसा
मस्त लिहिलंय!
12 Sep 2017 - 8:54 pm | डॉ सुहास म्हात्रे
भारी ! लेखन आणि वेड, दोन्हीही !
भरपूर सायकलस्वार्या गाजवा आणि इथे सचित्र वर्णन टाकायला विसरू नका. या लेखावरून, ती वर्णने चटकदार असतिलच याची खात्री झाली आहे !
12 Sep 2017 - 9:05 pm | आगाऊ म्हादया......
12 Sep 2017 - 9:21 pm | सोमनाथ खांदवे
मी बी लै इचार कर्तो , दोन चार येळ पोरा ची सायकल चालवून पन बगीतली . सीट लै टोचायच अन दोन्ही मांड्या ला सीट घासुन लै अगाग व्हायची , शेवटी वाकिंग वर समाधान मानलया .
12 Sep 2017 - 10:06 pm | आगाऊ म्हादया......
12 Sep 2017 - 10:12 pm | आगाऊ म्हादया......
12 Sep 2017 - 10:13 pm | आगाऊ म्हादया......
12 Sep 2017 - 10:43 pm | लिओ
तुम्ही तुमच्या कार्यालयात ये जा करण्यासाठी जर सायकल वर्षातले ६ महिने जरी वापरलात तर कार्यालयात ये जा करण्यासाठी होणार्या खर्चात बचत, तुमच्या आरोग्य खर्चात बचत, जिमच्या खर्चात बचत,
पुढच्या दिवाळिची काय खरेदी याचे नियोजन आत्ताच करा
शुभेच्छा
13 Sep 2017 - 10:39 am | mayu4u
नवीन सायकल! :))
13 Sep 2017 - 12:37 pm | sagarpdy
हे वेडाच खरं लक्षण, अभिनंदन :)
13 Sep 2017 - 10:39 am | दुर्गविहारी
मी ही सायकल पुन्हा हातात धरावी या विचारात आहे. अगदी तुमच्या सारखे सायकलिंग नाही तरी माझ्या ऑफिसमधे आणि शक्य तर ईतरत्र वापरण्याचा विचार आहे. उत्तम व्यायाम आणि प्रदुषणमुक्त सफारी म्हणजे सायकलिंग.
13 Sep 2017 - 10:52 am | mayu4u
त्वरित अमलात आणा!
13 Sep 2017 - 11:08 am | रघुनाथ.केरकर
१०० टक्के खरय.
13 Sep 2017 - 12:15 pm | ज्ञानोबाचे पैजार
मी मागची आठ वर्षे रोज सायकलने घरापासुन ते कंपनीच्या बसस्टॉप पर्यंत येतो. (साधारण ४ किमी) म्हणजे रोजचे किमान ८ किमी सायकल चालवतोच. या शिवाय जवळपासची सगळी अंतरे शक्यतो सायकलनेच जातो.
मागचे सहा महिने (म्हणजे मोदकाचा धागा आल्या पासुन) सुटीच्या दिवशी साधारण १५ ते २० किमी सायकलींग होतेच होते.
सुरवातीचे काही दिवस मला सायकल चालवण्याचा प्रचंड त्रास झाला कारण जवळजवळ १५ वर्षांच्या गॅपने सायकल हातात घेतली होती. पण आता सवय झाली आहे.
तुम्हाला तुमच्या संकल्पासाठी मनापासुन शुभेच्छा.
पैजारबुवा,
13 Sep 2017 - 10:49 am | mayu4u
सर्वांचे मन:पूर्वक आभार! सर्वांना धन्यवाद!
समूहाच्या स्त्रावा क्लब चा दुवा लेखात ऍडवल्याबद्दल व्यवस्थापनाचे विशेष आभार!
BRM एक स्वप्न आहे, पाहू कसं जमतंय ते.
आणि हो, फोटो टाकतो लौकरच!
पुनश्च धन्यवाद! धरलंय हँडल आणि मारतोय पँडल!
(सायकल आणि मिपा प्रेमी) मयुरेश
13 Sep 2017 - 11:15 am | दाते प्रसाद
नवीन सायकल खरेदीबद्दल अभिनंदन आणि कळपात आपले स्वागत !!
भरपूर सायकल चालवा , आणि ब्रह्म लवकरात लवकर पुर्ण करा !!
आणि हो . . . . . . ते नैवेद्याचं बघा जरा
13 Sep 2017 - 11:45 am | mayu4u
... मी पुण्यास येणार असलो तर मी कळवतो. :)
13 Sep 2017 - 3:17 pm | मार्गी
जोरदार!!! शुभेच्छा!
13 Sep 2017 - 4:09 pm | Nitin Palkar
अभिनंदन आणि शुभेच्छा! तुमचा संकल्प नक्की पूर्ण होईल. सरावात कसूर ठेवू नका. पुनश्च एकदा शुभेच्छा.
13 Sep 2017 - 8:59 pm | मित्रहो
अभिनंदन आणि शुभेच्छा
आता सायकल सवारी करा आणि त्याविषयी इथे लिहा
13 Sep 2017 - 11:40 pm | विशाल सोनवणे
Please let me know if we have any group in Mumbai... I would like to join
14 Sep 2017 - 6:43 pm | जेडी
सायकल घेताना नक्की काय काय पाहयचे, कोणती चांगली? थोडक्यात टेक्नीक्ल माहिती हवी आहे.
http://www.firefoxbikes.com/BikeDetails.aspx?BikeId=147
ही सायकल घ्यायची विचार आहे..कसे समजणार, सीट वर खाली करता येते की नाही? मधली दांडी नको आहे... किंवा दुसरी कोणती घेवु शकतो का?
15 Sep 2017 - 12:25 am | मोदक
शक्यतो ट्रिगर शिफ्टरवाली सायकल घ्या आणि शिमानो टर्नी, अल्टस, अॅसेरा (चढत्या क्रमाने) या प्रतीचे मागचे डिरेलर असूद्यात.
तुम्ही लिंक दिली आहे त्या सायकलला सीटखाली मध्येच एक पर्पल कलरचा पार्ट आहे.. तो सीटचा क्विक रिलीज आहे. सीट वरखाली करता येईल.
ही सायकल आवडली असली तर अशीच सायकल पण ट्रिगर शिफ्टर बघा.
यातला एकदम उजवीकडचा शिफ्टर रोड बाईकचा आहे. आपण साध्यासुध्या कारमधून जाताना जसे फेरारी किंवा लँबॉर्गिनीकडे दुर्लक्ष करतो किंवा जितके लक्ष देतो तितकेच याच्याकडे लक्ष द्या. ;)
15 Sep 2017 - 11:19 am | mayu4u
...मोदकरावांचा खालील धागा वाचावा:
http://www.misalpav.com/node/28858
14 Sep 2017 - 11:24 pm | स्वाती दिनेश
अभिनंदन!
सायकलने भटकायची जुनी आवड आता मागे पडली असली तरी सायकल ती सायकलच!
स्वाती
15 Sep 2017 - 12:39 am | रुपी
अरे वा! अभिनंदन!
स्वतःला जे मनापासून आवडतं ते करत आहात त्याचं खरंच कौतुक वाटतं.
माझे एक प्रोफेसर होते, त्यांना सायकलची अत्यंत आवड आहे. त्यांना काही भाषाही अवगत आहेत. जेव्हा त्यांनी जपानी भाषा शिकायचे ठरवले, तेव्हा शिकण्याची सुरुवात करताना त्यांना शिकवणार्याने विचारले की सर्वांत आधी तुम्हाला कुठला शब्द शिकायचाय? तर त्यांचे उत्तर होते 'सायकल'.