विचित्र प्राण्यावरुन आम्हाला हे सुचल.
पुस्तकाचे मनोगत
काय! तुम्ही पण अंधश्रद्धाळूच की राव ! लग्नाला एक तप पूर्ण झाल्याचे निमित्त म्हणा औचित्य म्हणा साधून हे पुस्तक प्रकाशित करण्याचा मनोदय मी व्यक्त केल्यावर आमच्या एका स्नेहयांनी ही प्रतिक्रिया दिली. मला मोठी गंमत वाटली. मुहूर्त या प्रकाराविषयी मानसिकता अशी पण रुजत गेली त्याचा हा आगळा वेगळा पैलू. अनेक विवाह संस्था लग्न जुळवताना सर्व प्रकारची मदत करतात. माहिती पुरवतात. पण पत्रिकेला किती महत्व द्यावे असा प्रश्न उपस्थित होतो त्यावेळी तो ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत श्रद्धेचा प्रश्न आहे अशी भूमिका घ्यावी लागते. मग विवाहाचे वेळी पत्रिका जुळते का? हे बघणे ही श्रद्धा की अंधश्रद्धा ? असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. प्रश्नकर्त्याला समोरच्याची काय भूमिका आहे हे समजावून घेण्याचा तो एक मार्ग असतो. विचारणारा माणूस संभ्रमात पडलेला असू शकतो. तो विवाहाच्या वेळी पत्रिका बघून निर्णय देणार असेल तर त्याला हा प्रश्न पडू शकतो. कदाचित आपल्या या श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणून हिणवले गेले असण्याची खंत असू शकते. आपल्या या श्रद्धेला कुणाचा तरी पाठिंबा असण्याची शक्यता अजमावी हा हेतू असू शकतो. काही तरी गुळमुळीत सांगू नका राव ! एकतर श्रद्धा तरी म्हणा किंवा अंधश्रद्धा तरी म्हणा! असे म्हणून समोरच्याला कैचीत पकडण्याचा हेतू असू शकतो. त्या निमित्त काही तरी वादसंवाद घडावा अशीही इच्छा असू शकते.
आपल्या तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट या न्यायाने माझी ती श्रद्धा इतरांची ती अंधश्रद्धा! माझी श्रद्धा ही समाजाला हानिकारक नाही म्हणून ती अंधश्रद्धा ठरत नाही. श्रद्धा ही आत्मिक बळ देते. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. या पद्धतीची मांडणीही समाजात होताना दिसते.
परंतु तसे पाहिले तर श्रद्धा ही मुळातच अंध असते. त्या मुळे अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्या सारखे आहे. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. तसेच चिकित्सेशिवाय एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याचे नाकारणे ही पण एक श्रद्धाच! विश्वास हा पुराव्यावर आधारलेला असतो. त्यामुळे त्याची चिकित्सा होउ शकते. श्रद्धेची चिकित्सा होत नाही. म्हणूनच विवाह ठरवताना पत्रिका बघावी की नाही? हे कोणी अमुक प्रसिद्ध व्यक्ति सांगते म्हणून न ठरवता संबंधितांनी स्वत: पत्रिका बघण्याची, जुळविण्याची पद्धत समजून घेउन मगच ठरवावे एवढीच या पुस्तकाच्या निमित्ताने नम्र विनंती.
प्रकाश घाटपांडे
यंदा कर्तव्य आहे? भाग १
यंदा कर्तव्य आहे ? भाग २
यंदा कर्तव्य आहे? भाग ३
यंदा कर्तव्य आहे ? भाग ४
यंदा कर्तव्य आहे? भाग ५
यंदा कर्तव्य आहे? भाग ६
प्रतिक्रिया
3 Nov 2008 - 8:21 pm | विनायक प्रभू
छान जमला आहे लेख
3 Nov 2008 - 8:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यंदा कर्तव्य आहे, पुस्तकाबद्दल अभिनंदन. पुस्तकात अजून काय आहे, पत्रिका बघितल्या पाहिजेत की नाही, काही किस्से, असतील तर सांगितल्यास चिंतनही करता येईल.
बाकी मनोगत आवडलेच हे वेसानल.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
3 Nov 2008 - 10:01 pm | लिखाळ
१. तसा आमचा पत्रिकेवर विश्वास नाही ! पण शास्त्र म्हणून पाहुया :)
२. समोरच्या व्यक्तीला भविष्यात काही अपघात-विचित्र योग असतील अथवा दोनही पत्रिकात एकाच वेळी असे काही योग येत असतील तर तसे लग्न न करणे बरे ! या मताला अनुसरुन काही जण पत्रिका बघतात.
