शिकण्याच्या पद्धती (Learning methods)

मंजूताई's picture
मंजूताई in जनातलं, मनातलं
20 Apr 2017 - 5:27 pm

सेतू - अ कॉन्शस पॅरेंट फोरम तर्फे मैत्रेयीचा(समुपदेशक) शिकण्याच्या पध्दतीवर एक चर्चात्मक कार्यक्रम घेतला. मैत्रेयीने टाटा इंस्टीट्युट ऑफ सोशल वर्कमधून एमएसडब्ल्यू केले आहे. पौगंडावस्थेतील मुला व मुलींच, विवाहपूर्व व विवाहत्तोर जोडप्यांच समुपदेशन करते.
आज शिकण्याच्या पद्धती सांगितल्या, उद्या तुम्ही त्या अमलात आणल्या व लगेच मुलाचे मार्क्स वाढले असं खात्रीलायक होईलच, असं नाही पण ह्या पालकांना मार्गदर्शक नक्कीच ठरतील.
शिकण्याच्या पद्धतीत तीन महत्त्वाच्या बाबी आहेत. १) इन्फर्मेशन /माहिती २) नॉलेज/ज्ञान 3)प्रयत्न. सध्या माहिती व ज्ञानाचा भडिमार होतोय व हा भडिमार मेंदूला असह्य झाला की तो दार बंद करून घेतो मग पालथ्या घड्यावर पाणी अशी अवस्था होते. एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे माहिती व ज्ञान म्हणजे शिक्षण नाही. शिकण्याच्या प्रक्रियेत प्रयत्नाची गरज असते. उदा. सायकल चालवणे. सायकल चालवण्याचा जेव्हा प्रयत्न करतो त्या वेळेला मेंदूचे अनेक भाग कार्यरत होतात. आपण जन्माला येतो ते दोन अब्ज न्यूरॉन्स घेऊन व आपण जितक्या सतत नवनवीन गोष्टी शिकत जाऊ तितके हे न्यूरॉन्स वापरात येतात, त्यांची घट्ट जोडणी होते व ती गोष्ट कायम स्मरणात राहते. एकदा शिकलेली सायकल चालवणं वा पोहणं विसरत नाही. शिकण्यातली महत्त्वाची बाब आहे ‘एकाग्रता’’. नवीन सायकल चालवायला शिकत असतो एकाग्रता भंग व्हायला नको म्हणून कोणी बोललेलं पण चालत नाही. पण एकदा का सायकल चालवायला शिकलो की ही एकाग्रता कमी होते. जेव्हा मुलं नवीन गोष्ट शिकत असतं तेव्हा ‘फोकस’ मोडमध्ये असतं. सायकलचंच उदारहरण घेऊ. एकदा का सरावांती सायकल चालवायला आली की मुलं करामती करायला लागतं, एक हात सोडून, दोन्ही हात सोडून.. ‘धडपड… प्रयत्न…अपयश…प्रयत्न… यश’ अश्या प्रक्रियेतून ‘शिकतो’. शिकण्यातली महत्त्वाची पायरी आहे ती अपयशाची! शिकलोच नाही तर अपयश नाही. आपण पालकांची एक गंमत असते, मुलं चालणं, सायकल चालवणं शिकताना हे जे धडपडणं, अपयश हे गृहीत धरलेलं, स्वीकारलेलं असतं पण अभ्यासातलं? नक्कीच नव्याण्णऊ टक्के पालकांनी नाही. प्रयत्न थांबले की शिकणं थांबतं. अपयश आलं तरी मुलं प्रयत्न करतंय ह्याचाच अर्थ की मुलं शिकतंय आज न उद्या शिकलेच व यश ही मिळवेल पण कदाचित आपल्या अपेक्षापूर्ती करणारं नसेल पण तरी त्याला प्रोत्साहित करत राहावं. बर्‍याचदा नकारात्मक प्रोत्साहन असतं. अमका ढमका पाहा काय काय करतो…..इ.अश्या प्रकारचं नकारात्मक टाळून ते जास्त सकारात्मक, आनंददायी असेल ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पालकांनी आपल्या मुलांच्या अभ्यासात लक्ष घातलं पाहिजे ह्यात काही दुमत नाही पण बरेचदा असं आढळून येतं की पालकच विद्यार्थी बनतात, हे टाळायला हवं. मुलं स्वखुशीने शिकायला उत्सुक कसा होईल, इकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक मुलाच्या शिकण्याची, ग्रहण करण्याची पद्धत वेगळी असते.
१) व्हिज्युअल लर्नर (visual learner)ः अश्या मुलांना एकदा एखादी गोष्ट पाहिली की लक्षात राहते. अशी मुलं भरभर बोलतात त्यांना डायग्राम, चार्ट्स पटकन वाचता येतात, लक्षात राहतात.
२) ऑडिटरी लर्नर (Auditory learner) अश्या मुलांना एकदा ऐकलं की लक्षात राहतं. अशी मुलं सावकाश बोलतात. देहबोली , चेहर्‍यावरचे हावभाव वाचता येत नाही. एक उदाहरण बघू पत्ता सांगायचा आहे. इथून सरळ गेल्यावर डाव्या हाताच्या तिसर्‍या गल्लीत वळलं की चवथं घर. ऑडिटरी लर्नरला हे पटकन कळेल व्हिज्युअल लर्नर पेक्षा व तो ते डोळ्यासमोर आणेल. पण ह्याच पत्त्याचं चित्र काढून दाखवलं तर व्हिज्युअल लर्नरला पटकन कळेल.
३) केनेस्थेटिक लर्नर(Kinesthetic learner)ः अश्या मुलांना करून बघितलं की लक्षात राहतं. ही मुलं पंच ज्ञानेंद्रियांचा उपयोग करतात. ह्या मुलांमध्ये चैतन्य व उत्साह भरपूर असतो पण निर्णय क्षमता कमी असते व अगदी सावकाश बोलतात. विज्ञानात ह्या मुलांना रुची असते व ते प्रयोगशील असतात.
