भाग १ - प्रस्तावना आणि केप सूनिअन
भाग २ - प्राचीन कोरिंथ
भाग ३ - अगामेम्नॉनच्या राज्यात
भाग ४ - नाफ्प्लिओचे पुराणवस्तूसंग्रहालय आणि एपिडाउरोस
भाग ५ - पालामिडी किल्ला
भाग ६ - असिनीचे अवशेष आणि टोलो
भाग ७ - आर्गोसचे अक्रोपोलिस
भाग ८ - बुर्ट्झी आणि नाफ्प्लिओ प्रोमंनाड
बर्याच दिवसांनी (खरं तर महिन्यांनी) पुढील भाग टाकत आहे, त्याबद्दल क्षमस्व!
२७ डिसेंबर, २०१५ अथेन्समधील पहिला दिवस. आजचा दिवस धरून ग्रीसमध्ये साडेतीन दिवस उरले होते. आज सकाळी लवकर निघून डेल्फीची सहल करून यायचं, असं ठरवलं होतं. आम्ही टूर वगैरे बुक केली नव्हती, पब्लिक बसने जाणार होतो. पहाटे गजर व्हायच्या आधीच मला जाग आली. पण झोपही अनावर येत होती. मग आज अथेन्स पाहू आणि डेल्फीला उद्या जाऊ असं मनात म्हणून गजर बंद करून टाकला. झोपा काढणं कधीकधी किती फायद्याचं ठरतं हे नंतर कळणार होतं!
सकाळी उठायला अर्थातच उशिर झाला. ख्रिसमसच्या दोन दिवसांच्या सुट्टीत सगळी पर्यटनस्थळं बंद असतात. त्यामुळे आज अथेन्समध्ये सगळीकडे गर्दी असणार हे नक्की होतं. आता निघायला उशिर झालाच आहे तर आधी सिंटाग्मा चौकातील 'चेंज ऑफ गार्डस्' सोहळा बघू आणि मग अक्रोपोलिसला जाऊ असं ठरवलं.
सिंटाग्मा चौकातील युद्धस्मारक आणि 'चेंज ऑफ गार्डस्'
सिंटाग्मा (Syntagma Square) हा ग्रीस राज्यघटनेचं नाव दिलेला चौक म्हणजे अथेन्समधील मध्यवर्ती ठिकाण आहे. या भागात राजमहालाची इमारत आहे, जिथे आता ग्रीसची पार्लमेंट भरते. चौकात Tomb of the Unknown Soldier हे युद्धस्मारक आहे. हे स्मारक तसेच राष्ट्रपतीभवनाचे रक्षण एव्झोन (Evzone) नावाच्या विशिष्ट सैनिकांची तुकडी करते. हे उंचपुरे Evzoni त्यांच्या पारंपारिक पोषाखामुळे (यात किल्ट, रुंद बाह्या, गोंडे लावलेली आणि खिळे ठोकलेली पादत्राणे येतात) व्हॅटिकनच्या स्विस गार्ड सारखेच पर्यटकांना आकर्षित करतात.
युद्धस्मारक आणि रक्षणास उभे एव्झोनी
युद्धस्मारकापाशी उभ्या Evzoni ची जोडी दर तासाला बदलते. हे 'चेंजिंग ऑफ गार्डस्' बघायला अनेक पर्यटक जातात. त्यादिवशी रविवार असल्याने सकाळी अकरा वाजता नेहमीच्या 'चेंज ऑफ गार्डस्' पेक्षा मोठा सोहळा होता. यात जवळजवळ सगळे गार्डस् त्यांच्या बँडपथक आणि अधिकार्यांसमवेत स्मारकापाशी येऊन सलामी देतात.
कवायत पाहत असताना सैनिकांना सरावाची खूप गरज आहे असं वाटत होतं. 'चेंज ऑफ गार्डस्' संपल्यावर अक्रोपोलिसला जाण्यासाठी अथेन्सच्या मेट्रोकडे वळलो. मेट्रोच्या लाल रंगाच्या मार्गावर पुढचंच स्टेशन अक्रोपोली आहे.
रोम, अथेन्स सारख्या शहरांनाच पुराणवस्तूंची संग्रहालये म्हणणं अतिशयोक्ती ठरू नये. अथेन्सच्या मेट्रोचं काम सुरू असताना खोदकामात मिळालेले अनेक अवशेष हे मेट्रोच्या स्टेशनांमध्ये पाहता येतात. त्यामुळे मेट्रोने प्रवास करतानाही बर्याचदा काहीतरी लक्षवेधक पाहायला मिळतं.
