रावणमामा
रावण नावाभोवती अनुकूल प्रतिकूल अर्थाच्या वलयांनी एक अभेद्य भिंत शेकडोवर्षापासून उभी केली आहे. संदेहाच्या प्रतलावरून प्रवाहित असणारे हे नाव कधी होकाराचा, तर कधी नकाराचा आशय घेऊन संस्कृतीच्या पात्रातून वाहते आहे. काहींना या नावात नकाराच्या सुस्पष्ट रेषा दिसतात, तर काहींना विद्वत्तेची वलये. शेकडो वर्षे उलटूनही त्याभोवती असणारे संदेहाचे धुके काही विरळ होत नसल्याने नकार-होकाराच्या कृष्णधवल छटांमध्ये ते आपला चेहरा शोधते आहे. म्हणूनच असेल की काय, या नावाला आपलं अभिधान म्हणून मिरवणारे आसपास अपवादानेच आढळतात. राम नाव धारण करून अभिमानाने मिरवणारे लाखोने आहेत. पण रावण नावाला आपल्या सांस्कृतिक संदर्भांनी नकारात्मक विचारांच्या चौकटीत अधिष्ठित करून ठेवले असल्याने, निदान या परगण्यात तरी ते उपेक्षितच राहिले आहे. राम भारतीय माणसांच्या मनात जितक्या सहजतेने सामावला. तितका रावण समरस होऊ शकला नाही. म्हणूनच नकार घेऊन वाहत राहणे त्याचे अटळ प्राक्तन ठरले असावे.
अपवादात्मक कोणी एखादा रावण नाव धारण करून आयुष्यभर आस्थेने मिरवत असेल, तर तो कुतूहलाचा विषय नक्कीच असू शकतो. अर्थात, या नावाबाबत माणसांच्या मनात संदेह असल्याने, ते टाळण्याकडे कल असणेसुद्धा स्वाभाविकच. संस्कृतीच्या प्रवाहातून वर्षानुवर्षे वाहत येणाऱ्या कथा, गोष्टी आणि अशा गोष्टीना घेऊन तयार झालेल्या सिरियल्स, सिनेमांमुळे मनात काही प्रतिमा साकारत असतात. अशाच काही लिखित, काही मौखिक संदर्भांच्या वाटांनी चालत येवून रावण नाव त्याच्या अंगभूत गुण-दोषांसह माणसांच्या विचारविश्वात सामावलं. याचाच परिपाक म्हणून रावण म्हणजे नकार, हा विचार आपल्या मानसिकतेत कोरला गेलेला असेल का? नकाराचे धुरकटलेले रंग घेऊन साकारणारी रावण नावाची प्रतिमा मनी विलसत राहिल्यामुळे तीच त्याची ओळख झाली असेल का? निश्चितपणे सांगणे अवघड आहे; पण कालोपघात संशोधनाच्या, परिशीलनाच्या कक्षा विस्तारत गेल्या, तसे या नावामागे असणारे संदर्भही उकलत गेले. त्याभोवती असणारे एकेक पैलू उलगडत गेले, तसे ते प्रत्यक्षात असणाऱ्या प्रतिमेपेक्षा वेगळे असल्याचे समजत गेले. आपली अंगभूत ओळख घेऊन संस्कृतीच्या प्रवाहात वाहत राहणाऱ्या एखाद्या नावाच्या ललाटी नियती असे भागधेय का अंकित करीत असेल? अर्थात, अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयास अवघड कसरत असते. ती शोधायचीच असल्यास आपल्या सामाजिक मानसिकतेच्या परिघातून प्रयत्नपूर्वक तपासून पाहावी लागतात. कालोपघात घडणारी परिवर्तने पहावी लागतात. सामान्य माणसांच्या मनात या नावाविषयी असणारा संदेह कदाचित थोडाफार निवळला असला, तरी त्याभोवती असणारे संशयाचे धुके पूर्णतः विरळ झाले नाही. त्याला उजळून टाकणारा प्रकाश अद्याप पसरायचा आहे. म्हणूनच या नावाला समजून घेतांना सामान्य वकुब असणाऱ्यांना मर्यादा येत असतील का?