४) रीडिंग व रायटिंग लर्नर (Reading & Writing learner)ः ही मुलं खूप शिस्तप्रिय, योजनाबद्ध व नीटनेटकी असतात. ह्यांच्या वह्या, गृहपाठ अपूर्ण नसतो. ह्यांना समाज ‘अच्छे बच्चे’ म्हणतो पण ह्याचा अर्थ बाकीचे नसतात असा नक्कीच नाही.
५) एन्वॉर्मेंटल लर्नर (environmental learner): ह्यांच्या शिकण्यावर आजूबाजूच्या परिसराचा फरक पडतो. अश्या मुलांना शांततेचा ,अंधाराचा आवाज ऐकू येतो. काही मुलं शांततेत अभ्यास करतील तर काही रेडिओ, टीव्ही लावून.
वरच्या पाच प्रकाराला ' विद्यार्थी केंद्रित' शिक्षण म्हणतात पण शाळेत हे असंभव आहे. पालकांनी आपल्या मुलाची पद्धत ओळखून त्याप्रमाणे अभ्यास करून घ्यावा. हे प्रत्येक प्रकार प्रत्येकात असतील किंवा नसतील. हे असे एअर टाइट कंपार्टमेंट नाही. आजच संशोधन असं सांगत की वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या शिकण्याच्या पद्धती असतात, असे असले तरी मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर त्याने काही फरक पडत नाही.
मूळ मुद्द्याकडे येऊ. पालकांनी काय करावे/करू नयेः-
*एक गोष्ट लक्षात ठेवावी की सराव व मेहनतीला पर्याय नाही, त्यासाठी त्याला प्रोत्साहित करत राहावे.
*परीक्षेची चिंता व ताण असणे स्वाभाविक आहे पण त्याची नेमकी कारणं शोधली पाहिजेत जेणेकरून त्याच्या शिकण्यात बाधा येणार नाही. आनंदी वातावरणातच मुलं उत्तम तर्‍हेने शिकतं.
* मुलांनी भरपूर पाणी प्यायला हवं. मेंदू कमी पाणी प्यायल्याने अकार्यक्षम होतो.
*सकस व चौरस आहार असायला हवा. रेडीमेड डबाबंद पदार्थात प्रिझर्वेटीव्हज असतात व ती पचवायला जास्त प्रमाणात कॅल्शियम गरज असते व ती शरीराच्या वाढी ऐवजी पचनासाठी वापरली जाते.
* शिकण्यासाठी मुलाची रात्रीची आठ तासांची शांत व गाढ झोप अवश्य झाली पाहिजे. मन दिवसभरात झालेल्या घडामोडींचं संकलन शांत वेळी करत असतं. इन साईट लर्निंग रात्रीच्या वेळात होतं जेव्हा मेंदू थकून विश्रांती घेत असतो, हे संशोधनांती सिद्ध झालंय.
परीक्षेची तयारी
*एकाच दिवशी तीन तास एकच टॉपिकचा अभ्यास करण्याऐवजी तीन दिवस एक तास रोज विभागून अभ्यासावा.
*रिवीजन वेगवेगळ्या पद्धतीने करावी. उदा. लिहून दाखवणे किंवा बोलून दाखवणे. तिचं गोष्ट शिक्षक बनून समजवून सांगणे आणि तो जर का समजवून सांगत असेल तर ह्याचाच अर्थ तो विषय त्याला चांगला समजलाय व त्यामुळे त्याचा आत्मविश्वास बळकट होईल.
*अभ्यासामध्ये थोड्या थोड्या वेळाची विश्रांती/ नॅप घेऊ द्यावी.
*काही अनुत्तरित प्रश्न/कोडी झोपण्यापूर्वी द्यावीत. मेंदू झोपेतही कार्यरत असतो त्यावेळी ती शोधायचा, सोडवायचा प्रयत्न करतो. ( नववी ते बारावीचे विद्यार्थी)
* व्हिज्युअल लर्नर करिता फॉर्मुले/इक्वेशन्सचे चार्ट बनवून लावावे. ऑडिओ लर्नरकरिता रेकॉर्ड करून ऐकवावे.
*मुलाला अभ्यासाच्या वेगवेगळ्या पद्धतींतून त्याच्या आवडीप्रमाणे निवडण्याचं स्वातंत्र्य द्यावे.
*कुठल्याही तीन तासाच्या परीक्षेच्या निकालावरून त्याची बुद्धिमत्ता ठरवणे योग्य नाही. पाठी मागच्या बाकड्यावर बसणारी मुले जीवनात अव्वल, पुढे असतात असं संशोधन सांगतं कारण त्यांचा मेंदू उद्यमशील असतो त्यामुळे त्यांच्या न्यूरॉन्सची जोडणी घट्ट व मजबूत असते.
*एखाद्या वर्षी एखाद्या विषयात कमी मार्क पडले तर काळजी करू नका. त्याला न्यूनगंड देऊ नये.
*मुलं चुका करत असेल तर त्याला सांगावे की त्याच त्याच चुका करू नको, नवीन चुका कर. परत तीच चूक करतेवेळी तो सतर्क होतो… नवीन चूक… सतर्कता… अश्या तऱ्हेने सुधारणा होत जाते. चुका करणे ही शिकण्याची पायरी असते त्यावरून पुढे जाता येते.
तीन महत्त्वाच्या गोष्टी
१) चुका होतील पण त्यातूनच शिकायचे असते!
२) सराव व मेहनतीला पर्याय नाही!
३) आहार निद्रा ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या बाबी आहेत मुलं आनंदी राहण्यासाठी! आनंदी मुलं लवकर व चांगलं शिकतं!

