आधार कुणाचा?

तळेकर's picture
तळेकर in जनातलं, मनातलं
27 Jan 2008 - 6:23 pm

आधार कुणाचा?

चांगल्या नोकरीच्या, गलेलठ्ठ पगाराच्या आशेने मुलं परदेशी जातात ते परतीचे दोर कापूनच. दोन वर्षांनी येऊ, चार वर्षांनी येऊ, असं म्हणत ग्रीन कार्ड कधी घेतात आणि कायमचे अमेरिकावासी कधी होतात, ते कळतही नाही. एकदा तिथल्या जीवनशैलीची सवय झाली, की इथे परत यायला नको वाटतं. आईवडिलांनाही मुलांच्या नसण्याची सवय होते आणि शेजारी, मित्र किंवा नातेवाईकांच्या आधाराने ते आयुष्य घालवतात.

'इथे सगळं ठीक आहे,' असं सांगितलं जातं तब्येत बरी नसली तरी. मुलं तिथे दूर अमेरिकेत, आपली दुखणी त्यांना काय सांगणार? भारतात यायचं, तर खर्च ! रजा पाहिजे? नातवांच्या आठवणीन व्याकूळ होनं आहेच. अशीच अवस्था बहुतेक आईवडिलांची असते. आज मुंबई-पुण्यासारख्या शहरात अक्षरश: घरटी एक मुलगा किंवा मुलगी अमेरिकेत असतात. चांगल्या नोकरीच्या, गलेलठ्ठ पगाराच्या आशेने ही मुलं परदेशी जातात, तेव्हा बहुतेकांनी परतीचे दोर कापलेले असतात. दोन वर्षांनी येऊ, चार वर्षांनी येऊ, असं म्हणत ग्रीन कार्ड कधी घेतात आणि कायमचे अमेरिकावासी कधी होतात, ते कळत नाही. एकदा का तिथल्या जीवनशैलीची सवय झाली, की इथे परत यायला नको वाटतं. मग कधी ४-५ वर्षांनी एखादी ट्रिप भारतात करायची, आईवडिलांची भेट घ्यायची आणि पुन्हा तिथल्या सेवेत हजर व्हायचं, असं सुरू होतं. आईवडिलांनाही मुलांच्या नसण्याची सवय होते आणि शेजारी ,मित्र किंवा नातेवाईकांच्या आधाराने ते आयुष्य घालवतात. दर रविवारी येणाऱ्या फोनवर समाधान मानतात. खूपदा हे बोलणं वरवरचं असतं. मुलांना तिकडे आपली काळजी कशाला, असं म्हणून आईवडील त्यांचे प्रॉब्लेम्स मुलांना सांगत नाहीत. मुलंही खरे प्रॉब्लेम्स आईवडिलांना सांगत नाहीत. नुसती खुशाली विचारली जाते.
अनेक पालक मध्येच एखादी अमेरिकावारी करून येतात. विशेषत: मुलीच्या किंवा सुनेच्या बाळंतपणाच्या निमित्ताने. एकदा बाळंतपण झालं, थोडी अमेरिका फिरून आलं, की परत तोच एकटेपणा खायला उठतो.

खूपदा मुलांना विशेषत: मुलींना खूप अपराधी वाटतं. आई-वडिलांना मुलांची गरज असते, तेव्हा आपण तिथे नाही, ही भावना मनात खात असते. त्यांच्याबरोबर डॉक्टरकडे जायला आपली गरज आहे, हे कळत असतं, पण ते काही करू शकत नाहीत, फक्त फोनवरून सल्ला देऊ शकतात. हजारो मैलांचं अंतर पार करणं खूप कठीण असतं. कधी कधी वाटतं मुलांनी येथे यावं, आता इथेही चांगल्या, मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात. आता परत या. मुंबईत किंवा पुणे येथे राहू शकता.' पण तिथे एवढी आरामाची जीवनशैली सोडून येणं सगळ्यांच्याच जिवावर येतं. आईवडिलांचा आक्रोश हृदयापर्यंत पोहोचतच नाही, त्याला कोण काय करणार?