रावण नाव असणारी माझ्या गावात दोनतीन माणसं होती. यांच्या नावाबाबत मनात काही प्रश्न आधीही होतेच. आजही ते आहेत; पण अर्थाचे संदर्भ मात्र बदलले आहेत. या लोकांसाठी रावण हेच नाव यांच्या आप्तस्वकीयांनी का निवडले असेल? बरे या नावाबाबत शेकडोवर्षापासून संदेहाचे अनेक पदर असतानाही, यांना वाईट वगैरे काहीच कसे वाटत नसावे? की 'नावात काय असते,' हा शेक्सपिअरचा विचार यांना खऱ्याअर्थाने समजला असेल? मनात उदित होणारे असे प्रश्न या लोकांना विचारण्याएवढे धारिष्ट्य तेव्हा नव्हते, म्हणूनच की काय वाढत्या वयासोबत ते प्रश्न कुतूहल बनून सोबत करीत राहिले. राम म्हणजे देव वगैरे, म्हणजेच नीतिसंमत, समाजसंमत, आदर्शवर्तनाचे प्रतिनिधित्त्व. तर रावण सगळ्यांच संकेतांना तिलांजली देणारा. अशी प्रतिमा मनाने तयार करवून घेतलेली. घेतलेली म्हणण्यापेक्षा आसपासच्या संदर्भांनी तयार करून दिलेली. अर्थात, लोकमनात अशा धारणा काही अभ्यासाने तयार झालेल्या नसतात, तर परंपरेच्या पात्राचे तीर धरून वाहत येणाऱ्या मौखिक आणि लिखित पण पूर्णतः प्रमाण नसणाऱ्या संदर्भांनी घट्ट कोरून दिलेल्या असतात. याचाच परिपाक म्हणून असेल कदाचित; पण परस्पर विरोधी, अगदी थेट दोन टोकाच्या प्रतिमा रावण नावाविषयी मनावर अंकित झालेल्या. हे सगळे संदर्भ सोबत घेऊन एकदा माझ्या गावातल्या रावणमामालाच विचारले, ‘कारे बाबा, तुझे हे असे नाव तुला खरंच मनापासून आवडते का? अरे रावण तर असा असा होता. असे असूनही तू अशा नावाला आपली ओळख म्हणून का मिरवतो?’ या प्रश्नाचे उत्तर त्याला माहीत असण्याचे काही कारणही नव्हते. त्यालाच काही माहीत नसल्यामुळे असेल कदाचित; पण त्याचे प्रत्येकवेळी ठरलेलं उत्तर असायचं, ‘काय माहिती भो! आमना म्हातारा-म्हातारीलेच इचारनं पडीन. त्यासले या नावमा काय इशेश दिसनं ते!’
रावणमामा गावातील चारचौघा माणसासारखा आणि त्यातलाच एक. पण तरीही त्याला या सगळ्या माणसांपासून वेगळा करणारा एक विशेष त्याच्याकडे होता, तो म्हणजे त्याचं इतरांपासून वेगळं असणं. खरंतर त्याच्या वागण्याचा रावण या नावाशी अगदी बादरायण संबंध जोडून पाहिला, तरी दुरान्वयानेही साम्य सापडणे अवघड काम. नाकासमोर दिसणाऱ्या आणि पावलाखाली येणाऱ्या वाटेने चालणारा. साधासरळ आवश्यकता असेल तरच वळणारा, तसंच वागणारा आणि जगणाराही. रामायणातल्या रावणाच्या विद्वत्तेबाबत विचारवंतांच्या विचारविश्वात काही वाद असतील, ते असोत. पण तो विद्वान होता असे म्हणतात. प्राप्त परिस्थितीला अनुकूल करण्याएवढे सामर्थ्य त्याच्याकडे असल्याचे कोणी कथन करतो. रणांगणात त्याच्या पराक्रमाची परिसीमा घडत होती, असेही कोणी सांगतात. जे काही असेल ते असो; पण आमचा रावणमामा मात्र शाळा नावाच्या समरभूमीवर फार थोडा अवधी टिकला. काही काळ लढत राहिला आयुधे हाती घेऊन; पण दोन हात करूनही येथे आपला निभाव लागणे शक्य नसल्याचे जाणवले, तेव्हा सगळी अस्त्रे-शस्त्रे टाकून तेथून पलायन केले, ते कायमचेच. त्याच्याकडून याबाबत काही माहिती मिळणे असंभव होते. तरीही मनात असणारे प्रश्न काही केल्या निरोप घेत नव्हते. रोपट्याच्या सालीवर कोरलेली अक्षरे त्याच्या विस्तारासोबत मोठी होत जातात. तशी मनात प्रश्न बनून कोरलेली ही अक्षरे वाढत्या वयासोबत वाढत गेली. मोठी होतांना मनात नवी वलये निर्माण करत गेली.