शिक्षणलेखमाहिती

प्रतिक्रिया

सूड's picture

20 Apr 2017 - 5:50 pm | सूड

अशाच गोष्टी प्रौढ व्यक्तींच्या बाबतीत सविस्तर सांगता येतील का? नवीन गोष्टी शिकताना यांच्याबाबतीत कोणकोणत्या गोष्टींचा प्रभाव पडतो.

आदूबाळ's picture

20 Apr 2017 - 6:14 pm | आदूबाळ

+१

मला नव्या नव्या गोष्टी शिकायची लय हौस आहे. काही सहज येतात, काही अतीच कठीण जातात. असं का व्हावं हे सविस्तर वाचायला आवडेल.

हे मुलांच्या अभ्यासाविषयी आहे का? अथवा एकूणच आकलन याविषयी आहे?

मितान's picture

20 Apr 2017 - 7:03 pm | मितान

चांगला लेख मंजू ! या पद्धतींचा एकूणच व्यक्तिमत्वावर खूप प्रभाव असतो असे दिसते.
दुर्दैवाने आपल्या शिक्षण पद्धतीत अध्यापन करताना,मूल्यमापन होताना या पैकी लेखन वाचन या दोनच गोष्टींवर जास्त लक्ष दिले जाते. अनेक कायनेस्थेटिक लर्नर मुलांचे शाळेत हाल होताना पाहिलेत.
मी यात अजून एक मुद्दा ऍड करेन. ते म्हणजे आपली शिकण्याची पद्धत ही या सगळ्या पद्धतींचे कॉम्बिनेशन असते. एक मुख्य आणि बाकी सहकारी.
लेख अजून सविस्तर जास्त आवडला असता.

उपयोजक's picture

20 Apr 2017 - 8:14 pm | उपयोजक

मी visual+Kinesthetic लर्नर आहे. फक्त व्हिज्युअल किंवा फक्त ऑडिटरी किंवा फक्त कायनेस्थेटीक लर्नर कोणीही नसतो.

