“हॅपी बर्थडे जानू“
“थँक यू पण अरे किती वेळा विश करशील.”
“तुझा बर्थडे रोज जरी आला तरी मला आवडेल” तो तिचा हात हातात घेत म्हणाला.
“चांगला मस्का लावतोयस आज तर.”
“नाही अगं खरंच. म्हणजे मला रोज सुट्टी घेऊन तुझ्यासोबत वेळ घालवता येईल.”
ती खळाळून हसली. तिच्या दोन्ही गालांवर उमटणाऱ्या खळीकडे बघण्यात तो हरवून गेला.
ते प्रेमीयुगुल एकमेकांच्या हातांत हात गुंफून गार्डनमधल्या एकांत कोपऱ्यात बसलं होतं. अंधार पडू लागल्यामुळे शहरातले लुकलुकणारे दिवे उजळू लागले होते, रस्त्यावरून धावणाऱ्या गाड्यांचे ठिपके शहर धावतंय ही जाणीव करून देत होते. या दृश्याकडे बघत एकमेकांच्या सहवासात तासनतास घालवायला दोघांना आवडायचं. गेल्या दोन वर्षांत ते कित्येकवेळा इथे आले होते.
“खरं सांगू? तुझ्यासोबत इथे आले न की परत जावसंच वाटत नाही. भीती वाटते या शहराची, इथल्या भल्याबुऱ्या कित्येक गोष्टींची. तू सोबत असला की खूप आधार वाटतो मला. प्लीज डोन्ट यू डेयर टू लीव मी.”
“प्लीज म्हणून धमकी देण्याची देण्याची अजब तऱ्हा आहे बाईसाहेबांची” तो हसून म्हणाला. तीसुद्धा हसली.
“डोन्ट वरी, तू सोड म्हटलं तरी तुझा पिच्छा काही मी सोडणार नाही.”
“प्रॉमिस?”
“प्रॉमिस.”
ती अलगद त्याच्या कुशीत शिरली. बराचवेळ ते नि:शब्दपणे तसेच बसून होते.
मोबाईल फोनच्या रिंगने दोघे तंद्रीतून बाहेर आले. तिने जरा नाखुशीनेच पर्समधून ते त्रासदायक यंत्र बाहेर काढलं.
“हॅलो मी कमिशनर राणे बोलतोय.”
“गुड इव्हनिंग सर” ती फोन कानांवर घट्ट दाबत म्हणाली. त्याला समोरच्याचं बोलणं ऐकू येऊ नये म्हणून ती खबरदारी होती.
“सॉरी, एक इमर्जन्सी होती म्हणून त्रास दिला.”
“हरकत नाही, बोला तुम्ही.”
“फिनिक्स मॉलमध्ये बॉम्ब लपवण्यात आलाय अशी आम्हाला शंका आहे.”
“शंका?”
“हो म्हणजे जवळजवळ खात्रीच आहे तशी. नुकताच आम्हाला फिनिक्स मॉलच्या समोर असलेल्या ज्वेलरी शॉपमधून फोन आला होता. काल रात्रीचे फुटेज पाहत असताना त्यांना कालपुरुष मॉलमध्ये प्रवेश करतांना दिसला.”
“काय!?”
“हो. त्यांचे दोन कॅमेरे दुकानाबाहेरच्या हालचालींवर नजर ठेऊन असतात म्हणून त्यांना तो दिसला. फिनिक्सचे सिसीटीव्ही त्याने निकामी केलेले असावेत म्हणून त्यात काही सापडलं नाही. हा महाभयंकर प्राणी तिथे गेला म्हणजे काहीतरी मोठा विनाश करण्याचा इरादा असेल त्याचा. आठवतंय मागे एकदापण त्याने याच पद्धतीने बॉंबब्लास्ट केला होता.”
“बरोबर आताही त्याने एखाद्या ठिकाणी लपवला असेल बॉ…”.तिने बाजूला पहिलं आणि जीभ चावली “आय मीन फाईल लपवली असेल.”
“फाईल?”
