तशी शंकरकाकांची आठवण हल्ली क्वचीतच निघते. पण पितळी समई दिसली की हटकून शंकरकाका आठवतात.
शंकरकाका आजोबांचे मित्र. रंगानं सावळे.अंगात भोका भोकांचं फाटकं गंजीफ्रॉक, गुडघ्याच्या वर गुंडाळलेलं मळकट पांढर धोतर, कानापाशी तेव्हढे पांढरे तुरळक केस. बाकी गुळगुळीत टक्कल. पांढऱ्या मिशीखाली जाड काळे ओठ, मान खाली झुकलेली. ते कधीच चपला वापरत नसत. अनवाणी फिरत. घरी आले की "तात्यानु" अशी घशात काहीतरी अडकल्यासारखी हाक मारत. ती ऐकल्यावर हे खाकरून का नाही घेत असं सारखं वाटत राही. पण त्यांचा आवाजच तसा होता. त्यांना खरूज होती. त्यामुळं ते घरात आलेले आज्जीला फारसं आवडत नसे. पण आजोबांपुढं तिचं काही चालायचं नाही. आजोबांची आणि त्यांची ओळख आज्जीच्या लग्नाआधीपासूनची. त्या दोघांची मैत्री म्हणजे सगळ्यांना एक कोडंच वाटायचं. आजोबा एवढे शिकलेले, गावातले प्रतिष्ठित वजनदार व्यक्ती तर शंकरकाका अडाणी, गरीब, पडेल ती काम करणारे मजूर. अगदी दोन टोकं.
आजोबानी गावात घर घेतलं तेव्हा घरासमोर एक पिंपळ होता. पिंपळाचं मूळ घराला कमजोर करतं म्हणून आजोबानी तो तोडायचं ठरवलं. पण गावातला एकही माणूस या कामाला तयार होईना. कारण जो पिंपळ तोडतो त्याचा निर्वंश होतो ही समजूत. आजोबांचा यावर विश्वास नव्हता. शेवटी आजोबानी स्वतः हातात कुऱ्हाड घेतली आणि तोडायला सुरुवात केली. ते बघायला अख्ख गाव जमलं. काही जण हे अघोरी कृत्य करण्यापासून त्यांना परावृत्त करू लागले. पण आजोबा थांबले नाहीत. शंकरकाका पण त्या गर्दीत होते. थोडयावेळानं ते पुढं आले, "तुमच्या हातात कुऱ्हाड शोभणा नाय द्येवा माका ती", म्हणून त्यांनी झाड तोडून दिलं. आजोबांचे आणि त्यांचे स्नेहाचे धागे बहुतेक इथेच जुळले असावेत.
ते व्यवसायानं तेली होते. त्यांचा तेलाचा घाणा होता. पण त्या शिवाय ते अनेक कामं करत. नारळ काढणं, झापं विणणं, घरं शाकारणं, मातीच अंगण करणं वगैरे वगैरे. त्यांनी केलेलं प्रत्येक काम बघण्यासारखं असं देखणं असे. गावात या बाबतीत त्यांची ख्याती होती. नारळ उतरवायचे झाले की ते तयार नारळच काढायचे, चुकूनही शहाळं पाडणार नाहीत. सुकी चुडतं न सांगता खाली काढत. एवढंच नाही, काढून झाल्यावर सगळे नारळ गोणत्यात भरून घरात आणून ठेवणं, चुडतं, पोयी वगैरे न्हाणीकडं उभी करून ठेवणं, वगैरे अगदी पूर्ण काम करायचे. झापं तर इतकी सुंदर वळत की त्या नक्षीकडं बघत राहावं. आई नेहमी म्हणे, काम कसं करायचं? शंकर काकांसारखं. व्यवस्थित आणि पूर्ण.