बोका-ए-आझम's picture

20 Apr 2017 - 7:12 pm | बोका-ए-आझम

या विषयावर अजून माहिती दिलीत तर खूपच आवडेल.

उपयोजक's picture

20 Apr 2017 - 8:04 pm | उपयोजक

मी स्वत: व्हिज्युअल स्पेशिअल लर्नर आहे. याबद्दल मी मिपावर विस्ताराने लिहिलं होतं!
www.misalpav.com/node/34414
पहिलाच लेख होता माझा.जरा तांत्रक घोटाळा झालाय तिथे.समजून घ्या!
पुन्हा एकदा लिहिणार आहे या विषयावर! कारण बर्‍याच जणांना ही संकल्पना त्यावेळी समजली नव्हती!

बरोबर ! एकच एक लर्निंग स्टाईल नसते तर एक मेजर असते बाकी सपोर्ट करतात.

नक्की लिहा याबद्दल :)

उपयोजक's picture

20 Apr 2017 - 9:04 pm | उपयोजक

इथे या शिकण्याच्या पध्दती आहेत असं लिहिलंय.पण या स्मृतिसंचयनाच्या पध्दती आहेत असं विवेक ठाकूर यांनी माझ्या त्या म्हटलंय!
या शिकण्याच्या पध्दती आहेत असं आंतरजालावर वाचायला मिळतं.
मंजुताई जमल्यास याबद्दल अधिक लिहा.

उपयोजक's picture

20 Apr 2017 - 9:07 pm | उपयोजक

इथे या शिकण्याच्या पध्दती आहेत असं लिहिलंय.पण या स्मृतिसंचयनाच्या पध्दती आहेत असं विवेक ठाकूर यांनी माझ्या त्या धाग्यावर म्हटलंय!
या शिकण्याच्या पध्दती आहेत असं आंतरजालावर वाचायला मिळतं.
मंजुताई जमल्यास याबद्दल अधिक लिहा.

प्रीत-मोहर's picture

20 Apr 2017 - 10:07 pm | प्रीत-मोहर

मस्त लेख मंजु. अजून वाचायला आवडेल. मी पण अनेक गोष्टींच्या combination मधली लर्नर आहे

पद्मावति's picture

20 Apr 2017 - 10:15 pm | पद्मावति

खुप सुन्दर आणि माहीतीपुर्ण लेख.

यशोधरा's picture

21 Apr 2017 - 3:03 am | यशोधरा

लेख आवडला.

बादवे लर्निंग स्टाइल खर्च उपयोगी आहेत का याबद्दल तज्ञांमध्ये वादविवाद आहेत. या बद्दल अधीन वाचण्यासाठी खालील लिंक्स वाचाव्यात

१. https://www.edutopia.org/article/learning-styles-real-and-useful-todd-fi...

२. Learning Styles: Concepts and Evidence

३. https://www.psychologicalscience.org/news/releases/learning-styles-debun...

अत्रे's picture

21 Apr 2017 - 6:12 am | अत्रे

खर्च -> खरंच

त्यात इन्पुट आणि आऊटपुट असंही काही असतं का?

कारण आजवर झालेल्या जर्मन परिक्षांमध्ये माझा लिसनिंग आणि रीडींग टेस्ट्स आणि रायटींग आणि स्पीकींग टेस्ट्स यांच्या स्कोर्स मध्ये कमालीची तफावत आहे. अजूनपर्यंत रायटींग आणि स्पीकींग टेस्ट्सच्या स्कोर मुळेच माझी नैय्या पार लागली आहे.

सप्तरंगी's picture

21 Apr 2017 - 5:29 pm | सप्तरंगी

माझ्याही फॉरेन लँग्वेज च्या निकालानुसार माझे लिसनिंग चे मार्क्स कमी आहेत, घरातल्यांच्या मते :
तसेही तुला ऐकून घ्यायची सवयच नाही ना , कसा असेल लिसनिंग चा स्कोर चांगला ?
घरात विचारून बघा लगेच मिळेल फुकटचा सल्ला :)

हा हा, ते आमच्या घरातले लोक सटीसहामासी ऐकवत असतात संधी मिळेल तसं.

