संशोधन गुप्त होतं म्हणून तो गप्प बसला नाहीतर ‘युरेका युरेका’ असं ओरडत नागडं पळाला असता. पण ज्याच्यामुळे या शोधाची प्रेरणा मिळाली त्या जैवशास्त्रज्ञ मित्राला बातमी देणं आवश्यक होतं. डॉक्टर नाकतोडेने शंकुपात्रात पडून असलेला मोबाईल उचलला अन लंबेला कॉल केला
“बुट्ट्या, लगेच प्रयोगशाळेत ये.”
“नंतर येतो, सध्या मी माकडांना डान्स शिकवतोय.”
“त्यांचं सोड, इथे आल्यावर तूच डान्स करायला लागशील. बेट्या तू शापमुक्त होणार आज.”
“काय सांगतोस नाकतोड्या. आलोच बघ शून्य मिनिटात.”
सातव्या मिनिटाला तो डॉक्टर नाकतोडेच्या प्रयोगशाळेत होता.
“सांग पटकन काय शोध लावलास.” तो धापा टाकत म्हणाला.
“एवढा मोठा शोध लावलाय बुट्ट्या ज्याची तू कल्पनाही करू शकणार नाहीस. लॉटरी लागलीये तुला लॉटरी.”
“गेअरपण टाकशील की गाडी रेसच करशील नुसती. मुद्द्याचं बोल.”
“ओक्के.”
नाकतोडेनं आपले दोन्ही हात एखाद्या जादूगारासारखे हवेत फिरवले अन शेजारच्या कपाटातून एक काचेची बाटली बाहेर काढली. त्यात गडद तपकिरी रंगाचा द्रव चमकत होता.
“ढँटढँ S .पेश है जनाब आपके खिदमतमे, डॉक्टर नाकतोडेज न्यू रिसर्च… मिस्टर डब्लो.”
“हे काय आता !?”
“या बाटलीतल्या रसायनाचं नाव आहे ते. हे पिलं की कोणतीही सजीव वस्तू आकाराने डबल होते.”
“सकाळी सकाळी कोणी भेटलं नाही का तुला?”
“भिकारचोटा तुझा विश्वास बसणार नाही मला माहीतच होतं. आता बघंच तू गंमत.”
नाकतोडेने कपाटातून एक पेटी बाहेर काढली. सूटकेसएवढी ती लाकडी पेटी त्याने टेबलावर ठेवली.
“अमीबा पाहिलाय का कधी?”
“पट्टीच्या पोहणाऱ्याला तू मासा पहिलाय का असं विचारतोयस. सूक्ष्मजीव मी असे खिशात घेऊन फिरत असतो. सुप्रसिद्ध बायॉलॉजिस्ट आहे म्हटलं मी.” त्याची छोटी छाती अभिमानानं फुलली.
“मग अमीबा जर तुला भेटला तर ओळखशील त्याला ?”
लंबे खांदे उडवत हसला अन आपल्या डाव्या डोळ्याकडे बोट करून म्हणाला,
“मित्रा, हा डोळा बारीक का झाला असेल असं तुला वाटतं?”
“नो आयडीया?”
“कारण तो सतत सुक्ष्मदर्शकाला चिकटलेला असतो म्हणून…आणि काय रे, अमीबा का एखादा माणूस आहे का रस्त्यात भेटायला?”
“इथून पुढे अमीबा, फंगाय तुला रस्त्यातपण भेटू शकतील. अल्गी पाण्यात पोहतांना दिसतील.”
“ते कसंकाय बुवा?!”
“इकडे ये आणि ही पेटी उघड.”
लंबे टेबलाजवळ आला. त्या तीन फूट टेबलाएवढीच त्याची उंची होती. नाकतोडेनं आधीच एक स्टूल त्याच्यासाठी मांडून ठेवला होता. तो एखाद्या बोक्याच्या शिताफीने त्यावर चढला. त्याने अलगद पेटीचं झाकण उघडलं. अन...आतली गोष्ट पाहून तो फुटभर उडालाच
“आय कान्ट बिलिव्ह धिस. इतका मोठा अमिबा !!”