हे सगळं रामायण आज आठवण्याचं कारण तसं फार काही विशेष नाही. मागच्या आठवड्यात गावाला गेलो होतो. गावाच्या रस्त्याने असणाऱ्या शेतात थोडा थांबलो. पलीकडच्या शेतातील केळीच्या बागेकडून “ओ भाचा, कवयं उनारे भो?” असे बोलत रावणमामा मी थांबलेल्या ठिकाणी येण्यासाठी शेतातून वळता झाला. कदाचित मला येतांना त्याने आधीच पाहिले असावे. आला तसा शेताच्या बांधावरील निंबाच्या झाडाखाली विसावला. खिश्यातून तंबाखू-चुना काढून हातावर घेऊन मळत राहिला थोडावेळ तसाच. मनासारखा झाल्यावर तोंडात भरला. तंबाखूचुन्याची डब्बी व्यवस्थित बंद करून परत खिशात घातली. त्याच्या शेजारी मी बसकण मारली. शेतात गव्हाला पाणी भरणारा लहान भाऊपण आमच्यात येऊन सामील झाला. शेजारच्या शेतात काम करणारे दोनतीन सवंगडी एकेक करून जमा झाले. गप्पांचा फड शब्दांची सोबत करीत आठवणींचे रंग गहिरे करीत राहिला. तोंडात ढकललेली तंबाखू स्वाद घेत घोळवत राहिला तशीच. अधूनमधून पापण्यांची उघडझाप करीत डोळे अर्धवट बंद करून मनाशी काहीतरी आठवत बराच वेळ चव घेत राहिला. तोंडात तुंबलेली पिचकारी दूर फेकीत अस्ताव्यस्त हालचाल केली आणि तरतरी आल्यासारखा बसल्या जागेवरच जुजबी हालचाल करीत सावरून बसला. एवढा वेळ तेथे जमलेल्या सगळ्यांच बोलणं ऐकणारा रावणमामा आता बोलण्याकडे वळला. एकेक गोष्टी मनात जुळवत उजळणी केल्यासारखा आठवून आठवून सांगत राहिला. जुन्या-नव्या आठवणी, प्रसंगांची पखरण करीत राहिला. मनाला सुखावणाऱ्या, त्रास देणाऱ्या क्षणांच्या गाठी-निरगाठी मोकळ्या करीत राहिला. मनात साठवलेलं सगळं शब्दांच्या वाटेने मुक्त करीत राहिला.
बोलता-बोलता त्याला सहज म्हणालो, “काय मामा, वावरमा केयास्ना पानं कापानं काम अजूनपन सुरूच शे! आते वय हुई गे, काही थांबाना विचार शे का नही?”
“हा भो! सुरूच शे. आपलं दुसरं काय काम जमस आमले. आमना पाचवीलेच पूजेल शे ते.” कदाचित नियतीलाही हेच मान्य असावे, अशा भावनेतून स्वतःला व्यक्त करीत राहिला. सांगत राहिला एकेक गोष्टी. काही आपल्या, काही परक्या, काही ओळखीच्या, काही अनोळखी. बरंच काही काही. सुख-दुःखाच्या क्षणांना आठवणींच्या धाग्यांनी गुंफत राहिला.
कामे आटोपून गावाहून लवकर परत निघायचं असल्याने त्यांचा निरोप घेऊन घाईनेच निघालो घराकडे. कामे संपवून परतीच्या प्रवासाला लागलो. रस्त्यांनी आभूषण म्हणून अंगावर धारण केलेल्या खड्ड्यांना हुलकावण्या देत शिताफीने गाडी हाकीत धावू लागलो. मनात मात्र रावणमामा भूत-वर्तमानाच्या सीमांवर उभा राहून विचारांची वलये निर्माण करू लागला. जलाशयात भिरकावलेल्या दगडाने पाण्यात तरंग उठून त्याची वलये तयार व्हावीत आणि त्यांनी मोठे होत किनाऱ्याकडे पळत राहावे तसे. मी गावात असेपर्यंतचा त्याचा भूतकाळ ज्ञात आहे. याच्या जगण्याच्या वर्तमानातही अधूनमधून डोकावणे घडते; पण या माणसाचा भविष्यकाळ काय असेल? या प्रश्नाचं उत्तर काहीकेल्या हाती लागत नाही. त्याला भविष्याच्या प्रतिमांमध्ये शोधू लागलो, तसे उत्तराचे प्रत्येक पर्याय पुन्हा-पुन्हा फिरून त्याच बिंदूवर येऊन विसावू लागले.
रोजच्या जगण्याचा संघर्ष करीत आपलं लहानसं विश्व प्रामाणिक परिश्रमाने संपन्न करू पाहणारा रावणमामा आमच्या गावातलं एक साधंसरळ नाव. जगण्यात कोणतेही अडनिड वळणं नसलेला. अवघड वाटा टाळून मूठभर सुखाच्या शोधात चालत राहणारा. रावण या नावाभोवती असणाऱ्या सगळ्याच संदर्भांना खोटे ठरवणारा. खरंतर रावणातला राम म्हटलं तर तेही वावगं ठरू नये असा. वागणंही आणि जगणंही तसंच. नियतीने आखून दिलेल्या सुख-दुःखाच्या मार्गावर श्रद्धापूर्वक चालणारा. प्राप्त परिस्थितीला सामोरे जात जगण्याची प्रयोजने शोधणारा. त्याच्या वागण्या-जगण्याकडे पाहून वाटते, माणूस मनाने संतुष्ट असला की, अभावातही आपला प्रभाव निर्माण करीत सन्मानाने जगता येते. अर्थात, हे एकदा का ज्याला कळले आणि त्याप्रमाणे वागणे घडले की, तुमचं नाव काहीही असो. तुम्ही कुठे आणि कोणत्या घरी जन्माला आलात याला फारसे महत्त्व नसते.