हे ठिकाणसमाजप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

27 Jan 2008 - 11:23 pm | विसोबा खेचर

तळेकरसाहेब,

कधी कधी वाटतं मुलांनी येथे यावं, आता इथेही चांगल्या, मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात. आता परत या. मुंबईत किंवा पुणे येथे राहू शकता.' पण तिथे एवढी आरामाची जीवनशैली सोडून येणं सगळ्यांच्याच जिवावर येतं. आईवडिलांचा आक्रोश हृदयापर्यंत पोहोचतच नाही, त्याला कोण काय करणार?

क्या बात है तळेकर साहेब! परदेशस्थ मुलांच्या आईवडिलांचा मूक-आक्रोश आपण अगदी योग्य शब्दात मांडलात!

अहो फार लांब कशाला? आमच्या घराजवळचंच एक उदाहरण आहे. एका परदेशस्थ मुलाचे आईवडील इथे अगदी एकाकी अवस्थेत आयुष्य कंठत आहेत. आता दोघांची वयं झाली आहेत. त्यांचा मुलगा तिकडे अमेरिकेत बायको मुलांसमवेत अगदी मजेत मारे बंगला वगैरे बांधून राहतो आहे. पैसे वगैरे पाठवतो पण त्याच्या पैशांची आईवडिलांना खरंच गरज नाही. त्यांना आता म्हातारपणी मुलगा जवळ असावा, सून जवळ असावी असंच वाटतं!

म्हातारा-म्हातारीला काही आजारपण वगैरे आलं तर दवाखान्यात, हॉस्पिटलात वगैरे पोहोचवण्याकरता मीच धावपळ करतो. मला त्याचे वडील डोळ्यात पाणी आणून अनेकदा,

"तात्या, मी मेलो की माझ्या मुलाला वगैरे कळवण्याच्या भानगडीत पडू नकोस. त्याला आईवडीलांची काहीही किंमत नाही. तूच मला अग्नी दे!"

असं म्हणतात तेव्हा मला त्यांची खरोखरंच दया येते!

असो, त्या मुलाचीही काही बाजू असेल! आपल्याला काय कल्पना? परंतु जर एखाद्या मुलाचे आईवडील इथे भारतात त्याच्यासाठी तळमळत असतील तर काय उपयोग त्या मुलाचा आणि त्याच्या त्या पैशांचा?

अवांतर - तळेकरसाहेब, याच विषयावर मी माझे आबा जोशी हे व्यक्तिचित्र लिहिले आहे. मनोगतावर ते कधीकाळी खूप गाजले होते!

असो...

आपला,
(निवासी भारतीय!) तात्या.

प्राजु's picture

28 Jan 2008 - 5:45 am | प्राजु

कधी कधी वाटतं मुलांनी येथे यावं, आता इथेही चांगल्या, मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात. आता परत या. मुंबईत किंवा पुणे येथे राहू शकता.'

हे तुमचं वाक्य मनाला भिडलं. तुम्ही लिहिलेलं अक्षरन् अक्षर खरं आहे. मी नव-यासोबत इथे आले तेव्हा आईच्या मनाची स्थिती समजूनही काही उपयोग नव्हता. तिला भेटताना गळा दाटून आला होता. ती म्हणाली, " आकाशी भरारी घेणा-या पाखराचे पाय आणि पंख बांधून नसतात ठेवायचे... फक्त तुझं घरटं इथे आहे हे मात्र विसरू नको." आईचे हे शब्द आजही आठवले की, उठून निघून सरळ भारतात यावे असे वाटते. तुमच्या या लेखाने पुन्हा हा विचार मनाशी घट्ट होऊ लागला आहे.

- (पूर्णपणे भारतीय) प्राजु

पिवळा डांबिस's picture

28 Jan 2008 - 6:59 am | पिवळा डांबिस

मा. तळेकरसाहेब,

लेख चांगला आहे. या प्रश्नाची भारतातील मंडळींची बाजू तुम्ही चांगली मांडली आहे.

पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, तळेकरशेठ!! :)

त्यातून आजकाल "कोणीही यावे आणि अनिवासी लोकांना टपली मारून जावे" याची फॅशनच झाली आहे. :))

तसे कशाला, आपण चार दिवस थांबूया. दुसरी बाजू मांडण्यासाठी कोणी नव्या दमाची, तरणी पोरं उतरतात की मला म्हातारया शेलारमामाला मैदानात पाठवतात ते बघुया!

"कायरं अनिवासी पोरांनु! हाये का कोनी हिमतीचा? का समद्यांनी शेपूट घातली?" :))

तरीही तुमचाच,

(पिकल्या डुईचा) पिवळा डांबिस

बेसनलाडू's picture

28 Jan 2008 - 8:37 am | बेसनलाडू

"कोणीही यावे आणि अनिवासी लोकांना टपली मारून जावे" याची फॅशनच झाली आहे. :))
१००% सहमत आहे.
(सहमत)बेसनलाडू

प्राजु's picture

28 Jan 2008 - 8:22 am | प्राजु

अगदी खरं. पिवळा डांबीस म्हणतात ते ही खरे आहे.

त्यातून आजकाल "कोणीही यावे आणि अनिवासी लोकांना टपली मारून जावे" याची फॅशनच झाली आहे. :))
खरंच असे झाले आहे.

-(सध्या अमेरिकेत) प्राजु

प्रमोद देव's picture

28 Jan 2008 - 9:09 am | प्रमोद देव

नोकरीनिमित्त तरूणांना गाव /देश सोडून इतरत्र जावे लागते. हा प्रश्न आजचाच नाहीये. आजपासून काही वर्षांपूर्वीपर्यंत एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यामुळे ही समस्या तितकी गंभीर नव्हती. मात्र जसजशी विभक्त कुटुंब पद्धती अंमलात आली आहे तेव्हापासून ही समस्या जास्त तीव्र होत चाललेय. इथे दोष फक्त तरूण मंडळींना देणे योग्य होणार नाही. काही प्रमाणात आपल्या सारख्या ज्येष्टांचाही दोष असतो. विशेषतः स्वभावाचा दोष. आपण वागलो,वागतो तेच बरोबर आणि सद्याचे तरूण वागताहेत ते सगळे चूक असे म्हणणे. म्हणून
दोष असलाच तर खरे तर तो परिस्थितीचा असतो. नोकरीसाठी जर अन्यत्र राहावे लागले (इथे परदेश/अन्य शहर/गाव अभिप्रेत आहे) तर मुले अशावेळी आपल्या वृद्ध पालकांना आपल्या बरोबर ठेऊ शकतात. पण बर्‍याच वेळा अनुभव असा असतो की ही वृद्ध मंडळी आपला गाव सोडायला तयार नसतात. काही जण असे गावे सोडून मुलांबरोबर जातातही. पण भिन्न वातावरणाशी जुळवून घेणे त्यांना जमत नाही. त्यामुळेही नाईलाजाने ते पुन्हा आपल्या गावी परततात आणि एकटेपणाचे जीवन जगतात.
म्हातारपणात स्वभाव हटवादी होत असतो. त्याचाही त्रास त्यांना स्वतःला आणि कुटुंबातील इतरांना होत असतो. त्यामुळे एकत्र राहून दोन दिशांना तोंडे असण्यापेक्षा दूर राहून जवळीक असावी म्हणूनही काही जणे वेगवेगळे राहतात. अर्थात त्याचा नकळत होणारा परिणाम म्हणजे अशा वृद्ध माणसांकडे नाईलाजाने का होईना पण होणारे दूर्लक्ष; प्रकृतीची हेळसांड वगैरे.
तरूणांनी वृद्धांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्याशी शक्यतोवर जमवून घेणे आणि वृद्धांनीही सद्याच्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आणि आपल्या अपत्यांच्या दैनंदिन जीवनात ढवळाढवळ न घेण्याची खबरदारी घेतल्यास हा प्रश्न बर्‍यापैकी सुटू शकेल.
त्यामुळे मी दोष कोणा एकाला देणार नाही. दोष असलाच तर तो परिस्थितीचा आणि त्या प्रमाणे आपल्यात बदल न घडवणार्‍यांचा.