“अम.. ते जाऊद्या सर, मला सांगा मी काय मदत करू शकते?”
“आम्ही बॉम्बशोधक पथक नेऊन तपास केला असता पण तसं केल्यास खूप गोंधळ माजेल. आपल्याला समजलंय हे कालपुरुषाला माहीत पडल्यास तो वेळेच्या आधीच ब्लास्ट करू शकतो.”
“हम्म”
“म्हणून माझी अशी विनंती आहे की तुम्ही साध्या वेषात फिरुन बॉम्ब कुठे आहे हे शोधून काढा. बाकी आम्ही सांभाळून घेऊ. तुमच्याकडे सुपरपावर्स आहेत. याआधीसुद्धा तुम्ही या सुपरव्हीलनला मात दिलीये. शेकडो लोकांचे जीव धोक्यात आहेत”
“डोन्ट वरी आय अॅम कमिंग” एवढं बोलून तिने कॉल कट केला. तो कंटाळवाण्या चेहऱ्याने तिच्याकडे बघत होता. अशावेळी फोन आल्याच त्याला आवडत नाही हे तिला माहीत होतं.
“ऐक ना अरे. अम्म… मला ना एक अर्जन्ट काम निघालय ऑफिसमध्ये. मॅनेजर साहेबांनी बोलावलंय लगेच. तासाभरात जाउन येऊ का मी? अश्शी गेले अन अश्शी आले”
“आजचा स्पेशल दिवस तुझ्यासोबत घालवावा म्हणून मी लवकर तुला भेटायला आलो. माझ्या खडुस बॉसकडून अर्ध्या दिवसाची सुट्टी कशी मिळवली माझं मलाच माहीत. अन तुझ्या बॉसचा फोन आला की लगेच चालली धावत. धिस इज नॉट फेयर यार.”
“सॉरी शोन्या पण खूप जरूरी आहे रे जाणं. एक खूप महत्वाची फाईल माझ्या कपाटात आहे. ती देऊन लगेच येते.” बोलता बोलता ती घाईघाईत उठली.
“ठिक आहे चल मीपण येतो सोबत. तिकडून तिकडेच डिनरला जाऊ”
“अरे नाही म्हणजे तू कशाला त्रास करून घेतोय उगाच. मी आणलीय न गाडी. ही गेले अन ही आले.” त्याच्या प्रतिसादाची वाट न पाहता ती जवळजवळ धावत निघाली. त्याने तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे निराशेने बघितलं अन स्वतःला मऊशार गवतात झोकून दिलं
---------
आजची कामगिरी रंगरूप न बदलता अन खास पोषाख न चढवता पार पाडायची असल्यामुळे तिला चिंता नव्हती. विसाव्या मिनिटाला हातातली पर्स सावरत तिने त्या आलीशान मॉलमध्ये प्रवेश केला अन पुढच्या अर्ध्या तासात आपल्या मानसिक शक्तींच्या आधारे विस्फोटक गोष्टीचा तपास लावला.
“हॅलो सर, मला तपास लागलाय. तुम्हाला हवी ती गोष्ट टेरेसवर असलेल्या कचऱ्यांच्या पेट्यांआड लपवलेली आहे. बॉम्बशोधक पथकातल्या एका व्यक्तीला पाठवलं तरी पुरेसं आहे.“ ती आजुबाजुला बघत हळू आवाजात बोलली.
“थँक यू व्हेरी मच असीधारा. तू खरी सुपर वूमन आहेस, परत एकदा आपल्या माणसांचा प्राण वाचवलास.”
“इट्स ऑल राईट सर, हे तर माझं कर्तव्यच आहे. “
“बरं तू बघितलंस का कुठल्या प्रकारचे अन किती बॉम्ब आहेत?”
ती उत्तर देणार तेवढ्यात मॉलबाहेर पडणाऱ्या तिला समोरून साध्या वेषात असलेले कमिशनर प्रवेश करतांना दिसले.
“सर एक मिनीट होल्ड करा” ती फोनमध्ये कुजबुजली. कमीशनला क्रॉस करून बाहेर पडल्यावर तिने परत बोलायला सुरुवात केली.