रावणमामाचा ५६-५७ उन्हाळ्या-पावसाळ्यांचा प्रवास गावातल्या साऱ्यांसाठी आदर्शवर्तनाचा मापदंड ठरणारा आहे. मनाने श्रीमंत झालात की, गरिबीतही समाधानाने जगता येते, या विचारांचा वस्तुपाठ आहे. नियतीने दारिद्र्य हीच एकमेव दौलत दिमतीला देऊन याला इहलोकी पाठवला. दैव काही द्यायला विसरले असेल, पण अनुभवातून कमावलेल्या शहाणपणातून याने नियतीलाच आव्हान दिले. हिंमत नावाचे हत्यार हाती धारण करून तो परिस्थितीशी लढत राहिला. परिश्रमाच्या वाटेने जगण्याला हवा तसा आकार देता येतो, हे सिद्ध करीत राहिला. आहे त्यात समाधानाने जगणारा हा साधासा माणूस. सततच्या श्रमाने रापलेला चेहरा. उन्हातान्हात काम करीत राहिल्याने देहावरील मूळच्या रंगाने कधीच निरोप घेतलेला. सव्वापाच-साडेपाच फुट उंची घेऊन वाढलेला आणि जेमतेम अंगकाठी असणारा हा देह शोधायचा असला, तर गावात शोधून हाती लागणे जवळजवळ असंभव. तो एखाद्या शेतातल्या केळीच्या बागेत पाने कापताना हमखास दिसेल. तेथे नसला तर नदीवर मासे पकडताना आढळेल. येथेही नाहीच सापडला, तर शेजारील गावाच्या बाजारात सापडेलच सापडेल. याव्यतिरिक्त कुठे शोधायची आवश्यकताच नाही. तालुक्याच्या, जिल्ह्याच्या गावाला जाण्याचे प्रसंग याच्या आयुष्यात कधी आले का? या प्रश्नाचे उत्तर क्वचितच होय या पर्यायात हाती लागेल. आपण आणि आपले मूठभर विश्व सांभाळून सगळी हयात तो या जगाभोवती प्रदक्षिणा घालतो आहे. त्या पूर्ण होत नाहीत आणि हा थकतही नाही. त्या कधी पूर्ण होतील याचे भविष्य कदाचित ब्रह्मदेवालाही वर्तवणे अवघड आहे.
बोलणं माणसांची सहजवृत्ती असते. काही माणसं बोलण्यामुळे जिंकतात. काही बोलून हरतात. काही बोलण्यामुळे वाचाळ ठरतात. काही फार थोडे बोलतात. काही जिभेवर खडीसाखर ठेऊन बोलतात. वाणीत गोडवा असला की, थोडं बोलणंसुद्धा आपलं वाटत असतं. अर्थासह अथवा अर्थविहीन बडबड करणाऱ्या अनेक प्रभृती गावात गल्ल्या भरून वाहताना दिसतील. पण थोडं बोलून जास्त काम करणारे अपवाद असतात. शब्दांच्या जंजाळात, वाक्यांच्या गोंधळात बोलून अधिक गुंता न करता मोजकंच बोलण्याचा रावणमामाचा स्वभाव त्याची स्वतंत्र ओळख झाला. कामासाठी बोलावे आणि कामापुरते बोलावे. नसल्यास आपल्या कामातून बोलावे, असंच याचं वागणं.
मायबाप असेपर्यंत त्यांचा आस्थेने सांभाळ करणारा. त्यांच्यात आपलं अस्तित्व शोधणारा. हेच आपले विठ्ठल-रुखमाई आहेत, असे म्हणणारा. त्यांच्यासाठीच काय; पण पुरुषप्रधान संस्कृतीचे सारे संदर्भ सोबत घेऊन वाढलेला असतानाही बायकोशी अधिकाराच्या अविर्भावात कधी बोलला नाही. बोलताना कधी याचा आवाज चढला नाही. दोहोंमध्ये वादाचे प्रसंग आलेच, तर बाईंचाच आवाज अधिक असायचा. त्या त्रासिक आवाजाला समजून घेत आपल्या परिस्थितीची जाणीव करून देत म्हणायचा, ‘आपण कोणी तालेवार नाहीत कौतुक करायला. जी काही ओली-सुकी भाकरी मिळते, तीच आपली दौलत आहे.’ त्याच्या या शब्दांनी बायकोने त्रास करून घेतला असेल, घरातील समस्या समोर मांडूनसुद्धा या बाबावर काही परिणाम होणार नाही, हे माहीत असूनही त्राग्याशिवाय ती माउली काही करू शकत नसे. अशावेळी स्थितप्रज्ञ शब्दाचा शब्दशः अर्थ कळायचा. दोन मुलं, एक मुलगी नांदत्या घरात किलबिलणारी. लेकरांचा गोंधळ ऐकून कधी त्यांना ओरडला किंवा संताप अनावर झाला म्हणून धोपटून काढल्याचे निदान मलातरी स्मरत नाही. गावात इतरांशी बोलताना या माणसाची आवाजाची पट्टी कधी वाढली नाही. शेजाऱ्या-पाजाऱ्यांशी भांडणाचा संबंध कधी येवूच दिला नाही. वादाचे प्रसंग आपल्या पावलांनी चालून आले, तरी त्यांच्या वाटेवर प्रेममयी शब्दांच्या पायघड्या या माणसाने अंथरल्या. प्रेमाच्या दोन सौम्य शब्दांनी भांडणाचे अनेक प्रसंग परतवून लावले. आपलेपणाच्या साध्या शब्दांनी कलह संपवता येतात याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचा हा रावणमामा.