“मिस्टर डब्लोच्या सहाय्याने मी त्याला बराचपट मोठा केलाय. आता तुला सूक्ष्मजीव मोठाले करून पाहण्याची गरज नाही. तुझं सूक्ष्मदर्शक विकून टाक OLX वर.”
लंबे मात्र एकटक अमिबाकडे पाहत होता. पेटीत त्या एकपेशीय सजीवाची हालचाल होत होती.
“हे तर भन्नाटच आहे यार.” त्याने वळून पाहत म्हटलं. अन समोरचं दृश्य पाहून त्याची भीतीने बोबडी वळली, पाय लटलट कापू लागले. टेबलावर, त्याच्या अगदी समोर वाघ बसला होता !! तो रागाने लंबेकडेच पाहत होता. लंबेनं घाबरुन स्टुलावरून खाली उडी मारली. त्याची ही स्थिती पाहून नाकतोडे खळखळून हसायला लागला.
“घाबरू नको बुट्ट्या, मांजर आहे ती. तीन वेळा मिस्टर डब्लो पाजला तिला. नाऊ शी इज एट टाइम्स लार्जर दॅन ओरिजिनल.”
त्याला दुजोरा देण्यासाठीच की काय, त्या वाघाने ‘म्याऊ’ असा आवाज काढला.
“आतल्या खोलीत मांजराएवढे उंदीर अन उंदराएवढे झुरळं आहेत. काही दिवसांनी बघ, मी माझ्या कुत्र्याच्या पाठीवर बसून कामावर येत जाईल. हा, तो घोड्यासारखं खिंकाळणार नाही म्हणा.”
नाकतोडे घोड्यासारखं खिंकाळत हसला.
लंबे संमोहित झाल्यासारखा टकामका मिस्टर डब्लोकडे पाहत होता. बाटलीला स्पर्श करण्यासाठी त्याने हात पुढे केला
“हात नको लावू. मौल्यवान वस्तू आहे ती. मलाच हाताळावी लागेल.”
नाकतोडेने बाटली पुसूनपासून जागेवर ठेवली.
“नाक्या, मला उंच करशील? पलीSSज.”
“त्यासाठीच तर तुला बोलावलंय; फिकर नॉट.”
“थँक्स यार.”
“मला सांग, उंच झाल्यावर तू सगळ्यात आधी काय करशील?”
“जानूला भेटीन”
“कोण ही जानू?”
“तिचं नाव जान्हवी आहे पण प्रेमाने मी तिला जानू म्हणतो. आमची फेसबुकवर ओळख झाली. आधी चॅटींग झालं नंतर मोबाईल नंबर घेतला. तुला तर माहितीये न मी बोलण्यात किती हुशार…”
“चभरा.”
“ओके चभरा आहे ते. याच कौशल्याच्या आधारावर पटवलं तिला.”
“अरेरे. प्रॉब्लम काय आहे.”
“आता ती भेटायचं म्हणते.”
“मग भेट ना.”
“तीच तर गोची आहे न यार. मी टॉल, डार्क अँड हॅण्डसम आहे असं सांगितलं होतं तिला.”
“लाज वाटते का रे बुट्ट्या तुला. अंथरुण पाहून तरी पाय पसरायचे.”
“जे झालं ते झालं. मला पटकन तुझा डब्लो पाज. उंच होतो अन जातो तिला भेटायला.”
“अरे थांब थोडं. एवढा उतावळा होऊ नको.”
“नाही मित्रा. हा भार असह्य झालाय आता..तीन फूट उंची असूनही लोक दीडफूट्या म्हणतात मला. आजपर्यंत माझ्या कतृत्वाचीच उंची मोठी होती. आता शरीराचीपण होऊ दे. माझं लंबे हे नाव सार्थक होऊ दे.”
“शंभर टक्के होईल. पण लगेच नाही. माणसांवरील वापराआधी अजून काही टेस्ट कराव्या लागतील.”
तेवढ्यात लंबेचा फोन वाजला
“डॉक्टरसाहेब, कुठे आहे तुम्ही?” पलिकडचा आवाज.
“बाहेर आहे. काय झालं?”
“तुम्ही गडबडीत पिंजऱ्याचा दरवाजा उघडा टाकला. रिसर्चला ठेवलेले माकडं पळून गेले.”
