[खो कथा] पोस्ट क्र. ४

निशदे's picture
निशदे in जनातलं, मनातलं
21 Mar 2017 - 10:19 pm

--------------------
[खो कथा] पोस्ट क्र. १
[खो कथा] पोस्ट क्र. २
[खो कथा] पोस्ट क्र. ३
--------------------

भाग चौथा:
आता या सगळ्या राड्यातून फक्त खुदीरामच वाचवू शकेल. मोबाईलवर मेसेज पाहिला. फक्त एक पत्ता लिहिला होता तिथे. पांडवगडाच्या लेण्यांच्या खाली एक झोपडी होती. तिथे जाऊन पोचलो. आत जाऊन बघतो तर खुदीराम बिडीचे झुरके भरत बसला होता.
"साल्या, काय केलेस मला? डोक्याला कसला भुंगा लावून ठेवला आहेस?"
"मैने क्या किया? तुला पाहिजे होतं त्याची किंमत घेतली आणि दिलं तुला..." खुदीराम हसत बोलला.
"काय चेटूक केलंस त्या आरशात? आणि मला इथे कशाला बोलावलंस?" त्याचं हसणं अन् माझा संताप वाढायला लागला.
"बोलावलं???? मैने नही बुलाया तुझे..... "
(क्रमशः)

***************
मी अजून हसतच होते. शशिकांतचे मित्र सगळे अवलियाच आहेत की. आणि इतकी वर्षं येताएत नाशकात तर लेणी कशी नाही पाहिली? आम्हाला दोघांना लेणी दाखवायला आणलं आणि स्वतः कुठे गायब झाले? केसांची बट उगाचच सावरत मी पुढे निघाले.
"शालू, तुला आरसा हवाय का?"
"लेण्यांत आरसा?"
"लेण्यात नाही. मला एका चेटूक बाबाजीने दिला. बायकांनी बघायचा नसतो म्हणे!"
चेष्टा करताएत का माझी? माझा विश्वास नाही असल्या गोष्टींवर माहित आहे की याला..... याने आणि शशिकांतने मिळूनच प्लॅन केला असणार माझ्या चेष्टेचा.
"दाखव की. कसले चेटूक होते म्हणे त्याने?"
अशोकने हसत हसत त्याच्या बॅगमधून एक आरसा काढला. जेमतेम ८-१० इंचाचा आकार असेल त्याचा. पण चारही कडा सोनेरी नक्षीकामाने बंदिस्त केल्या होत्या. लेण्यांमध्ये बर्‍यापैकी अंधार असल्याने नक्षी नीट दिसेना.
"नीट दाखव की आरसा. थांब माझ्या मोबाईलचा लाईट लावते" एव्हढे म्हणून मी माझा मोबाईल चालू केला.
पुढचे काही कळलेच नाही. एकदम संपूर्ण लेणी उजेडाने लखलखून निघाली. आरशाच्या उजेडाने आम्ही डोळेच मिटून घेतले. डोळे उघडले तर मी गडावरून खाली फेकली जात होते. एक मोठ्ठी किंकाळी फोडून मी बेशुद्धच पडले.
डोळे उघडले तर घरातच होते. ही काय भानगड? हा शेजारी बसलेला शशिकांत इतका थकलेला का वाटतोय? आणि अशोक कुठे गेला?
***************

भाग चौथा:
च्यायला काहीच समजेनासे झालेले. खुदीरामने अजून पाच हजाराला बुडवला. आरसा विकत दिला. पण मी कशाला घेतला परत? कोण कोणाला बांबू लावतोय काही कळत नाही. बाहेर येऊन सिगरेट पेटवली. सगळ्या राड्यात शर्ट मळला होता. गाडीत एक्स्ट्रा कपडे असतातच. आरशात बघूनच शर्ट बदलायला लागलो. एकदम गडावरून किंकाळी ऐकू आली. वर पाहिलं तर काहीच नव्हतं. सायको झालोय आपण. डॉक्टरकडे जायचा विचार आला तसाच झटकला. काय वेडे झालो का काय डॉक्टरकडे जायला?
आरसा मागच्या सीटवर ठेवला. सिगरेट संपवली अन् खायला हॉटेल शोधायला लागलो.
(क्रमशः)

***************
रात्रीच्या वार्‍यात बिब्ब्याचा अन् मोहरीचा वास तडतडत होता. झोपडीच्या आत आवाज चढले होते.
"देख खुदीराम, दोस्त है वो मेरा...... "
"वा रे वा...... आता दोस्ती आठवली तुला. माझ्याशी दोस्ती केलीस त्याचं काय मग?"
"त्याचा काही संबध नाही त्याच्याशी. आणि तुला काय झाले याच्याशी माझा काही संबंध नाही"
"तुझा संबंध नाही? एक बात मत भुलो शशिकांत...... या दुनियेत तू आणलंस मला आणि आता खुशाल पलटी मारतोस? ही जागा, हे आयुष्य माझं नाही आणि मी इथे राहणार नाही."
"अरे हरामखोरा, त्यासाठी माझ्या आयुष्याचं वाटोळं करणार आहेस का?"
"तुझं आयुष्य?" खुदीराम खदाखदा हसायला लागला. "अरे दुबळ्या, तुझ्यात इतकी ताकद कुठली? माझ्या लक्षात आधीच यायला हवं होतं. हरकत नाही. तुझ्या दोस्ताकडून मात्र माझं आयुष्य परत मिळवीनच."
"बघतोच मी कसा हात लावतोस माझ्या दोस्ताला. आत्ता बोलावून घेतो इथे."
शशिकांतने मोबाईलवरून मेसेज केला.
पुढे कोणी काही बोलण्याआधीच खुदीरामने आरसा समोर धरला. झोपडीतल्या एव्हढ्याश्या मेणबत्तीनेसुद्धा आरसा उजळून निघाला. त्याच्या उजेडापासून वाचण्यासाठी शशिकांतने डोळ्यावर हात धरला......
***************