एका स्टेशनला पाहिलेला ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील पाणी वाहून नेणारा टेराकोटा पाइप
अक्रोपोलिसच्या परिसरात
अक्रोपोलिस असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी मेट्रो स्टेशनच्या बाहेरच अक्रोपोलिस म्युझिअम आहे. रविवार असल्याने हे म्युझिअम रात्री आठ वाजेपर्यंत पाहता येणार होतं. त्यामुळे आधी अक्रोपोलिस आणि मग म्युझिअम असा बेत होता. पण म्युझिअमच्या बाहेर आधी एक फेरफटका मारला. म्युझिअमच्या प्रवेशासाठी पर्यटकांची लांबलचक रांग लागली होती. अक्रोपोलिसकडे जाणार्या लोकांचीही उन्हाळ्यात असावी तशी गर्दी होती. सकाळी लवकर यायला हवं होतं वगैरे म्हणण्याला आता काही अर्थ नव्हता. पण प्रवेशद्वाराशी पोहोचेपर्यंत लक्षात आले की लोक उलट पावली परत फिरत होते. संप असल्यामुळे अक्रोपोलिस चक्क बंद होतं! तोपर्यंत आम्हांला संपाची कुणकुणही लागली नव्हती. पण अक्रोपोलिस म्युझिअम तर सुरू होतं! हा काय प्रकार आहे, नक्की कोणती ठिकाणं बंद आहेत हे विचारायला जवळच असलेल्या पर्यटन माहितीकेंद्रात गेलो. तिथली रांग थोडी ओसरल्यावर चौकशी केली तर कळलं की ग्रीक सरकारच्या सांस्कृतिक खात्यात काम करणार्या कर्मचार्यांनी सकाळी एक दिवसाचा संप पुकारला होता. २५, २६ डिसेंबर नाताळची सुट्टी आणि २७ डिसेंबरला संप! असं सुट्टीला जोडून संपावर जाणं तिथे नवीन नाही, हे नंतर कळलं. उरलेल्या सुट्टीत सकाळी संपाची माहिती काढल्यावर बाहेर पडायचं असं ठरवून टाकलं.
ग्रीसमधील बहुतेक म्युझिअम्स आणि प्राचीन अवशेष सांस्कृतिक खात्याच्या अखत्यारीत येत असल्याने ते बघायला आलेल्या आमच्यासह देशभरातील सगळ्याच पर्यटकांची गैरसोय होणार होती. दु:खात सुख एवढंच की पहाटे उठून आम्ही डेल्फीला गेलो नव्हतो! नाहीतर एवढा प्रवास करून एक दिवस वाया घालवून हात हलवत परत यावं लागलं असतं. अथेन्समध्ये निदान अक्रोपोलिस म्युझिअम तरी पाहता येणार होतं. (या म्युझिअमचा कारभार सां. खात्याच्या अंतर्गत येणारी एक वेगळी संस्था बघते.)
पर्यटन केंद्रात काही माहितीपत्रकं होती. त्यातील प्राचीन ग्रीक तंत्रज्ञानाच्या एका प्रदर्शनाचं पत्रक घेतलं आणि तिथे कसं जायचं वगैरे विचारून घेतलं.
केंद्राच्या आवारात बसायला कट्टे होते. जवळच मस्त फुललेला जाईचा वेल होता. आम्हाला आता काही घाई नसल्याने आरामात बसलो. अथेन्समधील एकदोन जागांवर वेळेअभावी फुली मारणं भाग होतं. आज प्राचीन तंत्रज्ञानाचं प्रदर्शन, अक्रोपोलिस म्युझिअम आणि लायकाबेटस (Lycabettus) टेकडी पाहू आणि उरलेल्या दिवसांत (सरकारी कर्मचार्यांच्या युनिअन्सनी कृपादृष्टी ठेवल्यास) अक्रोपोलिस, डेल्फी आणि नॅशनल आर्किओलोजी म्युझिअम पाहू असा बेत ठरला.
आमचं बोलणं ऐकून आम्ही भारतीय वाटल्याने जवळ बसलेल्या एक वयस्कर बाई आमच्याशी बोलायला आल्या. मूळच्या श्रीलंकेच्या असाव्या. त्या लंडनहून एकट्याच २५ ते २७ अथेन्स बघायला आल्या होत्या. त्याच दिवशी संध्याकाळी परत जाणार होत्या. त्यांनी बुकिंग वगैरे कुणाकडून तरी करून घेतलं होतं. २५, २६ ला पर्यटनस्थळं बंद हे त्यांना अथेन्सला आल्यावर समजलं. त्यात २७ ला संप. अक्रोपोलिस पाहण्याच्या इच्छेपोटी त्या आल्या होत्या. पुन्हा कधी ग्रीसला येणंही जमणार नव्हतं. त्यांच्याजागी मला प्रचंड राग आला असता. पण त्यांच्या बोलण्यात फक्त निराशा होती. त्यांना उरलेल्या अर्ध्या दिवसात काय करता येईल याची माहिती हवी होती. पण पर्यटकांना तोंड देताना वैतागलेल्या (पर्यटन खातं संपावर नव्हतं ना!) तिथल्या कर्मचार्यांनी काही धड सांगितलं नव्हतं.