जीवनकलहात साऱ्यांनाच ज्ञात-अज्ञात वाटांनी मार्गस्थ व्हावे लागते. उदरभरणाच्या अनेक वाटातून आपली एक पाउलवाट निवडून वर्तावे लागते. गावात अनेकांनी आपापल्या वाटा निवडून जगण्याची प्रयोजने शोधण्याचे यशस्वी-अयशस्वी प्रयत्न केले. काही कष्टाच्या मार्गाने लक्ष्मीच्या आराधनेला लागले. काहींनी अल्पश्रमात लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे मार्ग शोधून काढले. तिच्या नूपुरांच्या मंजुळ पदरवाने आपल्या दाराशी येवून वळणाऱ्या वाटा निनादत राहाव्यात म्हणून अनेक कसरती करीत राहिले. कुणी तिला अव्वाच्यासव्वा व्याजाची भरजरी वसने परिधान करून नटूनथटून येताना आनंदले. कुणी शेती-मातीला आपलं दैव मानून काळ्यामातीच्या कुशीत हिरवी स्वप्ने रुजवत राहिले. कुणी शेळ्या, गायीम्हशी, गुरेवासरे माळावर दिवसभर हाकीत राहिले. कुणी हातभट्टीच्या सर्जनशील प्रयोगातून निर्मित थेंब साठवत आपलं भविष्य बाटलीबंद करीत होते.
पण या सगळ्यात रावणमामा अपवाद बनून आपली प्राक्तनरेखा वेगळ्या वाटेने अधोरेखित करीत राहिला. त्याचापुरता जगण्याचा व्यवसाय त्याने शोधला, तोही बिनभांडवली. भांडवल असलेच तर फक्त कधीतरी घेतलेली जुनी सायकल. तिच्या कॅरीअरवर बांधलेल्या नायलॉनच्या दोऱ्या आणि सायकलच्या हँडलला बाराही महिने तेराही काळ लटकत राहणारा विळा. पंचक्रोशीत होणाऱ्या कुठल्याही वैयक्तिक, सार्वजनिक कार्यक्रमांच्या जेवणावळींसाठी लागणारी केळीची पाने पुरवण्याचे काम करीत असायचा. अर्थात, असे कार्यक्रम काही वर्षभर नसतात. अशावेळी नदीवर मासे धरण्यासाठी एखाद्या वीराच्या थाटात निघायचा. पाठीवर मासे पकडण्याचे जाळे. खांद्याला मोठा ट्यूब हवा भरून लटकावलेला. त्याला बरोबर दोन भागात वेगळी करणारी दोरी मधोमध बांधलेली. नदीवर बराचवेळ अथांग पाण्यात तरंगत राहायचा. हाती लागलेली दौलत जमा करून शेजारच्या गावात विकून येणाऱ्या पैशातून मीठ-मिरची असे काही साहित्य घेऊन दिवे लागणीला घरी परतायचा. कधी तेथून डब्यांमध्ये भरून रॉकेल आणायचा आणि गावात विकायचा. पाणीपावसाच्या, झडीच्या दिवसात नसलंच काही काम, तर घराच्या ओसरीत तंबाखू मळीत बसलेला असायचा.