आमच्या घरात त्यांचं नाव बऱ्याचदा घेतलं जाई. जेवताना आम्ही आजीकडे हट्ट धरायचो. "आजी गोष्ट सांग ना!" मग आजी रंगात येऊन गोष्ट सुरु करायची. बऱ्याचदा आमची जी सवय आजीला आवडत नसे त्यावर त्यादिवशीची गोष्ट असायची. उदाहरणार्थ जेवताना उजव्या हाताने फुलपात्र पकडणे, आजूबाजूला उष्टं सांडवणे. गोष्ट शंकर तेल्यावर रचलेली असे. आजी सांगायची, "शंकर तेल्याला की नाही, एक सवय होती, दोन्ही हातांनी जेवायचं. एकदा आपल्याकडं मुंजीचं जेवण होतं, ही भली मोठी पंगत बसली होती. (इथे त्या पंगतीचं वर्णन ), शंकर तेली पण होताच त्यात. वगैरे वगैरे ." .... यातल्या किती गोष्टी खऱ्या ते मला अजूनही माहित नाही. पण शंकर काका या ना त्या प्रकारे आमच्या घरातील नेहमीची व्यक्ती होती. कौलं , पन्हळ बदलणे, नारळ काढणे, पावसाळ्यानंतर परडं साफ करणे, अंगण सारवायला शेण आणून देणे , नीरफणस, सुपाऱ्या, आंबे काढणे अशा काही ना काही कामासाठी ते बऱ्याचदा येत.
आपणहून ते कधीच काही मागत नसत. अगदी हक्काची मजुरीसुद्धा. मजुरी किती द्यायची असं विचारलं तर "तुमीच काय ता द्येवा " हे उत्तर. पण आजोबा त्यांना नेहमी जास्त पैसे देत. आणि आजोबानी पैसे दिले की,"यवढे कित्याक? नको नको कमी करा पाहू." म्हणून शंकरकाका हट्ट धरत. दिलेले पैसे कमी करा म्हणणारा असा अत्यंत अल्पसंतुष्ट माणूस मी आजपर्यंत कधी पहिला नाही. पण एक दिवस शंकरकाका आजोबांना म्हणाले, "तात्यानु, माका समई व्हयी. गणपती इले हा." ते गणपतीचे दिवस होते. कोकणात गणपती हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा सण. आजकाल घरोघरी गणपती असतो, पूर्वी नसायचा. पण कोकणी लोकांचा खटपणा भारी. ज्याला घरी गणपती ठेवायचा नाही त्यालाही तो ठेवायला नाही लावला तर तो कोकणी माणूसच नव्हे. मग त्याच्या दारी आदल्या रात्री गुपचूपपणे कुणीतरी गणपतीची छोटी मूर्ती आणून ठेवी. आता दारी आलेल्या गणपतीला नाही कसं म्हणणार? लोक तसे श्रद्धाळू होते. मग त्या घरी गणपती बसवणं सुरू होई. गावातले बहुतांश गणपती असे सुरू झाले. तर कुणीतरी असाच शंकर काकांच्या दारावर गणपती ठेवला होता. देवांचं धड स्वागत करायला त्यांच्या घरी काहीच नव्हतं. त्यांना आजोबांची आठवण आली . आमच्याकडे पुरुषभर उंचीच्या नक्षीदार पितळी समया धूळ खात पडल्या होत्या. आजोबानी काही न विचारता त्या शंकरकाकांना देऊन टाकल्या.
समया आजोबांच्या, दिल्याही त्यांनीच. कधी कधी मला वाटतं आजोबा पण काय, इतक्या सुंदर समया अशा कशा देऊन टाकल्या? कारण आज तशा समया विकत घेणं अशक्य. पण मग अजून एक प्रसंग आठवतो. अडनिड्या वयात वाईट संगतीला लागलो होतो. असाच एकदा लपून छपून सिगरेट ओढताना शंकर काकांनी बघितलं. बापरे! त्यांना बघून माझ्या हातातली सिगरेट गळून पडली. त्यांनी घरी सांगितलं तर काय महाभारत होईल या भीतीमुळे निव्वळ या भीतीमुळेच मी पुन्हा त्या मार्गाला लागलो नाही. शंकर काकांनी घरी सांगितलं नव्हतं. कदाचित त्यांनी मला ओळखलंही नसेल. पण कळत नकळत माझ्या आयुष्याला त्यांनी जे वळण दिलं त्यापुढं समयांचं मोल कसं करणार ?