केशवराव's picture

28 Jan 2008 - 11:51 am | केशवराव

काळ ज्या प्रमाणे बदलतो तसे आपण बदलयला हवे. मुलांनी नोकरी / व्यवसाया निमित्त दूर जाणे हे क्रमप्राप्तच आहे. [ मुलीने सासरी जाण्यासारखेच....] आपल्या संगोपनासाठी त्यानी ईथे रहावे अशी अपेक्शा करणे म्हणजे त्यांचे पंख छाटण्या सारखेच आहे.
आपणच त्यांना घडवण्यास मदत करतो, मोठे करतो,भरारी घेण्यास शिकवीतो ; आणि त्यांनी भरारी घेतली कि घायाळ होतो.
व्रुद्धांचे प्रश्न जरूर आहेत. जरा वेगळ्या नजरेने बघुया. आपण सुखी राहूया ,त्यांना सुखी ठेवूया.
[एक विचार चमकला... आपल्या मुलांच्या म्हातारपणी हा प्रश्न किती मोठ्ठा झाला असेल ?त्यांचे समूपदेशन आपणच आत्ता करायला नको ना?] आपण आपले प्रश्न मांडल्याने 'आपण दूर आलो हा अपराधच केला' असे आपल्याच मुलांना वाटेल.

एक पर्याय म्हणून पुण्याला परांजप्यांनि 'अथश्री' नावाचा प्रकल्प केला आहे . अशी योजना हि यावर उपाय नाही का ठरू शकत?

विसोबा खेचर's picture

28 Jan 2008 - 12:26 pm | विसोबा खेचर

आपल्या संगोपनासाठी त्यानी ईथे रहावे अशी अपेक्शा करणे म्हणजे त्यांचे पंख छाटण्या सारखेच आहे.

असहमत आहे....अहो कुठले आईवडील आपल्या मुलाचे पंख छाटतील?

एक पर्याय म्हणून पुण्याला परांजप्यांनि 'अथश्री' नावाचा प्रकल्प केला आहे . अशी योजना हि यावर उपाय नाही का ठरू शकत?

म्हणजे परांजप्यांनी थोडक्यात अजून एक वृद्धाश्रम सुरू केलाय असे तुम्हाला म्हणायचे आहे का? इथे म्हातार्‍या, हातपाय थरथरणार्‍या आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकायचं आणि स्वत: तिथे परदेशात पैसा कमवायचा, करियर बनवायचं! काय जळ्ळा उपयोग आहे त्या करियरचा? कुणाला दाखवणार ते करियर आणि तो पैसा?

अहो ज्यांनी स्वत: खस्ता खाऊन, आजारपणात जागरणं करून, तळहाताच्या फोडाप्रमाणे आपल्याला जपले, लहानाचे मोठे केले, त्यांना उतारवयात सोडून निघून जायचं, मी, माझं आयुष्य, माझं करियर याचाच जप करत रहायचं हे मला तरी व्यक्तिश: पटत नाही!

आईवडील असतात म्हणून जगण्यात मजा असते. त्यांचं प्रेमाने करण्यात लाख मोलाचं (लाख डॉलरचं म्हटलं पाहिजे! :) समाधान असतं! एकदा ते गेले की कुणाला दाखवणार आपलं कर्तृत्व? मग कोण आहे पाठीवरून प्रेमाचा हात फिरवायला?

असो, वरील विचार हे माझे व्यक्तिगत विचार आहेत व माझ्यापुरते मर्यादित आहेत. यातून कुणाही अनिवासी भारतीयांचा अनादर करण्याचा माझा हेतू नाही. जे अनिवासी भारतीय इथे आपल्या आईवडिलांना एकटे टाकून परदेशात रहात असतील त्यांचीही काही बाजू असेल, त्यांचेही काही प्रश्न असतील याची मला कल्पना आहे.

आपला,
(गलेलठ्ठ पगाराची दुबई, बहारिन मधली नोकरीची संधी याच कारणस्तव अनेकदा नाकारून इथे भारतात आईसोबतच रहायचा निर्णय घेतलेला समाधानी!) तात्या.