भाग चौथा:
जेवणसुद्धा बकवासच निघाले. अर्धं तसंच गिळलं आणि उठून शशिकांतच्या घराकडे चालायला लागलो. पुन्हा पहिल्यासारखं सामसूम घर. दरवाज्यावर ठॉकठॉक केले. कोणीच नाही उघडला. दोनतीनवेळा तसंच केलं. शेवटी कंटाळून एक लाथ घातली दरवाज्याला तर तसाच उघडला. म्हणजे उघडाच होता की च्यायला! इतक्या रात्री? हॉलमधे गेलो तर पूर्ण अंधार. मोबाईल गाडीत. दिव्याची बटनं शोधायलाही वेळ लागला. बटन दाबल्यासरशी सगळा हॉल मंद पिवळ्या रंगात चमकायला लागला. समोरच्या पांढर्‍याशुभ्र सोफ्यावर रक्ताचे डाग दिसले. चरकलोच. सोफ्याच्या मागे डोकावलो. काचेचे असंख्य तुकडे सर्वत्र विखुरले होते. रक्ताचे पाट फरश्यांमधल्या चिरांतून सगळीकडे वाहत होते. एका हातात एक तुकडा अन् दुसर्‍या हातात काच नसलेला नुसताच सोनेरी प्रभावळीचा आरसा घेऊन गळा चिरलेल्या अवस्थेत शालू पडली होती.

कथा

प्रतिक्रिया

एस's picture

21 Mar 2017 - 10:25 pm | एस

पुढचा खो कुणाला?

निशदे's picture

22 Mar 2017 - 1:17 am | निशदे

दीपाक११७७ यांना...... ऑल द बेस्ट!!!!

शेवटचा डाव's picture

22 Mar 2017 - 1:23 am | शेवटचा डाव

कितवा भाग

निशदे's picture

22 Mar 2017 - 1:26 am | निशदे

ते दीपकच ठरवतील.

काही कळेना झालंय मला तर.

इतर कोणालाही असं होतंय का?

आषाढ_दर्द_गाणे's picture

22 Mar 2017 - 12:13 am | आषाढ_दर्द_गाणे

+१
मलाही...

साहेब..'s picture

22 Mar 2017 - 8:50 am | साहेब..

मलाही...

पिलीयन रायडर's picture

21 Mar 2017 - 11:22 pm | पिलीयन रायडर

तुम्ही लोक चढवत चालला आहात मजल्यावर मजले.. कुणाला तरी ह्याचा शेवट करायचा आहे हे ही लक्षात आहे ना?!!
आता गोष्टीची उकल व्हायला सुरूवात व्हायला हवी..

पुढचा खो कुणाला?

ज्योति अळवणी's picture

22 Mar 2017 - 12:02 am | ज्योति अळवणी

नाही समजला हा भाग

अॅस्ट्रोनाट विनय's picture

22 Mar 2017 - 1:07 am | अॅस्ट्रोनाट विनय

हा Multi Dimensional Reality चा मामला दिसत आहे. छान. विज्ञानकथांमध्ये कमीवेळा स्पर्शीली गेलेली थियरी तुम्ही बाहेर काढलीत. आधीचे धागेपण जोडले आहेत. बऱ्याच दिवसांत असं झणझणित वाचलं नव्हतं

पैसा's picture

22 Mar 2017 - 11:14 am | पैसा

सहमत. लै आवडले. शेवट करणार्‍याचा कस लागणार आहे.

शेवटचा डाव's picture

22 Mar 2017 - 1:21 am | शेवटचा डाव

या पुर्वीच्या सर्वा भागांची व्यवस्तीत ऊकल मस्त

काही समजले नाही. आता पर्यंत छान चालले होते. :-(

प्राची अश्विनी's picture

22 Mar 2017 - 11:51 am | प्राची अश्विनी

+11

प्राची अश्विनी's picture

22 Mar 2017 - 12:04 pm | प्राची अश्विनी

Sorry, हा प्रतिसाद पैताईच्या प्रतिक्रियेला होता.

बरखा's picture

22 Mar 2017 - 3:13 pm | बरखा

सगळेच भाग छान झालेत. पुढ्च्या भागांच्या प्रतिक्षेत.....

Ranapratap's picture

22 Mar 2017 - 6:25 pm | Ranapratap

खो खो मध्ये जितके खेळाडू तेवढे खो झाले पाहिजेत. हाही भाग सुंदर झाला. थोडी लिंक तुटली होती पण पुन्हा सगळे पहिले भाग वाचले.