रंगपंचमी

पराग देशमुख's picture
पराग देशमुख in जे न देखे रवी...
1 Feb 2017 - 7:01 pm

रंग मनाचा,रंग क्षणाचा,
क्षणाक्षणाला विरघळणारा.
क्षणात हसरा,क्षणात हळवा,
डाव्या गाली ओघळणारा.

पुसता अश्रू आवेगाने,
रंग काजळी विस्कटणारा.
अंमळ उसासे स्फुंदत असता,
रंग बोचरा गहिवरणारा.

मित्रांची ती चौकट जमता,
रंग खुशीचा खळखळणारा.
कातरवेळी काहुरणारा,
पिंग गुलाबी रंग बावरा.

रंग कोणता शौर्येन्द्राचा,
निधड्या छाती वार झेलता?
रंग कांतीचा गौर वेगळा,
चाहुलीसरशी थरथरणारा.

अवखळ,चंचल,शुद्ध-कांचनी,
बालमनाचा रंग निरागस.
तारुण्याचा रंग अंध परी,
समर्थ,पामर,रसरसणारा.

अनुभवाने रापून झाला,
प्रौढ मनाचा रंग सावळा.
समाधानी नि शांत,विचारी,
वैराग्याचा रंग पांढरा.

रंग उदासी,रंग कुतुह्ली,
रंग लाजरा,रंग विचारी.
रंग आळशी,रंग जहरी,
रंग उद्यमी,लुसलुसणारा.

जीवनभर हि अशी चालली,
मनरंगांची "रंगपंचमी".
शब्द बापुडे,पडे तोकडे,
वर्णन करिता रंगपसारा
-------------------------------------------------------------------------मुकुंद

फ्री स्टाइलभावकविताकवितामुक्तकशब्दक्रीडा

प्रतिक्रिया

पैसा's picture

2 Feb 2017 - 10:43 am | पैसा

आवडले रंग!

विशाल कुलकर्णी's picture

2 Feb 2017 - 11:46 am | विशाल कुलकर्णी

वाह ..

रंग उदासी,रंग कुतुह्ली,
रंग लाजरा,रंग विचारी.
रंग आळशी,रंग जहरी,
रंग उद्यमी,लुसलुसणारा.

क्या बात है...