लायकाबेटस टेकडीवरून अक्रोपोलिस दिसतं असं आम्ही सांगितलं. पण त्या तिथे गेल्या असताना smog मुळे काही खास दिसलं नव्हतं. त्यांच्याकडे केप सूनिअन आणि बोटीने तीन बेटं पाहणे अश्या दोन सहलींची पत्रकं होती. सूनिअन संपामुळे बंद असणार आणि बेटांची सहल दिवसभराची असल्याने करता येणार नाही, हे सगळं त्यांना समजावलं. अक्रोपोलिस पाहायचं होतं तर अक्रोपोलिस म्युझिअमला महत्त्वाचे अवशेष आहेत ते पाहिले का असं विचारलं. तर इतर म्युझिअम्ससारखं ते म्युझिअम बंद नाही हे त्यांना माहित नव्हतं. त्यांना झालेल्या आनंदाने आम्हालाही खूप बरं वाटलं. त्यांच्यामागोमाग आम्हीही तिथून निघालो.
प्राचीन तंत्रज्ञानात कितीही रस असला तरी त्यावेळी उत्साह नव्हता. डोकं शांत करण्यासाठी भर दुपार असली तरी लायकाबेटस टेकडी चढू असा विचार केला.
लायकाबेटस टेकडी
अथेन्सच्या अनेक टेकड्यांपैकी लायकाबेटस टेकडी हे एक पर्यटनस्थळ आहे. या टेकडीवर जायला funicular रेल्वे आहे. पण funicular च्या पायथ्याशी पोहोचायला अर्धीअधिक टेकडी चढणे किंवा टॅक्सी हे दोनच पर्याय आहेत. मेट्रोने टेकडीपाशी जाऊन पायर्या चढायला सुरूवात केली. या भागात उच्चभ्रू वस्ती आहे. पायर्यांच्या दोन्ही बाजूंना इमारती, ठराविक अंतरावर पायर्यांना भेदून जाणारे रस्ते आणि काही दुकाने, कॅफे वगैरे आहेत. परत येताना पोटपूजा करायला एक जागा हेरून ठेवली. थोडं चढून झाल्यावर पायर्यांच्या बाजूच्या कट्ट्यावर थोडं बसलो. आज बहुतेक कॉलेज कट्ट्याची आठवण काढायचा दिवस होता. तेवढ्यात एक हायफाय तरुणी बाजूच्या कट्ट्यावर येऊन बसली. तिच्याजवळच्या भल्यामोठ्या पर्समधून तिने एक पिशवी काढून बाजूला ठेवली. आजूबाजूच्या लोकांकडे तिचं लक्षही नव्हतं. कॉलेजकट्ट्यावर डबा खायचो तसा ही डबाबिबा पिशवीतून काढणार की काय याकडे आमचं लक्ष लागलं होतं. पण त्या मुलीने चक्क पायांतील stiletto heel चे शूज काढले. पिशवीतून सपाट तळ असलेली पायताणं काढून पायांत घातली. stilettos पिशवीत आणि पिशवी पर्समध्ये ठेवून ती पायर्या चढायलाही लागली. तिच्या फॅशनप्रति असलेल्या निष्ठेला मनोमन हात जोडले! एकीकडे पावसाळ्यात मुंबईत लोकलने प्रवास करताना छत्री प्लास्टिकच्या पिशवीत आणि पिशवी बॅगेत ठेवणंही आठवलं.
एकदाचं funicular चं तिकिट काढून काही मिनिटांचा प्रवास करून माथ्यावर पोहोचलो. पर्यटक आणि फेरीवाल्यांची गर्दी उसळली होती. वर एक चॅपेल आणि अॅम्फीथिएटर आहे. पण ही टेकडी प्रसिद्ध आहे ती इथून दिसणार्या अथेन्स आणि अक्रोपोलिसच्या नजार्यासाठी.
लायकाबेटसवरून दिसणारं अक्रोपोलिस
सहलीत आतापर्यंत पाहिलेल्या दृश्यांच्या तुलनेत लायकाबेटसवरून दिसणारं अथेन्स काही विशेष वाटलं नाही. हवासुद्धा स्वच्छ नव्हती. इथून रात्री दिव्यांच्या रोषणाईत अक्रोपोलिस छान दिसतं. आम्ही थोडा वेळ वर थांबून परत निघालो.
त्या दिवशी संध्याकाळी म्युझिअमला जाताना मात्र अक्रोपोलिसने पुन्हा दर्शन दिलं.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
31 May 2017 - 8:43 am | प्रचेतस
सुरेख झालाय हा भाग.
2 Jun 2017 - 7:52 pm | दुर्गविहारी
उत्तम माहिती. ग्रीसला जायला मिळेल कि नाही ते माहिती नाही, पण निदान व्हर्चुअल टुर तरी होती आहे तुमच्यामुळे.
3 Jun 2017 - 3:00 am | निशाचर
प्रचेतस आणि दुर्गविहारी, प्रतिक्रियांसाठी धन्यवाद!
तुम्हा दोघांच्या लेखांतूनही खूप जागा पाहायला मिळत असतात.