केशवराव's picture

28 Jan 2008 - 10:21 pm | केशवराव

तात्यासाहेब,
फार भावनिक होवून लिहीलेत. कुठलेही आई- वडील मुलांचे पंख छाटणार नाहीत. मंजूर!
पण , मायेच्या बंधनानी त्याना जखडुन ठेवणेही योग्य नाहीच. तुमचे वैयक्तिक उदाहरण ठिक आहे, मी सामाजिक प्रश्न म्हणुन विचार केला. मी स्वतः ६० वर्षे वयाचा आहे. माझा एक मुलगा परदेशात असतो. दुसरा ईथे आहे. पण काय सांगावे ,तो पण दूर जाऊ शकतो. आणि ईथे राहीला तरी भारतात कुठेही जाऊ शकतो. नोकरी / व्यवसायाचे चित्रच पालटले आहे. काही गोष्टी आता स्विकाराव्याच लागतिल.
व्रुद्धाश्रम हि संकल्पना सुद्धा आता समाजाचे एक अंग म्हणुनच पहावी लागेल.क्रुपया 'अथश्री ' ला एकदा भेट द्या. तो व्रुद्धाश्रम नाही. ज्यांची मुले दूर आहेत अशा लोकांची ती सोसायटी आहे.[ मी परांजप्यांचा एजंट नाही.]
जरा वेगळ्या द्रुष्टीने विचार करून पहा.
* एक विधान : ' तुमच्या मुलांचे तुम्ही चांगले संगोपन केले पाहीजे , कारण तीच तुम्हाला चांगला व्रुद्धाश्रम निवडण्यास मदत करणार आहेत.'

विसोबा खेचर's picture

29 Jan 2008 - 9:53 am | विसोबा खेचर

व्रुद्धाश्रम हि संकल्पना सुद्धा आता समाजाचे एक अंग म्हणुनच पहावी लागेल.

हे विधान पटले नाही. माझ्या मते आईवडीलांची काळजी, त्यांची देखभाल, त्यांच्याजवळ असणे, ह्या गोष्टींना मुलांनी प्रथम प्राधान्य द्यायला हवे.

बाय द वे,

मी परांजप्यांचा एजंट नाही.

हे आवडले! :)

तुमच्या मुलांचे तुम्ही चांगले संगोपन केले पाहीजे , कारण तीच तुम्हाला चांगला व्रुद्धाश्रम निवडण्यास मदत करणार आहेत.

हम्म! असेच आता म्हणायला हवे. जी मंडळी आज आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात एकाकी, असहाय्य ठेवत आहेत त्यांच्याही वाट्याला त्यांच्या अपत्यांकडून असाच एकाकीपणा, असहाय्यपणा आला पाहिजे म्हणजे मग समजेल!!

असो,

आपला,
(श्रावणबाळ होण्यात आयुष्याची धन्यता मानणारा!) तात्या.

ससस's picture

1 Feb 2008 - 12:55 pm | ससस

त्यात्या,

मि तुमच्याशि सहमत आहे.
मला पटापटा पट लिहिता येत नाहि.

ऋषिकेश's picture

28 Jan 2008 - 9:53 pm | ऋषिकेश

मुलांनी नोकरी / व्यवसाया निमित्त दूर जाणे हे क्रमप्राप्तच आहे. [ मुलीने सासरी जाण्यासारखेच....]
संपूर्णपणे असहमत!! व्यवसाया निमित्त दूर जाणे आणि दूर स्थायिक होणे यात फरक आहे. करियरसाठी दूर जाणे वेगळे आणि बदलत्या काळात गरजेचे आहे पण घरच्यांना विसरून तिथलेच होणे वेगळे. मुलगी सासरी गेली कि तिथलीच होते. पण अर्थाजनासाठी परदेशी जाणे हे सासरी जाण्यसारखे नाहि.
काहि काळासाठी परदेशी राहून अर्थार्जन करून पुन्हा आपल्या घरी आलो तर त्या पैशाचा फायदा असे मी तरी मानतो.

-ऋषिकेश

अघळ पघळ's picture

29 Jan 2008 - 9:22 am | अघळ पघळ

घरच्यांना विसरून तिथलेच होणे वेगळे.