“धर त्यांना. मी शून्य मिनिटात आलो.”
“नाक्या, मी पळतो आता. भेटू नंतर.” असं म्हणून तो माकडासारख्या उड्या मारत निघून गेला; पण जाताजाता त्याने हातचालाखीने मिस्टर डब्लोची बाटली खिशात टाकली होती.
* * *
डब्लोची बाटली चोरीला गेल्याचं नाकतोडेला लवकरच कळालं. एकतर त्याचा शोध गुप्त होता अन दुसरं म्हणजे अजून काही चाचण्या बाकी होत्या. नसता आगाऊपणा केल्यामुळे तो लंबेवर खूप चिडला होता. त्याने लंबेला बरेच कॉल केले पण त्याचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. लंबे ज्याठिकाणी सापडू शकतो त्या प्रत्येक ठिकाणी तो गेला; पण काहीच फायदा झाला नाही. शेवटी तिसऱ्यांदा त्याच्या घरी चक्कर मारली तेव्हा दरवाजा उघडा दिसला. दरवाजा ढकलून तो घरात गेला. पण आत कुणीच नव्हतं. घरभर फिरुन त्याने आवाज दिले.
“नाक्याS.” क्षीण आवाजात प्रत्युत्तर मिळालं.
“कुठेय तू?”
“इथेच आहे.”
आवाज तर जवळूनच येत होता पण दिसत कुणीच नव्हतं.
“इथे म्हणजे कुठे?”
“किचनच्या ओट्याखाली.”
नाकतोडेने ओट्याखाली वाकून पाहिलं. तिथे जेमतेम दिडफूट उंचीचा लंबे उभा होता!
“आयला तू छोटा कसाकाय झालास ?!! निम्माच उरलास तू तर.”
“शीट…तुझं औषध पिलं अन बुट्टा झालो यार अजून.”
“तुला म्हटलं होतं घाई करू नको. माणसांवरच्या टेस्ट बाकी आहेत अजून. पण तू कसला ऐकतोस. उथळ बुद्धीचा बटू मानव.”
“जे झालं ते झालं. मला पुन्हा पहिल्यासारखं बनव.”
“माझ्या हातात का जादूची कांडी आहे का? अजून रिसर्च करावा लागेल, काही रासायनिक संरचना बदलाव्या लागतील.”
“बदल ना मग पटकन.”
“आधी मला सांग, तू माझा रिसर्च का पळवलास?”
“सिंपल आहे. मला गरज होती त्याची.”
“अरे लेकरा पण मीच तुला ते पाजणार होतो न.”
“ते सोड. मी तुझा रिसर्च पळवला न. तूपण माझा एखादा रिसर्च पळव. खुश? पण आधी मला उंच कर.”
“चारपाच दिवस थांब. मी इलाज शोधून काढतो.”
“तोपर्यंत मी काय करणार ?”
टिंग टॉंग.
उत्तराऐवजी दारावरची बेल वाजली. दोघेजण त्रासिक चेहऱ्याने हॉलमध्ये गेले. लंबेने दरवाजाच्या फटीतून बाहेर पाहिलं.
“ओ माय गॉड, जानू आली.”
“ती कशीकाय आली ?!”
“मीच तिला बोलावलं होतं. म्हटलं उंच होऊ अन भेटू तिला.”
टिंग टॉंग टिंग टॉंग
परत एकदा बेल वाजली.
“नाक्या काहीतरी कारण सांगून तिला कटव. मी लपतो इथे कपाटात.”
“अरे पण…”
“बेस्ट ऑफ लक.”
नाकतोडेने नाईलाजाने दरवाजा उघडला. त्याने पाहिलं अन तो पाहतंच राहिला. समोर सर्वांगसुंदर मदमस्त तरूणी उभी होती.
“हाय.”
“हा..य. लंबे सध्या घरी…”
पण त्याचं वाक्य पुर्ण व्हायच्या आत तिने त्याचा गालगुच्चा घेतला
“वर्णन केलं होतं अगदी तसाच आहेस. टॉल, डार्क अँड हॅण्डसम.”