३. स्थळ पसंत नाही हे सांगण्यासाठी 'पत्रिका जुळत नाही' हे सांगता येते आणि कुणाचेच मन न दुखवता नकार देता येतो, हा सर्वात व्यवहारी उपयोग !
>पुस्तकात अजून काय आहे, पत्रिका बघितल्या पाहिजेत की नाही, काही किस्से, असतील तर सांगितल्यास चिंतनही करता येईल.<
बिरुटे सरांशी सहमत.
बाकी ज्योतिषशास्त्र खरे की खोते हा मूळ प्रश्न स्वतःसाठी निकालात निघाला की लग्नाच्या ठरवाठरवीत पत्रिकेचे स्थान काय असावे ते आपोआपच ठरते.
लग्नाची निमंत्रण पत्रिका सर्वात चांगली आणि ती पटकन तयार करावी ! :)
--लिखाळ.
14 Feb 2009 - 4:12 pm | मृगनयनी
२. समोरच्या व्यक्तीला भविष्यात काही अपघात-विचित्र योग असतील अथवा दोनही पत्रिकात एकाच वेळी असे काही योग येत असतील तर तसे लग्न न करणे बरे ! या मताला अनुसरुन काही जण पत्रिका बघतात.
सहमत!
३. स्थळ पसंत नाही हे सांगण्यासाठी 'पत्रिका जुळत नाही' हे सांगता येते आणि कुणाचेच मन न दुखवता नकार देता येतो, हा सर्वात व्यवहारी उपयोग !
त्रिवार सहमत!
:)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
3 Nov 2008 - 10:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
वाचून वाटलं घाटपांडे काकांनी अभिरतसाठी एक प्रश्नपत्रिका तयार केली की काय? म्हणून उघडणार नव्हते, पण नावाची ग्यारेंटी होती म्हणून उघडला.
काका, लेख आवडला, खूप छान लिहिलं आहेत. माझ्या बाबतीत आम्ही दोघंही भविष्य, पत्रिका, मुहूर्त यावर विश्वास ठेवत नसल्यामुळे विवाह नोंदणी कार्यालयातल्या लेखनिकाला जेव्हा लवकरात लवकर वेळ मिळेल तोच मुहूर्त धरुन सह्या ठोकल्या.
चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. तसेच चिकित्सेशिवाय एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याचे नाकारणे ही पण एक श्रद्धाच!
+१
अदिती
3 Nov 2008 - 11:24 pm | विसोबा खेचर
अरे वा! पुस्तक लिवल्याबद्दल अबिनम्दन बरं का घाटपान्डेसाहेब! :)
आपला,
(कर्तव्य नसलेला) तात्या.
4 Nov 2008 - 9:08 am | प्रकाश घाटपांडे
"यंदा कर्त्यव्या आहे ?"हे पुस्तक २००४ मध्ये प्रकाशित आहे. खर तर ती विवाह व ज्योतिष एवढ्याच मर्यादित विषयावरील पुस्तिका आहे.मिपासाठी नवीन आहे. पहिले पुस्तक म्हणजे ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद. इथे फुकट वाचता येत पण दुकानातुन खरेदी केले की ७५ रु पडतात.
(येक रुपया बी न भेटलेला)
प्रकाश घाटपांडे
4 Nov 2008 - 11:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(येक रुपया बी न भेटलेला)
प्रकाश घाटपांडे
हा हा हा =))
अवो, साहेब..तुमी पैशासाठी थोडी लिव्हता, अहो तुमचा इशय प्रबोधनाचा..तव्हा पैशाचा अन परबोधानाची
सांगड कशी घालणार .ज्यानला जमते त्यायच्या कोर्या कागदाचे बी पैशे होतात,तेबी पाह्यलं हाये आमी :)
तव्हा लिव्हीत राव्हा !!!
-दिलीप बिरुटे
14 Feb 2009 - 1:15 pm | प्रकाश घाटपांडे
कर्तव्य करताना जर काही लोकांना थकवा आला आणि ते जर कर्तव्य मुक्त झाले तर 'मिळून सार्या जणीं 'नी त्यांच्या साठी व्यासपीठ केले असुन कर्तव्यमुक्तीनंतर आता कसे वाटते ? असा विषय घेतला आहे. इच्छुकांनी आपले लिखाण त्यांच्या कडे पाठवावे
प्रकाश घाटपांडे
14 Feb 2009 - 5:18 pm | राहूल
"परंतु तसे पाहिले तर श्रद्धा ही मुळातच अंध असते. त्या मुळे अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्या सारखे आहे."
एकदम बरोबर. या गोष्टीवरून बर्याच लोकांशी माझे वाद झाले आहेत.
लेख खूपच छान आहे.
- राहूल.