गावात साऱ्यांचा दिवस तसाही भल्या पहाटे सुरु होणे काही नवलाईचे नाही. पण रावणमामाचा दिवस सगळ्यांच्या आधी सुरु व्हायचा आणि सायंकाळी उशिरा मावळायचा. पहाटेच्या झुंजूमुंजू उजेडात सायकल घेऊन रस्त्याने निघालेल्या रावणमामाला सूर्य केळीच्या बागांमधून उगवतांना दिसायचा. भलेही शाळा शिकताना भूगोलाच्या पुस्तकात पूर्वेकडून, तर साहित्यिकांनी लिहिलेल्या कथा-कादंबऱ्यातून कुठल्याशा डोंगराआडून उगवत असला तरी. आकाशाच्या पटलावर प्रवासासाठी निघालेल्या सोन्याच्या गोळ्याकडे काही क्षण कृतज्ञभावाने बघत राहायचा तसाच भारावल्यासारखा. त्याचं दर्शन घेत मनोभावे हात जोडून आपल्या जगण्यासाठी उर्जा मागत कापलेल्या पानांचा गठ्ठा सायकलवर बांधून रस्त्याने लागायचा. लग्नकार्याघरी पानांचे मोठे भारे सकाळीच येऊन पडायचे. तेथून पुन्हा सायकल पळत राहयची दुसऱ्या शेताच्या वाटेने. पानांना मागणी अधिक असली की, परिवारातले कोणीतरी एकदोन सदस्य सोबतीला असायचे किंवा रोजंदारीने मुलं घेऊन बागांमधली केळीची हिरवीकच्च पानं जमा होत राहयची. हे सगळं जुळवताना त्याची दमछाक व्हायची, पण दिलेला शब्द पूर्ण करणारा रावणमामा शब्दापासून कधी ढळला नाही. भलेतर त्यासाठी रात्रीचा दिवस करून कधी अर्धपोटी, कधी उपाशीपोटी काम करीत राहयचा.
माणसांनी मोहात पडण्यात वाईट काहीच नाही. ती माणसाची सहजवृत्ती. पण काहींना मोहाच्या फसव्या क्षणांना आपल्या जगण्यातून अलगद बाहेर करण्याची, झालाच अधिक तर निक्षून टाळण्याची कला अवगत असते. त्यातला रावणमामासुद्धा एक. आहे ते पर्याप्त मानणारा आणि मिळाले तेवढेच आपल्या नशिबात आज होते म्हणणारा. प्रामाणिकपणाला मोल नसते, असे नाही. समाजात अगदी सगळेच एकजात स्वार्थी नसतात. रावणमामासारख्या साध्याभोळ्या माणसांचं प्रामाणिक वर्तन इतरांसाठी कुतूहलाचा विषय असतो. क्षणाक्षणाने केलेले कष्ट आणि कणाकणाने जमवलेली पै-पै प्रामाणिक माणसांच्या आयुष्यात बरकत घेऊन येते. कदाचित ती भौतिकसुखांवर स्वार होऊन आकांक्षांच्या गगनात विहार करण्याएवढी नसेल. पण अशी माणसे लोकांच्या मनात आपलं लहानसं घरटं बांधून वसतीला असतात.
आयुष्याच्या गुंत्याच्या गाठी-निरगाठी सोडवण्यात माणसांचे सारे काही खर्ची पडत असते. हे गुंते उकलण्याचे विकल्प माणसे शोधत राहतात. सगळ्यांनाच त्याची उत्तरे मनासारखी मिळतात असेही नाही. पण उत्तरे शोधतांना सोबत असणारा प्रामाणिकपणा आयुष्याची उंची वाढवतो. हीच बरकत रावणमामाच्या स्वप्नातील इमल्यांची चित्रे साकार करण्याला कारण ठरली. माथ्यावर असणारे चंद्रमौळी छप्पर आणि तव्यावर तयार होणारी दोनवेळेची भाकरी याच्या स्वप्नांची परिसीमा होती. अशा जगण्याला भौतिकसुखांची आस सहसा नसते. याच्या जगण्यात सुखस्वप्ने असतीलही कदाचित. त्यांनाही पंख पसरून आकांक्षांच्या सुळक्यांवर विसावयाचे असेल. किंवा तसे नसेलही. नियतीने संपन्नतेचे दान पदरी घातले नसल्याने रावणमामाचे पाय जमिनीशी नाते सांगणारे आणि मन मातीशी इमान राखणारे राहिले असेल का? हा प्रश्न मनात नकळत डोकावून जातो. आजही गावातील अनेकांना तसेच वाटते. रावणमामाने मनातील स्वप्ने शब्दांचा हात पकडून जिभेवर कधी येवू दिली नाहीत, असा बहुतेकांचा निष्कर्ष. हे सगळं असलं नसलं, तरी किमान सुखे आपल्या अंगणी वसतीला यावीत, हे त्याच्या मनात असेलच, भलेही त्याने तसे कोणाला जाणवू दिले नसेल कधी. मनी वसणारी सुखे आपल्या अंगणी उभी करण्याची उमेद त्याच्या हातात नक्कीच होती आणि आज उतारवयातही कायम आहे. आयुष्य केवळ एखाददोन प्रश्न सोबत घेऊन चालत नसते. काही प्रश्न आपल्या पावलांनी चालत येऊन दारी दस्तक देत असतात. त्यांनी उभ्या केलेल्या चिन्हांची उत्तरे शोधण्यासाठी नव्या वाटांनी जाणे घडते आणि ते कोणाला टाळता येतही नाही.