“तो लंबे तिकडे छोटा…”
“छोट्यामोठ्या गोष्टी विसरून जा रे. मीपण विसरून जाते. बिकॉझ आय लव्ह यू बेबी.”
ती लाडिकपणे त्याच्या गळ्यात पडली. आनंदाने त्याचा श्वास गुदमरला.
‘मी तुझा रिसर्च पळवला..तूपण माझा एखादा रिसर्च पळव.’
लंबेचं वाक्य त्याला आठवलं.
“आय लव्ह यू टू.”.त्याच्या तोंडून नकळतपणे शब्द बाहेर पडले.
‘दण दण दण’
कपाटाच्या आतून आवाज आला.
“सॉरी मी तुला वेळ देऊ शकलो नाही. पण आता काही दिवस फक्त तुझ्याबरोबर घालवणार.”
“आणि तुझा रिसर्च ?”
“तो काही दिवस बंद.”
कपाटाच्या आतून येणारा आवाज अजून वाढला.
“कसला आवाज आहे हा?”
“काही नाही गं, उंदीर खूप झालेत. चल आपण बाहेर फिरायला जाऊ.”
अन तो बुट्ट्याच्या रिसर्चला घेऊन हसतखिदळत बाहेर पडला.
प्रतिक्रिया
28 Mar 2017 - 11:05 am | उगा काहितरीच
हाहाहाहा ! मस्त कथा .
28 Mar 2017 - 11:41 am | प्राची अश्विनी
सही आहे.:)
28 Mar 2017 - 12:37 pm | लॉरी टांगटूंगकर
==)) =)
मजा आली! धन्यवाद.
28 Mar 2017 - 12:47 pm | संजय क्षीरसागर
.
28 Mar 2017 - 12:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर ! शेवट मस्तं.
28 Mar 2017 - 12:58 pm | संजय पाटिल
हा हा हा...
28 Mar 2017 - 1:13 pm | संजय पाटिल
मिस्टर डब्लो चा मिस्टर हाफ्लो झाला वाटतं..
28 Mar 2017 - 1:02 pm | अॅस्ट्रोनाट विनय
सॉरी शेवटच्या दोनतीन ओळी चुकून कट झाल्या कथा टाकताना. संपादनाची सोय नसल्याने उरलेला भाग खाली टाकला आहे. कृपया गोड मानून घ्यावे -
पण आता काही दिवस फक्त तुझ्याबरोबर घालवणार.”
“आणि तुझा रिसर्च ?”
“तो काही दिवस बंद.”
कपाटाच्या आतून येणारा आवाज अजून वाढला.
“कसला आवाज आहे हा?”
“काही नाही गं, उंदीर खूप झालेत. चल आपण बाहेर फिरायला जाऊ.”
अन तो बुट्ट्याच्या रिसर्चला घेऊन हसतखिदळत बाहेर पडला.
28 Mar 2017 - 1:32 pm | एमी
हा हा हा :-D लय भारी!!
28 Mar 2017 - 2:35 pm | अॅस्ट्रोनाट विनय
मिस्टर डब्लो चा मिस्टर हाफ्लो झाला वाटतं..
>> :)) आधी झाला होता हाप्लो पण आता पूर्ण आहे. मिपाच्या मसीहांना मिस्टर डब्लोची बॉटल पाठवली अन त्यांनी लगेच संपादन केलं. उनको थेँक्स
28 Mar 2017 - 3:52 pm | मराठी कथालेखक
मस्त ..
28 Mar 2017 - 4:32 pm | पैसा
=))
28 Mar 2017 - 5:23 pm | सुमीत
रिसर्च पळवला, मजा आली. भन्नाट विनोदी
28 Mar 2017 - 5:30 pm | सस्नेह
गोष्ट भारी आणि चित्र लै भारी !
28 Mar 2017 - 5:36 pm | अत्रे
मस्त आहे कथा. :)
28 Mar 2017 - 5:41 pm | एमी
चित्र कुणी काढलय?? लै भारी आहे.