“मी घाईत असल्याने किती आणि कुठल्या प्रकारचे बॉम्ब आहेत बघू शकले नाही फक्त टेरेसवर बारूदाचा साठा आहे एवढंच मला कळालं अन लगेच मी तुम्हाला सांगितलं. “
“हरकत नाही, तसंही आम्ही पोहोचतच आहोत. काय असेल ते कळवतो”
“सॉरी सर पण आजची रात्र बिझी आहे मी. आपण उद्या बोललं तर चालेल का?”
“हो शुअर. थँक्स वन्स…” तिने फोन बंद करून टाकला, स्विच ऑफ करून पर्समध्ये फेकला.
-----------
“बघ एका तासाच्या आत परत आले की नाही. “
“बरं झालं नाहीतर मला इथंच समाधी घ्यावी लागली असती.”
“हे जरा अतीच झालं.”
“धन्यवाद. चला आता पोटात इंधन टाकायला जाऊयात.”
“अॅज यू विश माय लॉर्ड.”
त्याने उभं राहून आळोखेपिळोखे दिले, पँट झटकली अन दोघेहीजण पार्किंगच्या दिशेने निघाले.
-----
त्या छोटेखानी पण शानदार हॉटेलच्या टेरेसवरचा तो अख्खा मजला त्याने बुक केला होता. सगळीकडे ह्रृदयाच्या आकारातले गुलाबी फुगे लटकत होते, काहीवर I Love You तर काहींवर Happy Birthday to you लिहलेलं होतं. पार्श्वभूमीला गुणगुणणारं बॅकस्ट्रीट बॉइजचं ‘शो मी द मिनिंग’ शांततेला अधिक गहिरं करत होतं. मध्यभागी असलेला सुशोभित टेबल रंगीबेरंगी कॅंडल्सच्या प्रकाशात उजळून निघाला होता. त्याने हलकेच तिच्या डोळ्यांवरची पट्टी काढली. समोरचं दृश्य पाहून तिचा गुलाबाच्या फुलासारखा सुंदर चेहरा आनंदाने उजळून निघाला. एकमेकांचा हात हातांत घेऊन दोघेजण नियोजित जागी जाउन बसले. आजूबाजूचा लख्ख उजेड गायब होऊन मंद निळसर आभा पसरली. इतका वेळ काजव्यासारखा टिमटिमणारा मेणबत्त्यांचा प्रकाश आता लख्ख भासू लागला.
त्याने खिशातला गुलाब काढून तिला दिला. तिच्या चेहऱ्यावरचं हास्य अजून रूंदावलं
“थँक्स. मी तुझीच आहे राजा. पण उगाच एवढा खर्च…”
“शूSS…”त्याने तिच्या गुलाबी ओठांवर बोट टेकवलं “तो विचार तू नाही करायचास”
“बरं बाबा चूप”
“दॅट्स लाईक अ बेटर गर्ल. नाउ गेट रेडी टू सेलिब्रेट.” त्याने मागे बघून इशारा केला. थोड्या अंतरावर उभा असलेला वेटर लगबगीने समोर आला. आपल्या हातातला केक त्याने टेबलावर ठेवला अन “हॅपी बर्थडे मॅडम” बोलून निघून गेला.
आनंदाच्या तुषारांनी पुढचे काही क्षण चिंब भिजत राहिले.
“तू मला विचारलं होतं न की बर्थडे गिफ्ट काय आहे?”
“हो, तू बोलला होतास काहीतरी स्पेशल आहे. काय आहे सांग ना. आय अॅम सो एक्साइटेड.”
“ओके पण जर माझ्या प्रश्नाचं उत्तर हो असेल तरच ते मिळेल.”
“अरे बापरे. बरं विचार.”
तो तिला टेरेसच्या एका बाजूला घेऊन गेला.
“काय चाललंय तुझं”
“कळेल. डोळे बंद कर आधी.”
“अरे पण”
“नो क्वेश्चन्स.”