आमच्या घरी सगळ्या जमिनी शेणाच्या होत्या. त्या, तसेच अंगण काही वर्षांनी धोपटून सारख्या कराव्या लागत. ते काम अर्थातच शंकरकाकांकडं असे. नंतर जमिनी सिमेंट किंवा रंगीत कोब्याच्या करायची फॅशन आली. शंकरकाकांनी कुठूनतरी ते शिकून घेतलं. आणि ते आजोबांकडे आले. "तात्यानु आता जमिनीक कोबो करून घेवा. मी करतंय." आमच्या घराला बावीस खोल्या. त्या सगळ्या सिमेंटच्या करायच्या तर खर्च परवडण्यासारखा नव्हता. आजोबांनी नकार दिला. पण हळूहळू गावातली घरं कोब्याची होऊ लागली. शंकरकाकांची ती स्पेशालिटीच बनली. एकदा त्यांना गावातल्या एका डॉक्टरचं काम मिळालं. पण मग नक्की काय बिनसलं कोण जाणे पण ते काम काही व्यवस्थित झाले नाही. इतक्या वर्षात शंकरकाकांचं काम चुकण्याची ही पहिलीच वेळ. त्या डॉक्टरनी शंकरकाकांना पैसे तर दिले नाहीच. शिवाय सगळीकडे शंकर तेल्यानं खराब काम केलं ही बातमी पसरली. लोकं काय, एखाद्याला वर चढवतील त्याहून जास्त वेगानं त्याला खाली आणतील. त्या छोट्याश्या गावात जो तो शंकरकाकांची चेष्ठा करू लागला.
शंकरकाकांना हे खूप लागलं असावं. त्यांचं आता वय झालं होतं. नारळ काढणं वगैरे त्यांनी बंद केलं होतं. म्हणून ते फारसे आमच्या घरी येत नसत. पण या घटनेनंतर काही दिवसांनी ते घरी आले. नेहमीप्रमाणे "तात्यानु" म्हणत घरात न शिरता आजोबांच्या ऑफिस बाहेर गुपचूप बसून राहिले. आईनं चहा विचारला तर मानेनंच नको म्हणून सांगितलं.आजोबांचं काम चालू होतं. काम संपल्यावर आजोबानी पाहिलं तर शंकरकाका निघून गेले होते. असं तीनचारदा झालं. आजोबांच्या हे लक्षात आलं. मग एक दिवस शंकरकाका आल्या आल्या आजोबानी त्यांना आत बोलावलं. " काय झालं?" असं आजोबानी विचारताच शंकरकाकांचा बांध फुटला. सत्तर वर्षांचा माणूस अक्षरशः रडायला लागला. "तात्यानु माझी काय्येक चूक नाय. मी डाक्टरांक सांगलेलंय यवढो खर्च येतलो म्हणून. पण तो कमी करण्यासाठी त्येंनी सोत्ताच माका सामान आणून दिल्यानी, तो रंग, चुनो सिमेंट इतको खराब होतो, म्हणान ह्या असा झाला. आजपतूर माझ्या कामाक कुण्णीयेकांन नाव ठेवला नसत पण आता लोक तोंडार बोलतत. गावात माजी इज्जत रवली नाय." शंकरकाका मनातला सल बोलून दाखवत होते. थोड्या वेळाने शांत झाल्यावर धीर करून म्हणाले, "तात्यानु, माका एक संधी देशात? तुमच्या ऑफिसाक आणि भायेरच्या एका खोलीक कोबा करूक हो म्हणा. व्हयातर माका एक पैसो मजुरी देव नका. माका करुचा हां म्हणून करतलंय." आजोबांना नाही म्हणवेना.
त्या दोन खोल्यांना त्यांनी घोटून घोटून इतका सुंदर लाल रंगाचा गुळगुळीत कोबा केला की लोक मुद्दाम बघायला येत. नको नको म्हणत असताना आजोबानी त्यांना पैसे दिले. त्यानंतर शंकरकाका फारसे घरी आलेले आठवत नाही. तसंही त्यांचं वय झालंच होतं. त्यांनी नंतर काम कारणही बंद केलं. पुढे आजोबा गेले तेव्हा शंकरकाका भेटायला आले होते. काही न बोलता खाली जमिनीवर बसले. जाताना त्या लालगर्द कोब्यावर हळुवार हात फिरवून गेले.
नंतर काही वर्षातच शंकरकाका गेले . ते गेल्याचं आम्हाला बरंच उशीरा कळलं. एक साधा गरीब माणूस. तो गेल्याची थोडीच कुठे बातमी होते .
.
त्या दोन खोल्यांचा कोबा इतका सुरेख झालाय. अजूनही त्याचा रंग तजेलदार आहे. अख्ख्या घराला नंतर आम्ही टाईल्स लावल्या पण त्या दोन खोल्यांची जमीन बदलायची कधीच इच्छा झाली नाही.