28 Mar 2017 - 7:47 pm | अॅस्ट्रोनाट विनय
जन्मजात कार्टून असलेला माझा एक कार्टुनिस्ट मित्र आहे. त्याच्या मित्रप्रेमाला एकदा भरती आली होती. मला बोलला तुझ्या कथांसाठी काही चित्र काढून देतो. त्यापैकी एक चित्र आहे हे. दुसऱ्या चित्राची size जास्त असल्याने upload झालं नाही
29 Mar 2017 - 4:50 am | एमी
छानच आहे चित्र! पण ज्याचे श्रेय त्याला द्यावे म्हणून मित्राचे नाव/गैरवापर होऊ नये म्हणून वॉटरमार्क, कॉपीराइट चित्रावर यायला हवा होता असे वाटते.
मिपावर अभ्या, डांगेअण्णा जी चित्र काढतात त्यात काय करतात?
===
आषाढ_दर्द_गाणे, अओ ते मारवा गंमत करतायत ओ :-D
29 Mar 2017 - 11:33 am | अॅस्ट्रोनाट विनय
ज्याचे श्रेय त्याला द्यावे
>> पुढील वेळी लक्षात ठेवीन :)
28 Mar 2017 - 6:18 pm | मितान
=))
28 Mar 2017 - 8:27 pm | मारवा
तात्काळ काढुन टाकावे किंवा कीमान एडीट तरी करावे. हे चित्र जणु उघड उघड बेबंद अनिर्बंध होउ पाहत असलेल्या , चंगळवादी, भैौतिक सुखासाठी ह पाप लेल्या, मायेत गुरफटलेल्या, जिच्या उरात केवळ विषया ची च स्पंदने हेलकावे घेतायेत अशा निर्लज्ज उन्मादी संसक्रूती चे उद्दाम प्रतीक आहे.
कुठे नेवुन ठेवली मिपा माझी ?
29 Mar 2017 - 6:58 am | अॅस्ट्रोनाट विनय
:)))
29 Mar 2017 - 8:44 pm | कपिलमुनी
फारच खोलात घुसलात =))
28 Mar 2017 - 8:50 pm | मारवा
संशोधन करत राहणे कीती महत्वाचे हे यातुन समजते.
निरपेकशपणे संशोधनाचे बी रूजवत रहावे फळे कोणी ना कोणी चाखेलच हा आशावाद यातुन मिळतो.
ना कोणी लहान ना कोणी महान हे तत्व ही कथा शिकवते. हे छोटट हे मोठ या शूद्र मानसिकतेतील व्यर्थता ही कथा दाखवुन देते.
29 Mar 2017 - 12:58 am | आषाढ_दर्द_गाणे
कथा झक्कास!
माझ्यापुरते बोलायचे तर मला तरी चित्र काही अश्लील वाटले नाही.
आणि ते काढून वगैरे टाकायची गरज वाटत नाही.
अर्थात अश्लीलता हि व्यक्तिसापेक्ष आहे. त्यामुळे इतरांचे मत वेगळे असू शकते.
त्याचा आदर/मान्यता इत्यादी...
मी पहिल्यांदा कथा वाचली तेव्हा चित्राचे प्रयोजन उमगले नव्हते. मोबाईलवर वाचल्यामुळे असेल कदाचित.
पण नंतर 'जानूला पाहता पाहता सद्सद्विवेकबुद्धी गहाण ठेवणारा नाकतोडे' हा क्षण त्यात चपखलपणे पकडल्याची जाणीव झाली आणि चित्र आवडले.
रच्याकने, चभरा म्हणजे काय?
29 Mar 2017 - 8:55 pm | पिलीयन रायडर
आमच्याकडे त्याला "चाबरा" म्हणतात.
कथा गंमतशीर आहे!
29 Mar 2017 - 6:56 am | अॅस्ट्रोनाट विनय
चभरा म्हणजे बोलका पोपट
29 Mar 2017 - 5:17 pm | राजाभाउ
मस्त कथा. विनोदी साय फाय.
29 Mar 2017 - 9:30 pm | किसन शिंदे
हाहाहा!! भारी आहे कथा.
रच्याकने आमच्याकडे 'चाभरा' म्हणतात चुरूचुरू बोलणा-या व्यक्तीला.
29 Mar 2017 - 10:57 pm | एस
भारी!
30 Mar 2017 - 12:20 pm | चिनार
मस्त कथा!!!!