घरच्यांना न विसरता तिथलेच होणे ह्या विषयी आपले मत जाणून घ्यायला आवडेल. आजकाल तिकडचेच झाले तरी दर आठवड्याला इकडे फोन करून इकच्यांना न विसरणारे पण आहेत हो.

बेसनलाडू's picture

29 Jan 2008 - 9:54 am | बेसनलाडू

आमच्याकडे तर बॉ डेली रिपोर्ट असतो ;)
(डेली)बेसनलाडू

सुनील's picture

28 Jan 2008 - 9:47 pm | सुनील

आज मुंबईतील कोळी-भंडारी इत्यादी मूळ रहिवासी सोडले तर बाकीचे कोण आहेत? कुठून आलेत? कशासाठी आलेत?

आपापले गाव सोडून शिक्षणासाठी, कचेर्‍या-कारखान्यातून काम करण्यासाठी तरुणांनी मुंबई गाठली. सर्वांनीच काय आपल्या आई-वडीलांना येथे आणले नाही. प्रत्येकाची कारणे वेगवेगळी. मुंबईतील जागा लहान म्हणा वा घरच्या शेतीवाडीकडे बघायचे आहे म्हणा, पण बहुतेक घरात वृद्ध आई-वडील गावी आणि तरुण मंडळी मुंबईत हेच दृश्य होते/आहे. कोकणच्या अर्थव्यवस्थेला "मनी ऑर्डर इकॉनॉमी" हे नाव काय उगाच नाही पडले! पुलंचा "अंतू बर्वा" काल्पनिक नाही!!

आता याच मंडळींची मुले परदेशी जाऊ लागली / राहू लागली तर एवढा बाऊ कशापायी? त्यांनी जे केले त्याचेच हे विस्तारीत रूप नव्हे काय?

मला स्वतःला यात वावगे वाटत नाही. अर्थात मतभिन्नता असणार हेदेखील मला मान्य आहेच.

मुलांचे संगोपन केले, त्यांना उत्तम शिक्षण दिले की आई-वडीलांची जबाबदारी संपली. पुढचे निर्णय त्यांनी मुलांवरच सोडलेले बरे. (हेच त्या मुलांनाही लागू होतेच!). कारण जेव्हा परदेशी वाढलेली त्यांची मुले जरा मोठी होताच "डेटींगच्या" गोष्टी करू लागली तर दचकू नये तसेच आपल्या शाळकरी समवस्क मित्र / मैत्रीणींबरोबर "स्लीपओव्हर्"ला गेली तर आता ते काय करताहेतच्या काळजीने स्वतःच्या झोपेचे खोबरे करून घेऊ नये!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रकाश घाटपांडे's picture

29 Jan 2008 - 10:23 am | प्रकाश घाटपांडे

दोन्ही आपापल्या जागी खर आहे. अमुक एक बाजू खरी आहे म्हणजे दुसरी खोटी आहे असे नाही. सुनिल व चतुरंग यांनी समन्वय साधला आहे. नोकरीनिमित्त खेड्यातून शहरात आल्यावर आम्हालाही असे टोमणे बसले आहेत. पण त्याचाही आदरच आहे.
प्रकाश घाटपांडे