स्रुजा's picture

23 Apr 2017 - 6:52 pm | स्रुजा

सहसा त्या लिसन आणि रीपीट वाल्या टेस्ट्स असतात - तुमची एका परीने "रीटेन्शन" पॉवर ची अ‍ॅसेसमेंट होते. एकदा ऐकुन तसंच्या तसं लिहीणे किंवा रीपीट करणे हे कितपत येतं याची टेस्ट. म्हणजे त्या थेट तुमच्या " ऐकुन घेण्याच्या" क्षमतेशी संबंधित नसून ऐकलं ते तसंच्या तसं पुढे पोहोचवण्याच्या क्षमतेशी निगडीत आहे. शिवाय या जर्मन आणि ईंग्लिश लँगवेज टेस्ट्स ज्या होतात त्या तुमची "अ‍ॅक्सेंट" शी असलेली ओळख देखील जज करतात. आपल्या कानांना त्याचा सराव होण्यास वेळ लागतोच.

मंजूताई's picture

21 Apr 2017 - 1:36 pm | मंजूताई

मैत्रेयीच्या ह्या कार्यक्रमाचं मी शब्दांकन केलंय, तज्ञ नाही.
अशाच गोष्टी प्रौढ व्यक्तींच्या बाबतीत सविस्तर सांगता येतील का? नवीन गोष्टी शिकताना यांच्याबाबतीत कोणकोणत्या गोष्टींचा प्रभाव पडतो.>>>> प्रौढ व्यक्तिंबद्दल एवढंच सांगू शकते की आपल्या आनंदासाठी व आपल्याला ज्यात रुची आहे ते शिकत राहावे.
आदुबाळ, तज्ञांचा सल्ला घ्यावा :)
कंजूस, हो मुलांसाठीच आहे म्हणून पालकांसाठी सल्ले/मार्गदर्शन आहे.
केअशु, पुढचा लेख स्मृती संचन बद्दलच आहे. तुमचा धागा वाचते
बोका, कुठल्या ठराविक गोष्टीवर वाचायला आवडेल ते सांगा... मैत्रेयीला विचारुन सांगू शकीन.
मितान, तुच अजून भर घाल ना... सूडच्या प्रश्नाचं उत्तर ही दे

आता ९५ टक्के मुलं सहा तास शाळा अधिक चार तास कोचिंग क्लासला जातात॥ ती हे कधी करणार?

nanaba's picture

23 Apr 2017 - 6:38 pm | nanaba

Coursera.org वर ह्या करता एक कोर्स आहे.

लेख आवडला. अजुन विस्ताराने नक्की वाचायला आवडेल.

पण हे खुप ढोबळमानाने केलेलं वर्गीकरण आहे का? ते सावकाश बोलतात असं दोन विभागांत तुम्ही लिहीलंय , मला त्याचा अर्थ नाही समजला.

खास करुन , केनेस्थेटिक लर्नर(Kinesthetic learner)ः अश्या मुलांना करून बघितलं की लक्षात राहतं. ही मुलं पंच ज्ञानेंद्रियांचा उपयोग करतात. ह्या मुलांमध्ये चैतन्य व उत्साह भरपूर असतो पण निर्णय क्षमता कमी असते व अगदी सावकाश बोलतात.

अशा प्रकारची मोठी माणसं माहितीची आहेत म्हणजे ज्यांना करता करता ध्यानात येतं आणि ते इतरांचं बघुन नीट इम्प्लीमेंट करु शकतात पण मी अशांची निर्णयक्षमता अपवादात्मक चांगली पाहिली आहे. सावकाश बोलतात म्हणजे काय ते कळलं नाही.

हे काही ठराविक मार्कर्स आणि थंब रुल्स आहेत का? सगळे वैशिष्ट्य सगळ्यांना लागू होतीलच असं नाही?

पैसा's picture

24 Apr 2017 - 8:09 pm | पैसा

आवडले

मंजूताई's picture

24 Apr 2017 - 8:31 pm | मंजूताई

स्न्रुजा, हे काही ठराविक मार्कर्स आणि थंब रुल्स आहेत का? सगळे वैशिष्ट्य सगळ्यांना लागू होतीलच असं नाही?>>>>> असं काही नाही. हे जनरल observation आहे. सावकाश म्हणजे धिम्या गतीने बोलतात..

रुपी's picture

25 Apr 2017 - 3:35 am | रुपी

लेख आवडला.

स्मिता चौगुले's picture

25 Apr 2017 - 10:18 am | स्मिता चौगुले

माहीतीपुर्ण लेख.

यावर आणखी विस्तारानं वाचायला आवडेल, तुम्ही किंवा आण्खी कोणी जाणकार व्यक्ती असतील तर त्यांनी मनावर घ्यावं.

सोपं आणि सुटसुटीत असूनही मुद्द्याचं मांडलं आहेत ... धन्यवाद