रावणमामाचे कालचे जगणे मी पाहिले आहे. आजचे जगणेही प्रासंगिक का असेना पाहतो आहे. प्रगतीच्या पट्ट्या वापरून त्याच्या यशापयशाला मोजयाचेच तर कधी उंची शोधणाऱ्या रेषांची टोके दिसतात, कधी उताराकडे सरकणाऱ्या रेषा जीवनआलेखावर अंकित झालेल्या दिसतात. असे असले तरीही त्याच्या जगण्याला सुमार का असेना उंची आहे. त्याने प्रयत्नपूर्वक स्वतःच निर्मिलेला परीघ आहे. पण दुर्दैवाने या प्रगतीचा परीघ भाकरीच्या वर्तुळावर विसावलेला आहे. भाकरीचा चंद्र त्याच्यासाठी जगातील सगळ्यात देखणा आहे.
त्याच्याशी बोलताना सहज म्हणालो, “मामा, पोरं काय कामधंदा करी राह्यनात सध्या?”
म्हणाला, “पोरगीनं लगीन करं गुजस्ता सालले. तिना नशीबकन घर गह्यरं चांगलं भेटणं! खायी-पियीसन सगळा सुखी शेतस.”
“आणि पोरं रे भो! कॉलेजमा जातस व्हतीन आते?”- मी.
दीर्घ उसासा टाकत म्हणाला, “दोन्ही पोरं करतंस वावरसमा काम. कसानं कालेज, न कसानं शिक्सन? रोजना भाकर-तुकडाना प्रश्नसमा त्यासनाकडे ध्यान देवाले माले टाईम होताच कोठे. जेमतेम दहावी शिकानात, त्याभी नापास. आसासले दुनियामा इचारस कोण? भला भला बहादर शिकीसन पडेल सेतस. आसा आर्धा-उर्धासकडे ढुकीसन तरी कोन देखंस का? नही तरी आमना बापजादासनी अख्खी हयातमा कवयं शाळानं तोंडबी देखं नही. शिकनं आमना रंगतमा नहीच. माले एक सांग, आते त्यासाठे वाईट वाटीसन काही फायदा शे का? मागला वरीसले दोन बिघानं तुकडं लिधं कवडी-कवडी जमा करीसन. वाटाले दोन बिघा पहिलेच येयेल होतं. करतंस दोनीबी पोरं वावरमा काम. कमावतंस पोट पुरतं. नहीच राहत काही काम तवयं करतस माले थोडी मदत.”
त्याच्या मनात साठलेलं मळभ मोकळं करीत राहिला. त्यातून खंतावलेपण आणि त्यालाच बिलगून असलेलं अस्पष्ट समाधान बोलण्यातून व्यक्त होत राहिलं. म्हणालो, “ठीक शे ना मग! सगळं चांगलं सुरु शे ना! घर, वावर नाववर शे. भाकर-तुकडाना, पोट-पाणीना प्रश्न सुटना, मग काय पाहिजेल? कष्टसले पर्याय नही.”
माझं बोलणं ऐकून एक दीर्घ उसासा त्याने घेतला. कदाचित कोणाकडे तरी पानं पोहचवण्याचे ओझे मनावर असेल. तोच विचार डोक्यात असेल म्हणून अस्वस्थ चुळबूळ त्याच्या देहाच्या हालचालीत दिसायला लागली. बोलणं आणखी लांबलं असतं. पण माझ्याकडेही फारसा वेळ नसल्याने संवादाला विराम दिला.
जगाचे सगळे व्यवहार सुखाच्या उताराने वाहत आहेत. सुखाचं मृगजळ साऱ्यांनाच संमोहित करीत आहे. मनी विलसणाऱ्या मोहतुंबी पाशांनी प्रज्ञा अवगुंठीत होऊन विचारांचं विश्व संकुचित होत आहे. सुखांच्या संकल्पित संकल्पनांचे वर्तुळ स्वतःभोवती कोरून त्याला सजवण्यात माणसांना आनंद गवसतो आहे. भौतिकसुखांनी त्यात नवे आभासी रंग भरले जात आहेत. ते शक्य तितके स्वतःपुरतं सीमित करण्यात धन्यता मानली जात आहे. साऱ्यांनाच पसाभर वर्तुळात सुखाचे चांदणे शोधायचा छंद लागला आहे. गावगाड्यात अशीही काही माणसे आहेत, ज्यांच्या जगण्याचा परीघ नियतीनेच आखून मर्यादा घालून दिल्या आहेत. असे असूनही हेच आपले विधिलिखित समजून, ही माणसं आपलं भावविश्व समृध्द करीत आहेत, कोणत्याही तक्रारीशिवाय. असलीच त्यांची तक्रार तर हीच की, व्यवस्थानिर्मित सुखांचं आम्ही काय घोडं मारलं की, आमच्याकडे त्यांनी ढुंकूनही पाहू नये. तुमची सुखे तुमची आहेत, हे खरं असलं तरी आम्ही तुमचे कोणीच नाहीत का? खरंतर या साध्या प्रश्नाचं सोपं उत्तर आपल्या समाजाच्या परिघात आहे. पण स्वकेंद्रित जगण्याच्या मानसिकतेमुळे कधी त्या उत्तराचे विकल्प तपासून पहायची आवश्यकता वाटत नसेल का?