प्रकाश घाटपांडे's picture

29 Jan 2008 - 10:54 am | प्रकाश घाटपांडे

द्विरुक्ति झाल्याने प्रकाटाआ
प्रकाश घाटपांडे

चतुरंग's picture

28 Jan 2008 - 10:50 pm | चतुरंग

मी स्वतः अनिवासी असल्याकारणाने मला अनेकवेळा सामोरा आलेला!
ह्यावर खूपच लिहिले गेले आहे आणि लिहिण्यासारखेही आहे.
प्रत्येक माणसाची काही तत्व (प्रिंसिपल्स) आणि काही मूल्यं (व्हॅल्यूज) असतात, किंवा निदान असायला हवीत.
तुमचं वय, अनुभव, आयुष्यातला टप्पा ह्या नुसार तुमच्या मूल्यांमधे थोडा-थोडा फरक पडत जातो, आणि तो सापेक्ष असतो.
ते योग्यही आहे नाहीतर आयुष्य तुंबून राहील. (अर्थात हा बदल चांगल्याकडे नेणारा आहे असं इथे गृहित आहे!)
तत्वं ही बहुतांश पक्की असतात (ती बदलण्यासाठी खरोखरच काही तरी उलथापालथ घडणारं आयुष्यात आलं तर ती ही बदलतात. पण साधारणतः नाही)!
परिस्थितीचा तत्वांशी झगडा सुरु झाला की प्रश्न निर्माण होतात!
वरती प्रमोदकाका आणि सुनील यांनी म्हणल्याप्रमाणे पिढीदरपिढीतील फरकामुळे काही तडजोडी ह्या अपरिहार्य असतात. तर काहीवर मार्ग निघू शकतो. पुढच्या-मागच्या पिढीतल्या प्रत्येकाच्या लवचिकपणावर आणि मार्ग काढण्याच्या क्षमतेवर उत्तर अवलंबून असतं.

आई-वडिलांना टाकून पुढे जाणं हा कृतघ्नपणाच आहे. पण हा करणारे अनिवासीच असतात असे कुठे आहे?
आपल्या हक्काच्या घरात मुला-सुनांसमवेत राहूनही "निराधार" असलेले काही लोक मला व्यक्तिशः माहीत आहेत! जे मन मोकळं करायला माझ्यासारख्या वर्षा-दोनवर्षातून भारतात येणार्‍यांची वाट बघतात - केवढा भीषण विरोधाभास आहे हा!!
सुदैवाने माझ्या आई-वडिलांना (आणि त्यामुळे मला) असे प्रश्न नाहीत हे मी माझे भाग्य समजतो.

खलील जिब्रान ची एक कविता देतोय त्यात त्याने हेच सत्य मांडलेले आहे.

चतुरंग

सुधारक's picture

29 Jan 2008 - 6:39 am | सुधारक

आम्ही मुले आमच्या मुंबईच्या बिल्डिंगमधून पांगलो. कोणी अमेरिकेला , कोणी वाशीला तर कोणी पुण्याला. फक्त एक जण अजून टिकून आहे तो आता दारूच्या आहारी जाऊन आई वडिलांना प्रचंड त्रास देतो. त्याची आई माझ्या आईला येऊन विचारत होती, ' माझा मुलगा कां हो गेला नाही तुमच्या मुलांसारखा घर सोडून ?'

मला वाटते यात निवासी किंवा अनिवासी हा मुद्दा अग्राह्य आहे.

पिवळा डांबिस's picture

28 Jan 2008 - 11:42 pm | पिवळा डांबिस

बेसनलाडू, प्राजु, केशवराव, प्रमोदराव, सुनिल, आणि चतुरंग,

वा रं पठ्ठे हो! माज्या म्हातारयाच्या आवाहनाचा मान राखलात!!
मन भरून पावलं!!!

आपलाच,
(आनंदाश्रू पुसनारा) पिवळा डांबिस

ससस's picture

1 Feb 2008 - 1:02 pm | ससस

स्वःतच्या मनसारखि उत्तरे मिलालि म्हनुन अभिनदन करन्या सारखे काहिच नाहि आहे.
चुका त्या चुकाच.

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Feb 2008 - 10:29 pm | llपुण्याचे पेशवेll

प्रत्येक व्यवस्थेचे गुण - दोष असतातच. जसे स्वत:च्या लेक-सुना नातवंडात राहून पोरके झालेले आईबाप पाहीले आहेत ,तसे आई -बाप (सासू सासर्‍यांवर) प्रेम करणारे लेक-सुना देखील मी पाहील्या आहेत...ईथे एकच मुद्दा आहे तो सारासार विवेकाचा... जेंव्हा आई वडीलांची हाक येईल तेंव्हा सर्व पाश तोडून जाणे हे मला रास्त वाटते.
छोट्या भांडणातून आईबापाला वृद्धाश्रमात टाकायला निघालेला एक नातलग पाहीला... तसेच आपल्या मुलीमुळे तिचा नवरा आईबापाला वृद्धाश्रमात टाकत आहे हे कळल्यावर वरमलेले तिचे मातापिता देखील पाहीले आहेत. जगात जसे चांगले आहे तसे वाईट देखील आहे.. काय घ्यावे काय नाही हे विचारांती ठरवावे...
(अमेरीकेत येऊन गोंधळलेला)
डॅनी..
पुण्याचे पेशवे

प्राजु's picture

1 Feb 2008 - 10:40 pm | प्राजु

पाल् करान्चा शालि,
आपण नक्की कोणत्या चुकांबद्दल बोलत आहात? कारण...

