माणसाला अनेक छंद असतात. कुणाला वाचनाचा, कुणाला लिहिण्याचा, कुणाला झाडे लावण्याचा, कुणाला पशुपक्षी पाळण्याचा. छंदाशिवाय जीव म्हणजे सुकाणूशिवाय होडी होय. मला अनेक छंद आहेत आणि ते मी आजपर्यंत जोपासले आहेत.
मानवी जीवनात अध्यात्माला अनन्यसाधारण महत्व आहे. श्रद्धेविना जीवन रुक्ष आहे. याला कारण म्हणजे लहानपणापासून मी घरातील अध्यात्मिक वातावरणात वाढले. माझ्या वडिलांना अध्यात्माची खूप गोडी होती. "जीवनात कुणाचेही मन विनाकारण दुखवू नये. कुणाचाही द्वेष, मत्सर करून नये. मन शुद्ध असावे. मग त्या मनात ईश्वराचे प्रतिबिंब पडते!" असे ते सांगत. रात्री वडील आम्हाला रामायण व महाभारतातील गोष्टी सांगत. वडिलांच्या संस्काराची शिदोरी मी आयुष्यभर जपून ठेवली व आचरणात आणली. पोथ्या पुराणे तसेच संत चरित्रे वाचणे, पूजा करणे, देवाचे नामस्मरण करणे मला खूप आवडते. माझी गणपतीची व देवीची रोज साधना असते. त्यामुळे मनाला खूप शांती मिळते व जीवन जगण्याला उभारी येते.
दुसरा छंद म्हणजे मला पाककलेची खूप आवड आहे. माझे वडील मोठे बागाइतदार होते. घरची धन धान्ये, सर्व प्रकारची फळे, भाजीपाला हे सगळे घरचेच होते. कुटुंब मोठे होते. घरात पै पाहुण्यांची वर्दळ असे. माझी आई निरनिराळे पदार्थ, भाज्या, कोशिंबिरी, लोणचे, मुरब्बे वगैरे बनवायची. आईकडून मी ते सर्व शिकले. लिंबाचे, आवळ्याचे, मिरचीचे, कैरीचे हे सगळे लोणचे मी शिकले आणि मी आता नेहमी सगळे लोणचे स्वत: बनवते. संत्र्याचा व आवळ्याचा मुरब्बा देखील मी दरवर्षी बनवते. निरनिराळे पदार्थ बनवून दुसऱ्यांना खाऊ घालणे मला मनापासून आवडते. तिळाचे बिजोरे, दुधी भोपळ्याचे वडे, धने मिरही, दही मिरची, गाजराचे सांडगे, भेंडीचे सांडगे असे वाळवण्याचे अगणित प्रकार मी करते. हा छंद मी आजपर्यंत जोपासला.
माझा आणखी एक लहानपणापासून छंद आहे तो म्हणजे फुलझाडे लावण्याचा. माझ्या वडिलांना फुलांची खूप आवड होती. गुलाब, मोगरा, जाई, जुई, शेवंती, तगर, चमेली, तेरडी इत्यादी सर्व प्रकारची फुलझाडे ते लावीत व जातीने त्याकडे लक्ष देत. आम्ही भावंडे सुरीच्या दिवशी वडिलांबरोबर मळ्यात जात असू. त्यामुळे आम्हाला फुलझाडे लावण्याची आवड उत्पन्न झाली.
लग्न होऊन सासरी आले. माझ्या पतीची नोकरी खेडेगावी होती. झाडे लावण्याजोगी जागा नव्हती. कुंड्यातच रोपे लाऊन हौस भागवावी लागे. अखेर आमचे स्वत:चे घर झाल्यावर आम्ही घरापुढे बाग तयार केली. अंबा, लाल जास्वंद, कन्हेर, चांदणी, चाफा, कृष्णकमळ, शेवंती, पारिजातक, चमेली वगैरे फुलझाडे लावली. त्याना आम्ही नळीने पाणी घालतो, अधूनमधून खत घालतो. माझे पती व मी दोघेही झाडांची काळजी घेतो. त्यामुळे आमची बाग हिरवीगार आहे. झाडांची कटिंग अधूनमधून माझे पती करतात. फुलांचा सुगंध आसमंतात दरवळत असतो. त्यावेळी मन प्रसन्ना होते. फावल्या वेळात झाडांची निगा राखली म्हणजे वेळ जातो. कारण निसर्ग हीच एक मोठी संपत्ती आहे. अशा प्रकारे मी हा सुद्धा छंद आतापर्यंत जोपासला.
माझे बरेच जीवन खेड्यात गेले. त्यावेळेस टीव्ही वगैरे काहीच नव्हते. फक्त रेडियो ऐकणे किंवा पुस्तके वाचणे हीच करमणुकीची साधने होती. त्यामुळे मला वाचनाचाही छंद लागला. कादंबऱ्या, संत चरित्रे यांनी माझे कपात भरलेले असायचे. वाचनाची साथ मी कधीच सोडली नाही.
लेखिका: -
शरयू वसंत वडाळकर,
मालेगाव, (जि. नासिक)
वय - ६६
फोन - +91-8698003526
प्रतिक्रिया
17 Jan 2017 - 7:43 pm | शलभ
छान आहेत छंद..
17 Jan 2017 - 9:16 pm | सतिश गावडे
शिर्षकावरुन वाटले भावेंच्या आत्मचरित्राचे परीक्षण असावे.
छान लिहीले आहे.
17 Jan 2017 - 9:25 pm | संजय क्षीरसागर
असं वाटतं.
17 Jan 2017 - 9:30 pm | संजय क्षीरसागर
असं म्हणायचंय.
17 Jan 2017 - 9:50 pm | अनरँडम
तुमचे अनुभव चारचौघांपेक्षा वेगळे असतील असे तुम्हाला वाटत असेल तर जरूर लिहावे. पण फोननंबर वगैरे सार्वजनिकपणे जाहीर करू नये असे वाटते. या माहितीचा समाजकंतक गैरवापर करू शकतात.
17 Jan 2017 - 10:24 pm | संजय क्षीरसागर
समाज कंटकांची काय भीती ?
17 Jan 2017 - 10:39 pm | अनरँडम
पण आर्थिक गुन्हेगार (पिरॅमिड स्किमवाले) कोणालाही पकडू शकतात.
17 Jan 2017 - 10:44 pm | संजय क्षीरसागर
मला ट्रीपचा छंद नाही म्हणून सरळ सांगायचं.
17 Jan 2017 - 10:24 pm | पैसा
मिपावर स्वागत! तुमच्या पाककृती आणि झाडांची माहिती लिहा हळूहळू इथे.
17 Jan 2017 - 11:10 pm | यशोधरा
वाचते आहे..
18 Jan 2017 - 12:28 am | पद्मावति
तुमच्याकडून पाककृती शिकायला आवडेल. लिहित रहा.
18 Jan 2017 - 10:16 am | खेडूत
प्रामाणिक कथन आवडले. सविस्तर- बारकाव्यांसह लिहीलेत तर अजून चांगले वाटेल.
अजून लिहायचा छंदही लावून घ्या..!