रावणमामा फक्त एक व्यक्ती अथवा तिचं नाव नाही. अशी माणसं आपल्या आसपास गाव-वस्ती, वाड्या-पाड्यावर अनेक आहेत. कदाचित ती आमच्या नजरेस पडत नसतील. पडली तरी सोयिस्कर दुर्लक्ष करायची सवय करून घेतल्यामुळे पाहणे घडत नसेल. खरंतर अशी माणसं समाजाचं संचित असतात. या साध्या माणसांच्या परिश्रमावर जगाचे व्यवहार सुरळीत सुरु असतात. आपला आसपास कितीही दुभंगत असला, जगणं उसवत असले आणि स्वार्थाचा परीघ विस्तारत असला, तरी संकुचितपणाला जराही संधी न देता जगणारी ही माणसे खऱ्या अर्थाने समाजाची दौलत असतात. जगण्यावर आणि कष्टांवर श्रद्धा ठेवून काम करीत राहतात. यांच्या कष्टाला मोहोर येण्यासाठी फक्त या श्रद्धांचं रुपांतर भक्तीत होणं गरजेचं असतं. त्यासाठी समाजाने थोडं उदार व्हायला हवं. आणि हे अवघड आहे असे वाटत नाही. मान्य आहे साऱ्यांनाच सारीच सुखं मिळतील, असं नाही; पण सुखाची एखादी झुळूक यांच्या अंगणी यायला काय हरकत असावी?
***
प्रतिक्रिया
25 Mar 2017 - 5:53 am | कंजूस
आवडलं लेखन.
26 Apr 2017 - 8:25 pm | चंद्रकांत
आभार!
25 Mar 2017 - 7:29 am | प्राची अश्विनी
प्रतिभेचा प्राणवायू आवडला.
26 Apr 2017 - 8:25 pm | चंद्रकांत
आभार!
25 Mar 2017 - 11:19 am | जगप्रवासी
व्यक्तिलेखन आवडलं. त्या रावणाला प्रभू श्री रामांनी मारला पण तुमच्या रावण मामाने आमच्या काळजात घर केल
26 Apr 2017 - 8:26 pm | चंद्रकांत
आभार!
25 Mar 2017 - 11:55 am | आदूबाळ
छान! आवडलं!
26 Apr 2017 - 8:27 pm | चंद्रकांत
आभार!
26 Apr 2017 - 9:12 pm | सतिश गावडे
लेखाचा आशय आवडला. मात्र उपमा अलंकाराचा अतिरेक केला आहे.
संवादामध्ये असलेली बोलीभाषा कोणती?
आणि हो, रावणायन अनेक अध्यायात लिहिलं असतं बरं झालं असतं. :)
19 Jul 2021 - 9:30 pm | चंद्रकांत
जी, मनःपूर्वक आभार!
बोली अहिराणी आहे.
27 Apr 2017 - 12:18 am | अर्धवटराव
सामान्य माणसाचं व्यक्तीचित्रण आवडलं. वर सगा म्हणतात तसं प्रकाण थोडं जास्तच अलंकारीक झालय. पण एकुण उत्त्म आहे.
नवसाच्या पोरांना आडवळणी नावं ठेवायची पद्धत होती पुर्वी.. धोंडो भिकाजी जोशी टाईप. रावण, दुर्योधन (आमच्याच मोहोल्ल्यात या नावाचा माणुस होता ) वगैरे नावं त्याच कारणासाठी देत असावेत.
एरवी नाव आणि स्वभाव याचा काहि संबंध नसतोच. असे खास निगेटीव्ह नाव धारण करणारे एक वेळ आपल्या सामाजीक प्रतिमेप्रती थोडे जास्त सजग असावेत.
19 Jul 2021 - 9:31 pm | चंद्रकांत
जी, मनःपूर्वक आभार!
27 Apr 2017 - 5:44 am | यशोधरा
रावणमामाचं व्य्कतीचित्रण आवडलं.
19 Jul 2021 - 9:32 pm | चंद्रकांत
जी, मनःपूर्वक आभार!
27 Apr 2017 - 11:01 am | पैसा
तुमची शैली अलंकारिक आहे. जरा प्रमाण कमी असलेले मला व्यक्तिशः आवडते. तुमच्य लिखाणावर टीका करायचा हेतू नाही.
19 Jul 2021 - 9:32 pm | चंद्रकांत
जी, मनःपूर्वक आभार!
27 Apr 2017 - 11:42 am | अत्रे
रावणमामाची गोष्ट आवडली.
या वाक्याचा काही अर्थ लागला नाही.
19 Jul 2021 - 9:33 pm | चंद्रकांत
जी, मनःपूर्वक आभार!