“ओके बाबा.” तिने डोळे अलगद बंद केले. त्याने मनगटी घड्याळावर नजर टाकली.
“उघडू का डोळे”
“जस्ट फिव सेकंड्स डार्लिंग.”
त्याने परत एकदा वेळ पाहिली
“हं उघड आता.”
तिने तसंच केलं. समोर दूरदूरपर्यंत पसरलेल्या इमारती अन अन त्यांच्या अधूनमधून डोकावणारं काळंभोर आकाश होतं. बराचवेळ झाला तरी त्यादृश्यात काही फरक पडला नाही.
“काय आहे मला तर काहीच दिसत नाहीये.” ती त्राग्याने बोलली अन त्याच्या दिशेने वळली. तिच्याकडे बघून तो हसला अन एक गुडघा जमिनीवर टेकवून खाली बसला. खिशात हात घालून त्याने एक छोटीशी डब्बी बाहेर काढली. मंद निळसर प्रकाशात आतली अंगठी लख्खकन चमकली.
“विल यू मॅरी मी?” धडधडत्या काळजाने त्याने जादूई शब्द उच्चारले. या अनपेक्षीत सुखद धक्क्याने तिच्या जाणीवेचा कणनकण थरारला. चेहरा दुसरीकडे वळवून ती तिच्याच नकळत लाजली.
“हो की नाही सांग ना.”
“बावळटा हो”
आनंदाने बेभान होऊन त्याने तिला आपल्या मजबूत बाहुपाशांच्या मिठीत बद्ध केलं. या मोहमयी क्षणात त्याला बराचवेळ हरवून जायचं होतं. समोरच्या फिनिक्स मॉलवर लपवलेले, अन आकाशात ‘विल यू मॅरी मी’ हा संदेश झळकवणारे रॉकेट ऐनवेळी का उडाले नाहीत याचा विचार तो नंतर करणार होता.
------------------------------------------------------
प्रतिक्रिया
24 Jan 2017 - 7:10 pm | राजाभाउ
भारीय !!! एकदम. पण क्रमशा: टाकायला विसरलात काय ?
24 Jan 2017 - 7:34 pm | उगा काहितरीच
छान गोष्ट ...
24 Jan 2017 - 8:47 pm | ज्योति अळवणी
मस्त! कथा आवडली
24 Jan 2017 - 10:49 pm | अॅस्ट्रोनाट विनय
कथा आवडली याचा आनंद आहे
24 Jan 2017 - 10:55 pm | अॅस्ट्रोनाट विनय
क्रमशः चा पुढेमागे विचार करायला हरकत नाही. सुपरहिरोंच्या पोशाखामागे दडलेल्या माणसाचा शोध घेणे मला नेहमीच आवडत आलंय.
25 Jan 2017 - 5:08 am | रुपी
भारीच.. वेगळीच कथा. आवडली :)
25 Jan 2017 - 8:17 am | फेदरवेट साहेब
साहिये हे लेखन, बॅक स्ट्रीट बॉईज वरून एकदम शालेय जीवन आठवले :)
25 Jan 2017 - 8:23 am | एस
ओके, कालपुरुष आणि असिधारा हे सुपरव्हिलन आणि सुपरहिरो एकमेकांच्या प्रेमात आहेत तर.
छान लिहिलीयं गोष्ट.
26 Jan 2017 - 4:44 pm | संजय पाटिल
हम्म्म्म.....
25 Jan 2017 - 12:04 pm | सस्नेह
छान आहे कथा. आवडली. लिहित रहा.
25 Jan 2017 - 11:45 pm | रातराणी
मस्त! कथा आवडली!
31 Jan 2017 - 10:17 pm | urenamashi
सूंदर...
31 Jan 2017 - 10:52 pm | संजय क्षीरसागर
जगण्याची मौज घेणार्या कल्पनांना अजूनही पंख आहेत हा दिलासा मिळतो.
लिहीत राहा.
8 Feb 2017 - 7:03 pm | अॅस्ट्रोनाट विनय
धन्यवाद __/\__