स्वःतच्या मनसारखि उत्तरे मिलालि म्हनुन अभिनदन करन्या सारखे काहिच नाहि आहे.

चुका तर आपल्या लेखनातही आहेत...

(कन्फ्यूस्ड) प्राजु

पिवळा डांबिस's picture

2 Feb 2008 - 5:41 pm | पिवळा डांबिस

सांगतील, सांगतील, घाई काय आहे प्राजुताई! :))

अजून त्यांना आपले विचार नेमक्या शब्दांत मांडायला शिकायचंय!
त्या आधी नेमके शब्द लेखनात कसे मांडायचे ते शिकायचंय!

तुम्ही प्रश्न मुद्द्याचा विचारलात हो, पण ती दिल्ली अजून खूप दूर आहे असं दिसतंय. :))
इतकंच, की त्यांना पहिलीत असतांना एम. ए. चा पेपर सोडवायची घाई झालीय!!

प्राजुताई, तुम्हाला गोरोबा कुंभार, नामदेव, आणि थापटण्याची गोष्ट माहित आहे की नाही? :)

आपला गोष्टीवेल्हाळ,
पिवळा डांबिस

वरदा's picture

2 Feb 2008 - 2:31 am | वरदा

हे मान्य की आई वडिलांची जबाबदारी घ्यावी..भारतात रहाणारी किती मुलं आणी सुना आवडीने आई वडीलांची काळजी घेतात? अर्धे बँगलोरला जातात उरलेले हैद्राबादला आणि बाकिच्यांच पटत नाही म्हणुन एकाच गावात वेगवेगळे रहातात असेही कितितरी आहेतच की! जवळ रहाणारे सुद्धा रोज भांडंणं करणारे आहेत....कमीत कमी आम्ही त्यांची काळजी घेण्यात असमर्थ नाही आणि सतत प्रयत्नशील असतो हे तरी चांगलं नाही का..परवाच ओळखीच्या एका मैत्रीणीने हार्ट ऑपरेशन चा सगळा खर्च करुन बँक बॅलंस संपला आणि पुढच्या ट्रीटमेंट साठी पैसे मागितले...कमीतकमी आम्ही अशी वेळ कधी येऊ देणार नाही हे तर मान्य करा..आम्हीहि इथे चैन करत नाही गाड्या चालवतो तर चैन वाटते लोकांना पण आम्हाला दुसरा ऑप्शन नाही...आम्हीही सारखे पैसे जमवून त्यांच्या नावावर करत असतो..मग ह्याला काहीच व्हॅल्यू नाही का?

प्राजु's picture

2 Feb 2008 - 9:36 pm | प्राजु

खरंय वरदा म्हणते ते... पूर्णपणे सहमत आहे वरदाशी..

- प्राजु

मानस's picture

2 Feb 2008 - 10:39 am | मानस

चांगला विषय आहे. सध्या ह्याच विषयावर एक पुस्तक गाजत आहे, ते म्हणजे अपर्णा वेलणकरचे "फॉर हियर ऑर टू गो"

नक्की वाचा, वेळे अभावी ह्या बद्दल प्रतिक्रिया पुन्हा केव्हातरी ......

एक अनिवासिय भारतीय .......

मानस

प्राजु's picture

2 Feb 2008 - 9:39 pm | प्राजु

डांबिसकाका,
अगदी खरं बोललात. आणि हो ती गोष्टही माहिती आहे मला... :)))
पां. च्या शा. ला (पाल् करान्चा शालि) एम्.ए.चा पेपर सोडवायची घाई झाली आहे.. हे नक्की.

- प्राजु

तळेकर's picture

11 Feb 2013 - 4:45 am | तळेकर

हा विषय संपला नाही