प्रतिक्रिया
15 Mar 2017 - 7:04 am | यशोधरा
सकाळी सकाळी रडवलंत!
15 Mar 2017 - 11:03 am | ravpil
There were so many such people earlier in villages. They worked for their pride. Not for money. Excellent writing...
15 Mar 2017 - 11:28 am | पैसा
हृद्य व्यक्तिचित्र
15 Mar 2017 - 11:46 am | सुमीत
सुंदर व्यक्तिचित्र. निरपेक्ष, प्रामाणिक,कष्टाळू व्यक्ती शंकर काका.
आवडले, खूप आवडले.
15 Mar 2017 - 12:03 pm | अजया
अप्रतिम सुंदर लेख.
15 Mar 2017 - 12:08 pm | मनिमौ
पाणी आल वाचून डोळ्यात
15 Mar 2017 - 12:12 pm | मंदार कात्रे
अप्रतिम
15 Mar 2017 - 12:18 pm | खेडूत
अत्यंत सुंदर व्यक्तिचित्र..!
आवडले, अजून लिहावे.
15 Mar 2017 - 1:38 pm | इशा१२३
फार सुंदर व्यक्तिचित्रण !!
15 Mar 2017 - 2:16 pm | उत्तरा
खुप छान लिहीलं आहे..
वाचताना माझ्या आजोबांना भेटायला येणारे एक काका डोळ्यासमोर आले..
15 Mar 2017 - 2:30 pm | किसन शिंदे
आवडलं हे व्यक्तिचित्र
15 Mar 2017 - 3:01 pm | balasaheb
खुप सुन्दर
15 Mar 2017 - 3:47 pm | एस
डोळे किंचित पाणावले वाचताना. अतिशय ताकदीनं लिहिलं आहे! अजून लिहा.
15 Mar 2017 - 4:13 pm | संजय क्षीरसागर
सुरेख !
15 Mar 2017 - 4:26 pm | मार्मिक गोडसे
सुंदर लेख
15 Mar 2017 - 6:07 pm | राजाभाउ
मस्त व्यक्तिचित्रण अजुन येवु दे.
15 Mar 2017 - 7:07 pm | शलभ
मस्त लिहिलय..खूप आवडलं..
15 Mar 2017 - 7:23 pm | Ranapratap
छान कथा, तुमची कथा वाचून पु ल चा नारायण आठवला.
15 Mar 2017 - 9:46 pm | पिलीयन रायडर
काय सुंदर लिहीलंय.... वा!!!!!!
मिपावर धाग्यांना रेटींग द्यायची सोय हवी होती. असे धागे गर्दीत हरवले तरी मिपाकर त्यांना उच्च रेटींग्स देऊन लखलखत ठेवतील.
15 Mar 2017 - 10:23 pm | मोदक
सुंदर व्यक्तीचित्र..!!
15 Mar 2017 - 10:46 pm | पद्मावति
फार फार सुरेख लिहिलय.
16 Mar 2017 - 6:31 am | रेवती
लेखन आवडले.
16 Mar 2017 - 6:44 am | संजय पाटिल
डोळ्यासमोर प्रत्यक्ष चित्र उभे केलेत...
16 Mar 2017 - 4:31 pm | मराठी कथालेखक
छान लेख.
बावीस खोल्या !! हेवा वाटतो हो तुमचा.. कधी जमलं तर घराचे फोटो टाका
29 Mar 2017 - 11:19 am | चुकलामाकला
नक्की. :)
16 Mar 2017 - 11:23 pm | निशाचर
सुरेख व्यक्तिचित्र
17 Mar 2017 - 1:19 pm | स्वीट टॉकर
"अख्ख्या घराला नंतर आम्ही टाईल्स लावल्या पण त्या दोन खोल्यांची जमीन बदलायची कधीच इच्छा झाली नाही." एकदम सही!
19 Mar 2017 - 2:34 pm | अभिजीत अवलिया
सुंदर ...
29 Mar 2017 - 11:21 am | चुकलामाकला
धन्यवाद मंडळी.__/\__
29 Mar 2017 - 4:35 pm | एमी
आवडल.
11 Apr 2017 - 10:15 pm | ऱोमन hile
खरंच खूप छान लिहिलं आहे .
12 Apr 2017 - 10:31 am | केडी
सुंदर लिहिलाय.....वाचताना तो कोबा, ते घर आणि त्या खोल्या अक्षरशः डोळ्यासमोर दिसताय्त्